Wednesday 19 October 2016

‘मा – मलकत् अयमानुकुम’ ते ‘Revival Of the Slavery Before Hour’

“That which your right hands own’’ (कुरआन ४:३)

प्रस्तावना –

मार्च २०१५ मध्ये न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक लेख प्रकाशित झाला होता. न्यूयॉर्क टाईम्सची एक महिला पत्रकार ‘रुक्मीनी कालीमाचाई’ हिने लिहिलेला ‘I was sold, With a box of Pills’ या नावाचा तो लेख होता. सहज उत्सुकता म्हणून मी तो वाचला. तो लेख होता, इस्लामिक स्टेट ‘याझिदी’ धर्माच्या मुलींना पकडून त्यांचा सेक्स स्लेव्ह म्हणून वापर करतं, त्याच्यापुढे अशा मुलींशी शारीरिक संबंधातून त्या मुली गर्भवती राहू नयेत यासाठी त्यांना गर्भनिरोधक गोळ्यांचा ओव्हर डोस दिला जातो, त्या मुलींचा शरीरावर ओव्हर डोसचे घातक परिणाम होत आहे. मुली गर्भवती राहू नये याचे कारण गर्भवती मुलीशी किमान नऊ महिने शरीरसंबंधांवर मर्यादा येतात. त्या येऊ नयेत म्हणून ‘I was sold, with a box of Pills’.

‘इस्लामिक स्टेट’ या नावाची ‘आपण’ म्हणतो एक दहशतवादी संघटना मध्यपूर्वेत उदयाला आली आहे, रोज सरसकट गावांच्या कत्तली, अतिशय अमानुष पद्धतीने ते लोकांच्या हत्या, सक्तिनी धर्मांतरं आणि बलात्कार, या प्रकारच्या बातम्या आपण बहुतेक रोज वाचतो. पण गुलामगिरीची एक नवीन व्यवस्था त्यांनी उभी केली आहे याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही म्हणून मी विचार केला कि तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या या ‘सेक्स स्लेव्हारी’ या विषयाचा आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाला सुरवात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, कि मराठी पत्रकार आणि विचारवंत यांनी ‘इस्लामिक स्टेट’ आणि त्यांची ‘सेक्स स्लेव्हारी’ हे विषय पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहेत. एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांनी या विषयाचा अभ्यास केला आहे, आणि त्यांना सुद्धा अभ्यासपूर्ण म्हणावे कि नाही अशी शंकाच आहे. युरोप किंवा अमेरिकेला इस्लामिक स्टेटचा थेट धोका असल्यामुळे त्यांनी त्याचा जास्त खोलात शिरून अभ्यास केला आहे. मराठी वाचकांना या विषयाच्या अभ्यासाठी पाश्चात्य साधनांवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी मी त्याचा अभ्यास करायचा ठरवला.

लेखाच्या सुरवातीलाच लेखाच्या शीर्षकाचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. ‘मा - मलकत् अयमानुकुम’ ही संज्ञा स्त्रीच्या गुलामगिरीचे समर्थन करणारी ‘दिव्य कुरआन’ मधली आहे. ‘मा - मलकत् अयमानुकुम’ याचा अर्थ होतो - विवाह झालेल्या स्त्री शिवाय युद्धात कैद होऊन आल्या असतील व युद्ध कैदींची अदलाबदल न होण्याच्या स्थितीत शासनाकडून लोकांत वाटल्या गेल्या असतील. प्रेषित महंमद पैगंबरयांच्या आयुष्यातील ‘मदिना’काळात कुरआन मधील ही चौथी ‘सुरह’ अवतरीत झालेली आहे. या चौथ्या सुराहतील तिसरी आयात हे सांगते. म्हणजे इसवीसनाच्या सातव्या शतकात ही व्यवस्था निर्माण झाली. आणि ‘इस्लामिक स्टेट’ यांनी त्यांच्या ऑक्टोबरच्या ‘दबिक़’ या मासिकातून अशी गुलामगिरीची व्यवस्था कायदेशीर आहे, असं सांगणारा लेख प्रकाशित केला. त्या लेखाचे नाव होते ‘Revival of the Slavery before Hour’. सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे, कि सातव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत गुलामगिरी कायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.   

इस्लामिक स्टेट म्हणजे काय?

एक दहशतवादी संघटना, या पलीकडे लोकांना फारशी याबद्दल माहिती नाही. तेव्हा मूळ विषयामध्ये शिरण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी समजावून घेणे आवश्यक आहे. इतिहासाच्या दोन प्रवाहातून या इस्लामिक स्टेटची निर्मिती झालेली आहे. आपल्या काळाच्या दृष्टीने अलीकडचा प्रवाह म्हणजे ‘तेलाचे राजकारण’ त्यातून झालेली ‘दोन गल्फ युद्ध’ याचा इस्लामिक स्टेटच्या निर्मितीमध्ये दुर्लक्ष न करता येण्याजोगा वाटा आहे. २००३-०४ मध्ये दुसऱ्या गल्फ युद्धाच्या वेळी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली ‘नाटो’ इराकमध्ये उतरलं त्यांनी लोकशाही स्थापना करण्याच्या हेतूनी ‘सद्दाम हुसेन’ची हुकुमशाही राजवट उलथवून टाकली आणि लोकशाही राज्यस्थापनेचे प्रयत्न केले. २०१० च्या वसंत ऋतूमध्ये ट्युनिसीयामध्ये लोकशाहीसाठी क्रांतीला सुरवात झाली. आणि एकामागून एक सर्व अरब देशांमध्ये त्या क्रांतीची लाट पोहोचली. ट्युनिसीया, इजिप्त, लिबिया, सिरीया, येमेन, कुवेत, लेबेनॉन, ओमान, बहारीन, सौदी अरेबिया. त्या क्रांतीमुळे सर्व देशात गृहयुद्ध सुरु झाली. अंतर्गत राजकीय पोकळी निर्माण होण्याचे प्रकार या सर्व देशात झाले. या ‘कलह’ काळात अनेक गट अर्थात उदयाला आले. देशात तयार झालेली राजकीय पोकळी भरून काढून सत्तेमध्ये वाटा मिळावा हा एक सामान्य हेतू बहुतेक सर्व गटांचा होता. अशा गटांमध्येच इराक आणि सिरीयामध्ये ‘इस्लामिक स्टेट’ निर्माण झाली. सुरवातीला केवळ ‘इस्लामिक स्टेट’ असे नाव असलेली ही संघटना इराक आणि सिरीयाच्या काही भागांवर राज्य करण्याइतकी मोठी झाली. तेव्हा त्यांनी पूर्वीचे नाव बदलून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम/लेव्हेंट (म्हणजे सिरीया, शाम, लेव्हेंट ही एकाच प्रदेशाची नावं आहेत)’ हे नाव धारण केलं. २०१४ च्या जून मध्ये त्यांनी स्वतंत्र ‘खिलाफतीची’ स्थापना केली. तिथून पुढे आजच्या तारखेपर्यंत ती खिलाफत राज्य करते आहे.

इस्लामिक स्टेटच्या निर्मितीमधला हा एक प्रवाह आहे. दुसरा प्रवाह जास्त महत्वाचा आणि दुर्लक्षित आहे. इस्लामिक स्टेट म्हणजे काय? म्हणजे जिथे इस्लामचं राज्य आहे. इस्लामचं राज्य म्हणजे काय, जिथे राजा किंवा राज्याचा प्रमुख मुसलमान आहे. केवळ राजा मुसलमान असून भागात नाही. राज्याचे कायदे आहेत आणि राजा मुसलमान असेल तर त्याला 'इस्लामिक स्टेट' म्हणत नाहीत. मग कायदे कोणते पाहिजेत, तर कायदा पाहिजे 'शरिया.' आता शरिया म्हणजे काय? सर्वात क्लिष्ट विषय इथून सुरु होतो. प्रेषित महंमद पैगंबर यांच्या मृत्यनंतर 'अबू-बक्र' हा पहिला खलिफा झाला. अजून ‘शरिया’ लिखित स्वरुपात तर नाहीच पण अस्तित्वातही नव्हता. पैगंबर यांचा काळातही शरिया अस्तित्वात नव्हता. कारण तेव्हा अजून ‘कुराण’चीच निर्मिती सुरु होती. मुद्दा हा आहे की पैगंबर यांच्या काळात ‘शरिया’ कायदा अस्तित्वातच नव्हता. प्रेषितांच्या मृत्यनंतर झालेले पहिले चार खलिफा इस्लामच्या इतिहासात आदर्श मानले जातात. त्या चार पैकी दोघाजणांचे कुरआन नुसार राज्य करत नाहीत, इस्लामिक स्टेटची निर्मिती करत नाहीत, म्हणून खून झालेले आहेत.  आता अल्लाहनी सांगितल्याप्रमाणे म्हणजेच कुरआन प्रमाणे, म्हणजे नेमकं कसं? हे कोणालाही माहिती नाही. जसं अल्लाह कोण हे कोणालाही माहिती नाही तस अल्लाह्नी सांगितल्याप्रमाणे म्हणजे काय हेही कोणालाही माहिती नाही. पण या आदर्श समजल्या जाणाऱ्या पहिल्या चार खलिफांनंतर खलिफा झालेल्या जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या खालीफांनी इस्लामचा अभ्यास असलेल्या पंडितांना एकत्र आणून राज्य कसं चालवलं पाहिजे, याचे नियम लिहून घेतले. आणि For The First time in the history of Islam लिखित कायदा निर्माण झाला. प्रेषित म्हणून आलेल्या महंमद पैगंबर यांनी इ.स. ६१० मध्ये इस्लामची स्थापन केली. इ.स. ६३२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग सुरु होतो खालीफांचा काळ. इस्लामच्या इतिहासामध्ये ज्या खलिफांना सर्वात आदराच स्थान आहे अशा चार खालीफांचा काळ सुरु होतो. तो आहे इ.स. ६३२ ते इ.स ६६१. या चार पैकी दोन खालीफांचा खून ‘इस्लामिक स्टेट’ ची निर्मिती करत नाही म्हणून करण्यात आलेले आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. या चारही खालीफाना इस्लामच्या इतिहासामध्ये सर्वात आदराचं स्थान आहे. ‘इस्लामिक स्टेट म्हणजे मूळ कुरआनहदीस प्रमाणे चालणारे शासन. याचे पुरावे मी देण्याची गरज नाही, कारण इस्लामिक स्टेटनी असे पुरावे उपलब्ध करून देलेले आहेत.

तेलाचे राजकारण – अमेरिका इराक युद्ध – ओट्टोमान साम्राज्याचा पाश्चात्यांनी केलेला पराभव आणि मूळ कुरआनआणि हादीसनुसार चालणारे राज्य निर्माण करण्याची १४०० वर्षाची प्रेरणा या दोन इतिहासाच्या प्रवाहातून इस्लामिक स्टेट ची निर्मिती झालेली आहे.

याझीदी कोण?

इराकच्या उत्तरेला असलेल्या ‘माउंट सिंजार’ या भागावर इस्लामिक स्टेटने २०१४ ऑगस्ट मध्ये हल्ला केला. आणि तो भाग ताब्यात घेतला. या ‘सिंजार’ पर्वताच्या आसपास ‘याझीदी’ धर्माचे लोक राहतात. दोन दृष्टीकोनातून ‘याझिदी’ धर्माचा आणि धर्मियांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. एक इस्लामिक स्टेटच्या नजरेतून आणि एक बिगर इस्लामी नजरेतून.

बिगर इस्लामी नजरेतून याझिदी –

इस्लामपूर्व काळातील पारशी किंवा ज्यू टोळ्यांप्रमाणे शांत व गरीब असणारा त्याच परंपरेतील ‘याझिदी’ हा एक धर्म आहे. पाश्चिमात्य जगातील इतर सर्व धर्माप्रमाणे हा सुद्धा एकेश्वरवादीच धर्म आहे. एकमेव ‘ईश्वर’ हा जगाचा निर्माता आहे. तोच या जगाचा नियंता आहे. सर्व प्राणीमात्रांच्या भल्याबुऱ्याला तो एकमेव ईश्वर जबाबदार आहे. याझिदी धर्म असे मानतो कि त्या एकमेव ईश्वराने जगाच्या नियंत्रणासाठी सात देवदूतांची नेमणूक केली आहे. त्या सात देवदूताचा प्रमुख आहे ‘मलेक तौस’ मोराच्या रुपातील देवदूत. जगातील बहुतेक सर्व ठिकाणी ज्याप्रमाणे सूर्याची पूजा होते, तशीच याझिदी सुद्धा सूर्याची पूजा करतात. याझिदींच्या अनधिकृत झेंड्यावरही ‘सूर्य’ आहे. पारशी, याझिदी हे दोन्हीही इस्लामपूर्व काळातील मेसोपोटेमिया परंपरेतील धर्म आहेत. या धर्मातही उतरंडीवरील वर्ग व्यवस्था प्रस्थापित आहे. इराकमध्ये मोसूलच्या उत्तरेला शेख-अदि-इब्न मुसाफिर यांची मशीद आहे, त्याचबरोबर सिंजर पर्वतांमध्ये ‘चार्मेरा’ हे ठिकाण अशी दोन याझिदिंची तीर्थक्षेत्रं आहेत. याझिदी स्वतःला आदम किंवा अॅडम (आद्य प्रेषित. पृथ्वीवरील ईश्वराने किंवा अल्लाहने निर्माण केलेला पहिला मानव. पहिला प्रेषित. ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम हे तिन्हीही धर्म हीच परंपरा मान्य करतात) यांचे सुपुत्र म्हणवतात. बाकीचा सर्व मानव समाज अॅडम आणि इव्ह या दोघांची मुलं-बाळं आहेत, परंतु याझिदी हे केवळ अॅडमचे सुपुत्र आहेत, अशी याझिदिंची श्रद्धा आहे. जगाच्या पाठीवर आठ ते पंधरा लाख इतकीच याझीदिंची संख्या आहे. पण मुख्य याझिदी बहुल भाग इराकच्या उत्तरेकडील सिंजर पर्वताच्या जवळचा आहे. भारतात किंवा कोणत्याही सहिष्णू वातावरणात वाढलेला माणूस कोणत्याही दुसऱ्या धर्माकडे ‘उपासनेचा वेगळा’ मार्ग असेच पाहील. धर्माच्या तौलनिक अभ्यासात असा दृष्टीकोन एकांगी राहील. तेव्हा इस्लामिक स्टेट या याझिदिंकडे कोणत्या नजरेतून पाहते ते सुद्धा अभ्यासणे महत्वाचे आहे.

इस्लामी नजरेतून याझिदी –

(पुढचे सर्व मत इस्लामिक स्टेटचे आहे, माझे नाही) याझिदी स्वतःला अॅडमचे सुपुत्र म्हणवतात, परंतु इतिहासाच्या प्रवाहामध्ये त्यांनी पूजा करण्यासाठी ‘इब्लीस’ या देवाची निर्मिती केली. अल्लाहने (एकमात्र ईश्वराने) याझिदींच्या सात देवदूतांना अॅडमला (आद्य प्रेषिताला) दंडवत घालायची आज्ञा केली. शरण जायला सांगितले. तेव्हा त्या देवदूतांनी अल्लाहच्या या आज्ञाचे पालन केले नाही, तर उर्मटपणे उल्लंघन केले. शरण न जाण्यातच त्यांनी समाधान मानले, तेच खरं सत्य मानले. इतका धर्मद्रोह करूनही याझिदिंना असे वाटते कि अंतिम निर्णयदिनी अल्लाह त्यांना माफ करेल. अज्ञानातून त्यांनी ‘इब्लीस’ची निर्मिती केली आहे. सत्याचे ते रूपक आहे, असे याझिदी मानतात. इस्लामिक स्टेट त्यांच्या ‘दबिक़’ या मासिकातून असा प्रश्न विचारते की, अल्लाहप्रती या पेक्षा उर्मटपणा आणि धर्मद्रोह कोणता असू शकतो? १४०० वर्षापूर्वी अल्लाहने त्याच्या पुस्तकात (म्हणजे कुरआन मध्ये) सांगितले आहे कि, ‘पवित्र (निषिद्ध) महिना संपल्याक्षणी अनेकेश्वरवाद्यांना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहा. मग त्यांनी पश्चाताप व्यक्त केला, नमाज कायम केली आणि जकात (जिझिया) दिली तर त्यांना सोडून द्या’ (अत्-तौबाह् या सुरहमधील पाचवी आयात, यातून हे स्पष्ट होऊ शकेल की २०१५ च्या ‘रमजान’नंतर जगात अनेक ठिकाणी इस्लामिक  स्टेटचे हल्ले अचानक वाढले कसे?). आणि अल्लाहने अशी आज्ञा देऊनही १४०० वर्ष सलग इराक आणि शाम (म्हणजे सिरीया) भागात या ‘काफिरांचे’ (म्हणजे याझिदिंचे) असलेले अस्तित्वसुद्धा अंतिम निर्णय दिनी मुसलमानांना अडचणीचे ठरणार आहे. अंतिम निर्णय दिनी अल्लाह जेव्हा विचारेल कि ‘हे’ काफिर अजून जिवंत कसे तेव्हा मुसलमान काय उत्तर देणार आहेत?

सरसकट कत्तल नाही –

इस्लामिक स्टेट याझिदिंकडे या नजरेतून बघते. इस्लामिक स्टेटनी जेव्हा उत्तर इराकमधील हा सिंजर पर्वतांचा प्रदेश ताब्यात घेतला तेव्हा या ‘पागन’ लोकसंख्येशी त्यांचा संपर्क आला. त्यावेळी ती वरची आयात डोक्यात असूनही इस्लामिक स्टेटनी ताब्यात आलेल्या याझीदिंची सरसकट कत्तल केली नाही. आधी इस्लामिक स्टेटमधील ‘शरिया’चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘याझिदी’ हा विषय संशोधनासाठी देण्यात आला. इस्लामच्या वैचारिक चर्चाविश्वात एक प्रश्न अनेक वर्ष अनुत्तरीत आहे, तो म्हणजे ‘याझिदीं’शी कोणत्या पद्धतीने वागायचं? याझिदी धर्म हा सुरवातीपासून काफिरच आहे कि काळाच्या ओघात मुळचा एकेश्वरवादी असलेला अनेकेश्वरवादी झाला. या दोन परंपरांशी वागण्याचे मार्ग कुराण, हादीसनुसार वेगवेगळे आहेत. त्यामुळे ‘याझिदी’ कोणत्या परंपरेतून येतात हे आधी स्पष्ट होणे आवश्यक आहे. संशोधनातून असे निष्पन्न झाले कि ‘याझिदी’या धर्माचे पूर्ण इस्लामीकरण कधीही झाले नाही, त्यांनी कधीही इस्लामचा स्वीकार केला नाही. क्रॉसची पूजा करणारे ख्रिश्चन सुद्धा याझिदिंना सैतानाची पूजा करणारे म्हणतात. एकदा याझिदी कोणत्या परंपरेतून आले आहेत, हे सिद्ध झाल्यावर मग शरियतनुसार स्त्रिया आणि मुलं यांना वेगळं काढण्यात आले. ज्या पुरुषांनी पश्चाताप व्यक्त केला आणि धर्मांतर केले ते वाचले. ज्यांनी इस्लाम स्वीकारला नाही त्यांना मृत्युदंड देण्यात आला. ‘सिंजर’ ताब्यात घेण्याच्या कारवाईमध्ये जे योद्धे लढले त्यांना युद्धलुट मिळाली. त्यामध्ये स्त्रिया आणि इतर स्थावर संपत्ती होती. एकूण युद्धलुटीपैकी एक पंचमांश त्या लढलेल्या योद्ध्यांमध्ये वाटून टाकण्यात आली. आधुनिक काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर ‘गुलाम’ करण्याची प्रक्रिया जगात इतरत्र कुठेही झालेली नाही. कदाचित नायजेरिया आणि फिलिपाईन्समध्ये तेथील मुजाहिदीनांनी ख्रिश्चन स्त्रिया आणि मुलांना गुलाम केलं होतं, त्याच्या क्रमांक दुसरा लावता येईल. (‘दबिक़’या मासिकाच्या चौथ्या अंकात हे सर्व सांगण्यात आले आहे)

जाहीरनामा :

इस्लामिक स्टेटची ‘अल-खानसा’ या महिला गटाने इस्लामिक स्टेट मधील मुस्लीम स्त्रियांसाठी एक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. ‘Women Of the Islamic state’ मध्ये मांडण्यात आलेली तत्व ही इस्लामिक स्टेटची मार्गदर्शक तत्व म्हणता येतील. इस्लामिक स्टेट मधील मुस्लीम स्त्रियांचे स्थान काय आहे हे सांगणारा हा जाहीरनामा आहे. जाहीरनामा सांगतो ‘मानवी शरीराचे इंच इंच झाकले जाईल असे काळे कपडे स्त्रियांनी घातले पाहिजेत. यामध्ये पाय झाकणाऱ्या बुटांचा सुद्धा समावेश आहे. त्याचप्रमाणे हात व हातांची बोटे झाकली जातील असे ग्लोव्हज सुद्धा त्यांनी वापरले पाहिजेत. महिलांनी लपलेले असावे आणि मस्तक अच्छादित ठेवावे. आधुनिक पाश्चात्य कपड्यांच्या दुकानांवर बंदी असावी, कारण ते सैतानाचे कर्म आहे. प्रत्येक स्त्रीचे मुलभूत कर्तव्य आहे की तिने आई बनावे आणि आपल्या नवऱ्याची आणि मुलांची सेवा करावी. स्त्रिया अपवादात्मक परिस्थितीमध्येच घराच्या बाहेर पडू शकतात. उदा. जिहाद करण्यासाठी कोणी पुरुष उपलब्धच नसतील तर स्त्रिया घराबाहेर पडू शकतात. केवळ जिहाद करण्यासाठी,किंवा धर्माचा अभ्यास करण्यासाठी, (धर्म अर्थात इस्लाम) या जाहीरनाम्यात कुरआनमधल्या आयतींचे संदर्भ देऊन मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

या जाहीरनाम्यात मुलींनी कोणत्या वयात काय प्रकारचे शिक्षण घेतले पाहिजे याचे स्पष्टीकरण आलेले आहे. वय वर्ष ७ ते ९ या वयाच्या मुलींनी तीन प्रकारचे पाठ घेतले पाहिजेत. एक – समज (Fiqh – Undrestanding) धर्म (Religion) दोन – कुरआनआणि अरबी साहित्याचे लेखन आणि वाचन आणि शास्त्र (Accounting आणि नैसर्गिक शास्त्र) १० ते १२ वर्षाच्या मुलींनी मुख्यतः धर्माच्या अभ्यासावर भर दिला पाहिजे. मुख्यतः त्याची समज (Fiqh) आणि त्याचबरोबर लग्न आणि घटस्फोटासंबंधीच्या दिल्या गेलेल्या निर्णयांचा अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर विणकाम, शिवणकाम आणि स्वयंपाक हा सुद्धा मुलींच्या शिक्षणाचा भाग असला पाहिजे. १३ ते १५ वर्षाच्या मुलींसाठी मुख्य भर ‘शरियाच्या अभ्यासावर’ असेल. आणि मुलांचे संगोपन कौशल्य विकास यावर असेल. या वयोगटात शास्त्राचा अभ्यास कमी होईल कारण गरजेपुरते शास्त्र त्यांचे आधीच्या गटात शिकून झाले आहे. त्याचप्रमाणे इस्लामचा इतिहास आणि प्रेषितांचे आयुष्य आणि त्यांचे अनुयायी हा भाग या वयात शिक्षणात असला पाहिजे.

मुलींच्या लग्नाचे योग्य वय ९ असल्याचे जाहीरनाम्यात म्हंटले आहे. तथापि वयवर्ष १६-१७ पर्यंत लग्न झाले पाहिजे असा जाहीरनाम्याचा आग्रह आहे. कारण तोपर्यंत मुली Young & Active असतात.

अत्याचारांचे प्रकार :

ज्यावेळी सिंजार ताब्यात घेण्यात आलं तेव्हा १४ वर्षावरील पुरुषांची कत्तल करण्यात आली. आणि सर्व स्त्रियांना गुलामाच्या बाजारात उभं करण्यात आलं. गुलामांच्या बाजाराची संपूर्ण व्यवस्था इस्लामिक स्टेटकडे पूर्वीपासून तयार होती. त्याचं अर्थशास्त्र त्यांच्याकडे तयार होतं. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा व्यवस्थेमधील ढिसाळपणा गुलामांच्या बाजारात दिसत नव्हता, असं पिडीत मुलीने सांगितले आहे. शरीराचा आकर्षकपणा आणि स्तनांचा आकार लक्षात यावा म्हणून गुलामांच्या बाजारात मुलींना विवस्त्र करण्यात आलं होतं. गुलाम म्हणून विकत घेण्यापूर्वी स्त्रियांची नाविन्यता चाचणी (Verginity Test) करण्यात आली. आकर्षकता, स्तनांचा आकार आणि नाविन्यता या निकषांवर मुलींची किंमत ठरवून त्यांची विक्री करण्यात येत होती. त्यामध्ये सुंदर आणि लहान मुलींसाठी सर्वात जास्त किमंत आकारली गेली.

या सर्वच नियोजन आधीच तयार होतं हे म्हणण्याचं कारण म्हणजे वरील निकषांच्या आधारावर आणि वयोमानाप्रमाणे खरेदी किमतीचा तक्ता इस्लामिक स्टेटने या पूर्वीच प्रकाशित केला होता. ९ वर्षाच्या मुलीला १७० अमेरिकी डॉलर, वयवर्ष १० ते २० च्या मुलींना १३० अमेरिकी डॉलर, आणि सर्वात कमी म्हणजे ९० अमेरिकी डॉलर २० ते ३० वयोगटातील मुलींना. ही किंमत अर्थात प्रत्येक मुलीनिहाय बदलू शकते. मुलींची पैशाच्या भाषेतील किंमत Flat chest & unattractiveness यामुळे कमी होऊ शकते. हे सर्व पाहून ‘लैंगिक अत्याचार’ विषयी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या एका विशेष प्रतिनिधीने आपले मत व्यक्त केले आहे, ती म्हणते,ISIS has institutionalised rape and sex slavery as a terror tactic. We have heard of 20 year old girl who was burned alive because she refused to perform extreme sexual act”.

पिडीत मुलीची मनोगतं सर्वत्र उपलब्ध आहेत. त्या त्यांचे भयंकर अनुभव सांगतात. दर वेळेला जेव्हा एखादं जिहादी मुलीवर अत्याचार करायला यायचा तेव्हा तो प्रार्थना करायचा. तो त्या मुलीला सांगायचा की ही ‘इस्लामी पूजा’(Ibadah) आहे. जिहादी योद्ध सांगायचा की मी मुलीशी संभोग केल्याने मी अल्लाच्या जवळ जाणार आहे. आणि म्हणून स्त्री गुलामाबरोबर समागम हे पुण्य आहे, असही तो सांगायचा. १९ वर्षाची मुलगी तिचे गुलामांच्या बाजारातील अनुभव सांगते, ती सांगते, “जेव्हा माझी वेळ आली तेव्हा त्यांनी मला चार वेळा उभं राहून दाखवायला सांगितलं, त्यांनी मला स्वतःभोवती फिरून दाखवायला सांगितलं. त्यांनी मला माझ्या शेवटच्या मासिक पाळी बद्दलसुद्धा अनेक प्रश्न विचारले. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की मी गर्भवती तर नाही ना!” गर्भवती स्त्री बरोबर समागमाची परवानगी इस्लाम/शरीय देत नाही असं इस्लामिक स्टेटच म्हणणं आहे. एका 34 वर्षाच्या याझीदी स्त्रीवर अनेकदा अत्याचार झाले, पण तिने आपल्या डोळ्यांसमोर १२ वर्षाच्या मुलीवर होणारे अत्याचार पहिले आणि ती स्वतःचं दुःख विसरून गेली, असं तिने सांगितलं आहे. त्या १२ वर्षाच्या मुलीचे हाल ती 34 वर्षाची स्त्री सांगते आहे. “He destroyed her body. She was badly infected. The fighter kept asking me, ‘Why does she smell so badly? and I said he has infection on the inside, You need to take care of her, he ignored the girls’ agony. continuing the ritual of praying before and after raping the child. I said him she is just a little girl. he replyed, No, She is not a little girl. she is slave. and she knows exactly how to have a sex. and having sex with her pleases god.”

आपण रोज परदेशी मिडिया सांगताना ऐकतो कि अमेरिकी आणि नाटो सैन्य मिळून इस्लामिक स्टेटच्या भागावर हवाई हल्ले करते आहे, आणि इस्लामिक स्टेटची ताकद कमी होते आहे. पण आता मार्च मध्ये ‘रोज तीन वेळा असे सलग १६ महिने’ अत्याचार सहन केलेली २० वर्षाची याझिदी मुलगी इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून सुटून आली. तिने सांगितलं कि, मोबाईल फोन किंवा तत्सम गोष्टींच्या बदल्यात तिला अनेक वेळा विकण्यात आलं. ज्या माणसाच्या हाती ती गुलाम म्हणून होती, त्याची बायको सुद्धा नवऱ्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून त्या याझिदी मुलीला मारत असे. ती सांगते कि तिच्या बहिणींसमोर सुद्धा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. काहीवेळा तर सामुहिक बलात्काराची परिसीमा इतकी अमानुष असायची कि ती बेशुद्ध पडायची, पण अत्याचार थांबायचा नाही. ही मुलगी सांगते, कि तिने स्वतःला अनेकदा संपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. काही पाण्यामध्ये बुडवून घेतलं, कधी स्वतःला विजेचा शॉक लावून घेतला. पण त्या सर्वातून ती दुर्दैवानी वाचली, आणि तिच्या नशिबी गुलाम राहणेच येत होत. शेवटी, तिच्या भावाने तिला इस्लामिक स्टेट कडून तीस हजार डॉलरला विकत घेतलं. भावानी स्वतःच्या बहिणीला पैसे देऊन विकत घेऊन सोडवलं.

मी या गोष्टी मध्ययुगातल्या सांगत नाही. किंवा अमेरिकेच्या गृहयुद्धापूर्वी अनेक उदारमतवादी अमेरिकन्स निग्रों गुलामीतून मुक्त करण्यासाठी विकत घेत असत. मी अडीचशे वर्षापूर्वीच्याही गोष्टी सांगत नाहीये. मार्च २०१६ मधली घटना सांगतो आहे.

एका कुटुंबातील ९ स्त्रिया इस्लामिक स्टेटनी पकडून नेल्या. पाच पुरुषांची कत्तल केली. कुटुंबातील एकच माणूस जिवंत राहिला. सुदैवानी तो कुटुंबप्रमुख होता. त्यानी त्याच्या चार मुली आणि दोन बायका यांना पैसे देऊन विकत घेतलं. मुलाखतीमध्ये तो सांगतो, कि एकदम पैसे उभे करणं सुद्धा त्याला शक्य नव्हतं. मग एकदा कर्ज काढून दोन मुली त्याने सोडवल्या, मग काही महिने थांबून पुन्हा कर्ज काढून पुढच्या मुली सोडवल्या. तो सांगतो, घरातल्या ६ मुली तरी सुटल्या, पण उरलेल्या तीन जणींचा काहीही पत्ता नाही, त्या जिवंत आहेत, कि मेल्या आहेत, जिवंत असतील तर काय सहन करत असतील. तो सांगतो, ‘कि मुली सोडवून आणल्या पण आता मी सगळं गमावून बसलो आहे, डोक्यावर प्रचंड कर्ज आहे. मुली अजून त्या धक्क्यातून बाहेरही आल्या नाहीत. पण आता त्यांना जगवण्यासाठी सुद्धा माझ्याकडे काहीही शिल्लक नाही’ मुलाखतीमध्ये शेवटी तो सांगतो की, ‘आम्हाला जगायचं आहे, आम्ही कधीही कोणाला कोणताही त्रास दिलेला नाही. तरी आम्हाला हे सहन करावं लागतं आहे!’

३ ऑगस्ट २०१४ मध्ये जेव्हा इस्लामिक स्टेटने याझीदिंचा प्रदेश ताब्यात घेतला तेव्हा पकडून, गुलामांच्या बाजारात ज्या मुलीला उभं केलं गेलं. जीची Sex Slave म्हणून विक्री झाली, जिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आला, ती कशीबशी इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून सुटून जर्मनीमध्ये आश्रयाला गेली. संयुक्त राष्ट्रसंघासमोर त्या ‘धाडसी’ मुलीचे मनोगत झाले. त्यामध्ये तिने तिच्यावर झालेले अत्याचार आणि आंतरराष्ट्रीय समूहाला याझीदींच्या सुटकेसाठी काय काय करता येऊ शकत, यावर ती मुलगी बोलली आहे. साधारण १० मिनिटांचे ते भाषण आहे. त्यामध्ये ती सांगते, कि आम्ही अल्लावर श्रद्धा ठेवत नाही, म्हणून जणीवपूर्वक आमच्यावर अत्याचार करण्यात आले. ते केवळ आम्हाला मारायला आले नव्हते, त्यांना स्त्रिया आणि मुली गुलाम म्हणून हव्या होत्या. या सर्व गुलामांच्या देवघेवीमध्ये नियोजनाचा अभाव दिसत नव्हता, हे सर्व सुनियोजित होतं. माझ्या डोळ्यासमोर माझ्या सख्ख्या भावांना गोळ्या घालून मारण्यात आला. मला माझा धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. माझ्या बाकीच्या धर्मबांधवाना दोनच पर्याय देण्यात आले होते, धर्मांतर किंवा मृत्यू. सुदैवानी मी सुटू शकले, परंतु अजूनही ३४०० पेक्षा जास्त स्त्रिया त्या राक्षसांच्या हातात आहे, जागतिक समूहाने लवकरात लवकर आम्हाला स्वाभिमानाने पुन्हा जगता यावं यासाठी काही तरी प्रयत्न केले पाहिजेत.’

६ जुलै २०१६ रोजी ‘टेलीग्राम’ सोशल मिडिया अॅप वर ’१२ वर्षाची सुंदर, व्हर्जिन’ मुलगी विकायची आहे, अशी जाहिरात झळकली. त्यासाठी बोली लागणार आहे, पहिली बोली बारा हजार डॉलरची लागली आहे, असं जाहिरातीत सांगितलं होतं. पुन्हा सांगतोय, कि या गोष्टी मध्ययुगातल्या नाहीत, २०१६ या वर्षातल्या आहेत.

शंका निरसन –

ज्या वेळी ही सर्व व्यवस्था निर्माण होत होती, त्याचं वेळी म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१४ याच काळात इस्लामिक स्टेटकडून अधिकृत पातळीवर याचे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. जसा ‘दिबाक’या मासिकातील लेख आहे त्याचं प्रमाणे एक माहिती पत्रक इस्लामिक स्टेटने प्रकाशित केलेले आहे. त्यामध्ये Sex Slavery संदर्भात सर्व उपस्थित होऊ शकतील अशा शंका आहेत, आणि त्यांची उत्तरही दिली आहेत. अर्थात मूळ माहितीपत्र अरेबिक लिपीमध्ये आहे, परंतु त्याचे इंग्लिश भाषांतर उपलब्ध आहे. त्या माहितीपत्रामध्ये एकूण २७ प्रश्न आहेत. कोणताही प्रश्न सुटणार नाही असा त्याचा फक्त सारांश सांगतो. साधारणपणे एक व्यवस्था उभी राहिल्यानंतर काही शंका सुद्धा निर्माण होतात, काही प्रश्न तयार होतात, असे काही प्रातिनिधिक प्रश्न आणि त्यांची उत्तरं असं या माहितीपत्रकाचे स्वरूप आहे.

इस्लामची भूमी नसलेल्या प्रदेशातील म्हणजे ‘दार-उल-हरब’ मधील स्त्रिया पकडून कैदी बनवण्याची परवानगी त्यांना (म्हणजे मुसलमानांना) आहे, असं ते म्हणतात. त्यांना कैदी बनवण्याची परवानगी मिळते कारण त्या (स्त्रिया) श्रद्धाहीन आहेत. त्यामध्ये ज्यू आणि ख्रिश्चन स्त्रिया सुद्धा येतात. ‘किताबी’ नसलेल्या स्त्रियांचे श्रद्धाहीनत्वच त्यांना कैद करण्याची परवानगी आम्हाला (म्हणजे इस्लामला) देतं, असं ते सांगतात. अनेकेश्वरवाद हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ‘दार-उल-हरब’ मधील कैदी बनवलेली स्त्री जी श्रद्धाहीन आहे (अल-साबी), तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी आम्हाला (इस्लामिक स्टेटला) अल्लाहनेच दिली असल्याचे ते सांगतात. प्रश्न क्रमांक ४ मध्ये अशी परवानगी आहे ह्याचा कुराणमधील आयतीचा संदर्भ दिला आहे. युद्धभूमीतून अशा पकडून आणलेल्या स्त्रियांचे ‘जिहादी योद्ध्यांमध्ये’ इमाम वाटप करतो. वाटून दिलेल्या स्त्रियांची आधी नाविन्यता चाचणी करण्यात येते. जर जिहादी योद्ध्याच्या ताब्यात मिळालेली स्त्री गर्भवती नसेल तर, ताबा मिळाल्याक्षणी तिच्याशी शारीरिक संबध ठेवण्याची परवानगी जिहादी योद्ध्याला आहे, असं ते म्हणतात. आपली गुलाम (स्त्री) गर्भवती राहू नये याची मात्र ‘जिहादी योद्धे’ काळजी घेतात. (I Was sold, with a box of pills या लेखाचा वीच्य हा आहे) अशा ‘अल-साबी’ (‘दार-उल-हरब’ मधील कैदी बनवलेली स्त्री जी श्रद्धाहीन आहे) स्त्रिया विकता येतात. विकत घेता येतात. त्याचप्रमाणे त्या बक्षीस म्हणूनही देता येतात. ‘अल-साबींकडून’ इस्लाम धर्माला आणि जगातिक इस्लामला कोणत्याही प्रकारचा धोका पोचेल अशी शंका जरी आली तरी त्यांना नष्ट करण्याची सुद्धा ‘जिहादी योद्ध्यांना’ परवानगी आहे. जिहादी योद्धा आणि गुलाम स्त्री यांच्या संबंधांतून जन्माला आलेल्या मुलगा/मुलगी सज्ञान (म्हणजे वयवर्ष ९) होईपर्यंत त्याचा संपत्ती म्हणून वापर करता येत नाही. मुलगा/मुलगी सज्ञान होईपर्यंत त्यांना त्यांच्या आईपासून दूर सुद्धा करता येत नाही.

एखादा जिहादी योद्धा मारला गेला, तर त्याच्या अन्य संपत्तीप्रमाणे गुलामांचीसुद्धा वाटणी होईल. मात्र अशा स्त्रीयांबरोबर शरीर संबंध ठेवता येणार नाहीत. तिच्याकडून फक्त सेवा करवून घेणे अपेक्षित आहे, असं ते म्हणतात. जिहादी योद्ध्यांच्या परवानगीशिवाय गुलामांबरोबर शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत. ते दुसऱ्याच्या संपत्तीवरचे अनधिकृत अतिक्रमण समजले जाईल. परंतु ती संपत्ती विकत घेऊन हा प्रश्न सोडवता येईल असे ते म्हणतात.

शरीरसंबंधासाठी योग्य अशा वयात मुलगी आली की तिच्याशी संभोग करावा, मुलगी अजून वयात आली नसेल तर मात्र संभोगाशिवाय तिचा उपभोग घेता येऊ शकतो, असे त्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. शरीरसंबंधांच्या दरम्यान जास्तीत जास्त शरीरसुख देणाऱ्या ‘कोणत्याही’ तंत्राचा वापर पुरुष स्त्री गुलामच्या परवानगीने किंवा परवानगीशिवाय करू शकतो. स्त्री गुलामाला मारहाण करणे सुद्धा क्षम्य मानले आहे. परंतु चेहेऱ्यावर मारहाण करू नये, असा संकेत आहेत. स्त्री गुलाम आपल्या मालकापासून जर पळून जायचा प्रयत्न करत असेल तर तो अक्षम्य गुन्हा मानला गेला आहे, तथापि या गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा कुरआनकिंवा शरियामध्ये ठरवून दिलेली नाही. ती शिक्षा तो मालक स्वतःच्या मर्जीने देऊ शकतो. स्त्री गुलामाबरोबर लग्न सुद्धा करण्याची परवानगी आहे. परंतु दुसऱ्या योद्ध्याच्या स्त्री गुलामाबरोबर लग्न केले तर मात्र शरीरसंबंधाचा अधिकार कायदेशीररीत्या लग्न झालेल्या पुरुषाला मिळेल, मालकाला नाही.

फतवा –

जागतिक वारसा असलेले ‘पालमिरा’ हे शहर इस्लामिक स्टेटनी ताब्यात घेतल्यानंतर उध्वस्त केले होते. इसवीसनाच्या पूर्वीच्या दुसऱ्या सहस्त्रकात हे शहर निर्माण झाले होते. इस्लामपूर्व अरब काळातील मूर्तीपूजा तिथे अस्तित्वात होती. त्यामुळे या शहरातील अनेक जुन्या वास्तू मूर्तीपूजक होत्या. पण २०१६ च्या मे मध्ये रशिया, अमेरिका, नाटो सैन्याच्या कारवायांमुळे इस्लामिक स्टेटला हा प्रदेश सोडवा लागला. त्यावेळी या सैन्यांना इस्लामिक स्टेटनी ‘सेक्स स्लेव्हारी’चे कायदे नियम सांगणारा ‘फतवा’ सापडला. थेट ‘सेक्स स्लेव्हारी’ वरील इस्लामिक स्टेटचा हा दुसरा अधिकृत पुरावा. पाहिलं ते ‘माहितीपत्र’.

‘सेक्स स्लेव्हारी’ या विषयात ‘काय करावं नि काय करू नये’ याचे १५ मुद्दे सांगण्यात आले आहेत. फतवा जानेवारी २०१५ मध्ये जारी करण्यात आला आहे. इस्लामिक स्टेटची ‘कमिटी ऑफ रिसर्च अँड फतवा’ नावाची शाखा आहे, त्यानी काढलेला हा फतवा आहे.

फतवा सांगतो, मासिक पाळी पूर्ण झाल्यावर स्त्री गुलाम पवित्र झाल्याशिवाय तिच्याशी मालकाने संबंध ठेवण्यास मनाई आहे. मासिक पाळी किंवा ती गर्भवती असेल तर तिच्याशी संबंध ठेवता येणार नाही. मुलगा आणि वडील एकाच स्त्री गुलामाबरोबर संबंध ठेवू शकत नाहीत. जर एका स्त्रीचे मालक दोन जण असतील तर तिचा उपयोग ‘जॉईन्ट प्राॅपर्टी’ सारखा वापट होऊ शकतो. मुलगी आणि आई अशा दोघींशीही एकच मालक संबंध ठेवू शकत नाही. जर स्त्री मालकापासून गर्भवती राहिली तर तिला मालकाला वाऱ्यावर सोडून देता येणार नाही. वडिलांच्या गुलामाबरोबर मुलाला संबंध ठेवता येणार नाहीत, त्याचप्रमाणे मुलाच्या गुलामाबरोबर वडिलांना संबंध ठेवता येणार नाहीत.

या फतव्यामध्ये मुख्यतः अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या करण्यास मनाई आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, जगात सर्वच ठिकाणी युद्धलुट म्हणून स्त्रिया आणि मुलं गुलाम ठेवण्याची पद्धत रूढ होती. त्याच्यावर होणारे अत्याचार सुद्धा जाहीर होते. प्राचीन काळापासून ते युद्धातील कैद्यांचे कायदे तयार होईपर्यंत सर्वच ठिकाणी गुलामगिरी अस्तित्वात होती. पण ‘इस्लाम’ धर्माचे या गुलामगिरीला धार्मिक पाया निर्माण करून दिला. गुलाम स्त्रीला दुय्यम पत्नीचा दर्जा, तिच्यापासून होणाऱ्या संततीची संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी त्या मालकावर सोपवण्यात आली. गुलमगिरीच्या या अशा स्वरूपामुळे आजसुद्धा इस्लामी विचारवंत या प्रकारच्या स्त्रीच्या गुलामगिरीचे समर्थन करताना दिसतात. अल-जझीरा, बगदाद विद्यापीठ इथपासून झाकीर नाईक पर्यंत सर्व इस्लामी बौद्धिक जगतातून या गुलामगिरीचे जाहीर समर्थन होते. इस्लामी धर्मशास्त्राचे पंडित जगातील सर्व इह्लौकिक गोष्टींना धर्मातील संदर्भ देतात, त्याप्रमणे इस्लामिक स्टेट यांनीही मूळ कुरआन आणि हादीसमधील संदर्भ देऊन या गुलामगिरीचे समर्थन केले आहे. प्रत्यक्ष सय्यद मौदुदी आणि ‘हादीस’चे संकलक सहिह बुखारीयांनीही कुरआनमधील अशा आयतींचे समर्थन केलेले आहे. मौदुदी स्त्री गुलामाबरोबर शारीरिक संबंध कायदेशीर असल्याचे घोषित करतात. ‘हादीस’मध्ये प्रेषितांच्या कृती आणि उक्ती येतात. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रेषितांनी स्त्री गुलामाबरोबर शारीरक संबंध ठेवण्याचे समर्थन केल्याचे बुखारी सांगतात.  

सुटकेचे प्रयत्न –

स्वतःच्या मुलींना वडिलांनी पैसे देऊन सोडवून घेतल्याची गोष्ट तर वर सांगितली. असे पैसे देऊन याझिदी मुली सोडवून आणायचे अनेक प्रयत्न इराक आणि शाम (सिरीया) या भागात झाले. कोणत्याही आंतरराष्ट्रीय मदतीशिवाय ‘स्वतःच्या’ बळावर काही लोक एकत्र आले, आणि त्याच्या गटानी आतापर्यंत अडीचशे पेक्षा जास्त याझिदी मुलीना सोडवून आणलं आहे.


पण हे प्रयोग जगासमोर आले. भारतातील योग गुरु श्री श्री रविशंकर यांची स्वयंसेवी संस्था Art Of Living इराक मध्ये मदतकार्य करत आहेत. Art Of Living चे अनेक कार्यकर्ते जीवावर उदार होऊन तिथे मदतकार्य करत आहेत. १० अमेरिकी डॉंलरच्या बदल्यात एका अप्लवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार करण्यात आला होता, त्या मुलीला सोडवण्यात Art Of Living ला यश आलं आहे. त्याचबरोबर अत्यल्प दरामध्ये पाणी आणि अन्न सुद्धा हे कार्यकर्ते उपलब्ध करून देत आहेत.

आधाराची गरज –

साधारण २००० वर्षापूर्वी इस्लामपूर्व अरब टोळ्यांनी पॅलेस्टाईन ताब्यात घेतलं. तिथे असलेल्या ज्यूंना हाकलून दिलं. त्यावेळी ज्यू भारतात आश्रयाला आले. ते अजूनही भारतात आनंदानी राहत आहेत. त्यानंतर इस्लामी आक्रमकांनी पर्शियावर हल्ला केला आणि पर्शिया उध्वस्त केलं. त्यावेळी पारशी लोकं भारतात आले, ते अजूनही भारतात आनंदानी राहत आहेत. ज्यू आणि पारशी आज मूळ भारतीय समाजातून वेगळे काढता येत नाहीत, इतके एकरूप झाले आहेत. हा पूर्वइतिहास लक्षात घेऊन पुन्हा एकदा इस्लामी आक्रमणाला बळी पडलेला ‘याझीदी’ समाज पुन्हा एकदा भारताकडे आशेने बघतो आहे. १ फेब्रुवारी २०१६ रोजी याझीदिंचे एक शिष्टमंडळ ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे’ सरसंघचालक ‘मोहन भागवत’ यांना ‘बंगळूरू येथे भेटले. यामध्ये समान आक्रमणाच्या इतिहासावर, भारताने ज्यू आणि पारशी समाजाला दिलेल्या वागणुकीवर चर्चा झाली. मला याची खात्री आहे की उदय भविष्यात गरज पडली तर ज्यू आणि पारश्यांप्रमाणे भारत ‘याझीदींच्या’ मागे सुद्धा उभा राहील.

समारोप –

एकविसाव्या शतकाच्या या दशकात एक नवीन समस्या जगासमोर उभी राहिली. आतापर्यंत अशा समस्येशी लढण्याची जगाला सवय नव्हती. त्याच्याबरोबर ‘सेक्स स्लेव्हारी’ सारखा अमानुष विषय अचानक एका गटाकडून समर्थनीय मानला जाऊ लागला, हे सगळं खरच कल्पनेच्या पलीकडचं आहे. अचानक उद्भवलेल्या ‘झिका’ या व्हायरस प्रमाणे, इस्लामिक स्टेट या व्हायरस वर सुद्धा जालीम उपाय अजून जगाला सापडलेला नाही. याच मुख्य कारण, अजून रोगाचेच निदान नीट झालेले नाही. अजूनही अनेक अभ्यासक या रोगाला इस्लामचे विकृत रूप म्हणूनच बघत आहेत. ते ही वस्तुस्थिती मान्य करायलाच तयार नाहीत की, इस्लामिक स्टेट मूळ कुरआन आणि हादीस प्रमाणे चालणारे ‘खरे’ इस्लामिक स्टेट आहे. किंवा ते अशी आकांक्षा बाळगतात कि प्रेषित पैगंबर आणि पहिले चार आदर्श खलिफा यांच्या काळात होते त्याप्रमेण हे इस्लामिक स्टेट झाले पाहिजे. त्यामुळे हे सर्वांनी मान्य केले पाहिजे की, मूळ इस्लामी प्रेरणा डोक्यात ठेवून या इस्लामिक स्टेटची निर्मिती झालेली आहे.

सुरवातीला मी जाणीवपूर्वक असे लिहिले आहे, कि या गटाला आपण ‘दहशतवादी’ म्हणतो. त्यांच्या कृती ‘त्यांच्या’ दृष्टीनी दहशतवादी नाहीत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ते जे अत्याचार करतात त्या अत्याचारांना आपण अत्याचार म्हणतो, पण त्याला ते अल्लाहची पूजा म्हणतात. याझिदीमुलीशी शरीर संबंध ही अल्लाहची पूजा आहे असे ते मानतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकांचा अभ्यास जास्त महत्वाचा आहे, आपण काय म्हणतो त्यापेक्षा.

पण ‘सेक्स स्लेव्हारी’ सारखा विषय जेव्हा समोर येतो, तेव्हा धर्मचिकित्सा किंवा मूळ धर्मात आहे किंवा नाही, सारखे प्रश्न उपस्थित न करता त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. वर सांगितल्या प्रकारचे अत्याचार सहन करून बाहेर आलेली मुलगी कशी जगत असेल, ती आता निर्मळ मानाने जगाकडे पाहू शकेल कि नाही, पुरुष जातीकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन काय झाला असेल. माझं अस स्पष्ट मत आहे, कि इस्लामिक स्टेटच्या सेक्स स्लेव्हारीला सुद्धा इस्लामनुसार मान्यता आहे, परंतु एका अतिरेकी माणसाने एका शांत स्त्रीवर केलेले अत्याचार असं जरी ह्या व्यवस्थेकडे पाहिलं तरी त्याचे स्वरूप कमी अमानुष ठरत नाही.

सर्वात शेवटी, इस्लामचा अभ्यास करताना एक मुद्धा सतत लक्षात ठेवावा लागतो. तो आहे कुराणचे कालक्रमानुसार पडणारे दोन भाग. एक मक्का काळ आणि दुसरा मदिना काळ. या दोन काळात बदललेल्या परिस्थितीनुसार परस्परविरोधी सुद्धा आयती आलेल्या आहेत. तेव्हा ही बदललेली परिस्थिती नेमकी काय होती याचा अभ्यास हिंदुनी करणे आवश्यक आहे. बरेच अभ्यासक ‘इस्लाम’ कसा धर्मसहिष्णू आहे हे सांगताना ठराविक ६-७ आयातींचा संदर्भ देतात.या आयती मक्काकालीन आहेत. त्यावेळी प्रेषितांची शक्तीही कमी होती.मदिनाकाळात मात्र या सर्वधर्मसहिष्णू भासणाऱ्या आयती येणे बंद झाले होते, याउलट उघड उघड आक्रमक आयतीच आल्या आहे.’ हे मात्र नक्की की ‘इस्लामिक स्टेट’ आपल्या सर्व कार्यपद्धतीची दिशा कुराण’, ‘शरिया’, प्रेषितांचे आयुष्य’, ‘पहिले चार खलिफा’ यांच्यातूनच दाखवत आहे. अल्लाहला खुश करण्यासाठी, स्वर्गात जागा मिळावी म्हणून, नरकाग्नीपासून मुक्तता मिळावी म्हणून आम्ही हे सर्व करत आहेत, अशी त्यांची भूमिका आहे. या त्यांच्या भूमिकेचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे.



या सर्वातून मला अजून न सुटलेला प्रश्न एकच आहे, तो म्हणजे उच्चशिक्षित, पाश्चात्य आणि पौर्वात्य तरुण/ तरुणी इस्लामिक स्टेटकडे आकर्षित होण्याचे कारण काय असेल? इस्लामिक स्टेटमध्ये असं कोणतं आकर्षण आहे, की ज्यामुळे पुरुष आणि महिलासुद्धा जीव द्यायला आणि तितक्याच क्रूरपणे जीव घ्यायला तयार होतात? मध्ययुगीन धार्मिक कक्षेतून माणूस कधी बाहेर येणार

(पूर्वप्रसिद्धी - साहित्य  चपराक  दिवाळी अंक २०१६) 

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....