Thursday, 18 May 2017

‘गजवा-ए-हिंद’ - किती खरं किती खोटं!


तारिक फतेहने झी मीडिया वरच्या चर्चातून अनेक असे विषय लोकांसमोर मांडले ज्या विषयावर पूर्वी बोलायला लोकं घाबरत होते. तारिक फतेहनी स्वतः चा प्राण धोक्यात घालून 'तलाक' सारखा विषय चर्चेला घेतला. भारतावरच्या काही मुसलमानांच्या संशयास्पद निष्ठा हा विषय चर्चेला घेतला. आता उघडपणे लोकं बोलायला लागली आहेत. तारिक फतेहचा हा खूप मोठा फायदा झाला आहे हे मान्य करावं लागेल. नेहमीप्रमाणे तपशिलांची बोंब असुदे, पण लोकं बोलायला लागली. असाच एक विषय त्याने उघडपणे बोलायला सुरवात केली आणि तो म्हणजे 'गजवा ए हिंद' या आज्ञेबद्दल. त्यांनी हा विषय मीडिया समोर आणेपर्यंत बहुसंख्य भारतीयांना या बदल काडीचीही माहिती नव्हती. कारण एका 'गजवा ए हिंद' बद्दल माहिती मिळवण्यासाठी 'हादीस' काय आहे ते माहिती असावं लागतं, इस्लामचं थोडं फार बेसिक तरी आकलन लागतं त्याचा आपल्याकडे आभाव आहे. म्हणून तारिक फतेहनी जाहीर वाभाडे काढून सुद्धा कोणाही भारतीयाला याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे कळलेलं नाही, कारण तपशीलच अजून समजलेला नाही. तो तपशील थोडक्यात सांगावा असा माझा हेतू आहे. सुरवातीलाच एक मान्य करतो, की 'गजवा ए हिंद'चे मूळ ५ हदीस आहेत, त्यापैकी ३ सर्वात विश्वसनीय आहेत. ते ५ हादीस सोडले तर कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत. कोणते पुरावे लागतील ते पुढे मी सांगतोच. पण इस्लामचा हेतू आणि त्याच्या प्रकाशात 'गजवा ए हिंद'चे ३ हादीस याबद्दलच फक्त मी बोलणार आहे.

'हादीस' म्हणजे काय? - इस्लामी कायदेशास्त्राचा सर्वत महत्वाचा दुसरा आधार म्हणजे हादीस. सर्वात महत्वाचा म्हणजे कुराण आणि त्याच्यानंतर महत्वाचा दस्तऐवज म्हणजे हादीस. प्रेषित मुहंमद पैगंबर विशिष्ट परिस्थिती मध्ये कसे वागले, कसे बोलले याच्या नोंदी म्हणजे हादीस. कुराणाचा प्रेषितांच्या आयुष्याचा संदर्भकोष म्हणजे हादीस. कुराणातून न मिळालेल्या प्रश्नाची उत्तरं हादीस मधून देण्याची प्रथा आहे. 'बेडरूम पासून युद्धमैदानापर्यंतचे सर्व आदेश किंवा दिशा हादीसमधून मिळतात' असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. प्रेषितांच्या मृत्युंनतर शंभर दीडशे वर्षांनी प्रेषितांच्या स्मृतीकथा संकलित करण्याचे काम सुरु झाले होते. कानगोष्टींप्रमाणे प्रेषितांच्या कथा लोकांत प्रचलित होत्याच. शिवाय त्या प्रेषितांच्या असल्यामुळे त्यात कानगोष्टींप्रमाणे मीठ मसाला वाढलेला नव्हता, किंवा जो होता तो संकलकांनी बाजूला करून शुद्ध गोष्ट संकलित केली. असे प्रतिष्ठित असे सहा संकलक आहेत. हादीस बद्दलची सर्व माहिती मागच्या पोस्ट मध्ये मी लिहिली होती. (ती पोस्ट या लिंक वर वाचायला मिळेल – ती पोस्ट वाचा, त्याच्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा वाचण्यासारख्या आहेत, त्याही वाचा -https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/1964355763850968/?comment_id=1965190230434188&reply_comment_id=1965222747097603&notif_t=group_comment_mention&notif_id=1495098196649089)

या सहा संकलकांपैकी सहिह बुखारी आणि सहिह मुस्लिम यांनी संकलित केलेल्या हादीस संग्रहांना खूप मनाचे स्थान आहे. 'सहिह' या शब्दाचा अर्थच विश्वसनीय असा होतो. पण यांच्याशिवाय अजून चार संकलक आहे. त्यांच्या हादीस संग्रहांना बुखारी आणि मुस्लिम यांच्याखालोखाल स्थान आहे. उरलेल्या चार संकलकांसाठी विश्वसनीय हादीस ठरवण्याचे चार निकष ठरवून दिलेले आहेत. सर्वात विश्वसनीय हादीस म्हणजे 'प्रेषितांची कथा' असेल तर त्याला 'सहिह' म्हंटले जाते, त्याच्यानंतर 'हसन' म्हणजे सहिह पेक्षा कमी विश्वसनीय, त्यानंतर आहे 'दाईफ' म्हणजे कमजोर, कमी विश्वसनीय, आणि सर्वात शेवटी आहे 'मौदू' म्हणजे ज्या कथेत ढवळाढवळ केली गेली आहे, जी शुद्ध उरलेली नाही. बुखारी आणि मुस्लिम सोडून सर्व संग्रहात प्रत्येक हादीस म्हणजे प्रेषितांच्या कथेच्या खाली हा चार शब्द आढळतात.
'गजवा ए हिंद' हे चे उल्लेख असलेले एकूण ५ हादीस आहेत. त्यापैकी त्यापैकी २ खूप शोधाशोध करून सुद्धा मला सापडले नाहीत. अर्थात त्यांनी फारसा फरक पडत नाही, कारण सर्वात विश्वसनीय असे वर उल्लेख केलेल्या ६ संग्राहकांपैकी कोणीही ते दोन संकलित केलेले नाहीत. 'अन निसाई' नावाचा एक संकलक या सहा (विश्वसनीय संकलकां) पैकी आहे. त्यांनी संकलित केलेल्या ३ हादीस आहेत. तीन पैकी एक 'हसन' या दर्जाची आहे, उरलेल्या दोन 'दाईफ' या दर्जाच्या आहेत.


सुरवातीला 'हसन' या दर्जाची ची आहे, त्यात काय लिहिलंय ते पाहूया. ‘अन निसाई' यांनी संकलित केलेली ३१७७ क्रमांकाची हादीस आहे, ‘एका मुक्त केलेल्या गुलामाने प्रेषितांच्या तोंडून पुढची वाक्य ऐकली होती, त्याने ती संकलकाला सांगितली आहेत, संकलकाने त्याची सत्यता पडताळून घेऊन त्याची नोंद केलेली आहे, हा तपशील लक्षात ठेवावा. प्रेषितांच्या तोंडी वाक्य आहेत, 'माझ्या उम्मा (म्हणजे धर्माचे)चे दोन गट असे असतील कि ज्यांना अल्लाह नरकाच्या आगीपासून मुक्त करेल. एक गट जो भारतावर स्वारी करेल, दुसरा गट जो 'इसा बिन मर्याम' बरोबर राहील'. या मध्ये भारतावर स्वारी करेल याला अरेबिक शब्द आहे 'गाजवा ए हिंद'! पुन्हा सांगतो ही 'हसन' दर्जाची हादीस आहे. या हादीस मध्ये प्रेषित उम्माच्या लोकांना (म्हणजे इस्लाम मानणाऱ्या लोकांना) आश्वासन देत आहेत, की एक तर तुम्ही भारतावर स्वारी करणाऱ्या गटात राहिलात तर किंवा इसा बीन मर्याम बरोबर राहिलात तर नरकयातनांपासून नक्की सुटका मिळेल. स्वाभाविक पणे शंका उभी राहिली असेल कि 'इसा बिन मर्याम' काय प्रकरण आहे?

'इसा बीन मर्याम' - बीन म्हणजे 'चा मुलगा', 'बीन मर्याम' म्हणजे मर्यामचा मुलगा इसा. कुराणीक भाषेत येशू. मेरीचा मुलगा येशू. इस्लामी तत्वज्ञानात येशू हा इस्लामचाच पूर्वीचा प्रेषित मानला गेला आहे. आणि त्याच्याकडे अल्लाहने जबाबदारी सोपवली आहे कि, सीरियातून तेव्हाचा 'रोम' आताच युरोप ताब्यात घ्यायचा. वरच्या हादीस मध्ये जो दुसरा गट 'इसा बीन मर्याम' बरोबर राहणार आहे असा उल्लेख आहे, त्यात येशू बरोबर राहून पृथ्वीचा तो भाग ताब्यात घेण्याच्या मोहिमेत जे भाग घेतील त्यांची नरकाच्या आगीपासून सुटका होईल असा त्याचा अर्थ आहे.

पुढच्या दोन्हीही हादीस 'दाईफ' दर्जाच्या आहेत. पण तरीही त्यात काय म्हंटले आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा 'अन निसाई' यांनी संकलित केलेली हादीस क्रमांक ३१७५. त्यात प्रेषितांनी आश्वासन दिले आहे कि, 'भारतावर स्वारी होणार' प्रेषित म्हणतात ती स्वारी बघायला मी जिवंत राहिलो तर मी सुद्धा त्या स्वारीमध्ये भाग घेईन आणि त्यामध्ये माझ्या संपत्ती सकट माझा त्याग त्यामध्ये करिन. आणि जर मला त्या लढाईत मृत्यू आला तर 'शाहिद' म्हणून माझ्यासाठी तो खूप मोठा सन्मान असेल. जर मी जिवंत परत आलो तर मला 'अल मुहर्रर्रर्र' म्हणजे नरकाच्या आगीपासून मुक्त होण्याचा दर्जा मिळेल. जसा तो 'अबू हुरिया'ला मिळालेला आहे.' कुराण आणि हादीस मध्ये अश्या काही लोकांची नावं आहेत, ज्यांना त्यांच्या जिवंतपणीच नक्की स्वर्ग मिळेल असं आश्वासन प्रेषितांनी दिलं आहे, त्यामध्ये 'अबू हुरिया' यांचे नाव आहे. ते प्रेषितांच्या सहकाऱ्यांपैकी एक होते. ही हादीस 'दाईफ' दर्जाची आहे.

राहिलेली एक हादीस म्हणेज याचीच कार्बन कॉपी आहे. एकही शब्दाचा फरक नाही. आणि म्हणूनच ती सुद्धा 'दाईफ' दर्जाची हादीस आहे. त्याचा क्रमांक 'अन निसाई - ३१७६ हा आहे.

हा झाला शास्त्रातील भाग. व्यवहारात काय होतं आता बघूया. अनेक इस्लामी पंडित ह्या 'गजवा ए हिंद' हादीस चे स्पष्टीकरण देताना ठामपणे सांगतात की केवळ मुहंमद गझनवी, किंवा कासीम यांनी केलेली भारतावर स्वारी इतक्या लहान मर्यादेत या हादीसकडे बघता येणार नाही. इस्लामी सिद्धांतानुसार जगाचा शेवट एका प्रलयाने होणार आहे. तेव्हा 'कयामत का दिन' येईल तो यायचा असेल तर सर्व जग इस्लाममय होणं गरजेचं आहे, अन्यथा बिगर इस्लामी लोकं पृथ्वीवर राहिले तर कयामत का दिन येण्यास विलंब होईल. म्हणून सर्व जग इस्लाममय करण्यासाठी च्या मार्गातील या दोन महत्वाच्या लढाया प्रेषितांनी 'हादीस' मध्ये सांगितल्या आहेत. इसवीसन ७११ पासून इसवीसन १७६१ पर्यंत कासीम पासून अब्दालीपर्यंत भारतावर अनेक इस्लामी आक्रमणं झाली. शिवाय पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सुद्धा ४ वेळा पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं आहे. काही मुसलमानी पंडित म्हणतात 'प्रेषितांनी नरकाच्या आगीपासून मुक्त होण्याचा मार्ग 'गजवा ए हिंद'च्या हादीस मध्ये सांगितला आहे म्हणून भारतावर सर्व इस्लामी आक्रमणं झाली. पाकिस्तानची सुद्धा निर्मिती भारत जिंकून घेण्यासाठी झाली आहे असं काही मुसलमानी पंडितांचं मत आहे.

मला असं वाटतं कि, सावध राहायला काहीही बिघडत नाही. युद्धखोर न होता 'गजवा ए हिंद' खरं आहे असं मानून सावध राहिलो तर 'वीन-वीन' परिस्थिती राहील. पण जोपर्यंत भारतावर आक्रमण करणारे कासीम पासून परवेझ मुशर्रफ पर्यंत हे मान्य करत नाहीत की, 'प्रेषितांनी हादीस मध्ये सांगितलं कि भारत जिंकला तर नरकाच्या आगीपासून मुक्तता होईल, म्हणून आम्ही भारतावर आक्रमण केलं' तोपर्यंत 'गाजवा ए हिंद' वर काही मुस्लिम पंडित म्हणतात म्हणून विश्वास ठेवता येणार नाही. हा विषय मुघल इतिहास अभ्यासणाऱ्या मंडळींचा आहे, कि मूळ कागदपत्र किंवा मुघल इतिहासाची साधनं अभ्यासून 'प्रेषितांनी हादीस'मध्ये सांगितलं म्हणून आम्ही भारतावर स्वारी करून आलो' असं ठाम विधान किंवा भूमिका सापडत नाही तोवर ठाम विधान करता येत नाही. आणि ठाम विधान म्हणजे 'गजवा ए हिंद' खरं आहे असं म्हणता येत नाही.

आपल्या अज्ञानामुळे 'गाजवा ए हिंद' ही मनुवाद, भांडवलवाद, पुरोहितवाद यांच्याविरुद्धची लढाई आहे असा सांगितला जातो. जोपर्यंत आपल्याला खरी भूमिका कळत नाही तोपर्यंत त्यांचा प्रचार खरा मानव लागतो, कारण प्रतिवाद आपल्याला करता येत नाही. जागतिक इस्लामचा इतिहास ओझरता जरी पहिला तरी मूर्तिपूजा संपवणे, अनेकेश्वरवादी संपवणे आणि जग इस्लाममय करणे हेच इस्लामचे ध्येय राहिलेले आहे, तेव्हा मनुवाद, भांडवलवाद वगैरे हा अपप्रचार आहे. जर उद्या ठाम पुराव्यांच्या आधारे असं दिसलं कि 'गाजवा ए हिंद' खरं आहे तर, त्याचा अर्थ हाच कि भारत इस्लाममय करणे, मूर्तिपूजा आणि मूर्तीपूजक संपवणे, अनेकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवादी संपवणे.

'गजवा ए हिंद' चा अर्थ हा असा होतो. आज जितकी उपलब्ध आणि विश्वसनीय साधनं समोर दिसली त्यांच्यावरून ह्याच्यापेक्षा जास्त खोलात शिरता येत नाही. मुस्लिम पंडित 'गजवा ए हिंद' खरं आहे असं म्हणतात म्हणून ते खरंही मानता येत नाही.


© मुकुल रणभोर 
- mukulranbhor111@gmail.com
- mukulranbhor.blogspot.in


Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....