नुकताच परंपरेनुसार शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजीपार्क वर झाला. एक गोष्ट
मात्र खरी आहे की बाळासाहेब असतानाच्या दसरा मेळाव्याची मजा आता उरली नाही. पूर्वी
शिवाजी पार्कवरून खरच मुलुखमैदान तोफ झाडायची. आता तो मजा राहिली नाही. या
वेळेच्या दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे तर लहान मुलांना समजून सांगावं तसं आणि तितकाच
बालिश बोलत होतं. भारताला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित केलं जावं आणि समान नागरी
कायदा लवकरात लवकर अमलात आणला गेला पाहिजे. हे दोन्हीही मुद्दे एकाच भाषणात. हिंदूराष्ट्र
हवं असेल तर समान नागरी कायदा कशाला हवा आहे? किंवा समान नागरी कायदा हवा असेल तर
हिंदूराष्ट्र कशाला पाहिजे आहे? या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा असू शकतात? हा
उद्धव ठाकरेंचा अजाणतेपणा म्हणावा का? तिकडे योगी (?) आदित्यनाथ म्हणतोय कि, 'सेक्युलॅरीझम
को देश से फेक देना चाहिये!' कारण ती कल्पना पाश्चात्य आहे. तिचा उगम भिन्न काळात,
भिन्न परिस्थितीत, भिन्न देशात झाला. सेक्युलॅरीझमच्या जन्माच्या वेलची परिस्थिती
आणि भारतातली परिस्थिती कधीच सारख नव्हती. भारतात धर्मसत्तेची आणि राजसत्तेची
राज्य पदावरून कधीच भांडणे झाली नाहीत
वैगेरे युक्तिवाद भारतातल्या हिंदुत्ववाद्यांकडून केले जातात. याच्या उलट या
सहिष्णुतेच्या उदाहरणांवर हिंदूंनी आदिवासी, बहुजन समाजावर केलेल्या अत्याचाराची उदाहरणं
मुख्यतः हिंदू पुरोगामी हेऊन हा वाद सुरु ठेवतात.
या देशात
सेक्युलॅरीझम वर चर्चा ही अशी होते. हिंदुत्ववादी हिंदूंच्या सहिष्णुतेची उदाहरणं
देतात. त्याच्याविरुद्ध हिंदू पुरोगामी असहिष्णुतेची. हि चर्चा मूर्खपणाची आहे. सेक्युलॅरीझम
म्हणजे नक्की काय आहे हे समजून न घेता रोज या देशात हि चर्चा सुरु असते. भारतीय
राज्यघटनेनी 'सेक्युलर' या शब्दाचा 'Basis of morality should be in This world'
हाच अर्थ स्वीकारलेला आहे. हिंदू धर्म सहिष्णू आहे म्हणून भारताला सेक्युलॅरीझमची
आवश्यकता नाही, हा मुद्दाच मुळात चुकीचा आहे. किंवा सेक्युलॅरीझम सारखी पाश्चात्य
कल्पना भारतीय समाजव्यवस्थेला लागू होत नाही हा सुद्धा मुद्दा कालबाह्य झाला आहे. भारतात दोन धर्मांमध्ये कधीही कलह नव्हते. इस्लामी संस्कृतीच्या आक्रमणामुळे
इथली सहिष्णू संस्कृती नष्ट झाली अन्यथा सेक्युलॅरीझमची भारताला गरजच नाहीये. हे
सर्व मुद्दे कालबाह्य ठरलेले आहेत. सेक्युलॅरीझम या शब्दाचा केवळ 'जनतेच्या
इहलौकिक जीवनावरील धर्माची पकड संपवणे' इतकाच अर्थ आहे. सर्व जगात सेक्युलॅरीझमची
चर्चा करताना 'धर्म म्हणजे केवळ पारलौकिक बाबींचा विचार करणारी संस्था' इतकाच अर्थ
गृहीत धरलेला असतो. धर्माची समाजजीवनातली व्याप्ती यामध्ये गृहीत धरलेली नाही.
'धर्म' या संस्थेची सर्वात धमरद्रोही व्याख्या हीच असेल. सर्व धर्मांचे या
व्याख्येच्या विरोधात एकमत होईल. केवळ जन्मापुर्वीचा आणि मृत्यनंतरचा विचार करणारी
एक संस्था म्हणजे धर्म हे कोणाला मान्य होण्यासारखं आहे का? धर्म म्हणजे
परलोकाच्या नावे चालणारे इहालोकाचे व्यवहार असतात. या व्यवहारांचे स्तोम कमी कारे सेक्युलॅरीझम
के काम आहे. असा सेक्युलॅरीझम कोणाला मान्य होईल का?
याची
व्याप्ती किती प्रचंड आहे याची वरकरणी विचार करताना कल्पना येणार नाही. मुसलमान
असण्याचे, इस्लाम स्वीकारण्याची मूलभूत आत काय आहे? ती म्हणजे श्रद्धा. ईश्वर
एकमेव आहे, तो म्हणजे अल्लाह आहे आणि महंमद पैगंबर हे त्याचे शेवटचे आणि
सर्वश्रेष्ठ प्रेषित. हे जर एखाद्यानी मान्य केलं तर तो मुसलमान झाला. माणूस
मुसलमान काधीही आणि कुठेही होऊ शकतो. आता मी हे वाक्य उच्चारलं आणि जर मला ते
मान्य असेल तर मी या क्षणाला मुसलमान झालो. म्हणजे मुसलमान 'असणे' हि पारलौकिक
गोष्ट झाली. परंतु मुसलमान झाल्यानंतर दिवसातून पाच वेळ नमाज पढावा लागतो,
आयुष्य्तून एकदा हज यात्रा करावी लागते (त्यात अपघात होतात, तिथे सैतानाला दगड
मारायचे असतात, त्यात चेंगराचेंगरी होऊन माणसं मारायची असतात) जिहाद करायचा असतो
(जिहाद हे केवळ आक्रमक इस्लामचं लक्षण आहे असं समजू नका) जिझिया कर ही इस्लामची
मूलभूत तत्व इहलोकात येतात. मनानी मुसलमान होणं हि बाब परलोकात येते, पण मुसलमान
असणं व्यक्त करणे हे इहलोकात येतं. परालोकाच्या नवे चालणारे इहलोकातील व्यवहार
म्हणजे धर्म. हे झालं इस्लामचं. हिंदुंचंही तसच आहे. 'हिंदू'ची कोणतीही व्याख्या
घ्या. वेद प्रमाण मानणारा. पण म्हणजे 'मानणे' ही बाब पारलौकिकच आहे. त्या
वेदातल्या वाचानंप्रमाणे वागणे हि इह्लौकिक बाब. सर्व धर्मांचे असेच आहे. परलोकाच्या
नवे चालणारे इहलोकीचे व्यवहार म्हणजे धर्म असतो. धर्माचे इहलोकातले स्थान हळू हळू
कमी करणे आणि नष्ट करणे हे सेक्युलॅरीझमचे काम आहे.
आपण
भारतात राजसत्तेची धर्माबद्दलची भूमिका काय असावी या दृष्टीने सेक्युलॅरीझम चा
विचार करतो. हे चूक आहे. चाणक्य नावाच्या हिंदू ऋषीने (असा ऋषी जो वर्णाश्रम
धर्माला अनुकूल होतं. पांरपारिक हिंदू धर्माचाही त्याला अभिमान होता असा ज्या
काळात इस्लामचा जन्मही झाला नव्हता अशा काळात) अर्थशास्त्रामध्ये राजधर्माची सूत्र
सांगितली आहेत. ती सोप्या शब्दात सांगतो. कुंभमेळ्याला जाणे, हज यात्रेला जाणे हा
राजाचा/राजसत्तेचा धर्म नाही. हजारोंचे कुंभमेळे व्यवस्थित झाले पाहिजेत हा राजाचा
धर्म आहे. म्हणजे राजाचा/राजसत्तेचा कोणताही अधिकृत धर्म असता कामा नये. म्हणजे
राजाचा कोणताही धर्म असू नये. हा झाला राजाचा धर्म. पण तेव्हा दोन धर्मांमध्ये कलह
सुरु व्हयाचे होते तेव्हाची हि व्याख्या आहे. आता जिझिया लावणे, दार-उल-हर्ब चे
दार-उल-इस्लाम मध्ये रुपांतर करण्यासाठी जिहाद करणे हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे.
अल्लाह शिवाय कोणालाही पुजणे हा इस्लामनुसार सर्वात मोठा गुन्हा आहे. हिंदुंचही
तेच. हिंदूंची सर्व शास्त्रे म्हणजे कायदा असणारे ग्रंथ अर्थात सर्व स्मृती ग्रंथ.
सर्व स्मृतीग्रंथांमधला समाज हा वर्णाश्रमधर्मावर आधारलेला आहे. हिंदू हा जगातला
एकमेव धर्म आहे ज्यांनी अस्पृश्यतेच, स्त्रीच्या दुय्यम स्थानाचे समर्थन करताना
धर्मातील दाखले दिले. माणसाच्या गुलामगिरीचे धार्मिक समर्थन करणारा हिंदू हा
जगातील एकमेव धर्म आहे. प्राचीन भारताचे वैभवाच्या गोष्टी सुद्धा वाचताना हे
लक्षात ठेवलं पाहिजे कि कोणतातरी एक वर्ग समाजव्यवस्थेपासून लांब होतं. कोणालातरी
पायामध्ये गाडून त्याच्यावर समाज उभा होता. जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व
हिंदू परिषद, शिवसेना, सनातन प्रभात जेव्हा म्हणतात कि भारताला हिंदूराष्ट्र म्हणून
घोषित केलं पाहिजे तेव्हा तेव्हा त्या हिंदूराष्ट्राचा कायदा (शास्त्र) कोणता
असेल?
दोन
धर्मातील कलाहावारचे सेक्युलॅरीझम हे उत्तर नाही. जो समाज दोन हजार वर्ष राष्ट्रहिताला
घटक अशी जातीव्यवस्था नष्ट करू शकला नाही. उलट त्या जातीव्यवस्थेच्या विरोधात बंद
करणाऱ्या सर्वाना स्वतः मध्ये सामावून घेत गेला. म्हणजे ज्यांनी ज्यांनी बंद केलं
ते सर्व ह्या धर्माचा भाग बनून गेले. फुले, शाहू, आंबेडकर, विवेकानंद, सावरकर सर्व
आयुष्यभर जातीव्यवस्थेच्या विरोधात लढले पण जातीव्यवस्था नष्ट करू शकले नाहीत.
एवढा महान शिवाजी राजा. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणून परकी सत्तेविरुद्धचा लढा उभा केला,
तो जिंकूनही दाखवला पण तरीही शिवाजी राजा जातीव्यवस्था नष्ट करू शकला नाही. हा
समाज बदलतच नाही. हिंदू समाजाइतका कमालीचा चिवट समाज जगाच्या पाठीवर सापडणार नाही.
हा त्याचा चिवटपणा हा भारतातल्या सेक्युलॅरीझम समोरचा सर्वात मोठा अडथळा आहे. सर्व
सुधारक, सर्व क्रांतीकारक पचवून हिंदू समाज पूर्वीइतकाच सनातनी कसा राहू शकतो.
जितके परकी सत्तांचे आघात भारतावर आणि हिंदू धर्मावर झाले तितका हिंदू समाज जास्त
जास्त सनातनी होत गेला आहे. भारताला पारतंत्र्य का आलं, याचा कारण सुद्धा आम्ही
भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये शोधतो. हा कमालीचा सनातनीपणा, ही अजगरासारखी
वृत्ती (सर्व मोठे मोठे ते बदल पचवून शांत पडून राहायची वृत्ती) हा भारतातल्या सेक्युलॅरीझमसमोरचा
सर्वात मोठा अडथळा आहे. जेव्हा एखाद्या देशातली बहुसंख्य जनता मध्ययुगीन मानसिकतेतून
बाहेर येते तेव्हा अल्पसंख्य जनता आपले आपण सेक्युलर होत असते.
आजच्या
राजकारणात सेक्युलॅरीझमचा विचार नेहमी अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणाच्या संदर्भात
केलं जातो. हीच मुळात पहिली चूक आहे. सेक्युलर राज्यव्यवस्थेत अल्पसंख्यांकांच्या
हिताचे आणि जीविताचे रक्षण होतं असेल तर ती अनुषंगिक बाब आहे. सेक्युलॅरीझम अल्पसंख्येच्या
हितासाठी नसतो, तो नेहमीच बहुसंख्येच्या हितासाठी असतो; हि गोष्टच विसरून जाऊन आपण
सेक्युलॅरीझमचा विचार करतो आहोत. ( जागर - नरहर कुरुंदकर - पान नं - १५०) त्यामुळे सेक्युलॅरीझम ची गरज ८५ टक्के जनतेल
धर्माच्या गुलामगिरीतून मोकळे करून माणूस म्हणून विकासाच्या सर्व संधी देण्यासाठी
असते, हि मुख्य बाब आहे. त्यामध्ये १५ टक्क्यांचे रक्षण आपोआप होऊन जाते.
भारताच्या बाबतीत विचार करताना हिंदू आणि मुसलमान आणि जाती हिंदू अजूनही मध्ययुगीन
मनोवृत्ती सोडायला तयार नाहीत. म्हणून भारतात हिंदू आणि मुसलमान दोन्हीही
धर्मांच्या लोकांना सेक्युलॅरीझमची गरज आहे. सेक्युलॅरीझमची चर्चा करताना सर्वात
महत्वाचं म्हणजे त्याचे मराठी प्रतिशब्द शोधायचा किंवा चर्चेमध्ये वापरायचा हट्ट
आपण सोडून दिला पाहिजे. 'सेक्युलॅरीझम' सर्वात गैरसमजूतीत असलेली कल्पना यामुळेच
झाली आहे. सेक्युलॅरीझमला आपण 'सर्वधर्मसमभाव', 'धर्मसहिष्णुता', 'निधर्मी' असे
मराठी प्रतिशब्द देतो. सेक्युलॅरीझम म्हणजे सर्वधर्मसमभाव नाही. सेक्युलॅरीझम
म्हणजे इह्लोकातली धर्माची पकड संपवणे. सेक्युलॅरीझम म्हणजे मध्ययुगीन धार्मिक
मनोवृत्तीतून सर्वांना बाहेर काढणे. अशा या सेक्युलॅरीझम ची भारतात दोघांनाही गरज
नाहीये का?