रायगडवर आम्ही गेलो होतो. आणि टिपिकल पुणे ते महाड, महाड ते पाचाड, पाचाडहुन पायथा आणि वर असे नव्हतो गेलो. पुण्यातून आम्ही गेलो पानशेतच्या पुढे घोल नावाचे गाव आहे तिथे. तिथून सह्याद्री उतरत कोकणदिव्याच्या बाजूनी त्या मार्गावरचे कोकणातले पहिले गाव आहे सांदोशी. तिथून चालत छत्री निजामपूर, तिथून रायगडचा पायथा.. असे आम्ही किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा वाजले होते संध्याकाळचे पाच साडेपाच. उन्हाळ्याचे दिवशी होते. त्यामुळे सूर्यास्त व्हायला अजून भरपूर वेळ होता. आमच्या सर्वांच्या डोक्यात हे पक्क होतं कि सूर्यास्त जो बघायचा तो टकमक टोकावरून. मग आम्ही सगळे टकमक टोकावर पोहोचलो. सूर्य शांत होत होता हळूहळू. आमच्यातल्या कोणीतरी सुर्याखाली हाताची बोटं मोजून सूर्यास्ताला अजून किती वेळ आहे वगैरे याचं गणित मांडलं. दिवसभर भरपूर चालून झाल्यामुळे असेल किंवा वातावरण निर्मिती मुळे आम्ही सगळेच शांत होतो. कोणाच्या तोंडून चकार शब्द निघत नव्हता. मध्येच कोणीतरी एखादा शब्द बोलायचा, पण तो तेवढाच. आमच्या मागे इतर पर्यटकांची गडबड सुरु होतीच. पण ते येत होते जात होते. दिवसभर उन्हात चालणं झाल्यामुळे अर्थातच आम्ही सगळे घामानी भिजलो होतो, पण टोकावरच्या संध्याकाळच्या गार वाऱ्यानी बारीक थंडी वाजायला सुरवात झाली होती. पण मुळात दिवस उन्हाळ्याचे असल्याने त्या गारव्यात एक प्लेझंटनेस होता. एकूणच 'ती वेळ पुरिया होती अन झाड मारवा होते'!!
माझ्या डोक्यात एक गाणं सुरु होतं या वेळी. मूळची कविता ब. भा. बोरकरांची आहे. 'संधीप्रकाशात अजून जो सोने' त्याचं गाणं केलं आहे सलील कुलकर्णीने. पण हे एक गाणं असं आहे कि तिथे सुरापेक्षा शब्द जास्त ताकदीचे भासतात. आणि या गाण्याला सर्वात अनुकूल वेळेला आम्ही टकमक टोकावर बसलो होतो. कवी म्हणतोय संधीप्रकाशाच्या वेळी आकाशात पसरणारे सोन्याचे किरंण जेव्हा तरंगत आहेत तेव्हाच मला मृत्यू यावा. 'संधीप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी' या गाण्याचं फर्स्ट इम्प्रेशन 'हे मृत्यूगीत आहे' असा होण्याचा दाट संभव आहे. पण मला हे सर्वात रोमँटिक गाणं वाटलं. याच कारण जेव्हा कवी म्हणतो कि त्यावेळी माझी लोचने मिटुदे, त्यावेळी तो अपेक्षा करतोय कि 'असावीस पास, जसा स्वप्नभास, जीव कासावीस झाल्याविना'
प्रेमाची माझी कल्पना एकदम साधी आहे. 'अॅक्सेप्ट्न्स' हा एकच शब्द पुरेसा आहे त्यासाठी. समोरच्या व्यक्तीचे गुण - दोष, वर्तमान आणि भूत कसही असुदे. मला एखादी व्यक्ती आवडली म्हणजे तिची आयुष्याकडे बघायची दृष्टी आवडली, आणि एकदा आवडली की मी आनंदानी 'अॅक्सेप्ट' करायला तयार आहे का, असेल तर ते प्रेम आहे. प्रेमाची माझी इतकी साधी व्याख्या आहे. ती असताना समोरच्यानी माझ्यावर तसंच प्रेम करावं अशी माझी अपेक्षा नाही. कारण एकतर्फी प्रेम करणं इतकंच आपल्या हातात आहे. त्यामुळे आयुष्य कसं का गेलेलं असेना, शेवटचा एक क्षण त्यावेळी माझ्या पास असावीस इतकीच माझी अपेक्षा आहे. असं कवी सुद्धा म्हणतो. असावीस पास, जसा स्वप्नभास, जीव कासावीस झाल्याविना!!
आणि अशी जर तू शेवटच्या क्षणी पास असलीस तर मला गंगाजलाचीही गरज नाही. तू तुझ्या हातानी काढलेलं विहिरीतलं पाणी सुद्धा चालेल. कवी म्हणतो कि 'थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे'. कवी इतकं सांगतो की तेव्हा तू तुझ्या घरून तुळशीचं पान घेऊन ये. या सगळ्या शब्दात आवेग नाहीये, अस्वस्थता नाहीये. चिडचिड किंवा आक्रोश तर नाहीच नाही. एक साधी अपेक्षा! स्वप्न हा जसा भास आहे त्या प्रमाणे मला तुझ्या अस्तित्वाचा भास झाला तरी चालेल पण तो 'तुझा' असावा.. म्हणजे तिने आलच पाहिजे, त्याशिवाय मी मान टाकणार नाही, वगैरे ब्लॅकमेलचा प्रकार नाही. असावीस पास, जसा स्वप्नभास!! गुलाम अलीची एक गझल आहे, गझलच्या सुरवातीला प्रथेप्रमाणे एक शेर आहे. 'ना उडा यूं ठोकरो से, मेरी खांके कब्र जालीम । येहीं एक रेहे गयी है, तेरे प्यार की निशानी।।' माझी कबर तू पावलांनी झिडकारू नको, किंवा दुर्लक्ष सुद्धा करू नको कारण तुझ्यावरच्या प्रेमाची ती शेवटची निशाणी आहे. भावना हिंदी किंवा इंग्लिशमध्ये व्यक्त केली कि भारी, मराठी मध्ये केली तर भारी नाही का?? बोरकर म्हणतात,
वाळल्या ओठां दे निरोपाचें फूल;
भुलींतली भूल शेवटली
भुलींतली भूल शेवटली
आता आयुष्य तसंही संपलय. तेव्हा निरोप म्हणून एक फुल तरी दे.. शेवटची आठवण म्हणून! सलील कुलकर्णीच क्रिएशन म्हणजे संपूर्ण गाण्याची चाल अतिशय संथ पण मस्त आहे. मागे एकाच तालात तबला सुरु आहे. एकच ताल, कुठेही बदल नाही. शेवटच्या कडव्याला मात्र चाल बदलते. गाण्याचा संपूर्ण मूड बदलून जातो. आणि त्याने म्हंटल पण उत्तम आहे. ज्या वेळेची मी गोष्ट सांगतोय, टकमक टोक आणो तिथली संध्याकाळ तेव्हा सलील कुलकर्णीने हि कविता स्वतःच म्हंटली होती. पण त्यानंतर त्याने हि कविता द ग्रेट आणि लिजंडरी लता बाईंकडून गाऊन घेतली. तीच चाल.. तेच शब्द.. हे गाणं गाताना लता बाईंचं वय ऐंशीच्या पुढे आहे. आवाजातली कंपन गाण्यात जाणवतात. त्यानी ते गाणं अजून 'प्रेममय' झालं आहे. तीच चाल.. तेच शब्द.. पण लता बाईंच्या आवाजात ऐकताना आपल्याला त्यांनी गाजवलेली सहा दशकं, फिल्मी दुनिया, आणि तो जादुई स्वर ऐकू येतो.
आज सुद्धा कोणत्याही प्रसंगी, कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी हे गाणं ऐकलं कि मला आठवतं ते 'टकमक टोक' ती प्लेझंट संध्याकाळ, आणि
वाळल्या ओठां दे निरोपाचें फूल;
भुलींतली भूल शेवटली!!
वाळल्या ओठां दे निरोपाचें फूल;
भुलींतली भूल शेवटली!!
https://www.youtube.com/watch?v=oWoV0O04fSY
ता.क. - फोटो गुगल वरून घेतला आहे!
ता.क. - फोटो गुगल वरून घेतला आहे!
फार सुंदर!
ReplyDelete