शनिवारी रात्री कोणत्या तरी मित्राच्या घरी किंवा रूमवर सगळे जमतात. आपल्याला आवडतं ते खायला प्यायला घेऊन येतात. आणि गप्पा मारत बसतात. हा अनुभव बहुतेक सर्वांना असेल. अशा मैफलींना वयाचं बंधन नसतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा मैफलींना विषयाचं बंधन नसतं. मला तर असा अनुभव आहे कि एरवी उघडपणे बोलता येणार नाहीत असे सर्व गंभीर विषय सुद्धा तिथे सहज मोकळे होतात. रात्रभर गप्पा सुरु राहतात. मित्र दर्दी असतील तर कदाचित मागे बेगम अख्तर किंवा नुसरत फतेह अली (आपापल्या आवडीनुसार) सुरु असतो. एका प्रसन्न वातावरणात, हसत खेळत यच्चयावत विषय बोलले जातात.
आम्ही सुरु करतोय अशीच एक मैफल. वयाचं बंधन नाही, विषयाचं नाही, बेगम अख्तर किंवा नुसरत फतेह अलीचं सुद्धा नाही. साधारणपणे दिवसा चारचौघात बोलता येणार नाहीत असे विषय आपण मोकळेपणानी बोलणार आहोत, मांडणार आहोत. फक्त काही विशिष्ट्य आम्ही स्वतःला घालून घेतलेली आहेत. ती सांगणे गरजेचे आहे.
लहान तोंडी मोठा घास घेतो आहोत. पण ही मराठी भाषेची सेवा आहे. मराठी भाषेवर अमर्याद प्रेम आहे ते व्यक्त करण्याचं हे एक माध्यम आम्ही निवडतो आहोत. त्यामुळे जे विषय मराठीमध्ये कमी लिहिले गेले आहेत किंवा दर्जेदार विषयाचे दरवाजे अजून मराठीसाठी उघडले गेले नाहीत, अशा विषयांना या मैफलीत प्राधान्याने स्थान असेल. मराठी भाषेत नवीन ज्ञान निर्माण करण्याचा हा हेतू आहे. (विचार करताना जाणवलं कि असे असंख्य विषय आहेत, ज्यांच्यावर दर्जेदार लिखाण मराठी मध्ये झालेलं नाही. झालं असलं तर ते अपवाद आहेत.) सर्व मराठी मासिकं, साप्ताहिकं, नियतकलिकं यांच्यात ‘ट्रेकिंग ब्लॉग’ सारखं सदर असतं. सर्व ठिकाणचा अनुभव असा आहे कि तांत्रिक माहितीने भरलेले हे ब्लॉग असतात. म्हणजे काय तर उदा. स्वारगेटवरून अमुक अमुक वेळेला एसटी निघते, ती अमुक अमुक वेळेला राजगडाच्या पायथ्याला पोहोचते. किल्ल्यावर पोहोचायला अमुक अमुक इतका वेळ लागतो. वर बघण्यासारखं अस अस आहे, वगैरे. व्यक्तीशः मला ही तांत्रिक माहिती वाचून कंटाळा आला आहे. पण असंख्य मुलं-मुली महाराष्ट्रात ट्रेकिंग करणारी आहेत. प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव थरारक आहेत. माझ्या ओळखीत तीन दिवस राजगडावर एकटा राहिलेला मुलगा आहे. तो तांत्रिक माहिती सांगतो तेव्हा ती मला माहिती असते. पण तो जेव्हा तीन दिवस दोन रात्री किल्ल्यावर तीस वर्षापेक्षा जास्त काळ राहिलेल्या एका माणसाबरोबर तो राहतो ते अनुभव त्याच्या तोंडून ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. आमच्या मैफलीत असे अनुभव आम्ही शेअर करणार आहोत. असे अनुभव जे दुसरीकडे तुम्हाला वाचायला मिळणार नाहीत.
‘व्यक्तीवाद’ या संकल्पनेवर उभ्या असलेल्या संस्थात्मक लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. ती लोकशाही बळकट करणं हे जसं प्रत्यके नागरिकाचं कर्तव्य आहे तसंच आमचं पण कर्तव्य आहे, असं आम्ही मानतो. ती लोकशाही बळकट कशी होणार तर, ‘लोकमत’ बळकट झालं कि लोकशाही बळकट होणार! सशक्त लोकमत तयार होण्यासाठी लागणारे सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय विषय आम्ही मैफलीत निश्चितच चर्चेला घेणार आहोत. त्यामागे आमच्या दोन भूमिका आहेत. पहिली – ज्या विशिष्ट विषयावर ‘मत’ तयार होण्यासाठी लागणारे तपशील सहज आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत त्या विषयाकडे अजून कोणत्या दृष्टिकोनातून बघता येतं का? हे सांगण्याचा आमचा प्रयत्न असेल. उदा. सध्या सुरु असलेला ‘शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक होते का नव्हते’ हा विषय आहे. जबरदस्त तपशीलाच्या आधारे पण ‘नरहर कुरुंदकर’ यांनी त्या विषयाकडे बघायचा एक नवीन दृष्टीकोन दिला. ‘तो योग्य का अयोग्य’ हा विचार ज्याचा त्यानी करायचा आहे. पण एका नवीन अभिनव दृष्टीने विषयाकडे बघता येतं हा तर धडा कुरुंदकर यांनी घालून दिला. आमचा तोच प्रयत्न असेल. दुसरी भूमिका – ज्या विषयवार तपशील उपलब्धच नाहीत किंवा कमी उपलब्ध आहे, त्यामुळे ‘मत’ बनवणं अशक्य होऊन बसतं, अशा विषयांचे तपशीलच आम्ही उपलब्ध करून देऊ. अशा प्रकारच्या तपशीलावर भर असणाऱ्या लेखात आम्ही मत व्यक्त करण्याला प्राधान्य देणार नाही. ‘मत’ हे तपशील वाचून वाचकाने बनवायचे आहे. पत्रकाराचं काम हेच असतं. वाचकांना ‘मत’ तयार करण्यासाठी लागणारे जबरदस्त तपशील, पुरावे उपलब्ध करून देणं, जिथे पुरावे उपलब्ध आहेत तिथे नवीन दृष्टीकोन देणं. सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक विषयांवर आमची भूमिका हि राहील.
क्रिकेट उदाहरणार्थ – क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. पण आकडे रुक्ष असतात. पण शेन वॉर्न, मायकल कॅस्प्रोविच, जेसन गीलेप्सी, ग्लेन मॅक्ग्राथ यांच्यासमोर संपूर्ण चवथा दिवस हिमालयासारखे अभेद्य राहिलेले द्रविड आणि लक्ष्मण हा भावनेचा विषय असतो. इथे आकडे खरी गोष्ट सांगत नाहीत. लक्ष्मणची सेंच्युरी होण्याच्या आसपास समोरचा प्लेयर आउट होऊन द्रविड खेळायला आला त्यानंतर काही काळात दोघांनाही पाठीत आणि पायाला क्रॅंप यायला सुरवात झाली. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यावर दोघंही फीजिओकडे गेले ट्रिटमेंट घेतली. आणि चौथ्या दिवशी खेळायला आले. चौथ्या दिवशी पुन्हा क्रॅंप येणं थांबलं नाही. तशा परीस्थित उभे राहून दोघांनी भारतासाठी नुसती मॅच वाचवली नाही तर जिंकून दिली. ‘लक्ष्मणचे २८१’ आणि ‘द्रविडचे १८०’ संपूर्ण गोष्ट सांगत नाहीत. अशा क्रिकेटच्या मैदानावर असंख्य गोष्टी घडलेल्या आहेत. आज आपण रवींद्र जडेजाचे थरारक कॅचेस बघतो आणि आवक होतो. पण जेव्हा फिल्डिंग हे आजच्या इतकं प्रगत आणि प्रभावी नव्हतं तेव्हा क्लोजइन फिल्डिंग करताना ‘एकनाथ सोलकर’ने घेतलेले जबरदस्त कॅचेस आपल्याला माहिती नाहीत. सचिनचा बॅड पॅच सुरु होता. 'आउट ऑफ ऑफ साईड'चे बॉल कव्हरला मारण्याच्या नादात तो आउट होत होता. हे त्याच्यासुद्धा लक्षात आलं. त्यानंतरची सचिनची ऑस्ट्रेलियामध्ये सीडनीवरची २००४ ची इनिंगबघा .. सचिननी ब्रेट ली आणि शेन वॉर्न आणि वर्ल्ड क्लास बॉलरसमोर एकही फोर किंवा सिक्स कव्हरला मारलेला नाही. स्वतःशी ठरवून 'कि जो शॉट मारण्याच्या नादात आधी आउट होत होतो तो शॉट अजिबात मारायचा नाही' हे ठरवणं आणि ते फॉलो करणं !! सचिनने त्या इनिंगमध्ये २४१ रन केल्या. ३३ फोर मारल्या, पण एकही फोर कव्हरला मारलेली नाही .. एकही नाही .. (कोणाचा विश्वास नसेल तर माझ्याकडे पुरावा आहे, विचारणा करावी) सचिनच्या नावासमोर लागणारा '२४१ नाबाद' हा आकडा सचिनच्या मनाची जबरदस्त ताकद सांगत नाही ..
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये मॅच फिक्सिंग का होत नाहीत? कारण त्यांची क्रिकेटची परंपरा सुरु होते ती माणसं लीजंडरी होती. आपण जसं शिवाजी राजांच्या नावाला धक्का पोहोचू नये यासाठी सावध राहून कामं करतो, तसं इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये प्लेयर क्रिकेट खेळतात ते या भावनेतून कि ‘ग्रेस, हटन, लारवूड’ किंवा ‘ट्रम्पर, ब्रॅडमन, पॉन्सफोर्ड’ यांच्या नावानं आपल्या कृत्यांमुळे धक्का पोहोचता कामा नये. पण अशी लीजंडरी नावं आपल्याकडे सुद्धा होऊन गेली पण आपल्याला त्यांच्या गोष्टी माहितीतच नाहीत. आपल्या मैफलीत क्रिकेट येईल ते असं येईल. फक्त आकडे घेऊन येणार क्रिकेट तुम्हाला इथे वाचायला मिळणार नाही. क्रिकेटबद्दल जे वाचाल ते इतरत्र फार कमी वाचायला मिळेल. आपल्या मैफलीचं हे वैशिष्ट्य असणार आहे.
विषयांच वैविध्य असेल आणि हेच आमचं वैशिष्ट्य असेल. उदा. १९२७ साली भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे मासिक सुरु केले होते. ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक पूर्णतः लैंगिक शिक्षणाला वाहिलेले होते. जवळ जवळ २७ वर्ष ‘रधों’ कर्व्यांनी हे मासिक चालवले. लोकसंख्या वाढीचा प्रश्न पुढच्या काळात गंभीर होणार आहे, त्यासाठी संतती नियमन आणि लैंगिक शिक्षण हे विषय समाजाला समजावून सांगितले पाहिजेत या हेतूने ते मासिक सुरु झाले होते. आज एकविसाव्या शतकात महाराष्ट्र भारत या समस्येनी ग्रस्त आहे. शिवाय लैंगिकता सुद्धा आक्रमक होत चालली आहे. मानवी शरीराचे शास्त्रीय ज्ञान न मिळता पॉर्न सारख्या अमानवी, विकृत, अशास्त्रीय माध्यमातून तरुणांना लैंगिक जीवनाचे ज्ञान होते आहे, ते धोकादायक आहे. मी स्वतः त्या अनुभवातून गेलेला असल्यामुळे त्याचा धोका मला दिसतो आहे. आमच्या मासिकात म्हणून आम्ही लैगिंक शिक्षण हा विषय प्राधान्याने समाविष्ट केलेला आहे. त्यात सुद्धा केवळ शास्त्रीय माहितीमध्ये न अडकता काम जीवनाचे मानसशास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा समाविष्ट केले जाणार आहेत. या विषयात तज्ञ डॉक्टरांचे सहाय्य आम्ही घेतलेले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार मासिकातील ‘कामजिज्ञासा आणि लैंगिक शिक्षण’ हे सदर चालू राहील.
साधारणपणे मराठीमध्ये कमी लिहिले गेलेले विषय आम्ही प्राधान्याने घेणार आहोत. ‘चित्रपट’ समाजाच्या स्थितीचे प्रतिबिंब दाखवणारे मध्यम आहे. पण आज जे चित्रपट हजारो कोटी कमावतात (त्यांच्या पैसे कमावण्यावर काही म्हणायचे नाही, तो त्यांचा अधिकार आहे) ते चित्रपट समाजाच्या स्थितीचे प्रतिबिंब असतात असे म्हणता येणार नाही. पण जे चित्रपट चांगले असतात, ते लोकप्रिय ठरत नाहीत असा अनुभव आहे. अनेक वास्तवदर्शी चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण ते वास्तवदर्शी असल्यामुळे लोकप्रिय ठरत नाहीत. असे चांगले पण दुर्लक्षित चित्रपट कोणते कोणते, त्यांचे परीक्षण किंवा ओळख, त्याचा वेगळा आशय हे सर्व सुद्धा आम्ही आमच्या मासिकात समाविष्ट करणार आहोत. यामध्ये केवळ भारतीय भाषांतले चित्रपट असतील असं नाही. चित्रपट परीक्षण करण्यामध्ये ‘चित्रपट आशयाच्या दृष्टीने’ चांगला आहे का, इतकाच निकष आम्ही ठेवणार आहोत.
येत्या काळात आम्ही जे नियोजन केले आहे त्यामध्ये ‘भारताचे शेजारी’ असे सदर सुरु करण्याचा आमचा विचार आहे. भारताचे पाकिस्तान, चीन बरोबरचे संबंध आपण रोज अनेक नियतकालिकांतून वाचतो. पण भारताला भूतान, नेपाळ, अफगाणीस्तान, म्यानमार सारखे देश सुद्धा शेजारी लाभले आहेत याचा विचार केला जात नाही. आमच्या ‘भारताचे शेजारी’ दुर्लक्षीत देश किंवा बाबी यांवर आम्ही भर देणार आहोत. त्याचप्रमाणे विज्ञानवर सोप्या मराठीमध्ये लिहीणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्या क्षेत्रात मराठी भाषा कमी पडते आहे. अद्ययावत ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ याचे आकलन मराठी माणसाचे कमी राहिले तर जगाच्या दृष्टीने आपण मागे पडणार. आमचा तो सुद्धा प्रयत्न असेल कि त्या त्या क्षेत्रात काम केलेल्या अधिकारी लोकांकडून सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगणारे लेख समाविष्ट करणे.
हे सर्व आम्ही करतो आहोत कारण आमचं मराठी भाषेवर अतोनात प्रेम आहे म्हणून. इंग्लिश भाषा मोठी का झाली? याचे कारण इंग्लिश लोकांनी जगातल्या सर्व क्षेत्रांचा जबरदस्त अभ्यास करून जे लिहिलं ते इंग्लिशमध्ये लिहिलं. कोणतंही क्षेत्र त्यांना वर्ज्य नव्हतं. आपणसुद्धा जगातल्या सर्व क्षेत्रांतील ज्ञान मराठीमध्ये उतरवू शकलो, ते अर्थातच केवळ भाषांतर नाही, तर ते ज्ञान शिकून पचवून सोप्या मराठी मध्ये लिहिता आलं, तर पुढच्या शंभर दीडशे वर्षात मराठी सुद्धा जगाची ज्ञानभाषा होऊ शकेल. ती ताकद मराठीमध्ये आहे. मराठी भाषेत ज्ञान निर्माण झालं पाहिजे हाच आमचा हेतू आहे.
त्याचबरोबर चीनचा हुकुमशहा माओ त्से तुंग याचे एक प्रसिद्ध भाषण आहे. चीनमधली साम्यवादी क्रांती यशस्वी झाली तेव्हा माओ म्हणाला होता, ‘यापुढे आमचं राष्ट्र अपमान सहन करणार नाही!’ आमच्या मातृभाषेत ज्ञान निर्माण करण्याच्या या प्रयत्नातून आम्ही देशाची आमच्या परीने सेवा करतो आहोत या भूमिकेतूनच आम्ही हा अभिनव उपक्रम सुरु करतो आहोत. कोणत्याही क्षेत्रात माझा देश अपमान सहन करता कामा नये, यासाठी त्याचा विचाराचा पाया पक्काच पाहिजे! यासाठी हा उपक्रम सुरु करतो आहोत..
भाऊ तोरसेकरांनी मला एक गोष्ट सांगितली होती. बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले वृत्तपत्र सुरु केले. तो काळ होता १८३० च्या आसपासचा. पेशवाई बुडून ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलात आल्यानंतरची बहुदा पहिली पिढी. त्याकाळी ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘क्लास वन-सुपर क्लासवन’ अधिकाऱ्यांचा पगार रुपयाच्या भाषेत होता. पाच रुपये दहा रुपये असा. त्यावेळी जांभेकर यांनी ‘दर्पण’ची किंमत १ रुपया ठेवली होती. याचा अर्थ जांभेकरांना तोटा नफ्याचं गणित काळात नव्हतं असा अर्थ होतो का, तर नाही. जांभेकर यांना माहिती होतं की (त्यावेळच्या १ रुपया) आपण जो मजकूर देतो आहे त्याची किंमत ‘तेवढी’ आहे. आपण ‘वाचनीय’ मजकूर देतो आहोत याची जांभेकराना खात्री होती. आताच्या वृत्तपात्रांची किंमत ‘कटिंग चहाच्या’ किमंतीपेक्षा कमी आहे याचं कारण त्या वृत्तपत्रांनाही याची खात्री आहे आपण देतोय तो मजुकर लोकं जास्त पैसे देऊन वाचणार नाहीत. ती वाचकाची गरज मला सुद्धा आणि अनेक वाचकांना भागात नसल्याचा अनुभव रोज येत असेल. आजोबा सांगतात ‘आचार्य अत्रे’ चालवत होते ते ‘मराठा’ पूर्ण वाचायला आठवडा पुरत नसे. आजचा पेपर एका चहाबरोबर संपतो. ही वाचकाची गरज भागवणे हे आमचे प्रमुख कर्तव्य असेल. विचार करायला लावतील असे आणि नवीन विचार पुरवतील असे लेख आम्ही वाचकांना देऊ याची मी खात्री देतो. ज्या पत्रकारांची आपण आदराने नावं घेतो ते ‘टिळक, आगरकर, आंबेडकर आचार्य अत्रे, माडखोलकर’ या लोकांच्या निष्ठा लेखणीशी होत्या पैशाशी नाही म्हणूनच आपण त्यांची नावं आदराने घेतो. ‘अक्षर मैफल’ सुरु करताना आमच्यासमोर पत्रकारीतेचा आदर्श म्हणून हीच लोकं आहेत, ज्यांची निष्ठा लेखणीशी होती, आमचाही प्रयत्न तोच असेल.
संपादक
अक्षर मैफल
No comments:
Post a Comment