Sunday 25 March 2018

दार उल हरब

‘दार उल हरब’ – शब्दशः ‘दार उल हरब’ याचा अर्थ ‘युद्धभूमी’ असा होतो. जिहाद या संकल्पनेचा ज्यावेळी इस्लामी पंडितांनी विचार सुरु केला त्याच्याबरोबरच नेमकी युद्धभूमी कोणती याचा सुद्धा विचार सुरु केला गेला आहे. ज्या भूमीवर इस्लामी कायदा लागू नाही, जेथे मुसलमान राजा राज्य करत नाही, अशी भूमी जी ‘इस्लामीची भूमी नाही’ त्याला युद्धभूमी म्हणतात. साधारणपणे इस्लामीभूमीच्या सीमेवर असणारी ज्याच्या राजाला इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन केले आहे अशा भूमीला युद्धभूमी म्हणतात. ‘युद्धभूमी’ या शब्दात युद्ध करून ती भूमी इस्लामची भूमी बनवणे हे अभिप्रेत आहे. या युद्धाला इस्लामी धर्मशास्त्रात ‘पवित्र युद्ध’ (जिहाद) म्हंटले आहे. सर्व मुसलमानांसाठी ‘आपली अल्लाहप्रती श्रद्धा आणि इमान कायम आहे हे सिद्ध करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणून ‘जिहाद’ म्हणजे पवित्र युद्ध करण्याचा मार्ग कुराणात सांगण्यात आला आहे. हे पवित्र युद्ध श्रद्धावान मुसलमानांनी श्रद्धाहीन बिगर मुसलमानांविरुद्ध करायचे आहे, असेही कुराण सांगते. परंतु या युद्धांचा हेतू केवळ अन्याय करणे हा नसून बिगर इस्लामी प्रदेश जिंकून ती ‘इस्लामची भूमी’ बनवणे आणि त्याप्रदेशात शांतता प्रस्थापित करणे हा आहे. 

कुराण ‘शांतता, स्थैर्य’ असलेला प्रदेश वेगळा आणि ‘इस्लामी कायदा’ लागू असलेला प्रदेश वेगळा असा भेद करत नाही. इस्लामी धर्मशास्त्र असे मानते कि, ‘स्थैर्य आणि शांतता’ कि केवळ इस्लामच्या भूमीतच (दार उल इस्लाम मध्येच) असू शकते. त्यामुळे मुसलमानांच्या दृष्टीने ‘दार उल हरब’ मध्ये करायच्या युद्धाचा हेतू स्पष्ट आहे, बिगर मुसलमान यांना इस्लाम स्वीकारायला लावणे आणि त्या प्रांतात इस्लामची शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे. इस्लामी धर्मशास्त्रात या ‘युद्धभूमीचे’ वेगवेगळे संदर्भ येतात. काही ठिकाणी ‘शाश्वत मिशनरी (प्रचारी) युद्धाचा धोका असलेली भूमी’ असा उल्लेख येतो. तर काही ठिकाणी ‘बिगर मुसलमानांनी कर देऊन सुरक्षा मिळवलेली भूमी’ असा उल्लेख येतो. याला ‘दार उल अहद’ किंवा ‘दार उल सूलह’ असे अरबी शब्द आहेत. 

इसवीसन ६२२ मध्ये आपल्या अनुयायांसह प्रेषित पैगंबर मक्केतून हिजरत म्हणजे स्थलांतर करून मदिनेत गेले. मदिनेत प्रेषित पैगंबर यांनी पहिले इस्लामी राज्य स्थापन केले. त्या पहिल्या इस्लामी राज्याच्या सीमा ज्या बिगर इस्लामी राज्याच्या सीमांना भिडत होत्या त्या ‘बिगर इस्लामी’ राज्यांना ‘दार उल हरब’ म्हणण्याची प्रथा प्रथम पडली होती. प्रेषितांनी इस्लामी राज्यातर्फे त्या शेजारच्या बिगर इस्लामी राज्यांना इस्लामी राज्यात समाविष्ट होण्यासाठी अर्ज पाठवले होते. समाविष्ट होण्याचे दोनच मार्ग देण्यात येत असत. एकतर तुमचा धर्म सोडून इस्लाम स्वीकारणे किंवा इस्लामच्या आक्रमणाला तोंड देऊन युद्ध करणे. असे अर्ज प्रेषितांनी रोमन, पर्शियासारख्या त्यावेळेच्या बलाढ्य सम्राटांना सुद्धा पाठवले होते. ‘यामाम’च्या लोकांना प्रेषितांनी पाठवलेला अर्ज या प्रकारच्या अर्जांचे ऐतिहासिक उदाहरण आहे. या सर्वांचे संदर्भ प्रेषितांच्या हादीसमध्ये सापडतात. जेव्हा बिगर इस्लामी राजे इस्लाम स्वीकारत असत तेव्हा त्यांची भूमी ‘इस्लामची भूमी’ म्हणजे ‘दार उल इस्लाम’ होत असे. शिवाय तिथे इस्लामचा कायदा लागू होत असे, आणि मुसलमान आणि कर देऊन सुरक्षित झालेले झिम्मीयांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्याची असे.

सर्व मुस्लीम राजांचे आणि राज्यांचे आपल्या शेजारच्या बिगर मुस्लीम राजा आणि राज्याबरोबर उघड किंवा गुप्तपणे (शक्य त्या सर्व मार्गांनी) युद्ध सुरु ठेवणे, आणि इस्लामची भूमी बनवण्यासाठी प्रयत्न करत राहणे हा ‘दार उल हरब’चा पारंपारिक अर्थ आहे. इस्लामी धर्मशास्त्राच्या आद्य आणि प्रार्थमिक ग्रंथात हाच अर्थ सांगितला आहे. मुल्ला खुसारौ यांच्या ‘किताब उल जिहाद’ या ग्रंथात ते लिहितात, ‘इस्लामस्वीकारण्याच्या मुस्लीम राजाचा आणि राज्याचा शांततामय अर्ज ज्याने ज्याने फेटाळला आणि मुसलमान होण्यास नकार दिला असा प्रत्येक व्यक्तीबरोबर लढले पाहिजे, ‘दार उल हरब’ चा हाच अर्थ होतो. 

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....