Monday, 17 August 2015

छत्रपती शिवाजी महाराज – जीवनरहस्य

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव : छत्रपती शिवाजी महाराज – जीवनरहस्य 
लेखक : नरहर कुरुंदकर
प्रकाशक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन, पुणे
किंमत : ६० रुपये
पृष्ठ संख्या : ६०


            छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनरहस्य आणि हिंदवी स्वराज्याच्या यशामागचे रहस्य उलगडणे हाच या पुस्तकाचा हेतू आहे. आणि कुरुंदकरांनी केवळ ६० पानांत हे मांडले आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्याकडे पाहण्याचा एक सर्वस्वी वेगळा दृष्टिकोन अगदी थोडक्यात पण समर्पक शब्दांत मांडला आहे.
            नरहर कुरुंदकरहे नांदेडस्थित आध्यापक होते. लेखक व्याख्याते, इतिहासकार आणि एक थिंक टँक. नावावर एकही पुस्तक नसतानामराठवाडा साहित्य संमेलनाचेअध्यक्षपद भूषवलेला हा माणूस. वयाच्या केवळ ५० व्या वर्षी त्यांचे आयुष्य संपले. मृत्यू आला तोही औरंगाबादला व्याख्यानासाठी स्टेजकडे जाताना. इतिहासाकडे किंवा घडणाऱ्या कोणत्याही घटनांकडे पाहण्याचा एखाद्याचा दृष्टिकोन किती वेगळा असू शकतो ह्याचे कुरुंदकर हे एक उत्तम उदाहरण आहेत. ते स्वतःला राष्ट्र सेवा दलाचे स्वयंसेवक मानत. त्यामुळे पूर्ण निधर्मी आणि नास्तिक. पण भारतातील समाजवाद्यांना जे जमले नाही ते कुरुंदकरांना साधले असावे असे दिसते. कारण मध्ययुगात आणि हिंदवी स्वराज्यात सर्व गोष्टींवर धर्माचा पगडा होता. शिवाजी महाराज हिंदू धर्माचे अभिमानी आणि हिंदू पदपातशाही निर्माण करणारे होते, ही गोष्ट ते इतर समाजवाद्यांसारखी झटकून टाकत नाहीत तर निर्मळ मनाने मान्य करतात.
            हिंदवी स्वराज्याची स्थापना ही इतिहासातील एक घटना होती. शिवाजी हे काय इतिहासातील एकटेच राजे नव्हे. शिवाजींच्या आधीही राजे झाले, नंतरही झाले. आणि राज्याभिषिक्त सुद्धा अनेक राजे इतिहासात झाले आहेत. त्यामुळे राज्याभिषेकाला नाटकीमहत्त्व देण्याचे काही कारण नाही. इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये दाखल होण्यासारखे शिवाजी महाराजांच्या चरित्रात काय आहे? राज्यव्यवहारकोशनिर्माण केलेला इतिहासातील शिवाजी हे पहिले राजे आहेत. राज्याभिषेकामुळे हिंदवी स्वराज्याला अखिल भारतीय महत्त्व प्राप्त झाले असले तरी ते राज्याभिषेकाच्या पूर्वीच झालेले होते. मराठी भाषेवर आणि संस्कृतीवर झालेले यवनी भाषेचे आक्रमण थोपवण्याचा प्रयत्न म्हणजे राज्यव्यवहार कोशआहे. त्यामुळे राज्याभिषेक असो किंवा अफजलखानाचा वध असो, ह्या घटनांना नाटकी महत्त्व देण्याचे काही कारण नाही, असे कुरुंदकर म्हणतात.
            तोपर्यंतच्या इतिहासात लढाईचे ठिकाण आणि वेळ ठरवण्याचा हक्क कोणताच एतद्देशीय राजा बजावू शकला नव्हता. स्वराज्यावरील पहिले आक्रमण १६४८ साली झाले. तिथून पुढे १६५९ पर्यंत कोणतेही मोठे आक्रमण स्वराज्यावर होऊ शकले नाही कारण शिवाजींनी ते होऊ दिले नाही. १६४८ ची पुरंदची लढाई राजे जिंकलेले असून कोंढाणा राजांनी आदिलशहाला देऊन टाकला. त्यामुळे आदिलशहाने शिवाजी घाबरला आहे असा तर्क करून शिवाजी महाराजांकडे दुर्लक्ष केले. हेच राजांना हवे होते. आणि म्हणूनच १६४८ ते १६५८ ही दहा वर्षे राजांनी कोणतीही मोहीम हाती घेतली नाही. या काळात त्यांनी न्यायव्यवस्था सुधारली. मावळची व्यवस्था लावली, वतनदारांचा बंदोबस्त केला, स्त्रियांना सुरक्षिततेची हमी दिली. सर्व जातीच्या लोकांना एका ध्येयासाठी जगण्याची आणि वेळ पडली तर मारण्याचीही आणि मरण्याचीही प्रेरणा दिली. खरे म्हणजे १६४८ नंतर लगेचच अफजलखानाची स्वारी येऊ शकली असती, पण ती कधी यावी याच्या सर्व दोऱ्या शिवाजी राजांनी आपल्या हातात ठेवल्या होत्या. अशी एक वेळ आली की अफजलखान कर्नाटकच्या मोहिमेत गुंतला होता अणि विजापूरला आदिलशहा मरणासन्न अवस्थेत होता. अशा परिस्थितीत आदिलशहा शिवाजी विरुद्ध कोणतीही मोहीम हाती घेऊ शकत नव्हता. या परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी राजांनी जावळीवर स्वारी केली. म्हणजे आदिलशाही विरोधातील लढाईची वेळ शिवाजी महाराजांनी ठरवली.
            नाटकी महत्त्व का द्यायचे नाही, तर महत्त्व अफजलखानाला मारण्याला नसून हक्क बजावण्याला आहे. महत्त्व वधाला देऊन शिवाजी राजे आनंदात राहिले असते तर कदाचित इतिहासाने त्यांची नोंद घेतली नसती. अफजलखान वधातून विजापूर सावरायच्या आत पन्हाळ्यापर्यंतचा मुलूख शिवाजीराजांनी जिंकला याला महत्त्व आहे. त्यामुळे फक्त खानवधाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊ नये असे कुरुंदकर म्हणतात. राजांना हे सुद्धा पक्के माहिती होते की विजापूर आपला सर्वात मोठा शत्रू नाही तर सर्वात मोठा शत्रू दिल्लीश्वर औरंगजेब आहे. खानवधाची बातमी दिल्लीत पोचली की दिल्लीश्वराची स्वारी होणार हे माहिती असल्यामुळे त्यापूर्वीच जावळी जिंकून मोठ्या फौजेशी लढण्याचे सामर्थ्य त्यांनी निर्माण करून ठेवले होते. म्हणजे राजे एकाच वेळी विजापूर आणि दिल्ली यांच्याशी झुंज घेत आहेत पण पूर्ण तयारीनिशी. महत्त्व आणि यशाचे रहस्य यात आहे, असे कुरुंदकर म्हणतात.
            समर्थ रामदास शिवाजी राजांचे गुरू होते का नव्हते, याविषयी हल्ली वाद सुरू आहे. कुरुंदकरांचे म्हणणे आहे की ते राजांचे गुरू होते का नव्हते हा मुद्दा खूपच गौण आहे. दोघांचीही कार्यक्षेत्रे वेगळी आहेत आणि त्यांना एकमेकांच्या मर्यादांचे भान सुद्धा आहे. हिंदवी स्वराज्य असावे ही भावना, स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करण्याचे काम शिवाजी महाराज करू शकले नसते आणि प्रत्यक्ष राज्य स्थापनेचे काम समर्थ करू शकले नसते. शिवाजी राजांच्या जन्माच्यापूर्वीपासून समर्थ भारतभर ही भावना आणि प्रेरणा निर्माण करत फिरत होते. १६४८ मध्ये कोणालाही याची शाश्वती नव्हती की स्वराज्य स्थापन होईल. तरीसुद्धा बाजी पासलकर, नेताजी पालकर, येसाजी कंक, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो या मंडळींमध्ये स्वराज्याची प्रेरणा निर्माण करण्याचे काम समर्थांनी केले आहे. पण या मंडळींना प्रत्यक्ष राज्यस्थापनेमध्ये सहभागी करून घेतले शिवाजी राजांनी. पुरंदरचा तह हा शिवाजींच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा पराभव आहे. मिळवलेले बहुतेक सर्व राज्य गेले. राजा कैदेत पडला. तरी लोकांचा धीर आणि विश्वास कमी झाला नाही, याचे श्रेय जितके राजांचे आहे तितकेच समर्थांचेही.
            शिवाजी राजांचे ५० वर्षांचे संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर असल्यामुळे आपण असे म्हणतो की तोरणा जिंकणे ही एक महत्त्वाची घटना होती, कारण ते अनुप्रासात बसते (तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले)! पण कुरुंदकर म्हणतात की तोरणा जिंकणे ही दुय्यम घटना होती. मोरोपंत पिंगळ्यांसारखा सामान्य ब्राम्हण, अण्णाजी दत्तोसारखा दूर मराठवाड्यातील एक पोरगा, हंबीरराव किंवा तानाजीसारखा एक सामान्य शेतकरी हे महान क्रांतीचे सामर्थ्यशाली आधार निर्माण करणे हे खरे स्वराज्याचे तोरण होते. प्रत्येक अत्याचारी पुरुषाच्या अवयवाचा शिवाजींनी पाडलेला तुकडा त्यांना दहा निष्ठावंत उभे करून देत असे. स्वराज्याचे खरे तोरण मावळच्या व्यवस्थेत बांधले जात होते. शिवाजी महाराजांच्या यशाचे खरे रहस्य त्यांनी निर्माण केलेल्या ध्येयनिष्ठेमध्ये आहे. त्यापूर्वी राजा मारला गेला की सैन्ये आपोआपाच संपत असत. शिवाजींनी शिकवले की, राजासाठी नव्हे, तर ध्येयासाठी लढायचे. सिंहगडची लढाई तानाजी मालुसरे पडल्यानंतर जिंकलेली आहे. आणि त्यातच खरे रहस्य आहे. १६४५ साली पुकारलेले हिंदवी स्वराज्य नव्हे, अफजलखान वधाने सिद्ध झालेले हिंदवी स्वराज्य नव्हे, खरे म्हणजे राज्याभिषेकानंतर अस्तित्वात आलेलेसुद्धा स्वराज्य नव्हे. औरंगजेबासारख्या बलाढ्य सेनापतीशी २७ वर्षे कडवी झुंज देऊन त्यातून उरलेले खरे हिंदवी स्वराज्य आहे. आणि त्यामागची खरी प्रेरणा शिवाजी महाराज ही आहे. औरंगजेब शिवाजी महाराजांना पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानत होता याचे महत्त्वाच कारण काय? काबूलपासून आसामपर्यंत आणि काश्मीरपासून तंजावरपर्यंत पसरलेल्या प्रचंड साम्राज्याचा मुख्य शत्रू शिवाजी असायचे कारण काय होते? दीड जिल्ह्यांच्यासुद्धा नसलेल्या स्वराज्याकडून औरंगजेबाला काय त्रास होता? शिवाजीकडे ना पैसा, ना सैन्य , ना युद्धसामग्री. तरी शत्रू क्रमांक एक का?? याचे कारण शिवाजीने सामान्य शेतकऱ्यांच्या मनात पेटवलेला स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा मंत्र. जो समाज एखाद्या मंत्राने किंवा विचारांनी भारलेला असतो त्यांच्यामध्येच इतिहास घडविण्याची ऊर्मी असते आणि अशी पेटलेली निष्ठावान माणसे हेच शिवाजी महाराजांच्या यशाचे खरे रहस्य आहे.
            कुणीही नेता असो किंवा नसो, हे माझे राज्य आहे, ते मला टिकवलेच पाहिजे या जिद्दीने मध्ययुगात भारतीय जनता एकदाच लढली, ती हिंदवी स्वराज्यासाठी. मध्ययुगासारख्या कालखंडात जेव्हा जनतेला वाटणारे राज्य निर्माण होते त्यावेळी या राज्याचा बाह्याकार मध्ययुगीन राजेशाहीचा राहिला तरी त्या राज्याचे अंतरंग वास्तवता खऱ्या लोकशाहीची होऊन जाते. म्हणूनच कोणत्याही शतकातील स्वातंत्र्याकांक्षेचे शिवाजी महाराज हे प्रतिनिधी ठरले.
            कुरुंदकर यांच्या मते शिवाजी महाराजांच्या यशाचे रहस्य त्यांच्या राज्यव्यवस्थेत होते. ते निश्चितपणाने हिंदवी स्वराज्य होते आणि म्हणूनच सर्व धर्मांचा त्यात सन्मान होता. त्याची नैतिक बैठक निर्दोष होती. रावणाने सीता पळवली याची तक्रार राम तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याने असे एकही कृत्य केलेले नसते. धार्मिक आक्रमणाला उत्तर उलट धार्मिक आक्रमण नसून सर्वधर्मसमभाव हेच त्याचे उत्तर असू शकते. म्हणून स्वराज्यात मशिदींचेही स्थान आदराचे होते. मौलवींनाही आदराचे स्थान होते. समकालीन राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात जो वाद सुरू असतो की शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला हिंदवी स्वराज्य म्हणणे योग्य आहे का? किंवा शिवाजी महाराजांना गोब्राम्हणप्रतिपालकम्हणणे योग्य आहे का? याचे उत्तर लेखकांनी दिलेय. ते म्हणतात, ‘शिवाजी महाराजांनी जाहीरपणे आणि पूर्ण विचाराअंती स्वतःचा राज्याभिषेक वेदमंत्रांनी संपन्न करून घेतला. हा पुरावा पुरेसा नाही का? आणि तसे केल्यामुळे त्यांना गोब्राम्हणप्रतिपालक असलेच पाहिजे, कारण ती हिंदू धर्माची प्रतीके आहेत.’ शिवाजी महाराजांच्या सर्व प्रेरणा आध्यात्मिक असल्यामुळे सूडया भावनेला जागाच नाही. आणि म्हणूनच ते चाणक्याने सांगितल्याप्रमाणेउपभोगशून्य स्वामीहोऊ शकतात, ‘श्रीमंत योगीहोऊ शकतात. शिवाजी म्हणजे नुसते युद्ध नाही, शिवाजी म्हणजे नुसते हौतात्म्य नाही. शिवाजी म्हणजे नव्या व्यवस्थेचा आग्रह आहे. आज्ञापत्रात म्हटले आहे की, राज्य असे असावे की ते चालवताना मागच्या सत्तेची आठवण होता कामा नये.
            नव्या व्यवस्थेचा आग्रह म्हणजे सुलतानशाहीपेक्षा, मोगलांपेक्षा चांगल्या व्यवस्थेचा आग्रह. शिवाजी म्हणजे युद्धाचा काळ, वेळ आणि स्थळ ठरवण्याचा हक्क मागणारा आणि बजावणारा. हे हिंदवी स्वराज्याचे खरे रहस्य आहे


No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....