Wednesday, 8 June 2016

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना :

Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही. Sex प्रमाणे ISIS या विषयावर भारतात आणि मुख्यतः महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात उदासीनता आहे. (उदा. प्रा. शेषराव मोरे, निळू दामले, अतुल कहते आणि योगेश परळे या चारच जणांनी मराठीमध्ये काही अभ्यास करून इस्लामिक स्टेटबद्दल लिहिले आहे. बाकी रोजच्या वृत्तपत्रांमध्ये बातमीशीवाय इस्लामिक स्टेटबद्दल फारसं काही येतच नाही). या दोन विषयावर महाराष्ट्रात अजिबात चर्चा होत नाही. तिसरा विषय आहे गुलामगिरीचा. महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या परंपरेमुळे सर्व प्रकारांची ‘गुलामगिरी’ महाराष्ट्रातून बहुतेक हद्दपार झाली आहे. ‘माणसाचा संपत्ती म्हणून वापर’ ही कल्पना भारतात कधीच अस्तित्वात नव्हती, ती पश्चिमी देशांमध्ये होती. त्या संपत्तीचा शरीरसुखासाठी उपयोग सुद्धा पश्चिमी देशांत केला जात असे. भारतात ‘जातीव्यवस्था’ हेच गुलामगिरीचे स्वरूप होते. पण प्रबोधनाच्या मोठ्या परंपरेनंतर आज कोणीही मराठी माणूस गुलामगिरीची जाहीर भाषा बोलणार नाही. याचा अर्थ महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातून Sex, इस्लामिक स्टेट आणि गुलामगिरी हे तिन्हीही विषय बहिष्कृत आहेत. आणि या तिन्हीही गोष्टी हातात हात घालून एकत्र उच्छाद मांडू लागल्या, आणि त्याला जागतिक प्रतिष्ठासुद्धा मिळू लागली. इस्लामिक स्टेट, Sex, गुलामगिरी आणि धर्म हे सर्व एकत्र येऊन मध्यपूर्वेत अत्याचार होत आहेत. इस्लामिक स्टेटने कुराणातील आयतींचा संदर्भ सांगत ‘Sex गुलामी’ हा दहशतवादाचा एक नवीन मार्ग तयार केला.इस्लामिक स्टेटने सुरु केलेल्या या नवीन व्यवस्थेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठीमध्ये कोणीही या विषयावर लिहिलेले नाही.  

साधने :

साधारणपणे संदर्भ साहित्य शेवटी लिहावे असा संकेत आहे. परंतु ज्याच्यावरून हा अभ्यास करता आला आहे त्या संदर्भांची पार्श्वभूमी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून सुरवातीला संदर्भ साहित्य.

इस्लामिक स्टेटला आपलं म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं हवं आहे. म्हणून उपलब्ध सर्व माध्यमांचा ते योग्य वापर करत आहेत. इस्लामिक स्टेट ‘दिबाक’या नावःचे एक मासिक प्रकाशित करते. त्याचे १२ पेक्षा अधिक अंक प्रकाशित झाले आहेत. ‘दिबाक’ हे उत्तर सिरीयामधील एक शहर आहे. मुसलमानांची अशी एक श्रद्धा , कुरणानुसार तयार झालेली आहे की, मुसलमान विरुद्ध बिगर मुसलमान हा जागतिक लढा होणार आहे आणि त्याची शेवटची लढाई या ‘दिबाक’ या शहरात होणार आहे. ती लढाई इस्लामने जिंकली की सर्व जग इस्लाममय होणार आहे. तर असं ‘दिबाक’ या नावाने मासिक प्रकाशित होतं. २०१४ च्या ऑक्टोबरच्या मासिकात ‘Revival Of The Slavery befour hour’ या नावाचा एक लेख प्रकाशित झाला होता. हा एक Sex गुलामगिरी संदर्भातील महत्वाचा दस्तऐवज आहे.

इस्लामिक स्टेटची एक महिला विंग आहे. त्या विंगचे नाव ‘अल-खानसा’ ब्रिगेड. या ‘अल-खानसा’ ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी शब्दांकन केलेला एक जाहीरनामा (Manifesto) प्रकाशित आहे. ‘अल-खानसा’ हा इस्लामिक स्टेटचं अधिकृत महिला विभाग आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्याचे नाव ‘Women Of the Islamic State : Manifesto & Case Study’ असे आहे. (अर्थात मूळ जाहीरनामा अरेबिक लिपीमध्ये आहे, पण त्याचे इंग्लिश भाषांतर उपलब्ध आहे). या जाहीरनाम्यात काय आहे हे लेखात पुढे येईलच. परंतु ही ब्रिगेड काय आहे हे सांगणे गरजेचे आहे. या ब्रिगेडमध्ये मुख्यतः उच्चशिक्षित पाश्चिमात्य महिला कार्यरत आहे. वीस वर्षाची एक ब्रिटीश मुलगी या ब्रिगेडमधली महत्वाची सदस्या आहे (Leading Figure). पाश्चिमात्य उच्चशिक्षित महिलांनी इस्लामिक स्टेटसाठी ४१ पानांचा जाहीरनामा तयार केला आहे. हा सुद्धा एक महत्वाचा दस्तऐवज आहे.

इराकच्या उत्तरेला असलेल्या ‘माउंट सिंजार’ या भागावर इस्लामिक स्टेटने २०१४ ऑगस्ट मध्ये हल्ला केला. आणि तो भाग ताब्यात घेतला. या ‘सिंजार’ पर्वताच्या आसपास ‘याझीदी’ धर्माचे लोक राहतात. जगाच्या पाठीवर याझीदी एकूण १ लाख ते ५ लाख इतके आहे. एकूण इराकच्या लोकसंख्येच्या केवळ १.५% हा समाज आहे. या धर्मात बाहेरून धर्मांतर करून जाता येत नाही. या धर्मात जन्मच घ्यावा लागतो. ‘झोरोस्ट्रीयन’ यांच्याशी साम्य असणारा हा धर्म आहे. म्हणून मुसलमानांच्या दृष्टीने ‘काफिर’ असलेल्या याझीदिंचा इस्लामिक स्टेट उल्लेख Devil Worshipers असं करत. ऑगस्ट २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटने हा प्रदेश ताब्यात घेतल्यावर स्त्रिया आणि पुरुष यांना वेगळे काढण्यात आले. १४ वर्षाच्या वरच्या सर्व पुरुषांची कत्तल करण्यात आली. आणि स्त्रियांना गुलामाच्या बाजारात विकायला काढलं. Sex Slave म्हणून त्यांचा वापर करण्यात आला. अशा पिडीत महिलांपैकी काहींना इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून सोडवण्यात यश आलं आहे. अशा मुलींची मनोगते उपलब्ध आहेत. त्या पिडीत याझीदींच्या एका प्रतिनिधीला संयुक्त राष्ट्रात पाचारण करण्यात आलं होतं. त्या मुलीचं संयुक्त राष्ट्र संघात झालेलं भाषण उपलब्ध आहे. स्वतःवर झालेले भयंक अत्याचार स्वतःच्या तोंडाने सांगणाऱ्या मुलीचे शब्द हा सुद्धा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. (अत्याचारांचे वर्णन पुढे आहे).

इस्लामिक स्टेट ज्या कुराणातील आयतींचा संदर्भ देत आहे, त्या खऱ्या आयती आहेत का हे पाहण्यासाठी कुराण, सुद्धा वापरण्यात आले आहे. ही सर्व साधने वापरून हा लेख तयार झालेला आहे.

जाहीरनामा :

‘Women Of the Islamic state’ मध्ये मांडण्यात आलेली तत्व ही इस्लामिक स्टेटची मार्गदर्शक तत्व म्हणता येतील. स्त्रियांचे इस्लामिक स्टेट मधील स्थान काय आहे हे सांगणारा हा जाहीरनामा आहे. जाहीरनामा सांगतो ‘मानवी शरीराचे इंच इंच झाकले जाईल असे काळे कपडे स्त्रियांनी घातले पाहिजेत. यामध्ये पाय झाकणाऱ्या बुटांचा सुद्धा समावेश आहे. त्याचप्रमाणे हात व हातांची बोटे झाकली जातील असे ग्लोव्हज सुद्ध त्यांनी वापरले पाहिजेत. महिलांनी लपलेले असावे. महिलांनी लपलेले आसवे आणि मस्तक अच्छादित ठेवावे. आधुनिक पाश्चात्य कपड्यांच्या दुकानांवर बंदी असावी, कारण ते सैतानाचे कर्म आहे. प्रत्येक स्त्रीचे मुलभूत कर्तव्य आहे की तिने आई बनावे आणि आपल्या नवऱ्याची आणि मुलांची सेवा करणे. स्त्रिया अपवादात्मक परिस्थितीमध्येच घराच्या बाहेर पडू शकतात. उदा. जिहाद करण्यासाठी कोणी पुरुष उपलब्धच नसतील तर स्त्रिया घराबाहेर पाडूय शकतात. केवळ जिहाद करण्यासाठी. किंवा धर्माचा अभ्यास करण्यासाठी. (धर्म अर्थात इस्लाम)

या जाहीरनाम्यात कुराण मधल्या आयतींचा संदर्भ देऊन मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Men are serving Women like themselves, man cannot distinguish themselves from according to two features refered to by God : Men are incharge of women by [right of] what God has given over the other and what they spen [for maintance] from their wealth [कुराण ४:३४]

या जाहीरनाम्यात मुलींनी कोणत्या वयात काय प्रकारचे शिक्षण घेतले पाहिजे येशे स्पष्टीकरण आलेले आहे. वय वर्ष ७ ते ९ या वयाच्या मुलींनी तीन प्रकारचे पाठ घेतले पाहिजेत. एक – समज (Fiqh – Undrestanding) धर्म (Religion) दोन – कुरण आणि अरबी साहित्याचे लेखन आणि वाचन आणि शास्त्र (Accounting आणि नैसर्गिक शास्त्र) १० ते १२ वर्षाच्या मुलींनी मुख्यतः धर्माच्या अभ्यासावर भर दिला पाहिजे. मुख्यतः त्याची समज (Fiqh) आणि त्याचबरोबर लग्न आणि घटस्फोटासंबंधीच्या दिल्या गेलेल्या निर्णयांचा अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर विणकाम, शिवणकाम आणि स्वयंपाक हा सुद्धा मुलींच्या शिक्षणाचा भाग असला पाहिजे. १३ ते १५ वर्षाच्या मुलींसाठी मुख्य भर ‘शरियाच्या अभ्यासावर’ असेल. आणि मुलांचे संगोपन कौशल्य विकास यावर असेल. या वयोगटात शास्त्राचा अभ्यास कमी होईल कारण गरजेपुरते शास्त्र त्यांचे आधीच्या गटात शिकून झाले आहे. त्याचप्रमाणे इस्लामचा इतिहास आणि प्रेषितांचे आयुष्य आणि त्यांचे अनुयायी हा भाग या वयात शिक्षणात असला पाहिजे.

मुलींच्या लग्नाचे योग्य वय ९ असल्याचे जाहीरनाम्यात म्हंटले आहे. तथापि वयवर्ष १६-१७ पर्यंत लग्न झाले पाहिजे असा जाहीरनाम्याचा आग्रह आहे. कारण तोपर्यंत मुली Young & Active असतात.

अत्याचारांचे प्रकार :

ज्यावेळी सिंजार ताब्यात घेण्यात आलं तेव्हा १४ वर्षावरील पुरुषांची कत्तल करण्यात आली. आणि सर्व स्त्रियांना गुलामाच्या बाजारात उभं करण्यात आलं. गुलामांच्या बाजाराची संपूर्ण व्यवस्था इस्लामिक स्टेटकडे पूर्वीपासून तयार होती. त्याचं अर्थशास्त्र त्यांच्याकडे तयार होतं. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा व्यवस्थेमधील ढिसाळपणा गुलामांच्या बाजारात दिसत नव्हता, असं पिडीत मुलीने सांगितले आहे. शरीराचा आकर्षकपणा आणि स्तनांचा आकार लक्षात यावा म्हणून गुलामांच्या बाजारात मुलींना विवस्त्र करण्यात आलं होतं. गुलाम म्हणून विकत घेण्यापूर्वी स्त्रियांची नाविन्यता चाचणी (Verginity Test) करण्यात आली. आकर्षकता, स्तनांचा आकार आणि नाविन्यता या निकषांवर मुलींची किमंत ठरवून त्यांची विक्री करण्यात येत होती. त्यामध्ये सुंदर आणि लहान मुलींसाठी सर्वात जास्त किमंत आकारली गेली.

या सर्वच नियोजन आधीच तयार होतं हे म्हणण्याचं कारण म्हणजे वरील निकषांच्या आधारावर आणि वयोमानाप्रमाणे खरेदी किमतीचा तक्ता इस्लामिक स्टेटने या पूर्वीच प्रकाशित केला होता. ९ वर्षाच्या मुलीला १७० अमेरिकी डॉलर, वयवर्ष १० ते २० च्या मुलींना १३० अमेरिकी डॉलर, आणि सर्वात कमी म्हणजे ९० अमेरिकी डॉलर २० ते ३० वयोगटातील मुलींना. ही किमंत अर्थात प्रत्येक मुलीनिहाय बदलू शकते. मुलींची पैशाच्या भाषेतील किमंत Flat chest & unattractiveness यामुळे कमी होऊ शकते. हे सर्व पाहून ‘लैंगिक अत्याचार’ विषयी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या एका विशेष प्रतिनिधीने आपले मत व्यात्क केले आहे, ती म्हणते, “ISIS has institutionalised rape and sex slavery as a terror tactic. We have heard of 20 year old girl who was burned alive because she refused to perform extreme sexual act”.

काय प्रकारचे अत्याचार या याझिदी मुलींवर झाले ते प्रत्यक्ष याझीदी मुलगी सांगते आहे. परंतु त्यापूर्वी अत्याचार फक्त याझीदिंवरच का? याचं उत्तर इस्लामिक स्टेटनेच दिलं आहे. ते म्हणतात, “याझीदी People of the book नाहीत. याझीदी लोकं अनेकेश्वरवादी आहेत. याझीदी लोकं ज्या सात पऱ्यांची पूजा करतात पैकी एक ‘तौस मलिक’ हा देव नाही. (अर्थात अल्ला नाही. अल्लाशिवाय वेगळ्या देवाची पूजा हा इस्लामनुसारच सर्वात मोठा गुन्हा आहे.) उलट ‘तौस मलिक’ ही सैतानाची निर्मिती आहे. याझीदी लोकं सैतानांनी निर्माण केलेल्या देवाची पूजा करतात याचा अर्थ ते जिवंत राहायला लायक नाहीत. मुसलमानांनी हाती घेतलेला जिहाद यशस्वी व्हावा म्हणून (याझीदी) स्त्रियांना गुलाम म्हणून, आणि त्यांचा वापर शरीरसुखासाठी करण्याचा आम्हाला अधिकार आहे”  अनेकेश्वरवादी, People of the book नाही आणि अल्लाशिवाय दुसऱ्या देवांची पूजा करतात म्हणून अशा पाखंडी समाजाच्या स्त्रिया गुलाम म्हणून ठेवण्याचा इस्लामनुसार मुसलमानांना अधिकार आहे असं इस्लमिक स्टेटचे म्हणणे आहे.

पिडीत मुलीची मनोगतं सर्वत्र उपलब्ध आहेत. त्या त्यांचे भयंकर अनुभव सांगतात. दर वेळेला जेव्हा एखादं जिहादी मुलीवर अत्याचार करायला यायचा तेव्हा तो प्रार्थना करायचा. तो त्या मुलीला सांगायचा की ही ‘इस्लामी पूजा’ (Ibadah) आहे. जिहादी योद्ध सांगायचा की मी मुलीशी संभोग केल्याने मी अल्लाच्या जवळ जाणार आहे. आणि म्हणून स्त्री गुलामाबरोबर समागम हे पुण्य आहे, असही तो सांगायचा. १९ वर्षाची मुलगी तिचे गुलामांच्या बाजारातील अनुभव सांगते, ती म्हणे, “जेव्हा माझी वेळ आली तेव्हा त्यांनी मला चार वेळा उभं राहून दाखवायला सांगितलं, त्यांनी मला स्वतःभोवती फिरून दाखवायला सांगितलं. त्यांनी मला माझ्या शेवटच्या मासिक पाळी बद्दलसुद्धा अनेक प्रश्न विचारले. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की मी गर्भवतीतर नाही ना!” गर्भवती स्त्री बरोबर समागमाची परवानगी इस्लाम/शरीय देत नाही असं इस्लामिक स्टेटच म्हणणं आहे. एका 34 वर्षाच्या याझीदी स्त्रीवर अनेकदा अत्याचार झाले, पण तिने आपल्या डोळ्यांसमोर १२ वर्षाच्या मुलीवर होणारे अत्याचार पहिले आणि ती स्वतःचं दुःख विसरून गेली, असं तिने सांगितलं आहे. त्या १२ वर्षाच्या मुलीचे हाल ती 34 वर्षाची स्त्री सांगते आहे. “He destroyed her body. She was badly infected. The fighter kept asking me, ‘Why does she smell so badly? and I said he has infection on the inside, You need to take care of her, he ignored the girls’ agony. continuing the ritual of praying before and after raping the child. I said him she is just a little girl. he replyed, No, She is not a little girl. she is slave. and she knows exactly how to have a sex. and having sex with her pleases god.”

याझीदींच्या वेदना :

३ ऑगस्ट २०१४ मध्ये जेव्हा इस्लामिक स्टेटने याझीदिंचा प्रदेश ताब्यात घेतला तेव्हा पकडून, गुलामांच्या बाजारात ज्या मुलीला उभं केलं गेलं. जीची Sex Slave म्हणून विक्री झाली, जिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आला, ती कशीबशी इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून सुटून जर्मनीमध्ये आश्रयाला गेली. संयुक्त राष्ट्रसंघासमोर त्या ‘धाडसी’ मुलीचे मनोगत झाले. त्यामध्ये तिने तिच्यावर झालेले अत्याचार आणि आंतरराष्ट्रीय समूहाला याझीदींच्या सुटकेसाठी काय काय करता येऊ शकत, यावर ती मुलगी बोलली आहे. साधारण १० मिनिटांचे ते भाषण आहे. त्यामध्ये ती सांगते, ‘कि आम्ही अल्लावर श्रद्धा ठेवत नाही, म्हणून जणीवपूर्वक आमच्यावर अत्याचार करण्यात आले. ते केवळ आम्हाला मारायला आले नव्हते, त्यांना स्त्रिया आणि मुली गुलाम म्हणून हव्या होत्या. या सर्व गुलामांच्या देवघेवीमध्ये नियोजनाचा अभाव दिसत नव्हता, हे सर्व सुनियोजित होतं. माझ्या डोळ्यासमोर माझ्या सख्ख्या भावांना गोळ्या घालून मारण्यात आला. मला माझा धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. माझ्या बाकीच्या धर्मबांधवाना दोनच पर्याय देण्यात आले होते, धर्मांतर किंवा मृत्यू. सुदैवानी मी सुटू शकले, परंतु अजूनही ३४०० पेक्षा जास्त स्त्रिया त्या राक्षसांच्या हातात आहे, जागतिक समूहाने लवकरात लवकर आम्हाला स्वाभिमानाने पुन्हा जगता यावं यासाठी काही तरी प्रयत्न केले पाहिजेत.’

धर्म-शास्त्राचा आधार :

इस्लामिक स्टेटच्या अभ्यासामधील हा सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. मुळात ‘इस्लामिक स्टेट’ हा अमेरिका-इराक युद्धाचा एक परिणाम आहे असाच समज सर्वत्र पसरलेला आहे. (अतुल कहते यांनी लिहिलेले मराठीमधील पुस्तक हाच धागा घेऊन इस्लामिक स्टेटचं अन्वयार्थ लावतात) तो अंशत:च योग्य आहे, कारण ‘इस्लामिक स्टेट’ ही कल्पना प्रेषित महंमद पैगंबर यांच्या काळापासून चालत आलेली आहे. अमेरिका-इराक हे एक तत्कालीन कारण असू शकेल. पण इस्लामिक स्टेटची निर्मिती झाली पाहिजे असा आग्रह प्रेषित, त्यानंतर आलेले पहिले चार खलिफा यांचा सुद्धा होता. आणि म्हणून २१ व्या शतकातील इस्लामिक स्टेट जे जे काही करतं त्याला ते प्रेषित पैगंबर, कुरण, शरीय हादीस म्हधील संदर्भ देतात. याचं एक उदाहरण त्यांनी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात आलेलंच आहे, अशी पुढेही अजून येणार आहेत. (इस्लामिक स्टेट म्हणजे काय? यावर सुद्धा मी दोन लेख लिहिलेले आहे. त्यामध्ये केवळ अमेरिका – इराक युद्धाचा हा परिणाम नाही, यावर मी संदर्भ देऊन लिहिलेले आहे. तेही सर्वांनी वाचवे. ISIS चा पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष – भाग १ - http://mukulranbhor.blogspot.in/2015/12/blog-post.html आणि ISIS चा पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष – भाग २ - http://mukulranbhor.blogspot.in/2015/12/blog-post_25.html    

एक अभ्यासाचा दृष्टिकोन समोर आणायचा आहे. समजा १८५७ चा उठाव झाला, त्याचा ब्रिटिशांनी लावलेला अर्थ म्हणजे हा ‘उठाव’ होता, सावरकर म्हंटले ‘हे स्वातंत्र्यसमर’ होतं. आता या लढाईला प्रत्यक्ष लढाई करणारे काय म्हणत होते? प्रत्यक्ष लढाई करणाऱ्यांची भूमिका काय होती? ते कोणत्या हेतूनी ती लढाई ते लढत होते हे, ब्रिटीश किंवा सावरकर यांच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. तोच दृष्टीकोन इस्लमिक स्टेटच्या अभ्यासाला लावणे आवश्यक मला आहे. इस्लामिक स्टेट प्रत्येक कारवाईनंतर याचे स्पष्टीकरण देते आहे की आम्ही जे वागतो आहोत ते मूळ इस्लामला धरून आहे. आम्ही अल्लाहला खुश करण्यासाठी असे वागतो आहोत वगेरे. तर त्याला जास्त महत्व आहे, बाकीचे इस्लामिक स्टेटबद्दल काय म्हणत याला फारसा अर्थ नाही.

स्त्रीच्या गुलामगिरीचा व्यवस्था म्हणून स्वीकार कुराणमध्ये आहे, अर्थात त्याचं आयातींच्या आधारे इस्लमिक स्टेट त्या व्यवस्थेचे समर्थन करते. त्यापैकी सुरह २ आयात १७७, ४:२४-२५, ४:९२, ५:८९ अशा आयती आहेत, या आयातींमध्ये गुलामगिरीचा व्यवस्था म्हणून स्वीकार आलेला दिसेल. ज्याप्रमाणे ज्ञानेशवर, शंकराचार्य हे भगवद्गीतेचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार आहेत, त्याप्रमाणे सय्यद मौदुदी हे कुराणचे आणि मौलाना बुखारी हे हादीसचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार आहेत. सय्यद मौदुदी २३:५-६ यावर भाष्य करताना sex slave girl is lawful असं सांगतात. प्रेषितांची एक हादीसमधील गोष्ट मौलाना बुखारी यांनी सांगितली आहे. त्यामध्ये युद्धलूट म्हणून ताब्यात घेतलेल्या स्त्रीयांबरोबर लैंगिक संबंध ठेवणे पाप नसल्याचं प्रेषितांनी सांगितलं आहे, असं बुखारी लिहितात. मूळ इंग्लिश वाक्य आहे, Mohammad casually believes that slave women who are part of one fifth of the spoils of war can be treated like sexual property.

आयुष्यातील कोणत्याही प्रश्नाला उलेमांनी दिलेलं उत्तर म्हणजे ‘फतवा’. फतवा जारी करण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही. कुरण, शरिया, हादीस, प्रेषितांचे चरित्र, इस्लामचा इतिहास, खालीफांचा इतिहास या सर्वांचा ज्याचा सखोल अभ्यास आहे अशा इस्लामी पंडितलाच फतवा जारी करण्याचा अधिकार मिळतो. भारतात ‘दर-उल-उलूम, देवबंद विद्यापीठाला’ आणि मुंबईमधील रझा अॅकॅडमीला ‘फतवे’ जारी करण्याचे अधिकार आहेत.  Sex Slavery किंवा गुलाम स्त्रीबरोबर संभोगाचा अधिकार या विषयावरचे अनेक फतवे अनेक वेबसाईट्स वर उपलब्ध आहेत.

प्रश्न – उत्तरांचा सारांश :

ज्या वेळी ही सर्व व्यवस्था निर्माण होत होती, त्याचं वेळी म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१४ याच काळात इस्लामिक स्टेटकडून अधिकृत पातळीवर याचे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. जसा ‘दिबाक’या मासिकातील लेख आहे त्याचं प्रमाणे एक माहिती पत्रक इस्लामिक स्टेटने प्रकाशित केलेले आहे. त्यामध्ये Sex Slavery संदर्भात सर्व उपस्थित होऊ शकतील अशा शंका आहेत, आणि त्यांची उत्तरही दिली आहेत. अर्थात मूळ माहितीपत्र अरेबिक लिपीमध्ये आहे, परंतु त्याचे इंग्लिश भाषांतर उपलब्ध आहे.

‘जिहादी टेरिरीझम थ्रेट मॉनिटर’ नावाची एक वृत्त संस्था आहे. ती वृत्त संस्था सांगते की आमचा विशेष अभ्यासाचा विषय आहे ‘मूलतत्ववादी दहशतवाद’. इस्लामिक स्टेटबद्दलच्या सर्व सविस्तर बातम्या या वृत्त संस्थेच्या वेबसाईटवर सापडतील. याचं वेबसाईटवर हे मूळ ‘अरेबिक लिपीतील’ माहितीपत्र आणि त्याचे इंग्लिश भाषांतर उपलब्ध आहे. त्यामध्ये एकूण २५ प्रश्न-उत्तरे आहेत. सर्व देणे शक्य नाही. तरी कोणताही प्रश्न सुटणार नाही या पद्धतीने सारांश फक्त सांगतो.

इस्लामची भूमी नसलेल्या प्रदेशातील म्हणजे ‘दार-उल-हरब’ मधील स्त्रिया पकडून कैदी बनवण्याची परवानगी त्यांना (म्हणजे मुसलमानांना) आहे, असं ते म्हणतात. त्यांना कैदी बनवण्याची परवानगी मिळते कारण त्या (स्त्रिया) श्रद्धाहीन आहेत. त्यामध्ये ज्यू आणि ख्रिश्चन स्त्रिया सुद्धा येतात. ‘किताबी’ नसलेल्या स्त्रियांचे श्रद्धाहीनत्वच त्यांना कैद करण्याची परवानगी आम्हाला (म्हणजे इस्लामला) देतं, असं ते सांगतात. अनेकेश्वरवाद हे एक महत्वाचा मुद्दा आहे. ‘दार-उल-हरब’ मधील कैदी बनवलेली स्त्री जी श्रद्धाहीन आहे (अल-साबी), तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी आम्हाला (इस्लामिक स्टेटला) अल्लाहनेच दिली असल्याचे ते सांगतात. प्रश्न क्रमांक ४ मध्ये अशी परवानगी आहे ह्याचा कुराणमधील आयतीचा संदर्भ दिला आहे. युद्धभूमीतून अशा पकडून आणलेल्या स्त्रियांचे ‘जिहादी योद्ध्यांमध्ये’ इमाम वाटप करतो. वाटून दिलेल्या स्त्रियांची आधी नाविन्यता चाचणी करण्यात येते. जर जिहादी योद्ध्याच्या ताब्यात मिळालेली स्त्री गर्भवती नसेल तर, ताबा मिळाल्याक्षणी तिच्याशी शारीरिक संबध ठेवण्याची परवानगी जिहादी योद्ध्याला आहे, असं ते म्हणतात. आपली गुलाम (स्त्री) गर्भवती राहू नये याची मात्र ‘जिहादी योद्धे’ काळजी घेतात. अशा ‘अल-साबी’ (‘दार-उल-हरब’ मधील कैदी बनवलेली स्त्री जी श्रद्धाहीन आहे) स्त्रिया विकता येतात. विकत घेता येतात. त्याचप्रमाणे त्या बक्षीस म्हणूनही देता येतात. ‘अल-साबींकडून’ इस्लाम धर्माला आणि जगातिक इस्लामला कोणत्याही प्रकारचा धोका पोचेल अशी शंका जरी आली तरी त्यांना नष्ट करण्याची सुद्धा ‘जिहादी योद्ध्यांना’ परवानगी आहे. जिहादी योद्धा आणि गुलाम स्त्री यांच्या संबंधांतून जन्माला आलेल्या मुलगा/मुलगी सज्ञान (म्हणजे वयवर्ष ९) होईपर्यंत त्याचा संपत्ती म्हणून वापर करता येत नाही. मुलगा/मुलगी सज्ञान होईपर्यंत त्यांना त्यांच्या आईपासून दूर सुद्धा करता येत नाही.

एखादा जिहादी योद्धा मारला गेला, तर त्याच्या अन्य संपत्तीप्रमाणे गुलामांचीसुद्धा वाटणी होईल. मात्र अशा स्त्रीयांबरोबर शरीर संबंध ठेवता येणार नाहीत. तिच्याकडून फक्त सेवा करवून घेणे अपेक्षित आहे, असं ते म्हणतात. जिहादी योद्ध्यांच्या परवानगीशिवाय गुलामांबरोबर शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत. ते दुसऱ्याच्या संपत्तीवारचे अनधिकृत अतिक्रमण समजले जाईल. परंतु ती संपत्ती विकत घेऊन हा प्रश्न सोडवता येईल असे ते म्हणतात.

शरीरसंबंधासाठी योग्य अशा वयात मुलगी आली की तिच्याशी संभोग करावा, मुलगी अजून वयात आली नसेल तर मात्र संभोगाशिवाय तिचा उपभोग घेता येऊ शकतो, असे त्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. शरीरसंबंधांच्या दरम्यान जास्तीत जास्त शरीरसुख देणाऱ्या ‘कोणत्याही’ तंत्राचा वापर पुरुष स्त्री गुलामच्या परवानगीने किंवा परवानगीशिवाय करू शकतो. स्त्री गुलामाला मारहाण करणे सुद्धा क्षम्य मानले आहे. परंतु चेहेऱ्यावर मारहाण करू नये, असा संकेत आहेत. स्त्री गुलाम आपल्या मालकापासून जर पळून जायचा प्रयत्न करत असेल तर तो अक्षम्य गुन्हा मानला गेला आहे, तथापि या गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा कुराण किंवा शरियामध्ये ठरवून दिलेली नाही. ती शिक्षा तो मालक स्वतःच्या मर्जीने देऊ शकतो. स्त्री गुलामाबरीबर लग्न सुद्धा करण्याची परवानगी आहे. परंतु दुसऱ्या योद्ध्याच्या स्त्री गुलामाबरोबर लग्न केले तर मात्र शरीरसंबंधाचा अधिकार कायदेशीररीत्या लग्न झालेल्या पुरुषाला मिळेल, मालकाला नाही.

सर्व प्रश्न उत्तरं वाचून असं लक्षात येईल की या जिहादी योद्ध्यांची अल्लाहवर, कुराणवर, शरीयावर श्रद्धा आहे. सर्व समस्यांना, सर्व प्रश्नांना, सर्व शंकांना उत्तरं ते त्यातूनच (कुराण, प्रेषितांचे आयुष्य, शरिया, हदीस) देण्याचा प्रयत्न करतात.

सुटकेसाठी प्रयत्न :

याझीदींच्या सुटकेसाठी कमी-अधिक प्रमाणत जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. परंतु जागतिक पातळीवरचे थोडे प्रयत्न सुद्धा लगेच जागासमोर येतात, पण प्रादेशिक पातळीवरचे मोठे प्रयत्न सहजा सहजी जगासमोर येत नाहीत. भारतातील योग गुरु श्री श्री रविशंकर यांची स्वयंसेवी संस्था Art Of Living इराक मध्ये मदतकार्य करत आहेत. Art Of Living चे अनेक कार्यकर्ते जीवावर उदार होऊन तिथे मदतकार्य करत आहेत. १० अमेरिकी डॉंलरच्या बदल्यात एका अप्लवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार करण्यात आला होता, त्या मुलीला सोडवण्यात Art Of Living ला यश आलं आहे. त्याचबरोबर अत्यल्प दरामध्ये पाणी आणि अन्न सुद्धा हे कार्यकर्ते उपलब्ध करून देत आहेत.

साधारण २००० वर्षापूर्वी इस्लामपूर्व अरब टोळ्यांनी पॅलेस्टाईन ताब्यात घेतलं. तिथे असलेल्या ज्यूंना हाकलून दिलं. त्यावेळी ज्यू भारतात आश्रयाला आले. ते अजूनही भारतात आनंदानी राहत आहेत. त्यानंतर इस्लामी आक्रमकांनी पर्शियावर हल्ला केला आणि पर्शिया उध्वस्त केलं. त्यावेळी पारशी लोकं भारतात आले, ते अजूनही भारतात आनंदानी राहत आहेत. ज्यू आणि पारशी आज मूळ भारतीय समाजातून वेगळे काढता येत नाहीत, इतके एकरूप झाले आहेत. हा पूर्वइतिहास लक्षात घेऊन पुन्हा एकदा इस्लामी आक्रमणाला बळी पडलेला ‘याझीदी’ समाज पुन्हा एकदा भारताकडे आशेने बघतो आहे. १ फेब्रुवारी २०१६ रोजी याझीदिंचे एक शिष्टमंडळ ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे’ सरसंघचालक ‘मोहन भागवत’ यांना ‘बंगळूरू येथे भेटले. यामध्ये समान आक्रमणाच्या इतिहासावर, भारताने ज्यू आणि पारशी समाजाला दिलेल्या वागणुकीवर चर्चा झाली. मला याची खात्री आहे की उदय भविष्यात गरज पडली तर ज्यू आणि पारश्यांप्रमाणे भारत ‘याझीदींच्या’ मागे सुद्धा उभा राहील.

समारोप :

इस्लामचा अभ्यास करताना एक मुद्धा सतत लक्षात ठेवावा लागतो. तो आहे कुराणचे कालक्रमानुसार पडणारे दोन भाग. एक मक्का काळ आणि दुसरा मदिना काळ. या दोन काळात बदललेल्या परिस्थितीनुसार परस्परविरोधी सुद्धा आयती आलेल्या आहेत. तेव्हा ही बदललेली परिस्थिती नेमकी काय होती याचा अभ्यास हिंदुनी करणे आवश्यक आहे. नाशिकमधील प्राध्यापक संतोष शेलार यांनी यासंदर्भात लिहिले आहे की, बरेच अभ्यासक ‘इस्लाम’ कसा धर्मसहिष्णू आहे हे सांगताना ठराविक ६-७ आयातींचा संदर्भ देतात.या आयती मक्काकालीन आहेत. त्यावेळी प्रेषितांची शक्तीही कमी होती.मदिनाकाळात मात्र या सर्वधर्मसंभवू भासणाऱ्या आयती येणे बंद झाले होते, याउलट उघड उघड आक्रमक आयतीच आल्या आहे.’ हे मात्र नक्की की ‘इस्लामिक स्टेट’ आपल्या सर्व कार्यपद्धतीची दिशा कुराण’, ‘शरिया’, प्रेषितांचे आयुष्य’, ‘पहिले चार खलिफा’ यांच्यातूनच दाखवत आहे. अल्लाहला खुश करण्यासाठी, स्वर्गात जागा मिळावी म्हणून, नारकाग्नीपासून मुक्तता मिळावी म्हणून आम्ही हे सर्व करत आहेत, अशी त्यांची भूमिका आहे. या त्यांच्या भूमिकेचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे.

या सर्वातून मला अजून न सुटलेला प्रश्न एकच आहे, तो म्हणजे उच्चशिक्षित पाश्चात्य आणि पौर्वात्य तरुण/ तरुणी इस्लामिक स्टेटकडे आकर्षित होण्याचे कारण काय असेल? इस्लामिक स्टेटमध्ये असं कोणतं आकर्षण आहे, की ज्यामुळे पुरुष आणि महिलासुद्धा जीव द्यायला आणि तितक्याच क्रूरपणे जीव घ्यायला तयार होतात? मध्ययुगीन धार्मिक कक्षेतून माणूस कधी बाहेर येणार?

(पूर्वप्रसिद्धी - नवभारत, ऑगस्ट २०१६) 

ता.क. 
१. 'दबिक़'या मासिकाचे एकूण १५ अंक प्रकाशित झाले आहेत. 

२. अमेरिका, रशिया आणि नाटो सैन्यांनी इस्लामिक स्टेटच्या प्रदेशावर हवाई हल्ले सुरु केले. त्यातून 'खलिफा अबू-बक्र-अल-बगदादी' मारला गेल्याच्या अफवा अनेकदा उठल्या, पण तशी अधिकृत बातमी अजून आलेली नाही.

३. या हवाई हल्ल्यांमुळे इस्लामिक स्टेटची राजकीय, आर्थिक ताकद कमी होत असल्याचा सर्वसाधारण आपला समज होतो, पण 'दबिक़'चा शेवटचा अंक जुलै २०१६ मध्ये प्रकाशित झालेला आहे. 

४. 'टेलिग्राम'या सोशल मिडीया अॅप वर 'याझीदी' मुलगी लिलावात काढली आहे, अशी बातमी इस्लामिक स्टेटनी प्रकाशित केली होती. ती बातमी सुद्धा हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढल्यानंतरच आली होती. 


५. रमजानच्या महिन्यात जगात अनेक ठिकाणी अनेक दहशतवादी हल्ले इस्लामिक स्टेटनी घडवून आणले. त्यामध्ये मुख्य टार्गेट युरोप राहिलेलं आहे, पण बांगलादेश सुद्धा आशियातील केंद्र बनत चालले आहे. 
-       मुकुल रणभोर
mukulranbhor.blogspot.in

Saturday, 4 June 2016

द 'गावसकर' मार्क

वेस्टइंडीजच्या तोफखान्याला तोंड देणारा 'लिटील' मास्टर
साल होतं १९८७. पाकिस्तानबरोबर भारताची कसोटी मालिका सुरु होती. एकूण पाच सामन्यांच्या मालिकेमधले पहिले ३ सामने अनिर्णीत राहिले होते. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ‘आपण न जिंकणे’ आणि ‘दुसऱ्यालाही जिंकू न देणे’ ही भारताची रणनीती असावी. जून १९३२ साली भारतीय क्रिकेटला कसोटीचा दर्जा मिळाला. तेव्हा पासून २०१५ पर्यंत भारत एकूण ४९५ कसोटी सामने खेळला आहे, त्यापैकी २१० सामने अनिर्णीत राहिलेले आहेत. यावरून जिंकण्याच्या एकूण प्रमाणापेक्षा सामना अनिर्णीत ठेवण्याचे प्रमाण जास्त होते असेच दिसते. सलग सर्वात जास्त कसोटी सामने अनिर्णीत राहिल्याची जी रेकॉर्ड्स त्या यादीत पहिली तीन स्थानं भारतानेच व्यापली आहेत. आता ज्या सामन्याची मी गोष्ट सांगतो आहे, ती १९८७ सालची पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळली जात होती. पहिल्यांदी फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघानी ३९५ धावा केल्या. त्यामध्ये सहाव्या क्रमांकावर येणारा ‘इजाझ फकी’ याने शतक केलं, त्याला साथ द्यायला इम्रान खानने ७२ धावा केल्या होत्या. पाच दिवसाच्या कसोटीमध्ये पहिले पूर्ण दोन दिवस पाकिस्तानच फलंदाजी करत होतं. भारताच्या गोलंदाजांनी एकूण १८७.३ इतक्या ओव्हर्स टाकल्या. तिसऱ्या दिवशी भारताचे दोन सलामीचे फलंदाज उतरले. पहिल्या दोन विकेट्स अगदी झटपट पडून गेल्या. पण स्ट्राईकवर येणारा फलंदाज एका बाजूने टिकून शांतपणे खेळत होता. त्यांनी अर्धशतक पूर्ण केले. आणि ‘इजाझ फकी’चा एक चेंडू मिडविकेटकडे फटकावला आणि ५७ धावांवरून ५८ धावांवर गेला. ती एक धाव आणि तो फलंदाज इतिहासात कायम कोरले गेले. ती धाव सुनील मनोहर गावसकर याला दहा हजार धावांपर्यंत घेऊन गेली.

१८७७ साली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटला सुरवात झाली आहे. सर डॉन ब्रॅडमन, जॅक हॉब्स, गॅरी सोबर्स, व्हिव रिचर्डस, ग्रॅहाम पॉलॉक,  जेफ्री बॉयकॉट, ग्रॅहाम गूच सारखे फलंदाज क्रिकेटला लाभले. पण गावसकर असा पहिला फलंदाज ठरला ज्यानी दहा हजार धावांचा टप्पा गाठला. शेवटच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर गावसकर लगेचच निवृत्त झाला. त्या बेंगलोर कासोटी सामन्याचीही गोष्ट अद्भुत आहे. पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानला केवळ ११६ धावा करता आल्या. भारताचा फिरकी गोलंदाज मणिंदर सिंग याने २७ धावांच्या बदल्यात ७ विकेट्स घेतल्या. पण विकेटच इतकी खराब झाली होती की फिरकी पुढेकोणीच टिकत नव्हतं. भारत सुद्धा केवळ १४५ धावा करू शकला. पण साधारण १९९२ पूर्वीचा पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा प्रबळ होता. दुसऱ्या डावात पाकिस्तानने २४९ धावा केल्या आणि भारताला जिंकण्यासाठी २२१ धावा हव्या होत्या. पाकिस्तानची गोलंदाजी नेहमीच जबरदस्त राहिलेली आहे. माझ्या एका मित्राला UPSC च्या मुलाखतीत विचारले होते की ‘समजा भारत पाकिस्तान अशी फाळणी झाली नसती तर काय झालं असत?’ त्यावर त्याने उत्तर दिलेली की जगात सर्वात बलाढ्य क्रिकेटची टीम भारताची राहिली असती. पाकिस्तानचे गोलंदाज आणि भारताचे फलंदाज. पण वासिक आक्रम, इक्बाल कासीम आणि तौसेफ अहमद आणि इम्रान खान असा जबरदस्त मारा असताना भारताची कच्ची फलंदाजी टिकेल कशी? एका मागून एक विकेट्स पडत होत्या. पण सलामीला आलेला गावसकर एका बाजूनी टिकून होता. गावसकरने २६४ चेंडू खेळून ९६ धावा केल्या. त्याच्यानंतरचा मोठा स्कोर म्हणजे अझरूद्दीनच्या २६ धावा हा होता. भारत सामना केवळ १६ धावांनी हरला. पण गावसकरने शेवटपर्यंत आशा मावळू दिल्या नव्हत्या.

ही सर्व बडबड आज करायचं म्हणजे १३९ वर्षाच्या इंग्लिश क्रिकेटच्या इतिहासात पहिला इंग्लिश फलंदाज ‘दहा हजार’ धावांच्या ‘गावसकर मार्क’ पर्यंत पोहोचला. त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये गावसकरने सर्वात प्रथम हा माईलस्टोन गाठला म्हणून या टप्याला ‘गावसकर मार्क’ असेच नावं पडले आहे.

'अॅलन बॉर्डर' च्या १०,००० विसरायला लावणारी लाराची २७७ ची इंनिग  
कसोटी दर्जा असलेल्या देशांपैकी अजून पाकिस्तानचा एकही खेळाडू इथपर्यंत पोहोचलेला नाही. न्युझीलंडचा नाही. पण भारताचे तीन जण या लिस्ट मध्ये आहेत. गावसकर, सचिन आणि राहुल द्रविड. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे सुद्धा तीन खेळाडू या यादीत आहेत. पहिला अॅलन बॉर्डर. सिडनी क्रिकेट ग्राउंड वर १९९३ साली ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान तिसरी टेस्ट सुरु होती. पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने स्टीव व्हॉंच्या शतकाच्या जोरावर आणि अन्य चार अर्धशतकं मिळून ५०३ धावा केल्या होत्या. त्या चार अर्धशतकांपैकी एक होतं अॅलन बॉर्डरच. बॉर्डरनी १८० चेंडू खेळून ७४ धावा केल्या. याचं डावात अॅलन बॉर्डरच्या दहाहजार धावा पूर्ण झाल्या. पण अॅलन बॉर्डरच्या दहा हजार धावा दुसऱ्या एका तरुण खेळाडूच्या जबरदस्त खेळीमुळे दुर्लक्षित राहिल्या का, ऑस्ट्रेलियाच्या ५०३ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचे सलामीचे दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले. वेस्ट इंडीजची स्थिती ३१-२ अशी होती. परंतु त्यानंतर सर रिची रिचर्डसन आणि कारकिर्दीतली केवळ पाचवी टेस्ट खेळणारा ब्रायन लारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी २९१ धावांची भागीदारी रचली. ब्रायन लारा याने २७७ धावा केल्या. १९९३ च्या दृष्टीने वेगवान समजल्या जाणाऱ्या ७४ च्या स्ट्राईरेटनी लारा खेळला होता.

या लाराने केवळ १९५ डावांमध्ये आणि फक्त १३ वर्ष आणि २५० दिवसांत दहा हजार धावांचा टप्पा पार केला. ज्या सामन्यात लारा इथेपर्यंत पोहोचला तो सामना मँचेस्टर, ओल्ड ट्रॅफोर्डवर होता. परंतु प्रत्यक्ष या सामान्यपेक्षा त्याचा आधीचा सामना जास्त इंटरेस्टिंग आहे. लॉर्डसवर झालेल्या याधीच्या टेस्ट मध्ये लाराला पहिल्या इंनिगमध्ये ११ आणि दुसऱ्या इंनिगमध्ये ४४ इतक्याच धावा करता आल्या. लाराला अजून केवळ ४ धावा हव्या होत्या. ४४ लाराला चुकीचा आउट देण्यात आलं. ड्रामा इथे संपत नाही. आधीचा प्लेयर आउट झाला, लारा खेळायला आला. पुढच्या फ्लिन्टॉफच्या पहिल्या चेंडूवर लेगबायची फोर गेली. लाराला केवळ चारच धावा हव्या होत्या. पण ‘बाईज’च्या धावा फलंदाजाला मिळत नाहीत. त्या टीमला मिळतात. पुढचे चार चेंडू लारा बीट झाला. आणि फ्लिन्टॉफच्या शेवटच्या बॉलवर लारा बोल्ड झाला. गावसकर मार्कसाठी अजून पुढच्या डावाची वाट बघावी लागणार. पुढच्या डावातही गिल्सच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू त्याला खेळायची संधी मिळाली, त्यावर त्याने ३ धावा पळून काढल्या पण तो ही चेंडू लेगबाय म्हणून ठरवण्यात आला. पुन्हा फ्लिन्टॉफ बॉलिंगला आला. पण पहिल्या चेंडूवर लाराने फोर मारली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला चौथा आणि वेस्ट इंडीजचा पहिला फलंदाज या ‘गावसकर मार्क’ पर्यंत पोहोचला. खर म्हणजे फ्लिन्टॉफच्या त्याचं ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर लारा आउटपण झाला. पण आता कदाचित समाधानाने आउट झाला असेल.

सौरव गांगुलीने वीरेंद्र सेहवागच्या कसोटीमधील निवडीवर सांगितलं होतं की, मी त्याला स्ट्राईक वर पाठवतो, कारण मला सामना जिंकायचा आहे. असा हा सेहवाग नावाचा राक्षस एकदा साउथ आफ्रिकेवर तुटून पडला होता. साल २००८, स्थळ ‘चेपॉक’. खरं म्हणजे आधी साउथ आफ्रिकेनी आपल्याला तसच धुतलं होतं. आपल्याकडे जसा सेहवाग होता, तसा त्यांच्याकडे ‘आमला’ होता, ग्राहम स्मिथ होता, मार्क बाउचर होता. असे सर्व एकत्र खेळून त्यांनी पहिल्या डावात ५४० धावा केल्या. पण सेहवाग सेहवाग आहे. त्याने ५४० धावांचा पाठलाग करताना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान त्रिशतक ठोकलं. हे सोप्प नाही. ‘आक्रमकता’ हा गुण काही ठराविक वेळासाठी टिकवून ठेवता येतो. ट्वेंटी२० मध्ये यशस्वी होण्याचे कारण तेच आहे. पण पूर्ण दिवस तो माइंडसेट टिकवून ठेवता येईल का? हो, सेहवागने करून दाखवलं. ह्या टेम्प्रामेंटबरोबर अजून एक अवघड गोष्ट म्हणजे समोर गोलंदाजीला बांगलादेश किंवा केनिय नव्हती. तर मखाय अँटीनी, डेल स्टेन, मॉर्ने मोर्केल, द ग्रेट जॅक कॅलीस. अॅलन बॉर्डरच्या दहा हजार धावा ज्या इंनिग मध्ये झाल्या, ती इंनिग लाराच्या खेळीमुळे जशी दुर्लक्षित राहिली तशीच सेहवागच्या या कत्तलखान्यामुळे अशीच एक इंनिग दुर्लक्षित राहिली. सेहवागबरोबर सलामीला आलेला ‘वासिम जाफर’ कसोटी क्रिकेटला साजेशी १६६ बॉलमध्ये ७३ अशी खेळी करून आउट झाला. वन डाऊनला ‘भारताचा एक सर्वोत्तम’ कसोटी प्लेयर खेळायला आला. राहुल द्रविड!! सेहवाग बरोबर दुसऱ्या विकेटसाठी द्रविडने २६८ धावांची भागीदारी रचली. सामन्याचा तिसरा दिवस संपताना सेहवाग ३०९ आणि द्रविड ६५ वर खेळत होते. चौथ्या दिवशी नवीन बॉल घेण्यात आला. आणि ब्रायन लाराचा ४०० चा विक्रम सुद्धा मोडू शकेल अशा स्टेजवर असलेला सेहवाग आउट झाला. ३१९ वर! (सेहवागचे त्रिशतक हे केवळ २७८ चेंडूत आलेलं आहे). सेहवाग आउट झाल्यावर सचिन तेंडूलकरसुद्धा लगेच आउट झाला. २९ चेंडूत २४ धावा करून सौरव गांगुली सुद्धा गेला. पण अभेद्य सह्याद्रीसारखा राहुल द्रविड उभा होता. द्रविडने २९१ बॉल खेळून १११ धावा केल्या. या द्रविडच्या इंनिगनेच द्रविडसुद्धा ‘टेन थाऊजंड’ क्लबमध्ये सामील झाला. जितक महत्वाच सेहवागच सर्वात वेगवान शतक आहे, तितकच अतिशय शांतपणे एका बाजूने टिकून राहणं सुद्धा तितकाच महत्वाचं आहे. आणि ‘सोने पे सुहागा’ म्हणजे ‘गावसकर मार्क’ला पोहोचणारा तिसरा भारतीय राहुल द्रविड ठरला.  

हा माझा सगळा जो खटाटोप सुरु आहे, त्याचं कारण ‘अॅलिस्टर कूक’ हा आहे. २००६ साली भारताविरूद्धच त्याची पहिली टेस्ट खेळला. नागपूरला झालेल्या त्या टेस्ट मध्ये एक अर्धशतक आणि एक शतक असा खेळला होता. करियरमधल्या पहिल्या टेस्टमध्ये कूकची ही कामगीरी होती. म्हणजे दहा हजार धावांचा टप्पा गाठायला कूकला केवळ दहा वर्ष लागली. इंग्लंड हे देश अजूनही इतर प्रकारांनापेक्षा कसोटी क्रिकेटला जास्त महत्व देतो. ते योग्यच आहे. ‘पीटरसन’ हा असाच ‘क्लासिकल टेस्ट प्लेयर’ मर्यादित शतकांच्या लीग्स खेळतो म्हणून त्याच्यावर करियर संपवण्याची वेळ आली. कदाचित पीटरसनच्या आयुष्यात अजून काही वर्ष कसोटी सामने खेळण्याचं भाग्य आलं असतं, तर कदाचित कूकच्या आधी पीटरसनच्या दहा हजार धावा झाल्या असत्या. पण वयाच्या भाषेत सर्वात तरुण खेळाडू, जो दहा हजार धावांपर्यंत पोहीचाला तो कूक आहे. या रेसमध्ये त्याने सचिनला सुद्धा मागे टाकलं. कोणतेही ‘रेकॉर्ड्स’ हे मोडण्यासाठीच असतात. ते जर अबाधित राहिले तर आपलं काही तरी चुकतं आहे असच मानलं पाहिजे. पण कूकला १२८ सामने किंवा २२९ डाव लागले हा टप्पा गाठायला. आमच्या गावसकरने केवळ २१० डाव खेळले आहेत. लारा, तेंडूलकर आणि पॉंटिंग यांना अनुक्रमे १९५ आणि १९६ डाव लागले आहेत. भारतात दर वेळेला ‘सचिन’च्या प्रलयंकारी आकड्यांमुळे अनेक खेळाडूंचे आकडे तितकेसे लक्षवेधी वाटत नाहीत. पण हे चूक आहे. राहुल द्रविड याने दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ २०६ डाव खेळले आहेत. वयाच्या भाषेत सर्वात तरुण ‘कूक’ असेल पण प्रत्यक्ष मैदानावर कूकपेक्षा वेगवान डावांमध्ये हा टप्पा गाठणारे अनेक जण आहेत. कुमार संगकाराने देखील १९५ डावांमध्ये हा विक्रम केलेला आहे. क्रिकेट या खेळात प्रत्यके आकडा काही ना काही सांगत असतो. १९५ डावांपेक्षा कमी डावांमध्ये हा विक्रम अजून कोणालाही करता आलेला नाही. पण सर्वात जास्त डाव ‘स्टीव्ह व्हॉं’ (२४४) आणि  अॅलन बॉर्डर (२३५) यांना लागले आहेत.

वरच्या सर्व बडबडीत चार महान खेळाडूंची नावं अजून मी घेतलेली नाहीत. यामध्ये रिकी पोंटिंग, महेला जयवर्धने, शिवनारायण चान्द्रपॉल आणि जॅक कॅलिस. या चौघांनी सुद्धा दहा हजार धावांचा टप्पा पार केलेला आहे. वर्षांच्या भाषेत सर्वात जास्त वर्ष शिवनारायण चान्द्रपॉलयाने घेतली. कारकिर्दीची एकूण १८ वर्ष खेळून शिवनारायण चान्द्रपॉल हा टप्पा गाठला आहे, पण गम्मत म्हणजे त्याने ‘स्टीव्ह व्हॉं’पेक्षा कमी डावांमध्ये हा विक्रम केला आहे. त्याने २३९ डाव खेळून हा विक्रम केला. ‘स्टीव्ह व्हॉं’ला सुद्धा हा टप्पा गाठण्यासाठी १७ वर्ष लागली. सचिनला १५ वर्ष लागली. द्रविडने मात्र केवळ ११ वर्षात हा टप्पा गाठला.

२०११ मध्ये सेंच्युरीयन, साउथ आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध श्रीलंका पहिली टेस्ट सुरु होती. पहिली फलंदाजी करताना श्रीलंकेनी केवळ १८० धावा केल्या. त्यामध्ये जयवर्धनेच्या ३० धावांचा समावेश होता. पुढच्या डावात बिकट सुरवात असताना जयवर्धने टिकेल असा खेळत होता. कॅलिसच्या एका ओव्हरमध्ये त्यानी सलग दोन फोर मारल्या. जयवर्धेन त्या दोन फोर मुळे ९९९९ धावांवर पोहोचला. त्याच ‘फोर-सिक्स’च्या अॅटिट्यूडमध्ये त्याने फटका मारला आणि ‘त्या’ एका धावेसाठी पाळला, तेव्हा कॅलिसने ‘डायरेक्ट थ्रो’ करून जयवर्धनेला रनआउट केलं. त्या एका धावेच्या मोहात त्याला अजून एका सामन्याची वाट बघावी लागली. दुसरी टेस्ट होती डरबन येथे, जयवर्धनेने नवव्या चेंडूवर एक धाव काढली आणि टप्पा गाठला. त्याने १४ वर्षात २१० डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकं आणि धावा यांच्या यादीत सचिन तेंडुलकर नंतर नंबर लागतो जॅक कॅलिस याचा. सचिनच्या ५१ कसोटी शतकानंतर जॅक कॅलिस याचा ४५ शतकांचा विक्रम आहे. सचिन तेंडूलकरच्या १५,९२१ धावांनंतर जॅक कॅलिसयाचा १३,२८९ धावांचा विक्रम आहे. जॅक कॅलिसने २१७ डाव खेळून हा टप्पा गाठला आहे. जॅक कॅलिसला हा टप्पा गाठण्यासाठी १३ वर्ष लागली. (टीप : हे सर्व वर्षांचे जे आकडे आहेत, ते खेळाडूच्या पहिल्या कसोटी पासून त्या कसोटी पर्यंत आहेत, ज्या सामन्यात त्यांनी हा टप्पा गाठला. अनेक खेळाडू त्यानंतरसुद्धा खेळत होते.)


उत्सवमूर्ती मात्र ‘अॅलिस्टर कूक’ हा आहे. वरती म्हंटल्याप्रमाणे कूक क्लासिकल प्लेयर आहे. दहा वर्षाच्या कारकिर्दीत कूक केवळ ९२ एकदिवसीय सामने खेळला आहे. ट्वेन्टी२० तर केवळ चारच. कारण कसोटी क्रिकेटहेच खरं क्रिकेट आहे. त्याच्या क्लासिकल असण्याचे एक जबरदस्त कारण उपलब्ध आहे. पुन्हा क्रिकेट मधले प्रत्येक आकडे काहीतरी नवीन सांगत असतात. कूकने त्याच्या कारकिर्दीत २२९ डावांमध्ये केवळ १० सिक्स मारल्या आहेत. हो तुम्ही बरोबर वाचलं. केवळ १० सिक्स!! (याच न्यायाने आमचा द्रविड, गावसकर सुद्धा तितकेच क्लासिकल ठरतात. द्रविडच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत २८६ डावांत त्याने केवळ २१ सिक्स मारल्या आहेत. गावसकरने सुद्धा केवळ २६) केवळ बेधुंद फटकेबाजी म्हणजेच क्रिकेट नव्हे. ‘रंनिग बिट्वीन द विकेट्स’ हे कसोटी क्रिकेटचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यातून खेळाडूचा फिटनेस, स्टॅमिना दिसतो. आपला मूळ विषय केवळ दहा हजार धावांचा सुरु आहे. पण २०१०/११ ची अॅशेस सिरीज ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. ‘अॅलिस्टर कूक’ने पाच सामन्यात मिळून १२७ सरासरीने दोन सेंच्युरी, एक डबल सेंच्युरी आणि तीन हाफ सेंच्युरी च्या जोरावर ७६६ धावा केल्या होत्या, एका सिरीज मध्ये!

आता दहा हजार धावांच्या यादीत आमचा गावसकर सर्वात खाली आहे. कोणत्याच खेळाडूची दुसऱ्या खेळाडू बरोबर तुलना करूच नये. पण गावसकर जेव्हा फलंदाजी करत होता, त्यावेळी क्रिकेटचे नियम फलंदाजीला अनुकूल नव्हते. समोरून गोलंदाजीला वेस्ट इंडीजचा तोफखाना होता. ऑस्ट्रेलियाचा राक्षस डेनिस लिली होता. इम्रान खान होता. तिकडे इयान बॉथम होता. (खर तर इंग्लिश विकेट ही कधीच फलंदाजांना अनुकूल राहिलेली नाही, त्यामुळे कूकच कौतुक आहेच.) पण शेवटी माझं भारतीय मन आद्य गुरुला मानत राहत. एकदिवसीय सामन्यात एका इंनिगआमध्ये २०० धावा होऊ शकतात हे जसं सचिनने दाखवून दिलं. तसंच कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा होऊ शकतात हे गावसकरने दाखवून दिलं. त्याआधी सोबर्स, ब्रॅडमन,  जॅक हॉब्स, व्हिव रिचर्डस, ग्रॅहाम पॉलॉक, सारखे खेळाडू होतेच की. पण गावसकर ‘हेल्मेटविना’ बॅट घेऊन तोफखान्याला तोंड द्यायला निघाला आणि त्याने बाकीच्यांना जमलं नाही ते करून दाखवलं.

या सर्व अभ्यासातला सर्वात मोठा विष्णूचा आहे. तो लिहित नाही (कारण त्याला माझ्याइतका वेळ नाही). पण त्याचा मेंदू वापरून मी मात्र लिहितो. क्रिकेट या खेळातील सौंदर्याची इनसाईट म्हणजे विष्णू आहे.
-       मुकुल रणभोर
-       9021423717


Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....