Friday, 28 July 2017

आयसीसचा उदय – प्रबोधनाच्या अभावामुळे?


२०१४ च्या जुलै - ऑगस्ट पासून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया’ या गटानी मध्यपूर्वेत ‘खिलाफत’ स्थापन केली. १९२४ मध्ये तुर्कस्तानचा हुकुमशहा केमाल आतातुर्क याने चारशे वर्षाहून अधिक काळ राज्य केलेली ओट्टोमन खिलाफत नष्ट केली होती. त्यानंतर जगात अनेक ठिकाणी पुन्हा ‘खिलाफत’ निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यापैकी एक म्हणजे २०१४ मध्ये निर्माण झालेली इस्लामिक स्टेट.
एक दहशतवादी संघटना, या पलीकडे लोकांना फारशी याबद्दल माहिती नाही. तेव्हा मूळ विषयामध्ये शिरण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी समजावून घेणे आवश्यक आहे. इतिहासाच्या दोन प्रवाहातून या इस्लामिक स्टेटची निर्मिती झालेली आहे. आपल्या काळाच्या दृष्टीने अलीकडचा प्रवाह म्हणजे ‘तेलाचे राजकारण’ त्यातून झालेली ‘दोन गल्फ युद्ध’ याचा इस्लामिक स्टेटच्या निर्मितीमध्ये दुर्लक्ष न करता येण्याजोगा वाटा आहे. २००३-०४ मध्ये दुसऱ्या गल्फ युद्धाच्या वेळी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली ‘नाटो’ इराकमध्ये उतरलं त्यांनी लोकशाही स्थापना करण्याच्या हेतूनी ‘सद्दाम हुसेन’ची हुकुमशाही राजवट उलथवून टाकली आणि लोकशाही राज्यस्थापनेचे प्रयत्न केले. २०१० च्या वसंत ऋतूमध्ये ट्युनिसीयामध्ये लोकशाहीसाठी क्रांतीला सुरवात झाली. आणि एकामागून एक सर्व अरब देशांमध्ये त्या क्रांतीची लाट पोहोचली. ट्युनिसीया, इजिप्त, लिबिया, सिरीया, येमेन, कुवेत, लेबेनॉन, ओमान, बहारीन, सौदी अरेबिया. त्या क्रांतीमुळे सर्व देशात गृहयुद्ध सुरु झाली. अंतर्गत राजकीय पोकळी निर्माण होण्याचे प्रकार या सर्व देशात झाले. या ‘कलह’ काळात अनेक गट अर्थात उदयाला आले. देशात तयार झालेली राजकीय पोकळी भरून काढून सत्तेमध्ये वाटा मिळावा हा एक सामान्य हेतू बहुतेक सर्व गटांचा होता. अशा गटांमध्येच इराक आणि सिरीयामध्ये ‘इस्लामिक स्टेट’ निर्माण झाली. सुरवातीला केवळ ‘इस्लामिक स्टेट’ असे नाव असलेली ही संघटना इराक आणि सिरीयाच्या काही भागांवर राज्य करण्याइतकी मोठी झाली. तेव्हा त्यांनी पूर्वीचे नाव बदलून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम/लेव्हेंट (म्हणजे सिरीया, शाम, लेव्हेंट ही एकाच प्रदेशाची नावं आहेत)’ हे नाव धारण केलं. २०१४ च्या जून मध्ये त्यांनी स्वतंत्र ‘खिलाफतीची’ स्थापना केली. तिथून पुढे आजच्या तारखेपर्यंत ती खिलाफत राज्य करते आहे. (आता तीचा इराक आणि सिरीयावरील प्रभाव संपला तरी फिलिपाईन्स, बांगलादेश, अफगाणिस्तान या भागात तिचे अवशेष टिकून आहेत)

‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी गटाच्या उदयाची करणे देताना पत्रकार अभ्यासक हे मुख्य कारण सांगतात. अमेरिकेचे तेलासाठीचे हितसंबंध, म्हणून इस्रायलला पाठींबा वगैरे. ज्या एका कारणाकडे सहज दुर्लक्ष होतं ते सांगायचा माझा प्रयत्न आहे. ते कारण आधुनिक आणि तत्कालीन कारणापेक्षा जास्त महत्वाचे आहे. अर्थात हे वाचकांनी ठरावाचे आहे. 


इथे आपण दोन उदाहरणं घेऊन त्यांची तुलना करून पाहूया उत्तर मिळतय का? युरोपीय सत्ता भारतात आल्या आणि राज्य स्थापनेसाठी त्यांनी प्रयत्न केले तो काळ साधारणपणे १७५७ म्हणजे प्लासीचे युद्ध. ब्रिटिशांच्या भारतातील राज्य स्थापनेची सुरवात. प्लासीची लढाई जिंकून भारताच्या एका प्रदेशावर ब्रिटिशांचे राज्य सुरु झाले. ते अर्थात ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचे होते. अधिकृत ब्रिटनचे राज्य भारतात लागू झाले ते १८५७ पासून. पण प्लासीच्या आणि नंतरच्या बक्सारच्या युद्धापासूनच भारतीयांत जागृती सुरु झाली होती. याचे पहिले उदाहरण म्हणजे राजाराम मोहन रॉय. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांच्या विरोधात आधुनिक दृष्टी घेऊन राजाराम मोहन रॉय उभे राहिले. राजाराम मोहन रॉय यांच्यापासून ब्रिटिशांमुळे मिळालेल्या आधुनिक शिक्षणातून शिकलेले भारतीय हिंदू धर्मातील रूढी परंपरा यांच्याविरुद्ध लढायला उभे राहिले. हा भारतीय प्रबोधनाचा काळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. हा प्रवास कुठून सुरु होऊन कुठेपर्यंत येऊन पोहोचला हे पहिले पाहिजे. राजाराम मोहन रॉय यांच्या स्वतःच्या वाहिनीला सती जावे लागले होते. महाराष्ट्रात पेशव्यांच्या शेवटच्या पिढ्या एका समाज गटाला अस्पृश्य म्हणून बाजूला करत होत्या. जोतीराव फुले यांचा अनाथ आणि पिडीत विधवांसाठी अनाथाश्रम सुरु करावे लागत होते. आणि या सगळ्या प्रथांना इथली व्यवस्था धर्माचे संदर्भ देत होती. इथपासून १९४७ साली स्वतंत्र होताना बहुसंख्य परंपरावादी हिंदुनी एकत्र येऊन ‘इहवादी’ राज्यघटना बनवली. एका काश्मिरी पंडिताने एका दलिताला मुद्दाम मंत्रिमंडळात बोलावून घेऊन मसुदा समितीचं अध्यक्षपद दिलं. भारतातील प्रबोधनाचा हा प्रवास खूप महत्वाचा होता.

आता दुसऱ्या बाजूला उदाहरण आहे ऑट्टोमन साम्र्याज्याचे. १४५३ मध्ये काँस्टँटिनोपलचा अरबांनी म्हणजे ऑट्टोमन साम्राज्याने पाडाव केल्यानंतर ते साम्राज्य स्थिर राहिलं. पहिल्या पिढ्यातील आक्रमकता संपून गेली आणि प्रसरणशीलता नाहीशी झाली. तेव्हापासून पुढची तीन शतकं ऑट्टोमन साम्राज्य हे ‘सीक मॅन ऑफ युरोप’ राहिलं. तिकडे युरोपीय देश मात्र जग शोधायला बाहेर पडले. युरोपात सुद्धा प्रबोधनाची सुरवात होऊन गेली होती. विज्ञानाची प्रगती यांच्या आधारे व्यापारउदीम याने संपत्ती गोळा करण्यासाठी युरोपीय जग जिंकत सुटले होते. तसे ते व्यापाराच्या माध्यमातून ऑट्टोमन राज्यात सुद्धा शिरले. ते मुख्यतः ज्यू आणि ख्रिश्चन होते. भारतात जसा टर्निंग पॉईंट प्लासीची लढाई हा मानतात त्याप्रमाणे ऑट्टोमन राज्यात टर्निंग पॉईंट नेपोलियनची इजिप्तची स्वारी हा मानतात. १७९७ मध्ये नेपोलियन इजिप्तमध्ये आला. त्याच्या आधी युरोपीय ऑट्टोमन राज्यात वेगवेगळ्या माध्यमातून शिरले होतेच. व्यापारी म्हणून, धर्मप्रसारक म्हणून इत्यादी. नेपोलियन इजिप्तमध्ये आला तो तीन वर्ष तिथे थांबून होते. या तीन वर्षात नेपोलियन बरोबर आलेले सैन्याशिवायचे अनेक लोक म्हणजे शास्त्रज्ञ, शिक्षक, कायदेपंडित, व्यापारी इत्यादी लोकांशी ऑट्टोमन राज्यातील सामान्य लोकांचा संपर्क झाला. ‘आधुनिक विचाराचा’ ऑट्टोमन राज्याशी आलेला तो पहिला दीर्घ संपर्क! ज्याप्रमाणे भारतात ब्रिटीश राज्याला प्रतिक्रिया उमटल्या तशाच ऑट्टोमन राज्यातसुद्धा उमटल्या.

भारत आणि ऑट्टोमन राज्यातला फरक असा आहे, कि ब्रिटीश भारतात थेट राज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नात होते. ऑट्टोमन राज्यात युरोपीयनांनी राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले नाहीत. उलट सत्ता समतोल साधण्यासाठी त्यांनी ऑट्टोमन राज्य टिकावं यासाठी आपले प्रयत्न खर्च केले.  

१९ व्या शतकाच्या सुरवातीला युरोपीय देश जगाच्या सर्व भागात व्यापारासाठी जात होते आणि पुढे राज्य स्थापन करत होते. भारतात १८५७ मध्ये ब्रिटीशांच राज्य सुरु झालं, त्याच्यापूर्वी ते अमेरिकेतून हारून आले होते. १८५० च्याच सुमारास ते चीन मध्ये गेले. आफ्रिकेच्या अनेक देशांत त्यांनी आपले बस्तान बसवले. जसे युरोपीय आशिया आफ्रिका खंडांमध्ये गेले आणि राज्य स्थापनेचे पर्यंत करत होते, तसेच ते युरोपला जवळ असणाऱ्या इस्लामी देशांत सुद्धा शिरले.  पूर्वीचे बलाढ्य ओट्टोमान साम्राज्य ‘आजारी’ पडले होते आणि इतर कोणतीही मुस्लीम शक्ती युरोपीय सत्तांना लगाम घालू शकेल इतकी बलाढ्य नव्हती. स्वाभाविकपणे युरोपीयन इस्लामी देशांत शिरले. योरोपीय सत्तांचा जो परिणाम भारतावर झाला किंवा इतर जगावर झाला त्याच प्रमाणे इस्लामी देशांवरही झाला. ज्याप्रमाणे भांडवलशाही ही एकटी येत नाही, तिच्याबरोबर जीवन जगण्याची एक पद्धत पण येते. लोकशाही, स्वतंत्र अशी मूल्य भांडवलशाही बरोबर येतात. त्याचप्रमाणे युरोपियन नुसते येत नाहीत, ते त्यांच्याबरोबर त्यांचे विचार घेऊन येतात, बायबल आणतात (म्हणजे धर्म), ते वैज्ञानिक दृष्टीकोन आणतात. त्याच्या प्रभावाखाली येऊन एक पिढी असं मानते कि अन्यायी एतद्देशीय सत्तेपेक्षा न्यायी परकी बरा. भारतात ब्रिटीश सत्तेला वरदान मानणारे लोक होते तसचं. पण त्या काळात समाज मंथन सुरु होतं. समाज विचार करायला लागतो, कि आपल्याकडे असं काय नाही जे युरोपियनांकडे आहे. त्यांच्याकडे अस काय आहे ज्याच्या बळावर ते मुठभर लोकं खंडप्राय देशावर राज्य करू शकतात. त्यातून मूल्य व्यवस्था निर्माण होतात. राष्ट्रवाद, समाजवाद, इतिहास, अर्थकारण या सर्वाचा विचार सुरु होतो. जे जे भारतात झालं ते सर्व कमी अधिक प्रमाणात इस्लामी देशांत सुद्धा झालं. एतद्देशीय शिक्षण संस्था निर्माण होतात, एतद्देशीय लोक धर्म चिकित्सा करू लागतात. एतद्देशीय लोकांकडून ग्रंथनिर्मिती होते, नवीन वृत्तपत्र सुरु होतात. राष्ट्रीय नेते त्यातून पुढे येतात. युरोपीय सत्ता इस्लामी राष्ट्रात स्थिर झाल्या तेव्हा हे सर्व त्या देशातही घडलं. तिथेही अनेक राष्ट्रीय नेते उदयाला आले. ग्रंथनिर्मिती होऊ लागली. भारतात ज्याप्रमाणे फुले – रानडे – चिपळूणकर हि पिढी स्वातंत्र्य मागत नव्हती. स्वातंत्र्य मागणारी पिढी पुढची होती, टिळक - गोखले – गांधी. त्याप्रमाणे इस्लामी देशांतही स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली.

मुहंमद आली पाशा (आधुनिक इजिप्तचा राष्ट्रपिता)
जसे भारतात फुले – रानडे – चिपळूणकर निर्माण झाले तसे तिकडे सलीम तिसरा, मुहंमद अली, महमूद दुसरा असे पहिल्या पिढीतले लोक निर्माण झाले. त्यांनी युरोपीय सत्ता झुगारुन देऊन नवीन राष्ट्राची उभारणी असा मार्ग अवलंबला नाही. त्यांनी आपापल्या प्रदेशात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. समील तिसरा याने ऑट्टोमन राज्यात सैन्यात आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला, जसा प्रयत्न महादजी शिंदे यांनी केला होता. मुहंमद अली याने ऑट्टोमन राज्याचा एक प्रतिनिधी या नात्याने इजिप्तमध्ये शिक्षणाचे प्रयोग सुरु केले. मुहंमद अलीच्या इजिप्तमध्ये मुलींना सुद्धा शिक्षणाचे दरवाजे खुले होते. मुहंमद अलीला आधुनिक इजिप्तचा निर्माता म्हणतात.

भारताचा स्वातंत्र्याकडचा प्रवास आणि इस्लामी राष्ट्रांचा स्वातंत्र्याकडचा प्रवास यात फरक पडत गेलेला आहे. त्या एका फरकानी भारत हा इस्लामी देशांपेक्षा वेगळा जास्त समृद्ध म्हणून उभा राहतो. भारतातील सर्व प्रबोधनाची परंपरा वारकरी संप्रदायापासून सुरु होऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत भारतानी मान्य केली. स्वातंत्र्य मिळताना सर्व भारतचं यावर एकमत होतं की भारत हा ‘धर्मसत्ताक’ देश असणार नाही. याला एकमेव कारण म्हणजे ‘प्रबोधनाची’ चळवळ. इस्लामी देशांत जितक्या सर्व ‘स्वातंत्र्य’ मिळवण्यासाठी संघटना निर्माण झाल्या त्या धर्मसत्ताक स्वतंत्र राष्ट्रासाठी लढत होत्या. आधुनिकतावादी पहिल्या पिढीतील मुस्लीम नेत्यांच्या नंतर त्यांचे शिष्य हे वेगळ्या वाटेनी गेले. नंतर उदयाला आलेले ‘जमाल उद दिन अफगाणी’, ‘खेदिवे इस्लामील’, ‘रीफ अल तहतअवी’, ‘मुहंमद अब्दूह’, ‘रशीद रीदा’, ‘अब्दू अल रेहमान कवाकीबी’ ही लोकं ‘मुस्लीम ब्रदरहूड’ आणि तत्सम संघटनेच्या निर्मिती मागची लोकं आहेत. एक प्रातिनिधिक उदाहरण पुरेसे ठरेल. भारतात जसे ज्ञानेश्वरापासून बाबासाहेबांपर्यंत धर्मसुधारक झाले त्यांनी काळाच्या पुढे जाणार बुद्धिवाद मांडला. तर्काच्या बुद्धीच्या कसोटीवर घटना मापून पाहायला शिकवली. ती एक कमी इस्लामी इतिहासात आहे असे म्हणता येईल याबाबत एक मजेदार उदाहरण आहे. ऑट्टोमन राज्यात जेव्हा आधुनिकते विषयी चळवळ सुरु झाली तेव्हा राज्याच्या अनुदानाने काही विद्यार्थी युरोपात नवीन विद्या, शास्त्र तंत्रज्ञान शिकायला गेले. त्यांच्यापैकी एक होता रिफा'आ अल तथवई. हा फ्रान्समध्ये शिकायला गेला होता. तिथलं त्याचं शिक्षण पूर्ण करून तो परत आला तेव्हा त्याने त्याचे मत नोंदवून ठेवले आहे, ते 'अल्बर्ट हौरानी' याने आपल्या 'हिस्ट्री ऑफ अरब पीपल' या ग्रंथात उदघृत केले आहे. तो म्हणतो, "even the common people know how to read and write ... but among their ugly beliefs is this, that the intellect and virtue of their wise men are greater than the intelligence of the prophets" भारतीय राष्ट्रवादाचा जसा उदय झाला, तसा मुस्लीम राष्ट्रवादाचा सुद्धा उदय झाला. पण हा प्रवास वेगळ्या दिशांनी जातो. भारत स्वीकारतो तो इहवादी घटनेचा राष्ट्रवाद, मुस्लीम देश स्वीकारतात तो कुराण, हादीस प्रणीत राष्ट्रवाद. अर्थात अनेक मुस्लीम देशांच्या घटना जरी भिन्न असल्या तरी कुरानानी हादीस, शरियाच्या प्रेरणा त्यांना विसरता येत नाहीत. भारत ‘रामायण, महाभारत आणि मनुस्मृती’ विसरून पुढे जाऊ शकला, इस्लामी देश तिथे कमी पडले.

अनेक जे नेते इस्लामी देशांत निर्माण झाले त्यांनी आपला देश आदर्श ‘इस्लामिक स्टेट’ कसा असेल त्याबद्दल विचार केलेला आहे. सर्व मुस्लीम विचारवंत ‘आदर्श इस्लामिक स्टेट’ची निर्मिती कशी करता येईल या विचारानी ग्रस्त झालेले आहेत. अपवाद म्हणून जे नेते ‘सेक्युलर किंवा इहवादी’ म्हणून विकसित झाले ते इस्लामी राष्ट्रात यशस्वी झाले नाहीत. सर्व जग इस्लाममय करणे हे प्रत्येक मुसलमानाचे धार्मिक कर्तव्य आहे. त्याचाच अर्थ जिंकलेल्या प्रदेशावर ‘इस्लामिक स्टेट’ ची स्थापना करणे, हाही त्याच धार्मिक कर्तव्याचा भाग आहे हे आपण लक्षात घेत नाही. 

‘इस्लामिक स्टेट’ ही साधी कल्पना आहे. ज्या प्रदेशावर मुसलमाना व्यक्ती राज्य करतो आहे आणि त्या प्रदेशावर इस्लामी कायदा आहे. त्या राज्याला इस्लामिक स्टेट म्हणतात. इस्लाम आणि मुसलमान दोघांच्याही वैचारिक विश्वाचा आरंभ ‘इस्लामिक स्टेट’ ची निर्मिती कशी करता येईल या एका प्रश्नापासून झाला आहे. 

प्रारंभीच्या काळातील इस्लामी विचारवंत ‘इब्न खल्दून’ पासून ‘अयातुल्लाह खोमिनी’ यांच्यापर्यंत सर्वांनी इस्लामिक स्टेटची स्थापना हेच धेय्य मानले आहे. २०१४ मध्ये अबू-बक्र अल बगदादी यांनी खिलाफत स्थापन केली. त्यांनी काही अतिरेकी कारवाया केल्या, निर्घृण कत्तली बलात्कार केले यासाठी आपण त्यांना दहशतवादी संघटना म्हणतो. पण ‘इस्लामिक स्टेट’चे राज्यकर्ते त्यांच्या कृत्यांना अतिरेकी म्हणत नाहीत, ते त्याला धर्मिक कर्तव्य म्हणतात. वेळोवेळी त्यांनी प्रकाशित केलेल्या पँप्लेट्स मधून किंवा मासिकातून ऑडिओ – व्हिडीओ च्या माध्यमातून त्यांनी हेच सांगितलं आहे की हे धार्मिक कर्तव्य आहे. 

अमेरिका, रशिया, तेल, अणुकरार ही आधुनिक कारणं नव्हती तेव्हा सुद्धा मुसलमानी विचारवंत ‘इस्लामिक स्टेट’ ह्याच धेय्यासाठी लढत होती. काळाच्या प्रवाहात धेय्य गाठण्यासाठीची साधनं बदलणार तशी ती बदलली सुद्धा पण शाश्वत असणारे ‘इस्लामिक स्टेट’ याचा कोणी अभ्यास करायला तयार नाही. इस्लाम मध्ये प्रबोधन का होऊ शकत नाही, याचा कोणी अभ्यास करायला तयार नाही. केवळ अमेरिका आणि पश्चिमी देशांवर या दहशतवादाचे खापर फोडून मूळ प्रश्नांचे आकलन होणार नाही. इस्लामच्या राजकीय आणि धार्मिक इतिहासाचे आकलन झाल्याशिवाय ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया’ चे आकलन अपूर्ण राहणार आहे.   

-       मुकुल रणभोर © 
-       mukulranbhor.blogspot.in
-       mukulranbhor111@gmail.com  

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....