घोल ते रायगड
असे आम्ही चालत गेलेलो एकदा. तेव्हाचं सगळं सांगून झालाय. पानशेतच्या पुढे
पानशेतचा जलाशय शेजारी ठेवून २८ किमी वर ते घोल नावाचं गाव आहे. तिथून पुढे
सह्याद्री उतरत जायचं आणि मग पायथ्याला गेलो कि तिथून दहा-बारा किलोमीटर वर रायगड
आहे. असा एकूण वीस-पंचवीस किमीचा रस्ता असेल. पुण्यातून जाणारी एसटी घोलमध्ये
संध्याकाळी साडेसात नंतर पोहोचते. त्यानंतर पुढचा रस्ता पार करणं आवधड आहे, म्हणून
आम्ही घोलमध्येच मुक्काम केला होता. सकाळी उठून बेसिक आवरून आम्ही बसलो. तोंग
धुतलं, थोडाफार खाल्लं. तोपर्यंत गावाला जाग येत होती. गावातली माणसं गावात आलेले
नवीन पाहुणे बघायला बाहेर पडत होती. त्यातले काही धीर करून बोलायचा प्रयत्न करत
होती. आम्ही अर्थात पाहुणे होतो. पुढे जायचा रस्ता आम्हाला माहिती नव्हता. आणि
प्लॅन तोच होता, कि गावात कोणालातरी पुढचा रस्ता विचारायचा आणि पुढे चालायला
लागायचं.. कुठून आलात, काय करता वगैरे गप्पा झाल्यावर आम्ही ‘रायगड’ ला जायचा
रस्ता विचारला. ते आधी ते म्हणाले ‘अहो खूप रस्ता चुकला तुम्ही, इकडे घोलकडे कुठे
आलात?’ आमचे चेहेरे चायनीजच्या वर्गात बसल्यासारखे झाले, ते पाहून ते आपणहून
म्हणाले, ‘अरे महाडला जायचं पुण्यातून थेट एसटी आहे. तिथून पुढे गाड्या मिळतात
त्यांनी जायचं.. इथून चालत जावं लागेल!’ मग मुद्दा लक्षात आला, त्यांना म्हणलो आहो
चालतच जायचय. त्यांनी हात कपाळावर मारून घेतला, म्हणाले ‘अहो कशाला जाता चालत?
आरामात गाडीनी जायचं, पुढे ‘रोपवे’ची सुद्धा सोय आहे. चार मिनिटांत किल्ल्यावर
पोहोचतो...’ मग आमचा चालतच जायचा पक्का निर्धार आम्ही बोलून दाखवल्यावर त्यांनी
तुमची हौस असेल तर जा! असं म्हणून आम्हाला रस्त्याला लावलं.
माझं
रत्नागिरी जिल्ह्यात छोटंसं गाव आहे. गावाचं नाव ‘पन्हळे’. खरं म्हणजे जे आहे
त्याला गाव म्हणणं म्हणजेच चुकीच आहे. गावाला साजेसं ते मोठ नाही. अगदीच माणसं
राहतात म्हणून त्याला गाव म्हणायचं. पुण्यातून तिकडे जायचा सर्वात जवळचा रस्ता म्हणजे
मुंबई बंगलोर हाईवेवरून आंबा घाटातून खाली उतरणे. तो खाली मुंबई गोवा हाईवे जिथे
लागतो तिथून आमचं गाव पाच-सहा किलोमीटरवर आहे फक्त. पण आम्ही हौशी!! सरळ रस्त्यानी
गेलो तर कसं चालेल? म्हणून आम्ही वेगळ्या रस्त्यानी गेलो. तिघंच जणं. मी आणि माझे
दोन भाऊ. रात्रीच्या गाडीने कोल्हापूरला गेलो. पहाटेच्या गाडीनी आंबा घाटाच्या
अलीकडे पोहोचलो. गावाचं नावही आंबाच. आम्हाला आंब्यात पोचायला तरी सात वाजले. तिथून
विशाळगड फक्त १८ किलोमीटर. सकाळची पहिली वडाप पडकून गेलो विशाळगडला. वरंध किंवा
अंबेनळी किंवा ताम्हिणी किंवा आंबोली किंवा कशेडी हे घाट कायम सर्वात आवघड म्हणून
सांगितले जातात. असे जे कोण सांगतात त्यांनी हा आंबा ते विशाळगड रस्ता पाहिलेला
नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुफान जंगल. आणि यु पेक्षा मोठी वळणं त्यात चढ
किंवा उतार. अर्थात अशी वर्णनं करता येत नाहीत. ती करायची सुद्धा नसतात. पण ते
प्रकरण सोप्प नव्हतं. ती इमेज घेऊन विशाळगडावर गेलो. तिथे शिवाजी राजांचा गौरवशाली
इतिहास किल्ल्यावरील आवशेष पाहून आठवावा असं काहीही नाही. रीतसर वस्ती किल्ल्यावर
आहे. सिमेंट कॉंक्रिटमध्ये बांधून काढेलेले दोन मोठे दर्गे आहेत. पिराला कोंबडी
लागते, ती कापण्यासाठी मोठी प्रशस्त जागा आहे. ती जागा सुद्धा रस्त्याला लागुनच
आहे. तेव्हा नाक बंद करून आम्ही चालत राहिलो. आम्हाला जायचं होतं माचाळला. हे
रत्नागिरी जिल्ह्यातलं महाबळेश्वर आहे. लोहगड किंवा विसापूर सारखी विशाळगडावर वरती
भरपूर जागा आहे. गडाचा आवका बराच मोठा आहे. तो सगळा पार करून कोकणाच्या टोकाला
आम्ही पोहोचलो.
माझा असा
अनुभव आहे कि जिथे जिथे आम्हाला रस्ता माहिती नाही अशी वेळ येते तेव्हा आम्हाला जिथे
जायचं तिथेच जाणारा एक माणूस भेटतो. हे अनेकदा घडलं आहे. राजगड – तोरणा गेलो होतो
तेव्हा सुद्धा पाव रस्ता आमचा पार करून झाला आणि आम्ही रस्ता चुकलो. तेव्हा
आम्हाला सांगणारा एका माणूस भेटला होता. राजमाचीवरून कोंडण्याच्या लेण्याबघायला
चाललो होतो तेव्हा असाच माणूस भेटला होता. असा आम्हाला विशाळगडावर पण भेटला. तो हि
माचाळलाच चालला होता. पायात स्लीपर, एका हातात काठी, हाफ पँट, अंगात निळा पण फेड
पडलेला शर्ट, डोक्याला फडक बांधून एकही अक्षर न बोलता तो आमच्या पुढे चालत होता.
विशाळगडाचा डोंगर संपतो तिथे साधारण दीडशे-दोनशे फुट डोंगर उतरायचा आहे. आणि लगेच
तेवढाच माचाळचा डोंगर चढायचा आहे. तो टप्पा सोप्पा नाही. पावसाळा संपून आता भरपूर
दिवस उलटून गेले, वातावरण कोरडं सुद्धा होऊन गेलं. आता तो कोरडा पडलेला मुरूम
वाटेवर उतरलेला असतो. तो पक्का नसतो. त्याचा कोणताही भरवसा देता येत नाही. असा एक
तीव्र उतार आणि तेवढाच तीव्र चढ चढून आम्ही आलो. उन तापायला सुरवात झालीच होती.
इथून ते माचाळ गाव दिसायला लागतं. तरी अजून ते अंतर लाब होतं. पण गाव जवळ आलं आहे
याचा तरी अंदाज आला..
‘व्हिलेज व्हिजीट’
नावाचा एक प्रकार पुण्यामुंबईकडे चालतो. कॉस्मोपॉलिटिन वातावरणात वाढलेली मुल
मिळून खेडं कसं असतं हे बघायला जातात, जमिनीवर मांडी घालून जेवायचा अनुभव घेतात
वगैरे. असा दोन वर्षापूर्वी एक व्हिलेज व्हिजीटच नियोजन केलं होतं. आणि व्हिजीट
साठी खडकवासला धरणाच्या पुढंच गाव खानापूर निवडलं होतं. तेव्हा माझ्या डोक्यात आलं
कि आमच्या सह्याद्रीत अशी कित्येक गावं वस्त्या आहेत जिथे कच्चा सुद्धा रस्ता जात
नाही. रोजचं ट्रेकिंग करूनच लोकांना आपल्या घरी जावं लागतं. आणि या स्थिती पासून
आपण किती अनभिज्ञ आहोत. माचाळ हे गाव असच आहे. पठारावर वसलेलं. आम्ही गेलो तो दिवस
२६ जानेवारीचा होता. त्या गावात शाळा होती, तिथे झेंडावंदन करून झालं होतं. मला
राहवेना, मी त्या शाळेचा नि झेंड्याचा एक फोटो काढून ठेवला. जिथे रोजचं जगणं हाच
प्रश्न आहे तिथे सुद्धा लोकं कर्तव्य विसरत नाहीत. माचाळच्या त्या पठारावर बिबट्या
किंवा इतर हिंस्त्र प्राणी सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण
आजूबाजूला जंगल क्षेत्र आहेच. पण इतक रम्य गाव मी पाहिलेलं नाही. इतक शांत गाव मी
पाहिलेलं नाही. पुण्यात सुद्धा बघायला मिळणार नाही इतक निर्लेप हास्य मी तिथल्या
मुलांच्या चेहे-यावर पाहिलेलं आहे. मोबाईलला रेंज नाही, जीओ वगैरे तर नाहीच नाही,
पण मी एकही घरावर डिश अँटेना पहिला नाही. तरीही मुलं हासत होती.
माचाळ गाव
पार करून आम्ही पुढे आलो. अजून पठार संपलेलं नव्हतं. काम करत बसलेल्या बायकांनी
पुन्हा आम्हाला योग्य तो रस्ता सांगितला. आम्ही वेगळ्याच रस्त्यानी पुढे निघालो
होतो. चागला बाराचा सूर्य तळपत होता. पठार जिथे संपत तिथे जिवंत पाण्याचा एक झरा
होता. गार पाणी थोडं तोंडावर मारलं.. आता पठार संपलं आणि खाली कोकण दिसायला सुरवात
झाली. आता तो संपूर्ण डोंगर उतरून खाली जायचं होता. फार वेळ न घेता आम्ही चालायचा
सुरवात केली. रस्ता असा काही होता कि वाटेवर डोंगराची सावली येत होती. त्यामुळे
थेट उन्हाचा तडाखा बसत नव्हता. चागलं तासाभराच्या पायपीटीनंतर आम्ही एका गावात
पोहोचलो. अजून डोंगर पूर्ण उतरून झालेला नव्हता. निम्माच झालेला. तिथे सुद्धा शाळा
होती, तिथे सुद्धा झेंडावंदन झालं होतं. या गावातल्या लोकांना कोणताही
किराणामालाचं समान भरायचं असेल तर डोंगर चढून माचाळ, तिथून विशाळगड तिथून पुढे
आंबा. इतका जवळ जवळ ३५ किलोमीटरचा प्रवास करून वर घाटावर यावं लागतं किंवा डोंगर
उतरून ‘नावे’ इथपर्यंतचा प्रवास करून यावं लागतं. आणि हो अशी गावं केवळ आफ्रिकेत
नाहीत. आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपल्यापासून जवळ.. त्या गावात खास कोकणी पद्धतीच
एक महादेवच मंदिर होतं. थोडं थांबलो. कोकणात आलो होतो त्यामुळे उन्हाबरोबर घामही
वाढायला लागलेला. पुन्हा चालायला सुरवात केली. ते हि माचाळ इतकंच रम्य होतं. पण हे
आपल्याला रम्य दिसतं, कारण आपल्याला तिथे रोज राहायचं नाही. दुरून आपण पाहतो छान
म्हणतो आणि निघून जातो.. तसेच आम्ही पण निघून गेलो.
डोंगराच्या
पायथ्याला आलो. आता डांबरी रस्ता सुरु झाला होता. आमच्या ट्रेक मधला रोमान्स्
संपून गेला होता. पण आता पुढचे सात आठ दिवस इथे कोकणात घालवायचे आहेत, या आशेवर मी
चालत राहिलो. उन आणि दमट हवा यामुळे खूप थकून गेलो. खूपच थकलो. एका ठिकाणी
रस्त्यातच बसलो आणि जेवलो. येणारी जाणारी माणसं एलियन कडे बघावी तसे बघत होते. पण
आम्ही हौस संपत नाही. हौस संपत नाही, ती कायम आहे!!
No comments:
Post a Comment