Thursday, 7 May 2015

ब्राह्मण - ब्राह्मणेतर संघर्ष, संघर्षाचा बळी - समर्थ रामदास - भाग - २

समर्थ रामदास - संत तुकाराम - छत्रपती शिवाजी महाराज 

चिखलफेख हा शब्द सुद्धा छोटा वाटावा इतकी गलिच्छ टीका रामदास स्वामींवर होते. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, रामदास स्वामी - शिवाजी महाराज भेटीचे कोणतेही पुरावे नाहीत. उलट एक पत्रात स्वामी राजांना 'प्रसंग नसता लिहिले | माफ केले पाहिजे' असं म्हणतात याचा अर्थ रामदास स्वामींचे कोणतेतरी गंभीर गुन्हे असले पाहिजेत आणि म्हणून रामदास स्वामींच्या अस्तित्वाची महाराजांच्या इतिहासात गरज नाही अश्या प्रकारचा 'प्रती इतिहास' हल्ली जोमात आहे. तुकाराम महाराज आणि शिवाजी राजे यांची भेट झाल्याचा (बनावट) पुरावा ब्रिगेड आणि तत्सम गटांकडून दिला जातो. तुकाराम महाराजच शिवाजी राजांचे गुरु होते हेही मोठमोठ्यानी सांगितला जातं. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा ऐतिहासिक समकालीन विश्वसनीय पुरावा उपलब्ध आहे, पण समजा शिवाजी महाराज  आणि समर्थ रामदास यांची भेट झाली नसती तरी त्यामुळे दोघांच्याही मुल्यामापानामध्ये काय फरक पडतो? भेट झाली नाही म्हंटल तरी रामदास स्वामी कुठेतरी कमी पडले असा त्याचा अर्थ होत नाही. १६७२ साली रामदास स्वामींच राजांना पत्र आहे आणि प्रत्यक्ष भेट १६७६ मध्ये झालेली आहे. ती भेट कधीच झाली नसती तरी त्यांनी काय फरक पडला असता? फरक पडतो यांनी कि शिवाजी रामदास भेटीमध्ये शिवाजीला देण्यासारख रामदास स्वामींकडे काय होत? रामदास स्वामींकडे शिवाजी राजांना देण्यासारखा काहीतरी होता हे जर मान्य केला तर प्रत्यक्ष भेट झली किंवा नही हा मुद्धा निकालात निघतो. 

समकालीन दस्त ऐवजांमध्ये शिवाजी रामदास भेटीचे जसे पुरावे आहे तसे आज पर्यंत झालेल्या संशोधनामध्ये महाराष्ट्रातील सामाकालीन पुराव्यांमध्ये शिवाजी राजे आणि संत तुकाराम यांच्या प्रत्यक्ष भेटीचे पुरावे नाहीत. पण मूळ मुद्धा तोच आहे. अशी प्रत्यक्ष भेट झाली नाही म्हणून तुकारामाच्या मूल्यमापनात कमीपणा राहतो असं काही मानायचं कारण नाही. समजा हि भेट झाली असती तर तुकारामांनी शिवाजीला काय सांगितल असत? तुकाराम म्हाराजांच साहित्य रामदास किंवा एकनाथ महाराजांप्रमाणे स्वराज्याच्या कल्पनेनी झपाटलेल्याचे साहित्य आहे का? एक 'पायीकांचे अभंग' जर सोडले तर तुकारामांचं सर्व साहित्य मोक्ष, भक्ती यांनीच भरलेलं आहे. तुकाराम महाराजंचे प्रपंचाविषयीचे विचार सर्वाना माहिती आहेत. तरीही पुन्हा हे काही तुकाराम महाराजांचं कमीपण नाहीये. 

प्रत्यक्ष भेट झाली असती तर रामदास स्वामींनी शिवाजी राजांना काय सांगितलं असत? आणि तुकाराम महाराजांनी काय सागितलं असतं? आणि ते सांगणं शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला पूरक राहिलं असत का? 

या मुद्द्याचं अतिशय योग्य विश्लेषण श्री. म. माटे यांनी आपल्या 'श्री रामदास स्वामी यांचे प्रपंचविज्ञान' या प्रबंधात केला आहे. शिवाजी राजांना वैराग्याची ओढ होती, अश्या एक वैराग्याच्या क्षणी शिवाजी राजांनी तुकाराम महाराजांना लिहिले कि, 'मला आपले शिष्य करून घ्या' यावर तुकाराम महाराजांनी कळवले कि, 'मी तुला जवळ करणे योग्य होणार नाही.' आपल्या सानिध्यात शिवाजीच्या आयुष्याचा जीवनहेतू करपून जाईल हे तुकाराम महाराजांना कळत होतं. गृहस्थाश्रमाबद्दल तुकाराम महाराजांचे काय मत आहे हे सर्वाना माहिती आहे. अशावेळी आपणहून एक माणूस गृहस्थाश्रम सोडून आपण सांगितलेल्या मार्गांनी येऊ म्हणतोय हे काळात असताना शिवाजीचं जीवनधेय्य काय आहे हे ओळखून त्याला आपल्यापासून दूर ठेवणेच योग्य होईल हा विवेक तुकाराम महाराजांनी दाखविला हे तुकारामांचं मोठेपण आहे. अशाच एका वैराग्याच्या क्षणी शिवाजी राजांनी धन-दौलत, घोडे असं तुकारामांना पाठवलं, ते तुकाराम महाराजांनी  सन्मानपूर्वक परत पाठवलं. ''आम्ही काय दर्शनीय आहोत का? माझे अंग धुळीने माखलेले आणि चिरण्या पडलेले आहे तुमच्याचानी बघवणार नाही. या पालखीला आणि हत्ती घोड्यानाही मी शोभणार नाही'' असाही एक पत्र उपलब्ध आहे. या पत्राच्या सत्यतेविषयी शंका आहे. तुकारामांनी नुसते, मी तुझा गुरु नाहीं असे म्हंटले नाही तर शिवाजीला रामादासांची वाटही तुकाराम महाराजांनीच दाखविली असाही श्री. म. माटे म्हणतात. माटे यांच्या पुस्तकात तुकाराम आणि रामदास  यांची भेट झाल्याचाही पुरावा देण्यात आला आहे. तुकाराम महाराज चाफाळास गेले होते, रामदास देहु येथे गेले होते. अशी माटे यांनी लिहिलेलं आहे. 

गुरु-शिष्यांची किंवा मूळ प्रेरणा सारख्या असलेल्या दोन माणसांच्या प्रत्यक्ष भेटी झाल्याच पाहिजेत याची काहीही गरज नाही. नरहर कुरुंदकर यांनी एका भाषणात म्हंटल होता कि गांधीजींच्या किंवा डॉ. आंबेडकरांच्या शब्दावर विश्वास ठेवून लाखो माणसं चळवळीत उतरली त्या सर्वांची गांधीजींशी किंवा आंबेडकरांशी प्रत्यक्ष भेट झाली होती असं मानायचं काही कारण नाही. मूळ संबंध प्रेरणांचा असतो, तोच मुद्दा शिवाजी महाराज-संत तुकाराम- समर्थ रामदास यांचा लागू आहे. 

रामदास स्वामींवरचे मुख्य आक्षेप - 

रामदास स्वामींवर होणाऱ्या मुख्य एक-दोन आक्षेपांवर आज लक्ष देऊया. या आक्षेपांची मुख्य कारणं फक्त जातीयतावादामुळे भ्रष्ट झालेल्या मेंदूंत आहेत. केवळ ब्राह्मण जातीत जमाल आहे म्हणून रामदास स्वामींवर कोणत्या पातळीवर जाऊन टीका होते ते जरा बघा. हि टीका शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान करते आहे. प्रती इतिहासकार मां. म. देशमुख यांची अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. ती पुण्यात केवळ 'साधना साप्ताहिकाच्या' ग्रंथालयात मला पहायला मिळाली. (हा योगायोग आहे का?) त्यात देशमुख म्हणतात कि लग्नाच्या बोहोल्यावरून पळून जाणारा माणूस आठ स्त्रियांशी लग्न करणाऱ्या माणसाचं गुरु कसा असू शकेल, गुरूने शिष्यपेक्षा जास्त लग्न केलेली असली पाहिजेत. हा विनोद नाही. हा मा. म. देशमुख नागपूर ला एका कॉलेजमध्ये इतिहासाचा विभागप्रमुख आहे. लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेल्यामुले एका स्त्रीचं आयुष्य संपूर्ण बरबाद झालं, धड ती विधवा नाही, तिचा पुन्हा विवाह होऊ शकत नाही अशा अवस्थेत ती आयुष्यभर राहिली, म्हणून रामदास आदर्श असू शकत नाही. हा मी विनोद सांगत नाही. देशमुखांच्या पुस्तकात आहे हे. बोहोल्यावरून पळून गेलेला रामदास आदर्श असू शकत नाही हे रामदास स्वामींचा मूल्यमापन आहे का?  कोणत्याही पुरुषानी लग्नाच्या समयी आपल्या पत्नीला असं वचन दिलेलं असत कि दुखाच्या प्रसंगी साथ सोडणार नाही तसं वाचन शिवाजी राजनीही सईबाईंना दिलेलं असणार. हा प्रश्न फक्त वैदिक संस्कारांचा नाही. हा नैतीकतेचाही प्रश्न आहे. पण अफझलखानाशी लढायला जाताना सईबाई आजारी असतात, आणि मोहिमेवर असताना त्यांचा मृत्यू होतो. ह्या प्रसंगी देशमुखांच्या दृष्टीने  शिवाजी राजांनी सईबाईंवर अन्याय केला नाही का? रामदास स्वामी लग्नाच्या आधीच पळून गेले गौतम बुद्ध मध्यरात्री स्वतःचा मुलगा आणि लग्नाची बायको या दोघांनीही सोडून गेलेला आहे. हे काय माणसांचे मूल्यमापन करण्याचे मुद्दे आहेत का? दुर्दैव असं आहे कि हे महाशय प्राध्यापक होते, किती पिढ्यांना असा इतिहास शिकवला गेला असेल देव जाणे. 

असाच अजून एक विनोदी, तितकाच वेदनादायक आक्षेप मला या देशमुखांच्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळाला. ते म्हणातात कि रामदास स्वामींनी शिवाजी राजांकडे उपभोगासाठी स्त्रियांची मागणी केली. शिवाजी राजांनी आठ स्त्रियांची व्यवस्था केली आणि  म्हंटले कि यातून एकीची निवड करा. त्यावर रामदासांनी आठही स्त्रियांची मागणी केली, आणि राजांनी ती पुरवली.
यात प्राध्यापकांच्या हे लक्षात आलं नाही का कि आपण रामदासांवर टीका करण्याच्या नादात आपण शिवाजी राजांना दलाल केलत?? ह्या प्रकारचा विचार कोणताही मराठी माणूस करू शकत नाही. पण हे प्राध्यापक महाराष्ट्राला असं शिकवत आहेत. 

समारोप -  

महाराष्ट्रात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दोन्हीही पक्ष वैयक्तिक मालमत्तेची दावेदारी असल्यासारखं गेले १०० वर्ष हा वाद लढात आहेत. पूर्वी कदाचित त्याला बौद्धिक आधार असेलही आज हा लढा केवळ जातीद्वेष, जातीभेद एवढाच शिल्लक आहे. त्याचा बौद्धिक पाया पार ढासळला आहे. हा रस्ता केवळ विनाशाकडे जातो. हा वाद चुकीच्या पायावर उभा आहे. हा वाद संपलाच पाहिजे. रोज फेसबुक वर प्रचंड आक्रमक चिखलफेक पहायला मिळते याचा अर्थ मला असा दिसतो कि ब्रिगेडी संघटना विष पेरण्यात यशस्वी झाल्या आहेत. हि बाब अतिशय गंभीर आहे. फुले, शाहू, आंबेडकरांनाही चळवळीच हे आक्रमक स्वरूप मान्य झालं नसतं. आपल्या राष्ट्रपुरुषांच्या धेय्यवादाचा पहिला पराभव आपण अनुयायांची केला.          


संदर्भ -

१. श्री रामदास स्वामींचे प्रपंच विज्ञान - श्री. म. माटे - कॉंन्टिनेंटल प्रकाशन 
२. छत्रपती शिवाजी महारज जीवन रहस्य - नरहर कुरुंदकर - देशमुख आणि कंपनी 
३. श्रीमान योगी या ग्रंथाची प्रस्तावना - नरहर कुरुंदकर  

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....