Wednesday, 29 October 2014

कुमार गंधर्व : एक पुण्यस्मरण



       गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात जन्माला आलेल्या पिढीचं एक दुर्दैव कायम असणार आहे. असं म्हटलं जातं कि कोणत्याही कलेचा, साहित्याचा विकास फक्त स्वातंत्र्यातच होऊ शकतो. तसं झाल्याचा परिणाम आल्याला दिसतो कि सर्व क्षेत्रातील असामान्य प्रतिभा आणि ती प्रतिभा लाभलेली माणसं या शतकांनी पहिली. त्या माणसांना बघण्याच, ऐकण्याच, अनुभवण्याच भाग्य या पिढीला लाभलेला नाही. लेखक, गायक, वादक, चित्रकार, शिल्पकार सर्वच क्षेत्रात २० व्या शतकात अनेक माणस निर्माण झाली. आपल्या पिढीच्या नशिबी त्या लोकांचा फार सहवास नाही. प्रेरणादायी चरित्राने दिपून जावं, स्वर्गीय आवाजाने खरोखर स्वर्गसुखाचा आनंद देणारे आवाज आता फार राहिलेले नाहीत. एखाद्या विशाल झाडाच्या पायाशी बसावं, दोन क्षण शांततेचा थंडगार सावलीचा अनुभव घ्यावं पुढे निघावं, किंवा नुसत्या षड्जानी अजस्त्र सह्याद्रीची आठवण व्हावी अशीही माणसं आता राहिलेली नाहीत. म्हणून अशा चरित्र नायकाची आठवण येत राहते. यातली बऱ्यापैकी माणसे आपण जाणते होण्याआधीच निघून गेली याच दोष कोणाला द्यायचा?
      त्यातल्या ‘कुमार गंधर्व’ यांची आज विशेषत्वाने आठवण होते आहे याचं कारण येत्या १ नोव्हेंबरला ‘कालजयी कुमार गंधर्व’ या ग्रंथाचे पुण्यात प्रकाशन होणार आहे. हा ग्रंथ इंग्लिश आणि मराठी या दोनीही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे आणि मुख्य म्हणजे हा ग्रंथ दोन खंडांमध्ये असणार आहे. कदाची ‘कुमार गंधर्व’ यांच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकाचा उद्योग प्रथमच होत असेल. म्हणून आज त्यांची आठव होते आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे चरित्र प्रेरणादायी आहे. शांततेचा अनुभव देणारे आहे. विशाल झाडाच्या सावलीमध्ये बसल्याचा आनंद देणारे आहे. पण एक गोष्ट सर्वात महत्वाची जी जाणवते ती अशी कि ‘अत्यंत दुःखाच्या परिस्थितीमध्ये खचून जायचं नसतं तर त्या दुःखाने, निराशेने आणि Negativity ने भरून राहिलेल्या स्थितीतही आपल्या व्यक्तीमत्वातील सर्वोत्कृष्ट ते बाहेर येऊ द्यायचं असत. सर्व लोकांना शुद्ध शास्त्रीय संगीत आवडेलच अस नाही, तसा आग्रह पण नाही पण कुमार गंधर्वांकडे पाहून ‘दुःखाच्या परिस्थितीत निराश व्ह्यायचं नाही तर आपल्यातून सर्वोत्कृष्टला बाहेर येऊन द्यायचं’ हे जरी समजलं तरी आनंद मानला पाहिजे.
      लोकमान्य टिळकांच्या “अरे, हा तो बालगंधर्व!” याच चालीवर कोणीतरी छोट्या ‘शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीनाथ’ नावाच्या मुलाकडे बोट करून “अरे, हा तो कुमारगंधर्व!” असे म्हटले. ते वयाच्या १०व्या वर्षी. छोटा शिवपुत गाण्याकडे वळण्याच कारण मात्र मोठं गमतीदार आणि विचित्र आहे. शिवपुत्राचे वडील किरान घराण्याचे गायक होते. आईसुद्धा गोड गाणारी होती. वडील शिवपुत्राच्या थोरल्या भावाला बालगंधर्वांच्या रेकॉर्ड ऐकवायचे आणि त्याप्रमाणे म्हणायला सांगायचे. तोपर्यंत शिवपुत्र कोमकलीनाथ अजून कुमार गंधर्व झालेले नव्हते इतकेच नव्हे तर शिवपुत्र म्हणूनही त्यांना कोणीच विचारत नव्हतं. बालगंधर्वांची पद म्हणून जुन्या बेळगावमध्ये शिवपुत्राचा थोरला भाऊ मात्र मोठ कौतुक मिळवत होता. लोकं आपल्याला मात्र विचारीतही नाहीत आणि मोठ्या भावाचं मात्र भरपुर कौतुक करतात याच छोट्या शिवपुत्राला त्रास होत असेल. लहान शिवपुत्राला ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवण्याची स्वाभाविक भावना निर्माण झाली. थोरल्या भावासाठी आणलेल्या रेकॉर्ड्स तो एकून म्हणू लागला. वय वर्ष ७. एका आसुयेपोटीच शिवपुत्र गाण्याकडे वळला. वयाच्या ७ व्या वर्षी आपण पण कोणी कमी नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी म्हटलेलं बालगंधर्व याचं एक पद, हा प्रवास पुढे ‘मला उमजलेले बालगंधर्व’ इथपर्यंत पोचतो. ५२-५३ साली मुंबईला बालगंधर्वांच्या उपस्थितीत कुमार गंधर्वांनी हा कार्यक्रम केला. हा त्यांचा एक सन्मान मानला गेला. हा प्रवास ९० साली मिळालेलं पद्मविभूषण आणि ९२ साली मृत्यूपर्यंत सुरूच होता.
      भावाला हरवण्यासाठी सुरु झालेला प्रवास पद्मविभूषण पर्यंत सहज, सरळ झालेला नाही. माझ्या मते चरित्रनायकाच्या आयुष्यात तसं अपेक्षितही नाही. चाळीसच्या दशकात त्यांना टीबी झाला, तो ५ वर्ष टिकला. म्हणजे पाच वर्ष गाणं पूर्ण बंद. अशाच एक दीर्घ आजारात एक फुफुस काढून ताकाव लागलं. शास्त्रीय गायकाला एक फुफुस नाही म्हणजे काय करिअर उरलं? पण दुःखाच्या परिस्थितीमध्ये आपल्यातलं उत्तम ते बाहेर येऊ द्यायचं म्हणजे काय? एक फुफुस नसल्यामुळे श्वास फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी पूर्वीच्या ३२-३२ आवर्तनाच्या ताना ८ आवर्तानापर्यंत लहान केल्या. आणि लहान ताना हि एक नवीन परंपराच त्यांनी जन्माला घातली. हॉस्पिटलच्या दीर्घ काळात त्यांनी मध्य प्रदेशातील लोकसंगीताचा अभ्यास केला. तो सुद्धा हॉस्पिटलच्या खोलीत बसून. रस्त्यावर सुरु असलेलं संगीत त्यांनी ऐकल आणि लोकगीताच्या स्वरबिजातून त्यांनी सहेल तोडी, मधसुरजा, मालवती, मघवा यांच्यासारख्या धुनरागांचे व्रुक्ष फुलविले. नवीन राग जन्माला घातले. ७१ च्या युद्धात भारताने प्रचंड विजय मिळवला त्याचा आनंद त्यांनी नवीन राग जन्माला घालून साजरा केला. इंदिरा गांधींच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून त्या रागाचे नाव ‘प्रियदर्शनी’ ठेवले आणि तो राग त्यांनी इंदिरा गांधीना अर्पण केला.
      भारतीय शास्त्रीय संगीतच एक महत्वाच वैशिष्ट्य आहे. राग हा प्रकार एका विशिष्ट format मध्ये बांधलेला असतो. तो राग सदर करण्याचे नियमही काटेकोर असतात. कोणत्या रागाचे कोणते सूर कोमल, कोणते मध्यम, कोणते तीव्र हे सगळा ठरलेलं असत. तानांची निवड कशी करायची, सरगम कसा असावा हे सर्व ठरलेलं असतं. ते सर्व आत्मसात करून, पचवून आपली प्रतिभा त्याला जोडून नवीन भर घालता येते. या वैशिष्ट्यामुळे कोणताही बंधन सादरीकरणाच्या आड येत नाही. याच संदर्भात पुलंनी मस्त किस्सा सांगितला आहे. आचार्य अत्र्यांच्या उपस्थितीत कुमार गंधर्वांची एक मैफल झाली. त्यावेळी त्यांनी ‘हमीर’ हा राग सादर केला, पण ते कोणाच्याच लक्षात आलं नाही. अत्र्यांनी विचारलं हमीर सारखा सर्वश्रुत राग असून सुद्धा तो कोणाच्याच लक्षात आलं नाही हे कसा काय? त्यावर कुमारजी म्हणाले; “लोकांची चूक नाही, आत्रेसाहेब ह्या लोकांना राग जर समोरून आला तरच ओळखता येतो. मी ‘हमीर’च प्रोफाईल रंगवत होतो. कुमारजी म्हणत असत, “एखाद्या प्रियकराची प्रयासिशी प्रथम “पहिली वळख गोडीची” व्हावी, तशीच रागाच्या कुल्मार्यादेत वाढलेल्या चीजेचा अंतर्यामी जाऊन तिची ओळख करून घ्यावी लागते. सौंदर्याच्या नानाप्रकारात दडलेल्या स्थानांचा शोध घ्यावा लागतो. चीजेची आधी सगळी फिगर दाखवायला पाहिजे. एखादी सुंदर जागा असते. म्हणजे काय पुन्हा पुन्हा तीच दाखवायची? बाईच नाक सुंदर आहे म्हणून फक्त नाकाच चित्र काढतात का? अरे, चेहे-याच्या प्रपोर्शन मध्ये नाक छान दिसत! समाज डोळे तिरळे असले, तर नाक कितीही छान असुदे इम्प्रेशन राहील का? म्हणून चीजेची ओळख चांगले हवी. तर प्रोफाईल वगैरे जमतं!”
      बेगम अख्तर यांनी गायलेली एक सुंदर गझल आहे, ‘जाने क्यू आज तेरे नाम पे रोना आया है|’ त्यात थोडासा बदल करून म्हणाव असं वाटतं कि, ‘जाने क्यू आज तेरे ना होने पें रोना आया है| रोना आया है||’                                   

Thursday, 16 October 2014

अर्पणपत्रिका ...

पण जराशा वेगळ्या वाटलेल्या!!




माझ्या मोठ्या भावानी मला वाचनाची आवड लावली.

आईनी सगळ्या प्रकारचं वाचायची सवय लावली. आणि आई चा आग्रह आहे कि पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत सगळ वाचायचं. सखाराम गटणे मध्ये समालोचन आहे ना? तस्सच !!  पुस्तकच नाव, लेखकांच नाव,प्रकाशकाच नाव, पत्ता, किमत आवृत्ती सगळ. ते वाचण्यात कधीच कोणतं problem वाटला नाही म्हणा, पण एक फायदा मात्र नक्की झाला. लेखकाची प्रतिभा मला अर्पणपत्रिकेपासूनच दिसायला सुरवात झाली. बऱ्याच वेळेला ते एखाद्या व्यक्तीला अर्पण केलेलं असलं तरीसुद्धा त्यामागची भावना किती महत्वाची आहे हे अर्पणपत्रिकेतुनच लक्षात येत. माझ्या वाचनात आलेल्या काही हटके अर्पणपत्रिकांचा हा संग्रह. यात केवळ व्यक्तींना केलेली पुस्तके नाहीत. तर सर्वस्वी वेगळा विचार त्यामागे आहेत अशा काही खास अर्पणपत्रिका.


१. दिपस्थंभ - प्रा. शिवाजीराव भोसले : 
उगवत्या पिढीच्या उमलत्या बुद्धीस



 २. त्रिवेणी - गुलजार :
शांताबाई - आप सरस्वती  कि तरह हि मिली 
 और सरस्वती कि तरह हि गुम हो गायी |
ये 'त्रिवेणी' 
आप हि कॉ अर्पित करता हुं |
-गुलजार    


३. कोसला - भालचंद्र नेमाडे :
शंभरातील नव्याण्णवांस


                                              ४. कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण :
                                               आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला
                                               आकार आणि आशय देणारी माझी 
                                               प्रिय पत्नी 'सौ. वेणूताई' हिच्या स्मृतीस. 


५. स्वतः विषयी - अनिल अवचट :
सुनंदा - हे पुस्तक अर्पण करण्यासाठी तुला काही काळ 
माझ्यातून बाहेर काढव लागतंय, त्याबद्दल थोडी रुखरुख आहे. 


६. भारतीय लोकसत्ता -डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे :
भारताच्या जागृत लोकशक्तीस


७. उरलंसुरलं - पु. ल. देशपांडे :
माझ लिखाण आनंदाने हसत हसत स्वीकारणाऱ्या 
माझ्या वाचकवर्गालाच हे 'उरलंसुरलं' कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.


८. आपण सारे अर्जुन - व. पु. काळे :
संसारात माणसाला काय हव असत?
इंग्रजी भाषेत योग्य शब्द आहे -
CONCERN
याच्या जोरावर बाकीचे सगळे मतभेत दृष्टीआड करता येतात.
यशस्वी संसारच हेच सूत्र आहे, CONCERN
हि आवृत्ती त्या संसाराला !


९. गुलमोहर - व. पु. काळे :
काही काही व्यक्तींच्या बाबतीत 
'त्याचं आणि तुमचं नातं काय?' 
असा प्रश्न विचारला जातो. 
नातेवाईकांकडून फटके खाऊनही 
नात्याचं महत्व संपत नाही. 
नुसती मैत्रि एवढ्यावर समाधान होत नाही. मैत्री आणि नातेवाइक यांच्यामध्ये एक धूसर पडदा असतो
तो दिसत नाही पण जाणवतो.
हा 'गुलमोहर' त्या धूसर जाणीवेला.


१०. पुर्णामाईची लेकरे - गो. नी. दांडेकर
मायबोली मराठीचे कवतिक 
परम शिवभक्त 
श्री. बाबासाहेब पुरंदरे 
यांस. 
गोपाल नीलकंठ दांडेकर


११. आम्ही भगीरथाचे पुत्र - गो. नी. दांडेकर:
त्या शूर कामगारांच्या पावन स्मृतीस 
भाकरा धरण बांधित असता
आपल्या अमोल प्राणाचे बलिदान केले.


१२. कुणा एकाची भ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर :
 युगा अठ्ठावीसांची वेदना.....
- तिला 
-कुणी एक


१३. अजुनी नाही जागे गोकुळ - गो. नी. दांडेकर :
व्यथा अनादी काळापासूनची 
तिला- 


१४. विज्ञानेश्वरी - दत्तप्रसाद दाभोलकर
सातशे वर्षापूर्वी 
विज्ञान सहजपणे 
माझ्या भाषेत आणणाऱ्या 
माझ्या ज्ञानेश्वराना.


१५. मौनाची भाषांतरे - संदीप खरे :
 या ठिकाणी नाव नसल्यास  
ज्यांना वाईट वाटेल, वा राग येईल
अशा सर्वास..


१६. तुझ्यावरच्या कविता - संदीप खरे :
कुणालाच नको... मलाच राहूदे !!


१७. गारंबीची राधा - श्री. ना. पेंडसे :
खेड, दाभोळपासून बंदरपत्त्यावरील 
मुरुड, मुर्डी 
अंजर्ल्यापर्यंत गेलेल्या 
दापोलीच्या लाल मातीस 

या मातीचे मी देणे लागतो.



१८. तुंबाडचे खोत - श्री. ना. पेंडसे :
त्या थोर कादंबरीकरांना 
ज्यांनी
माझी जागा मला दाखवली


१९. पानिपत - विश्वास पाटील :
-मराठी मातीस..

२०. हे counting सुरूच राहील ....

Friday, 3 October 2014

शिवाजी 'खरच' कोण होता? भाग - २

गोब्राह्मणप्रतिपालक कि कुळवाडी भूषण? 

               गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्य निमित्ताने आणि आजच्या समाजाची आणि राजकारणाची स्थिती यावरून हे चिंतन सुरु झालेला आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मण - ब्राह्मणेतर चळवळ आज एका वेगळ्या उक्कामावर पोचली आहे अस दिसतं. त्या चळवळीचा मुळात पायाचा भुसभुशीत आहे. म्हणजे सर्व चळवळ एका चुकीच्या मुद्द्यावर सुरु आहे पण तो आत्ताचा विषय नव्हे. त्या चळवळीचा आजचा वाद याशिवाजी महाराज 'गोब्राह्मणप्रतिपालक होते कि कुळवाडी भूषण होते?' या मुद्द्यावर सुरु आहे. आणि काही संस्थांकडून चुकीच्या मुद्द्यावर सुरु असलेला हा वाद मोठ्या हिरीरीने चालवला जातो. आज शिवाजी राजांच्या आयुष्यातून आणि सार्वजिक जीवनातून सर्व ब्राह्मण समाज संपवून टाकण्याची भाषा होते ते पण अधिकृत पातळीवर. जाहीर सभांमधून ब्राहमणांच्या कत्तलीचे आदेश दिले जातात. आणि सत्ताधार्यांचाही त्यांना पाठींबा असतो. कदाचित त्यामुळेच काही संघटना हे धैर्य करू शकत असतील. नुकतंच 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक वाचालं आणि पुन्हा एकदा हे जाणवलं कि कम्युनिस्ट इतिहासकार जनतेला अंधारात ठेवण्याच किंवा गरजेपुरता प्रकाश दाखवण्याच काम किती निष्ठेने, श्रद्धेने, मोठ्या आत्मीयतेने करतात. त्यामुळे ह्या विषयाल हात घालणं कधी तरी महत्वाच वाटत. आज मुख्यतः गोब्राह्मणप्रतिपालक का कुळवाडी भूषण? याचा विषयावर मी लिहिणार आहे. 
               शिवाजी महाराजांना 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हंटला कि काही संघटनाची आणि व्यक्तींची तळपायाची आज मस्तकात जाते. त्यामध्ये पानसरे पण येतात. 'गोब्राह्मणप्रतिपालक' हि पदवी त्यांना कमीपणाची वाटते. या पदवी मुले शिवाजीराजांच्या कार्याला कमीपणा येतो अस (काही अपवाद वगळता) सर्वांना वाटत. माझ्या मते 'गोब्राह्मणप्रतिपालक' याच्या इतकी विशाल, प्रचंड व्याप्ती असलेली पदवी शोधून सापडणार नाही. का? याचा उत्तर स्वयंभू विशाल असलेल्या मुद्द्यावरून सुरु होतं. तो मुद्दा आहे शिवाजी राजे 'हिंदुपदपादशाहा' होते का? याचा उत्तर पुरोगामी, सेक्युलर, समाजवादी आणि साम्यवादी नाही अस देतील. पण तरी ते हिंदुपदपादशाहा होते. शिवाजी महाराज एतद्देशीयांचे राजे होते, त्यामध्ये ८५% हून अधिक समाज हिंदूधर्मीय होता. हा इतद्देशियांचा राजा जेव्हा जाणीवपूर्वक, संपूर्ण विचार करून वेद मंत्रांनी स्वतःला अभिषेक करून घेतो तेव्हा तो हिंदूंचा राजा होत नाही काय? (वा. सी. बेंद्रे यांचा पुस्तक 'राज्याभिषेक प्रयोग' म्हणून आहे त्यामध्ये त्यांनी राज्याभिषेकाचे सर्व विधी मंत्रांसकट दिले आहेत, ज्यांना वाचता येतात मनाचा आणि डोळ्याचा पिवळेपणा दूर सारून त्यांनी वाचाव) एतद्देशियांचा राजा वेद्मान्त्राणि अभिषिक्त होतो यापेक्षा वेगळा पुरावा म्हणून काय पाहिजे शिवाजी हिंदुपदपादशाहाच होता हे सांगयला. ज्यावेळी एखादा राजा वेद्मान्त्रानी स्वतःला अभिषेक करून घेतो तेव्हा त्याच्यावर 'गोब्राह्मणप्रतिपालक'असण्याची जबाबदारी आहे.गाई,वेदआणि ब्राह्मण हि तीनीही हिंदू धर्माची प्रतीके आहेत. जो राजा स्वतःला वेदमंत्रांनी अभिषेक करून घेतो त्याची हि जबाबदारी आहे कि हिंदू धर्माच्या आणि त्याच्या प्रतीकांच्या रक्षणाच. 
               गाय या चार पायाच्या जनावराकडे आपण जोपर्यंत चार पायाचे जनावर म्हणून पाहतो तो पर्यंत राजा 'गोब्राह्मणप्रतिपालक' असण्यात त्याचा अपमान आहे. परंतु ते जनावर म्हणून  न पहाता हिंदूधर्माच प्रतिक म्हणून त्याच्या कडेपहिल पाहिजे.एखाद्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज हा कापडाचा एक तुकडाच असतो. एक केशरी तुकडा असतो, एक पांढरा असतो, एक हिरवा असतो ते जोडलेले असतात. या तीन तुकड्यांना स्वयंभू अस महत्व आहे का? नाही. पण महत्व केव्हा आहे जेव्हा तो एकत्र तुकडा उभ्या देशाकडून जेव्हा राष्ट्रध्वज म्हणून मान्य केला जातो तेव्हा त्याच तीन तुकड्यांना राष्ट्रीय महत्व मिळत. तो उभा आहे का आडवा, सरळ आहे का उलटा यावरून मानवी हत्या सुद्धा हौ शकतात किंबहुना त्या क्षम्य मानल्या जातात. त्याचप्रमाणे गाय हे हिंदूधर्मच प्रतिक आहे. समस्त हिंदू समाजानी गाय हे प्रतिक मानलं आहे. गाई प्रमाणे ब्राह्मण हे ही हिंदूधर्मच प्रतिक आहे. त्यामुळे शिवाजीवर 'गोब्राह्मणप्रतिपालक' असण्याची जबाबदारी आहे. 
               गैरसमज होऊ नये यासाठी अधिक खुलासा करणं जरूर आहे. 'ब्राह्मण' हा वर्णव्यवस्थेतलं किंवा जातिव्यवस्थेतला एखादा वर्ण किंवा जात नसून अत्याधुनिक शास्त्रचं, संस्कृत भाषेच अध्ययन करणारा कोणत्याही आर्थिक फळाची अपेक्षा न ठेवणारा एक समाज समूह आहे.असा जो वर्ग आहे त्या वर्गाचा सांभाळ खरं म्हणजे सर्व राजांनी आणि राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. ब्राह्मण या जातीचा शिवाजी राजा प्रतिपालक होता का? तर नव्हे. ब्राह्मण्य सोडलेले जे ब्राह्मण आहेत त्यांचा शिवाजी राजा प्रतिपालक आहे. हल्ली आपण जो मुद्दा ठळक पणे आपण पहात/वाचत असू तो म्हणजे अफझलखानाच्या वधा पेक्षा महत्वाच म्हणजे कृष्णाजी भास्कर ला शिवाजी राजांनी मारला. चुकीच्या संदर्भात वापरला तरी मुद्दा खोटं ठरत नाही.'गोब्राह्मणप्रतिपालक' असण्यात  शिवाजी राजांचा कोणताही अपमान नाही कमीपणातर नाहीच नाही.  
               अजून एका छोट्याश्या मुद्द्याचा उल्लेख कारण समकालीन संदर्भात गरजेचं आहे. गोविंद पानसरे यांच्यासकट जे म्हणतात कि 'गोब्राह्मणप्रतिपालक' हा शब्द राजांच्या अधिकृत पत्रांमध्ये कुठेही नाही, त्यामुळे राजांना 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हणता येणार नाही. अधिकृत पणेराजांच्ये पत्रामध्ये उल्लेख नाही हे म्हणण सुद्धा वस्तुस्थिती सोडून आहे. मी रामचंद्रपंत अमात्यांच एक पत्र दाखवू शकतो. तर पानसरे जे म्हणतात कि इतिहासाशी इमान राखून बोलायचं झालं तर शिवाजी राजांना 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हणता येणार नाही.हे सर्वाशी चुकीच आहे. इतिहासाशी इमान राखून जे शिवाजी महाराजांना 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हणणार नाहीत त्यांनी अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी कि 'पूत शुद्राचा' किंवा 'कुळवाडी भूषण' या दोन शब्दांनाही ऐतिहासिक कोणताही आधार नाही. हे दोनीही शब्द महात्मा जोतीराव फुल्यांच्या शिवाजी वरच्या पोवाड्यामध्ये आलेले आहेत. इतिहासाशी इमान राखून जे शिवाजी राजांना 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हणणार नाहीत त्यांनी 'कुळवाडी भूषण' हि म्हणू नये. 'गोब्राह्मणप्रतिपालक' यानी शिवाजी च्या कर्तुत्वाला कमीपणा येतो म्हणून नाही पण कुळवाडी भूषण मध्ये समता दिसते हे चुकीच आहे. कोणत्याच पदवीने शिवाजीला कमी पणा येत नाही. पण पानसरे 'गोब्राह्मणप्रतिपालक' संकुचित आणि चुकीचं पण कुळवाडी भूषण कसा उदार हे इतिहासाशी इमान राखून दाखवण्याचा प्रयत्न करतात तो चुकीचा आहे. 
               शब्द हे किती प्रभावी मध्यम आहे हे एका छोट्याश्या गोस्तीवरून दाखवता येईल. तथाकथित पुरोगामी इतिहास लेखकांकडून अशी समजून करून देण्यात आली आहे कि शिवाजी राजांनी  गागाभट्टांना 'बोलावून' आणलं. याचा अर्थ असा होतो कि शिवाजीने उभ्या केलेल्या राज्याला अखिल भारतीय आणि धर्मच स्वरूप मिळावा यासाठी आणि राज्याभिषेकासाठी राजांनी गागाभट्टांना बोलावल. हे सर्वस्वी चुकीच आहे. शिवाजीला राजा म्हणवून घेण्याची इतकी घाई किंवा हौस नव्हती. परंतु जो माणूस आणि धर्म शिवरायांच क्षत्रियत्व आणि राजा होण्याचा अधिकार नाकारत होता अशा लोकांना आणि धर्माला विरोध करण्यासाठी, त्या विरोधाला धर्मवाड़मयातुनच उत्तर देण्यासाठी. हिंदू राजा राज्यपदावर बसला पाहिजे यासाठी धर्माचा अन्वयार्थ लावाला म्हणून आणि आपली विद्वत्ता शिवाजी राजांच्या मागे उभी करण्यासाठी गागाभट्ट काशीहून आपन्हुन्स्वाथ आले आहेत. आणि मग राज्याभिषेक पार पडलेला आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचा हा एक भाग असल्यामुळे इथे सांगितला.    
               


Wednesday, 1 October 2014

शिवाजी 'खरच' कोण होता? भाग - १

याला इतिहासाशी इमान राखून लिहिणे म्हणतात का? 



'हिंदू विरोध', 'हिंदुत्व विरोध', 'हिंदू देव देवतांच्या अवास्तव अपमानाचं अवास्तव समर्थन' अशा 'सेक्युलर' गोष्टींचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा सर्व 'समाजवादी', 'साम्यवादी', 'आंबेडकरवादी', आरक्षणवादी' (माझा आरक्षणाला बिनशर्त पाठींबा आहे), 'बमसेफी', 'मूलनिवासी', 'नास्तिकवादी', 'सर्व ब्रिगेडवादी', 'मुक्ती मोर्चा वादी' प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे पाठींबा देतात. या मागची मानसिक भूमिका काय असेल? हिंदू म्हणजे काय हे समजून न घेता, आणि हिंदू म्हणजे केवळ वैदिक असा गैरसमज जाणीवपूर्वक करवून घेऊन तयार झालेले हे सेक्युलर आहेत. याच परंपरेतले असल्यामुळे 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तकही 'सेक्युलर' परंपरेतले झालेले आहे. डाव्या चळवळीतला एक विचारवंत मध्ये म्हंटला सुद्धा कि, ''ब्राह्मणद्वेष पुरोगामित्वाला मारक ठरलेला आहे'' ह्याचा गांभीर्यानी पुरोगाम्यांनी विचार करायला हवा. शिवाजी 'खरच' कोण होता? या लेखांमागचे सर्व चिंतन 'शिवाजी कोण होता?' या कॉ. गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून सुरु झालं आहे. पानसरे ज्या घटनेचा जाणीवपूर्वक उल्लेख करतात ते म्हणजे या पुस्तकाच्या निर्मितीची कहाणी. 'शिवाजी कोण होता?' या विषयावर नागपूरच्या 'धनवटे' कॉलेजच्या सभागृहात २ दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. तिकिटे लावून दोन दिवस हि व्याख्यानमाला झाली. हे धनवटे कॉलेज म्हणजे जिथे 'भांडारकर तो झाकी है, शनिवारवाडा अभी बाकी है' अशा शीर्षकाची पुस्तके लिहितो तो प्राध्यापक मा. म. देशमुख तिथे इतिहास शिकवतो. म्हणजे पूर्वी शिकवत असे. धनवटे कॉलेजमध्ये इतिहास शिकवणारा हा प्राध्यापक आणि त्याच कॉलेज मध्ये 'शिवाजी कोण होता?' या विषयावर दोन दिवसांची व्याख्यानमाला हा निव्वळ योगायोग आहे अस मला वाटत नाही. जर धनवटे कॉलेजचा पुस्तकाच्या निर्मितीमध्ये काही वाटा असेल तर ते इतिहासाशी इमान राखून नाही. माझा अस स्पष्ट म्हणण आहे कि साम्यवादी आणि विवेकवादी संघटनांनी      ( या मध्ये हे दोनच 'वादी' का? तर ह्या दोन संघटना कोणत्यातरी तात्विक पायावर उभ्या आहे, केवळ दुसऱ्याच्या द्वेषावर नाही. )अशा लोकांना आपल्या कामापासून दोन हात दूर ठेवावं हेच खरं.


मला असं वाटतं कि गोविंद पानसरे पुस्तकाच्या सुरवातीला ऐतिहासिकदृष्ट्या सत्य मुद्दे सांगून वाचकांचा विश्वास संपादन करतात आणि पुढे मोठ्या आत्मविश्वसनी अर्धसत्य मुद्दे सांगतात. सुरवातीला विश्वास संपादन करून पुढच्या अर्धसत्याची ते तयारी करत आहेत. पुस्तकाच्या सुरवातीची प्रकरणे वतनदारी नष्ट केली, शेतसा-याची पद्धत, स्त्रियांचा सन्मान आणि सुरक्षितता, शेतकऱ्यांसाठी जाणता राजा, उद्यागांना आणि व्यापाऱ्यांना संरक्षण असे सर्वस्वी महत्वाचे आणि संपूर्ण सत्य ते मांडतात. पण पुढचे मुद्धे इतिहासाला धरून आहेत असं बिलकुल वाटत नाही. हे लिखाण इतिहासाशी इमान राखून केलेलं नाही.

सर्वात महत्वाचा मुद्धा. तुम्ही जेव्हा शिवाजी राजांवर एखादे पुस्तक लिहित आहात आणि ते वैचारिक आहे म्हणजे कादंबरी किंवा कथा, कविता नाटक नाही. तर एक वैचारिक पुस्तक लिहिता तेव्हा संदर्भग्रंथसूची सर्वात महत्वाची आहे. म्हणजे कोणत्या ग्रंथातून कोणतं मुद्दा घेतलेलं आहे. तशी सूची पानसरे देतात. त्या सूची मध्ये एकूण ४३ ग्रंथ आहेत. पण त्या ४३ ग्रंथांच्या यादी मध्ये एक 'सभासदाची बखर' सोडली तर एकही समकालीन पुरावे नाही. शेवटी समकालीन पुरावा म्हणून जे वापरल तर एक 'बखर?' (इतिहासशास्त्राचा असा संकेत आहे कि बखरींचा पुरावा म्हणून वापर करतान काही मर्यादा ठेऊन करावा) पण ते जाऊदे. सभासदाच्या बखरीमध्ये 'कृष्णाजी अनंत सभासद' स्वतः अस सांगतात कि या बखरीचे लेखन १६९७ मध्ये राजाराम महाराजंच्या देखरेखीखाली जिंजीच्या किल्ल्यात झाले आहे. याचा अर्थ सभासदाची बखर मराठ्यांच्या इतिहासाला समकालीन असली तरी शिवाजी राजांना समकालीन नाही. पानसरे एका भाषणात असं म्हणाले होते कि, ''भूषण नामक एक कवी होता पण तो विश्वासार्ह नाही. त्यामुळे 'अगर शिवाजी होतो, तो सुनते होती सबकी' यावर विश्वास ठेवायची गरज नाही.'' गरज नाही? सभसदापेक्षा कवी भूषण शिवाजी राजांना समकालीन आहे. त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही आणि तरी म्हणत राहणार 'इतिहासाशी इमान राखून' याला काही अर्थ नाही. अहो या भूषणाच सोडून देऊ पण या संदर्भग्रंथसूची मध्ये परमानंद नाही, जेधे शकावली नाही, जयराम पिंडे नाही, भूषण नाही, रामदास स्वामींचा साहित्य नाही. समकालीन संदर्भ न देता पण इतिहासाशी इमान असलेल हे कदाचित एकमेव शिवरायांच चरित्र असावं.

समकालीन संदर्भ न देण्याची गांभीर्यता लक्षात यावी यासाठी एक दोन उदाहरणं लक्षात घेणं जरुरीच आहे. 'कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर' हा शिवाजी राजांचा १६५६ पासूनचा सहाध्यायी आहे. १६७४ पर्यत तो महाराजांबरोबर आहे. त्यानंतर कदाचित त्याच मरण झालं असावं. त्यांनी जी शिवाजी महाराजांवर चरित्रात्मक आणि काव्यात्मक (एकाच वेळी) जो ग्रंथ लिहिला त्याच नाव आहे 'अनुपुरण' किंवा 'शिवभारत'. हा ग्रंथ मी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून लिहितो आहे अस परमानंद यात म्हणतो आहे. शिवभारतात ३४ पूर्ण अध्याय असून ३५ व्या अध्यायात ९ श्लोक आहे. शिवाजी राजे जेव्हा अफझलखानाला भेटायला गेले त्यांच्याबरोबर जे १० जणं अंगरक्षक म्हणून गेले त्या दहाही जणांची यादी या शिवभारतात देलेली आहे. अन्यत्र इतकी अचूक नावं दिल्याचं सापडणार नाही. शिवभारतात राज्याभिषेकाच वर्णन नाही. कारण कदाचित कवी तोपर्यंत जीवंत राहिला नसेल. पण शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून ग्रंथाची रचना होते आहे, याला ऐतिहासिक महत्व आहे का नाही? कॉ. पानसरे परमानंद संदर्भ ग्रंथ म्हणून वापरत नाहीत पण ग्रॅंड डफ् वापरतात. समकालीन व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण उत्तरकालीन आणि परदेशी व्यक्तीवर विश्वास ठेवणार, याला इतिहासाशी इमान राखून म्हणायचं का? त्याच प्रमाणे 'कवी भूषण' हा कनोजी ब्राह्मण शिवरायांची कीर्ती ऐकून महाराष्ट्रात आला आणि शिवाजी राजांना भेटला. शिवरायांनी औपचारिक जाहीर जरी केलं नसलं तरी तो शिवाजी महाराजांच्या दरबारातील राजकवी आहे. त्यांनी राजांवर जे काव्य रचलं. त्यावरही आपला विश्वास नाही का? बरं ! फादर हेरास यांनी पोर्तुगीज मधून एक कागद प्रसिद्ध केला, तो संभाजी राजांचा आहे. मूळ कागद १२ फुट लांब आहे. त्यावर संभाजी राजांचा हस्तक्षर आहे. त्यामध्ये संभाजी राजे शहाजी राजे आणि शिवाजी राजांबद्दल गौरवोद्गार काढत आहेत. पण हाही पुरावा पानसरे यांनी संदर्भ म्हणून दिलेला नाही. 'रामचंद्रपंत आमात्य' यांची आज्ञापत्र त्यांनी वापरली आहे, पण सोयीप्रमाणे. कदाचित साम्यवादी असल्यामुळे आर्थिक बाबींवर थोडा भर जास्त आहे. फक्त आर्थिक विषयांशी निगडीत अशीच आज्ञापत्र त्यांनी वापरलेली आहे. मग किमान असं म्हणू तरी नये की इतिहासाशी इमान आहे.

'कारनामा' म्हणजे कर्तबगारी या नावाचा एक ग्रंथ उपलब्ध आहे. तो मुसलमान सरदारांच्या औरंगजेबाशी असलेल्या पत्रव्यवहाराचा संग्रह आहे. तो हि या संदर्भग्रंथसूची मध्ये नाही. देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षानी आणि प्रत्येक विचारधारेनी स्वतःच्या गरजेनुसार, सोयीनुसार शिवाजी राजांच्या कर्तृत्वाचा अन्वयार्थ लावलेला आहे. काही प्रमाणात ते मला स्वाभाविकही वाटत. भगवद्गीतेप्रमाणे शिवाजी महाराजांचा आयुष्य सुद्धा संदिग्ध, त्याच वेळी गुंतागुंतीच आणि अनेक पदर असलेला असल्यामुळे अनेक अन्वयार्थ निघू शकतात. 'शिवाजी कोण होता?' हे प्रत्येकांनी आपापल्या विचारधारेनुसार मांडावं पण निम्मेअर्धे, सोयीचे पुरावे देऊन नव्हे. महाराजांना महाराष्ट्रात समकालीन पुरावे कोणते, महाराष्ट्राबाहेरील समकालीन कोणते? महाराष्ट्रातले उत्तरकालीन, महाराष्ट्राबाहेरचे उत्तरकालीन कोणते? हे इतिहासशास्त्रानी प्रमाण ठरवून दिलेला आहे. त्याच्या मर्यादेतच शिवाजी महाराजांची मांडणी झाली पाहिजे. निम्म, खोटं, असत्य सांगून काय मिळतं? आपला अजेंडा लोकांवर बिम्बावाण्यासाठी किमान इतिहासाचा वापर करू नका.

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....