Saturday, 4 June 2016

द 'गावसकर' मार्क

वेस्टइंडीजच्या तोफखान्याला तोंड देणारा 'लिटील' मास्टर
साल होतं १९८७. पाकिस्तानबरोबर भारताची कसोटी मालिका सुरु होती. एकूण पाच सामन्यांच्या मालिकेमधले पहिले ३ सामने अनिर्णीत राहिले होते. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ‘आपण न जिंकणे’ आणि ‘दुसऱ्यालाही जिंकू न देणे’ ही भारताची रणनीती असावी. जून १९३२ साली भारतीय क्रिकेटला कसोटीचा दर्जा मिळाला. तेव्हा पासून २०१५ पर्यंत भारत एकूण ४९५ कसोटी सामने खेळला आहे, त्यापैकी २१० सामने अनिर्णीत राहिलेले आहेत. यावरून जिंकण्याच्या एकूण प्रमाणापेक्षा सामना अनिर्णीत ठेवण्याचे प्रमाण जास्त होते असेच दिसते. सलग सर्वात जास्त कसोटी सामने अनिर्णीत राहिल्याची जी रेकॉर्ड्स त्या यादीत पहिली तीन स्थानं भारतानेच व्यापली आहेत. आता ज्या सामन्याची मी गोष्ट सांगतो आहे, ती १९८७ सालची पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळली जात होती. पहिल्यांदी फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघानी ३९५ धावा केल्या. त्यामध्ये सहाव्या क्रमांकावर येणारा ‘इजाझ फकी’ याने शतक केलं, त्याला साथ द्यायला इम्रान खानने ७२ धावा केल्या होत्या. पाच दिवसाच्या कसोटीमध्ये पहिले पूर्ण दोन दिवस पाकिस्तानच फलंदाजी करत होतं. भारताच्या गोलंदाजांनी एकूण १८७.३ इतक्या ओव्हर्स टाकल्या. तिसऱ्या दिवशी भारताचे दोन सलामीचे फलंदाज उतरले. पहिल्या दोन विकेट्स अगदी झटपट पडून गेल्या. पण स्ट्राईकवर येणारा फलंदाज एका बाजूने टिकून शांतपणे खेळत होता. त्यांनी अर्धशतक पूर्ण केले. आणि ‘इजाझ फकी’चा एक चेंडू मिडविकेटकडे फटकावला आणि ५७ धावांवरून ५८ धावांवर गेला. ती एक धाव आणि तो फलंदाज इतिहासात कायम कोरले गेले. ती धाव सुनील मनोहर गावसकर याला दहा हजार धावांपर्यंत घेऊन गेली.

१८७७ साली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटला सुरवात झाली आहे. सर डॉन ब्रॅडमन, जॅक हॉब्स, गॅरी सोबर्स, व्हिव रिचर्डस, ग्रॅहाम पॉलॉक,  जेफ्री बॉयकॉट, ग्रॅहाम गूच सारखे फलंदाज क्रिकेटला लाभले. पण गावसकर असा पहिला फलंदाज ठरला ज्यानी दहा हजार धावांचा टप्पा गाठला. शेवटच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर गावसकर लगेचच निवृत्त झाला. त्या बेंगलोर कासोटी सामन्याचीही गोष्ट अद्भुत आहे. पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानला केवळ ११६ धावा करता आल्या. भारताचा फिरकी गोलंदाज मणिंदर सिंग याने २७ धावांच्या बदल्यात ७ विकेट्स घेतल्या. पण विकेटच इतकी खराब झाली होती की फिरकी पुढेकोणीच टिकत नव्हतं. भारत सुद्धा केवळ १४५ धावा करू शकला. पण साधारण १९९२ पूर्वीचा पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा प्रबळ होता. दुसऱ्या डावात पाकिस्तानने २४९ धावा केल्या आणि भारताला जिंकण्यासाठी २२१ धावा हव्या होत्या. पाकिस्तानची गोलंदाजी नेहमीच जबरदस्त राहिलेली आहे. माझ्या एका मित्राला UPSC च्या मुलाखतीत विचारले होते की ‘समजा भारत पाकिस्तान अशी फाळणी झाली नसती तर काय झालं असत?’ त्यावर त्याने उत्तर दिलेली की जगात सर्वात बलाढ्य क्रिकेटची टीम भारताची राहिली असती. पाकिस्तानचे गोलंदाज आणि भारताचे फलंदाज. पण वासिक आक्रम, इक्बाल कासीम आणि तौसेफ अहमद आणि इम्रान खान असा जबरदस्त मारा असताना भारताची कच्ची फलंदाजी टिकेल कशी? एका मागून एक विकेट्स पडत होत्या. पण सलामीला आलेला गावसकर एका बाजूनी टिकून होता. गावसकरने २६४ चेंडू खेळून ९६ धावा केल्या. त्याच्यानंतरचा मोठा स्कोर म्हणजे अझरूद्दीनच्या २६ धावा हा होता. भारत सामना केवळ १६ धावांनी हरला. पण गावसकरने शेवटपर्यंत आशा मावळू दिल्या नव्हत्या.

ही सर्व बडबड आज करायचं म्हणजे १३९ वर्षाच्या इंग्लिश क्रिकेटच्या इतिहासात पहिला इंग्लिश फलंदाज ‘दहा हजार’ धावांच्या ‘गावसकर मार्क’ पर्यंत पोहोचला. त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये गावसकरने सर्वात प्रथम हा माईलस्टोन गाठला म्हणून या टप्याला ‘गावसकर मार्क’ असेच नावं पडले आहे.

'अॅलन बॉर्डर' च्या १०,००० विसरायला लावणारी लाराची २७७ ची इंनिग  
कसोटी दर्जा असलेल्या देशांपैकी अजून पाकिस्तानचा एकही खेळाडू इथपर्यंत पोहोचलेला नाही. न्युझीलंडचा नाही. पण भारताचे तीन जण या लिस्ट मध्ये आहेत. गावसकर, सचिन आणि राहुल द्रविड. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे सुद्धा तीन खेळाडू या यादीत आहेत. पहिला अॅलन बॉर्डर. सिडनी क्रिकेट ग्राउंड वर १९९३ साली ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान तिसरी टेस्ट सुरु होती. पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने स्टीव व्हॉंच्या शतकाच्या जोरावर आणि अन्य चार अर्धशतकं मिळून ५०३ धावा केल्या होत्या. त्या चार अर्धशतकांपैकी एक होतं अॅलन बॉर्डरच. बॉर्डरनी १८० चेंडू खेळून ७४ धावा केल्या. याचं डावात अॅलन बॉर्डरच्या दहाहजार धावा पूर्ण झाल्या. पण अॅलन बॉर्डरच्या दहा हजार धावा दुसऱ्या एका तरुण खेळाडूच्या जबरदस्त खेळीमुळे दुर्लक्षित राहिल्या का, ऑस्ट्रेलियाच्या ५०३ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचे सलामीचे दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले. वेस्ट इंडीजची स्थिती ३१-२ अशी होती. परंतु त्यानंतर सर रिची रिचर्डसन आणि कारकिर्दीतली केवळ पाचवी टेस्ट खेळणारा ब्रायन लारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी २९१ धावांची भागीदारी रचली. ब्रायन लारा याने २७७ धावा केल्या. १९९३ च्या दृष्टीने वेगवान समजल्या जाणाऱ्या ७४ च्या स्ट्राईरेटनी लारा खेळला होता.

या लाराने केवळ १९५ डावांमध्ये आणि फक्त १३ वर्ष आणि २५० दिवसांत दहा हजार धावांचा टप्पा पार केला. ज्या सामन्यात लारा इथेपर्यंत पोहोचला तो सामना मँचेस्टर, ओल्ड ट्रॅफोर्डवर होता. परंतु प्रत्यक्ष या सामान्यपेक्षा त्याचा आधीचा सामना जास्त इंटरेस्टिंग आहे. लॉर्डसवर झालेल्या याधीच्या टेस्ट मध्ये लाराला पहिल्या इंनिगमध्ये ११ आणि दुसऱ्या इंनिगमध्ये ४४ इतक्याच धावा करता आल्या. लाराला अजून केवळ ४ धावा हव्या होत्या. ४४ लाराला चुकीचा आउट देण्यात आलं. ड्रामा इथे संपत नाही. आधीचा प्लेयर आउट झाला, लारा खेळायला आला. पुढच्या फ्लिन्टॉफच्या पहिल्या चेंडूवर लेगबायची फोर गेली. लाराला केवळ चारच धावा हव्या होत्या. पण ‘बाईज’च्या धावा फलंदाजाला मिळत नाहीत. त्या टीमला मिळतात. पुढचे चार चेंडू लारा बीट झाला. आणि फ्लिन्टॉफच्या शेवटच्या बॉलवर लारा बोल्ड झाला. गावसकर मार्कसाठी अजून पुढच्या डावाची वाट बघावी लागणार. पुढच्या डावातही गिल्सच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू त्याला खेळायची संधी मिळाली, त्यावर त्याने ३ धावा पळून काढल्या पण तो ही चेंडू लेगबाय म्हणून ठरवण्यात आला. पुन्हा फ्लिन्टॉफ बॉलिंगला आला. पण पहिल्या चेंडूवर लाराने फोर मारली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला चौथा आणि वेस्ट इंडीजचा पहिला फलंदाज या ‘गावसकर मार्क’ पर्यंत पोहोचला. खर म्हणजे फ्लिन्टॉफच्या त्याचं ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर लारा आउटपण झाला. पण आता कदाचित समाधानाने आउट झाला असेल.

सौरव गांगुलीने वीरेंद्र सेहवागच्या कसोटीमधील निवडीवर सांगितलं होतं की, मी त्याला स्ट्राईक वर पाठवतो, कारण मला सामना जिंकायचा आहे. असा हा सेहवाग नावाचा राक्षस एकदा साउथ आफ्रिकेवर तुटून पडला होता. साल २००८, स्थळ ‘चेपॉक’. खरं म्हणजे आधी साउथ आफ्रिकेनी आपल्याला तसच धुतलं होतं. आपल्याकडे जसा सेहवाग होता, तसा त्यांच्याकडे ‘आमला’ होता, ग्राहम स्मिथ होता, मार्क बाउचर होता. असे सर्व एकत्र खेळून त्यांनी पहिल्या डावात ५४० धावा केल्या. पण सेहवाग सेहवाग आहे. त्याने ५४० धावांचा पाठलाग करताना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान त्रिशतक ठोकलं. हे सोप्प नाही. ‘आक्रमकता’ हा गुण काही ठराविक वेळासाठी टिकवून ठेवता येतो. ट्वेंटी२० मध्ये यशस्वी होण्याचे कारण तेच आहे. पण पूर्ण दिवस तो माइंडसेट टिकवून ठेवता येईल का? हो, सेहवागने करून दाखवलं. ह्या टेम्प्रामेंटबरोबर अजून एक अवघड गोष्ट म्हणजे समोर गोलंदाजीला बांगलादेश किंवा केनिय नव्हती. तर मखाय अँटीनी, डेल स्टेन, मॉर्ने मोर्केल, द ग्रेट जॅक कॅलीस. अॅलन बॉर्डरच्या दहा हजार धावा ज्या इंनिग मध्ये झाल्या, ती इंनिग लाराच्या खेळीमुळे जशी दुर्लक्षित राहिली तशीच सेहवागच्या या कत्तलखान्यामुळे अशीच एक इंनिग दुर्लक्षित राहिली. सेहवागबरोबर सलामीला आलेला ‘वासिम जाफर’ कसोटी क्रिकेटला साजेशी १६६ बॉलमध्ये ७३ अशी खेळी करून आउट झाला. वन डाऊनला ‘भारताचा एक सर्वोत्तम’ कसोटी प्लेयर खेळायला आला. राहुल द्रविड!! सेहवाग बरोबर दुसऱ्या विकेटसाठी द्रविडने २६८ धावांची भागीदारी रचली. सामन्याचा तिसरा दिवस संपताना सेहवाग ३०९ आणि द्रविड ६५ वर खेळत होते. चौथ्या दिवशी नवीन बॉल घेण्यात आला. आणि ब्रायन लाराचा ४०० चा विक्रम सुद्धा मोडू शकेल अशा स्टेजवर असलेला सेहवाग आउट झाला. ३१९ वर! (सेहवागचे त्रिशतक हे केवळ २७८ चेंडूत आलेलं आहे). सेहवाग आउट झाल्यावर सचिन तेंडूलकरसुद्धा लगेच आउट झाला. २९ चेंडूत २४ धावा करून सौरव गांगुली सुद्धा गेला. पण अभेद्य सह्याद्रीसारखा राहुल द्रविड उभा होता. द्रविडने २९१ बॉल खेळून १११ धावा केल्या. या द्रविडच्या इंनिगनेच द्रविडसुद्धा ‘टेन थाऊजंड’ क्लबमध्ये सामील झाला. जितक महत्वाच सेहवागच सर्वात वेगवान शतक आहे, तितकच अतिशय शांतपणे एका बाजूने टिकून राहणं सुद्धा तितकाच महत्वाचं आहे. आणि ‘सोने पे सुहागा’ म्हणजे ‘गावसकर मार्क’ला पोहोचणारा तिसरा भारतीय राहुल द्रविड ठरला.  

हा माझा सगळा जो खटाटोप सुरु आहे, त्याचं कारण ‘अॅलिस्टर कूक’ हा आहे. २००६ साली भारताविरूद्धच त्याची पहिली टेस्ट खेळला. नागपूरला झालेल्या त्या टेस्ट मध्ये एक अर्धशतक आणि एक शतक असा खेळला होता. करियरमधल्या पहिल्या टेस्टमध्ये कूकची ही कामगीरी होती. म्हणजे दहा हजार धावांचा टप्पा गाठायला कूकला केवळ दहा वर्ष लागली. इंग्लंड हे देश अजूनही इतर प्रकारांनापेक्षा कसोटी क्रिकेटला जास्त महत्व देतो. ते योग्यच आहे. ‘पीटरसन’ हा असाच ‘क्लासिकल टेस्ट प्लेयर’ मर्यादित शतकांच्या लीग्स खेळतो म्हणून त्याच्यावर करियर संपवण्याची वेळ आली. कदाचित पीटरसनच्या आयुष्यात अजून काही वर्ष कसोटी सामने खेळण्याचं भाग्य आलं असतं, तर कदाचित कूकच्या आधी पीटरसनच्या दहा हजार धावा झाल्या असत्या. पण वयाच्या भाषेत सर्वात तरुण खेळाडू, जो दहा हजार धावांपर्यंत पोहीचाला तो कूक आहे. या रेसमध्ये त्याने सचिनला सुद्धा मागे टाकलं. कोणतेही ‘रेकॉर्ड्स’ हे मोडण्यासाठीच असतात. ते जर अबाधित राहिले तर आपलं काही तरी चुकतं आहे असच मानलं पाहिजे. पण कूकला १२८ सामने किंवा २२९ डाव लागले हा टप्पा गाठायला. आमच्या गावसकरने केवळ २१० डाव खेळले आहेत. लारा, तेंडूलकर आणि पॉंटिंग यांना अनुक्रमे १९५ आणि १९६ डाव लागले आहेत. भारतात दर वेळेला ‘सचिन’च्या प्रलयंकारी आकड्यांमुळे अनेक खेळाडूंचे आकडे तितकेसे लक्षवेधी वाटत नाहीत. पण हे चूक आहे. राहुल द्रविड याने दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ २०६ डाव खेळले आहेत. वयाच्या भाषेत सर्वात तरुण ‘कूक’ असेल पण प्रत्यक्ष मैदानावर कूकपेक्षा वेगवान डावांमध्ये हा टप्पा गाठणारे अनेक जण आहेत. कुमार संगकाराने देखील १९५ डावांमध्ये हा विक्रम केलेला आहे. क्रिकेट या खेळात प्रत्यके आकडा काही ना काही सांगत असतो. १९५ डावांपेक्षा कमी डावांमध्ये हा विक्रम अजून कोणालाही करता आलेला नाही. पण सर्वात जास्त डाव ‘स्टीव्ह व्हॉं’ (२४४) आणि  अॅलन बॉर्डर (२३५) यांना लागले आहेत.

वरच्या सर्व बडबडीत चार महान खेळाडूंची नावं अजून मी घेतलेली नाहीत. यामध्ये रिकी पोंटिंग, महेला जयवर्धने, शिवनारायण चान्द्रपॉल आणि जॅक कॅलिस. या चौघांनी सुद्धा दहा हजार धावांचा टप्पा पार केलेला आहे. वर्षांच्या भाषेत सर्वात जास्त वर्ष शिवनारायण चान्द्रपॉलयाने घेतली. कारकिर्दीची एकूण १८ वर्ष खेळून शिवनारायण चान्द्रपॉल हा टप्पा गाठला आहे, पण गम्मत म्हणजे त्याने ‘स्टीव्ह व्हॉं’पेक्षा कमी डावांमध्ये हा विक्रम केला आहे. त्याने २३९ डाव खेळून हा विक्रम केला. ‘स्टीव्ह व्हॉं’ला सुद्धा हा टप्पा गाठण्यासाठी १७ वर्ष लागली. सचिनला १५ वर्ष लागली. द्रविडने मात्र केवळ ११ वर्षात हा टप्पा गाठला.

२०११ मध्ये सेंच्युरीयन, साउथ आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध श्रीलंका पहिली टेस्ट सुरु होती. पहिली फलंदाजी करताना श्रीलंकेनी केवळ १८० धावा केल्या. त्यामध्ये जयवर्धनेच्या ३० धावांचा समावेश होता. पुढच्या डावात बिकट सुरवात असताना जयवर्धने टिकेल असा खेळत होता. कॅलिसच्या एका ओव्हरमध्ये त्यानी सलग दोन फोर मारल्या. जयवर्धेन त्या दोन फोर मुळे ९९९९ धावांवर पोहोचला. त्याच ‘फोर-सिक्स’च्या अॅटिट्यूडमध्ये त्याने फटका मारला आणि ‘त्या’ एका धावेसाठी पाळला, तेव्हा कॅलिसने ‘डायरेक्ट थ्रो’ करून जयवर्धनेला रनआउट केलं. त्या एका धावेच्या मोहात त्याला अजून एका सामन्याची वाट बघावी लागली. दुसरी टेस्ट होती डरबन येथे, जयवर्धनेने नवव्या चेंडूवर एक धाव काढली आणि टप्पा गाठला. त्याने १४ वर्षात २१० डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकं आणि धावा यांच्या यादीत सचिन तेंडुलकर नंतर नंबर लागतो जॅक कॅलिस याचा. सचिनच्या ५१ कसोटी शतकानंतर जॅक कॅलिस याचा ४५ शतकांचा विक्रम आहे. सचिन तेंडूलकरच्या १५,९२१ धावांनंतर जॅक कॅलिसयाचा १३,२८९ धावांचा विक्रम आहे. जॅक कॅलिसने २१७ डाव खेळून हा टप्पा गाठला आहे. जॅक कॅलिसला हा टप्पा गाठण्यासाठी १३ वर्ष लागली. (टीप : हे सर्व वर्षांचे जे आकडे आहेत, ते खेळाडूच्या पहिल्या कसोटी पासून त्या कसोटी पर्यंत आहेत, ज्या सामन्यात त्यांनी हा टप्पा गाठला. अनेक खेळाडू त्यानंतरसुद्धा खेळत होते.)


उत्सवमूर्ती मात्र ‘अॅलिस्टर कूक’ हा आहे. वरती म्हंटल्याप्रमाणे कूक क्लासिकल प्लेयर आहे. दहा वर्षाच्या कारकिर्दीत कूक केवळ ९२ एकदिवसीय सामने खेळला आहे. ट्वेन्टी२० तर केवळ चारच. कारण कसोटी क्रिकेटहेच खरं क्रिकेट आहे. त्याच्या क्लासिकल असण्याचे एक जबरदस्त कारण उपलब्ध आहे. पुन्हा क्रिकेट मधले प्रत्येक आकडे काहीतरी नवीन सांगत असतात. कूकने त्याच्या कारकिर्दीत २२९ डावांमध्ये केवळ १० सिक्स मारल्या आहेत. हो तुम्ही बरोबर वाचलं. केवळ १० सिक्स!! (याच न्यायाने आमचा द्रविड, गावसकर सुद्धा तितकेच क्लासिकल ठरतात. द्रविडच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत २८६ डावांत त्याने केवळ २१ सिक्स मारल्या आहेत. गावसकरने सुद्धा केवळ २६) केवळ बेधुंद फटकेबाजी म्हणजेच क्रिकेट नव्हे. ‘रंनिग बिट्वीन द विकेट्स’ हे कसोटी क्रिकेटचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यातून खेळाडूचा फिटनेस, स्टॅमिना दिसतो. आपला मूळ विषय केवळ दहा हजार धावांचा सुरु आहे. पण २०१०/११ ची अॅशेस सिरीज ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. ‘अॅलिस्टर कूक’ने पाच सामन्यात मिळून १२७ सरासरीने दोन सेंच्युरी, एक डबल सेंच्युरी आणि तीन हाफ सेंच्युरी च्या जोरावर ७६६ धावा केल्या होत्या, एका सिरीज मध्ये!

आता दहा हजार धावांच्या यादीत आमचा गावसकर सर्वात खाली आहे. कोणत्याच खेळाडूची दुसऱ्या खेळाडू बरोबर तुलना करूच नये. पण गावसकर जेव्हा फलंदाजी करत होता, त्यावेळी क्रिकेटचे नियम फलंदाजीला अनुकूल नव्हते. समोरून गोलंदाजीला वेस्ट इंडीजचा तोफखाना होता. ऑस्ट्रेलियाचा राक्षस डेनिस लिली होता. इम्रान खान होता. तिकडे इयान बॉथम होता. (खर तर इंग्लिश विकेट ही कधीच फलंदाजांना अनुकूल राहिलेली नाही, त्यामुळे कूकच कौतुक आहेच.) पण शेवटी माझं भारतीय मन आद्य गुरुला मानत राहत. एकदिवसीय सामन्यात एका इंनिगआमध्ये २०० धावा होऊ शकतात हे जसं सचिनने दाखवून दिलं. तसंच कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा होऊ शकतात हे गावसकरने दाखवून दिलं. त्याआधी सोबर्स, ब्रॅडमन,  जॅक हॉब्स, व्हिव रिचर्डस, ग्रॅहाम पॉलॉक, सारखे खेळाडू होतेच की. पण गावसकर ‘हेल्मेटविना’ बॅट घेऊन तोफखान्याला तोंड द्यायला निघाला आणि त्याने बाकीच्यांना जमलं नाही ते करून दाखवलं.

या सर्व अभ्यासातला सर्वात मोठा विष्णूचा आहे. तो लिहित नाही (कारण त्याला माझ्याइतका वेळ नाही). पण त्याचा मेंदू वापरून मी मात्र लिहितो. क्रिकेट या खेळातील सौंदर्याची इनसाईट म्हणजे विष्णू आहे.
-       मुकुल रणभोर
-       9021423717


No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....