Sunday, 25 March 2018

काफिर

काफीर  - ‘काफिर’ हा शब्द ‘कुफ्र’ या शब्दाचा कर्ता आहे. ‘कुफ्र’ या शब्दाचा अर्थ लपविणे. सत्य लपविणे, सत्याला नकार देणे असा ‘कुफ्र’ या शब्दाचा अर्थ आहे. त्याचे ‘काफिर’ होताना सत्य लापाविणारा, सत्याला नकार देणारा असा होतो, सत्यावर पांघरून घालणारा असा होतो. काफिर म्हणजे (सत्य) नाकारणारा. काफिर याचा अर्थ अल्लाहने मुहंमद पैगंबर यांच्यामार्फत पाठवलेल्या सत्य धर्माला (इस्लामला) नाकारणारा. इस्लाममध्ये श्रद्धेच्या ज्या पाच कसोट्या सांगण्यात आल्या आहेत त्या पाच पैकी एकावरही श्रद्धा न ठेवणारा इस्लामच्या दृष्टीने काफिर म्हणजे श्रद्धाहीन ठरतो. मुसलमानी पंडित श्रद्धाहीन म्हणजे काफिर आणि नास्तिक हे दोन शब्द समानार्थी वापरतात. याचे कारण श्रद्धेच्या पाच कसोट्यांपैकी पहिलीच कसोटी आहे ‘एकमेव अल्लाहवर श्रद्धा’, नास्तिक म्हणजे कोणताच अल्लाह किंवा देव न मानणारा असा होतो. देव आणि अल्लाह असे दोन समानार्थी वाटणारे शब्द मुद्दाम वेगळे वापरले आहेत. इस्लामच्या दृष्टीने देव आणि अल्लाहयात फरक आहे. तो सांगणे हा आताचा हेतू नाही. पण ईश्वर किंवा देव मानणे हे सुद्धा काफिर असल्याचेच लक्षण आहे. पूजा केवळ अल्लाहची करायची असते असे इस्लामी धर्मशास्त्र सांगते. अल्लाह प्रती श्रद्धा न ठेवणे हे श्रद्धाहीन असल्याचेच लक्षण आहे. त्याचबरोबर अल्लाहबरोबर इतर देव मानणे हे सुद्धा काफिर असल्याचे लक्षण आहे. म्हणून मुसलमान श्रद्धाहीन म्हणजे काफिर आणि नास्तिक हे दोन शब्द समानार्थी असल्यासारखे वापरतात.  

‘डिक्शनरी ऑफ इस्लाम’ मध्ये काफिर कोणाकोणाला म्हणायचे याच्या पाच कसोट्या सांगण्यात आल्या आहे. १. ज्यांनी पहिल्या महान करणावरच विश्वास ठेवला नाही, असे काफिर. पहिले महान कारण म्हणेज, ‘अल्लाहच्या आज्ञेनुसार मुहंमद सत्य धर्माचा प्रसार करण्यासाठी पृथ्वीवर अवतरले आहेत’, यावरच ज्यांचा विश्वास नाही असे ते काफिर. २. एकमेव ईश्वर आहे तो म्हणजे अल्लाह आहे यावरच ज्यांचा विश्वास नाही, असे काफिर. ३. असे जे एकमेव ईश्वर अल्लाहवर श्रद्धा ठेवतात, पण त्याच्या संदेशावर (म्हणजे कुराणवर) विश्वास ठेवत नाहीत असे काफिर. ४. जे मूर्तीपूजक आहेत असे काफिर. ५. जे एकमेव अल्लाहवर आणि त्याच्या संदेश्वर (म्हणजे कुराणवर) विश्वास ठेवतात पण ज्यू आणि ख्रिश्चन यांच्याप्रमाणे मुहंमद यांच्या प्रेषितत्वावर विश्वास ठेवत नाहीत, असे काफिर. या पाच कसोट्यांवरून सुद्धा लक्षात येईल कि पाच श्रद्धांच्या प्रमाणे या पाच कसोट्या सुद्धा एकमेकांना अनुकूल आहेत. यापैकी एक जरी कसोटी खरी ठरत असेल तरी तो काफिर ठरतो. 

असगर आली इंजिनीअर यांच्या Rethinking issuess in Islam या ग्रंथात ते लिहितात, “कुफ्र किंवा काफिर याचा अर्थ लापाविणारा किंवा नकार देणारा असा आहे. कुराणाप्रमाणे काफिर तो कि जो सत्य मार्गदर्शन स्वीकारण्याचे नाकारतो व अनैतिक व दुराचारी जीवन जगतो.” परंतु नीती अनीतीच्या किंवा दुराचारी असणाच्या, सत्य म्हणजे नेमके कोणते हे ठरवण्याच्या कसोट्या आधुनिक नीतिशास्त्र किंवा तर्कशास्त्रावरून ठरत नसून कुराणावरून ठरतात. 

या संदर्भात एक उदाहरण देणे गरजेचे आहे. जेष्ठ समाज सुधारक हमीद दलवाई यांनी आपल्या मृत्यूपत्रात ‘आपण मेयावर दहन करावे, दफन करू नये’ असे लिहिले होते. याचा संदर्भ घेऊन उदारमतवादी मुस्लीम कवी आणि विचारवंत एहतेशाम देशमुख लिहितात, “अल्लाहवर श्रद्धा नाही आणि त्यांच्या पैगंबरांवर श्रद्धा नाही, त्याला मुसलमाना म्हणता येत नाही. ‘हमीद दलवाई’ हे केवळ नाव इस्लामी पद्धतीचे आहे या कारणासाठी त्यांना मुसलमान म्हणता येणार नाही.” अशा प्रकारे हमीद दलवाई यांना बिगर मुसलमान किंवा श्रद्धाहीन ठरवले गेले आहे. एवढेच नव्हे तर जो मुसलमान किंवा श्रद्धावान राहिला नाही असा माणसाला ‘तकफिर’ म्हणतात. जो पूर्वी मुसलमान होता पण त्याच्या काही कृत्यांमुळे आता तो मुसलमान राहिला नाही अशा माणसाला ‘तकफिर’ म्हणतात. हमीद दलवाई यांना ‘तकफिर’ ठरवून ते पुढे लिहितात, “ज्याची आपल्या धर्मावर श्रद्धा नाही. ती व्यक्ती त्याच्या जाती-धर्माच्या व्यक्तींबद्दल व तत्वांबद्दल भाष्य करण्याचे अधिकारसुद्धा गमावून बसते.” 
काफिर म्हणजे कोण, कुफ्र म्हणजे काय, शिर्क (अनेक देव मानणारा – अनेकेश्वरवादी) म्हणजे काय याची अनेक भाष्य मुस्लीम पंडितांनी याच प्रकारची केली आहे. परंतु आता आपण केवळ ‘काफिर’ म्हणजे कोण आणि काय या व्याख्येपुरता विचार करत आहोत. काफिर असणे हा इस्लामच्या दृष्टीने किती मोठा गुन्हा आहे, त्या गुन्ह्याला शिक्षा किती आणि कोणत्या प्रकारच्या आहेत याचा विचार आपण आता करत नाही आहोत.काफिर असण्याच्या गुन्ह्याबद्दलच्या शिक्षा नंतरच्या भागात पाहू. 

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....