Monday 17 April 2017

मुसलमानी रियासत


इस्लाम बद्दल कोणतीही चर्चा करताना काही चर्चेचे नियम आपण ठरवून घेतले पाहिजेत. माझ्या वाचनातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि भारतीय सहिष्णू मन घेऊन आपल्याला इस्लामचा अभ्यास करता येणार नाही. कारण तर्क शास्त्र, बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा या आधुनिक किंवा सो कॉल्ड पाश्चिमात्य कल्पनांच्या आधारे इस्लामकडे पहिले तर आपले इस्लामचे आकलन एकांगी राहील असे मला वाटते. एक उदाहरण देतो, कि प्रेषित स्वतः निरक्षर होते तर अनुयायांनी लिहिलेले कुराणची हस्तलिखितं तपासली कोणी, किंवा प्रेषित यांनी बलिदान देण्यासाठी एका जवळच्या अनुयायांचे नवजात बालक घेतले होते. ते त्याची प्रेषितांवरची श्रद्धा तपासासाठी. प्रेषित आपल्या मुलाचे बलिदान देत आहेत हे पाहून तो अजिबात दुःखी अस्वस्थ झाला नाही, यावरून त्याची श्रद्धा अढळ होते हे सिद्ध झाल्याने बलिदानाची नवजात बालकावर उचलेली तलवार खाली बालकावर चालण्याच्या आधी बालकाच्या ठिकाणी गाय प्रकट झाली, आणि ते बाळ वाचलं. अशा प्रकारचे अनेक चमत्कार भारतीय मनाला कुराण किंवा हादीस यांच्यात दिसू शकतात. किंबहुना आहेतच. पण मुसलमानाला ते चमत्कार वाटत नाहीत. याचे कारण आपल्या बुद्धिवादाचा कसोट्या वेगळ्या आहेत. रामाच्या अस्तित्वावर कोणीही प्रश्नचिन्ह सहज उपस्थित करू शकतो, पण अल्लाहच्या अस्तित्वावर तसे होत नाही. रामाच्या अस्तित्वाचे भारतीय पुरातत्वीय अवशेष शोधून देतो किंवा अनेक प्रकारच्या साहित्यातून रामाची कठोर चिकित्सा करतो. पण अल्लाहच्या अस्तित्वाचा पुरावा काय तर मुसलमान अगदी जेन्युइनली 'कुराण' मध्ये सांगितलं आहे कि, असे उत्तर देतात. म्हणजे अल्लाहचे अस्तित्व कुराणनुसार सिद्ध होते.
तेव्हा आपण मुसलमानी रियासत या टायटल खाली चर्चा करणार आहोत, तेव्हा हे लक्षात ठेवूया कि ज्या फॅक्ट्स मुसलमान फॅक्ट्स मानतात त्यांच्या खरेपणावर फार चर्चा करण्यात अर्थ नाही याचे कारण इस्लाम हा मुसलमानांच्या श्रद्धेचा विषय आहे बौद्धिक चिकित्सेचा नाही. कुराणमध्ये काही भाग प्रक्षिप्त आहे का, वगैरे सुद्धा यात येईल. याचेसुद्धा एक टोकाचे उदाहरण देतो. प्रेषितांची एक हादीस आहे ज्यात प्रेषित म्हणतात कि, 'अंतिम निर्णय दिन जेव्हा जवळ येणार असेल तेव्हा दाबिक या सीरियातील शहरात मुसलमान आणि रोमन्स यांच्या फौज समोरासमोर उभ्या ठाकतील. त्या दाबिक या शहरात मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यात शेवटची लढाई होईल आणि सर्व जग त्यानंतर इस्लाममय होईल.' आता प्रेषित त्यांच्या आयुष्यात इस्लामच्या स्थापनेनंतर सीरियाला कधीच गेले नाहीत. आणि आधी सुद्धा जेव्हा गेले होते तेव्हा ते दाबिक या शहराला गेले असण्याचे कोणते पुरावे सापडत नाहीत, यावरून 'दाबिक' बद्दलच हदीस हे खरं असण्याची शक्यता कमी आहे असं मत प्रा. शेषराव मोरे यांनी मांडलं होतं. पण हे मत मांडून झाल्यावर झाल्यावर मोरेच म्हणाले कि आपण त्याची सत्यता पडताळून पाहतो कारण आपण भारतीय किंवा बिगर इस्लामी तर्कशास्त्र शिकलो आहोत. मुसलमान असं म्हणेल कि, या प्रकारचे उदगार अल्लाहने प्रेषितांकडून वदवून घेतले असतील. किंवा आहेत.!! लक्षात येत आहे का कि, आजपर्यंत आपण इस्लामबद्दल कोणतीच सकारात्मक चर्चा का करू शकलो नाही?
भारतात जसे ज्ञानेश्वरापासून बाबासाहेबांपर्यंत धर्मसुधारक झाले त्यांनी काळाच्या पुढे जाणार बुद्धिवाद मांडला. तर्काच्या बुद्धीच्या कसोटीवर घटना मापून पाहायला शिकवली. ती एक कमी इस्लामी इतिहासात आहे असे म्हणता येईल याबाबत एक मजेदार उदाहरण आहे. ऑट्टोमन राज्यात जेव्हा आधुनिकते विषयी चळवळ सुरु झाली तेव्हा राज्याच्या अनुदानाने काही विद्यार्थी युरोपात नवीन विद्या, शास्त्र तंत्रज्ञान शिकायला गेले. त्यांच्यापैकी एक होता रिफा'आ अल तथवई. हा फ्रान्समध्ये शिकायला गेला होता. तिथलं त्याचं शिक्षण पूर्ण करून तो परत आला तेव्हा त्याने त्याचे मत नोंदवून ठेवले आहे, ते 'अल्बर्ट हौरानी' याने आपल्या 'हिस्ट्री ऑफ अरब पीपल' या ग्रंथात उदघृत केले आहे. तो म्हणतो, "even the common people know how to read and write ... but among their ugly beliefs is this, that the intellect and virtue of their wise men are greater than the intelligence of the prophets"
तेव्हा हे रिजिड मन कसं तयार होतं हे अभ्यासण्यासाठी मुसलमान होऊन इस्लामचा अभ्यास करावा लागेल. हिंदू राहून तो एकांगी होण्याची शक्यता जास्त आहे. मुसलमान होऊन म्हणजे प्रत्यक्ष धर्म बदलण्याची गरज नाही, मुसलमान होऊन म्हणजे जे आहे ते पक्कं आणि ईश्वरी आहे हि श्रद्धा ठेऊन अभ्यासावे लागेल. अभ्यास सुरु करताना वृत्ती चिकित्सक ठेवून चालणार नाही. एकदा का बेसिक आकलन झालं कि मग चिकित्सा करता येईल. जेष्ठ इतिहासकार ग.भा. मेहेंदळे म्हणाले होते कि, 'भाष्य करण्याची गडबड करू नका, तपशील आधी समजून घ्या!!' तेव्हा खरं-खोटं, मूळ-प्रक्षिप्त ह्याची चर्चा नंतर करता येईल.
आता पुढे कुराण म्हणजे काय आहे, हादीस म्हणजे काय आहे, शरियत म्हणजे काय आहे, हे थोडक्यात मी लिहिणार आहे. भारतातील सुद्धा इस्लामचा अभ्यास करण्यासाठी हा धर्मशास्त्राचा अभ्यास महत्वाचा ठरेल.

------------------------------******-------------------------------*****-----------------------------------------------------




ऍडमिन लोकांशी बोलून ठरवल्या प्रमाणे धर्मशास्त्रातील काही घटकांची माहिती आता लिहितो आहे. प्रथम एक गोष्ट मान्य केली पाहिजे कि मी कोणी जाणकार नाही. तेव्हा वाचताना जे दिसलं ते विचार करून लिहितो आहे. कुराण किंवा हादीस साठी मुसलमानी लेखकांनी लिहिलेले मी भर देऊन वाचले आहे. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच मी कोणतीही गोष्ट तर्काच्या आधारे चॅलेंज केलेली नाहीत.

आपण सुरवात दिव्य ग्रंथ 'कुराण' पासून करूया.

'कुराण' या शब्दाची उत्पत्ती 'करा' या मूळ अरबी शब्दापासून झाली आहे. 'करा' याचा अर्थ एकत्र करणे असा होतो. प्रत्यक्ष 'कुराण' ग्रंथात मात्र या ईश्वरी ग्रंथाला अनेक नावे योजण्यात आली आहेत. काही ठिकाणी थेट 'कुराण' असा उल्लेख आहे काही ठिकाणी ग्रंथ, काही ठिकाणी संभाषण असाही उल्लेख आहे. आमला जमालुद्दीन सियुती यांनी 'कुराण' साठी कुराणात आलेल्या पर्यायी विशेषणांची यादी बनवली आहे ती संख्या ५५ इतकी आहे.

इस्लामपूर्व अरबस्थानाचे नैतिक अधःपतन झाले होते. माणुसकी संपत चालली होती. दारू, जुगार, व्यसनं, बदफैली चारित्र्य यामुळे लहानपणापासून मुहंमद दुःखी होते. ते सतत अरबांना योग्य, सत्य धर्म सांगितलं पाहिजे याचा विचार करत असत. प्रेषित पहिल्यापासून स्वभावाने अत्यतं साधे, मनमिळावू, प्रामाणिक, सत्यप्रिय होतेच. भवतालच्या परिस्थितीने व्याकुळ होऊन चिंतनासाठी प्रेषित अनेकदा मक्केच्या सीमेवर असलेल्या 'हिरा' पर्वतावर जाऊन चिंतन करत असत. चिंतनाचा विषय अरबांना योग्य धर्म कोणता सांगावा, हाच मुख्यतः असे. वयाच्या ४० व्या वर्षी असेच चिंतनासाठी हिरा पर्वतातील एका गुहेत ते बसलेले असताना मानवी रूपातील देवदूत जिब्राइल मुहंमद यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याने एक रेशमी रुमाल मुहम्मदांच्या समोर ठेवला. आणि आज्ञा केली रूमालावर लिहिलेलं वाचण्याची वाचण्याची. मुहंमद म्हणाले, मी निरक्षर आहे. तेव्हा जिब्राइल या देवदूताने त्यांचा हात हातात घेतला आणि जोराने दाबला. आणि पुन्हा आज्ञा केली आता वाच, तरीही मुहंमद म्हणाले मला वाचता येत नाही. असं एकूण तीन वेळेला झाल्यानंतर चौथ्या वेळेला कुराणातील पहिल्या आयती प्रेषितांच्या तोंडून निघाल्या. त्या आयती कुराणमध्ये सुरह ९६ मधल्या पहिल्या पाच आयती आहेत. ह्याची तारीख ६ ऑगस्ट ६१० हि आहे, या दिवशी मुहंमद हे अल्लाहचे प्रेषित म्हणजे संदेश वाहून नेणारे 'रसूल' बनले. सर सय्यद अहमद म्हणतात कि जिब्राइल हि कोणी व्यक्ती नसून अल्लाहच्या संदेशाच्या स्वीकार करण्याची प्रेषितांच्या ठिकाणी असलेली एक दैवी शक्ती होती, तिचेच नाव जिब्राइल आहे.

कुराणचे स्वरूप -

इसवीसन ६१० ते ६३२ प्रेषितांच्या मृत्यूपर्यंत कुराण निर्मितीचे काम सुरु होते. दिवसाच्या कोणत्याही वेळेला अल्लाहचा संदेश येत असे. तो आला कि प्रेषित आपल्या अनुयायांना तो लगोलग सांगत असतं, मग ते अनुयायी दगडावर, चामड्यावर, किंवा खजुराच्या पानावर लिहून घेत असत. काही जण चक्क त्या आयती पाठ करून ठेवत असत. प्रेषित जिवंत असताना कुराण कोणालाही एकत्र लिहून ठेवण्याची गरज वाटली नाही कारण प्रेषित म्हणजे अल्लाहचा पृथ्वीवरचा प्रतिनिधी जिवंत होता. प्रेषितांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र पहिले खलिफा अबू बकर याना कुराणाच्या अधिकृत आवृत्तीची गरज वाटू लागली. त्यांनी प्रेषितांच्या सहकाऱ्यांना एकत्र बोलवून हि गरज समजावून सांगितली. त्यानंतर प्रेषितांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी 'झैदी बिन थाबित' यांनी कुराणच्या आयती पाठ केलेल्या लोकांना भेटून त्या आयती लिहून घेतल्या. ते सर्व दगड, चामड्याचे तुकडे, खजुराच्या पानाचे तुकडे एकत्र करून कुराण एकत्र लिहून काढले. ते काम इसवीसन ६५१ मध्ये पूर्ण झालं. त्यावेळी प्रेषितांच्या पत्नी हफसा हिच्याकडून ती कुराणची आवृत्ती सर्टिफाय करून घेण्यात आली. शिवाय प्रेषितांच्या इतर सहकाऱ्यांनी सुद्धा ती सर्टिफाय केली. मग शंका आणि संदिग्धता टाळण्यासाठी इतर सर्व कुराणच्या आवृत्ती जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आल्या. आणि ६५१ मध्ये तयार केलेली कुराणची आवृत्ती अधिकृत म्हणून मान्य करण्यात आली. त्यातून काही भाग प्रक्षिप्त आहे का, किंवा पाठ केलेल्या लोकांनी खऱ्या आयती पाठ केल्या होत्या याचा पुरावा काय, किंवा काही भाग विस्मृतीत गेला नसल्याची हमी कोण घेतो वगैरे प्रश्न निर्माण झाले. त्यावर अनेक मुस्लिम इतिहासकार आणि पंडितांनी भाष्य केले आहे. त्यापैकी एक आपण पाहू. भारतातील जेष्ठ मुस्लिम अभ्यासक मौलाना वाहिदुद्दीन म्हणतात, "इस्लाम च्या पूर्वीचे धर्मग्रंथ भ्रष्ट झाले याचे कारण त्याचे पावित्र्य टिकवण्याचे कोणतेही मार्ग किंवा संस्था ईश्वराने निर्माण केले नव्हते. म्हणून ज्यू आणि ख्रिश्चन यांचे ग्रंथ भ्रष्ट झाले. म्हणून स्वतः अल्लाहनेच व प्रेषित मुहंमदानी विशेष काळजी घेऊन कुराण हा तंतोतंत व कायमचा, तसाच शुद्ध ठेवण्याची व्यवस्था केली आहे." म्हणून ज्या स्वरूपात प्रेषितांना कुराण अवतरित झाले त्याच स्वरूपात ते आज आपल्यासमोर आहे. प्रेषितांनंतर १३-१४ शतकं कुराण कायम विशुद्ध व अविकृत राहिले आहे. यात एखाद्या अक्षराचा वा कानामात्रेचाही फरक पडलेला नाही, असे मुसलमान मानतात.      

कुराणात ११४ सुरह म्हणजे अध्याय आहेत. कुराणात ६०० रुकू (विभाग), ६२२५ आयती (श्लोक), ७९,९३४ किलमा (शब्द) आणि ३,३८,६०६ हुरुफ (अक्षरं) आहेत. कुराणातील ११४ सुरहंपैकी ९० सुरह मक्काकालीन आहे, २४ मदिना कालीन. कुराण वाचताना प्रत्येक पानाच्या वर आयत मक्काकालीन आहे कि मदिना कालीन आहे त्याचा उल्लेख केलेला असतो. कुराण वाचताना मक्का काळ आणि मदिना काळ हा फरक समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रेषितांचे एक अधिकृत चरित्र माहिती असणे, संग्रही असणे आवश्यक आहे. मदिना काळातील मुख्य फरक म्हणजे प्रेषितांनी राज्य स्थापन केलं होतं. मक्का काळात राज्य स्थापन केलेलं नव्हतं. मक्का काळ आणि मदिना काळ हे प्रकरण म्हणजे एका स्वतंत्र पोस्टचा विषय आहे. कुराणच्या निर्मितीचा काल २२ वर्षाचा असल्यामुळे एक विषय आणि त्यावरचे विवेचन असं कुराणात नाही. प्रेषितांच्या आयुष्यातील घटनांनुसार विषय बदलेत गेलेले आहेत. त्यासाठी हादीस समजून घ्यावे लागतात.

इथे चर्चा केली पाहिजे असे दोन-तीन महत्वाचे विषय आहेत. १. कुराणचा हेतू, २. कुराणचा संदेश, ३. इस्लामम्हणजे काय? पण ते सुद्धा स्वतंत्र पोस्टमध्ये पण पाहूया. आत प्रथम कुराणचे भाष्य करण्याच्या पद्धती. आणि प्रमुख भाष्यकार याबद्दल विचार करू.

कुराणचा अन्वयार्थ लावण्याची पद्धत म्हणजे – तफसीर. कुराणचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार म्हणजे अर्थात स्वतः प्रेषितच. त्यासाठी त्याच्या हादीसचा आधार घेतला जातो. परंतु प्रेषितांच्या मृत्युनंतर त्यांचे जवळचे सहकारी इब्न अब्बास (मृत्यू ६८७) यांना कुराणचे प्रेषितांनंतरचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार मानतात. (प्रेषितांच्या सहका-यांना ‘सलाफ’ म्हणतात) कुराणचे अन्वयार्थ लावण्याचे शास्त्र खूप विस्तृतपणे तयार करण्यात आले आहे. त्याच्या दोन सर्वात महत्वाच्या पद्धती आहेत. १. तफसीर बील मथुर आणि २. तफसीर बील राई. तफसीर बील मथुर म्हणजे कुराणचा प्रेषित आणि त्यांचे अनुयायी यांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे अन्वयार्थ लावणे. तफसीर बील राई म्हणजे परंपरेपेक्षा कारण परंपरेला महत्व देऊन केलेलं भाष्य.

कुराण वरील पहिले भाष्य अल तबरी यांचे प्रसिद्ध आहे. तबरी यांनी दहाव्या शतकात सविस्तर आणि डिटेल भाष्य केलेलं आहे. त्याचे नाव ‘जामी अल बयान फी तफसीर अल कुराण’ असे आहे. त्यानंतर बाराव्या शतकातील ‘अबुल कासीम महमूद अल झमाक्षरी’ यांचे कुराणचे भाष्य प्रसिद्ध आहे. आज जमते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदुदी यांचे भाष्य जगप्रसिद्ध आहे. त्याच्या भाष्याचे नाव ‘Towords understanding Quran’ असे आहे. भारतातील मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सुद्धा कुराणवर भाष्य केलेलं आहे. त्यांच्या भाष्य ग्रंथाचे नाव ‘तर्जुमन अल कुराण’ असे आहे.
मध्यंतरी बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लामचा एकांगी अभ्यास केला कारण बाबासाहेबांनी अभ्यास केला तेव्हा कुराणचे इंग्लिश भाषांतर झालेले नव्हते असा एक युक्तिवाद मांडण्यात आला. त्यांचासाठी. कालक्रमानुसार कुराणचे पहिले इंग्लिश भाषांतर १८६१ साली प्रसिद्ध झाले. भारतात कुराणची उर्दू-रोमन भाषांतर आवृत्ती १८४४ साली प्रसिद्ध झाली. सध्या अभ्यासासाठी वापरण्यात येणारे मुस्लीम पंडित मोहंमद पिथकॉल व अलामा अब्दुल्ला युसुफ यांनी कुराणची केलेली इंग्लिश भाषांतरं भारतात १९३० आणि १९३४ साली उपलब्ध होती. आता तर जगातल्या अनेक भाषांत कुराण उपलब्ध आहे. मराठी इस्लामी पब्लिकेशन्स ट्रस्ट यांनी सय्यद अबुल आला मौदुदी यांनी केलेलं भाषांतर मराठी मध्ये उपलब्ध करून दिले आहे. शिवाय ‘दावतुल कुराण’ नावाने मुंबईहून ३ खंड प्रकाशित झाले आहेत. (क्रमशः)     

------------------------------******-------------------------------*****-------------------------------------------------      


इतिहासाच्या पाउलखुणा या फेसबुक पेज वर इस्लामी संस्कृती याच्या चर्चेत लिहिलेल्या पोस्ट ब्लॉगवर सलग सुद्धा वाचता येतील.
https://www.facebook.com/photo.php?fbid=299441000488631&set=g.1649589398660941&type=1&theater
या लिंक वर त्या पोस्ट आणि कमेंट्स वाचता येतील 

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....