इतिहास, संस्कृती, तत्वज्ञान, कला, संगीत यांच्यात प्रेमाचे सर्वोच्च स्वरूप म्हणून भारतीय आपण अभिमानाने 'राधा-कृष्णाचे' उदाहरण सांगतो. राधेच कृष्णावर असलेल प्रेम सर्वोच्च दर्जाचं होतं याचं कारण काय? तर राधेची 'कृष्णाने आपल्याशी लग्न करावी अशी अपेक्षा तर नव्हतीच, पण कृष्णाने दुसऱ्या कोणाशीही लग्न करू नये’ अशीही अपेक्षा नव्हती. एखादी प्रामाणिक प्रेयसी 'ज्याच्यावर प्रेम करतो' त्याच्याकडून दोन सगळ्यात मोठ्या अपेक्षा कोणत्या करू शकते तर, एक - त्याने माझ्याशी लग्न करावे, किंवा दोन - किमान दुसऱ्या कोणाशीही करू नये. राज कपूरचं गाणं आठवतं आहे का?
तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नाही
तुम किसी और को चाहोगी तो मुश्कील होगी.
पण आपण राधा कृष्ण नसल्यामुळे आपण अपेक्षा करतो. अपेक्षांची रेंज खूप असू शकते, तशी ती असतेही. पण समोरच्या व्यक्तीने आपल्यावर तितकंच प्रेम करावं ही अपेक्षा मात्र तत्वतः शक्य नसते, हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या हातात फक्त ५० टक्के प्रामाणिक प्रेम करणं इतकंच आहे. राधा कृष्ण हे प्रेमाचं सर्वोच्च प्रतिक अशासाठी आहे, कि साठ-पासष्ट वर्षाच्या कृष्णाच्या आयुष्यात राधेला त्याचा सहवास तरी किती मिळाला? पण तिने कधीही त्याचा त्रागा केला नाही, दुःख व्यक्त करत 'सहानुभूती मागत' फिरली नाही! ती कृष्णावर प्रेम करत राहिली. या प्रकरणात कृष्णसुद्धा व्हिलन ठरत नाही, हे लक्षात असू द्या.
आपल्या लाडक्या माणसाचे दुसरे प्रकरण सुरु आहे, हे मान्य करण्याची तयारी दाखवणे हे राधेच्या प्रेमाइतकेच मोठे मन आहे. आदर्श म्हणून ती ताकद मिळवणे हे धेय्य असले पाहिजे. पण आदर्श म्हणून सामान्य माणसाला ते मिळणे अवघड आहे. लग्न होण्याच्या आधी आपल्या नवऱ्याचं एका मुलीवर प्रेम होतं. पण अनेक कारणामुळे तिच्याशी लग्न होऊ शकलं नाही. नवीन लग्न झाल्यावर मात्र तो तिला विसरण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. हे समजून घेणारी बायको आपल्याला मिळाली आहे, याचा त्या नवऱ्याला सुद्धा अभिमान असतो. तो तिच्यावर सुद्धा प्रामाणिक प्रेम करत असतो. नवऱ्याचं पाहिलं प्रेम त्याच्या नवीन संसारात सतत आडवं येत राहतं. तिने त्याला पाठवलेली पत्र, कविता इत्यादी. मुळात नवऱ्याच्या मनात तिची अजून जागा असते. पण या सगळ्याशी त्याच्या बायकोला कोणतीही अडचण नसते.
नवऱ्याला मात्र एकमार्गी, 'टिपिकल मध्यमवर्गीय' आयुष्य जगायचं आहे. त्याला पूर्वायुष्यातला एक अध्याय विसरून जायचं आहे. त्यासाठी सुद्धा तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. पण आपण सामान्य माणसं आहोत हो, आपल्याला ते जमत नाही. एकविसाव्या शतकातली मुक्त विचारांची स्वच्छंदी मुलगी आपल्यावर जीवापाड प्रेम करते, ही गोष्ट नवरा विसरू शकत नाहीये. रोजच्या जगण्याशी त्याचा संघर्ष सुरु आहे. पण त्याला तिला विसरायचं आहे.
याच प्रयत्नात 'तिच्या आठवणी असलेलं सगळं' तिला परत पाठवायचं, आपल्या डोळ्यासमोर तीचा स्पर्श झालेलं काहीही ठेवायचं नाही, असा विचार करून तो, तीचा एक गुलाबी स्वेटर, एक मोठा मफलर, मेकअपचा समान असा ऐवज परत पाठवतो. हा सगळा ऐवज त्याची बायको त्याला काढून देते. त्यांच्या या वागण्यात क्रौर्य असं काहीच नसतं. पण प्रेमाच्या या त्रिकोणात कोणी तर दुखणार आहेच. तशी 'माया' दुखावते.
एकविसाव्या शतकातली मुलगी असल्यामुळे 'लग्न' या संस्थेवर तीचा विश्वास नसतो, लिव्ह इन मध्ये राहायची तिची तयारी असते. पण आई-वडिलांच्या धाकामुळे 'महिंदर' पाचगणीमध्ये गाण्याची शिक्षिका असणाऱ्या 'सुधा'शी लग्न करतो. लग्न करण्यापूर्वी महिंदर 'माया'बद्दल सुधाला सगळं सांगतो, प्रामाणिकपणे! त्याच्या भूतकाळासकट सुधा त्याला स्वीकारते, महिंदरसुद्धा आपल्या भूतकाळासह सुधाबरोबर नवीन आयुष्याला सुरवात करतो. 'माया' कायम त्याच्या बरोबर आहे, हे वास्तव मान्य करून दोघंही संसार करत असतात. कितीही झालं तरी सुधा ही सुधा आहे, राधा नाही. हनिमूनहून परत येताना 'माया'ने महिंदरला पाठवलेला गुलाब, त्याच्या शर्टवर अडकलेलं तिचं कानातलं याचा नाही म्हंटल तरी सुधाला त्रास होत असतो, तो स्वाभाविक सुद्धा आहे.
या त्रासातून 'माया'च्या सगळ्या वस्तू परत करायच्या, असा दोघं मिळून निर्णय घेतात. या परत करण्याच्या वस्तूंमध्ये काय काय आहे, तर मफलर, महाग स्वेटर, मेकअपचं समान इत्यादी ऐहिक गोष्टी. पण प्रेम ही काय ऐहिक बाब आहे का? त्या गोष्टी मायाच्या हातात पडल्याबरोबर टिपिकल 'माया' पत्र लिहिते. 'हे सगळं तर पाठवलंस, पण अजून काही समान तुझ्याकडे आहे, ते सुद्धा पाठवून दे!' ते पत्र वाचताना महिंदर आणि सुधा दोघांनाही आपल्या निर्णयाचा पश्चाताप होतो, पण बाण सुटून गेलेला आहे. आता रडण्याशिवाय काहीही करता येत नाही.
पत्र वाचून झाल्यावर महिंदर आणि सुधा दोघंही निःशब्द होतात. सुधा महिंदरच्या खांद्यावर डोकं ठेवून अश्रूंना वाट करून देते. पुरुषाला असलेल्या शपामुळे त्याच्या चेहेऱ्यावर अपार दुःख दिसत असूनही डोळ्यात पाणी दिसत नाही. आणि सुधाचे (रेखाचे) दाट काळे केस महिंदरच्या (नसिरुद्दीन शहाच्या) खांद्यावर पसरलेले आहेत, सुधाने आपला चेहरा लपवला आहे आणि मागे अशा भोसलेचा आलाप ऐकू येतो!! काही सेकंद व्यथित झालेले सुधा आणि महिंदर आपल्याला स्कीनवर दिसतात आणि मग एकदम फ्रेश पांढऱ्या रंगाचा गाऊन घातलेली हसरी माया पांढऱ्या प्रकाशात जिन्यावर बसलेली दिसते.
संध्याकाळच्या वेळी नदीच्या किनारी किंवा समुद्रकिनाऱ्यावर वाऱ्याचा वेग कमी होतो. आणि अतिशय अल्ल्हाददायक अशी झुळूक आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जाते. रडणारे दोन चेहरे आणि अशा भोसलेचा आलाप आपल्याला असाच वेगळ्या जगात घेऊन जाते. आलाप संपल्याबरोबर तितक्याच हळुवारपणे शब्द येतात, ‘मेरा कुछ समान, तुम्हारे पांस पडा है!’ नुसतं एकदा सहज ऐकताना लक्षात येणार नाही, पण ‘समान’ आणि ‘पांस’ हे दोन शब्द एक निमिष जास्तच गायले आहेत. त्या एका निमिषात आपल्या मनावर कोरलं जातं कि, ते जे काय ‘समान’ अजून शिल्लक आहे ते तु पाठवल्याप्रमाणे कमी महत्वाचं नाहीये. पण तु ते पाठवायला विसरलास, ते अजूनही ‘तुझ्या’कडेच आहे, असेल शक्य तर ते सुद्धा पाठवून दे! काय काय आहे तुझ्याकडे अजून? तर ‘सावन के कुछ भिगे भिगे दिन रख्खे है, और मेरे एक खत मै लिपटी रात पडी है’ असेल शक्य तर हे सुद्धा पाठवून दे.. ती जी रात्र, तुलाही आठवत असेल ती; लवकर संपवून टाक आणि ते सगळं समान माझं आहे ना, ते पाठवून दे. ‘वो रांत बुझादो, मेरा वो समान लौटा दो! आता इथे आरडीची कमाल सुरु होते. या अंतऱ्यात चार ओळी आहेत, पहिल्या साडेतीन ओळींच्या मागे केवळ गीटार आहे, शेवटचं ‘मेरा वो समान लौटा दो’ ला मागे तबला सुरु होतो.. तो ठेका पुढच्या सगळ्या ओळींच्या मागे आपल्याला ऐकू येतो.
यानंतर शब्द संपल्यावर मागे संतूर सुरु होते, आपल्याला समोर चित्र दिसतात ती एका अर्धवट वाळलेल्या झाडाची. काळ वसंत ऋतूचा आहे, पानगळ सुरु आहे. आरडीचं जीनियस असं कि पानगळ आपल्याला संतूरच्या सुरांतून सुद्धा ऐकू येते. ‘माया’ महिंदरला आठवण करून देते, ‘पतझड है कुछ, है ना?’ आठवतोय का तो काळ? पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट, कानों में एक बार पहन के लौटाई थी | पतझड़ की वो शाख अभी तक काँप रही है, वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो. आहे का शक्य तुला हे पाठवणं, असेल तर पाठवून दे. ‘माया’हे म्हणते आहे तोपर्यंत तिला त्याच्या बरोबरचे क्षण आठवतात. त्याच्या गाडीवरून बेफान होऊन फिरलेले ते क्षण, चित्र काढत असताना महिंदर शेजारी झोपलेला असतो त्याच्या पाठीवर रंगवलेल आपलं नाव, तुफान पावसात एका छत्रीमधून चालत चाललेले ते क्षण. ते आठवताना तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं.
तुला आठवतं का, ‘एक अकेली छत्री मै जब आधे-आधे भिग रहे थे, आधे सुखे आधे गिले’ आठवतं तुला? त्याच्यानंतर आठवणींच्या प्रदेशातून माया परत येऊन गुढग्याला मिठी मारून बसलेली माया आपल्याला दिसते, तिच्या चेहेऱ्यावर अजून स्मित हास्य आहे. आठवतं का तुला, ‘एक अकेली छत्री मै जब आधे-आधे भिग रहे थे, आधे सुखे आधे गिले’, ‘सुखा तो मै ले आई थी!’ पण ‘गिला मन शायद बिस्तर के पास पडा हो’ आपण भिजलो होतो तेव्हा कोरड्या राहिलेल्या आठवणी आणि क्षण ते न्यावे लागतं नाहीत, ते बरोबर येतातच. तसे मी घेऊन आले आहे. ‘सुखा तो मै ले आई थी,’ पण ज्या तुझ्याबरोबरच्या त्या ओल्या आठवणी होत्या त्याचं काय? ‘गिला मन शायद बिस्तर के पास पडा हो, वो भिजवा दो, मेरा वो समान लौटा दो.’
का रे, तुला आठवतं का?
‘एक सौ सोलाह चांद कि रांते’, आणि हो रे तुला आठवतं का? तुझ्या खांद्यावर एक तीळ आहे. तुझ्या शर्टचा तेवढा भाग कापून मी तिथे कीस केलं होतं? ‘एक सौ सोलाह चांद कि रांते, एक तुम्हारे कांधे का तील’, आणि हो रे, तु माझ्या हातावर मेंदी काढली होतीस, त्यावेळी तुला दाखवलेला ओल्या मेंदीचा वास, आठवतोय का? ‘गिली मेहेंदी कि खुशबू,’ ‘माया’ हे सगळं आठवत असते, झोपल्यावर पडून कुशीत एक बाहुली घेऊन पडलेल्या ‘माया’हे सगळं आठवतं असतं. ‘गिली मेहेंदी कि खुशबू, झूट-मुठ के शिकवे कुछ?’ हे सगळं तुला आठवत असेल, तर माझं खोटं-खोटं चिडणं, रुसणं सुद्धा आठवत असेल. नसेल आठवत तर मी आठवण करून देते.
‘झूट-मुठ के वादे भी सब याद करा दूं,’ सब भिजवा दो, मेरा वो समान लौटा दो’ हे म्हणून ‘माया’ त्या बाहुलीला झोपाळ्यावर तशीच ठेऊन उठून जाते, झोपाळा हालत राहतो!
सगळं पाठवून दे, सोबत ‘एक इजाझात दे दो बस’ हे सगळं पाठवून देशील त्याच्या बरोबर शेवटचं एकंच म्हणजे ‘एक ‘इजाझात दे दो बस, जब इसको दफनाऊंगी, मै भी वही सो जाउंगी, मै भी वही सो जाउंगी!’ सगळ्या आठवणी जर गाडून टाकायच्या आहेत, तर जागून उपयोगच काय आहे? त्यामुळे ‘मै भी वही सो जाउंगी’ संपूर्ण गाण्यात सुरु असलेला तबला, संतूर, गिटार शेवटच्या वाक्याला बंद होतं आणि फक्त आणि फक्त ‘आशा’चा जीवघेणा सूर!!
‘इजाझात दे दो बस, जब इसको दफनाऊंगी,
मै भी वही सो जाउंगी,
मै भी वही सो जाउंगी!’
https://www.youtube.com/
No comments:
Post a Comment