Wednesday 18 March 2020

‘समाजस्वास्थ्य’कार 'र. धो. कर्वे' यांचा आजचा संदर्भ (भाग - २)

'समाजस्वास्थ्य'कार 'र. धो. कर्वे' यांचा आजचा संदर्भ (भाग - १)

बालपणातील काही कटू अनुभवांमुळे म्हणा किंवा वडिलांचा, सख्ख्या आईचा पुरेसा सहवास न लाभल्यामुळे म्हणा पण रधों तापट आणि एकलकोंडे बनले होते. शिवाय दिसायला फार आकर्षक नव्हते, आवाज घोगरा होता. त्यामुळे आपल्या कुरूपपणामुळे आपल्याशी कोणी बोलणार नाही असा त्यांनीच स्वतःचा ग्रह करून घेतला होता. शेवटपर्यंत जिवाभावाचा मित्र म्हणावा असा एकही माणूस रधोंजवळ नव्हता. त्यांची जिवाभावाची पत्नी मालतीबाई 1944 साली गेल्या. एक शकुंतलाबाई परांजपे आणि मामा वरेरकर हे दोन जण सोडले तर रधोंनी संपूर्ण आयुष्य एकाकीपणात काढलं. पार आचार्य अत्रे, बाबासाहेब आंबेडकर, रियासतकार सरदेसाई, प्रभाकर पाध्ये, ना.सी.फडके, नाटककार कोल्हटकर इत्यादी लोकांनी रधोंच्या कार्याला आपली सहानुभूती दर्शवली होती. पण तरी रधों कायम एकटे होते. त्याचं एकटेपणामधून ते दिवस दिवस एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीमध्ये जाऊन वाचत बसत असत. पुढे अनेकांनी लिहिलं आहे की वाद घालावेत तर फक्त रधोंनी. वडील आण्णासाहेब कर्वे यांनी सुद्धा ठामपणे आपल्या मुलाच्या बाजूने मतं व्यक्त केलेली नाहीत. अगदी सुरवातीला पहिल्या पुस्तकाच्या प्रती रधोंनी वडिलांना पाठवल्यावर ‘हे विषय समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत’ इतक्या मोजक्या शब्दात आपली पसंती महर्षी कर्व्यांनी आपल्या मुलाकडे पोहोचवली होती. पण या सगळ्याच्या शिवाय एक गुण जो रियासतकार सरदेसाई यांच्यापासून सर्वांनी गौरवाने उल्लेख केलेला आहे तो म्हणजे रधोंचा बुद्धिवाद!
‘स्वर्ग, नरक, ईश्वर, आत्मा वगैरे मी मानीत नाही; तेव्हा ऐहिक सुखालाच मी किंमत देतो. पण हे सुख कशाने मिळते? पैशाने अनेक इष्ट वस्तू मिळतात, अडचणी दूर होतात; परंतु तेवढ्यानेच मनुष्य सुखी होत नाही. सुखाचे एकमेव साधन म्हणजे पूर्ण मनःशांती. याकरिता स्वतःच्या मतानेच स्वतःची किंमत कमी होईल अशा गोष्टी करू नयेत; ती वाढेल अशा कराव्यात. मग लोकमताची पर्वा (शक्य तोवर) करू नये. पश्चाताप होईल असे करू नये; पण तसा प्रसंग आलाच अपरिहार्य गतगोष्टीचा शोकही करीत बसू नये.’ हे रधोंचं जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे. चाळीसच्या दशकात मुंबईमध्ये बुद्धीवादी मंडळीनी एकत्र येऊन ‘द रॅशनॅलिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ नावाने एक संस्था सुरु केली होती. त्या संस्थेतर्फे ‘रीझन’ नावाचे इंग्लिश नियतकलिक चालवले जात असे. रधों काही काळ रीझनचे संपादकही होते. रीझनचे जवळजवळ 90 पेक्षा जास्त अंक उपलब्ध आहेत. बुद्धीवादी कसोटीवर न उतरणाऱ्या सर्व धार्मिक व सामाजिक अंधश्रद्धांशी आणि रुढींशी संघर्ष करून या देशाच्या जनतेच्या मनात शास्त्रीय दृष्टीकोन आणि सहिष्णुता रुजवण्याचा प्रयत्न करणे’ हे रीझनचे धेय्य होते, असं रधों लिहितात. रधोंचे सगळे विचार एका लेखात सांगणे शक्य होणार नाही. पण काही प्रातिनिधिक उदाहरणांवरून आपण ते समजावून घेण्याचा प्रयत्न करू.

रधोंवर त्यांच्या आयुष्यात तीन वेळा खटले भरण्यात आले. तिन्हीही वेळा ते ‘अश्लीलता’ याच्याशी संबंधित गोष्टींवरून भरण्यात आले होते. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ‘व्यभिचाराचा प्रश्न’ हा 1931 साली लिहिलेला लेख आणि त्यावरून झालेला खटला. आताच्या हिंदुत्ववादी आणि ज्यांच्या भावना सहज दुखावल्या जातात अशा कमजोर लोकांना रधोंचा ‘व्यभिचाराचा प्रश्न’ हे लेख आवडणार नाही. तसाच ते 31 सालच्या पुण्याला आणि ब्रह्मवृंदाला सुद्धा आवडला नव्हता.
स्त्री पुरुष यांचे शारीरिक संबंध हे या भारतीय संस्कृतीने ‘न बोलण्याचा विषय’ ठरवून टाकला. किंबहुना ‘सेक्स’चा भारतीय संस्कृतीइतका मोकळेपणानी आणि प्रगल्भपणे अभ्यास दुसऱ्या कोणत्या प्राचीन संस्कृतीने केलेला नाही, हे मान्य करायचं झालं तरी, मधल्या हजार वर्षांत असं नेमकं काय घडलं की भारतीय माणूस वात्स्यायनाचे कामसूत्र, खजुराहोची शिल्प यांना दुरावला? इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्या ‘विवाह संस्कृतीच्या इतिहासाला’ विकृत म्हणू लागला? ‘सेक्स’ हा विषय मुद्दाम चारचौघात बोलवा असा नाही हे मान्य, पण पतीपत्नीने सुद्धा एकमेकांशी बोलू नये ही जी व्यवस्था आपण उभी केली त्यानी समाजाचं स्वास्थ्य बिघडलं. वात्स्यायनाने समाजातून प्रसन्न आणि आरोग्यपूर्ण आविष्कार निर्माण व्हावेत यासाठी कामसूत्र मांडून ठेवली. पण आपण ती सूत्र जास्तीत जास्त समाजापासून दूर नेत राहिलो. जोवर त्यात स्त्री किंवा पुरुष कोणाचेही शोषण होत नाही आणि एकमेकांच्या संमतीने सेक्स होतो आहे तोपर्यंत सेक्स वाईट म्हणून टाकून देण्याच्या अधिकार संस्कृतीला दिला कोणी? तर मधल्या काळात समाजाची मूल्यव्यवस्था बदलत गेली. प्राचीन काळी प्रचलीत असणाऱ्या प्राण्याशी संभोग करणे, यज्ञाच्या ठिकाणी संभोग करणे या कृती अनैतिक ठरवल्या गेल्या. पण ज्या प्राचीन काळाबद्दल आपण बोलतो तिथे संभोग हा फार गोपनीय विषय नव्हता. तो उघडपणे करण्याचा किंवा बोलण्याचा विषय होता हे इतिहासाचार्य राजवाडे यांच्यापासून रधोंपर्यंत सगळ्यांनी सांगितलं. वेश्याव्यवस्था ही सुद्धा समाजाची गरज म्हणून अस्तित्वात असली पाहिजे, (फक्त त्यात फक्त स्त्री जातीचे शोषण नको) अशी भूमिका अनेक समाजशास्त्रज्ञांनी मांडली आहे. मुद्दा काय आहे, तर सेक्स ही गोष्ट वर्षातून, आयुष्यातून एकदा करण्याची गोष्ट नाही. आपल्याला भूक लागली की आपण खातो. किती खातो, काय खातो, कुठे खातो याचा आपण बभ्रा करत नाही. तसंच सेक्सचंही आहे. सेक्सचा आपण इतका विचार का करतो हा प्रश्न न कळण्यासारखा आहे. कोणाचेही शोषण न होऊ देणे इतकेच पथ्य पाळले पाहिजे. पण याला व्यभिचार म्हणायचं का?
ज्या लेखावरून रधोंवर ‘अश्लीलतेच्या’ कायद्याखाली खटला भरण्यात आला तो ‘व्यभिचाराचा प्रश्न’ याचं विषयाशी संबंधित आहे. रधों त्या लेखात श्रीकृष्णाची उदाहरणे देतात. लेखाची सुरवात करताना रधों लिहितात ‘व्यभिचार हा पाप नाही असे आमचे मत आहे’. रधों लिहितात की, हिंदू धर्माने व्यभिचार हा पाप असल्याचे कुठेही म्हणलेले नाही. श्रीकृष्णाने तर व्यभिचाराचा आदर्श घालून दिलेला आहे. कुंतीला लग्नाच्या आधी मुलगा होणे, सूर्यापासून मुलगा होणे, कुंतीला दोन पुरुषांपासून झालेले पाच पांडव हे कोणत्या एकपत्नीव्रतेत बसतं? एका स्त्रीला पाच नवरे मिळणे हे कोणत्या नीतीच्या व्याख्येत बसतं? आपली धर्मपत्नी द्यूतामध्ये लावणे आणि ती शत्रूच्या हातून विवस्त्र होताना पाहणे हे कोणत्या नैतिकतेत बसतं? तेव्हा व्यभिचार हा हिंदू समाजाने कधीच पाप मानला नाही. भागवत पुराणात, हरीवंशात आणि गीतगोविंदामध्ये राधा आणि कृष्णाच्या प्रणयांची रसभरीत वर्णने या संस्कृतीने वाचलेली आहेत. तेव्हा व्यभिचार हा पाप न मानता जर त्या नात्यात मोकळेपणा आला तर अधिक हेल्दी पद्धतीने समाज उत्क्रांत होत जाईल. समागम हे पाप आहे, पण भटांच्या बडबडीमुळे त्याला धर्ममान्यता मिळते हे खुळचटपणाचे लक्षण आहे, असे रधों लिहितात. एकमेकांच्या गुणं वैशिष्ट्यांवर भाळून जवळ येणे आणि समागम करणे हे जास्ती चांगलं की, आई-वडील ठरवून देतील त्या अनोळखी माणसाशी समागम करणे योग्य? आयुष्यभराचा कोंडमारा स्त्री किंवा पुरुषाने का म्हणून सहन करायचा? त्यामुळे व्यभिचार हा अनेकदा उच्च दर्जाचा समागम असतो असे रधों लिहितात. लग्नामध्ये दरवेळी तो परस्पर संमतीने असेल याची खात्री देता येत नाही. म्हणून लग्नातील समागम कधी कधी उच्च दर्जाचा असू शकतो. पण वेश्येकडे प्रेमाचा संबंध नसला तरी तो परस्पर संमतीने असल्यामुळे तो कायमच उच्च दर्जाचा असतो, असे रधों लिहितात. आता कल्पना करा 1931 साली रधों लिहितात की, लग्नातील समागमापेक्षा वेश्येशी केलेला समागम अधिक पवित्र किंवा उच्च दर्जाचा आहे. रधों सेक्समध्ये प्रेमापेक्षा परस्पर संमतीला प्राधान्य देतात. याचा अर्थ स्त्री आणि पुरुष दोघांनाही निर्णय घेण्याचा अधिकार देतात. प्रस्थापित लग्नसंस्थेमध्ये स्त्रीला सेक्स नाकारण्याचा अधिकार आहे का? आज सुद्धा ‘वेश्येशी समागम अधिक उच्च’ या विचारला समाज मान्यता देणार नाही. 1931 च्या समाजाने याला रिस्पॉन्स कसा दिला असेल विचार करा.
समोर जे दिसतं त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे, तेव्हाही वेगळीच होती. रधों या विषयाकडे वळले याचं कारण फर्ग्युसनमध्ये त्यांनी आपल्या मित्रांचे अनेक अनैतिक संबंध पहिले होते. आजची परिस्थिती वेगळी नाही. जी लग्नसंस्था आपण पवित्र मानली, दोन घराण्यांचा एकत्र येण्याचा सोहळा म्हणून उचलून धरली त्या संस्कृतीत आज लग्न झालेल्या 10 जोडप्यांपैकी 6 जोडपी विवाहबाह्य संबंधात गुंतलेली आहेत. त्यापैकी 4 जोडपी विवाहबाह्य शारीरिक संबंधात आहेत. आपण व्यभिचार पाप आहे असं म्हणून केवळ भागणार नाही. समाज ते करतोच आहे. आज व्हर्जिन मुलगी किंवा मुलगा लग्नासाठी मिळणे कठीण झाले आहे, तेव्हा व्यभिचार पाप नाही! आरोग्य आणि संमती सांभाळली की वाट्टेल ते करण्याचा आपल्याला अधिकार आहे. रधों 1931 मध्ये हेच सांगत होते. पण सरकारने त्यांच्यावर खटला भरला आणि हे लिखाण अश्लील ठरवले. तो खटला रधों हरलेले आहेत. कारण अश्लील म्हणजे नेमकं काय? याची कोणतीही व्याख्या उपलब्ध नाही. एखादी गोष्ट मला अश्लील वाटू शकते ती दुसऱ्याला वाटणार नाही! तेव्हा अश्लीलता हा केवळ आरोप करणाऱ्याच्या मनाचा गुण आहे वस्तू, चित्र किंवा शब्दाचा नाही.
रधोंच्यावर अश्लीलतेच्या कायद्याखाली एकूण तीन वेळा खटले भरण्यात आले होते. तिन्ही वेळा हे खटले रधों हरले असले तरीही एकदा रियासतकार सरदेसाई यांनी रधोंच्या बाजूने कोर्टात साक्ष दिलेली होती. ‘व्यभिचाराचा प्रश्न’ या लेखात काहीही अश्लील नाही व तो लेख मी माझ्या मुलीला वाचण्यास देऊ शकतो इतका तो पवित्र आहे’ अशा भाषेत त्यांनी रधोंची बाजू घेतलेली होती. दुसऱ्या खटल्याच्या वेळी तर रधोंचे वकीलपत्र स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतले होते. खटल्याचे कामकाज झाल्यानंतर रधों आणि बाबासाहेब बुद्धिवादावर चर्चा करत असतं. कायदा सुस्पष्ट नसल्यामुळे रधों कायम खटले हरत गेलेले आहे.
रधों सांगत होते त्या संततिनियमनाच्या शास्त्रीय पद्धतींवर अनेकांनी टीका केलेली होती. त्यापैकी महत्त्वाचे नाव म्हणजे महात्मा गांधी. गांधीजी सांगत होते त्या आत्मसंयमनाच्या मार्गावर रधोंनी कडाडून टीका केलेली आहे. गांधीजींसारखा माणूस आत्मसंयमन करू शकेल, आपण सामान्य माणसाकडून तशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. शिवाय गांधीजीनी सुद्धा आपल्या ‘सत्याचे प्रयोग’ मध्ये आपले आत्मसंयमन यशस्वी झाले असल्याचे म्हटलेले नाही. गांधीजींचे आत्मसंयमनाचे प्रयोग आयुष्याच्या शेवटी शेवटी करून यशस्वी झाल्याचे गांधीजी सांगतात पण वाढत्या वयात तो प्रयोग अयशस्वी ठरल्याचेही गांधीजीच सांगतात, याचा संदर्भ देऊन रधों लिहितात, गांधीजींचा मार्ग म्हणजे ‘एखाद्या अवयवाची स्वच्छता राखावी यासाठीचा उपाय म्हणजे तो अवयव वापरूच नये, अशा पद्धतीचा आहे. तो शास्त्रीय नाही शिवाय सामान्य माणसाला तो जमणार सुद्धा नाही. रधोंनी गांधीजींवर लिहिलेल्या लेखात गांधीजींचे अर्थव्यवस्थेपासून संततिनियमनापर्यंत अनेक विचार मुद्देसूद खोडून काढले आहेत. रधों शेवटी लिहितात, ‘… यावरून असा निष्कर्ष निघतो, की या महत्त्वाच्या प्रश्नांच्या बाबतीत गांधीजींनी प्रगतीचे मार्गदर्शन करण्याऐवजी उलट प्रतिगामी मार्गच दाखवला.’
रधों स्वतः प्रामाणिकपणे असं मानत असत की गोपाळ गणेश आगरकर यांचा बुद्धीप्रामाण्याच्या बाबतीतला मी एकमेव खरा वारस आहे. त्या बुद्धिप्रामाण्याचा धक्का अनेकांना बसला होता. म्हणजे इतिहासाचार्य राजवाडे यांच्यापासून महात्मा गांधी, मार्क्सवादी, शास्त्रीय संगीतातला हार्मोनियमचा वापर इत्यादी. धर्म, बुवाबाजी यावर तर रधोंनी कडाडून टीका केली होतीच, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण इथे आगरकरांचा मुद्दाम उल्लेख रधोंनी सुद्धा करण्याचा आग्रह का ठेवला असेल? तर याची कारण म्हणजे 1881-82 च्या दरम्यान ‘स्त्रीदास्यविमोचन’ या आगरकरांच्या लेखात सर्वप्रथम संततिनियमनाचा विचार आगरकरांनी मांडलेला होता. अर्थात ‘संततिनियमन’ हा शब्द आगरकरांनी वापरलेला नाही, ‘पण ठराविक मुले झाल्यावर कोणत्यातरी उपायाने संततीचे नियमन करणे गरजेचे आहे, त्याच्याशिवाय स्त्री बंधनातून मुक्त होणार नाही!’ रधोंच्याही पूर्वी, अमेरिकेतील सँगर बाईंच्याही पूर्वी कदाचित जगातला संततिनियमनाच पहिला उच्चार या आगरकर नावाच्या अद्वितीय व्यक्तीकडून झाला होता. हे आम्ही विसरलो. आमच्या विसरण्याने आम्ही आमचं नुकसान करून घेतलं फक्त.
शेवटी रघुनाथ धोंडो कर्वे हा सुद्धा हाडामांसाचा आणि मातीचेच पाय असलेला माणूस होता. त्यातच माणूस म्हणून होणाऱ्या चुका आपण गृहीत धरल्या पाहिजेत. जे निकष लावून रधों ‘राजवाडेंपासून गांधीजींपर्यंत’ चुका काढत राहिले तेच निकष आपण रधोंना सुद्धा लावू शकतो. माणसाचे काही विचार चुकीचे असू शकतात हे गृहीत धरूनही एका गोष्टीचे नवल वाटणे कमी होत नाही आणि ती म्हणजे 30/40 च्या दशकात रधों हट्टाने नग्न स्त्रिची चित्रं कव्हरवर लावत होते. विधवा, परित्यक्ता स्त्रियांच्या कामसुखाच्या हक्काबद्दल बोलत होते. लग्नातील सेक्सपेक्षा वेश्येशी केलेला सेक्स जास्त पवित्र मनात होते. हे सगळं जेव्हा भारताच्या बाहेर घडलं तेव्हा समाजाच्या प्रतिक्रिया खूप जहाल होत्या. इंग्लंड – अमेरिकेसारख्या विचारांनी आधुनिक असणाऱ्या देशांत स्त्रियांना या विचारांसाठी मार खावा लागलेला आहे. तुरुंगात जावं लागलेलं आहे. पण आमच्या देशात असा एक माणूस होऊन जातो तो या सगळ्याला पुरून उरतो. टक्कर देत उभा राहतो! त्याच्याबरोबर त्याची पत्नीही उभी राहते. पुढे मालतीबाई व्हीलचेअरवर बसून राहिल्या, पण काम करत राहिल्या. त्या माउलीने लोकांचे टोमणे, शिव्या, टीका कशी सहन केली असेल? बरं ती सहन करूनही कामावर परिणाम होऊ द्यायचा नाही, यासाठी मनाची काय जबरदस्त ताकद पाहिजे हो! ठरवून मुल होऊ न देण्याचा निर्णय घेणं आणि पुन्हा रधोंनी स्वतःवर केलेली शस्त्रक्रिया यामुळे समाजाने मारलेले टोमणे सहन करणं सोपं नाही. आयुष्यभर रधोंनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक तोट्यात चालवलं. कायम स्वतःचे खर्च कमी करून ते समाजाला शिकवत राहिले. हा ध्येयवाद कशातून जन्माला येत असेल हो?
आता संततिनियमन हा विषय शब्द बदलून सरकारने धोरण म्हणून स्वीकारला आहे. रधोंच्या विचाराचा तो विजय मानायला हरकत नाही. आता गरज आहे ती ‘स्त्री’ स्वातंत्र्य याबद्दलच्या रधोंच्या विचारांची. फेमिनीस्ट लोकांनी खरं म्हणजे रधोंना रोज डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे होतं, पण रधों इतर अनेक समाजसुधारकांप्रमाणे उपेक्षित राहिले. समतेच तत्त्व साधं आहे, निर्णय घेण्याचा अधिकार ‘तिलाही’ आहे, तो मिळाला पाहिजे.
आयुष्यभराचा रधोंचा सोबती म्हणजे मामा वरेरकर. रधोंबद्दल ते लिहितात, ‘कंपूशाहीने पकड धरलेल्या महाराष्ट्रात प्रामाणिक माणसाची कदर होत नाही. आपल्यातील असामान्य व्यक्तीला योग्य स्थान मिळण्यास महाराष्ट्रातील जाहिरातजनार्दनांना फार हौस असते. म्हणूनच प्रो.कर्वे यांना त्यांना हक्काचे स्थान मिळाले आहे, असे अजूनही वाटत नाही. एवढे खरे, की तत्त्वनिष्ठेशी तादात्म्य पावलेल्या या अस्सल मराठ्याने कुणाच्याही रागाची किंवा लोभाची कधीच पर्वा केली नाही. त्याचप्रमाणे संकटांना आणि अडचणींना उभ्या आयुष्यात कधीच जुमानले नाही. प्रस्तुत लेखकाच्या दृष्टीने प्रो.कर्व्यांइतका लोकविलक्षण माणूस महाराष्ट्रात तरी विरळाच आहे.’
(समाप्त)

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....