Wednesday, 18 March 2020

‘सायबर सेक्सी : रीथिंकिंग पॉर्नोग्राफी’ – पॉर्नोग्राफीचा ऑनलाईन सर्व्हे


मी सहावीत होतो. मित्राच्या घरी खेळायला गेलो होतो. तेव्हा नाईट आऊटची संकल्पना अजून आजच्याइतकी प्रचलित झाली नव्हती. संध्याकाळी खेळायला जाणं, रात्री उशिरात उशिरा 8 वाजता घरी येणं, ही नाईट आऊटची कल्पना होती. मित्राच्या घरी नवीन नवीन कॉम्प्युटर आणलेला होता. कॉम्प्यूटर टेबलवर ‘स्वदेस’ चित्रपटाच्या सीडीचं कव्हर पडलेलं होतं. कव्हरमध्ये आत सीडी नव्हती. माझ्यासमोर कॉम्प्यूटर सुरू होता. स्वाभाविकपणे ती सीडी ‘प्ले’ करायला इन्सर्ट केलेली असणार. मी शोधू लागलो. मिडीया प्लेयरमध्ये दोन ‘स्वदेस’ लिहिलेल्या फाईल दिसत होत्या. त्यातली पहिली प्ले केली. 5 मिनिटांच्या ‘स्वदेस’ नंतर एकदम फर्स्ट जनरेशन पॉर्न स्क्रीनवर दिसायला लागलं.

त्या क्षणाच्या आधी मी ‘त्या’ प्रकारचं काहीही पाहिलेलं नव्हतं. ‘असं’ काही असतं याचा मला अंदाजही नव्हता. मी दचकून (किंवा घाबरून!) सीडी काढून कव्हरमध्ये व्यवस्थित भरून ठेवली. कोणी पाहिलं असेल या भीतीनं आलेला एक घामाचा बिंदू पुसून टाकला आणि मित्राच्या घराच्या हॉलमध्ये येऊन बसलो. पण ते १०-१५ सेकंद डोक्यात बसले. दिवसरात्र ते तिथंच. अजून आमच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचे वर्ग सुरू झालेले नव्हते. पण मित्रांच्या बोलण्यातून लैंगिक विषयाच्या चर्चा कायम होत असंत. तेव्हा माझी समजूत अशी होती की मुलगा होण्यासाठी सतत ९ महिने सेक्स करावा लागतो. सेक्स आणि ९ महिने याचं गणित जेव्हा नंतर कळलं तेव्हा आपल्या अज्ञानावर हसलेला मी, मला अजून आठवतो आहे. पण शाळेत मित्रांच्या बोलण्यात येणार्‍या शिव्या, ‘हार्मोनल चेंजेस’चे विज्ञानातले धडे आणि ती पाहिलेली 15 सेकंद यांचं कोडं सुटत नव्हतं. पुढचे बरेच दिवस ते कोडं केवळ गुंतागुंतीचं होत गेलं होतं.
नववी-दहावीच्या वर्षांत मी पहिल्यांदा १५ सेकांदांहून अधिक काळ पॉर्न पाहिलं. सहावीपासून पडलेलं कोडं तेव्हा सुटलं. आता मधल्या काळात पॉर्नचा चिकित्सक अभ्यासही केला. मराठी जनांचा लैंगिक डिस्कोर्स का अवघड आहे त्याचंही कोडं उलगडलं. भारतात सलग बलात्काराच्या घटना घडल्या तेव्हा पॉर्न बंदीच्या बाजूनं हिरीरीनं बोललो. भारतात पॉर्न बघणार्‍या लोकांवर केलेले सर्व्हे वाचले. आता केवळ एक कुतूहल म्हणून पॉर्न बघण्याचा काळ संपला, आता त्याच्याकडे समाजशास्त्रीय अभ्यास म्हणून नकळत बघायची सवाय लागली.
नुकतंच ‘रिचा कौल-पडते’ हिनं लिहिलेलं ‘सायबर सेक्सी – रीथिंकिंग पोर्नोग्राफी’ हे पुस्तक वाचून संपवलं. या चित्रपटाचा ओपनिंग सीन वरच्या माझ्या अनुभवाशी मिळता जुळता होता. पॉर्नशी आलेला पहिला संबंध कसा होता, तो अनपेक्षितपणाचा धक्का पचवायला किती कष्ट पडले. रिचाचे या बाबतीतले अनुभव माझ्यासारखेच आहेत. आणि मला खात्री आहे की रिचाचं हे पुस्तक वाचणार्‍या बहुतांशी लोकांचेही अनुभव असेच असणार. पुस्तकात तिनं लोकांकडून ऐकलेले या प्रकारचे अनेक अनुभव दिले आहेत. काही पुस्तकांना ‘पेज टर्नर’ म्हणतात. त्या पुस्तकातली भाषा, शैली आणि मुद्दे इतके मोलाचे असतात की ‘अजून एक पान पूर्ण करू मग झोपू’, अशी इच्छा होते. आणि ‘अजून एक पान, अजून एक पान’ यातून बसल्या बैठकीला पुस्तक वाचून संपतं. रिचाचं पुस्तक या प्रकारचं आहे.
आपल्याकडे लैंगिक विषयावर लिहिताना, बोलताना येणारी मुख्य अडचण म्हणजे शब्दांचा तुटवडा. किंवा आपलं लैंगिक गोष्टींचं ज्ञान हे शाळेतल्या शिव्यांपासून सुरू झालेलं आहे. शिव्या देताना भाषेत येणारा आवेग गंभीर चर्चांमध्ये येऊन चालत नाही. त्याला पर्याय म्हणून मग शास्त्रीय शब्द वापरून जर चर्चा करायची झाली तर ‘व्हजायना’, ‘पीनस’ या शब्दांनी आकलानापेक्षा गोंधळ उडण्याचा संभाव जास्त आहे. या दुहेरी अडचणीतून मार्ग कसा काढायचा? रिचाला ही समस्याच आलेली नाही. पॉर्नमुळे आपलं लैंगिक बाबींचं ज्ञान इंग्रजीमध्ये जास्त सहज झालेलं आहे. त्यामुळे ‘पुसी’, किंवा ‘ब्लोजोब’ हे शब्द त्यांच्या मराठी प्रतिशब्दांसारखे अवघडलेपण निर्माण करत नाहीत. रिचानी ते मूळ, तसेच्या तसे इंग्रजी शब्द वापरून आपले मुद्दे मांडलेले आहेत. त्याचा एक फायदा असा आहे की, हे अनुभव जिवंत वाटतात. त्यात थोड्या अभ्यासाची भर टाकून लेखिका तिचेही अनुभवच लिहित आहे. स्वतःचे अनुभव आपल्याला इतक्या चांगल्या पद्धतीने शब्दांत मांडता येणार नाहीत कदाचित. रिचाच्या भाषा आणि लेखनाच्या शैलीमुळे पुस्तक अधिक वाचनीय झालं आहे. रिचानी या पुस्तकासाठी पाचशे ते सहाशे लोकांच्या अनौपचारिक मुलाखती घेतल्या आहेत. ती तिचे मुद्दे पटवून देण्यासाठी आपल्या अनुभवांबरोबर त्या लोकांचेही अनुभव सांगते. केवळ सांख्यिकी माहिती देऊन वाचकाला हैराण करण्याचं काम रिचानी केलेलं नाही. पहिली काही प्रकरणं वाचल्यावर माझ्या डोक्यात आलेली उपमा होती, ‘फेसबुक पोस्ट’ची. तिथे आपण स्मायली वापरू शकतो, स्टीकर वापरू शकतो, सरळ इमेज वापरू शकतो. आपलं मतं जास्तीत जास्त सजवू शकतो. फेसबुक पोस्ट आणि रिचाच्या लेखनातला फरक हा आहे की, मुद्दा काही नाही आणि शब्द सजवले आहेत, असं अनेकदा फेसबुक पोस्टचं स्वरूप असतं. रिचानी मांडलेले मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, तिनं ते तिच्या भाषा शैलीनं सजवले आहेत. पुस्तक का वाचनीय आहे, याचं एक उत्तर हे आहे.
आता लैंगिक शिक्षण, पॉर्न आणि तत्सम विषयावर रिचापेक्षा अधिकारी माणसं नाहीत का? तर नक्की आहेत. रिचानी केलेला अभ्यास खूप मूलगामी आहे, असंही नाही. दुरुस्त्या सूचवायच्या झाल्या तर सूचवताही येतील. पण आपल्याला काही अनुभव आहे. त्यावर आपण शांत डोक्यानं विचार केला. काही लोकांशी बोललो. त्यांचेही अनुभव असेच आहेत की वेगळे आहेत, यावर विचार केला. थोडा अभ्यास केला आणि पुस्तक लिहिलं या स्वरूपाचं हे पुस्तक आहे. कुरुंदकरांच्या भाषणासारखं ते परफेक्ट नाही. ते वाचकाला मंत्रमुग्ध करत नाही. पण विचार करायला भाग पाडतं. तिनं तिच्या पुस्तकानं तिच्याच पुस्तकाचं उपशिर्षक सिद्ध केलं आहे, ‘रीथिंकिंग पोर्नोग्राफी’!
कोणत्याही विषयाची चर्चा करताना मूलभूत विषयापासून सुरवात करायची ही बहुदा अभ्यासाची पाश्चात्य पद्धत असावी. पुस्तकाची सुरवात जरी तिच्या एका अनुभवानी होत असली, तरी पहिल्या प्रकरणात ‘पॉर्न’ शब्दाची व्याख्या, त्याचा पहिला उपयोग, ऐतिहासिक संदर्भ यात खर्च केला आहे. ‘पोर्नोग्राफी’ ची व्याख्या आपण पण मुद्दाम वाचून ठेवू, Printed or visual material containing the explicit description or display of sexual organs or activity, intended to stimulate sexual excitement असं कोणत्याही लैंगिक अवयवाचं किंवा कृतीचं चित्र किंवा वर्णन, आणि ज्याची निर्मिती भावना चाळवण्यासाठी केली आहे. ही ऑक्सफोर्ड डिक्शनरीतली व्याख्या दिली. ‘पोर्नोग्राफी’ हा शब्दही ग्रीक भाषेतून आलेला आहे. त्याचा अर्थ ‘वेश्यांबद्दल लिहिणे’ असा होतो. पोर्नो म्हणजे वेश्या, आणि ग्राफाईन म्हणजे लिहिणे. हा शब्दाचा उगम झाला. त्याचा अर्थ तेव्हाही आणि आजही भावना उत्तेजित करण्याच्या हेतूनं तयार केलेलं लैंगिक साहित्य, असाच होतो. या अर्थाचा पुनर्विचार करावा लागेल का? किंवा आपण ‘पॉर्न’ या शब्दाला जो अनैतिक अर्थ जोडला आहे, त्याचा पुनर्विचार करावा लागेल का? एकूणच आपल्या ‘सेक्स’कडे बघण्याच्या दृष्टीचा पुनर्विचार करावा लागेल का? अर्थात पुस्तकाचा विषय ‘पॉर्न’ पुरताच मर्यादित आहे. रिचानी ‘सेक्स’ हा केंद्रबिंदू घेऊन ‘रीथिंकिंग सेक्स’ असं पुस्तक लिहिलं असतं तर तशा पुस्तकाची भारतात जास्त गरज आहे. पण ठळकपणे कुठेही आलेलं नसलं तरी रिचा तोच मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे, असं मला वाटतं.
लोकांच्या भावना कशामुळे चाळवतील याचं काहीही गणित नाही. हे र. धों. कर्वे यांनी १९३० च्या दशकात ‘समाजस्वास्थ्य’ मधून सतत मांडलेलं आहे. ‘अश्लीलता हा कोणा व्यक्तीचा, वस्तूचा, अगर शब्दाचा गुणधर्म नसतो, तो पाहणार्‍याच्या नजरेचा गुण असतो.’ अशी ठाम भूमिका रधोंची फार पूर्वी घेऊन झालेली आहे. रिचानी मांडलेले सगळे मुद्दे रधोंनी फार पूर्वी मांडले आहेत. रिचानी त्या मुद्द्यांना अनुभवांची आणि सर्व्हेज्ची जोड दिली आहे, असं मला वाटतं.
पॉर्नला नैतिक/अनैतिक ठरवताना किंवा त्याच्यावर पुनर्विचार करताना रिचा काही प्रश्न उपस्थित करते. आपण प्रत्यक्ष पॉर्न पाहिलं त्याच्या आधी पॉर्नसदृश आपण काय काय पाहिलं होतं? 18-19 व्या शतकात इटलीयेतील पोम्पई येथे प्राचीन शहरांचे अवशेष उत्खननात सापडले. उत्खननात सापडलेली अनेक चित्र युरोपीय सभ्यतेला धक्का पोहोचवणारी होती. आज ज्याला आपण पॉर्न (बाय द वे पॉर्नचा मराठी अर्थ ‘बिभित्स साहित्य’ असा होतो) म्हणतो, तशी चित्र पोम्पईइथे सापडली. त्यानी युरोपीय सभ्यतेला हादरे बसले. भारतात स्वातंत्र्यासाठी लढा उभा राहिलेला असताना 1857 साली ब्रिटनच्या ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये या प्रकारच्या साहित्याच्या विरोधातला पहिला कायदा पास झाला. त्यानंतर काही वर्षांनी 1893 साली स्विस इंटरनॅशनल ब्युरोमध्ये ‘या’ प्रकारचं अनैतिक साहित्य हा जागतिक धोका आहे आणि सर्व सुसंस्कृत देशांनी याच्या विरोधात लढलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रिंटींग प्रेसच्या शोधामुळे जी गोष्ट केवळ सत्ताधारी वर्ष उपभोगू शकत होता ती गोष्ट सार्वजनिक झाली. त्यामुळे सरकारला (आणि नैतिकतेचे रखवालदार यांना) अशा प्रकारचे कायदे करण्याची गरज वाटू लागली. पण ‘पॉर्न’ म्हणून आता निर्माण होणारं साहित्य सरकार थांबवू शकेलही. पण रिचानं ‘पोम्पई’च्या पूर्वीपासून ज्याची गणना ‘पॉर्न’ म्हणून करता येईल याची यादी दिली आहे. 25 हजार वर्षांपूर्वी उत्खाननात मिळालेल्या मूर्ती (Venus of Willendorf), हजार वर्षांपूर्वी कोरलेली खजुराहोची मंदिरं, 12 व्या शतकात रचलेलं गीत गोविंद, 9 व्या शतकातलं अलवार संत गोदादेव याचं काव्य, 17 व्या शतकात इटलीमधली ecstasy of saint teresa, आणि पोम्पई येथील चित्रं. (एक निरीक्षण, या यादींत भारतातलं साहित्य जास्त आहे. नुकतंच गुरुचरण दास यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. ‘कामा – द रिडल ऑफ डीझायर’ या नावाचं. त्याची सुरवातच अशी आहे की जगातली एकमेव संस्कृती, ‘काम’ हे आयुष्याचं एक उद्दिष्ट मानलं. त्याच्यावर खूप विचार करून साहित्य निर्माण केलं आहे.) असं असताना ‘बिभित्स साहित्याच्या विरोधातला पहिला कायदासुद्धा किती अविचारी होता, हे लक्षात येईल.
यातून प्रश्न पडतो की मग ‘पॉर्न’ कशाला म्हणायचं? त्याची विशिष्ट व्याख्या करता येते का? रिचाच्या या पुस्तकाच्या ब्लर्पवर या संबंधीचा एका परिच्छेद आहे. 60 च्या दशकात अमरिकेत पॉर्नबंदीच्या एका याचिकेवर निर्णय देताना न्यायाधीश त्याच्या निर्णयात म्हणाला होता की, ‘पॉर्न’ म्हणजे काय हे मला नेमकं नाही सांगता येत. I cannot define pornography, But I know it, when I see it (पॉर्न म्हणजे काय हे शब्दांत सांगता येत नाही, पण पाहून सांगू शकतो की हे आहे की नाही!) आणि या विधानाबद्दल त्याच्याविरोधात खूप बोललं, लिहिलं गेलं. पण खरंच आहे. रिचानं अशा संभाव्य गोष्टींची यादी दिलेली आहे की ज्यांची गणना पॉर्न म्हणून करता येईल. रिचाच्या यादी बरोबर तुम्हीही विचार करा की, कॅटरिना कैफची स्लाईसची जाहिरात लागते. ‘चोली के पिछे क्या है’ हे गाणं, ‘इंडियन भाभी’ हे दोन शब्द (2015 या वर्षी भारतातून सर्वात जास्त सर्च केला गेलेले 2 शब्द), टायटॅनिक चित्रपटातला तळघरातल्या बंद गाडीतला काचेवर दिसणारा हात, ‘आशिक बनाया अपने’ हे गाणं? आता वर पॉर्नच्या व्याख्येचा पुन्हा एकदा विचार करा, भावना चाळवण्यासाठी तयार केलेल्या लैंगिक अवयवांचं चित्रण. वर लिहिलेलं साहित्य भावना चाळवण्यासाठी तयार झालेलं नाही असं जरी आपण गृहीत धरलं तरी त्यांनी लोकांच्या भावना चाळवतात की. मग त्याला पॉर्न म्हणणार का? उत्तर आपण द्यायचं आहे. रिचानं तिचं उत्तर दिलं आहे.
पॉर्न म्हणजे नेमकं काय याची व्याख्याही ठरवता येत नाही पॉर्नचा होणारा प्रसार सहनही होत नाही या द्विधा समस्येत नैतिकतेचे रखवालदार अडकलेले आहे, या युक्तिवादापाशी येऊन पाहिलं प्रकरण संपतं.
पहिल्या प्रकरणातच पॉर्नबद्दलच्या ‘रीथिंकिंग’ला आपण सुरवात करतो.
‘सायबर सेक्सी’ असं नाव असल्यामुळे रिचा ऑफलाईन बोलत नाही. ती कायम ऑनलाईनच विचार करते. विचाराची ‘ऑनलाईन’ चौकट तिनं स्वतःसाठी आखून घेतली आहे. दुसर्‍या प्रकरणात इंटरनेटमुळे झालेल्या फायद्यांबद्दल रिचा लिहिते. इथं सुरवातीला आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, ‘हर दिल अलग, हर सोच अलग, हर ताले की चाबी अलग.’ प्रत्येक माणूस स्वतंत्र विचार करतो. तसा त्याला करू दिला पाहिजे. कोणाच्याही आनंदाच्या कल्पनांना आपण आव्हान देऊ नये. कोणाच्याही आनंदाच्या कल्पनांची टिंगल करू नये. कोणा पुरुषाला पुरुषाबद्दल आकर्षण वाटत असेल, कोणा स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटत असू शकेल. कोणा पुरुषाला स्त्री आणि पुरुष दोघांबद्दल आकर्षण वाटत असेल. या आणि अशा सर्व शक्यता उपलब्ध असतात, त्याची जाणीव अनेक लोकांना इंटरनेटमुळे झाली. इंटरनेटपूर्वी एखाद्या पुरुषाला दुसर्‍या पुरुषाबद्दल वाटणारं आकर्षण हा त्याच्या न्यूनगंडाचा विषय होता. कारण त्याला त्याच्या आसपास त्याच्यासारखा विचार असणारा दुसरा माणूस सापडत नसे. रिचानं ग्रुप चॅटिंगचे फायदे सांगितले आहेत, त्यात हा मुद्दा मांडला आहे. या चॅटिंगमध्ये सुरवातीला बावरून गेलेली माणसं नाव जाहीर न करता बोलतात. आपल्या सारख्याच विचाराची माणसं जगात आहेत हे पाहून त्यांना थोडं रीलॅक्स वाटतं. रिचानी तिच्या सगळ्या प्रतिपादनाला तिनं घेतलेल्या सर्व्हेचे आधार दिले आहेत. तिनं अनेकांशी केलेल्या चर्चा पुस्तकात मांडल्या आहेत.
हे केवळ लैंगिक बाबींपुरतं मर्यादित आहे असं समजण्याचं कारण नाही. इंटरनेटमुळ जग जवळ आल्याचं आपण रोज बोलतो. उदाहरणार्थ फेसबुक, फेसबुकवर आपण आपलं मत व्यक्त करतो. त्याला लाईक करणारे हात असतात. त्यावर अनुमोदन देणार्‍या कमेंट्स असतात. फेसबुकच्या पूर्वीची लोकांना स्वतःची मतं होतीच. पण त्यावेळी लाईक करणारे हात खूपच मोजके होते किंवा नव्हतेच. यवतमाळमध्ये एखाद्या मुलानं पुस्तक वाचून सुंदर परिचय लिहिला, तर तो फेसबुकच्या पूर्वी फक्त त्याच्या वर्गातल्या मित्रांना कळत असे. आता शिक्षणासाठी जर्मनीला गेलेला सुद्धा एखादा तो परिचय वाचून लाईक करू शकतो. आपल्या सगळ्याच आवडीनिवडींना आता व्यक्त व्हायला खूप मोठी स्पेस उपलब्ध झाली आहे. रिचा त्यापैकी फक्त लैंगिक आवडी आणि निवडींबद्दल बोलते. यु.ए.ई.मध्ये वाढलेल्या एका मुलीबरोबर रिचा या पुस्तकाच्या दरम्यान आणि पुस्तकासाठी म्हणून बोलली होती. तिला वर्गातल्या एका मुलीबद्दल आकर्षण वाटत असे. पण ते कुठेही बोलायची सोय नव्हती. आकर्षण हे विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दलच वाटलं पाहिजे अशा वातावरणात वाढणार्‍या त्या मुलीच्या मनात आपल्यामध्येच काहीतरी दोष आहे, अशी भावना झाली. जवळ जवळ दहा-बारा वर्ष ती दोषभावना ती मनात दाबून ठेवून कुढत जगत होती. ‘याहू मेसेंजर’नं तिची ती दोषभावना दूर केली असल्याचं ती मुलगी सांगते. जगात समान लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणारे फक्त आपणच नाही, तर अनेक लोकं आहेत हे तिला त्या मेसेंजरमधल्या ग्रुप चॅटिंगमुळे कळलं.
वाईचे डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी ‘पाळी मिळी गुपचिळी’ हे स्त्री आरोग्य या विषयावर एक पुस्तक लिहिलं. त्याची चर्चा पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून खूप झालेली होती. त्यावर डॉक्टर अभ्यंकर लिहितात की, त्यांना अनेक स्त्रियांचे फोन येत. कौतुक करणारे. पण समस्या निवारणासाठीसुद्धा. आणि डॉक्टर आश्चर्यानी लिहितात की ‘स्त्री’ आरोग्यासंबंधीचे अनेक अत्यंत वैयक्तिक विषय स्त्रिया खूप मोकळेपणानं बोलतात. समोर ऐकणारी व्यक्ती एक पुरुष आहे हे माहिती असूनही स्त्रिया खूप मोकळेपणानं बोलतात. याचं कारण फोनवरून नाव खोटं सांगता येतं, आणि ऐकणार्‍या व्यक्तीला आपला चेहरा दिसत नसतो.
आपल्या लैंगिक जाणीवा एक्सप्लोअर करण्याची संधी अनेक लोकांना या इंटरनेटच्या ‘अनामिक’ गुणामुळे मिळाली.
2008 साली दोन मित्रांच्या दारूनंतरच्या हँगओव्हरमधून एकमेकांच्या फँटसींबद्दलच्या गप्पांमधून एक कॉमिक पात्र तयार झालं. इंग्लंडमध्ये राहणारा पुनीत अगरवाल नावाचा एक व्यावसायिक. त्याच्या डोक्यात आलेलं हे पात्र. एरॉटिक कॉमिक ही भारतीय पद्धत कधीच नव्हती. एरॉटिक कॉमिक ही चीन, कोरिया या देशांची मक्तेदारी होती. त्यांना जोरदार स्पर्धा निर्माण करणारी ही भारतीय ‘सविता भाभी’ या मित्रांच्या बोलण्यातून निर्माण झाली. दारुड्या नवर्‍याचं लक्ष नसलेली ही हाऊसवाईफ आहे. तिच्या कामभावना कोणाही मध्यमवर्गीय भारतीय माणसाला पिसाट वाटतील अशा आहेत. पण ‘सविता भाभी’ या कॉमिकनी सशुल्क सभासदत्त्व ठेऊनही जगात चीन आणि कोरियन कॉमिक्सला जबरदस्त स्पर्धा निर्माण केली आहे. सविता भाभीच्या कॉमिक्स तयार करणार्‍या वेबसाईटनं मध्यंतरी जाहीर केलं होतं की, त्यांच्या वेबसाईटला दर महिन्याला ‘नवीन’ 60 लाख लोकं भेट देतात. त्यांच्यापैकी 70 टक्के वाचक भारतीय आहेत. सविता भाभीच्या गोष्टी वेगवेगळ्या भाषेत भाषांतरित करून प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना ट्रान्सलेटर हवेत. त्यांना ते पुरेसा पगार द्यायला तयार आहेत. ‘सविता भाभी’ हे शंभर टक्के भारतीय उत्पादन आहे, असं रिचा लिहिते.
या पुस्तकातलं हे एक खूप महत्त्वाचं प्रकरण आहे. ‘वूमेन आणि पॉर्न’. रिचानं या प्रकरणात खूप महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. तो म्हणजे पॉर्नमुळे स्त्रिच्या शरीराचं ‘वस्तू’करण होतं का? पॉर्नमध्ये अनैसर्गिक किंवा हिंसक बाबी आपण प्रत्यक्ष जीवनात करायचा आग्रह/प्रयत्न करतो का? पॉर्नमुळे बलात्कार, हिंसा वाढते का? या सगळ्याची चर्चा रिचानं या प्रकरणात केली आहे.
अमेरिकेमध्ये 60-70 च्या दशकात ‘लैंगिक क्रांती’ होत होती. हा काळ साधारण हिप्पी चळवळ उलगडत जाण्याचा काळ आहे. भारतात आणि अमेरिकेत ‘ओशो’पंथ वाढीला लागण्याचा काळ होता. व्हिएतनाम युद्ध आणि ‘जास्त’ पैसा यानं विफल झालेले तरुण विचार करू लागले होते की, ‘या पेक्षा जीवनाला काहीतरी वेगळा अर्थ असणार’, तो नवीन अर्थ शोधण्याच्या नादात काही तरुण ‘मानवी’ मुल्यांपासून लांब गेले. ते ‘स्वतंत्र’ म्हणजे पूर्ण ‘स्वैराचार’ या मार्गाला गेले. त्यातून दारू, ड्रग्स, बीटल्स, ‘हरे रामा हरे कृष्णा’ असे अनेक भले बुरे परिणाम बाहेर पडले. त्याच काळात आणि हिप्पी चळवळीचा एक परिणाम म्हणून पूर्वीच्या लैंगिक नीतीमूल्यांचाही पुनर्विचार सुरु झाला. या काळात अमेरिकेत ‘पॉर्न’ बनवणे ही एक इंडस्ट्री म्हणून उदयाला आली. या नवीन उभ्या राहिलेल्या इंडस्ट्रीमध्ये स्त्रीच्या शरीराचा वस्तू सारखा वापर होतो आहे. ते पॉर्न पाहून नवीन पिढी स्त्री चे शरीर वस्तू सारखेच वापरू लागेल, या भीतीतून ‘अँटी-पॉर्न’ मुव्हमेंट अमेरिकेत उभी राहिली. मुक्त लैंगिक जाणीवांना प्रतिसाद म्हणून उभा राहिलेल्या ‘स्त्रीवाद्यांनी’ फेमिनिस्ट पॉर्न बनवणे, हे उत्तर शोधलं. त्यामध्ये ‘स्त्री’चा अधिकार जास्त राहील, अशा प्रकारे ते पॉर्न बनवलं जाऊ लागलं. पुरुषांनी बनवलेल्या पॉर्नमध्ये पुरुषाकडून होणारी हिंसकता कमी करून जास्त कोमल, मानीव सेक्सचं चित्रण केलं जाऊ लागलं. थोडक्यात सांगायचं तर ‘फिलेम फ्रेंडली’ पॉर्न बनवलं जाऊ लागलं. आजच्या घडीला सर्व पॉर्न साईट्सवर ‘फिमेल फ्रेंडली’ पॉर्न ही एक महत्त्वाची कॅटेगरी असते. (तुम्हाला माहिती असेलच म्हणा!)
2017 साली एक सर्वांत जास्त पहिली जाणारी पॉर्न साईट ‘पॉर्नहब’ यांनी एक सर्व्हे प्रसिद्ध केला होता. त्यात आश्चर्य वाटावं असे आकडे बाहेर आले होते. त्या सर्व्हेत पॉर्नहब या साईटवर सर्वात जास्त व्हिजिटर्स हे अमेरिका, इंग्लंड या देशांनंतर भारततून येतात. पॉर्नहबनं जाहीर केलेल्या आकडेवारीत भारतातून रोज 81 लाख लोकं पॉर्नहबवर येतात असं दिसलं आहे. या सर्व्हेमध्ये साईट संचालकांनी जाहीर केलं आहे की भारतातून रोज येणार्‍या लोकांपैकी 30 टक्के व्हिजिटर्स या महिला आहेत. 2016 च्या तुलनेत स्त्रियांचं या साईटवर येणंजाणं 129 टक्क्यांनी वाढलं आहे असं हा रिपोर्ट सांगतो. भारताचा हा ‘ग्रोथ रेट’ जगात सर्वांत जास्त आहे. या सर्व्हेतून असं लक्षात आलं आहे की ‘फिमेल फ्रेंडली’ पॉर्न ही नवीन कॅटेगरी समाविष्ट केल्यापासून स्त्रियांची संख्या वाढली आहे. हा पॉर्न पाहणार्‍या स्त्रियांचा सर्व्हे झाला. अजून एक सर्व्हे खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे ‘सेक्स टॉईज’चं भारतातलं मार्केट. भारतातून खरेदी होणार्‍या एकूण सेक्स टॉईजपैकी अजूनही 62 टक्के पुरुष आहेत. पण 38 टक्के संख्या स्त्रियांची आहे. संपूर्ण भारतात महाराष्ट्र राज्यातून सर्वात जास्त खरेदी होते. आणि असं समजू नका की हा आकडा फक्त मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांतून होतो. हा सर्व्हे सांगतो की, दुसर्‍या आणि तिसर्‍या दर्जाच्या शहरांतून सेक्स टॉईज विकत घेण्याचं प्रमाण 2016 या वर्षात 25 टक्क्यांनी वाढलं आहे.
या सर्व्हेतले आकडे रिचाच्या पुस्तकात नाहीत. किंवा ‘सेक्स टॉईज’चा विषयच रिचा काढत नाही. पण हे आकडे आणि रिचा प्रत्यक्ष लोकांशी बोलली आहे, त्यातून निघणारे निष्कर्ष समानच आहेत, तो म्हणजे भारतीय स्त्रिया पॉर्न बघतात. त्यांना अनेक पर्याय हवे आहेत. रिचाच्या पुस्तकात अनेक मुली हे सांगतात की, ‘स्त्री’च्या शरीराशी अनैसर्गिक आणि (विनाकारण) हिंसक होणारं सेक्सचं चित्रण आम्ही बघत नाही. सविता भाभी हे कॉमिक भारतात आणि बाहेरही इतकं मोठ्या प्रमाणात वाचलं जाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्याचं कारण हेच आहे. ‘सविता भाभी’ ही सेक्समधली प्रधान व्यक्ती म्हणून चित्रित केली गेली आहे. तिला सेक्समधला आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. सेक्स ‘सविता भाभी’ला जसा हवा तसाच होतो. पॉर्नमध्ये हे पथ्य सांभाळलं जात नाही.
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉर्नमध्ये अमानवीय कृत्य पाहून प्रत्यक्ष जीवनातही त्याचाच आग्रह धरणारे महाभाग. एक गोष्ट आधीच स्पष्ट केली पाहिजे की कोणत्याही समाजात बलात्कार होतात ते अपवाद म्हणूनच. समाजाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकं एकमेकांवर बलात्कार करतात, असं जेव्हा होईल तेव्हा तो समाजाचा ‘नियम’ असेल. एकूण समाजाच्या लोकसंख्येपैकी 10-12 लोकं बलात्कार करत असतील तर ते समाजाचे नियम असत नाहीत, ते अपवाद असतात. दिल्लीतलं ‘निर्भया’कांड झाल्यावर लगेचच महिन्याभरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. पोस्टमार्टममध्ये त्या मुलीच्या पोटात ‘खोबरेल तेलाची बाटली’ सापडली. या प्रकारची कृत्य पॉर्न व्हिडीओजमध्ये दाखवलेली असतात. ते पाहून एखादा माथेफिरू ते कृत्य करून बघण्याचा आग्रह धरू शकतो. पण सगळा समाज ‘तेच’ करून पाहू असा आग्रह धरत नाही. रिचानी पॉर्न पाहून व्यक्तीच्या वागण्याबोलण्यात होणारे बदल टिपणारे सुद्धा सर्व्हे पुस्तकात दिले आहेत. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून केलेले सर्व्हेसुद्धा रिचा देते. माणसाच्या हिंसकतेला सर्वस्वी पॉर्न जबाबदार आहे, हे विधान खोडून काढणारे सर्व्हे रिचा देते.
हे प्रकरण अनेक अर्थी महत्त्वाचं आहे. संस्कृतीच्या नावाखाली नैतिकतेचे दाखले देऊन, पॉर्न स्त्रियांसाठी घातक असल्याची कारणं देऊन भारतात पॉर्न बंदीच्या याचिका दाखल झाल्या. त्यानिमित्तानी रिचानी पॉर्न बंदी, भारतातला ब्रिटीश छाप असलेला ‘बिभित्स साहित्याच्या विरोधातला कायदा’, समलिंगी संबंधांवरचा कायदा याचीही चर्चा केलेली आहे. ब्रिटीश प्रभावामुळे भारताही शारीरिक सुख हा नैतिक गुन्हा मानला गेला आहे. त्याचीही चर्चा रिचा करते.
सगळ्या प्रकरणांचा संक्षिप्त आढावा घेणंही आपल्याला जागे अभावी शक्य होणार नाही. तरीही आपण अजून एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत. तो विषय म्हणजे ‘संमती’चा घोळ. रिचानं हे प्रकरण अत्यंत समंजस पद्धतीनं हाताळलं आहे. वरती म्हटल्याप्रमाणे रिचाचा सगळा विचार हा ‘ऑनलाईन’ आहे. त्यामुळे ‘संमती’चा घोळ रिचानं इंटरनेट डोळ्यासमोर ठेऊन केला आहे. रिच्याच्या प्रतिपादनाचा आधार घेऊन आपण ऑफलाईनही विचार केला पाहिजे.
मुळात सेक्स हीच संमतीनंच करायची गोष्ट आहे. त्यातल्या सर्व गोष्टीसुद्धा संमतीनंच व्हायला हव्यात. सेक्स करणार्‍या दोन लोकांमध्येसुद्धा आनंदाच्या, सुखाच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. त्या दुसर्‍यावर लादायच्या नसतात. उदा. ‘ब्लोजॉब’ किंवा ‘ओरल सेक्स’ हे पार्टनरला हवं आहे का, हे आधी जाणून घेतलं पाहिजे. किंवा मला हवं आहे, तर पार्टनरनं त्यामध्ये साथ दिलीच पाहिजे, ही अरेरावी चुकीची आहे. सांगायचा मुद्दा हा की संमती ही गोष्ट अत्युच्च प्राधान्याची आहे. पॉर्न पाहून सेक्सची इच्छा करणार्‍यांना संमतीनं केलेला सेक्स किती सुंदर असतो याचा अंदाज नसतो. संमतीचा विचार रधोंनी 20 च्या दशकात सांगितलेला आहे. रधों संमतीचं महत्त्व सांगताना या टोकाला जातात की ‘वेश्येशी केलेला सेक्स जास्त पवित्र आहे, लग्नाच्या बायकोपेक्षा केलेल्या सेक्सपेक्षा’ कारण वेश्येला आपला ग्राहक नाकारण्याचा अधिकार असतो. (?) लग्नाच्या बायकोला ‘नाही’ म्हणण्याचा अधिकारच नाही. वैवाहिक बलात्कार हा सध्या खूप चर्चेचा विषय बनला आहे. त्यामध्येही ‘संमती’ हाच विषय महत्त्वाचा आहे.
रिचा इंटरनेट समोर ठेऊन 3 ठिकाणच्या संमतीबद्दल बोलते. एक, सेक्स करण्याची किंवा एकमेकांसमोर नग्न होण्याची संमती. एकमेकांसमोर नग्न होण्याची किंवा त्यानंतर सेक्स करण्याला दोघांचीही संमती आहे का? त्यानंतर दोन, त्याचं चित्रण. सेक्सची दोघांचीही संमती मान्य झाल्यावर त्याचं चित्रण करण्याची दोघांचीही संमती आहे का? आणि तीन, ते इंटरनेटवर अपलोड आणि शेअर करण्याची संमती.
पुण्यातील काही तरुणांनी आपल्या सेक्सचं चित्रण सेक्समध्ये सामील असलेल्या सर्वांच्या संमतीनं इंटरनेटवर शेअर केलं होतं. पण त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा झाल्या. त्याच्या उलट दिल्ली मेट्रोमध्ये संमतीनं झालेला सेक्स उउढत मध्ये कैद झाला. तो इंटरनेटवर लाखो, करोडो वेळा संमतीशिवाय शेअर झाला, पहिला गेला. कोणालाही शिक्षा झाली नाही. अमेरिकेतील लैंगिक क्रांती नंतर स्त्रीवाद्यांनी बनवलेल्या पॉर्नमध्ये सुरवातीला किंवा शेवटी त्या पॉर्नमध्ये काम केलेल्या प्रत्येकानं डिस्क्लेमर द्यायची पद्धत पडली. त्यात त्यांनी सांगायचं की ‘चित्रित केलेल्या, त्याचं चित्रण आणि इंटरनेटवर अपलोड या सगळ्या गोष्टी आम्ही संमतीने केल्या आहेत’. भारतासारख्या अजूनही taboo असणार्‍या समाजात या गोष्टी खूप जबाबदारीनं सांभाळल्या पाहिजेत. स्त्रीच्या शरीराशी होणारी हिंसा, अनैसर्गिक समागम यावर आळा घालायचा असेल तर रिचानं साधा उपाय सांगितला आहे की, असे डिस्क्लेमर असलेलेच पॉर्न बघायचे.
‘सायबर सेक्सी’ हे पुस्तक तिचं उपशिर्षक सिद्ध करतं हे मी सुरवातीलाच सांगितलं. पॉर्न, सेक्स, संमती, भारतीय स्त्रिया पॉर्न बघत नाहीत अशा अनेक विषयांवरची आपली पूर्वीची मतं या पुस्तकाच्या वाचनानी बदलतात. एक गोष्ट फक्त मुद्दाम सांगायची आहे ती म्हणजे, रिचा हे गृहीत धरून पुस्तक लिहिते आहे की सेक्स म्हणजे आपण पॉर्नमध्ये पाहून जसा शिकलो आहे तसाच असतो. पॉर्नमध्ये सगळ्या व्हिडीओजमध्ये सेक्सचा एक विशिष्ट पॅटर्न असतो. जे पॉर्न बघतात त्यांना लक्षात येईल. की सुरवातीला किसपासून सुरू होऊन, मग काय घडतं, त्यानंतर काय घडतं, वगैरे… कॉमिक सेक्समध्ये सुद्धा हाच पॅटर्न फॉलो केला जातो. किंबहुना नवीन लिहिल्या जाणार्‍या मराठी कादंबर्‍यांतही (जिथे जिथे सेक्स ‘धीटपणे’ हाताळला असं आपण म्हणतो तिथेसुद्धा) सेक्सचा ‘पॉर्न’ पॅटर्न कायम आहे. हे धोकादायक आहे. कारण आपण भारतीयांनी ‘सेक्स’ हा उत्सव मानला आहे. ते जीवनाचं उद्दिष्ट मानलं आहे. तो केवळ ऑर्गेझमपाशी संपत नाही. तो केवळ ‘मोकळं होणे’ यापाशी संपत नाही. कामसूत्रामध्ये सेक्स हा रात्र भराचा विधी म्हणून सांगितला आहे. संगीत, नृत्य, अत्तरं ही सगळे तो विधी करण्याची साधनं आहेत. आपण पॉर्नमध्ये बघतो तो सेक्स केवळ ‘मोकळं होणे’ इथे संपतो. सेक्स तसा नाही. तो अजून रोमँटिक आहे. अजून प्रगल्भ आहे. रिचानं मात्र याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. रिचा खजुराहो मंदिरांचा उल्लेख करते, जयदेवाच्या गीत गोविंदाचा उल्लेख करते पण त्यातला उत्सव ती विसरते. तो आपण भारतीय म्हणून विसरता कामा नये.

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....