Friday, 1 May 2020

#एक_दिवस_एक_गाणं - चांद फिर निकला



मित्र सांगत होता ...

या लॉकडाऊनच्या काळात दिवस आणि वेळ कसा जातो हे सुदैवाने कळत नाही. घरी पुस्तकं खूप आहेत. सुपरफास्ट इंटरनेट आहे. आणि इंटरनेटवर बघायला Amazon, Netflix, Hotstar इत्यादी सुद्धा सगळं आहे. पण पुस्तकांतच वेळ इतका निघून जातो की बाकी कुठे लक्ष द्यायला वेळही मिळत नाही. सगळ्या प्रकारची एक-दोन एक दोन पुस्तकं वाचून झाली. पण वेळ जात नाही तो संध्याकाळचा. सगळ्या आयुष्याचे अस्तित्त्वाचे प्रश्न आठवायला लागतात ते संध्याकाळीच. करियरचे आणि बाकी आयुष्याचे प्रश्न एका बाजूला आणि तिला भेटून आता दीड-दोन महिने होत आले हा प्रश्न एका बाजूला. लॉकडाऊनच्या आधीची शेवटची भेट मिठी मारून झाली होती ते आठवतं आणि हा दर दोन आठवड्यांनंतर वाढत जाणाऱ्या लॉकडाऊनमुळे ते संध्याकाळचे प्रश्न अधिक गंभीर होत जातात. असंच काल फोन आला तेव्हा, 

मित्र सांगत होता ... 

एक दिवस दिवसभर जे काय रुटीन असेल ते करून संध्याकाळचा झोपाळ्यावर बसलेलो होतो. आणि गाणी म्हणायचा मूड झाला. नुकताच हलका पाऊस पडून गेला होता. सहाजिकच गार वारा सुटलेला. आणि मग एक एक गाणी आठवायला लागली. अशी पाच-दहा गाणी झाल्यावर त्यांना या वातावरणाला अनुकूल अशी गाणी आठवणं बंद झालं. त्याने मात्र तो अस्वस्थ झाला. शक्यतो मोबाईलला हात लावायचा नाही असं ठरवून मी झोपाळ्याकडे गेलो होतो. नाईलाजाने मी मोबाईल हातात घेतला. आणि मग एक एक गाणं पाहून म्हणत राहिलो. मग काही जी पूर्ण पाठ होती ती नुसती नावं पाहून म्हणत राहिलो, जी पाठ नव्हती ती ऐकत राहिलो. मग मधूनच एखादा मारवा लागायचा, एखादा शुद्ध सारंग लागायचा. मग एखादं आवर्तन ऐकून पुढचं गाणं मी लावत होतो, कारण गाणी म्हणायचा मूड होता, ऐकायचा नाही. असं करत करत संध्याकाळ उलटून गेली. जेवायची वेळ झाली. पण मैफलीचा मूड जो जमला तो जमलाच. कसे बसे दोन घास खाऊन मी पुन्हा झोपाळ्यावर जाऊन बसलो. आणि मैफल चालू ठेवली. त्या दिवशी एकूण परफेक्ट माहोल जमला होता, कारण पाऊस ही पडून गेला होता,वाराही सुटला होता आणि नंतर आकाशही मोकळं झालं होतं. 

मित्र सांगत होता ...

प्लेलिस्टमधली सगळी गाणी ओळखीचीच होती. एक एक गाणं निवडून प्लेलिस्ट मीच तयार केली होती. कोणत्या गाण्यानंतर कोणतं गाणं लागतं हे सुद्धा मला नीट माहिती होतं. त्यात कोणता पॅटर्न नव्हता. तो मी मुद्दाम तसाच ठेवला होता. त्यामुळे प्लेलिस्टची सुरवात 'प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी' पासून सुरू होईल. मग 'वल्हव रे नाखवा' लागेल. मग 'कितीदा नव्याने' लागेल कदाचित. नंतर 'तेरी झुकी नजर' लागेल, मग कदाचित 'एक चतुर नार' लागेल. मग कदाचित 'पत्ता पत्ता बुटा बुटा' किंवा 'हमरी अटरिया पें.' मध्येच एखादा 'अहिर भैरव' किंवा 'मालकंस' किंवा 'हंसध्वनी' किंवा 'छायानट'. प्लेलिस्टमध्ये हमखास सापडेल असा एखादा 'सारंग', 'मारवा'. पण आता जे गाणं लागलं त्यानी मी व्याकूळ झालो. मी हे गाणं याच्या आधी खूप वेळा ऐकलं होतं. पण आजचा मूड काही वेगळाच होता हे नक्की.. जेवण करून बाकीचे उठून आपापल्या कामाला निघून गेले होते. मी एकटाच बसलो होतो झोपाळ्यावर.

मित्र सांगत होता ...

मी आपला ऐकत होतो. तो म्हणाला, झोपायची वेळ झाली. टेरेसवर गाद्या घातल्या. तो म्हणाला आजूबाजूला घरातले बाकीचे पण झोपलेले होतेच. वर आलेला चंद्र पहिला आणि कानात वाजत असलेले सूर अचानक शब्द होऊन ऐकू यायला लागले. कानाशी येऊन लता मंगेशकर सांगत होती, 'चांद फिर निकला, मगर तुम ना आये, जला फिर मेरा दिल, करू क्या मै हाये' मग तो म्हणाला, मी गाणं बंद केलं आणि गाण्याचा व्हिडीओ लावला. कोणाच्या तरी आठवणीने व्याकूळ झालेली नूतन हे शब्द म्हणत होती. मला अचानक तिची आठवण आली यार. आणि आवेग सहन झाला नाही आणि हुंदका आला. तो फोनवरून हे सगळं सांगत असतानाही मला त्याचा हुंदका ऐकू आला. तो म्हणाला इतके दिवस गाणं ऐकत होतो, पण आजपर्यंत शब्द ऐकलेच नाहीत. 

खूप व्याकूळ होऊन मित्र सांगत होता ...

की, ''अरे तिला म्हणालो होतो मी की माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण तिचं कोणावर तरी वेगळ्यावर प्रेम होतं. मी तिला इतकीही म्हणालो की, माझी काही अपेक्षा नाही तुझ्याकडून. पण आज काय कळलं नाही काय झालं. आज तिची खूप आठवण आली.'' त्याने मला सगळी गोष्ट सांगितली होती. नेमकं काय काय घडलं हे मला माहिती होतं. 'जरासी आहट' मध्ये कसं तिला सारखं असं वाटत असतं की, तो येईल का, तो आला का? तस्म खुर्चीमध्ये तिचा पदर अडकतो. तिला वाटतं तोच आहे. हसून, थबकून ती मागे बघते. कोणी नसतं. तेव्हा ती म्हणते, 

'ये रात केहेती है, वो दिन गये तेरे 
ये जानता है दिल, के तुम नहीं मेरे
खडी हूं मै फिर भी, निगाहे बिछाये
मै क्या करू हाये, के तुम याद आये

या पेक्षा परफेक्ट शब्द माझ्या सिच्युएशनला यापूर्वी कधीही फिट्ट बसले नव्हते.

मित्र सांगत होता ...

डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाण्याची धार लागली होती. पण फक्त चांदण्याच्या प्रकाशात कोणाला कळतंय एवढं. आणि तसंही बाकीचे सगळे झोपलेच होते. हुंदके सुद्धा येत होते. पण मंद गार वाऱ्यात आणि डोक्यावर आलेल्या चंद्राच्या प्रकाशात कोणीही 'जागा' नव्हता. तो म्हणाला, त्यादिवशी मी रात्री तीन-साडेतीनपर्यंत तेवढं एकच गाणं ऐकत होतो. रात्रभर रडत होतो. पहिल्या कवड्यात मला हे लक्षात आलं आहे की, 'ये जानता है दिल, के तुम नहीं मेरे.' माझी याची तयारी झाली आहे न रे, तरी त्यावर पुढच्या कडव्यात ती असं का म्हणाली असेल रे की, 

सुलगते सीने से धुवा सा उठता है
लो, अब चले आओ, के दम घुटता है
जला गये तन को, बहारों के साये
मै क्या करू हाये, के तुम याद आये

मित्र हे सगळं सांगत होता, नूतनची मनाची तयारी झाली होती. तिला माहिती होतं की, तो येणार नाहीये. 'ये जानता है दिल, के तुम नहीं मेरे', तरी सुद्धा त्याला ती का म्हणत असेल की, लो, 'अब चले आओ, के दम घुटता है.'   

मित्र सांगत होता ... 

की, बाकी तू काहीही म्हण, लता मंगेशकरच्या आवाजात काही तरी वेगळीच जादू आहे. मी रात्रभर तेवढं एकच गाणं ऐकत होतो. रात्रभर रडत होतो. तरी गाणं बंद करावं असं वाटलं नाही. दरवेळी ती 'वो दिन गये तेरे' वर जी हरकत घेत होती ती तितकीच जीवघेणी होती. प्रत्येकवेळी ऐकताना 'लो, अब चले आओ'मध्ये कुठेतरी मला आशेचा किरण दिसत होता. 

हाच गाणं आणि आयुष्य यातला फरक आहे, हे मात्र ठामपणे मी त्याला सांगू शकलो नाही.  

(https://www.youtube.com/watch?v=ii8D7gNn318)

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....