Wednesday, 15 February 2017

गोष्ट एका रात्रीची - भीमाशंकर ते खांडस



गोष्ट ३-४ वर्षापूर्वीची आहे. एका मोठ्या ग्रुप बरोबर मी या ट्रेकला गेलो होतो. एखाद्या मोठ्या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जाताना नेहमीच मी रस्ता पाहून घेण्यासाठी जात असतो. ग्रुपच्या म्हणून अनेक मर्यादा असतात. आपल्याला हवा तसा मनसोक्त वेळ मिळत नाही. हवं तेव्हा, हवं तिथे हवं ते खाता येत नाही. फोटो काढण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत नाही. एकच फायदा म्हणजे रस्ता कळतो. असाच हा भीमाशंकर ते खांडस मी ट्रेक केला. ट्रेक भर उन्हाळ्यात होता. आदल्या दिवशी आम्ही भीमाशंकरला मुक्कामी होतो. सकाळी लवकर उठून आम्ही चालायला सुरवात केली होती. आधी एकदा रस्ता चुकलो. मग पुन्हा योग्य रस्त्यावर आलो. मोठे ग्रुप बरोबर असताना असे रस्ते चुकणे योग्य नाही, पण रस्ता चुकला नाही तर ट्रेक पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. या ट्रेकचे दोन रस्ते आहेत असं ऐकतो. एक शिडीची वाट आणि दुसरी गणपती घाटाची वाट. शिडीची वाट अधिक अवघड आहे असं ऐकलय, आम्ही मात्र तुलनेनी कमी कठीण अशा गणपती घाटाच्या वाटेनीच गेलो होतो. पहिला उताराचा एक मोठा टप्पा पार करून आल्यावर थोडा पठाराचा भाग आहे. डोंगरावरून पाहताना तिथे गाव असावं असं वाटत. पण तिथे गेल्यावर असं काही नाही हे लक्षात आलं. सिंहगडावर जाताना अनेक ठिकाणी जसे लिंबू सरबत किंवा ताक विकायला माणसं बसतात, त्यांची ती कच्ची दुकानं कशी असतात तसं एक लाकडी बंधाकाम आम्हाला लागलं. कच्च बांधकाम होतं. फक्त चार खांब, त्याच्यावर तिरके टाकलेले वर काही खांब, आणि त्यांच्यावर झावळ्या. बसायला सुद्धा झाडाचं खोड आडवं टाकून आधार केलेला. जागा छान होती. आम्ही तिथे थांबलो थोडा वेळ थोडी पोटपूजा केली. आणि पुढे निघालो. पण माझ्या डोक्यातला किडा वळवळायला लागला. या ट्रेकच्या आधीच माझा एकट्यानी राजमाचीचा ट्रेक करून झाला होता. राजमाची नंतर ही भीमाशंकरची जागा डोक्यात बसली. ट्रेक यथावकाश पूर्ण झाला. आम्ही पुण्यात आलो.

ती जागा अशी होती
आता एखादी ट्रेकिंगची कल्पना डोक्यात शिरली कि ती स्वस्थ बसून देत नाही. एकटं भीमाशंकरला जायचं. आणि आधी गेलो होतो त्याप्रमाणे नियोजन न करता रात्री मुक्कामाला ‘त्या’ ठिकाणी जायचं, आणि सकाळी उठून पुढे खांडसला जायचं!

मग एक दिवस नक्की केला. आदल्या रात्री घरातले बाकीचे सगळे झोपल्यावर मी माझी बॅग भरली. बॅग म्हणजे काय होतं, खाली अंथरायला एक घोंगडी, एक पांघरायला शाल.. खायचं सामान उद्या घरातून बाहेर पडलो कि घेऊ असं ठरवलं. आणि बॅग घराच्या दरवाज्याजवळ आणून ठेवली. सकाळी लवकर उठलो, लायब्ररीमध्ये जातो असं सांगून सकाळी लवकर बाहेर पडलो. तयार केलेली बॅग उचलून बाहेर पडलो. थेट स्वारगेटला गेलो. तिथे गेल्यावर कळलं थेट भीमाशंकर गाडी दुपारी होती, मी स्वारगेट वर पोहोचलो होतो सकाळचे सातला. थोडी संत्री, अंजीरं, थोड्या काकड्या, गाजरं असं सामान विकत घेतलं. थेट नाही तर गाडी बदलून जावू, असा विचार करून राजगुरुनगरची गाडी मिळाली. तिकडे गेलो. जाताना एसटी पंक्चर झाली. एरवी मी वैतागलो असतो. पण मला वेळ हवा होता. माझं लक्ष भीमाशंकरच्या जंगलात येणाऱ्या रात्रीवर होतं. भीमाशंकरच्या शंकराच्या मंदिरापासून ती जागा तासादीड तासाच्या अंतरावर होती, त्यामुळे भीमाशंकर हुन दुपारी दोन-अडीच पर्यंत निघालो पुढे चालायला तरी चालणार होते. यथावकाश मला राजगुरुनगरला पोहोचायला साडेनऊ झाले. मग मी तिथे पण थोडा टाईमपास केला. तिथून सुद्धा थेट एसटी नव्हतीच. पण मी विचार केला कि भीमाशंकरला जाऊन वेळ घालवावा. मग मी वडाप पकडली, तिने मला अकरापर्यंत भीमाशंकरला पोहोचवलं. अधिक वेळ न घालवता मी थेट मंदिरात गेलो. मी प्रचंड घाबरट आहे. माझा भूत-पिशाच्च वगैरेंवर अजिबात विश्वास नाही, पण त्यांच्या गोष्टी ऐकायला मला आवडतात. त्यामुळे अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर पडलेल्या. एकांताच्या ठिकाणी त्या नेमक्या आठवतात. त्याच्यावर उपाय म्हणून मग मी गाणी म्हणतो, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणतो वगैरे. पण अजून दिवस सुरु होता, परिसरात माणसांची वरदळ सुरु होती. मी आपला गाभाऱ्यात गेलो. फुलांचा वास त्या गाभाऱ्यात तुंबला होता. मी तिथे प्रार्थना केली, उद्यापर्यंत लक्ष ठेवून असा. बाहेर पडलो गाभाऱ्यातून. वेळ तर भरपूर होता. गुप्त भीमाशंकर पाहून येऊ असा विचार करून तिकडे निघालो. एक सांगायचं राहिलं दिवस अजून उन्हाळ्याचेच होते. पण सगळा परिसर अभयारण्याचा आहे, त्यामुळे कायम हवेत गारवा हा असतोच. गुप्त भीमाशंकरला उन्हाळ्यात पाहण्यासारख काहीच नव्हतं. धबधब्याच कोरडं पात्र. आणि गरम तापलेला काळा दगड. त्यात कातळाच्या सावलीत शंकराची छोटीची पिंड आणि समोर नंदी, नंदी मात्र उन्हात होता. तो परिसर मात्र वर्दळीपासून लांब होता, त्यामुळे शांत होता. माझ्या डोक्यात भुतांच्या गोष्टी नाचू लागल्या. मग मी ठरवून किशोर कुमारची दर्दभरी गाणी जोरात म्हणायला सुरवात केली. अशी तीन-चार गाणी म्हणून झाली. मग गाणीही आठवेनाशी झाली. तोपर्यंत साडेबारा होऊन गेले होते. मग मी एक गाजर एक काकडी खाल्ली. वेळ तर अजून भरपूर होता. मग बसून राहिलो तिथेच. वातावरण शांत होतं. मग मी मोबाईल काढला आणि अण्णांचा वृंदावनी सारंग लावला. डोळे मिटून बसलो. त्यांनतर भुतांच्या गोष्टी पण थांबल्या. आणि एकटं वाटणही बंद झालं. मग तो संपल्यावर उठलो. एक वाजून गेला होता. पुन्हा मुख्य मंदिरापर्यंत आलो. दुपारची गर्दी कमी होती. पुन्हा एकदा गाभाऱ्यात गेलो. पुन्हा तीच प्रार्थना. फक्त गुप्त भीमाशंकर पासून मुख्य मंदिरापर्यंत येताना अभयारण्यात असणाऱ्या प्राण्यांचे माहितीपर बोर्ड लावले आहेत. त्यात अनेक फुलपाखरं, पक्षी, शेकरू मुख्य. मग बाकीचे प्राणी वगैरे होते. त्यात बिबट्या सुद्धा भीमाशंकरच्या अभयारण्यात आहे असं मी वाचलं त्या बोर्डवर मग घाबरलो. माझ्याकडे कोणतही हत्यार नव्हतं. स्व संरक्षणासाठीच कोणतही साधन नव्हतं. आणि मी तर जंगलात राहायचं म्हणत होतो. एकदा विचार केला, कि नको.. आपण इथेच थांबू आणि सकाळी पुढे चालायला सुरवात करू. पण तो विचार किती क्षणभरच टिकला.

मागच्या वेळी ग्रुप बरोबर आलो होतो तो रस्ता माझ्या लक्षात होता. त्यामुळे न चुकता मी निघालो. मी गेलो होतो तो दिवस मी ठरवून विकेंड निवडला नव्हता किंवा गुरवार सुद्धा नव्हता. मी ठरवून मंगळवार निवडला. सोमवारी सुद्धा शंकराला डिमांड भरपूर. त्यामुळे मला एकटाच कुठे चाललास, एकटं फिरू नये वगैरे उपदेश देणारे कोणी भेटणार नाहीत अशी अपेक्षा ठेऊन मी गीवास निवडला होता. माझ्या नियोजित ठिकाणापर्यंत जाण्यासाठी फक्त उतरावं लागतं. आणि सगळा जंगलाचा प्रदेश असल्यामुळे कडक ऊन असून सुद्धा त्याचा त्रास असा होत नव्हता. मी अगदी आरामात चालत होतो. सूर्यास्त मला त्या स्पॉट वरून बघायचा होता. म्हणून कोणतीही गडबड न करता मी चाललो होतो. फोटो काढत होतो. जमेल तिथे जंगलाचा व्हिडीओ सुद्धा बनवत होतो. मी काही जंगलाचा अभ्यासक नाही, त्यामुळे मला पक्ष्यांची किंवा फुलपाखरांची विशिष्ट नावं काही माहिती नव्हती. पण मी असंख्य पक्षी पहिले निरनिराळ्या रंगांचे आकाराचे. फुलपाखरंही भरपूर पहिली. अगणित प्रकारची झाडं.. एकटं असलं म्हणजे हे बघता येतं. ग्रुप असेल तर ट्रेक वेळेत पूर्ण करण्यावरच सगळा भर असतो. असं भरपूर बघत मी चाललो होतो. माझ्या इतक लक्षात होतं कि पहिल्या उताराचा टप्पा पार झाला कि थोडी सपाटीची जागा आहे, कि तिथेच लगेच माझा नियोजित स्पॉट.. पण उताराचा पहिला टप्पा संपवून मी सपाटीला आलो तरी ती जागा दिसेना. रस्ता सुद्धा मळलेला वाटत नव्हता.  किंबहुना मी मागे पाहिलं तर त्याला रस्ता सुद्धा म्हणणं अवघड होता. मग मात्र माझी तंतरली. तीन-सव्वातीन होऊन गेलेलं होते. आणि आताचा मुख्य प्रश्न होता रस्ता शोधायचा. अशा वेळी सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ‘पॅनिक’ न होण्याचं. पण मी झालो. लगेच अस्वस्थ झालो. ‘पॅनिक’ झाल्यामुळे दिशा सुद्धा कळेनाश्या होतात. तसचं माझही झालं.

पण माझ्या हे लक्षात आलं कि पॅनिक न होणं महत्वाच. all is well वाला प्रकार स्वतःला समजावून सांगितला. दिशांचा अंदाज घेतला. आणि त्या लक्षात आल्या. आपल्या जायचं कुठे ‘खांडस’ला ते भीमाशंकरच्या नेमक्या कोणत्या दिशेला आहे हे आठवलं आणि चालायला लागलो. चालता चालता माझं मुक्कामाच प्लॅनिंग सुद्धा बदलून टाकलं. चालण्याचा वेगही वाढवला. तसा अर्धा तास चाललो आणि माझी नियोजित जागा समोर आली. भीमाशंकरच्या डोंगरावरून जिथे उतरायचं त्याच्या मागे मी उतरलो चुकून, म्हणून सगळी गडबड झाली.. मला आनंदही झाला आणि टेन्शनसुद्धा. जशी गेल्यावेळी मी ती जागा पहिली होती ती आजही तशीच होती. आजूबाजूची झुडपं वाढलेली. पण माणसाचा वावर तिथे होता एवढं काळात होतं. कारण ती जागा स्वच्छ होती. कचरा किंवा पाचोळा दिसत नव्हता. कदाचित ती छोटी टपरी शनिवार रविवार येणाऱ्या ट्रेकर्सना लिंबू पाणी किंवा ताक विकणारी असेल. आज मात्र मी सुनसान होती. चार-सव्वाचार झाले असतील. ऊन उतरतीला लागलेलं कळत होतं. पण अजून तो चांगला हातभार वर होता. सूर्यास्त व्ह्यायला अजून भरपूर वेळ होता. पण तितक्या वेळात मी खांडस पर्यंत पोहोचू शकलो नसतो. मग पुन्हा मी मुक्कामाचा विचार पक्का केला.

आता मला पुढंच टेन्शन होतं. माझ्याशिवाय आई बाबांना चैन पडत नाही. त्यांचा फोन येईल तेव्हा काय करायचं? काय सांगायचं? कोणाला फोन करायला रेंज सुद्धा मिळेना. मग मी माझी बॅग त्या टपरीच्या एका खांबाला टेकवून उभी केली. बॅगेतून एक काडकी आणि गजर घेऊन रेंज शोधायला बाहेर पडलो. अर्धा पाउण तास पायपीट केल्यावर थोडीशी रेंज मिळाली. मी विष्णूला फोन करून सांगितलं, ‘कि आई ला फोन करून सांग मुकुलच्या मोबाईलची बॅटरी संपली आहे, तो बसलाय अभ्यास करत. आणि बहुतेक तो आज रूम वरच थांबले’ आणि बाकीचं तू मॅनेज कर. उद्यापर्यंत मला फोन येता कामा नये.’ खरंच खूप चांगला मित्र आहे माझा. आई बाबांचा खरच फोन आला नाही मला. पण तेव्हढा विष्णूला फोन करून मी बॅग ठेवली होती तिथे येऊन बसलो. मग लक्षात आलं कि रात्री आपल्याला थांबायचं तर शेकोटी केली पाहिजे. आणि तर त्या अंधारात जीव नको होईल. पुन्हा मी उठलो. उन्हालाच असल्यामुळे कोरड्या लाकडांचा तुटवडा नव्हता. कोरडं गवतही तितकंच. अस सगळं साग्रसंगीत घेऊन आलो. चागला तासभर मी वाळकी लाकडं नि गवत तोडत होतो. रात्रभराची सोय करायची होती. यासगळ्यात भरपूर वेळ गेला. सूर्य बुडून गेला आणि माझ्या लक्षातही नाही. आणि खरं म्हणजे मी जिथे होतो तिथे झाडीच इतकी होती कि सूर्यास्त दिसलाही नसता. आता संधिप्रकाश पसरला होता. भूतांची दुसरी लाडकी वेळ. पहिली मध्यरात्री आणि दुसरी संध्याकाळी. मी घाबरायला सुरवात झाली. पण धीर धरून होतो मी. भीत होतो पण धीर सोडला नव्हता. कुठेतरी गुंतवून घ्यायचं म्हणून मी पुन्हा मोबाईल काढला हेडफोन कानात टाकले आणि गुलाम आली लावला. त्याच्या चांगल्या पंधरा-वीस मोठया गझल माझ्याकडे होत्या. मी त्या ऐकल्या. मग पोटात गुडगुड करायला लागलं.. मी संत्री काढली, सोलून एक एक फोड गुलाम आली च्या एका एका शेर बरोबर तोंडात टाकत होतो. गझल संपल्या. संत्री सुद्धा संपली. पोटातली गुडगुडही थांबली.

मला झोप कधीच त्रास देत नाही. माझ्या आयुष्यात तिच्याइतकी कार्यक्षम कोणीच नाही. डोळे मिटले कि मला झोप लागते. पण आज जास्तीत जास्त जगायचा माझा विचार होता. साडे आठलाच मध्यरात्री सारखा अंधार पडला होता. कुठून तरी मला कोल्हेकुई सुद्धा ऐकू आली. प्रचंड घाबरून मी जागेवरून उठलो. जमवलेली लाकडं एकत्र केली. गावात घेतलं आणि आणि जाळ तयार केला. शेकोटी करण्याआधी ती जागा स्वच्छ करून घेतली. थोडा खड्डा खणून त्यात एक जाड लाकडाचा बुंधा उभा केला. बाजूनी थोडी कमी जाड रचली सगळ्याच्या मध्ये गावात भरलं. आणि माझ्या हातानी निर्माण केलेलं ते शिल्प पेटवून दिलं. मधलं गावात भुरभूर पेटून गेल, पण माझी मेहनत वाया गेली नाही. जसं अपेक्षित होतं तसचं ते पेटलं. त्याच्या उजेडात माझी झोपयची जागा थोडीची साफ करून घेतली. साफ म्हणजे काय, दगडं थोडी बाजूला करायची इतकंच. बरोबर आणलेलं घोंगडं खाली अंथरलं आणि त्याच्यावर जाऊन बसलो. मी किती घाबरलो होतो हे मला सांगायची गरज वाटत नाही. ते कोणालाही कळू शकतं. बेक्कार घाबरलो होतो. ते इसापनीतीतल्या गोष्टीत बघा सश्याच्या पाठीवर झाडाचं पान पडत, आणि तो पळत सुटतो तसं प्रत्येक छोट्या मोठ्या आवाजाला माझं होत होतं. पूर्वी ऐकलेल्या सगळ्या गोष्टीतली भूतं समोर नाचायला लागली. पूर्वी एकदा ‘कोकणातले देव’ नावाचं पुस्तक मी वाचलेलं, त्यात भूतांचे प्रकार, त्यांना ओळखायचं कसं, ते सापडण्याची ठिकाणं, त्यांचे अॅक्टिव्ह होण्याचे काळ अशी सगळी रंजक माहिती त्यात होती. एरवी स्मरणशक्ती इतकी साथीला येणार नाही. पण एकटा असलो कि ती तत्परतेने येते. त्या ‘कोकणातले देव’ मधली एकेक भूतं मला समोर दिसायला लागली. शेवटी मी आडवा झालो. कुशीवर झोपलो आणि डोळ्यासमोर पेटवलेली शेकोटी येईल असा झोपलो. झोप येत नव्हतीच. झोपण्याचा प्रयत्न केला पण ती काही साथ देईना. शेवटचा निर्वाणीचा प्रयत्न केला तो ही फेल. मग पुन्हा उठून बसलो. हॅरी पॉटर ज्याप्रमाणे वॉल्डमॉर्ट समोर आल्यावर आनंदाचे प्रसंग आठवतो त्याच प्रयत्नात मी पण लागलो. कानात हेडफोन होतेच. आता कुमार गंधर्वांचा ‘श्री’ सुरु होता. मी ऐकलेल्या रागांपैकी सर्वात गंभीर राग. म्हणजे तो सुरु झाला कि वातावरण गंभीर होऊन जातं. पण मी तो बदलला नाही. डोळ्यासमोर शांत पेटलेली शेकोटी. पण डोळ्यात आनंदाचे प्रसंग आणि कानात श्री! आजूबाजूला नाचत असलेले ‘कोकणातले देव’ सुद्धा माझ्या कानाला कान लावून ‘श्री’ ऐकण्याच्या धडपडीत आहेत असा मला भास झाला. माझी भीती सुद्धा गेली. धीर करून मी अंगावर घेतलेलं पांघरूण बाजूला केलं. आणि उठून उभा राहिलो. हेडफोन कानात होतेच. मग मी शेकोटीच्या आसपासच चालत राहिलो. गोल फिरत राहिलो. शेकोटी दृष्टीआड जाऊ दिली नाही. लघु आणि दीर्घ शंका व्यक्त करून आलो. भीती आता गेली होती. कानात श्री सुरु असल्यामुळे भीतीदायक असे कोणतेही आवाज आता येत नव्हते. पेटलेल्या लाकडाचा उजेड जिथे पर्यंत आहे त्याच्या पलीकडचं काही दिसतं नव्हतं. त्यामुळे भीती कमी झालेली.

रात्रभर मला नीट झोप अशी लागलीच नाही. भीतीने असेल किंवा शेकोटी विजेल या भीतीने असेल पण मी तासातासाने जागा होत होतो, शेकोटी व्यवस्थित करून पुन्हा येऊन झोपत होतो. असा किती वेळा उठलो माझ्या लक्षात नाही. टक्क जाग आली तेव्हा झुंजूमुंजू झालं होतं. शेकोटी विजून गेलेली. फक्त निखारे थोडे शिल्लक होते. रात्री थंडी भरपूर पडली होती. माझे हात आखडले होते थंडीनी. मग मी पुन्हा थोडं गावात आणून शेकोटी पुन्हा पेटवली. थोडं शेकलं अंग! तोंड धुतलं, चूळ भरली. पुन्हा दोन गाजरं आणि अंजीरं खाल्ली. हे सगळे सोपोस्कर होईपर्यंत सूर्य उगवलाच. मी फार वेळ न घेता आवरलं, शेकोटी पाणी मारून पूर्ण विजावली. पुढे चालायला सुरवात केली. आता कसलंच टेन्शन नव्हतं. आता रस्ता चुकण्याची भीती नव्हती. ‘कोकणातल्या देवांची भीती नव्हती. जंगलातल्या प्राण्यांची भीती नव्हती. मला खांडसला पोहोचायला नाऊ वाजले. लगेचच कर्जतला जाणारी वडापसुद्धा मिळाली. कर्जत स्टेशन वर पोहोचतोच तोपर्यंत मुंबई कडून कोणती तरी एक्सप्रेस आलीच. गाडी लगेच सुटेल या भीतीनी मी तसाच तिकीट न काढताच चढलो. मला बसायला सुद्धा जागा मिळाली, आणि पुण्यात शिवाजी नगरला स्टेशन वर एकही तिकीट चेकर नव्हता!!     

(घरी कोणालाही माहिती नव्हतं म्हणून मी असा असा फिरून आलोय याचे सर्व पुरावे मी नष्ट केले विष्णू सोडून. म्हणून केवळ ब्लॉग आकर्षक व्हावा यासाठी फोटो वापरतो आहे. मी काढलेला एकही फोटो ठेवला नाही सर्व डिलीट करून टाकले. काही फोटो गुगल वरून घेतलेले आहेत, तर काही मी दुसऱ्या ठिकाणी काढलेले फोटो आहेत..)

Monday, 13 February 2017

विशाळगड ते लांजा व्हाया ‘माचाळ’

घोल ते रायगड असे आम्ही चालत गेलेलो एकदा. तेव्हाचं सगळं सांगून झालाय. पानशेतच्या पुढे पानशेतचा जलाशय शेजारी ठेवून २८ किमी वर ते घोल नावाचं गाव आहे. तिथून पुढे सह्याद्री उतरत जायचं आणि मग पायथ्याला गेलो कि तिथून दहा-बारा किलोमीटर वर रायगड आहे. असा एकूण वीस-पंचवीस किमीचा रस्ता असेल. पुण्यातून जाणारी एसटी घोलमध्ये संध्याकाळी साडेसात नंतर पोहोचते. त्यानंतर पुढचा रस्ता पार करणं आवधड आहे, म्हणून आम्ही घोलमध्येच मुक्काम केला होता. सकाळी उठून बेसिक आवरून आम्ही बसलो. तोंग धुतलं, थोडाफार खाल्लं. तोपर्यंत गावाला जाग येत होती. गावातली माणसं गावात आलेले नवीन पाहुणे बघायला बाहेर पडत होती. त्यातले काही धीर करून बोलायचा प्रयत्न करत होती. आम्ही अर्थात पाहुणे होतो. पुढे जायचा रस्ता आम्हाला माहिती नव्हता. आणि प्लॅन तोच होता, कि गावात कोणालातरी पुढचा रस्ता विचारायचा आणि पुढे चालायला लागायचं.. कुठून आलात, काय करता वगैरे गप्पा झाल्यावर आम्ही ‘रायगड’ ला जायचा रस्ता विचारला. ते आधी ते म्हणाले ‘अहो खूप रस्ता चुकला तुम्ही, इकडे घोलकडे कुठे आलात?’ आमचे चेहेरे चायनीजच्या वर्गात बसल्यासारखे झाले, ते पाहून ते आपणहून म्हणाले, ‘अरे महाडला जायचं पुण्यातून थेट एसटी आहे. तिथून पुढे गाड्या मिळतात त्यांनी जायचं.. इथून चालत जावं लागेल!’ मग मुद्दा लक्षात आला, त्यांना म्हणलो आहो चालतच जायचय. त्यांनी हात कपाळावर मारून घेतला, म्हणाले ‘अहो कशाला जाता चालत? आरामात गाडीनी जायचं, पुढे ‘रोपवे’ची सुद्धा सोय आहे. चार मिनिटांत किल्ल्यावर पोहोचतो...’ मग आमचा चालतच जायचा पक्का निर्धार आम्ही बोलून दाखवल्यावर त्यांनी तुमची हौस असेल तर जा! असं म्हणून आम्हाला रस्त्याला लावलं.

माझं रत्नागिरी जिल्ह्यात छोटंसं गाव आहे. गावाचं नाव ‘पन्हळे’. खरं म्हणजे जे आहे त्याला गाव म्हणणं म्हणजेच चुकीच आहे. गावाला साजेसं ते मोठ नाही. अगदीच माणसं राहतात म्हणून त्याला गाव म्हणायचं. पुण्यातून तिकडे जायचा सर्वात जवळचा रस्ता म्हणजे मुंबई बंगलोर हाईवेवरून आंबा घाटातून खाली उतरणे. तो खाली मुंबई गोवा हाईवे जिथे लागतो तिथून आमचं गाव पाच-सहा किलोमीटरवर आहे फक्त. पण आम्ही हौशी!! सरळ रस्त्यानी गेलो तर कसं चालेल? म्हणून आम्ही वेगळ्या रस्त्यानी गेलो. तिघंच जणं. मी आणि माझे दोन भाऊ. रात्रीच्या गाडीने कोल्हापूरला गेलो. पहाटेच्या गाडीनी आंबा घाटाच्या अलीकडे पोहोचलो. गावाचं नावही आंबाच. आम्हाला आंब्यात पोचायला तरी सात वाजले. तिथून विशाळगड फक्त १८ किलोमीटर. सकाळची पहिली वडाप पडकून गेलो विशाळगडला. वरंध किंवा अंबेनळी किंवा ताम्हिणी किंवा आंबोली किंवा कशेडी हे घाट कायम सर्वात आवघड म्हणून सांगितले जातात. असे जे कोण सांगतात त्यांनी हा आंबा ते विशाळगड रस्ता पाहिलेला नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुफान जंगल. आणि यु पेक्षा मोठी वळणं त्यात चढ किंवा उतार. अर्थात अशी वर्णनं करता येत नाहीत. ती करायची सुद्धा नसतात. पण ते प्रकरण सोप्प नव्हतं. ती इमेज घेऊन विशाळगडावर गेलो. तिथे शिवाजी राजांचा गौरवशाली इतिहास किल्ल्यावरील आवशेष पाहून आठवावा असं काहीही नाही. रीतसर वस्ती किल्ल्यावर आहे. सिमेंट कॉंक्रिटमध्ये बांधून काढेलेले दोन मोठे दर्गे आहेत. पिराला कोंबडी लागते, ती कापण्यासाठी मोठी प्रशस्त जागा आहे. ती जागा सुद्धा रस्त्याला लागुनच आहे. तेव्हा नाक बंद करून आम्ही चालत राहिलो. आम्हाला जायचं होतं माचाळला. हे रत्नागिरी जिल्ह्यातलं महाबळेश्वर आहे. लोहगड किंवा विसापूर सारखी विशाळगडावर वरती भरपूर जागा आहे. गडाचा आवका बराच मोठा आहे. तो सगळा पार करून कोकणाच्या टोकाला आम्ही पोहोचलो.

माझा असा अनुभव आहे कि जिथे जिथे आम्हाला रस्ता माहिती नाही अशी वेळ येते तेव्हा आम्हाला जिथे जायचं तिथेच जाणारा एक माणूस भेटतो. हे अनेकदा घडलं आहे. राजगड – तोरणा गेलो होतो तेव्हा सुद्धा पाव रस्ता आमचा पार करून झाला आणि आम्ही रस्ता चुकलो. तेव्हा आम्हाला सांगणारा एका माणूस भेटला होता. राजमाचीवरून कोंडण्याच्या लेण्याबघायला चाललो होतो तेव्हा असाच माणूस भेटला होता. असा आम्हाला विशाळगडावर पण भेटला. तो हि माचाळलाच चालला होता. पायात स्लीपर, एका हातात काठी, हाफ पँट, अंगात निळा पण फेड पडलेला शर्ट, डोक्याला फडक बांधून एकही अक्षर न बोलता तो आमच्या पुढे चालत होता. विशाळगडाचा डोंगर संपतो तिथे साधारण दीडशे-दोनशे फुट डोंगर उतरायचा आहे. आणि लगेच तेवढाच माचाळचा डोंगर चढायचा आहे. तो टप्पा सोप्पा नाही. पावसाळा संपून आता भरपूर दिवस उलटून गेले, वातावरण कोरडं सुद्धा होऊन गेलं. आता तो कोरडा पडलेला मुरूम वाटेवर उतरलेला असतो. तो पक्का नसतो. त्याचा कोणताही भरवसा देता येत नाही. असा एक तीव्र उतार आणि तेवढाच तीव्र चढ चढून आम्ही आलो. उन तापायला सुरवात झालीच होती. इथून ते माचाळ गाव दिसायला लागतं. तरी अजून ते अंतर लाब होतं. पण गाव जवळ आलं आहे याचा तरी अंदाज आला..

‘व्हिलेज व्हिजीट’ नावाचा एक प्रकार पुण्यामुंबईकडे चालतो. कॉस्मोपॉलिटिन वातावरणात वाढलेली मुल मिळून खेडं कसं असतं हे बघायला जातात, जमिनीवर मांडी घालून जेवायचा अनुभव घेतात वगैरे. असा दोन वर्षापूर्वी एक व्हिलेज व्हिजीटच नियोजन केलं होतं. आणि व्हिजीट साठी खडकवासला धरणाच्या पुढंच गाव खानापूर निवडलं होतं. तेव्हा माझ्या डोक्यात आलं कि आमच्या सह्याद्रीत अशी कित्येक गावं वस्त्या आहेत जिथे कच्चा सुद्धा रस्ता जात नाही. रोजचं ट्रेकिंग करूनच लोकांना आपल्या घरी जावं लागतं. आणि या स्थिती पासून आपण किती अनभिज्ञ आहोत. माचाळ हे गाव असच आहे. पठारावर वसलेलं. आम्ही गेलो तो दिवस २६ जानेवारीचा होता. त्या गावात शाळा होती, तिथे झेंडावंदन करून झालं होतं. मला राहवेना, मी त्या शाळेचा नि झेंड्याचा एक फोटो काढून ठेवला. जिथे रोजचं जगणं हाच प्रश्न आहे तिथे सुद्धा लोकं कर्तव्य विसरत नाहीत. माचाळच्या त्या पठारावर बिबट्या किंवा इतर हिंस्त्र प्राणी सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आजूबाजूला जंगल क्षेत्र आहेच. पण इतक रम्य गाव मी पाहिलेलं नाही. इतक शांत गाव मी पाहिलेलं नाही. पुण्यात सुद्धा बघायला मिळणार नाही इतक निर्लेप हास्य मी तिथल्या मुलांच्या चेहे-यावर पाहिलेलं आहे. मोबाईलला रेंज नाही, जीओ वगैरे तर नाहीच नाही, पण मी एकही घरावर डिश अँटेना पहिला नाही. तरीही मुलं हासत होती.

माचाळ गाव पार करून आम्ही पुढे आलो. अजून पठार संपलेलं नव्हतं. काम करत बसलेल्या बायकांनी पुन्हा आम्हाला योग्य तो रस्ता सांगितला. आम्ही वेगळ्याच रस्त्यानी पुढे निघालो होतो. चागला बाराचा सूर्य तळपत होता. पठार जिथे संपत तिथे जिवंत पाण्याचा एक झरा होता. गार पाणी थोडं तोंडावर मारलं.. आता पठार संपलं आणि खाली कोकण दिसायला सुरवात झाली. आता तो संपूर्ण डोंगर उतरून खाली जायचं होता. फार वेळ न घेता आम्ही चालायचा सुरवात केली. रस्ता असा काही होता कि वाटेवर डोंगराची सावली येत होती. त्यामुळे थेट उन्हाचा तडाखा बसत नव्हता. चागलं तासाभराच्या पायपीटीनंतर आम्ही एका गावात पोहोचलो. अजून डोंगर पूर्ण उतरून झालेला नव्हता. निम्माच झालेला. तिथे सुद्धा शाळा होती, तिथे सुद्धा झेंडावंदन झालं होतं. या गावातल्या लोकांना कोणताही किराणामालाचं समान भरायचं असेल तर डोंगर चढून माचाळ, तिथून विशाळगड तिथून पुढे आंबा. इतका जवळ जवळ ३५ किलोमीटरचा प्रवास करून वर घाटावर यावं लागतं किंवा डोंगर उतरून ‘नावे’ इथपर्यंतचा प्रवास करून यावं लागतं. आणि हो अशी गावं केवळ आफ्रिकेत नाहीत. आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपल्यापासून जवळ.. त्या गावात खास कोकणी पद्धतीच एक महादेवच मंदिर होतं. थोडं थांबलो. कोकणात आलो होतो त्यामुळे उन्हाबरोबर घामही वाढायला लागलेला. पुन्हा चालायला सुरवात केली. ते हि माचाळ इतकंच रम्य होतं. पण हे आपल्याला रम्य दिसतं, कारण आपल्याला तिथे रोज राहायचं नाही. दुरून आपण पाहतो छान म्हणतो आणि निघून जातो.. तसेच आम्ही पण निघून गेलो.


डोंगराच्या पायथ्याला आलो. आता डांबरी रस्ता सुरु झाला होता. आमच्या ट्रेक मधला रोमान्स् संपून गेला होता. पण आता पुढचे सात आठ दिवस इथे कोकणात घालवायचे आहेत, या आशेवर मी चालत राहिलो. उन आणि दमट हवा यामुळे खूप थकून गेलो. खूपच थकलो. एका ठिकाणी रस्त्यातच बसलो आणि जेवलो. येणारी जाणारी माणसं एलियन कडे बघावी तसे बघत होते. पण आम्ही हौस संपत नाही. हौस संपत नाही, ती कायम आहे!!

        

Friday, 3 February 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ‘इस्लाम’


बाबासाहेबांच्या विचारांचा भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने काय उपयोग आहे? एकविसाव्या शतकातही बाबासाहेबांचे विचार भारताला कसे मार्गदर्शक आहेत, याची चर्चा महाराष्ट्र आणि भारतभर होते आहे. नवभारताच्या घटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी या दृष्टीने बाबासाहेबांचा आणि त्यांच्या विचारांचा भरपूर अभ्यास चर्चा-विनिमय, लेख, व्याख्यानमाला आजपर्यंत होत आले आहेत, पुढेही होतील. पण ‘दलित आणि देश’ असे द्वैत निर्माण झाले तर देशाला अधिक प्राधान्य देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रवादी विचारांची तितकी चर्चा या देशात झाली नाही. ती या निमित्ताने करावी यासाठी हा लेख लिहिला आहे.

·         खरा पुरोगामी -

भारतातील दलितांचा प्रश्न याच्याशिवाय समग्र भारताचा विचार करून सातत्यानी बाबासाहेबांनी ३ विषयांवर मतं व्यक्त केली आहेत. एक – भारताची संरक्षण सिद्धता, दोन – राज्यघटनेचं स्वरूप आणि तीन – हिंदू मुस्लीम संबंध. बाबासाहेबांचे राष्ट्रीयत्व सिद्ध होण्यासाठी हे तीन विषय पुरेसे ठरतात. आज या तीनांपैकी पहिले दोन प्रश्न सुटलेले आहेत. भारतीय राज्यघटनेचे स्वरूप निश्चित झालेले आहे, भारत संरक्षणाच्या बाबतीत जगात आघाडीवर आहे. अजूनही न सुटलेला प्रश्न आहे तो म्हणजे ‘हिंदू-मुस्लीम’ प्रश्न. या संदर्भात बाबासाहेबांच्या विचारांचा आढाव आपण घेतला पाहिजे. एकविसाव्या शतकातही हा प्रश्न न सुटण्याचे कारण म्हणजे आपण ‘धर्मचिकित्सेला’ घाबरतो. किंवा आपण एकाच धर्माच्या चिकित्सेला सदैव तयार असतो. त्यामुळे एक मुद्दा आधीच स्पष्ट करणे गरजेचे आहे, तो म्हणजे बाबासाहेबांनी सर्वच धर्माची कठोर चिकित्सा केली आहे. त्यांनी केलेली इस्लामची चिकित्सा फक्त विचारात घेऊन त्यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. कारण परंपरावादी आणि सनातनी हिंदुना वाचवणार नाही इतक्या कठोर शब्दात त्यांनी हिंदूंची आणि हिंदू धर्माची चिकित्सा केलेली आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष हिंदू धर्माची चिकित्सा केलेले ग्रंथ उपलब्ध आहे, तसे प्रत्यक्ष इस्लामची चिकित्सा केलेले ग्रंथ नाहीत. पण कठोर चिकित्सेचा स्वभाव मात्र अनेक ठिकाणच्या भाषणांवरून आणि लिखाणावरून दिसतो.

·         काळाचे ३ टप्पे -

बाबासाहेबांनी इस्लाम धर्माचा विचार प्रामुख्याने ३ वेळेला केलेला दिसतो. सर्वप्रथम १९२९ साली नेहरू कमिटीच्या अहवालावर लिहिलेला लेख. त्यांतर धर्मांतराची घोषणा करताना आणि नंतरच्या काळात. सर्वात शेवटी फाळणी आणि पाकिस्तान निर्मितीच्या वेळी. बाकी अनेक ठिकाणी इस्लाम धर्मांसंबंधात आणि मुसलमानांच्या मानसिक वृत्ती संबंधात अनेक ठिकणी लिखाण किंवा भाषणांचे संदर्भ आहेत, पण ह्या तीन ठिकाणचे लेखन आणि भाषणे अत्यंत सूत्रबद्ध आहे. इथे एक मुद्दा सांगणे आवश्यक आहे. तो म्हणजे भारताची फाळणी किंवा नेहरू कमिटीच्या शिफारशी किंवा बाबासाहेबांचे धर्मांतर या सर्व गोष्टी आज ऐतिहासिक घटीते आहेत. त्यांच्या वस्तुस्थितीमध्ये आज फरक होण्याची शक्यता नाही. म्हणजे आज नेहरू कमिटीच्या शिफारशी लागू होऊ शकत नाहीत, किंवा पुन्हा फाळणी रद्द होऊन अखंड भारत निर्माण होण्याची शक्यता नाही (किमान तसं होऊ नये!). त्यामुळे बाबासाहेबांची फाळणी, नेहरू कमिटी वरील मते जरी कालबाह्य झालेली असली तरी इस्लाम आणि मुसलमान यांच्या संबंधीची मतं कायम आहेत, शाश्वत आहे. हे वाचताना लक्षात येईलच. आपण विचार करताना अशा शाश्वत मतांचा विचार करणार आहोत, त्याच्या अनुशांगनी फाळणी आणि नेहरू कमिटीचे संदर्भ येतीलच.

·         १९२९ – नेहरू कमिटीचा रिपोर्ट -

बाबासाहेब मुसलमानांच्या प्रवृत्तीचा ठळक अभ्यास नेहरू कमिटीच्या अहवालावर लिहिलेल्या लेखापासून सुरु होतो. भारताला स्वातंत्र्य हवं होतं म्हणजे नेमकं काय, तर भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेले ब्रिटिशांपेक्षा वेगळी राज्यव्यवस्था हवी होती. म्हणजे वेगळी राज्यघटना हवी होती. सर्व भारतीय म्हणजे भारतीय समाजाचे दोन महत्वाचे घटक ‘हिंदू आणि मुसलमान’ या दोघानाही मान्य होईल अशी राज्यघटनातयार करण्याचे प्रयत्न लोकमान्य टिळकांचे काळापासून (१८९८) सुरु होते. बहिष्कृत भारताच्या नेहरू कमिटीच्या अहवालावरील लेखात बाबासाहेब म्हणतात, अशी एक घटना या देशात १९२१ पासून लागू आहे. त्यामुळे गरज नसताना संपूर्ण नवीन घटना तयार करण्याचे काम नेहरू कमिटीने अंगावर घेतले आहे. ह्या नेहरू कमिटीने एकूण ७ शिफारशी केल्या आहेत. त्यामध्ये मागासलेल्या हिंदूंना असलेले स्थलवाचक – जातीवाचक मतदार संघ अमान्य करून मुसलमानांना देण्याची शिफारस नेहरू कमिटीने केली आहे, त्यावर बाबासाहेब म्हणतात, “या देशाच्या राजकारणात बेजबाबदारी व बेबंदशाही माजली असेल तर त्याला मुख्य कारण म्हणजे मुसलमानांकरिता स्वतंत्र स्थापन केलेला जातीवाचक मतदार संघ” बाबासाहेबांच्या म्हणण्याचा रोख असा आहे कि, “मागासलेल्या हिंदूंकरिता घडवलेले जे स्थलवाचक – जातीवाचक संघ राष्ट्रहिताच्या दृष्टीने नुकसानकारक आहेत, म्हणून टाकाऊ ठरविण्यात आले तेच स्थलवाचक – जातीवाचक संघ मुसलमानांकरिता निर्माण करताना कमिटीला कसा मुळीच दुगदा वाटला नाही, याचे आम्हास तरी आश्चर्य वाटते” बाबासाहेब या दुटप्पीपणाला ब्राह्मणी कावा म्हणतात.

नेहरू कमिटीच्या रिपोर्टवर टीका करताना १८ जानेवारी १९२९ च्या ‘बहिष्कृत भारता’च्या अंकात ‘नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य’ या अग्रलेखात बाबासाहेब लिहितात, “मागासलेल्या हिंदूंची व अस्पृश्यांची पायमल्ली करून कमिटीने हिंदूचे हित साधले असते तरी आनंद मानण्यास जागा होती. परंतु कमिटीला तेही साधता आले नाही.” नेहरू कमिटीच्या शिफारशींमध्ये सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांना स्वायत्त प्रांताचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आहे, “सिंध, बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्दीवरील प्रांत वेगळे व स्वतंत्र करण्यात आले म्हणजे हिंदुस्थानात जे एकंदर ९-१० प्रांत आहेत. त्यापैकी पाच प्रांतात मुसलमानांचे प्राबल्य होईल. अशी प्रांतरचना झाली असताना ज्या प्रांतात मुसलमान अल्पसंख्य आहेत त्या प्रांतातील हिंदुनी जर मुसलमानांचा छळ केला तर ज्या प्रांतात हिंदूंची कमी संख्या आहे त्या प्रांतातील मुसलमान लोक त्यांना (हिंदुना) छळावयास लागतील” बाबासाहेब सर्व हिंदूंना विचारतात कि, “मुसलमानांना स्वतंत्र मतदार संघ देणे बरे कि काही मुसलमान प्रांत निर्माण करून तेथील हिंदू लोकांना मुसलमानांच्या ओलीस देणे बरे?” बाबासाहेब शेवटी म्हणतात “ज्या योजनेत हिंदुना धोका पोहोचतो ती योजना काय कामाची?”

बाबासाहेब याच लेखात म्हणतात कि अशा प्रांतरचनेमुळे हिंदुना केवळ धोका आहे असे नव्हे तर हिंदुंवरही आरिष्ट येणार आहे. अशी भीती बोलून दाखवण्याचे कारण, समजा अशी प्रांतरचना करून, ब्रिटीश साम्राज्याअंतर्गत मिळालेले स्वराज्य भारत राखणार कसं हा बाबासाहेबांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा मुद्दा सीमांच्या संरक्षणाचा आहे. बाबासाहेब म्हणतात, “हा देश (भारत) एका बाजूने चीन-जपानसारख्या भिन्न संस्कृती तर दुसऱ्या बाजूला तर्की, पर्शिया, अफगाणिस्तान सारख्या मुसलमानी राष्ट्राच्या वेष्टनात अडकलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताने खूप सावधपणे वागले पाहिजे. समजा चीन-जपान कडून भारतावर हल्ला झाला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी सर्व भारत एकत्र उभा राहील याची खात्री देता येते. परंतु स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानवर जर तर्की, पर्शिया किंवा अफगाणिस्तान या तीन मुसलमान राष्ट्रांपैकी कोणी एकाने जरी मारा केला तर त्या प्रसंगी सर्व लोक एकजुटीने तोंड देतील याची खात्री कोणी देईल का? आम्हास तरी देता येत नाही. या देशात हिंदू आणि मुसलमाना हे दोन समाज नव्हे तर दोन राष्ट्र नांदत आहेत हिंदी मुसलमान लोकांचा ओढ मुसलमान संस्कृतीच्या राष्ट्रांकडे असणे अगदी स्वाभाविक आहे. हा ओढ इतका बेसुमार बळावला आहे कि मुसलमानी संस्कृतीचा प्रसार करून मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करणे व होतील तितके काफिर देश त्याच्या अमलाखाली आणणे हे त्याचे धेय्य होऊन बसले आहे. या विचारांनी पछाडल्यामुळे पाय हिंदुस्थानात असले तरी डोळे तुर्कस्तान कड अगर अफगाणिस्तान कडे लागलेले आहेत. हिंदुस्थान देश आपला आहे याबद्दल ज्यांना अभिमान नाही व ज्यातील निकटवर्तीय हिंदूबांधवांविषयी ज्यांना बिलकुल आपलेपणा नाही असे मुसलमान लोक मुसलमानी परचक्रापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यास सिद्ध होतील असे धरून चालणे धोक्याचे आहे असे आम्हास वाटते” बाबासाहेब स्वतंत्र होणाऱ्या हिंदुस्थानला याची जाणीव करून देतात कि, “सगळे मुसलमानी प्रांत हिंदुस्थानच्या सरहद्दीवर आहेत. विंध्य पर्वतापर्यंत सारी धरित्री मुसलमानमय आहे. यामुळे मुसलमान लोक स्वतंत्र भारताचे द्वारपाल आहेत. त्यांनी शत्रूला अडवून धरले तर ठीक, पण त्यांनी जर शत्रूला सहाय्य केले, नव्हे तटस्थ राहिले तरी अर्धे मकान गाठीपर्यंत त्यांना कोणीही शह देऊ शकणार नाही. घराच्यांच्याच सहाय्याने आत आलेला शत्रू घर करून राहणार, त्याला बाहेर घालवणे अशक्य आहे”
           
·         बाबासाहेबांचा द्रष्टेपणा -

या लेखाच्या शेवटी बाबासाहेबांनी ही भीती बोलून दाखवली आहे कि, हिंदू समाजाचा रोष त्यांच्यावर होताच, या प्रकारचे मत व्यक्त करून मुसलमान समाजाचा सुद्धा रोष त्यांच्यावर येणार, हे त्यांना माहिती होते. पण ज्यात देशाचे नुकसान आहे, ते स्वार्थासाठी मान्य करणे योग्य नाही. म्हणून बाबासाहेबांनी नेहरू कमिटीचा प्राणपणानी विरोध केला आहे. ती नेहरू योजना मान्य झाली नाही. पण बाबासाहेबांचे इथल्या मुसलमान समाजाच्या मानसिक प्रवृत्तीबद्दल १९२९ साली लिहिले आहे, ते आज खरं ठरताना दिसते आहे. भारतातल्या हिंदूंबद्दल त्यांना आपलेपणा नाही, पण इस्लामी संस्कृतीचा प्रसार करणे, मुसलमानी राष्ट्रांचा संघ तयार करणे. हे सर्व निकष आताच्या इराक आणि सिरीया मधील ‘इस्लामिक स्टेट’ मध्ये दिसतात. भारतातले मुसलमान सिरीया आणि इराक मधील मुसलमानी संस्कृतीकडे आकर्षित होऊन भारत सोडून जातात. या प्रकारचे वास्तव बाबासाहेबांना समकालीन लोकांपैकी कोणीही मांडलेले नाही. बाबासाहेबांचे वेगळेपण हे आहे.

·         १९३५ – धर्मांतर : घोषणा आणि वाद -

१३ ऑक्टोबर १९३५ रोजी ‘येवला’ (नाशिक” येथे मुंबई इलाखा परिषद भरली होती. याच परिषदेला धर्मांतर परिषद म्हणतात. ‘हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मारणार नाही’ ही प्रसिद्ध घोषणा याच परिषदेत बाबासाहेबांनी केली. प्रत्यक्ष धर्मांतर करण्यासाठी बाबासाहेबांनी पुढची वीस वर्ष घेतली. बाबासाहेबांचा सुरवातीपासून आग्रह होता कि, ‘हिंदू संस्कृतीच्या परिघातील धर्म’ स्वीकारणार. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. या संदर्भात बाबासाहेबांचा जुना अग्रलेख महत्वाचा ठरतो. २२ एप्रिल १९२७ च्या बहिष्कृत भारताच्या लेखात संस्कृतीच्या मुल्यांची तुलना करताना बाबासाहेब म्हणतात, “खरे म्हंटले असता ख्रिस्ती किंवा मुसलमानी धर्मशास्त्रे समतेच्या तत्वांचा पुरस्कार करणाऱ्यांपैकी नव्हेत. त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या मर्यादा अगदी आकुंचित आहे. सारी माणसे ईश्वराची लेकरे आहेत व परमेश्वराच्या दृष्टीला ती समसमान आहे एवढेच काय ते त्यांचे सांगणे आहे. माणसे ही ही आपापसात एकमेकांच्या दृष्टीने समसमान आहेत इतके प्रतिपादण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली नाही” याच लेखात बाबासाहेब पुढे म्हणतात, “हिंदू धर्माचा सिद्धांत ख्रिस्ती व महंमदी धर्माच्या सिद्धांतांपेक्षा किती तरी पटीने समतेच्या तत्वाला पोषक आहे. माणसे ईश्वराची लेकरे आहेत एवढ्यावर न थांबता ती ईश्वरची रूपे आहेत असे मोठ्या निर्भीडपणे हिंदूधर्म सांगत आहे. जेथे सारीच ईश्वराची रूपे आहेत तेथे कोणी उच्च कोणी नीच असा भेदभाव करणे शक्य नाही. हे त्या धर्माचे एक महान ओजस्वी तत्व आहे हे कोणासही नाकाबुल करता यावायचे नाही.”

धर्मांतराचा गंभीर विचार बाबासाहेबांच्या मनात येण्यापूर्वी अनेक वर्षापासून बाबासाहेबांचे इस्लामबद्दलचे मत काय आहे हे यावरून लक्षात येईल.

·         बौद्ध धर्माचाच विचार -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे जेष्ठ आणि श्रेष्ठ चरित्रकार ‘चांगवेद भवानराव खैरमोडे’ यांनी बाबासाहेबांचे १२ खंडात चरित्र लिहिले आहे. अनेक राजकीय गोष्टींबद्दलचे बाबासाहेबांचे खाजगी उल्लेख, व्यक्तिगत गुणविशेष, समाज – धारणा – विचारपध्दती खैरमोडे यांनी अचूक टिपले आहेत. या चरित्राचा सहावा खंड केवळ बाबासाहेबांची धर्मांतराची घोषणा आणि त्यानंतर महाराष्ट्र भारतात उठलेलं वैचारिक वादळ यावर आधारित आहे. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर लगेच २३ ऑक्टोबरला ‘दैनिक त्रिकाळ’ मध्ये एक बातमी छापली होती, त्याचा संदर्भ खैरमोडे यांनी दिला आहे. “आपण इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्विकारती नाही, असे बाबासाहेबांनी जाहीर केले आहे. बुद्ध धर्म हा लोकशासित धर्म असल्यामुळे तो आपल्याला पटत असल्याचे त्यांनी सांगितले” त्यानंतर तीनच दिवसात बुद्ध धर्माचे श्रेष्ठ अभ्यासक धर्मानंद कोसंबी बाबासाहेबांना राजगृहात भेटले. खैरमोडे लिहितात, “दोघांनी बुद्ध धर्मावर चर्चा केली. तेव्हा धर्मानंद कोसंबी यांना असे वाटले की, जरी आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारायचा याबद्दल स्वतः ला बांधून घेतलेले नाही, तरी त्यांचा बौद्ध धर्माकडे ओढ आहे. त्याच रात्री ते (कोसंबी) गांधीजींना भेटण्यास वर्ध्याला गेले. त्यांनी गांधीजींना सांगितले की, ‘Mahatmaji, I have hunch thought Dr. Ambedkar would accept Budhism.” त्याच्या आधी दोन दिवस २५ ऑक्टोबरला हिंदूसभेतर्फे आलेल्या शिष्टमंडळाशी बोलताना बाबासाहेब म्हणाले, “जेणेकरून भारत देशाच्या हिताला धोका येईल अशा प्रकारचे धर्मांतर मी करणार नाही. याबद्दल तुम्ही निश्चिंत असा. एवढेच काय, पण देशहितासाठी माझ्या समाज्याच्या प्रगतीवर मला जळजळीत कोळसे ठेवण्याची वेळ अली तर मी तसे करण्यास का कुं करणार नाही!”

बाबासाहेबांकडून इस्लाम स्वीकाराचे संकेत मिळण्याचे काही पुरावे समोर आणले जातात. खैरमोडे यांनी याचा विचार करून एक उदाहरण त्या पुराव्यांच्या ऐतिहासिकते बद्दल कितपत तथ्य आहे हे सांगितले आहे. ‘पुण्यातील मुक्कामात बाबासाहेबांना मुसलमाना, शीख, ख्रिस्ती पुढारी व धर्मगुरू भेटीला येत आणि त्यांच्याशी चर्चा करून, ते साहेबाना ‘आमचा धर्म स्वीकारा’ अशी विनंती करीत. हे लोक आपापल्या भूमिकेचे समर्थन करीतअसत आणि आंबेडकर आपला धर्म स्वीकारतील अशी अटकळ बांधून तिची वाच्यता जाहीरपणे करत. वर्तमानपत्रांचे बातमीदार अशा वृत्तांना प्रसिद्धी देत असतं. मुंबईच्या ‘टाइम्स’ने एक वृत्त असे प्रसिद्ध केले होते. “The deputation expressed the view that although Dr. Ambedkar had not openly intended that he would embrace Islam together with his followers, still there were indications thet he would ultimately decide in fvour of the Islamic faith”

·         ... किंवा शीख पंथ -

अमृतसर येथे एप्रिल १९३६ गुरुद्वारात भरलेल्या एका सभेत भाषण करताना बाबासाहेब म्हणाले होते कि, “पुढे मी काय करणार आहे हे इतक्यात मला सांगता येण्यासारखे नसले तरी शीख पंथ आवडतो हे मी सांगू शकतो. त्याच्यापूर्वी एकदा शीख लोकांनी बाबासाहेबांच्या बरोबर धर्मांतरासंबधी बोलणी केली. तेव्हा शीख धर्मातील पाच ककार न पाळता फक्त एकच ककार – कृपाण वापरणे – आम्ही पाळू असा बाबासाहेबांनी हेका धरला. हा हेका धरणे हे त्याचे पूर्ण विचारांती होते, असे खैरमोडे म्हणतात. याविषयी पुढे भरपूर चर्चा झाली, पण निश्चित कोणता निर्णय झाला नाही.
‘चांगदेव भवानराव खैरमोडे’ बाबासाहेबांच्या चरित्राच्या १२ खंडापैकी संपूर्ण एक खंड (सहावा) केवळ धर्मांतराची घोषणा आणि त्यानंतर उठलेलं वादळ यावर खर्च केलेला आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माशिवाय केवळ ‘शीख’ धर्माचा गांभीर्याने विचार केला असल्याचे लक्षात येईल. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात सतत ‘अराष्ट्रीय, भारताच्या हिताला धोका संभवेल अशा धर्माचा त्यांनी कधीही विचार केलेला नाही. बाबासाहेबांनी केलेल्या इस्लामच्या चिकित्सेचा सर्वात मोठा आणि महत्वाचा स्वतंत्र दस्तऐवज म्हणजे ‘पाकिस्तान’ हा ग्रंथ आहे.

·         १९४० – Thoughts on Pakistan ( किंवा मुस्लीम मन) -

२८ डिसेंबर १९४० रोजी बाबासाहेबांचा ‘Thoughts on Pakistan’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. खैरमोडे बाबासाहेबांचा हा सर्वात महत्वाचा ग्रंथ मानतात.

२६ ऑक्टोबर १९४० रोजी ‘मुस्लीम लीग’ने लाहोर येथील वर्षिक अधिवेशनात ऐतिहासिक ‘पाकिस्तान’ म्हणजे ‘फाळणी’ चा ठराव पास केला. ‘पुढील मूलभूत तत्वांवर आधारित नसणारी कोणतीही घटनात्मक योजना मुसलमानांना मान्य होणार नाही. ते तत्व असे : भौगोलिक दृष्ट्या सलग घटकांची (Units) ... अशा भागांत (regions) पुनर्रचना करण्यात यावी, की ज्या भागात (areas) मुस्लीम बहुसंख्यांक आहेत, अशा वायव्य व पूर्वेकडील विभागांना (zones) एकत्र करून स्वतंत्र राज्ये स्थापन करता यावेत व त्यांचे घटक (constitutent units) स्वायत्त व सार्वभौम असावेत” हा ठराव सुद्धा कोणताही आक्षेप घेण्यासारखा नाही, असे बाबासाहेबांचे आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मत होते. ही मागणी अगदी स्वाभाविक आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे ‘लाहोर ठरावावर’ काय मत असावे असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा एक अहवाल तयार करण्याची जबाबदारी पक्षाने बाबासाहेबांवर टाकली. बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास करून एक अहवाल निर्माण केला. तोच अहवाल पुढे ‘पाकिस्तान’ हा ग्रंथाची निर्मिती झाली. कोर्टामध्ये ज्याप्रमाणे कैफियत मांडली जाते वादी, प्रतिवादी आणि शेवटी निकाल असेच या पुस्तकाचेही स्वरूप आहे.

मुसलमानांनाकडून पाकिस्तानच्या मागणीला पाठींबा मिळण्याची दोन मूलभूत करणे आहेत. काही कारणं तत्कालीन आहेत, काही कारणं मूलभूत आहेत. बाबासाहेबांनी केलेल्या इस्लामच्या चिकित्सेच्या दृष्टीने आपल्यासाठी मूलभूत करणे जास्त महत्वाची आहेत.

राष्ट्रवाद म्हणजे काय? या सर्वात मूलभूत प्रश्नापासून बाबासाहेबांनी ग्रंथाची सुरवात केलेली आहे. बाबासाहेब म्हणतात, “राष्ट्रीयत्व ही सामाजिक भावना आहे. ही एकाकीपानाची सामुहिक भावना आहे. ज्यांच्या मनात ही भावना निर्माण होते त्यांच्यात बंधुत्वाची भावना निर्माण होते.” बाबासाहेब पुढे म्हणतात कि, “भारतीय मुस्लीम हे राष्ट्र आहे हा त्यांचा दावा कोणतीही कुरकुर न करता मान्य केला पाहिजे.” यानंतर आजचे ढोंगी पुरोगामी आणि ढोंगी कम्युनिस्ट लोकांप्रमाणे बाबासाहेब हिंदू मुस्लीम ऐक्याची काही उदाहरणं देतात. त्यामध्ये ब्रिटीश कायदा लागू होण्यापूर्वी मुसलमानांना हिंदू कायदा लागू होतं. किंवा मुस्लीम दर्गे आणि पीर हिंदूंना प्रिय आहेत. हिंदू – मुस्लीम ऐक्याचे अकबराचे प्रयत्न, १८५७ साली हिंदू मुसलमान एकत्र येऊन लढले इत्यादी. पण बाबासाहेब आजच्या पुरोगाम्यांपेक्षा वेगळे ठरतात कारण या काही साम्यस्थळांपेक्षा पुढे जाऊन वस्तुस्थितीचा विचार करतात. बाबासाहेब विचारतात, “या आधारावर हिंदू व मुस्लीम एक राष्ट्र स्थापन करू शकतील असा निष्कर्ष काढता येईल का? किंवा एवढ्या गोष्टीवरून एकमेकांवर अवलंबून राहण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे हे स्पष्ट होते का?” बाबासाहेब विचारतात, “हिंदू व मुसलमानांना असा एखादा पूर्वेतिहास आहे का कि ज्याच्या अभिमानात किंवा दुःखात ते एकत्रितपणे सहभागी होऊ शकतील?” याचे उत्तर हिंदूंनी दिले पाहिजे अशी बाबासाहेबांची अपेक्षा आहे. पण उत्तर देण्याआधी बाबासाहेब आठवण करून देतात की, “एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या या दोन सशस्त्र पलटणी आहेत. समान उद्दिष्टांसाठी सहभागी होण्यासाठी एक समान धागा तेथे नाही. परस्परांचा द्वेष, तिरस्कार परस्परांचा संहार हा त्यांचा भूतकाळ आहे. जर दोन्ही समाज भूतकाळावर पांघरून घालू शकले, तर भविष्यकाळ वेगळ असू शकतो.” भावनिक असणाऱ्या हिंदुंवर टीका करताना बाबासाहेब म्हणतात की, “समान पूर्वेतिहास नसतानाही हिंदू व मुसलमान एक राष्ट्र उभारू शकतात असा हिंदूंचा दृष्टीकोन आहे, असा दृष्टीकोन बाळगणे भ्रम आहे.”

·         ऐक्य शक्य आहे काय?

हिंदू व मुसलमान यांचा समान इतिहास आहे का? या प्रश्नांच्या उत्तरात बाबासाहेबांची संपूर्ण इस्लामची चिकित्सा येते. “ब्रिटिशांनी हा देश काबीज केल्यापासून मुस्लिमांच्या ऱ्हासाला प्रारंभ झाला. ब्रिटिशांनी अधिकारात, प्रशासनात, कायद्यात बदल केले त्यामुळे मुस्लीम समाज्याच्या अधोगतीस प्रारंभ झाला. मुस्लीम फौजदारी कायदा कमी करून मेकॉले कायदा लागू केला. त्यानंतर शरियतचे (मुस्लीम नागरी कायदा) क्षेत्र मर्यादित केले. १८३७ पासून राज्यकारभारातून ‘फारसी’ चे प्रमाण कमी केले. शरीयतची अंमलबजावणी करणारा काझींचा वर्ग नष्ट करण्यात आला. पण न्यायाधीशांच्या निवडीमध्ये सेक्युलर दृष्टीकोन आणण्यात आला.” हिंदू मुस्लीम ऐक्य न होऊ शकण्याचे कारण बाबासाहेब सांगतात, “प्रतिष्ठेविना, शिक्षणाविना, साधनसंपत्तीविना मुस्लिमांना हिंदूंच्या तोंडी देण्यात आले. दोन्ही जमातीच्या संघर्षात ब्रिटीशांनी तटस्थ धोरण स्वीकारले परिणामी मुस्लिमांची प्रचंड हानी झाली. ६०० वर्ष मुसलमान हे हिंदूंचे राज्यकर्ते होते. ब्रिटीशांच्या आगमनानंतर मुस्लिमांना हिंदूंच्या पातळीवर आणण्यात आले. राज्यकर्त्यापासून दुय्यम दर्जा ही अधोगती मुसलमानांसाठी पुरेशी होती. परंतु दुय्यम दर्जा हा हिंदूंच्या तुलनेत होता ही खरी मानखंडना होती. अवहेलना होती. या असहाय्य परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी मुसलमानांनी स्वतंत्र राष्ट्रीयत्व असलेल्या राज्याची मागणी केली तर ते अस्वाभाविक ठरेल का?”

ब्रिटीशांची ही वागणूक मुसलमानांना अपमानास्पद वाटण्याची करणे काय काय आहेत, यासाठी बाबासाहेब भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचे दाखले देतात. भारतावर झालेल्या इस्लामच्या आक्रमणांचा हेतू काय होतं हे सांगण्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण एक प्रकरण खर्च केलं आहे. बाबासाहेब लिहितात, “ केवळ लुटमार व विजय प्राप्त करण्यासाठी या मुस्लिमांनी आक्रमण केले नव्हते. हिंदू देवतांच्या मूर्तींचे भंजन करून, त्यांच्या श्रद्धांवर आघात करून भारतात मुस्लीम धर्म स्थापन करणे, हा सुद्धा या आक्रमणांचा हेतू होता.” बाबासाहेब म्हणतात, “गझनीच्या महमंदाने सुद्धा आपल्या आक्रमणांकडे एक पवित्र युद्ध (जिहाद) म्हणून पाहिलेले आहे.” एका अरबी इतिहासकराचा संदर्भ देऊन बाबासाहेब लिहितात, “त्याने मंदिरे उदध्वस्त करून मशिदी उभारल्या. शहरे पादाक्रांत करून दरिद्री लोकांना ठार केले. मूर्तींची तोडफोड करून इस्लाम धर्म स्थापन केला. आणि दरवर्षी हिंदूंविरुद्ध असा प्रकारचे पवित्र युद्ध (जिहाद) करण्याची त्याने प्रतिज्ञा केली”

बाबासाहेब लिहितात कि भारतावर आक्रमण करणारे मोगल, तुर्क, अफगाण हे सर्व आपापसात सुद्धा लढत असत. “तथापि एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे व ती म्हणजे आपापसात जरी त्याचे शत्रुत्व असले, तरी समान उद्दिष्टांसाठी ते संघटीत होत असत व ते उद्दिष्ट म्हणजे हिंदुच्या श्रद्धा नष्ट करणे.” बाबासाहेब पुढे इतिहासकारांचे संदर्भ देतात, “मुस्लीम आक्रमकांचे सूर्य आणि अग्नीची पूजा करणाऱ्या काफिरांची संपूर्ण कत्तल झाल्याशिवाय पूर्ण समाधान झाल्याशिवाय त्यांचे मौल्यवान संपत्तीकडे लक्ष जात नसे. प्रत्यक्ष पैगंबरांच्या आदेशांप्रमाणे इस्लाम स्वीकारण्यासविरोध केल्यास १७ वर्षावरील सर्व हिंदू पुरुषांची हत्या व स्त्रिया आणि मुलं गुलाम करण्याची त्यांची (मुस्लीम आक्रमकांची) पद्धत होती.” आज हिंदू मुस्लीम ऐक्याचे पुरोगामी दूत ज्या अकबराचे उदाहरण देतात त्या अकबराने बनारस शहरातील सर्व मंदिरे पडण्याचा आदेश दिला होता, असे बाबासाहेब सांगतात. आणि त्याच्या आदेशावरून ७६ मंदिरे पाडण्यात आली होती, याचाही ते उल्लेख करतात. बाबासाहेबांनी लिहिले आहे, “इतिहासकार लिहितात, इस्लामचे उदात्तीकरण करणे हे धर्माचे कर्तव्य मानले जाते. अल्लाची मानखंडणा करणाऱ्यांना गुलाम बनवले पाहिजे अशी शिकवणी आहे. हिंदूंची सातत्याने मानखंडणा करणे हे धार्मिक कर्तव्य असल्याचे आणि त्यांची हत्या करण्याचा प्रेशितांचा आदेश आहे, असे हनाफिंच्या पाठशाळेत शिकवतात. प्रेषितांनी म्हटले आहे कि त्यांना (हिंदुना) मुस्लीम करा किंवा त्यांची कत्तल करा”
या सर्वाचा निर्णायक निष्कर्ष सांगताना बाबासाहेब लिहितात, “दोन्ही धर्मातील लोकांना ही कटुता विसरण्याचा प्रयत्न केला नाही. या आक्रमणांबरोबर मंदिरे उध्वस्त करणे, सक्तीने धर्मांतर करणे, संपत्तीची लुट करणे, लोकांची कत्तल करणे, स्त्रिया व मुलांना गुलाम बनविणे चालू होते. या स्मृती मुसलमानांना गौरवास्पद तर हिंदुना लज्जास्पद असल्याने त्या आठवणी कायम ताज्यातवान्या राहिल्यास त्यात आश्चर्य काय?”

·         इस्लामची मूलभूत तत्व -

आतापर्यंत बाबासाहेबांनी सांगितलेली हिंदू मुस्लीम ऐक्य न होण्याची ऐतिहासिक कारण पहिली. आता त्यांनी केलेली प्रत्यक्ष धर्माची चिकित्सा पाहूया. बाबासाहेब लिहितात, “मुसलमानांची एकच निष्टा असते. मग ते नागरिक असो कि सैनिक असो. ते मुस्लीम प्रशासनात राहत असो, कि बिगर मुस्लीम प्रशासनात. त्यांची निष्ठा कुराणवर, त्यांच्या परमेश्वरावर (अल्लाहवर) प्रेशितांवर आणि त्या प्रेशितांचा शेवटचा प्रमुख उत्तराधिकारी (खलिफा) यांच्यावर असते. (मुस्लीम धर्मकायद्यानुसार संपूर्ण जग हे दोन गटात विभागले गेले आहे. एक – दार-उल-इस्लाम म्हणजे ‘इस्लामची भूमी’ आणि दोन – दर-उल-हर्ब म्हणजे ‘युद्धभूमी’. जिथे राज्य शरियतचे आहे ती इस्लामची भूमी. जिथे बिगर मुस्लीम कायदे लागू आहेत, ती युद्ध भूमी. भारतात बिगर मुस्लीम कायदे असल्याने भारत हा युद्ध भूमी आहे. आणि युद्ध करून तो इस्लामची भूमी करणे हे मुस्लिमांचे धार्मिक कर्तव्य आहे.) असा हा मुस्लिमांचा धर्म असल्याने भारत ही हिंदू आणि मुसलमानांची समान मातृभूमी असू शकत नाही.” युद्धभूमीचे इस्लामच्या भूमीमध्ये रुपांतर करण्यासाठी १८५७ साली मुसलमानांनी ब्रिटिशांच्या विरोधात जिहाद केला होता असेही बाबासाहेब म्हणतात. भारतीय मुस्लिमांचे डोळे अफगाणिस्तान, तुर्कस्तान कडे लागलेले आहेत. आणि भारतातील प्रत्यके मुसलमान प्रथम मुसलमान नंतर भारतीय आहे. यातून बाबासाहेब ‘पॅन इस्लामीझम’ चा सिद्धांत सुद्धा सांगतात. बाबासाहेब लिहितात, “मुसलमानांच्या दृष्टीने हिंदू काफिर आहेत, काफिर हा आदरास मुळीच पत्र नसतो. तो हलक्या जातीचा व दर्जाहीन असतो. म्हणजेच ज्या देशावर काफिरांचे राज्य आहे तो देश मुसलमानांना दर-उल-हर्ब आहे. असे असताना हिंदू सरकारची आज्ञा मुसलमान पळणार नाहीत, हे आधिक पुराव्यानिशी सांगण्याची आवश्यकता नाही.” स्वतंत्र भारतात हिंदू मुस्लीम एकत्र राहू शकतात का, यावर बाबासाहेब असा युक्तिवाद करतात.

हिंदुस्थानात हिंदू व मुसलमान ही दोन युद्धमान राष्ट्रे आहेत, हे बाबासाहेब १९२९ पासून मान्य करत आलेले आहे, ते ठामपणे बाबासाहेबांनी पाकिस्तान या ग्रंथात मांडले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण केल्याशिवाय दुसरा कोणताही तोडगा मान्य होण्यासारखा नाही, या निष्कर्षाप्रत बाबासाहेब आले आहेत.

·         (अखंड भारताचे) स्वातंत्र्याचे रक्षण कसे करणार?

ही बाबासाहेबांनी व्यक्त केलेली मत इस्लामच्या मूलभूत चिकित्सेतून आलेली आहेत. पण त्याच्याशिवाय काही तत्कालीन करणं आहेत, त्यावरून बाबासाहेब मुसलमानांकडे कोणत्या नजरेनी पाहतात हे लक्षात येईल. ती म्हणजे भारताची संरक्षण सिद्धता. पाकिस्तान या ग्रंथात बाबासाहेबांनी एकूण २८ पानं या मध्ये खर्च केलेली आहेत. शेवटी बाबासाहेब म्हणतात, “भारतीय लष्करात आज मुस्लिमांचे पूर्णपणे वर्चस्व आहे. आणि ज्या मुसलमानांकडे वर्चस्व आहे ते सर्व मुसलमान वायव्य सरहद्द प्रांतातील आहेत. ते भारताचे परकी आक्रमणापासून बचाव करणारे द्वारपाल आहेत. हे द्वारपाल दरवाज्यापाशी थांबून भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करतील यावर हिंदुनी कितपत विसंबून राहायचे?” हीच भीती बाबासाहेब १९२९ पासून मांडत आलेले आहेत. भारताच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी मुसलमानांवर अवलंबून राहणे हिंदुना धोक्याचे आहे, असे बाबासाहेबांनी मत व्यक्त केले आहे.

पाकिस्तान ग्रंथातील ५० पेक्षा जास्त पानं बाबासाहेबांनी १९२० ते १९४० या वीस वर्षातील जातीय दंगलीचा आढावा घेतला आहे. बाबासाहेब म्हणतात हा हिंदू – मुस्लीम यांच्यातील यादवी युद्धाचा २० वर्षाचा इतिहास आहे. आणि त्यातही हिंदुनी मुसलमानांवर केलेल्या अत्याचारापेक्षा मुस्लिमांनी हिंदुवर केलेले अत्याचार अधिक प्रमाणात होते, असे बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिलेले आहे.

इस्लामच्या चिकित्सेतील एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. इस्लाममधील सामाजिक स्थितीचा बाबासाहेबांनी आढावा घेतलेला आहे. यामध्ये भारतीय मुसलमानांमध्ये जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता याचा प्रश्न गंभीर आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या इतिहासात एकट्या बाबासाहेबांनी कुराणातील आयतींचा आधार देऊन कुराणातील आणि इस्लाममधील स्त्रियांची स्थिती काय आहे हे सांगितले आहे. बाबासाहेब लिहितात, “कुराण हा गुलामगिरीच्या बाबतीत मानवजातीचा शत्रू आहे आणि त्याचा सर्वाधिक त्रास स्त्रियांना झालेला आहे.”

·         हा बाबासाहेबांचा अपमानच -

इस्लामच्या मूलभूत सिद्धांतांचा, इस्लामच्या इतिहासाचा समग्र लेखाजोखा बाबासाहेबांनी मांडला आहे. स्वतः बाबासाहेबांनी वाचून मान्यता दिलेले बाबासाहेबांचे दुसरे विश्वसनीय चरित्र म्हणेज धनंजय कीर यांनी लिहिलेले चरित्र. पाकिस्तान या ग्रंथाबद्दल कीर लिहितात, ‘मुसलमानांच्या प्रतिगामी वृत्तीचे वर्णन करणारा काही खरमरीत नी बोचरा भाग मित्रांच्या भिडेखातर बाबासाहेबांनी गाळला.’ अन्यथा आज प्रसिद्ध असणाऱ्या मजकुरापेक्षा जास्त बोचरा आणि तिखट ग्रंथ आपल्यासमोर असता. नुकतचे महाराष्ट्र नगर पालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ४० पेक्षा जास्त नगरसेवक हे असवूद्दिन ओवेसी यांच्या MIM या पक्षाचे आहेत. त्यांनी दलित आणि मुस्लीम युती असे समीकरण मांडून निवडणुका लढवल्या आहेत. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षात MIM च्या मागे जाणाऱ्या दलितांनी बाबासाहेबांनी केलेली इस्लामची चिकित्सा वाचून MIM ला पाठींबा द्यावा. आणि दुसऱ्या बाजूने MIM ने सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या इस्लामधर्माबद्दल काय लिहिले आहे, याचा अभ्यास करावा. असा अभ्यास झाल्यास कोणीही बाबासाहेबांचा अपमान होईल अशी ‘जय मिम, जय भीम’ अशी घोषणा देणार नाही.   

संदर्भ ग्रंथ सूची -
१          .     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक
            (लेख – नेहरू कमिटीची योजना आणि हिंदुस्तानचे भवितव्य), महाराष्ट्र शासन (२००८)
२          .     डॉ. भीमराव रावजी आंबेडकर : खंड ६ आणि ८
            लेखक – चांगदेव भवानराव खैरमोडे, सुगावा प्रकाशन (२०१५)
३          .     डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक धोरणातील परिवर्तने
            लेखक – प्रा. शेषराव मोरे, राजहंस प्रकाशन (२०१५)
            .     पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी
            लेखक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री. गजानन बुक डेपो, पुणे
            .     Writings and speeches of Dr. Babasaheb Ambedkar (vol 8)
            महाराष्ट्र शासन (२०१४)
            .     डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखक धनंजय कीर,
            पॉप्यूलर प्रकाशन, मुंबई (२०१६)  


(पूर्व प्रसिद्धी - सांस्कृतिक वार्तापत्र, २६ जानेवारी २०१६ राष्ट्रभक्त बाबासाहेब आंबेडकर) 

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....