Friday, 11 November 2016

‘दबिक़’ मध्ये इस्लामिक स्टेट (भाग – ३)

सारांश ‘दुसऱ्या’’ अंकाचा


प्रस्तावना –

‘दबिक़’ या इस्लामिक स्टेटच्या मासिकाची सर्व पार्श्वभूमी आपण पहिल्या लेखात पहिली. दुसऱ्या लेखात ‘दबिक़’चा पहिला अंक कशा संदर्भात आहे, हे आपण पाहिलं. केवळ एका अभ्यासाची सुरवात करून देणे हाच माझा हेतू आहे. आतापर्यंत एकूण १५ अंक प्रकाशित झाले आहेत. सर्व अंकांची ओळख करून देणे हा माझा हेतूच नाही. इस्लामिक स्टेट सारखी एक दहशतवादी संघटना ‘दबिक़’ नावचे मासिक प्रकाशित करते आणि त्यातून आपले हेतू, ते साध्य करण्याचे मार्ग सांगते, ह्याची जाणीव मराठी वाचकांना व्हावी इतकाच माझा हेतू आहे. ह्या लेखात आपण त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकाबद्दल वाचणार आहोत. ‘द फ्लड’ (The Flood) ही दुसऱ्या अंकाची कव्हर स्टोरी आहे. हा अंक २९ जुलै २०१४ रोजी प्रकाशित झाला. ‘द फ्लड’ म्हणजे काय ते पुढे पाहूच, पण ‘दबिक़’ हे मासिक ज्या प्रमाणे बहुतेक सर्व जागतिक भाषांमध्ये प्रकाशित होते. त्याप्रमाणे फक्त ‘फ्रेंच’ भाषेत इस्लामिक स्टेट ‘दबिक़’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित करते. आणि आताच्या ‘इस्तंबूल’चे ओट्टोमान साम्राज्यातील नाव ‘कॉंस्टॅंटिनोपल’ या नावानी फक्त ‘तुर्की’ भाषेत एक मासिक प्रकाशित करते. अर्थात त्या देशाशी संबंधित सर्व महत्वाच्या घडामोडी, मुद्देच त्या आवृत्तींमध्ये समाविष्ट आहेत. या दोघांच्या तुलनेत ‘इंग्लिश’ मध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘दबिक़’ची व्यापकता मोठी आहे. जगातील अनेक वेगवेगळ्या विषयांवर यात लेख आहेत. त्याचा पानांचा पसारा जास्त मोठा आहे. अर्थात एकाच संस्थेच्या तीन वेगळ्या आवृत्ती असल्यानी मजकुराच्या संदर्भात फारसा फरक पडणार नाही. तीनीही मासिके ‘इस्लामिक स्टेट’ च्या ‘अल-हयात’ या मिडिया संस्थेतर्फेच प्रकाशित केली जातात.

‘द फ्लड’ या अंकात दोन महत्वाच्या ऐतिहासिक घटना आणि त्यांचे आताचे आविष्कार समाविष्ट केलेले आहेत. या अंकात दोन महत्वाचे लेख त्या संदर्भात आहे. पहिला आहे ‘It’s either the Islamic State of The Flood’ आणि दुसरा आहे ‘flood of Mubahalah’ (मुबाहाला). सर्व अंकांप्रमाणे याही अंकाच्या अनुक्रमणिकेच्या वर ‘दबिक़’शी संबंधित ते ‘हादीस’ दिलेलं आहे.

अंकाची प्रस्तावना –

वर उल्लेख केलेल्या दोन महत्वाच्या लेखांशिवाय अंकातील तिसरी महत्वाची गोष्ट आहे अंकाची प्रस्तावना. (पुढे वाचाल ते सर्व विचार इस्लामिक स्टेटचे आहेत, माझे नाहीत) अल्लाहच्या कृपेनी इस्लामिक स्टेटची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे, त्यामुळे महत्वाच्या काही बाबींवर इस्लामिक स्टेटच्या नेत्यांनी वाचकांना काही संदेश दिला आहे. त्यामध्ये महत्वाचे चार मुद्धे आहेत.
  • प्रत्येकाचे (मुसलमान) म्हणून पहिले कर्तव्य ‘हिजरत’ करणे हे आहे. ती हिजरत ‘दर-उल-कुफ्र’ ते ‘दर-उल-इस्लाम’ अशी असली पाहिजे. मुसलमानांनी आपापले काफिर देश सोडून इस्लामच्या भूमीकडे स्थलांतर केले पाहिजे.
  • आपल्या सर्व कुटुंबासहित लोकांनी ‘इस्लामिक स्टेट’ म्हणजे इस्लामच्या भूमीकडे प्रयाण केले पाहिजे. यामुळे अल्लाहच्या कार्यात तुम्हाला सहभागी होता येईल.
  • ‘मक्का’ आणि ‘मदिना’ यासारखी पवित्र शहरे धर्मद्रोही नास्तिकांच्या ताब्यातून मुक्त करणे आपले कर्तव्य आहे. त्या कामात तुमचा हातभार लागू शकतो.
  • अंतिम निर्णय दिनी अल्लाह तुमच्या या कृत्यांसाठी तुम्हाला योग्य ते बक्षीस देईल.

प्रस्तावनेतील महत्त्वाचे असे हे चार मुद्दे हिजरत करून इस्लामच्या भूमीकडे जाणे का महत्वाचे आहे, हे सांगतात. पण यापेक्षाही महत्वाचं म्हणजे इस्लामिक स्टेटला लोकांना पाठींबा कसा द्यावा याचे मार्ग या लेखात सांगितले आहेत.

इथे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे. इस्लामच्या इतिहासात ‘खलिफा’ किंवा ‘खिलाफत’ ही लोकशाही सदृश्य व्यवस्था आहे. सर्व मुसलमानांना आदर्श असणारे चार पहिले चार खलिफा आणि गेल्या १४०० वर्षातील सर्वच खलिफा हे लोकांच्या पाठींब्यावर खलिफा झालेले आहेत. सामान्य लोकांतील एक चारित्र्यवान माणूस खलिफा तेव्हाच होऊ  शकतो जेव्हा त्याला लोकांचा पाठींबा असेल. पहिले चार खलिफा असे लोकांनी निवडलेले आहेत. त्यानंतर निर्माण झालेल्या उमय्या आणि अब्बासी या दोन खिलाफातींना सुद्धा लोकांचा पाठींबा मिळवणे गरजेचे वाटत असे. (लोकांचा पाठींबा मिळवणे म्हणजे लोकांनी खालीफाशी ‘एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे’, अशी शपथ लोकांनी घेतली कि खालीफाला लोकांचा पाठींबा मिळाला असे समजले जाते ) त्याशिवाय खलिफा कायदेशीररित्या खलिफा ठरत नसे. हे एक इस्लामचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कोणत्याही खालीफाला लोकांचा पाठींबा हवा आहे, तसा इस्लामिक स्टेटच्या ‘अबू बक्र अल बगदादी’ यालासुद्धा लोकांचा पाठींबा हवा आहे. तो कसा मिळवायचा याचे काही कृतीशील मुद्दे त्यांनी सांगितले आहेत.

पहिला आणि सर्वात महत्वाचा अर्थात हिजरत करून जाणे. पण काही कारणाने हिजरत करून जाणे शक्य नसेल तर, जिथे आहात तिथून खलिफा इब्राहीम (म्हणजेच बगदादी) याला पाठींबा देण्याच्या सभा आयोजित करून पाठींबा दिला तरी चालण्यासारखे आहे. मात्र त्या सभा रेकॉर्ड करणे आवश्यक आहे. त्या रेकॉर्ड सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसारित केल्या जातील याची सोय करणेही गरजेचे आहे. अशा सभा शक्यतो मशीद, मदरसे, इस्लामिक संस्था या ठिकाणी आयोजित कराव्या. असा रेकॉर्ड केलेल्या सभा इस्लामिक स्टेट पर्यंत पोहोचतील अशा व्यवस्था केल्या पाहिजेत. जर अशा सभा आयोजित करून पाठींबा देणे पोलिसांच्या धाकामुळे शक्य नसल्यास मुसलमानांनी गुप्ततेच्या सर्व शक्यतांचा वापर करावा, आणि आपला पाठींबा जाहीर करावा.

या सर्व प्रयत्नांमुळे दोन गोष्टी साध्य होतील, एक बाकीच्या असुरक्षित, घाबरलेल्या इस्लामिक गटांना त्यांनी बळ मिळेल, आणि ते सुद्धा आपला पाठींबा खालीफाला जाहीर करतील. पण महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे अनेक मुस्लीम गटांनी पाठींबा दिल्यामुळे ‘काफिरांमध्ये’ दहशत पसरेल, ते  अस्वस्थ होतील. (‘दहशतवाद’ याचा अर्थच लोकांमध्ये ‘दहशत’ पसरवणे हा आहे) टोकाच्या शक्यतांचा विचार करून जर या पैकी काहीही शक्य नसेल, तर मनातून तुम्ही इस्लामिक स्टेट प्रती निष्ठा वाहिली पाहिजे. तुमच्या मनात श्रद्धा पाहिजे, त्या श्रद्धेच्या जोरावर इस्लामिक स्टेट आणि खिलाफत तुमची सुटका करेल.

दोनच पर्याय : इस्लामिक स्टेट किंवा प्रलय –

‘दबिक़’च्या दुसऱ्या अंकातील हा दुसरा महत्वाचा लेख. या लेखाचे एकूण पाच भाग आहेत. सगळे एकमेकांना सुसंगत असेल लेख आहेत. पहिल्या लेखातील मुद्दा आहे, कि लोकांना ‘स्वतंत्र मताचा अधिकार’. ‘स्वतंत्र मताचा अधिकार’ ही असत्यावर आधारित विचारसरणी आहे. ती इस्लामला मंजूर नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद या लेखात केला आहे. ‘स्वतंत्र मताचा अधिकार’ हि विचारसरणी शिकवते की आपले मत, जरी ते खरं असलं तरी ते दुसऱ्यावर लादण्याचा कोणालाही अधिकार नाही. अल्लाहनी सांगितलेल्या सत्याला आणि धर्मालाही ही विचारसरणी लावण्याचे प्रयत्न काही लोक करतात, ते चुकीच आहे.  सामान्य लोकांना वाटतं ते सत्य असू शकत नाही, जे अल्लाहनी प्रेषितांच्या मार्फत त्याच्या पुस्तकात सांगितलं तेच खरं सत्य असू शकतं. त्यामुळे लोकांना सत्य मानायचं कि नाही, हा प्रश्नच अस्तित्वात नाही. अंतिम सत्याशिवाय दुसरे सत्य मानायचा अधिकार लोकांना नाही. म्हणून ‘स्वतंत्र मताचा अधिकार’ लोकांना नाही. असा युक्तिवाद पहिल्या भागात केला आहे.

दुसऱ्या भागात पूर्व प्रेषित ‘नूह’ यांची इस्लाम प्रचाराची गोष्ट सांगितली आहे. प्रेषित मुहम्मद यांना ज्याप्रमाणे अल्लाहनी संदेश देण्यासाठी निवडलं त्याप्रमाणे त्यांच्या पूर्वी प्रेषित ‘नूह’ यानाही संदेश देऊन पृथ्वीवर पाठवले होते. परंतु लोकानी अल्लाहनी प्रेषित ‘नूह’ मार्फत पाठवलेलं सत्य मानलं नाही, आणि ते ‘नूह’ यांना त्रास देऊ लागले. त्यावेळी नूह यांनी अल्लाहकडे पृथ्वीवर प्रलय आणून ‘सत्य न मानणाऱ्यांचा’ बंदोबस्त करण्याची विनंती केली. त्यानंतर अल्लाहनी ‘नूह’ यांना एक जहाज बांधायला सांगितलं आणि सर्व प्राणीमात्रांचे नर आणि मादी यांना घेऊन त्या जहाजावर जायला सांगितलं. त्याप्रमेण प्रेषित नूह यांनी जहाज बांधून पूर्ण केले आणि अल्लाह्नी सांगितल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांसमावेत जहाजावर चढले. मग पृथ्वीवर भयंकर प्रलय आला, भूकंप झाले आणि ज्यांनी ज्यांनी सत्य नाकारले होते, ते त्या प्रलायांमध्ये नष्ट झाले. याचा अर्थ असा की अल्लाह्नी प्रेषितांमार्फत पाठवलेले सत्य नाकारले नाही तर मृत्यू निश्चित आहे. म्हणजे सामान्य लोकांना स्वतंत्र मताचा अधिकार नाही. हे सांगण्यासाठी ‘कुरआन’ मधील ‘अल्लाहशिवाय कोणाचीही भक्ती करू नका अन्यथा मला भीती आहे की तुम्हांवर एक दिवस दुःखदायक प्रकोप कोसळेल’ (११:२६) या आयतीचा संदर्भ दिला आहे.

प्रेषित नूह यांचे जहाज ही केवळ दंतकथा नाही. ‘हादीस’ चे जेष्ठ संकलक सहिह बुखारी यांनी हादीस नोंदवली आहे, कि ‘त्या जहाजाचे अवशेष अल-जुडी या पर्वतावर आहेत, आणि इस्लाम निर्माण झाल्यानंतरच्या पहिल्या पिढीतील लोकांनी ते अवशेष पहिले सुद्धा आहेत’ असं मानलं जातं की ते अवशेष अब्बासी खिलाफातीच्या काळापर्यंत अस्तित्वात होते, पुढे ते नष्ट झाले. (गूगल वर 'Nuh's ark' असे सर्च केल्यास काही फोटो दिसतातही) 

‘नूह यांचे जहाज’ या गोष्टीतून दोन मुद्दे समोर येतात. एक – ज्यांनी सत्य स्वीकारले आहे आणि त्यानुसार आचरण करत आहेत, त्यांनी प्रलयाच्या शिक्षेतून सुटका होईल, ज्यांनी स्वीकारले नाही ते नष्ट होऊन जातील. आणि दोन – ज्यांची शिक्षेपासून सुटका झाली अशा लोकांची संख्या नेहमी अल्पसंख्य असणार आहे. बहुसंख्य नेहमी नष्ट होऊन जाणार. ही दोन सत्य कालातीत आहेत. तसच कोणत्याही काळात जर लोक असं म्हणू लागले कि ‘नूह’ किंवा इतर प्रेषितांनी सांगितलेले जरी सत्य असले तरी त्यांना ते सत्य लोकांवर लादण्याचा अधिकार नाही. तर अस जे कोण म्हणतील ते सुद्धा श्रद्धाहीन मानले पाहिजेत असा प्रेषित नूह यांचा आदेश आहे.

काही लोकं असा आरोप करतात कि इस्लामिक स्टेट मुसलमानांवरही हल्ले करत आहे. याचा अर्थ ते खरे मुसलमान नाहीतच. खरा मुस्लीम दुसऱ्या मुसलमानावर हल्ले करत नाही. या आरोपावर उत्तर पुढच्या भागात दिले आहे. इस्लामिक स्टेट म्हणतं कि केवळ ईश्वर एकमेव आहे तो अल्लाह आणि मुहंमद पैगंबर हे त्याचे शेवटचे प्रेषित’ हा जप करून कोणी मुसलमान होत नाही. रोज असा जप करणारे अनेक प्रकारच्या काफिर कृतींमध्ये अडकलेले आहेत. मूळ इस्लामचा प्रेषितांनी शिकवलेला अर्थ समजणारे आज खूप थोडे लोक आहेत. म्हणूनच खरे इस्लामिक स्टेट जे प्रेषितांच्या काळात होते, आदर्श खालीफांच्या काळात होते, पर्शिया आणि रोम विरुद्धच्या जिहाद काळात होते, स्पेन पर्यंत साम्राज्य पसरले त्या उम्मया काळात होते. त्यावेळी मुलभूत विषयांची पायाभरणी झाली होती, त्यामुळे असे खरे इस्लामिक स्टेट निर्माण होऊ शकले. आज मुसलमान बाथ विचार, इहवादी विचार, उदारमतवाद, लोकशाही अशा इस्लाम विरोधी विचारांत अडकलेला आहे, म्हणून खरी आदर्श इस्लामिक स्टेटची निर्मिती करावी यासाठी भरकटलेल्या मुसलमानांवर सुद्धा इस्लामिक स्टेटहल्ले करत आहेत.

शेवटी त्यांनी आवाहन केले आहे कि आदर्श इस्लामिक स्टेटची निर्मिती करायची असेल तर सर्व मुसलमानांना एकत्र येऊन ‘स्वतंत्र मताचा अधिकार’ या तत्वाविरोधात लढावे लागेल.

सेक्युलर आणि कम्युनिस्ट –

‘दबिक़’ मासिकातील महत्वाचे सदर आहे, इस्लामिक स्टेट रिपोर्ट. या दुसऱ्या अंकात ‘कुर्द’ या बंडखोर गटाशी झालेल्या लढाईचा वृतांत दिला आहे. कुर्द हे धर्मानी मुसलमान असले तरी सुन्नी कम्युनिस्ट आहेत, आणि त्यांनी स्वतंत्र कुर्दी कम्युनिस्ट राज्य स्थापन करण्याचे धेय्य ठेवले आहे. या मार्गात ते इस्लामिक स्टेटशी शत्रुत्वाच्या भावनेनी वागतात. शिवाय त्यांनी कम्युनिझम सारखी काफिर विचारसरणी स्वीकारली आहे. त्यांच्याशी झालेल्या लढाईचा आणि विजयाचा वृतांत या रिपोर्टमध्ये आहे. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना केली आहे कि, अल्लाह या सेक्युलर आणि द्रोही लोकांना सतत असेच अपमानित करत राहा!! पुढच्या पानांमध्ये त्या लढाईतील फोटो दिले आहेत.

गोष्ट ‘मुबाहलह्’ची –

प्रेषितांनी मादीनेहून मक्केवर आक्रमण केले आणि मक्का जिंकून घेतली. त्यानंतर त्यांनी ‘दायित्व मुक्ततेची घोषणा’ केली. त्याचा परिणाम असा झाला कि अनेक ज्यू आणि ख्रिश्चन टोळ्यांनी इस्लाम स्वीकारला. पण त्यातही काही लोकांनी प्रेषितांवर श्रद्धा ठेवण्यास नकार दिला, आणि काही ख्रिश्चन टोळ्यांनी प्रेषितांना आपले ‘प्रेषितत्व’ सिद्ध करण्यचे आवाहन केले. इस्लामचे प्रेषित मुहंमद आणि ख्रिश्चनांचे प्रेषित येशू यांच्यात खरं कोण असा वाद तयार झाला, आणि चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे ठरले. ही चर्चा ‘मुबाहल’ येथे झाली. चर्चेतून असे निष्पन्न झाले कि मुहम्मदच खरे प्रेषित आहेत. तरी देशील ख्रिश्चन टोळ्यांनी इस्लाम स्वीकारला नाही. तेव्हा जो कोणी खोटा असेल त्यावर अल्लाह स्वतः प्रकोप आणेल, अशा आशयाची आयात अवतरीत झाली. ‘मुबाह्ल’च्या गोष्टीचा अर्थ आहे कि इस्लाम आणि बिगर इस्लाम यांच्यात सत्यावरून चर्चा होते आणि त्यात इस्लामचा विजय होतो. हा विजय झाल्यावर पराजित झालेल्यांनी इस्लामचा स्वीकार करणे अपेक्षित आहे.  

जगात अल- जवलानी नावाचा मुस्लीम एक गट आहे, तो इस्लामिक स्टेटच्या विरोधात लढतो आहे. आणि शरियतच्या ऐवजी माणसांनी निर्माण केलेल्या कायद्यांच्या आधारे राज्य चालवण्याचा त्यांचा हेतू आहे. इस्लामच्या आणि इस्लामिक स्टेटच्या दृष्टीने हा खूप मोठा गुन्हा आहे. त्यांच्या एका नेत्यांनी इस्लामिक स्टेट वर ‘खाजीरींपेक्षा’ जास्त आक्रमक असल्याचा आरोप केला होता. म्हणून इस्लामिक स्टेटच्या अबू मुहम्मद अल-अदानी (जो नुकताच अमेरिका – रशिया च्या संयुक्त कारवाई मध्ये मारला गेला असल्याची बातमी आली होती) याने जवलानी यांच्या नेत्यांनी ‘मुबाहल’ (म्हणजे चर्चेसाठी) बोलावलं.

इथे ‘खारीजी’ म्हणजे काय याचा खुलासा केला पाहिजे. आदर्श खलिफा उस्मान यांनी प्रशासनातील काही अधिकार देताना पक्षपात केला आणि उमय्या कुळातील लोकांना लायकी नसताना अधिकार पदावर बसवले, अशा काही महत्वाच्या आरोपांवरून खलिफा उस्मानची मुसलमानांकडूनच हत्या करण्यात आली. (एका मुसलमानाने दुसऱ्या मुसलमानाचे रक्त संडण्याचा हा पहिलाच प्रकार होता. इस्लाममध्ये यानंतर कायम दुफळी माजली) उस्मानच्या हत्येमुळे पुढचे खलिफा झाले ‘अली’. खलिफा झाल्यानंतर पहिला महत्वाचा प्रश्न त्यांना सोडवायचा होता, तो म्हणजे उस्मानच्या मारेकऱ्यांना पकडून शिक्षा करणे. पण खलिफा अली यांना ते जमत नव्हते, म्हणून सिरीयाचा गव्हर्नर अमीर मुविया याने अलीविरोधात लढाईचा पवित्रा घेतला. उमय्या कुळाचा अमीर मुविया आणि चौथे खलिफा अली यांच्या इस्लामच्या इतिहासातील पहिले गृहयुद्ध झाले. अनेक दिवस लढाईचा कोणताही निकाल लागला नाही. दोन्हीबाजूनी खूप मनुष्यहानी झाली. म्हणून लढाई थांबवून हा वाद सोडवण्यासाठी एका ‘लवाद’ नेमण्यात आला. हा लवाद जो निर्णय देईल, तो मान्य करणे सर्वांवर बंधनकारक करण्यात आले. त्या लावदानी ‘कुरआन’ला साक्षी ठेवून निर्णय द्यावा असे ठरले. परंतु कोणत्याही वादावर ‘कुरआन’चे आधार घेऊन मानव निर्णय देऊ शकत नाही, निर्णय कुरआनचाच असावा लागतो, त्यामुळे अनेक लोकं या लवादावर समाधानी नव्हते. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर लवादाने निर्णय दिला, तो घटनाबाह्य होता. तो निर्णय अलींच्या पक्षाच्या विरोधी जात होता. म्हणून अलींनी लवादाचा निर्णय न मानता, पुन्हा एकदा मुविया विरोधात लढाईची तयारी केली. त्यावेळी आधी लवादावर असमाधानी असलेले अजून दुःखी झाले. आणि पूर्वी अलींच्या बाजूनी असलेले आता लढाईच्या विरोधात गेले. असे मुस्लीम मुस्लिमांविरोधात लढणार नाही असा पवित्र घेतलेले म्हणजे ‘खारीजी’. खारीजी हा गात अत्यंत आक्रमक आणि मुलतत्ववादी होता. असं म्हटलं जातं कि जगाच्या इतिहासातील पहिली मुलतत्ववादी दहशतवादी संघटना म्हणजे ‘खारीजी’. मुसलमानी इतिहासकार सुद्धा या गटाला दहशतवादीच संबोधतात. पुढे अलींची हत्या या खारीजींनीच केली.

इस्लामिक स्टेट वर एक इस्लामच्या दृष्टीने धर्मद्रोही ठरलेला एक  जबात अल- जवलानी नावाचा गट ‘खारीजीं’पेक्षा जास्त आक्रमकपणाचा आरोप करतो आणि तो इस्लामिक स्टेटला मान्य नाही. हे पटवून देण्यासाठीच अल-अदानी याने ‘मुबाह्ल’ चे आयोजन केले आहे. अर्थातच ‘मुबाह्ल’मध्ये नेहमी इस्लाम जिंकत असतो, तसं या चर्चेतही जिंकला. या लेखाचे एकूण सात भाग आहेत. पुढच्या भागात या चर्चा करण्याच्या योग्य पद्धती कोणत्या याची चर्चा करण्यात आली आहे. त्यासाठी अनके मुस्लीम विचारवंताचे संदर्भ दिलेले आहेत.

यानंतर मुजाहिदीन (म्हणजे धर्मयोद्धे) म्हणजे नेमके कोण, याची चर्चा केलेली आहे. मुजाहिदीन तोच आहे, जो अल्लाहवर आणि त्यांच्या प्रेषितांवर संपूर्ण श्रद्धा ठेवतो. हि प्रत्यक्ष अल्लाह किंवा प्रेषितांना न पाहताही ठेवलेली श्रद्धा खूप महत्वाची आहे, असे अनेक ‘हादीस’ मधले संदर्भ देऊन सांगितले आहे. पुढच्या भागांमध्ये ‘मुबाह्ल’ बद्दल आणखी खोलात चर्चा केली आहे. त्या संबंधी तयार होणाऱ्या शंका, त्याची उत्तरं असं सर्व देऊन शेवटी अल्लाहच्या प्रेषितांच्या धर्माचा कसा विजय होतो हे स्पष्ट केलेले आहे. वर सांगितलेली ‘खारीजी’ नावाची संघटना आणि इस्लामिक स्टेट यांची तुलना सुद्धा चुकीची कशी आहे, हे सुद्धा सांगितले आहे. याचा अर्थ इस्लामच्या राजकीय धार्मिक इतिहासातील जे जे आदर्श त्याचाच आदर्श इस्लामिक स्टेटनी राज्य उभं करताना ठेवला आहे. या सर्वाला विरोध करणारे काफिर म्हणजे कोण असतात, याचेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

शेवटी, हि लढाई कशासाठी आहे, तर प्रेषितांनी निर्माण केलेलं आदर्श खालीफांनी पुढे नेलेलं स्पेन पासून सिंध पर्यंत पसरलेलं जगातील बलाढ्य अल्लाहचे पुस्तक आणि प्रेषितांच्या कृती यांच्याआधारे चालणारे मुस्लीम स्टेट निर्माण करण्यासाठी!! (इथे स्पेन ते सिंध ही केवळ कल्पना आहे. मुल धेय्य संपूर्ण जग हे मुस्लीम स्टेट करण्याचे धेय्य आहे) त्यासाठी काफिर यांच्याशी तर लढायचे आहेच परंतु, जे मुसलमान सेक्युलर आणि काफिरांच्या नादी लागून इस्लामपासून दूर चालले आहेत, त्यांच्याशी सुद्धा हि लढाई आहे.

‘दबिक़’च्या सर्व अंकात असणारे ‘In The words Of Enemy’ हे सदर याही अंकात आहे. त्याच्या नंतर इस्लामिक स्टेटनी मिळवलेले काही नवीन प्रदेश, त्यांची माहिती आहे. त्यासाठी झालेल्या लढायांची माहिती आहे. ‘सहिह मुस्लीम’ यांनी संकलित केलेलं एक हादीस आहे, त्यात प्रेषित सांगतात, ‘तुम्ही (म्हणजे मुसलमान) अल्लाहच्या मार्जीनी एक दिवस अरेबियाचा द्वीपकल्प जिंकून घ्याल. त्यानंतर पर्शिया, रोम, शेवटी तुम्ही ‘दज्जल’ (सैतानाच्या कृती) शी सुद्धा लढाल आणि त्याच्यावर विजय मिळवाल’

समारोप –

या अंकाबद्दल माझं निरीक्षण असं आहे कि, एकूण विचार सांगण्याची भाषा हि खूप सोप्पी आहे. कोणत्याही मुसलमानाला जो स्वभावतः धर्मश्रद्द असतो, त्याला कुरआन आणि हादीस मधले संदर्भ देऊन आकर्षित करण्यासाठी या भाषाशैलीचा उपयोग होत असेल. ज्यावेळी आपण इस्लामचा इतिहास हि संज्ञा वापरतो त्यावेळी ती केवळ धार्मिक नसते. इस्लाममध्ये धर्म आणि राजकारण वेगवेगळ्या संकल्पना नाहीत. त्यामुळे इस्लामचा इतिहास हा धर्माचाही इतिहास असतो त्याचंबरोबर तो राजकीय, सामाजिक, आर्थिक, सुद्धा इतिहास असतो. त्यामुळे गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे इस्लामिक स्टेटमध्ये मुसलमान कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याची काळजी घेतलेली आहे.

सर्व लेखांत संदर्भ वापरताना, ते कोणत्याही विवादास्पद व्यक्तीचे किंवा संस्थेचे वापरलेले नाहीत. सर्व संदर्भ सर्व इतिहासकारांना मान्य होतील असे आहेत. सर्व मुस्लीम जग ज्या लोकांना मानतं, त्याचं विचारवंतांचे संदर्भ वापरलेले आहेत. पुन्हा गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे संदर्भ वापरताना मूळ संदर्भाची कुठेही मोडतोड केलेली नाही. कुरआन किंवा हादीस मध्ये तशी मोडतोड करणे हा गुन्हाच मानला गेला आहे, पण इस्लामी तत्वज्ञान किंवा शरिया यांचे सुद्धा संदर्भ जसेच्या तसे वापरले आहेत. जर अजूनही कोणाला असे म्हणायचे असेल कि इस्लामिक स्टेट म्हणजे खरा इस्लाम नाही, तर त्याला तसे म्हणू दे! आपण अभ्यास करायचा.. 

(पूर्वप्रसिद्धी - नवभारत, नोव्हेंबर २०१६) 

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....