Monday 27 April 2015

ब्राह्मण - ब्राह्मणेतर संघर्ष, संघर्षाचा बळी - समर्थ रामदास - भाग - १

साधारणपणे असं म्हंटल जातं कि महत्मा फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक चळवळीच रुपांतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामध्ये झालं. आपण सुरु केलेल्या सामाजिक, आर्थिक समतेच्या लढ्याचं रुपांतर अशा जातीय वादामध्ये व्हावं असं फुल्यांना कधीच वाटलं नसेल. पण ते झालं. महाराष्ट्रातल्या सर्व पुरोगामी संघटनाची या वादाला ब्राह्मणेतरांच्या बाजूनी सहानुभूती असते असं, म्हणणं फार वावगं ठरणार नाही. किमान पुरोगामी संघटना आपली लढाई विचारांनी असल्याचं प्रतिपादन करतात, तसं गेल्या काही वर्षात वातावरण राहिलेलं नाही. ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद हा गेल्या काही वर्षात विचारांची लढाई राहिलेला नाही. मूलनिवासी, ब्रिगेडी, मराठा सेवा संघ प्रणीत संघटनांनी ह्या वादाला जबरदस्त आक्रमक रूप दिलं आहे, खतपाणी घातलं आहे. ह्या आक्रमक वादाला वैचारिक पाठबळ देणारे इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ सुद्धा विपुल प्रमाणात आहेत. ह्या संघर्षाच एक रूप शिवाजी रामदास ह्या मुद्द्यावर येतं. विचारांची लढाई विचारांनी व्हावी असं म्हणणाऱ्या संघटनांकडून अतिशय गलिच्छ शब्दात रामदासांवर टीका होत असते. पातळी सोडून टीका सुरु आहे. ह्या वादाला काही वैचारिक पायबंद घालण्याचा हा प्रयत्न आहे. (सर्व ठिकाणी केलेला एकेरी उल्लेख त्या व्यक्तीबद्दलचा अनादर किंवा द्वेष व्यक्त करतोय असं चुकूनही समजू नये)

संघर्षाच कारण काय? 

रामदास शिवाजीचा गुरु होता का नव्हता हा वाद नेमका कधी सुरु झाला, हे कोणालाही माहिती नाही. कोणी सुरु केला हेही कोणाला माहिती नाही. इतिहासनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले काही रामदासपंथीय लोकांनी शिवाजीच्या सर्व कार्यामागे रामदास उभे होते असं प्रतिपद साधारणपणे १८ व्या शतकाच्या मध्ये केलं. रामदास स्वामी शिवाजी राजांचे राजकीय, आर्थिक गुरु होते असं प्रतिपद केलं गेलं. हे रामदासपंथीय कोण होते, त्याचं ऐतिहासिक योगदान काय होतं, त्याचं कर्तृत्व काय होतं. त्यांनी नाव काय होती, हे सुद्धा कोणीही लक्षात ठेवलेलं नाही. कोणालाही त्याची गरज वाटलेली नाही. रामदासपंथीय म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यानंतर जवळ जवळ १०० वर्ष वाद सुरु आहे. हि गोष्ट अगदी खरी आहे कि ह्या भूमिकेमुळे शिवाजी हा कर्तृत्वशून्य राजा ठरतो. हे ऐतिहासिकदृष्ट्या शिवाजीच योग्य मूल्यमापन होणार नाही. 

संघर्षाचं मूळ अस्तित्व आहे का?

संपूर्ण ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद हा एक अज्ञानावर उभा आहे. एक चुकीची गोष्ट घडली असं दोघेहीजण गृहित धरतात, आणि घडलं ते बरोबर असं एकाच म्हणणं आणि घडलं ते चुकीच असं दुसऱ्याचं म्हणणं. ब्राह्मणेतरांचं म्हणणं असतं कि ब्राह्मण समाजानी सर्व ज्ञान आपल्याकडे कोंडून ठेवलं. त्यामुळे सर्व समाज अज्ञानामध्ये पडला आणि म्हणून ब्राह्मणांचा द्वेष केला तर ते समर्थनीय आहे. दुसऱ्या बाजूला ब्राह्मणांनाही असं वाटतं कि जगातल्या सर्व ज्ञानाचे आपण धनी आहे. सर्व ज्ञान खरच फक्त आपल्यकडे आहे. सर्व ज्ञान ब्राह्मणांकडे आहे हेच मुळात अज्ञान आहे हे दोघेही जण गृहीत धरून भांडत आहेत. कोणीही असा  विचार केला नाही कि कोंडून ठेवायला ब्राह्मणांकडे कोणतं ज्ञान होतं. आधुनिक शेतीच ज्ञान होत का? कलांच ज्ञान होता का? विज्ञान तंत्राज्ञानच ज्ञान होता का? देशाचं संरक्षण कसं करावं हे ज्ञान होता का? अंतरराष्ट्रीय राजकारणाचा ज्ञान होतं का? आधुनिक अर्थशास्त्राच ज्ञान होता का? ब्राह्मणांनी कोंडून ठेवलेलं ज्ञान श्राद्धपक्षाच आणि लग्न मुंजीत आणि सत्यनारायणाच्या पूजेत मंत्र कोणते म्हणायचे हे जे ज्ञान आहे तेवढ आणि तेवढच ज्ञान ब्राह्मणांनी कोंडून ठेवलं होता. हे कोंडून ठेवलेलं ज्ञान कोणत्याही संघर्षाशिवाय त्यांनी समाजाला उघडं करून दिलं असत, तर आमच्या समाजाची मानसिक गुलामगिरी दूर करण जस अवघड गेलं असत. ब्राह्मणवर्ग हे ज्ञान सहजासहजी  उघडं करून द्यायला  अनुकूल  नव्हता म्हणून महाराष्ट्रात प्रबोधनाची सुरवात झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद हा मुळात चुकीच्या मुद्द्यावर उभं आहे. चुकीचा मुद्दा बरोबर आहे असं गृहीत धरून दोन्हीही पक्ष कित्येक वर्ष भांडत आहेत. जो संघर्ष मुळात अस्तित्वात असण्याचं कारण नाही, तो संघर्ष जाणूनबुजून सुरु ठेवलं जातो आहे. दोन्हीही बाजूनी. 

'एतद्देषीयांच राज्य असावं' हि मूळ प्रेरणा -

हिंदुंच राज्य या ऐवजी आपण एतद्देशियाचं राज्य असं म्हणूया. या देशावर राज्य करत असलेली परकी राज्यव्यवस्था नष्ट व्हावी आणि एतद्देशीय परंपरांच रक्षण करणारी राज्यव्यवस्था निर्माण व्हावी आणि राज्यकर्ता व्हावी हि मूळ प्रेरणा संत एकनाथ महाराजांची आहे. एतद्देशियाचं राज्य निर्माण व्हावं हि भूमिका शिवाजी राजांच्यापूर्वी महाराष्ट्रात फक्त एकनाथ महाराजांची. बाकीचे सर्व संथ भक्ती, मोक्ष अर्थात निवृत्तीमार्गी होते. एकनाथ महाराजांनंतर प्रवृत्तीमार्गी अध्यात्म सांगणारे दुसरे संत रामदास आहेत. रामदास स्वामींच वाड़मय हिंदूराष्ट्राच्या प्रेरणेनी झपाटलेल वाड़मय आहे. सुखद योगायोग हा कि रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज एकमेकांना समकालीन आहे. समान भूमिका घेऊन राजे उभे राहिलेले आहेत. तू हिंदू धर्माच्या प्रेरणेचे राज्य निर्माण कर असं रामदास स्वामी शिवाजीला कधीही सांगायला गेले नाहीत. शिवाजी राजेही रामदासांना मी हिंदुंच राज्य निर्माण करू का हे विचारायला गेले नाहीत. दोघांचही धेय्य समान होतं, ते एकमेकांना समजून देण्याची गरज नव्हती. हे ध्येय जनतेला समजून देण्याची गरज होती. हे उदात्त ध्येय जनतेला समजवून देण्याच काम रामदास स्वामी करत होते का नाही हि खरा महत्वाचा मुद्दा आहे. ते शिवाजी राजांचे गुरु होते किंवा नव्हते हा गौण मुद्दा आहे. 

कर्तृत्वाच्या भिन्न कक्षा - 

अज्ञात रामदासीपंथीयांनी मांडलेल्या भूमुकेचा एक अर्थ असा निघतो कि प्रत्यक्ष राजकारणाचे धडे शिवाजी राजांनी समर्थ रामदास स्वामींकडून घेतले. व्यावहारिक राजाकारणाची इतकी मोठी तज्ञता जर रामादासांकडे होती, तर त्यांनीच राज्य निर्माण का केला नाही? या भूमिकेमुळे शिवाजीचं कर्तृत्व शून्यवत ठरत. रामदासीपंथीयांनी केलेली हि वैचारिक गफलत आहे असं माझं मत आहे. लढावं केव्हा, कुठे, लढताना पवित्रे कोणते घ्यावेत, गनिमी काव्यांनी लढाव कि प्रत्यक्ष मैदानात ह्याचा तज्ज्ञ शिवाजीच होता ह्याचा तज्ज्ञ काही रामदास  नव्हता. पण लढावं कश्यासाठी याचा तज्ज्ञ रामदास होता. एतद्देशियाचं राज्य यावं हि प्रेरणा जनतेत निर्माण करण्याच काम महाराष्ट्रीय संतांच होता ते काम फक्त रामदासांनीच केलं. या दोघांच्याही कर्तृत्वाच्या कक्षा वेगवेगळ्या आहेत. एकानी दुसऱ्यावर अधिकार सांगण्याच काही कारण नाही. ह्या परस्परपूरक अशा कक्षा आहे. 

एतद्देशीयांच राज्य निर्माण झालं पाहिजे हि प्रेरणा जनतेत निर्माण करण्याची गरज होती. हि प्रेपणा शिवाजीला समजून देण्याची गरज नव्हती. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे १६७२ सालचं रामदास स्वामींच शिवाजीला लिहिलेलं पत्र. दोघांनाही एकमेकांच कर्तृत्व माहिती होताच कि, तरीसुद्धा इतक्या अलंकारिक भाषेत रामदासांनी शिवाजीला पत्र लिहिल्याची काय गरज होती? आणि तू श्रीमंत योगी आहेस, तू पुण्यवंत आहेस,
नीतिवंत आहेस, तू जाणता राजा आहेस हे सांगून रामदासांनी काय मिळवलं? ह्या पत्राकडे आपण वेगळ्या नजरेनी पहिला पाहिजे. रामदासांनी हे पत्र केवळ शिवाजीला लिहिलेला नाही, तर आपलं साहित्य जिथे जिथे वाचलं जातं अश्या महाराष्ट्रीय लोकांसाठी लिहिलेलं हे पत्र आहे. हे लोकांना समजावून देण्याची गरज होती कि तो रायगडावर जो राजा राज्य करतोय तो जाणता राजा आहे, तो पुण्यवंत आहे, नीतिवंत आहे, तो परमेश्वरी अवतार आहे. मुद्दा एवढाचं आहे कि दोघांच्या कर्तृत्वाच्या मर्यादा भिन्न आहेत, त्या परस्पर पूरक अश्या कक्षा आहे. त्यासाठी गुरु किंवा शिष्य असण्याचं काही कारण नाही. त्यासाठी प्रत्यक्ष भेट होण्याचाही कारण नाही.
( क्रमशः)

http://mukulranbhor.blogspot.in/2015/05/blog-post.html
या लिंक वर पुढचा भाग वाचा...

    

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....