Monday, 9 April 2018

एक_दिवस_एक_गाणं - कुछ तो लोग कहेंगे

सामान्य, मध्यमवर्गीय मानसिकता असलेली पुष्पा मध्यमवर्गीय आयुष्य जगत आहे. भारतातल्या कोणत्याही शहरात जा मध्यमवर्गीय मानसिकता असलेली कुटुंबच्या कुटुंब फार मोठ्या महत्त्वाकांक्षा न बाळगता आयुष्य पुढे ढकलत असतात. लहान लहान समस्यासुद्धा आयुष्यभर पुराव्या इतक्या मोठ्या होऊन जातात. मध्यमवर्गीय समस्या कोणालाही सांगता येत नाही. कारण दोन वेळेला पुरेल इतकं उत्पन्न तर असतं पण मध्यमवर्गीय सन्मानासाठी काहीही उरत नाही. अशीच 'पुष्पा' मध्यमवर्गीय स्वप्न बघत बघत लहानाची मोठी झालेली आहे. एक चांगला नवरा मिळावा, दोन लहान गोड मुलं असावी. नवरा संध्याकाळी कामाहून दमून घरी आल्यावर त्याला चहा, मुलांची शाळेतून येण्याची वाट बघावी. पण स्वार्थी बेईमान नातेवाईकांमुळे पुष्पावर रस्त्यावर येण्याची वेळ येते. आपलं हक्काचं घर, गाव सोडून बकाल शहरात नैतिकतेच्या सर्व मर्यादा सोडून पोटाची भूक भागवण्यासाठी कोणाच्यातरी शरीराची भूक भागवण्याची वेळ येते. 

इथून पुढे हिंदी चित्रपट सुरु होतो. त्या परिस्थितीने पिचलेल्या, समाजाने ओरबाडून टाकलेल्या पुष्पाच्या प्रेमात शहरातला एक श्रीमंत आणि समंजस बिझनेसमन पडतो. तो त्याच्या वैवाहिक आयुष्यात सुखी नाही म्हणून 'प्रेमाच्या' शोधात तोही सभ्य समाजाची मर्यादा मोडून वेश्यावस्तीत जातो. पण पुष्पाच्या डोक्यातून मध्यमवर्गीय स्वप्न जायला तयार नाहीत. आनंदबाबू आणि पुष्पा एकमेकांच्या आधाराने आणि प्रेमाने दिवस ढकलत असतात. त्या पुष्पाला आजूबाजूला खेळायला येणाऱ्या एका लहान मुलाचा लळा लागतो. आपली अपूर्ण स्वप्न तिला त्या मुलात दिसत असतात. पण एका बाजारू बाईकडे कोणती आई आपल्या मुलाला जाऊ दिल? एक दिवस ती आई पुष्पाच्या दारासमोर उभं राहून तमाशा करते, आणि "मोठ्या माणसांना नादाला लावलं इथपर्यंत ठीक आहे, पण या बाजारू बाईची मजल लहान मुलांना नदाल लावण्यापर्यंत गेली" असं म्हणून आपल्या मुलाला घेऊन जाते. 

जी गोष्ट आनंदबाबू पुष्पाच्या डोक्यातून काढून टाकायचा प्रयत्न करत असतो ती या ना त्या स्वरूपात तिच्यासमोर येऊन उभी रहात आहे. आणि पुनः पुन्हा आनंदबाबू 'पुष्पा I hate tears' म्हणून तिला त्यातून बाहेर काढत असतो. मागून सुंदर बासरी वाजते आणि किशोर कुमार त्याच्या खास आवाजात 

कुछ तो लोग कहेंगे, लोगोंको काम है केहेना
छोडो बेकार की बातों मै बीत ना जाये रैना 

तुमच्या आमच्या हातात जो काही वेळ आहे तो कोणाचं बोलणं गांभीर्याने घेण्यात घालवायचा याचा विचार कोणी करायचा? या 'लोकं काय म्हणतील' या एका समस्येवर आमच्या शिरूभाऊंनी 'तुंबाडचे खोत'ची १२००-१३०० पानं लिहिली. 'लोकं काय म्हणतील' या समस्येला काहीही उत्तर नाही. 

पण आनंद बक्षी साहेबांनी 'लोकांच्या' मताला वैयाक्तीय आयुष्यात किती किंमत द्यायची याच्यासाठी दोन अफलातून उदाहरण घेतली आहेत. ते म्हणतात, साधारण या जगाची रीत अशीच आहे की 'हर एक सुबहो की शाम हुई' प्रत्येक सूर्योदयाला सूर्यास्त आहेच. आपण सामान्य माणसाची काय कथा जिथे 'सीता भी यहां बदनाम हुई' ज्या समाजानी सीतेला सुद्धा बदनाम केलं असा समाजाला तू इतकी किंमत का देतेस? 'फिर क्यू संसार की बातोंसे, भीग गये तेरे नैना?' 

आता लोकं मला म्हणतात - आनंदबाबू पुष्पाला समजावत आहेत की - लोकं मला टोमणे मारतात, टिंगल करतात की इतका मोठा माणूस 'इथे' येतो, एका वेश्येवर इतके पैसे उधळतो, दारू पितो वगैरे. पण गम्मत अशी की, हमने उनको भी चुपचूप के आते देखा इन गालीयो मैं' जी माणसं आपली गिल्ट लपवण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवतात त्याचं मत आपण मनावर घेऊन रडत बसायचं, ये योग्य आहे का? 

आनंदबाबूंच्या अशा समजवण्यामुळे पुष्पाच्या चेहऱ्यावर प्रसन्नपणा येतो..
गाणं म्हणता येत असेल ना गर्लफ्रेंड कितीही निराश असली तरी तिला खुश करता येतं, ही माझी थिअरी राजेश खन्नानी ४० वर्षांपूर्वी सिद्ध करून दाखवली.

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....