Wednesday, 18 March 2020

'समाजस्वास्थ्य'कार 'र. धो. कर्वे' यांचा आजचा संदर्भ (भाग - १)

महाराष्ट्रानं या देशासाठी अनेक चांगल्या परंपरा घालून दिल्या आहेत. ज्ञात इतिहासातला ‘वसुधैव कुटुंबकम’चा पहिला हुंकार हा महाराष्ट्रानं देशाला ज्ञानेश्वरीच्या रूपानं शिकवला आहे. या ‘महान राष्ट्राने’ कायम अखिल भारतीय लढा द्यायचा असतो. संकुचित विचार न करता लढायचं ते कायम सगळ्या भारतासाठी, याची शिकवण देशाला दिली छत्रपती शिवाजी राजांच्या रूपानं. आधुनिक काळात तर बंगाल आणि महाराष्ट्र हे प्रबोधनाचे भारताचे मार्गदर्शक राहिलेले आहेत. सर्व प्रकारच्या धर्मसुधारणा, सामाजिक सुधारणा यांचे आदर्श घालून देण्यात महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिलेला आहे. या महाराष्ट्रानं, पुण्यात स्त्री शिक्षणाचा एक अजब आणि अफाट प्रयोग सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्या रूपानं पाहिला. या महाराष्ट्रानं देशाला पत्रकारितेचा आदर्श घालून दिला. तसाच आणखी एक वेगळा आणि एरवी तिरस्करणीय असा घराणेशाहीचा एक अनोखा मार्ग पुन्हा या महाराष्ट्राने देशाला दाखवला आहे. मुख्यतः ‘राजकारण’ या क्षेत्रातली घराणेशाही ही तिरस्करणीय मानली जाते, ते योग्यच आहे. गांधीजी म्हणाले होते ‘महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे’ या महाराष्ट्रात अशी माणसं निर्माण होतात की ज्यांच्या कर्तृत्वानं देशाच्या भवितव्याच्या दिशा बदलतात. मी घराणेशाहीमधला आदर्श कोणत्या अर्थानं म्हणतो आहे, तर आमटे कुटुंब किंवा गोवारीकर कुटुंब, तेंडूलकर कुटुंब, दाभोळकर कुटुंब! किंवा काही व्यक्ती या परंपरा निर्माण करतात. त्यांची कुटुंब ही काही त्यांच्या मार्गानं जातील असं नाही. पण त्यांच्या प्रभावातून नवीन पिढी तयार होते. उदा. हमीद दलवाई किंवा नरहर कुरुंदकर, डॉ. सुखटणकर इ. या आणि अशा अनेक घराण्यांनी आपलं सर्वस्व अर्पण करून समाजसेवेचा आपापला मार्ग निवडला आणि संपूर्ण कुटुंबच्या कुटुंबानं एक कार्याला वाहून घेतलं. या यादीत मी मुद्दाम नाव लिहिलं नाही अशा ‘कर्वे’ कुटुंबाचं. कामाचा आवाका पाहिला तरी सामान्य माणूस थकून जाईल इतक्या मोठ्या आवाक्याचं काम या कुटुंबानी एका आयुष्यात करून दाखवलं. त्याचं किमान स्मरण ठेवणं हे आपलं महाराष्ट्रीय म्हणून कर्तव्य आहे.

कोकणाला बुद्धिमंतांची भूमी म्हणतात. पण शिरुभाऊंनी ‘तुंबाडचे खोत’मध्ये त्या कोकणाचा एक प्रचंड पट आपल्या समोर मांडला. त्यातंही आणि डोळसपणे पाहणार्‍या कोणालाही दिसेल की त्या कोकणाला दारिद्र्याचा एक शाप लागलेला आहे. अशा बुद्धिमान पण दरिद्री कोकणातून देशावर आले, शिकले आणि आतापर्यंत संस्कृतीनं परिघाच्या बाहेरची जागा (का, स्वयंपाकघरातली जागा?) दिलेल्या ‘स्त्री’ या घटकाला शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले, आयुष्याच्या शेवटी महर्षी झाले ते भारतरत्न धोंडो केशव कर्वे. सगळं आयुष्य एका कार्याला वाहून घेतलं.

‘स्त्री’चं आयुष्य किती हालाखीच आहे आणि होतं याचं एक छोटंसं पण समर्पक उदाहरण आहे. सुरवातीला स्त्री शिक्षण संस्था, मग श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ उभं करणारे अण्णासाहेब कर्वे शतायुषी झाली. स्वतंत्र भारतच्या सरकारनं त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला. पण संपूर्ण आयुष्य ‘स्त्री’च्या उद्धारासाठी खर्च केलेले कर्वे आयुष्याच्या शेवटी म्हणतात, ‘माझी इच्छा आहे मला अनेक जन्म मिळावेत. मिळतील त्या सर्व जन्मांत मी स्त्रीची सेवाच करीन. पण स्त्रीचा जन्म नको!’

सांस्कृतिक व्यवस्थेचा बळी असणार्‍या ‘स्त्री’चे प्रश्न केवळ शिक्षणानं सुटणार नाहीत हे कळण्याइतके महर्षी कर्वे अविचारी नव्हते. पण माणूस एका आयुष्यात काय काय करू शकेल? त्यांनी रस्ता निवडला ‘स्त्री’ शिक्षणाचा. मुलाचा रस्ता मात्र वेगळा होता.

१८८२ साली धोंडो कर्वे आणि राधाबाई यांच्या पोटी जन्माला आलेला पहिला मुलगा म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. र. धों. कर्वे! आता रधोंचा विचार करताना आणि मी केलेला इतरांना सांगताना मला या लेखाचं विकिपीडिया पेज करायचं नाही. जन्म किती साली झाला, ‘समाजस्वास्थ्य’ किती साली सुरू झालं. ती तांत्रिक माहिती कुठेही मिळेल. मी गेले ३-४ महिने ‘रधों’ नावाचं हे वादळ अनुभवताना काय काय विचार करत गेलो, हे सांगायचा माझा विचार आहे.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्या अनेक जवळच्या मित्रांकडे बघताना रधोंना हे लक्षात आलं की, ‘आपले अनेक सुशिक्षित म्हणवणारे आणि सुसंस्कृत घरातले मित्र वेश्येकडे जातात. तिथून आयुष्यभर पुरातील असे असाध्य रोग घेऊन येतात. उद्या रीतसर लग्न करतील तेव्हा तो रोग बायकोला आणि पर्यायानं मुलांनासुद्धा देतील.’ यात त्यांचा दोष नाही. ज्याप्रमाणे पोटाला भूक लागते आणि आपण खातो; त्याप्रमाणे शरीराला भूक लागते ती भागवायची समाजानं निर्माण करून दिलेली ही व्यवस्था आहे (वेश्या), तीचा वापर समाज करणार. पण तो करताना आरोग्याचा विचार करायचा असतो याची जाणीवच समाजाकडे नाही. असा काही रोग होऊ शकतो, त्यावर उपाय आहेत याचीही जाणीव समाजाकडे नाही. याच्यावर कोणीतरी काम केलं पाहिजे.

‘रधों’ हा मूळचा गणिताचा माणूस. रधों फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला होते, तो काळ आहे 1903 चा!

सावरकरसुद्धा त्याच काळी फर्ग्युसनमध्ये शिकत होते. दोघांच्याही दिशा वेगळ्या, मार्ग वेगळे. सावरकर टिळकांकडून प्रेरणा घेऊन परदेशी कपड्यांची होळी करण्याचा विचार करत होते. तर रधों बघत होते आपल्या मित्रांकडं, समाजाकडं. दरवर्षी किमान एकदा घरात पाळणा हलतोच आहे. ‘शरीराची भूक भागविणे’ यात ‘पाळणा हलणे’ हे समाजानं गृहीतच धरलं आहे. मुलं होऊ न देता लैंगिक सुख उपभोगता येतं याची समाजाला जाणीवच नाही.

समाजस्वास्थ्यच्या पुढच्या मासिकांतून रधों लिहितात, ‘आमच्या कॉलेजच्या काळात जे ओळखीचे विद्यार्थी मित्र होते, त्यांच्यापैकी काही नग्नचित्रे बाळगीत होते, काहींची लग्ने झालेली होती, काही वेश्यांकडे जात होते, काही स्वसंभोग व काही अनैसर्गिक प्रकार करत होते. हे पुरातन काळापासून चालू आहे.’ तेव्हा रधोंना समाज ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करतो आहे हे फर्ग्युसनमध्ये गणित शिकताना लक्षात आलं. तिथं रधोंनी लैंगिक विषयाशी संबंधित अनेक पुस्तकं वाचायला सुरवात केली. कामशास्त्र, शरीरशास्त्र आणि त्याचे मानसशास्त्र या विषयांचा रधोंनी कॉलेजच्या जीवनात भरपूर अभ्यास केला. मधल्या काळात पैसे कमावण्याचे मार्ग बदलत गेले. गणिताचे शिक्षक म्हणून रधोंनी नोकरीसुद्धा केली. गणितामध्ये पुढचे शिक्षण घेण्यासाठी म्हणून रधों फ्रान्सला सुद्धा गेले. विसाव्या शतकाच्या सुरवातीचे फ्रान्स ही कलेच्या जगाची राजधानी म्हणायला हरकत नाही. शिवाय प्रबोधन आणि क्रांती यांनी कलेत आणि पर्यायानं समाजजीवनात आलेला मोकळेपणा, खुलेपणा रधोंनी जवळून पहिला. गणिताबरोबर रधोंनी लैंगिक विषयांचा सुद्धा प्रचंड अभ्यास केला. फ्रेंच संस्कृतीनं ‘सेक्स’ या विषयाचा जो प्रगल्भपणे अभ्यास करून लिहून ठेवलेलं आहे ते पाहून रधों प्रभावित झाले असतील यात शंका नाही. त्याच्याशिवाय ते मुळातले ग्रंथ वाचण्यासाठी फ्रेंच भाषा शिकले नसते.

१९०३ म्हणजे फर्ग्युसनमध्ये होते तो काळ, ते मुंबईला ट्रेनिंग कॉलेजमधली दोन वर्षं, धारवाडला कर्नाटक कॉलेजमध्ये प्राध्यापकी केलेली वर्षं, फ्रान्समध्ये गणित विषयातला डिप्लोमा करताना व्यतीत केलेला काळ. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापकी करतानाचा काळ, विल्सन कॉलेजमध्ये प्राध्यापकी करतानाचा काळ इतका जवळ जवळ २४ वर्षं रधोंनी या विषयाचा प्रचंड अभ्यास केला. मध्यंतरी नोकरीसाठी नैरोबीला जाऊन आले. इथे मुद्दाम उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे स्पष्टपणा आणि हेकेखोर स्वभावामुळे नोकरी आणि माणसं फार टिकत नसत. पण फर्ग्युसनपासून समाजाची समस्या ते जाणून होते.

१९२१ साली सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्या नंतर विल्सन कॉलेजमध्ये नोकरी मिळेपर्यंत रधोंनी ‘संततीनियमन’ याच्या बाबतीत प्रबोधन करणारं क्लिनिक मुंबईमध्ये सुरु केले. काळ १९२१ चा आहे. याची प्रेरणा रधोंनी घेतली अमेरिकेतली ‘संततीनियमना’ची चळवळ १९१६ साली उभी करणारी मार्गारेट सँगर यांच्याकडून. संतती होणे हा ‘देवाचा प्रसाद’ मानला गेलेल्या हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही संस्कृतींनी ‘संततिनियमना’च्या प्रयोगाला विरोध करणं स्वाभाविक होतं. तसा मार्गारेट सँगर यांना अमेरिकेत आणि रधोंना भारतात झालाही. पण रधोंना ख्रिश्चन वरिष्ठ असलेल्या कॉलेजची नोकरी मात्र सोडावी लागली. ‘भालाकार’ भोपटकर सुद्धा ‘संततिनियमना’च्या विचारला विरोध करताना हेटाळणीच्या सुरात म्हणाले होते, ‘संततिनियमनाची’ साधने वापरून आपण लाखो राम आणि कृष्ण वाया जाऊ देतो आहोत!’ त्याचदरम्यान रधोंनी ‘संततिनियमन’ आणि ‘गुप्तरोगांपासून बचाव’ अशा दोन इंग्लिश पुस्तिका लिहून प्रकाशित केल्या. १९२५ च्या ‘किर्लोस्कर खबर’मध्ये ‘अमर्याद संतती’ हा लेख त्यांनी लिहिला तो सुद्धा औंध संस्थानात प्रक्षोभक म्हणून वादग्रस्त ठरला होता.

रधों ज्या काळात समाजाकडे बघत होते, परिस्थितीचा अभ्यास करत होते तेव्हा भारताची लोकसंख्या प्रतिवर्षी 2.1 टक्का या दरानं वाढत होती. या दरवर्षी मोठ्या होत जाणार्‍या लोकसंख्यावाढीच्या राक्षसावर रधों समाजाला जो शस्त्रक्रियेचा उपाय सांगत होते तो उपाय रधों यांनी वयाच्या 44 व्या वर्षी स्वतःवर केला होता. नोकरीनिमित्त नैरोबीला गेलेल्या रधोंनी स्वतःवर नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली होती. ती करण्याआधी रधों आणि मालतीबाई यांनी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता की, ‘आपण आपलं सगळं आयुष्य ‘संततिनियमन’ आणि ‘लैंगिक शिक्षणातून समाजप्रबोधन’ यासाठी अर्पण करणार आहोत. तेव्हा आपल्याला मुल होऊ देणे हा मुलावर अन्याय ठरेल. तेव्हा आपण मुल होऊ द्यायचं नाही.’ ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले’ या एका कृतीने रधों कर्ते सुधारक ठरले.

१९२७ सालापासून या एका अजब, अफाट आणि विचार करत जाऊ तितकं अविश्वासनीय वाटत जाईल अशा पर्वाला सुरवात होते. पूर्वी एकदा किर्लोस्करमध्ये लिहिलेल्या लेखावरून वाद झालाच होता. त्यानंतर ‘विनय म्हणजे काय?’ हा लेख पुरोगामी समजल्या जाणाऱ्या ‘किर्लोस्कर’ मासिकानं न छापता परत पाठवला होता. गणिताचे प्राध्यापक असताना १९२४ च्या आसपास ३९० रुपये पगाराची नोकरी सोडताना आपल्या वरिष्ठांना रधों म्हणाले होते, ‘गणित शिकवणारे खूप भेटतील. पण समाजाला ‘लैंगिक शिक्षण’ आणि ‘संततिनियमन’ याची दिशा देणारा कोणी भेटेल का याची शंका वाटते. हे काम मीच केलं पाहिजे.’ तेव्हा आपल्याला कळलेला समाजासमोरचा प्रश्न त्यावर आपण मांडू पाहतोय ते उत्तर समाजापर्यंत जर प्रस्थापित नियतकालिकांतून पोहोचत नसेल तर आपण आपलं नियतकालिक सुरु करू, हा स्वाभाविक विचार रधोंनी केला आणि १९२७ साली मासिक सुरु केलं ‘समाजस्वास्थ्य’


१९२७ साली सुरु केलेलं मासिक १९५३ सालापर्यंत अव्याहत सुरु होतं. रधोंच्या कामाच्या शिस्तीमुळे त्यांचा १४ ऑक्टोबरला मृत्यू झाल्यावरही, १५ तारखेला नोव्हेंबरचा अंक पोस्टात पडला होता. सलग २६ वर्षं ‘समाजस्वास्थ्य’ नावाचा एकहाती तंबू रधों कर्वे नावाच्या माणसानं तोलून धरला होता.

‘समाजस्वास्थ्य’च्या मुखपृष्ठावर नग्न स्त्रीचं चित्र असे. पहिला अंक तयार होऊन प्रेसकडे गेला तेव्हा, असलं प्रिंटींग आम्ही करणार नाही म्हणून प्रेसवाला अडून बसला. म्हणून पहिल्या अंकावर लाईटहाउसचं चित्र आहे. पण मासिकाच्या कव्हरवरचं चित्र हे नग्न असावं याबाबतीत रधों आग्रही होते. ‘सत्य हे कायम नग्न’ असतं ही त्यामागची भूमिका होती. शिवाय मासिक ‘कामविषयक’ चर्चा-विनिमय यासाठी वाहिलेलं असल्यामुळं जीवनाच्या सर्व क्षेत्रांचा शास्त्रीय आणि चिकित्सक, मोकळेपणानी विचार केल्याशिवाय ज्ञानाचे मार्ग खुले होणार नाहीत यावर त्यांचा विश्वास असावा. त्यामुळं कव्हरवर हट्टानं नग्न स्त्रीचं चित्रं असे. शकुंतलाबाई परांजपे, स्वतः कर्वे, अनंतराव देशमुख, य. दि. फडके यांनी ‘कव्हरवरील नग्नचित्र’ यावर काही ना काही लिहून ठेवलं आहे. पण मला वाटतं रधों हा रसिक माणूस होता. शास्त्रीय संगीताची रधोंना जाण होती. त्यांच्या लग्नात मंगलाष्टका नन अदर दॅन ‘उस्ताद अब्दुल करीम खाँ’ साहेबांनी म्हटल्या होत्या. त्याबद्दल तत्कालीन पुण्यातील ब्राह्मणांच्या शिव्या त्यांना खाव्या लागल्या होत्या. पण कलेची जाण होती. रधों फ्रान्समध्ये काही काळ राहून आलेले होते. तेव्हा प्रबोधनाचा एक मार्ग असणारी न्यूड पेंटिंग्ज रधोंना आपल्या मासिकाच्या कव्हरवर लावणं गरजेचं वाटत असावं!

(क्रमशः … )

‘समाजस्वास्थ्य’कार 'र. धो. कर्वे' यांचा आजचा संदर्भ (भाग - २) -

https://mukulranbhor.blogspot.com/2020/03/blog-post_18.html

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....