Monday 9 April 2018

एक_दिवस_एक_गाणं - हुजूर इस कदर




लाकडी बॅकग्राऊंडच्या भिंतीवर एक पारंपारिक युरोपियन प्रबोधनाच्या काळातलं प्रतिक म्हणजे 'स्त्रीचं न्यूड पेंटिंग' लावलेलं असतं. टिपिकल कोठीवर असतो तसा हलका पिवळा लाईट खोलीमध्ये पसरलेला असतो. शनिवार संध्याकाळची पार्टी सुरु असते. लोकं ड्रिंक्स घेत गप्पा मारत असतात. एकूण वातावरण धुंद असतं. त्या पेंटिंगकडे पाहून यजमान पेंटिंग नेमकं कसलं आहे ते समजावून सांगत असतो. पेंटिंगमध्ये असलेली स्त्री आळस देते आहे, आणि आळस देण्याच्या नादात तिचं तिच्या अंगावरच्या वस्त्राकडे लक्षच नाहीये, म्हणून तो म्हणतो,
अंगडाई ना ले ना दे हातों को उठाकर
सिने से तेरे देख दुपट्टा ना ढलक जाये |
तो शेर पूर्ण होतो, गप्पा सुरु राहतात. हास्यविनोद, ड्रिंक्स, कोणी कोणाची विचारपूस करतोयं, कोणी वेटर घेऊन येतोय ते पदार्थ तोंडात टाकतोय. यजमान आणि त्याचा सर्वात खास कलीग मात्र मैफलीपासून थोडेसे दूर कॉलेजच्या आठवणीत शिरले आहेत. पोटात एक दोन पेग गेलेलेच आहेत. तेव्हा त्यांना कॉलेजच्या काळातली एक गझल आठवते. दोघंही कॉलेजच्या आठवणीत रमलेले आहेतच. दोघांच्याही बायका पार्टीत असतात, त्यांनी दोघांनाही पिण्यावर आणि शेरोशायरीवर थोड सांभाळून वागायची ताकीद दिलेली असते. पण ती झुगारून ते ठरवतात ती गझल गायची. मग आढेवेढे घेतले जातात. तु म्हण, मी म्हणतो वगैरे होतं. आपल्या कानाला त्याच्यानंतर ऐकू येतो तो भूपिंदरचा आवाज. एक सुंदर आलाप आपल्याला ऐकू येतो, त्याच्यानंतरचा आलाप आपल्या कानावर पडतो तो सुरेश वाडकरच्या आवाजातला.
एका तबल्याच्या ठेक्यावर शब्द ऐकू येतात, 
'हुजूर इस कदर भी ना इतरांके चलिये
खुले आम आंचल ना लेहेराके चलिये
शब्द थांबले तरी मागून ऐकू येणारी बासरी आणि व्हायोलीन तो प्रवास थांबू देत नाहीत. शब्द सुरु आहेत असंचं आपल्याला वाटत राहतं.
मुद्दा असा आहे कि, भारतीय मध्यमवर्गीय पुरुष चारचौघात आपल्या नाजूक भावना बायकोजवळ व्यक्त करत नाही. किंबहुना तो आपल्या सर्व भावना कायम मनात ठेवतो, तो रडून, जोरदार हसून आपल्या भावना सहसा व्यक्त करतच नाही. पण जेव्हा दोन घोट घशाखाली उतरतात, त्याच्या भावनासुद्धा बाहेर येतात. असा एक मध्यमवर्गीय पुरुष सांगतोय, कि हुजूर, तुम्ही इतक्या केअरलेस अॅटिट्यूड मध्ये राहू नका, थोडं पाचपोच ठेऊन वागावं. तुमच्या बेधुंदपणात तुमचा पदर वाऱ्यावर उडतोय, आणि त्याच्याकडे तुमचं लक्षचं नाही, असं करू नका. हे सर्व अतिशय हलक्याफुलक्या मूडमध्ये सुरु आहे. कधीही व्यक्त न होणारा नवरा आपल्या भावना व्यक्त करतोय.
तो म्हणतो, कि समजा उद्या तुमच्या अशा वागण्यामुळे कोणी एक 'मनचला' तुमच्याशी फ्लर्ट करायला लागला तर तुम्ही काय कराल? कोणी पुढे येऊन तुमच्या केसात फुल माळलं तर तुम्ही ते झटकून टाकणारे का! नसिरुद्दीन शहा आपल्या बायकोला (शबाना आझमीला) विचारतो कि, 'लगा दे अगर बढके झुल्फो में कालिया, तो क्या अपनी झुल्फे झटक दिजीये गा!' शबाना आझमी त्यांना मान हलवून नकार देते. हे सगळं आम्हाला करायचं आहे हो, पण आम्ही पडलो पुरुष. आम्हाला चारचौघात हे करता येत नाही. तुमच्या बेधुंदपणामुळे दुसरा कोणी करेल तर आम्हाला कसं आवडेल ते, त्यामुळे तुम्ही असं वागू नका.
दोन पेग पोटात गेलेले आहेत, त्यामुळे त्या पेग्स बरोबर येणारा खुलेपणा सुद्धा इथे दिसतो आहे. मागे सुरु राहणाऱ्या तबल्यावर नसिरुद्दीन शहा आणि सईद जाफरी दोघंही टॅप डान्स करतात. तो वेडेपणा पाहून शबाना आझमीला हासू आवरत नाही. ती पदर तोंडाला लावून हसायला लागते. ते पाहून हा म्हणतो, 'बडी दिलनशि है हसी कि ये लडिया, ये मोती मगर युं ना बिखाराया किजीये' तुमचं हास्य कातील आहे, हे काय वेगळं सांगायला नको, पण काय आहे, तुम्ही अशा सर्वांकडे बघून हसायला लागलात तर कसं चालेल! उडा कें ना ले जाये झोंका हवांका, लचकता बदन युं ना लेहेराया किजीये'
सर्व चांगलं आहे हो, पण अडचण काय आहे माहितीये का, 
बहोत खुबसुरत है हर बांत लेकीन,
अगर दिल भी होता तो क्या बात होती, 
सगळं चांगलं आहे, पण आमचं हे मुकं प्रेम समजून घेणारं मन तुमच्याकडे नाही. ते जर असतं तर, 'लिखी जाती फिर दास्तान-ए-मुहोब्बत, एक अफसाने जैसी मुलाकात होती'
आरडी म्युझिक जे काय दिलं आहे ते त्याला शब्द नाहीत. चाल साधीच आहे. तबला, बासरी याच्याशिवाय कोणतंही वाद्य आपल्या कानांवर पडत नाही. चालीला एक ठेका आहे, त्या ठेक्यावर आपली मान डोलायला लागते! चालीचं ते यश आहे, त्या चालीवर गुलजारचे शब्द. 'जब आप दोनो मिल जाते है, तो गाना कुछ और ही बन जाता है' हे लता बाईंचे शब्द मला आठवले. 'मासूम' हा गुलजार साहेबांचा लँडमार्क चित्रपट, 'तुझसे नाराज नाही जिंदगी' हे गाणं तर आहेच, पण गेली १५-२० दिवस मी अडकलो आहे 'हुजूर इस कदर'मध्ये!! 
https://www.youtube.com/watch?v=wM1kBO2lrYQ

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....