'कुराण' या शब्दाची उत्पत्ती 'करा' या मूळ अरबी शब्दापासून झाली आहे. 'करा' याचा अर्थ एकत्र करणे असा होतो. प्रत्यक्ष 'कुराण' ग्रंथात मात्र या ईश्वरी ग्रंथाला अनेक नावे योजण्यात आली आहेत. काही ठिकाणी थेट 'कुराण' असा उल्लेख आहे काही ठिकाणी ग्रंथ, काही ठिकाणी संभाषण असाही उल्लेख आहे. आमला जमालुद्दीन सियुती यांनी 'कुराण' साठी कुराणात आलेल्या पर्यायी विशेषणांची यादी बनवली आहे ती संख्या ५५ इतकी आहे.
इस्लामपूर्व अरबस्थानाचे नैतिक अधःपतन झाले होते. माणुसकी संपत चालली होती. दारू, जुगार, व्यसनं, बदफैली चारित्र्य यामुळे लहानपणापासून मुहंमद दुःखी होते. ते सतत अरबांना योग्य, सत्य धर्म सांगितलं पाहिजे याचा विचार करत असत. प्रेषित पहिल्यापासून स्वभावाने अत्यतं साधे, मनमिळावू, प्रामाणिक, सत्यप्रिय होतेच. भवतालच्या परिस्थितीने व्याकुळ होऊन चिंतनासाठी प्रेषित अनेकदा मक्केच्या सीमेवर असलेल्या 'हिरा' पर्वतावर जाऊन चिंतन करत असत. चिंतनाचा विषय अरबांना योग्य धर्म कोणता सांगावा, हाच मुख्यतः असे. वयाच्या ४० व्या वर्षी असेच चिंतनासाठी हिरा पर्वतातील एका गुहेत ते बसलेले असताना मानवी रूपातील देवदूत जिब्राइल मुहंमद यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याने एक रेशमी रुमाल मुहम्मदांच्या समोर ठेवला. आणि आज्ञा केली रूमालावर लिहिलेलं वाचण्याची वाचण्याची. मुहंमद म्हणाले, मी निरक्षर आहे. तेव्हा जिब्राइल या देवदूताने त्यांचा हात हातात घेतला आणि जोराने दाबला. आणि पुन्हा आज्ञा केली आता वाच, तरीही मुहंमद म्हणाले मला वाचता येत नाही. असं एकूण तीन वेळेला झाल्यानंतर चौथ्या वेळेला कुराणातील पहिल्या आयती प्रेषितांच्या तोंडून निघाल्या. त्या आयती कुराणमध्ये सुरह ९६ मधल्या पहिल्या पाच आयती आहेत. ह्याची तारीख ६ ऑगस्ट ६१० हि आहे, या दिवशी मुहंमद हे अल्लाहचे प्रेषित म्हणजे संदेश वाहून नेणारे 'रसूल'बनले. सर सय्यद अहमद म्हणतात कि जिब्राइल हि कोणी व्यक्ती नसून अल्लाहच्या संदेशाच्या स्वीकार करण्याची प्रेषितांच्या ठिकाणी असलेली एक दैवी शक्ती होती, तिचेच नाव जिब्राइल आहे.
कुराणचे स्वरूप -
इसवीसन ६१० ते ६३२ प्रेषितांच्या मृत्यूपर्यंत कुराण निर्मितीचे काम सुरु होते. दिवसाच्या कोणत्याही वेळेला अल्लाहचा संदेश येत असे. तो आला कि प्रेषित आपल्या अनुयायांना तो लगोलग सांगत असतं, मग ते अनुयायी दगडावर, चामड्यावर, किंवा खजुराच्या पानावर लिहून घेत असत. काही जण चक्क त्या आयती पाठ करून ठेवत असत. प्रेषित जिवंत असताना कुराण कोणालाही एकत्र लिहून ठेवण्याची गरज वाटली नाही कारण प्रेषित म्हणजे अल्लाहचा पृथ्वीवरचा प्रतिनिधी जिवंत होता. प्रेषितांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र पहिले खलिफा अबू बकर याना कुराणाच्या अधिकृत आवृत्तीची गरज वाटू लागली. त्यांनी प्रेषितांच्या सहकाऱ्यांना एकत्र बोलवून हि गरज समजावून सांगितली. त्यानंतर प्रेषितांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी 'झैदी बिन थाबित' यांनी कुराणच्या आयती पाठ केलेल्या लोकांना भेटून त्या आयती लिहून घेतल्या. ते सर्व दगड, चामड्याचे तुकडे, खजुराच्या पानाचे तुकडे एकत्र करून कुराण एकत्र लिहून काढले. ते काम इसवीसन ६५१ मध्ये पूर्ण झालं. त्यावेळी प्रेषितांच्या पत्नी हफसा हिच्याकडून ती कुराणची आवृत्ती सर्टिफाय करून घेण्यात आली. शिवाय प्रेषितांच्या इतर सहकाऱ्यांनी सुद्धा ती सर्टिफाय केली. मग शंका आणि संदिग्धता टाळण्यासाठी इतर सर्व कुराणच्या आवृत्ती जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आल्या. आणि ६५१ मध्ये तयार केलेली कुराणची आवृत्ती अधिकृत म्हणून मान्य करण्यात आली. त्यातून काही भाग प्रक्षिप्त आहे का, किंवा पाठ केलेल्या लोकांनी खऱ्या आयती पाठ केल्या होत्या याचा पुरावा काय, किंवा काही भाग विस्मृतीत गेला नसल्याची हमी कोण घेतो वगैरे प्रश्न निर्माण झाले. त्यावर अनेक मुस्लिम इतिहासकार आणि पंडितांनी भाष्य केले आहे. त्यापैकी एक आपण पाहू. भारतातील जेष्ठ मुस्लिम अभ्यासक मौलाना वाहिदुद्दीन म्हणतात, "इस्लाम च्या पूर्वीचे धर्मग्रंथ भ्रष्ट झाले याचे कारण त्याचे पावित्र्य टिकवण्याचे कोणतेही मार्ग किंवा संस्था ईश्वराने निर्माण केले नव्हते. म्हणून ज्यू आणि ख्रिश्चन यांचे ग्रंथ भ्रष्ट झाले. म्हणून स्वतः अल्लाहनेच व प्रेषित मुहंमदानी विशेष काळजी घेऊन कुराण हा तंतोतंत व कायमचा, तसाच शुद्ध ठेवण्याची व्यवस्था केली आहे." म्हणून ज्या स्वरूपात प्रेषितांना कुराण अवतरित झाले त्याच स्वरूपात ते आज आपल्यासमोर आहे. प्रेषितांनंतर १३-१४ शतकं कुराण कायम विशुद्ध व अविकृत राहिले आहे. यात एखाद्या अक्षराचा वा कानामात्रेचाही फरक पडलेला नाही, असे मुसलमान मानतात.
कुराणात ११४ सुरह म्हणजे अध्याय आहेत. कुराणात ६०० रुकू (विभाग), ६२२५ आयती (श्लोक), ७९,९३४ किलमा (शब्द) आणि ३,३८,६०६ हुरुफ (अक्षरं) आहेत. कुराणातील ११४ सुरहंपैकी ९० सुरह मक्काकालीन आहे, २४ मदिना कालीन. कुराण वाचताना प्रत्येक पानाच्या वर आयत मक्काकालीन आहे कि मदिना कालीन आहे त्याचा उल्लेख केलेला असतो. कुराण वाचताना मक्का काळ आणि मदिना काळ हा फरक समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रेषितांचे एक अधिकृत चरित्र माहिती असणे, संग्रही असणे आवश्यक आहे. मदिना काळातील मुख्य फरक म्हणजे प्रेषितांनी राज्य स्थापन केलं होतं. मक्का काळात राज्य स्थापन केलेलं नव्हतं. मक्का काळ आणि मदिना काळ हे प्रकरण म्हणजे एका स्वतंत्र पोस्टचा विषय आहे. कुराणच्या निर्मितीचा काल २२ वर्षाचा असल्यामुळे एक विषय आणि त्यावरचे विवेचन असं कुराणात नाही. प्रेषितांच्या आयुष्यातील घटनांनुसार विषय बदलेत गेलेले आहेत. त्यासाठी हादीस समजून घ्यावे लागतात.
इथे चर्चा केली पाहिजे असे दोन-तीन महत्वाचे विषय आहेत. १. कुराणचा हेतू, २. कुराणचा संदेश, ३. इस्लामम्हणजे काय? पण ते सुद्धा स्वतंत्र पोस्टमध्ये पण पाहूया. आत प्रथम कुराणचे भाष्य करण्याच्या पद्धती. आणि प्रमुख भाष्यकार याबद्दल विचार करू.
कुराणचा अन्वयार्थ लावण्याची पद्धत म्हणजे – तफसीर. कुराणचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार म्हणजे अर्थात स्वतः प्रेषितच. त्यासाठी त्याच्या हादीसचा आधार घेतला जातो. परंतु प्रेषितांच्या मृत्युनंतर त्यांचे जवळचे सहकारी इब्न अब्बास (मृत्यू ६८७) यांना कुराणचे प्रेषितांनंतरचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार मानतात. (प्रेषितांच्या सहका-यांना ‘सलाफ’ म्हणतात) कुराणचे अन्वयार्थ लावण्याचे शास्त्र खूप विस्तृतपणे तयार करण्यात आले आहे. त्याच्या दोन सर्वात महत्वाच्या पद्धती आहेत. १. तफसीर बील मथुर आणि २. तफसीर बील राई. तफसीर बील मथुर म्हणजे कुराणचा प्रेषित आणि त्यांचे अनुयायी यांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे अन्वयार्थ लावणे. तफसीर बील राई म्हणजे परंपरेपेक्षा कारण परंपरेला महत्व देऊन केलेलं भाष्य.
कुराण वरील पहिले भाष्य अल तबरी यांचे प्रसिद्ध आहे. तबरी यांनी दहाव्या शतकात सविस्तर आणि डिटेल भाष्य केलेलं आहे. त्याचे नाव ‘जामी अल बयान फी तफसीर अल कुराण’ असे आहे. त्यानंतर बाराव्या शतकातील ‘अबुल कासीम महमूद अल झमाक्षरी’ यांचे कुराणचे भाष्य प्रसिद्ध आहे. आज जमते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदुदी यांचे भाष्य जगप्रसिद्ध आहे. त्याच्या भाष्याचे नाव ‘Towords understanding Quran’ असे आहे. भारतातील मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सुद्धा कुराणवर भाष्य केलेलं आहे. त्यांच्या भाष्य ग्रंथाचे नाव ‘तर्जुमन अल कुराण’ असे आहे. मध्यंतरी बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लामचा एकांगी अभ्यास केला कारण बाबासाहेबांनी अभ्यास केला तेव्हा कुराणचे इंग्लिश भाषांतर झालेले नव्हते असा एक युक्तिवाद मांडण्यात आला. त्यांचासाठी. कालक्रमानुसार कुराणचे पहिले इंग्लिश भाषांतर १८६१ साली प्रसिद्ध झाले. भारतात कुराणची उर्दू-रोमन भाषांतर आवृत्ती १८४४ साली प्रसिद्ध झाली. सध्या अभ्यासासाठी वापरण्यात येणारे मुस्लीम पंडित मोहंमद पिथकॉल व अलामा अब्दुल्ला युसुफ यांनी कुराणची केलेली इंग्लिश भाषांतरं भारतात १९३० आणि १९३४ साली उपलब्ध होती. आता तर जगातल्या अनेक भाषांत कुराण उपलब्ध आहे. मराठी इस्लामी पब्लिकेशन्स ट्रस्ट यांनी सय्यद अबुल आला मौदुदी यांनी केलेलं भाषांतर मराठी मध्ये उपलब्ध करून दिले आहे. शिवाय ‘दावतुल कुराण’ नावाने मुंबईहून ३ खंड प्रकाशित झाले आहेत. (क्रमशः)
No comments:
Post a Comment