Friday, 6 September 2019

आमचे इतिहासप्रेमी शेटे मास्तर


मी रमणबागेत शिकायला होतो. पाचवीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वीच शाळेबद्दल अनेक कल्पना डोक्यात फिट्ट बसलेल्या होत्या. आधीचं सगळं शालेय शिक्षण जरी शनवार- नारायण पेठेत झालेलं असलं तरी शिव्या देणे हे अनैतिकच वाटत असे. तर रमणबाग ही शिव्या देणाऱ्या मुलांची शाळा अशी एक माझी कल्पना होती. शिवाय ज्ञानप्रबोधिनीप्रमाणेच रमणबाग आणि नुमवी या दोन शाळांची ढोल पथकं खूप फेमस होती पुण्यात. शिव्या देण्याच्या या पूर्वग्रहाबरोबरच पुण्यातली बेस्ट शाळा हेही त्यावेळी आम्हाला माहिती होतं. 
२०१० साली मी दहावी पास झालो. पुढे ठरवून आर्ट्सला प्रवेश घेतला. आणि जी आवड होती ती जोपासायचा प्रयत्न सुरू केला. आर्ट्स ही अशी शाखा आहे की जिथे पदवी घेऊन पास झालो की नोकरी मिळवावी, लग्न करावं अशा पारंपारिक वाटेनी जाणं शक्य नसतं. तिथे आपली वाट आपण निर्माण करावी लागते. पण दहावी नंतर लगेच वाचनाची आवड लागली. ते वाचन एकाच वेळी दोन प्रकारचं होतं. एका बाजूला ललित साहित्य वाचत होतो, दुसऱ्या बाजूला वैचारिकही वाचत होतो. वाचनाने जे क्षितीज विस्तारलं त्यात लक्षात आलं की आपण ज्या शाळेत शिकलो, आणि ज्या शिक्षकांच्या हाताखाली आयुष्यातली मोलाची वर्षं खर्च केली ते किती महत्त्वाचं होतं. आज शाळा सुटून 9 वर्षं झाली. तरीही मला शाळेतले शिक्षक आठवतात. त्यातही सगळ्यात जास्त आठवतात ते आमचे शेटे सर. मोहन शेटे सर. खरं म्हणजे सरांनी मला केवळ आठवी, नववी, दहावी ही तीनच वर्षं शिकवलं. आठवीत मराठी, नववीत इतिहास आणि दहावीत पुन्हा मराठी. पण ती तीन वर्षं खूप महत्त्वाची होती. अनेक अर्थांनी. 
आज सरांची आणि माझी भेट होण्याचा पहिला प्रसंग मला आठवत नाही. पण मला याची खात्री आहे की तो काही फार महत्त्वाचा प्रसंग असणार नाही. आठवीतला मी हा कोणत्याच अर्थांनी खास नव्हतो. अभ्यासात फार चमकदार नाही, खेळात नाही, वक्तृत्वात नाही, गाण्यात नाही. आपलं असं खास नसण्याचा कोणताही फरक फक्त आपल्या चांगल्या शिक्षकांना पडत नाही. यातूनच माझी सरांशी ओळख झालेली असणार. आता मागे वळून पाहताना लक्षात येतं की सरांनी आम्हाला काय काय दिलं. 
आपल्यात काही खास नाही, आणि त्याने निर्माण होणारा न्यूनगंड माझा दहावी आणि शाळा संपल्यानंतर जास्त वाढला होता. कारण खरी परीक्षा आता कुठे सुरू झाली होती. आयुष्यात आलेला एकटेपणा दूर करण्यासाठी वाचन सुरू केलं. वेगवेगळे प्रसंग शोधून आणि स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यांना हमखास आम्ही शाळा सुटली तरी जात होतो. तेव्हा होणाऱ्या चर्चा या दोन प्रकारच्या होत्या. मी वर म्हणालो तसं माझं वाचन दोन दिशांनी एकाच वेळी सुरू होतं. स्वाभाविकपणे ते बोलू शकेन असे फक्त शेटे सरच होते. कारण मराठी आणि इतिहास हे त्यांचे विषय होते. अनेकदा अशा चर्चा झाल्यानंतर एका चर्चेच्या वेळी ते मला म्हणाले, की मुकुल शाळेतून पास होऊन बाहेर पडलेल्या मुलांमध्ये तू असा बहुदा पहिलाच माझा विद्यार्थी आहेस जो गो. नी. दांडेकर यांच्याबद्दलही तितक्याच आपुलकीने बोलतो आणि भारताच्या फाळणी, इथली जातीव्यवस्था, इथलं समाजकारण याबद्दलही तितक्याच पोटतिडिकेने बोलतोस. 
आपण आपल्याकडे त्रयस्थपणे सहसा पाहू शकत नाही, आणि म्हणून स्वतःचा जो शोध लागायचा त्याला विलंबही होतो, कदाचित तो होतही नाही. पण डायरी लिहिणे, कल तपासणीच्या परीक्षा याबरोबर जो सर्वात प्रभावी उपाय सांगितला जातो, तो शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या बाबतीत मार्गदर्शन करावं. सहज बोलता बोलता त्यांना माझ्याबद्दल लक्षात आलेली गोष्ट शेटे सरांनी मला सांगितली, त्याक्षणी गेले ३-४ वर्षं जो एक न्यूनगंड भरून राहिलेला होता, तो हळूहळू कमी व्हायला सुरवात झाली होती. 
सरांच्याबरोबर आम्ही भरपूर ट्रेक केले. किंबहुना ट्रेकिंगची आवड मला सरांमुळेच लागली. सातवीत असताना आम्ही पहिल्यांदा रायगडला गेलो होतो. तेव्हा मला आठवतंय, शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर बसून सरांनी सांगितलेली राज्याभिषेकाची गोष्ट. पण त्याहून विशेष म्हणजे रायगडहून परत येताना आम्ही शिवथरघळ येथे थांबलो होतो. पावसाळयानंतरच आमची ट्रीप गेली होते, माझ्या अंदाजाप्रमाणे. त्या शिवथरघळीतल्या तुफान पावसामध्ये, भोवती प्रचंड जंगल, शेजारून पडणारा प्रपात, मागे रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींची मूर्ती आणि शेटे सरांनी आम्हाला 'धबाबा तोय आदळे' हा अभंग/ओवी/श्लोक/ कविता शिकवली होती. ज्या ठिकाणी बसून प्रत्यक्ष अडीचशे तीनशे वर्षांपूर्वी रामदासांना त्या ओळी सुचल्या असतील, प्रत्यक्ष त्या ठिकाणी बसून सर आम्हाला त्या ओळी समजावून सांगत होते. शिवाय, ते शिकवणं म्हणजे केवळ कवितेतल्या अवघड शब्दांचे अर्थ सांगणं नव्हतं. एका कवितेच्या आधाराने ते त्या कवीचं सगळं आयुष्य आम्हाला उलगडवून दाखवत होते. अतिशय नकळतपण मला साहित्याची आवड लागली ती सरांमुळेच. अशीच कुसुमाग्रजांची 'जालियनवाला बाग' ही कविता शिकवली होती. 'आगगाडी आणि जमीन' ही कविता त्या खास रिदममध्ये त्यांनी वर्गात म्हणून दाखवली होती. सावरकरांच्या कविता सरांच्या तोंडून समजावून घेण्याचा प्रसंग आला नाही. 
सरांच्या घरी सुद्धा मग जाण्याचा अनेकदा प्रसंग आला. सरांच्या वाढदिवसादिवशी, कधी केवळ गप्पा मारायला. पण शाळेतून पास होऊन बाहेर पडल्यानंतर आमच्या शेटे सरंचं घर हक्काचं राहिलेलं. आहे. मी आजारी पडलो होतो तेव्हा सर येऊन पाहून गेले होते. शाळेतले शिक्षक आपल्या घरी येऊन जाणं हा काय आनंद असतो, हे आता सांगता येणार नाही, कारण आपण त्या बालपणाच्या भावनेतून बाहेर येतो. पण तो आनंद खूप मोठा असतो. 
जी गोष्ट सांगून सरांनी माझा न्यूनगंड दूर केला होता, ती गोष्ट सरांच्या बाबतीतही खरी होती. सरांच्या घरी गो.नी दांडेकर आणि सावरकर असे दोन फोटो होते. दोघंही  सरांची दैवतं. आता मला या गोष्टीसाठी कायम सरांचा हेवा वाटत आला आहे की राजगडाची एक शेवटची ट्रीप आमचे शेटे सर, गोनीदांच्या बरोबर गेले होते. सर हे अभिमानाने सांगत असत की त्यावेळी आप्पाचे पाय मला चेपून देता आले होते. आप्पांच्या प्रेमापोटी त्यांच्या आणि मग अनेकांच्या पुढाकारातून गोनीदा दुर्ग साहित्य संमेलन नंतर सुरू झालं होतं. एक वर्षं ते राजमाचीलाच आयोजित करण्यात आलं होतं. 
सावरकर हे सरांचं दैवत. जसं बाबासाहेब पुरंदरे हे दैवत तसंच. बाबासाहेबांच्या 'जाणता राजा' या महानाट्यावरून प्रेरणा घेऊन शेटे सरांनी 'क्रांतीसूर्य सावरकर' हे महानाट्य लिहिलं होतं. सुरवातीला त्याचं स्वरूप लहान होतं. त्यामध्ये मी सावरकरांच्या लहान भावाचं काम मी करणार होतो. पण नंतर त्यांनी याचं महानाट्य करण्याचा निर्णय घेतला. त्याचं महानाट्य झाल्यावर मग माझा रोल बदलला. पण मी त्यात होतो. 
दर वर्षी दिवाळीमध्ये मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रसंग घेऊन दृक्श्राव्य असं भव्य प्रदर्शन ते भरवतात. 'इतिहास प्रेमी मंडळ' म्हणून शाळेतल्या मुलांना बरोबर घेऊन हेरीटेज वॉक, अभ्यास सहली, प्रदर्शनं, व्याख्यानं असं ते सतत करत असतात. त्यांच्या हाताखाली शिकून शाळेतून बाहेर पडलेल्या असंख्य मुलांमध्ये इतिहासाची आवड निर्माण शेटे सरांनी केली आहे. 
एक वर्ष आम्ही पास झाल्यानंतर एका बॅचच्या मराठीच्या तोंडी परीक्षेला त्यांनी मुलांना free hand दिला होता. अभ्यासक्रमातलं ठराविक काही परीक्षेत न विचारता, मुलांना सांगितलं, 'तुम्हाला आवडते ती कविता पाठ करून या, आणि मला समजावून सांगा.' परीक्षा झाल्यानंतर सरांना भेटायला गेलो होतो तेव्हा सर म्हणाले, "आपण मुलांना इतकंही स्वातंत्र्य देत नाही. मुलं इतकी हुशार आहेत, इतक्या वेगवेगळ्या कविता पाठ करून आले होते. त्यांच्या वयाला साजेसं त्याचं स्पष्टीकरणंही इतकी भन्नाट होती. हे केलं पाहिजे." आमच्या शाळेनी शाळेच्या मागच्या बाजूला एक बाग तयार केली होती. कलाशिक्षणाचे सर्व वर्ग त्या बागेत भरत असत. चित्रकला, शिल्पकला, संगीत वगैरे.  आमचे सर, कविता शिकवायला मुलांना त्या बागेत घेऊन जात असत.   
पुण्यातल्या हेरिटेज वॉकच्या दरम्यान याचा आम्हाला अनुभव आला. अज्ञात क्रांतिकारकांच्या घरांजवळ, त्यांच्या वावरण्याच्या ठिकाणांजवळ उभं राहून त्यांच्या गोष्टी ऐकणं हा अनुभव त्या लहान वयाला खूप मोलाचा ठरत असे. क्रांतीवीर उमाजी नाईक यांची पुण्याच्या तहसीलदार कार्यालयाच्या जवळ समाधी आहे. ज्या पिंपळाच्या झाडाला उमाजी नाईक यांना फाशी दिली ते झाड अजूनही त्या तहसील ऑफिसच्या परिसरात उभं आहे. त्या झाडाच्या खाली उभं राहून उमाजी नाईकांची गोष्ट सरांनी सांगितलेली मला अजून आठवते. खुन्या मुरलीधराच्या मंदिराच्या अलीकडे एका मंदिरात वासुदेव बळवंत फडके काही काळ वास्तव्याला होते. त्याचीही गोष्ट अशीच आहे. 
पुण्यात खरं म्हणजे पावलापावलावर तुम्हाला जगण्याला प्रेरणा मिळतील अशी असंख्य ठिकाणं आहेत. ती त्या शाळेच्या वयातच आम्हाला दाखवून खरं म्हणजे आयुष्याला दिशाच सर देत होते. जसा ऐतिहासिक ठिकाणांचा हेरीटेज वॉक सर करतात तसा साहित्यिकांचाही करतात. पुण्यात त्या त्या साहित्यिकाच्या घराच्या जवळ जाऊन त्या त्या साहित्यिकाची आठवण काढणे. त्याच्या साहित्यातील काही मजकुराचे अभिवचन करणे. नाट्यछटा कार दिवाकर, राम गणेश गडकरी, अत्रे, गोनीदा, सावरकर इत्यादी आणि असे अनेक साहित्यिक त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही सरांच्या तोंडून ऐकले होते.       
पुल हरी तात्यांचं वर्णन करतात बघा, तसं शिवाजीचा पेशवाईची काळ सदेह अनुभवू शकणारा माणूस आमच्या आसपास वावरत होता. तो त्यानी भूतकालवाचक क्रियापदांनी दूर नेलेला नव्हता तो तुमच्या माझ्या इतका जिवंत करून दाखवला होता. 
खरं म्हणजे सरांच्याबद्दल अजून खूप गोष्टी आहेत, असा दिवस जात नाही ज्या दिवशी सरांची आठवण येत नाही. आता दिवाळी आलीच. आता सरांच्या प्रदर्शानाची गडबड सुरू झाली असेल. आज सगळं हे आठवायचं कारण म्हणजे काळ शिक्षक दिन होता. पूर्वी गुरुपौर्णिमेला आणि शिक्षक दिनाला मी नियमित शाळेत जात असे. यावर्षी ते जमलं नाही. 


Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....