Monday, 9 July 2018

मनुस्मृती – मराठी विश्वकोश - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी


(हे टिपण मी लिहिलेलं नाही. मराठी विश्वकोषाच्या खंड १२ मध्ये पान क्रमांक - ११३६ वर टिपण आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी हे टिपण लिहिलेलं आहे. 'The best product of Indian renaissance' असा मानवेंद्रनाथ रॉय यांनी शास्त्रीबुवांचा गौरवाने उल्लेख केला होता. प्राज्ञ पाठशाळेत त्यांनी एक तप आचार्यपरंपरेच्या प्राचीन पद्धतीप्रामाणे सखोल अध्ययन केले. वेदोपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके, सकळ पुराणग्रंथ, सर्व स्मृती संहिता, महाभारत-रामायणादी महाकाव्ये, धर्मनिबंध यांसारख्या सर्व प्राचीन ज्ञान-विद्यांना या एकपाठी शिष्याने आत्मसात केले. पुढे कलकत्त्याच्या संस्कृतपाठशाळेची 'तर्कतीर्थ' ही पदवी त्यांनी संपादन केली. 

वाईच्या प्रज्ञा पाठशाळेच्या माध्यमातून धर्मकोषाचे १९ खंड शास्त्रीबुवांनी प्रकाशित केले. 'वैदिक संस्कृतीचा विकास' या ग्रंथासाठी साहित्य आकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांच्या पुढाकारानेच 'मराठी विश्वकोश' निर्मिती मंडळाची स्थापना झाली.)

----------------------------------------------

धर्मशास्त्राचा एक मुख्य प्रमाणभूत ग्रंथ. याला मनुसंहिता असेही म्हणतात. यजुर्वेदात म्हटले आहे, की मनूने जे जे सांगितले आहे, ते औषधासारखे हितकर आहे. स्मृतिकार बृहस्पतीने म्हटले आहे, की मनुस्मृतीमध्ये जे जे सांगितले आहे, तेते वेदोक्तच आहे. म्हणून मनुस्मृतिविरूध्द स्मृति प्रमाण मानू नये. सध्या प्रचलित असलेल्या मनुस्मृतीत मनुमृतीच्या उत्पत्तीची कथा स्वतः स्मृतिकर्त्या मनूने महर्षीना सांगितली आहे. सृष्टीनिर्माणकर्ता विराट पुरूष, ब्रम्हदेवाने स्वतःतून निर्माण केला. त्या विराट पुरूषापासून माझा (मनूचा) जन्म झाला. मी प्रजानिर्मितीकरता अत्यंत कठीण तप करून प्रजापती असलेले दहा महर्षी निर्माण केले. या दहा महर्षींनी देव देवांची स्थाने आणि स्थावर-जंगम सृष्टी निर्माण केली. तो आदिलष्टा देव जेव्हा जागा होतो, तेव्हा सृष्टी अस्तित्वात येते व हालचाल सुरू होते. तो शांतपणे झोपला. की सर्व विश्व मिटते. असे हे चराचर जग जिवंत होते आणि मरते. त्याच आदिपुरूषाने हे धर्मशास्त्र निर्माण करून मला दिले. मी ते अन्य मुनींना दिले. हे ऋषीनो, तुमच्या मध्ये वसलेल्याहा जो मुनी भृग आहे, तो हे शास्त्र माझ्यापासून शिकला आहे. तो ते तुम्हाला सांगेल.

म्हणून या मनुस्मृतीस भृगप्रोक्त मानवधर्मशास्त्र असेही म्हणतात. स्वायंभुव मनुच्या या धर्मशास्त्राच्या चार संहिता प्रसिध्द झाल्या, असे संस्कारमयूख आणि चतुर्वर्गचिंतामणि-दानखंड या दोन धर्मनिबंधग्रंथांत एका स्मृतिवाक्याच्या आधारे म्हटले आहे. महाभारतामध्ये (अध्याय ३३६.३८ते ४६) असे म्हटले आहे, की पुरूषोत्तमाने शतसहस्त्र श्लोकांचे धर्मशास्त्र सांगितले. तेच स्वायंभव मनुने पुढे चालू ठेवले. बृहस्पती आणि उशनस यांनी त्याच्याच आधारावर आपले शास्त्र रचले आहे. महाभारतात मनूच्या नावाने अनेक सिध्दांत पुष्कळ ठिकाणी उदधृत केलेले दिसतात. परंतु त्यातंली बरीच उदाहरणे सध्याच्या मनुस्मृतीत मिळत नाहीत. हल्लीच्या मनुस्मृतीत न मिळणारे शेकडो श्लोक स्मृतिचंद्रीका ,स्मृतिरत्नाकर, निर्णयसिंधु, मिताक्षर, पाराशरमाधवीय, धर्मसिंधु इत्यादीकां ये उदधृत केलेले आढळतात. त्यांतील काही श्लोक बृहन मनु किंवा वृध्द मनु हे ग्रंथ कदाचित सध्याच्या मनुस्मृतीच्या पूर्वीचे असावेत. असा काही विद्वानांचा तर्क आहे. हे ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत.

इ.स.पू.दुसरे शतक हा भृगुप्रोक्त मनुस्मृतीचा काळ असावा, असा काही विद्वानांचा अंदाज आहे. सध्याच्या महाभारतामध्ये वन, शांति व अनुशासन या तीन पर्वात मनुस्मृतीतले संपूर्ण किंवा अंशतः २६० श्लोक उदघृत केले आहेत, असे ब्यूलर या जर्मन पंडिताने म्हटले आहे. यास्क, गौतम, बौधयन आणि कौटिल्य यांनी मनूच्या मतांचा उल्लेख केला आहे. मनु किंवा मानवा अशा तर्हेचा त्यांचा निर्देश आहे. परंतु ही मनुच्या नावाने उदघृत केलेली मते सगळीच सध्या उपलब्ध असलेल्या मनुस्मृतीत उपलब्ध होत नाहीत.

प्राचीन भारतीयांच्या काळातील पश्चिमी, भारतीय व अन्य देशीय विद्वानांशी मोठ्या जिज्ञासाने मनुस्मृतीचे अध्ययन केलेले दिसते. नीत्शे या जर्मन तत्ववेत्त्यावर मनुस्मृतीचा विलक्षण प्रभाव पडलेला दिसतो. तो म्हणतो, बायबल बंद करा आणि मनुस्मृति उघडा.

सध्याच्या मनुस्मृतीवर इ.स.नवव्या शतकापासून पंडितांनी लिहिलेल्या महत्वाच्या टीका उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे पंडितप्रणीत धर्मशास्त्रविषयक सर्व ग्रंथांमध्ये मनुस्मृतीतील उदाहरणे वारंवार आदराने घेतलेली असतात. मेघातिथी, गोविंदराज, कुल्लूक, असाहय, भागुरी, भोजदेव, घरणीधर, राघवानंद, नंदन, रामचंद्र, नारायण, इ. मनुस्मृतीचे टीकाकार होत. यांपैकी सात टीका मुंबईतील एकोणिसाव्या शतकातील कायदेपंडित विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी छापून प्रसिध्द केल्या होत्या.

सांप्रतच्या मनुस्मृतीचे १२ अध्याय आहेत. श्लोकसंख्या २६८४. अध्याय-१-विश्वाची उत्पत्ती, ब्रम्हदेवाचा आविर्भाव ,विराट पुरूषाची उत्पत्ती, स्थावर जंगमांची निर्मिती, चतुर्युगपरिमाण, मन्वंतरत परिमाण, चातुर्वण्याची उत्पत्ती व कर्मे ,ब्राम्हणाचे श्रेष्ठत्व , या शास्त्रज्ञाच्या अध्ययनाचा अधिकारी ब्राम्हण ,शास्त्राध्ययनाचे फल, आचारमहिमा. अध्याय-२ धर्माची व्याख्या ,धर्माची प्रमाणे , धर्माचे वेदमूलत्व, श्रुती व स्मृती यांचे प्रामाण्य मुख्य, श्रुती व स्मृती यांचे बलाबल धर्मानुष्ठानयोग्य देश, संस्कारांचे महत्व, गर्भाधानादी संस्कांर, मनुस्मृति त्रैवर्णिकांचे उपनयन, स्त्रियांचे संस्कार, ब्रम्हचर्याची व्रते वा नियम, वेदाध्ययनविषयक गुरूशुश्रूषादी नियम ,अभिवादनविधी, अध्याय ३-गृहस्थाश्रम, कन्यालक्ष,सवर्ण व असवर्ण स्त्री-पुरूषविवाह, आठ प्रकारचे विवाह, गृहस्थधर्मम, अध्याय ४ –जीवनउपाय अध्याय ५-भक्ष्याभक्ष्य, सापिंड्य, औशौचविचार, स्त्रीधर्म, पातिव्रत्य, अध्याय ६- वानप्रस्थाश्रम, अतिथिपूजा, संन्यासधर्म, ध्यानयोग, मोक्षसाधना, दशलक्षण साधारण धर्म अध्याय ७- राजधर्म, आध्याय ८-न्यायालयाचा विषय़ असलेला व्यवहार, न्यायालयातील विवाद, साक्षीधर्म, ऋणविचार, निक्षेप म्हणजे ठेव व त्यासंबंधाचे अपराध व नियम, अस्वामिविक्रय म्हणजे आपला नसलेला माल विकण्यासंबंधी अपराध व दंड यांची व्यवस्था, अनेकांनी एकत्र जमून चालविलेला व्यापार वा उद्यम, दुसर्यालने आपणास दिलेले परत न करणे ह्यासंबंधी नियं, वेतन न देणे करार मोडणे, क्रय आणि विक्रय ह्यांतील गोंधळ व नियम, मालक व गुराखी ह्यांच्यातील वाद, सीमेसंबंधीचा वाद, कठोर भाषा व त्यावरील दंड, दुस-याला शारीर इजा करणे व त्यासंबंधी दंड. चोरी व त्यासंबंधी दंड, जबरदस्तीने केलेले अपराध (साहस) अध्याय ९- स्त्री पुरूष यांच्या परस्परसंबंधातील व्यवहाराबद्दलचे वा अपराधाबद्दलचे नियम, वारसाहक्काचे नियम, जुगार इ. संबंधाचे नियम, राज्याला आणि प्रजेला ज्या प्रकारच्या समाजकंटकांपासून धोका निर्माण होतो, त्यांचा बंदोबस्त अध्याय – १० चारी वर्णाचे आणि संकर जातीचे विवरण, जातींचे उपजीविकेचे व्यवसाय, आपदधर्म, एकंदरीत धनार्जनाचे मार्ग, अध्याय ११- दानधर्म, यज्ञार्थआवश्यक धनार्जनासंबंधाचे नियम, पाप आणि प्रायश्चित्त यांचे प्रकार, अध्याय १२- शुभाशुभकर्माचे तत्वज्ञान,वेदप्रशंसा, मोक्षोपायविचार, धर्माची प्रमाणे, धर्मज्ञपरिषद,आत्मज्ञान.

मनुस्मृतीतील धर्मशास्त्र हे आध्यात्मिक तत्वज्ञानावर आधारलेले आहे. सर्व सत आणि असत विश्व आत्म्यात सामावलेले आहे, हे या तत्वज्ञानाचे पहिले गृहीत कृत्य आहे. धर्म व अधर्म यांच्यासंबंधी रागद्वेषरहित निर्विकार मनःस्थितीत सर्व मानवांना व सर्व प्राण्यांना हितकारक असा विवेकबुध्दीचा निर्णय मिळू शकतो. अशा मनःस्थितीत मानवांना किंवा प्राणीमात्राला अहितकारक असा कोणताही विचार येऊ शकत नाही. सगळे शुभ आणि अशुभ वर्तन हे बुध्दिविकारवश असणे-नसणे याच्यावर अवलंबून आहे. (मनु-१२.११८, ११९) आश्रमव्यवस्था आणि चातुर्वर्ण्यव्यवस्था ही सामाजिक जीवनाची मुख्य रचना अशा निर्विकार प्रज्ञेनेच नीट रीतीने स्पष्ट होऊ शकते, असा मनुचा सिध्दांत आहे. त्याने असे म्हटले आहे, की ज्ञानी,सज्जन, रागद्वेषापासून नित्य मुक्त अशांच्या ह्रदयाला पटलेला असा धर्म या मानवधर्मशास्त्रात सांगितलेला आहे (मनु २.१) आर्थिक लाभ आणि बाह्येंद्रियांचे सुख यांपासून जे अलिप्त असतात. त्यांनाच धर्मज्ञान प्राप्त होऊ शकते .मनुष्याच्या जीवनाची धर्म, अर्थ आणि काम ही तीन मुख्य उद्दिष्टे आहेत. यांचा समतोल ज्या आचारपध्दतीने साधेल तीच आचारपध्दती लोकयात्रेस सामाजिक जीवन व्यवस्थित रीतीने चालू राहण्यास म्हणजे समाजधारणेस कारणीभूत होते.

या मूलभूत तत्वांच्या प्रभावाखाली गेली हजारो वर्षे भारतीय समाज जगला आहे. त्याच्या उत्थान-पतनांचा इतिहास घडला आहे. वैयक्तिक जीवनाची व कौंटूबिक जीवनाची व्यवस्था आश्रमव्यवस्थेमध्ये आदर्श रूपात मनुने व्यक्त केलेली आहे. सामर्थ्यपूर्ण रीतीने जगण्याकरता आवश्यक असलेली शिक्षणपध्दती म्हणजे ब्रम्हचर्याश्रम होय. मानसिक, बौध्दिक आणि शारीरिक सामर्थ्याचा सर्वांगीण विकास होण्याकरता आवश्यक असलेला व्रतबंध सविस्तर रीतीने मनुस्मृतीत सांगितला आहे. ज्ञानेंद्रिये, कर्मेद्रिये आणि मन यांच्या प्रवृत्ती विवेकबुध्दीने नियंत्रित होण्याकरिता, त्याच्याकडून सहसा प्रमाद होणार नाही इतकी शिस्त बाणण्यास आवश्यक असलेले आचारधर्म ब्रम्हचारी धर्म म्हणून मनुस्मृतीमध्ये प्रतिपादले आहेत. (२.८८-१००) भारतीयांची ही शिक्षणसंस्था राज्यशासनापेक्षा समाजाच्या स्वयंशासनाखाली चालत होती. तिच्यात उत्कर्ष-अपकर्षही होत होते. जेव्हा उत्कर्ष होत होता तेव्हा सत्ययुग निर्माण होत होते. अत्यंत अपकर्षाच्या वेळी कलियुगाचा प्रादुर्भाव होत होता. सत्ययुगामध्ये सत्याचेच अनुशासन चालत होते. शिक्षणविन्मुख अशा तर्हेहचे सामाजिक वर्ग मनुच्या दृष्टीसमोर होते. त्यांस त्याने शुद्र असे म्हटले आहे. परंतु त्यांच्या जीवनव्यवसायांचा म्हणजे कारूकर्मे, शिल्पकर्मे, आणि द्विजशुश्रूषारूप या व्यवसायांचा परामर्श मनुने चांगला घेतला आहे.

वानप्रस्थ आणि संन्यास हे मुनिधर्म व्यक्तीच्या पारमार्थिक उन्नतीचा सर्वश्रेष्ठ उपाय म्हणून अनेक धर्मसंस्था मानतात. त्याप्रमाणे मनूचे धर्मशास्त्र ही मानते. परंतु मनुधर्मी जीवनपध्दती ही समाजावर अवलंबून असलेलीच सामाजिक संस्था आहे. तिचा आधार परमार्थाचा आदर्श लक्षात ठेवून जगणारा गृहस्थाश्रमीच होय. म्हणून गृहस्थाश्रम बाकीच्या तिन्ही आश्रमांचे अधिष्ठान होय, असा सिध्दांत मनूने सांगितला. गृहस्थाश्रमातील कर्तव्ये परिपूर्ण न करता म्हणजे गृहस्थाश्रम टाळून जे मुनिधर्माचा मोक्षाकरिता आश्रय करतात किंवा वानप्रस्थ वा संन्यांस स्वीकारतात ते परमार्थापासून च्युत होतात, असे निश्चित रूपात सांगितले आहे. म्हणून ऐहिक दृष्ट्या समृध्द जीवनाच्या निर्मितीकडे पाठ फिरवून वैराग्याच्या दीक्षेला महत्व देता कामा नये, ही गोष्ट मनूने अत्यंत वैशिष्ट्येपूर्ण रीतीने सांगितली आहे.

मनुस्मृतीतील समाजरचना म्हणजे चातुर्वर्ण्यव्यवस्था होय. भारतीय समाजरचनेचा तात्विक आकार ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या उच्च-नीच वर्णव्यवस्थेत प्रत्ययास येतो. यात ब्राम्हण हा सर्वश्रेष्ठ मानला आहे. जातिसंस्थेलाही त्यात महत्व दिलेले आहे, ब्राम्हण हा ब्राम्हण स्त्री-पुरूषांपासून जन्मलेला, क्षत्रिय स्त्री-पुरूषांपासून, जन्मलेला वैश्य हा वैश्य स्त्री-पुरूषापासून जन्मलेला ,शुद्र हा शुद्र स्त्री-पुरूषांपासून जन्मलेला असतो अशी जातिव्यवस्था सांगितली त्या त्या जातीची कर्तव्य त्या त्या जातीचे प्राण होत, अशा विचाराचे माहात्म्यही मनुस्मृतीत स्पष्ट रूपाने व्यक्त केले आहे. लाकडाचा हत्ती, भुसा भरलेल्या चामड्याचा मृग व अशिक्षित ब्राम्हण हे केवळ नामधारी होत. धनाच्या लोभाने जगणारा कर्तव्यच्युत ब्राम्हण हा आणि शूद्र यांच्यात फरक नाही. किंबहुना कर्तव्यच्युतीने सगळेच वर्ण स्वस्थानापासून भ्रष्ट होतात. असे मनूने निक्षून सांगितले आहे. केवळ जगण्यापुरतेच धन ब्राम्हणाने मिळवावे इंद्रियांच्या सुखाकरता नव्हे. क्षत्रियांने इंद्रियांवर जय मिळवून इतर देश जिंकायला निघावे. इंद्रियांवर विजय न मिळवलेला क्षत्रिय हा सर्वच गमावून बसतो. अशा तर्हेनचे वर्णव्यवस्थेचे चित्र मानवधर्मशास्त्रामध्ये निदर्शनास येते.

मनुप्रणीत राज्यशास्त्र : राजसत्ताप्रधान समाजसंस्था हा भारतीय मनुप्रणीत राजनीतिशास्त्राचा मुख्य आदर्श होय. राजा हा समाजशासनाचे नियम निर्माण करीत नाही, त्याला तो अधिकारच नाही. ते समाजशासनाचे सनातन नियम आर्यावर्तात दृढमूल झालेल्या आचार पध्दतीमध्ये समाविष्ट आहेत. त्यातला प्रजापालनाचा धर्म हा मुख्य राजधर्म आहे. प्रजांच्या परंपरागत धर्मव्यवस्थेची सुरक्षा ही राजाची जबाबदारी होय. धार्मिक राजा हा स्वर्गाचा अधिकारी व अधार्मिक राजा हा नरकाचा अधिकारी. समाजनियंत्रण आणि समाजाचे नियमन करण्याची दमनशक्ती म्हणजे दंडसंस्था ही राजाने नीट वापरली तरच त्याचे राज्य चालते. नाहीतर प्रजांचा क्षोम होऊन राजाचा स्वतःच्या वंशासह नाश होतो, अशी ऐतिहासिक वस्तुस्थिती मनूच्या राजनीतिशास्त्राने स्पष्ट केली आहे. म्हणून धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीतिशास्त्र व तत्वज्ञान यांच्यात पारंगत असलेला शिक्षित ,जितेंद्रिय राजा हाच राजपदास पात्र होय, ही गोष्ट अनेक पध्दतींनी मनूने सांगितली आहे. राजा ही महान देवता आहे, असे मनुस्मृतीत म्हटले आहे. त्याचा अर्थ असा, की अग्नी, वायू,सूर्य, सोम,यम, कुबेर,वरूण आणि इंद्र या देवतांचे सारभूत अंश एकत्र होऊन राजा परमेश्वराकडून निर्माण होतो. याचा अर्थ असा, की अग्नी, वायू, सूर्य, सोम इ. देवतारूप शक्ती यांची विश्वनियमाची कार्ये चालतात. तशी प्रजाशासनास आवश्यक असलेली सगळी कार्ये राजाने पार पाडावयाची असतात. प्रजाधारणेची कर्तव्य नीट रीतीने, नित्य जागृत राहून जो राजा पार पाडीत नाही त्याला दंडशक्ती नष्ट करते, असा इशारा निसर्गनियमानुसार मनुने दिला आहे.

सगळे आश्रमधर्म, वर्णधर्म, देशजातिधर्म, कुलधर्म, राजधर्म या सगळ्यांची कसोटी सार्वत्रिक धर्म होय. ह्या सार्वत्रिक धर्माची दहा लक्षणे मानवधर्मशास्त्रात सांगितलेली आहेत ती अशी संतोष ,क्षमा म्हणजे दुसर्यामने अपकार केला असताना आपण उलट त्याला अपकार न करणे दम मनाला व इंद्रियाला चलित करण्याच्या परिस्थितीमध्ये मनाचा निग्रह अस्तेय-परधनाचा अपहार न करणे शौच म्हणजे देहाची स्वच्छता इंद्रियनिग्रह ज्ञान, विविध विद्यांचा अभ्यास, सत्य आणि अक्रोध. हे दहा मिळून धर्माचे लक्षण होय.

हजारो वर्ष किंवा पाच हजार वर्षे भारतीय संस्कृती टिकली आहे. त्याच्या पाठीमागे काही जीवनाची शाश्वत मूल्ये किंवा गूढ रहस्ये अथवा तत्वे आहेत असे मानल्याशिवाय गत्यंतर नाही. मनुष्याच्या सामाजिक जीवनामध्ये मर्यादित, संकुचित, अन्यायकारक अशाही प्रथा आणि सामाजिक संस्था असतातच. निरोगी प्रवृत्ती आणि रोगट प्रवृत्ती व्यक्तीच्या जीवनात तसेच सामाजिक जीवनात असतात. रोगट प्रवृत्ती किंवा रोगकारक वर्तन हे व्यक्तीला त्याचप्रमाणे समाजाला एकदम स्पष्ट रूपाने लक्षात येत नसते. परिणामी होऊ लागले म्हणजे लक्षात येते असे साधरणपणे म्हणता येते. हीच गोष्ट भारतीय संस्कृतीचे दीर्घकाल प्रशासन करीत राहिलेल्या मानवधर्मशास्त्रालाही लागू आहे.

भारतात हिंदू समाजात समाजसुधारणेचे व धर्मसुधारणेचे आंदोलन सुरू होऊन १५० हून अधिक वर्षे झाली. मनुस्मृतीतील किंवा एकंदरीत हिंदुधर्मशास्त्रातील विधिनिषेध किंवा धर्मनियम हे समाज सुधारणेच्या आणि धर्मसुधारणेच्या विरोधी असल्यामुळे रूढिनिष्ठ जनता व समाजसुधारक ह्यांच्यात संघर्ष सुरू झाला. प्रथम समाजसुधारणेस अनुकूल असलेली धर्मशास्त्रातील वचने हुडकून काढून समाजसुधारक स्वतःच्या सुधारणेच्या कार्यक्रमाचे समर्थन करू लागले. परंतु रूढीनिष्ठांची धर्मशास्त्राविषयक बाजू खूप बळकट असल्यामुळे समाजसुधारणेची चळवळ जेव्हा दृढमूल होऊ लागली आणि पसरू लागली तेव्हा मनुस्मृती व धर्मशास्त्र ह्यांच्याविरूध्द जाणारा जहाल समाजसुधारकांचा वर्ग पुढे आला. अस्पृश्यतानिवारणाच्या संदर्भात अस्पृश्य समाजातून सुधारक नेतृत्व वर आले. उदा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी प्रतीकात्मक कृती म्हणून मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम अनेकदा पार पाडला. मनुस्मृतीमध्ये स्त्री-पुरूषनियमन,स्त्रियांचे पारतंत्र्य आणि जातिबध्द विषम समाजरचना ह्यांचे जोरदार समर्थन आहे. ब्राम्हण जात सर्वश्रेष्ठ व अस्पृश्य जमात ही सर्वात कनिष्ठ, बहिष्कार्य आणि सर्वसामान्य उच्चवर्णीयांच्या किंवा सवर्णांच्या वसतिस्थानांपासून दूर, अलग राहण्यास पात्र होय असे मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे. म्हणून मनुस्मृतीच्या आणि परंपरागत धर्मशास्त्राच्या विरूध्द आजचे हिंदुसमाजसुधारक वारंवार लिहितात व प्रचार करतात.

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....