Sunday 26 July 2015

निशाचर



''तू काहीही म्हण बरं का, थंडी प्रचंड होती. अगं आमचा जीव निम्मा केला त्या थंडीनी"

''तू सुरवातीपासून सगळं निट सांग, विष्णूनी नेहमीप्रमाणे अर्धवट सांगितलं''
''मी नेहमीप्रमाणे सुरवातीपासून सांगतो''
मग मी जरा सावरून बसलो. एक गोष्ट सांगायची होती. मी सांगणार होतो. ती पण मग जरा सावरून बसली. मी तोंडात प्राण आणून गोष्ट सांगायला सुरवात केली आणि तिने कानात प्राण आणून ऐकायला.

''त्यादिवशीचं शेवटचं लेक्चर संपलं आणि मी विष्णूच्या रूमवर गेलो. बसलो टाईम पास करत. रूमवर गेल्यावर दुसरं काय होणारे? विष्णू दोन-तीन दिवसात घरी जाणार होतं, बाळाला बघायला. विष्णूच मला म्हंटला कि आज थांब रूमवरच. जेवायला जाऊ मस्त, बसू गप्पा मारत रात्रभर. ठरलं. मी बाबांना फोन करून सांगितलं. आणि आश्चर्य म्हणजे बाबासुद्धा लगेच मान्य झाले.

मग मी आणि विष्णू जेवायला गेलो त्याच्या मेसवर. भरपूर जेवलो आणि पुन्हा रूमवर आलो. बसलो गप्पा मारत. त्या गप्पांना कोत्याही विषयाचं बंधन नसतं. ब्रह्मसूत्रापासून कामसूत्रापर्यंत. दहा साडे दहा झाले रात्रीचे. अभीपण त्याच्या त्याच्या रूम वर गेला. विष्णूचे बाकीचे रूममेट पण सगळे झोपले. आम्ही दोघं निशाचर! आम्हाला कुठली झोप यायला. आम्ही टक्क जागे. आता बाबांकडून परवानगी मिळवून थांबलो रूमवर आणि काय झोपायचं? छे! मी विष्णूला म्हणतलो चल फिरायला जाऊ. रूमवर बसून काय करायचय. आम्ही निघालो. ५ पावलं गेलो असू तेवढ्यात विष्णू म्हणाला मुकुल आपल्याकडे गाडी आहे. मी त्याला म्हणलो ''मग किल्ली घेऊन ये'' विष्णू पळत पळत परत गेला आणि गाडीची किल्ली घेऊन आला. गाडी होती पल्सर १८०. मी गाडीवर बसलो विष्णू अजून उभाच होतं. मी गाडीचा जरा अंदाज घेतला विष्णूकडे पाहिलं आणि म्हणतलो, ''मग, कुठे जायचं?''

''तू बोल. पुण्यात काय काय आहे बघण्यासारखं?''
''पुण्यात खूप काय काय आहे बघण्यासारखं, पण रात्री नाही. दिवसा बघण्यासारखं खूप आहे आणि विष्णू पुण्यातल्या गोष्टी कधीही बघता येतील रे.''
''मग कुठे जायचं?''
थोडा पॉज घेऊन मी म्हणलो, ''लोणावळा?''
''लोणावळ्यात रात्रीचं काय बघायचं आणि हायवे वरून जावं लागेल ना? मग नको!''
मग आम्ही दोघंही बराच वेळ गप्पच राहिलो. काहीच सुचत नव्हत. जे सुचत होतं तो मूर्खपणा होता किंवा बालीशपणा. आम्हाला दोन्हीही करायचं नव्हतं. विष्णूनी अचानक माझ्या खांद्यावर हात ठेवला.
''मुकुल मी आजपर्यंत आयुष्यात समुद्र पाहिलेला नाही!''
त्याच्या डोक्यात काय सुरु आहे याचा मी अंदाज बंधू लागलो. मला अंदाज बांधणं सुद्धा अवघड जात होतं. तेवढ्यात विष्णू म्हंटला' ''मुकुल श्रीवर्धन?''

मी भानावर आलो. श्रीवर्धन म्हणजे पौड, मुळशी, आख्खा ताम्हिणी घाट, माणगाव म्हणजे जवळ पास १५० किमीच अंतर. रात्रीच्या ११ वाजता. 
मी विष्णूला म्हणलो, ''भाई आज कुछ तुफानी हो जाये? बैस गाडीवर" मी गाडीला किक मारली. गाडी कुलकर्णी पेट्रोल पंपावर नेली. ५०० चं पेट्रोल भरल. अचानक इतका उत्साह कुठून आला काय माहिती. बहुतेक नुसत्या ताम्हिणीच्या आठवणीनी हा उत्साह आला असावा. विष्णू समुद्र बघायचा म्हणून उत्साही होतं, आणि मी रात्री बघणार म्हणून.

आम्ही निघालो. कुलकर्णीवर पेट्रोल भरलं. कर्वेरोड वरून चांदणी चौक. प्रचंड थंडी होती. आम्हा दोघाजणांमध्ये मिळून एक रुमाल होतं. बहुतेक सर्ववेळ गाडी मीच चालवली, पण विष्णूनी पण थोडा वेळ गाडी चालवली. जो कोण गाडी चालवत असेल तो रुमाल बांधत असे. थंडीच फार होती. चांदणी चौक म्हणजे जिथे हमखास पोलीस असतात. पण ११ वाजता रात्री कोण असणारे. कोणीही नव्हतं. मी सुसाट चालवत होतो गाडी. गाडी पल्सर होती यार. पण थंडी फार होती. नाक, कान, हताची बोटं गार पडली. बधीर झाली. तरी गाडी ताणात राहिलो. अजून आम्ही भूगावपर्यंत सुद्धा पोचलेलो नव्हतो. पहिल्या उत्साहात ठरवलं श्रीवर्धन पर्यंत जायचं. पण थंडीनी उत्साहाचा बर्फ केला. पण आम्ही 'इतरांप्रमाणे' नाही. पहिला उत्साह मावळला कि गळून जणारे. आम्ही टिकून राहिलो. पण हाताची बोटं काम करेनात. पाय काम करेनात. मी गाडी साइड्ला लावली. खाली उतरलो. विष्णूला विचारलं,

''भाई क्या करे?'' तर विष्णू तोंड वर करून कसा म्हणतो, ''एक बार जो हमने कमीटमेंट करली तो मै अपने आप कि भी नाही सुनता!'' हाणला पाहिजे कि नाही.  हात, पाय बधीर झालेत आणि डायलॉगबाजी करता साला. पण माघारी जायचं नाही हे ठरलं. पुन्हा एकदा नव्या उत्साहानी निघालो. आताचा उत्साह केवळ वरवरचा नव्हता. आता सिरीयसली ठरलं. भूगाव, पौड, पिरंगुट पर्यंत आपण शहराच्या बाहेर आलोय असं वाटतच नाही. खर फिरायला निघाल्याचा फील पौड सोडलं कि सुरु होतो. तशी खरी थंडी पण पौड सोडल्यानंतर सुरु झाली. वस्ती सोडून गावाच्या बाहेर आलो आणि चांगलीच थंडी सुरु झाली. मग काही वेळ विष्णू नी चालवली गाडी. जमत नाही जमत नाही म्हणतो पण चांगली चालवत होता गाडी.

पौड पासून मुळशी गावापर्यंत विष्णूनी चालवली गाडी. मी मागे बसून होतो. पौडपर्यंत रस्त्यावर गाड्या होत्या त्यामुळे काहीतरी आधार होता. जिवंतपणाच काहीतरी लक्षण होतं. पौडपासून तोही आधार गेला. उगाच कुठेतरी एखादी गडी दिसायची. त्यादिवशी पौर्णिमासुद्धा होती. काय मस्त चांदणं पडलं होतं. त्याला उपमाच नाही. चंद्रासारख चांदणं पडलं होत. दिवसभर भरपूर खेळून दमलेल्या मुलासारखं सगळं आसमंत शांत झोपलं होतं. कुठेही जोरात हवा नाही, कोणत्याही प्राण्या-पक्षायचं ओरडणं नाही. माणसांचा गलका नाही. या शांततेतही कोणतातरी अवाज असतो. गुलजारच्या एका गाण्यात आहे बघा- ''वादी मै गुंजती हुई खामोशीया सुने''

अगदी तस्सच. त्या शांततेत आमची गाडी खूपच आवाज करत होती. गाडीचा आवाज त्रास देत होता, पण थांबणं परवडणार नव्हतं. मुळशी धरणाचं पाणी जस दिसायला लागलं तसं आपण काय करायला निघालो आहोत त्याची भव्यता आणि मूर्खपणा लक्षात यायला लागला. थंडी वाजत होतीच. मी विष्णूला म्हणलो गाडी जरा हळू चालव. मी जॉगिंग करतो थोडा. एक-दीड किलोमीटरचा रस्ता मी जॉगिंग केलं. शरीर जरा गरम झालं. गाडी मी घेतली मग चालवायला. मुळशी धरणांच पाणी सुरु झालं होतं. म्हणजे आता पुढचे १२-१५ किमी हे पाणी आणि त्याबरोबर थोडासा अजून गारठा हा सोबतीला आला. पण फारच थंडी वाजायला लागली. तेव्हा मात्र आम्ही चक्क गाडी बाजूला  लावून रस्त्यावर २५-२५ डीप्स मारले. जोर मारले. अंग पुन्हा थोडं गरम झालं. गाडी पुन्हा सुरु केली. आताशी १२:३० वाजत होते. अजून संपूर्ण रात्र जायची आहे. त्यानंतर उत्तररात्र आहे. तेव्हा थंडी अजून वाढेल. १२ ची थंडी सहन होत नाहीये आणि पहाटेची कशी होईल. पण ठरवलं म्हणजे ठरवलं!

बॅकवॉटर संपेपर्यंत मग मात्र आम्ही थांबलो नाही. काकडत, कुडकुडत आम्ही धारण पार केलं. जिथे जलाशय संपतो तिथून लगेच घाट सुरु होतो. तिथे एक स्कोर्पियो आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली. मी विचार केला. आता रात्रीचा एक वाजलाय. आपण महाराष्ट्रातल्या एका अवघड घाटातून टू व्हीलर वरून प्रवास करतोय. आपलं काहीही होऊ शकत. कोणी सोबत असलं तर बर. अनायासे हा स्कोर्पियोवाला आला आहे. त्याला धरून ठेवावा. पूर्ण घाट मी त्याच्या पुढे जाऊ दिला नाही, मी ही त्याच्या पुढे गेलो नाही. हा डोळ्यासमोर असलेला बरा. 'काही होईल या भीतीमध्ये आणि स्कोर्पियोवाल्याला सोडायचं नाही' या नादात चांदण्याच्या प्रकाशात हा भव्य सह्याद्री कसा दिसतो हे बघायचचं राहून गेलं. माझं सगळं लक्ष वेग, रस्ता आणि स्कोर्पियोवरच. मुख्य सौंदर्य बघायचं राहून गेलं. तरी सुद्धा ते काळे डोंगर, प्रचंड दरी, तुफान जंगल जे चांदण्याच्या प्रकाशात दिसत होतं ते सांगायला शब्द नाहीत. तू अनुभवच मुळातून घ्यायलाच हवा. सांगून तो समजणारच नाही. घाटातच एक ठिकाणी 'पुणे जिल्हा-हद्द समाप्त' आणि रायगड जिल्ह्यात आपले स्वागत आहे' अश्या गद्य पाट्यांनी आम्ही किती लांब आलो आहोत हे सांगितलं. पुण्यापासून चांगलं ८०-८५ किमी लांब आलो होतो आम्ही. ताम्हिणी हा महाराष्ट्रातील सर्वात अवघड घाटांपैकी एक. तो आता राखीव जंगलाचा भाग आहे. त्यात रात्रीची वेळ. या सगळ्याची एक थोडीशी भीती माझ्या मनात होतीच. त्यामुळे कधी घाट संपतोय असं झालेलं. 'घाट समाप्त' च्या पाटीनी एक सुकून दिला. आम्ही थांबलो. याच्याआधीचा स्टॉप आम्ही धरणापाशी घेतलेला. आता गाडीवरून खाली उतरलो तर उभ सुद्धा राहता येईना. पाय गाडी चालवून आणि थंडीनी जाम आखडले. हालवताच येईनात. या परिणामाची कल्पना नव्हती. तसं खरं म्हणजे कोणत्याच परिणामांची कल्पना नव्हती. म्हणून तर इतक मोठ डेअरिंग करत होतो. पण पाय जाम दुखत होते. मग काही वेळ विष्णूनी गाडी घेतली.

माणगावपर्यंत मग विष्णूनी गाडी चालवली. माणगावच्या रस्त्यावर आम्ही एक अचाट प्रकार बघितला. काय २ वगैरे वाजले असतील. एक वळण पार करून पुढे आलो तर पांढरा शर्ट घातलेला कोणी एक पाठमोरा बसलेला. त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. जवळपास गाडी नव्हती. वस्तीसुद्धा लांब होती. ते बघताक्षणी काळजाचा ठोका मात्र चुकला. पुढे आल्यावर कळल कि त्याच्या समोर दोघजण काळं जर्किन घालून बसले होते आणि जेवत होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांची गाडी लावली होती. आणि गाडीवर पाटी होती MH १२. पाटी पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला. माणगावच्या थोडं अलीकडे पुन्हा मी गाडी घेतली. माणगावला पोचलो. पहाटे २ वाजता आम्ही माणगावमध्ये चहा पिला. अंगात थोडी गर्मी तयार झाली. तसाही घाट उतरून कोकणात आल्यामुळे थंडी थोडीशी कमी झाली होती, पण अगदी थोडीशी बरं का! आम्ही पुण्यापासून ११० किमी आलो होतो. अजुन ४०-५० किमी जायचं होतं. पाच मिनिटं थांबलो, जरा विश्राम घेतला. मुंबई-गोवा हायवे क्रॉस करून रस्ता बदलून निघालो. विष्णूसाठी समुद्र आता फक्त ४०-५० किमी दूर होतं. दोघही खूप excite झालो होतो.

आता चन्द्र पूर्ण डोक्यावर होता. आमची सावली आमच्या पायाखाली होती. रात्री दोन वाजता रस्त्यावर कोणत्याही गाडीची अपेक्षा नव्हती. शांततेचा अनुभव घ्यावा म्हणून मी गाड़ी बंद केली. गाडीचे लाईट बंद केले. पुढचा आनंद काय वर्णावा. ते पसरलेल चांदण अणि त्यानी तयार केलेल सुन्दर चित्र आम्ही उगाच डिस्टर्ब करतो आहोत अस आम्हाला वाटलं. अपराधी वाटलं. निसर्गाच्या कोणत्याही कलाकृतीला माणसाने हात लावू नये हेच खरं.  तरी आम्ही जास्तीत जास्त त्या चित्राशी एकरूप व्ह्यायचा प्रयत्न करत होतो. पण रस्ते कोकणातले. इच्छा नसताना गाड़ी सुरु करावी लागत होती, लाईट सुरु करावे लागत होते. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाने थोड्याच होतात. श्रीवर्धन आता १६ किमी राहिलं होतं. 

माझ्या डोक्यात अजुन एक कीड़ा आला. मी गाड़ी बाजूला लावली. पाठिवरची सॅक छातीवर घेतली.   रस्त्यावरून एखादी गाड़ी, ट्रक वगैरे येताना दिसला तर त्याच्या समोर आम्ही नाचलो. चांगल आठ - दहा गाड्यांसमोर नाचलो असे. आदिवासी लोकं नाचतात न तसे! त्या गाड्यांच्या ड्रायव्हरनी काय विचार केला असेल ह्याचा विचार येउन रस्त्यावर लोळून लोळून हसलो. हा काही मिनिटांचा मुर्खपणा पुढच्या आयुष्यात बळ देणारा ठरेल. हा मुर्खपणा आवरून गाड़ी सुरु केली अणि लगेचच वळण वळून पुढे आलो तर तिथे पोलिस चौकी होती. एका जरी ड्रायव्हरनी पोलिसाना सांगितलं असतंकी खाली दोन मूलं दारू पिउन धिंगाणा घालत आहेत, तर??? पोलिसनी किती, कसं अणि कुठे कुठे मरलं असतं?  

श्रीवर्धन गावत पोचलो. साधारण ३.३० झाले असतील. गाव सुनसान. शांत. इतकं शांत अणि सुनसान कोणतचं गाव मी कधीच पाहिलेलं नाही. इतक्यावेळेला श्रीवर्धनला येउन सुद्धा आज श्रीवर्धन नवीन बघत होतो. सगळ्या गोष्टींवर मंद, शांत चांदणं पडलेलं. उंच सुपरिचि, नारळाची झाडं संथ हालत होती. सगळाच कारभार संथ सुरु होता. कोणताही आक्रामकपणा नहीं, जोराचा वारा नाही. कुत्र्यांच भुंकण नाही, कोणाचं ओरडणं नाही. झाडांची पानं सुद्धा संथ हालत होती. बहुतेक हि नशा आंब्याच्या मोहोराची असावी. श्रीवर्धन मधला मुख्य रस्ता समुद्रापर्यंत जातो. तसं विश्वेश्वरच मंदिर, तहसीलदार ऑफिस, खोताची वाडी. असं मागे टाकत पुढे आलो. समुद्राच्या लाटांचा आवाज सुरु झाला. आता मात्र धीर धरवत नव्हता. कधी एकदा तो समुद्र बघतो असं झालेलं. डांबरी रस्ता संपला, लालमातीचा सुरु झाला. त्या लाल मातीवर समुद्राची रेतीसुद्धा सुरु झाली. जिथे रस्ता संपतो  तिथून तो रत्नाकर सुरु होतो. 'जेथे सागरा धरणी मिळते' तिथून. गाडी तशीच टाकून आम्ही समुद्राकडे पळत सुटलो. आवेग आवेग म्हणतात तो यालाच!!

चंद्र आता पश्चिमेकडे गेला होता. खाली काळशार पाणी त्यात चंद्रच प्रतिबिंब. लांब डोंगरावर काही दिवे लुकलुकत होते. बंदरावर काही जहाजं उभी होती. या सगळ्यावर चांदणं. या असल्या चित्रांचे फोटो काढायचे नसतात. या चित्रांची वर्णनं करायची नसतात. 'तो' जे दाखवेल ते आपण फक्त बघायचं असत. असल्या चित्रांची वर्णनं करायला शब्द पुरत नाहीत. कॅमेराचीहि तेवढी कुवत नसते. मी असले केविलवाणे प्रयत्न करत नाही. कोणीच करायचे नाहीत. जेवढ डोळ्यांनी पाहू शकतो तेवढ पाहिलं.

विष्णू खरच भाग्यवान. पहिल्यांदा समुद्र पाहिला आणि राजासारखा. किनाऱ्यावर आमच्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. कसलाही गलका नाही. गोंधळ नाही. शांत. बंदरावरची हालणारी जहाजं, चंद्राचं निथळणार प्रतिबिंब. त्या चित्राय सतत येणाऱ्या लाटांनी चैतन्य भरलं. ४ वाजले होते. पहाटेचा गार वर सुरु झालं होतं. सगळ अंग ठणकत होतं. त्या शांत मंद वाऱ्यांनी मला झोप लागली.

सकळी ६ वाजता आम्हाला जाग आली ती किनाऱ्यावर क्रिकेट खेळायला आलेल्या १०-१२ मुलांच्या गलक्यानी. मुलं मस्त वळून स्टंप ठोकून क्रिकेट खेळत होते. अंगावरची धूळ झटकत उठलो. रात्रीच्या थंडीचा मी जबरदस्त धसका घेतला. ऊन आल्याशिवाय मी गाडीवरच बसणारच नाही असं ठरवलं. सूर्य अजून उगवला नव्हतं. पण प्रकाश पसरला होता. रात्री पाहून झालेला समुद्र वेगळा आणि आता सकाळी पाहिलेला वेगळा. आम्ही मग काही वेळ पाण्यात जाऊन उभे राहिलो. खेळण्याच्या दुकानात गेल्यावर लहान मुलांचे चेहेरे कसे होतात, तसा विष्णूचा चेहरा झाला होता. अशात सात वाजले. सूर्यही उगवला होतं. आता अजून थांबणं परवडणार नव्हतं. थंडी अजूनही होतीच. पण आता निघाण्याशिवाय पर्याय नव्ह्ता. रात्री आम्ही दोघांनीही बरीच संयामानी गाडी चालवली. आता तसं संयम पाळून चालणार नव्हतं. याचं एकमेव कारण म्हणजे सकाळी लवकर घरी येतो असं बाबांना सांगितलं होतं. सातला समुद्राकडे आम्ही पाठ फिरवली.

रात्रभर झोप नाही, डोळ्यात वांर जाऊन जाऊन डोळे सुजलेले. रात्रीची जास्त झाल्यासारखे. प्रचंड चुरचुरत होते डोळे. परत येताना आम्ही अक्षरशः ३ तासात १५० किमी आलो. अजिबात संयम ठेवला नाही. सावध राहून, मस्त गाडी चालवत आलो. येताना मात्र संपूर्ण गाडी मी चालवली.  घरी पोचलो तर बाबांनी विचारलं, "काय रे, काय झालं डोळ्यांना?" आता काय सांगणार,

म्हणलो, '' अहो कुठे काय. झोपलो नाहीये ना रात्रभर!''

(ता.क. सर्व फोटो गूगल वरून घेतलेले आहेत. सर्वच नियोजन अचानक ठरल्यामुळे चांगला कॅमेरा आमच्याकडे नव्हता. मोबाईल सुद्धा खास नव्हता.) 

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....