Monday, 9 April 2018

एक_दिवस_एक_गाणं - युगायुगांचे नाते आपुले




एक एक दिवस एका एका गाण्याचा असतो. निदान माझ्यासाठी तरी. त्या एका दिवसात मी दुसरं काहीच ऐकत नाही. मध्ये अनेक दिवस मी दिवस रात्र फक्त 'तरुण आहे रात्र अजुनी' ऐकत होतो. नंतर एकदा 'मेरी सुरत तेरी आँखे' मधलं मन्ना डे च्या आवाजातलं 'पूछो ना कैसे मैने रैन बिताई' हे गाणं ऐकण्यात मी दिवस घालवले. 'तेरे बिना जिंदगी से' आणि 'इस मोड से जाते है' तर कोणत्याही वेळी कोणत्याही मूड मध्ये ऐकू शकतो. मागे असंच सलील कुळकर्णीने संगीत दिलेला अल्बम होता 'संधीप्रकाशात' त्यातलं ब.भा बोरकरांची कविता 'संधीप्रकाशात' माझ्या मोबाईलच्या प्लेलिस्ट मध्ये एकच गाणं ८-१० वेळा मी टाकून ठेवलं होतं आणि ते रिपीट मोड वर. मध्ये एकदा विद्या बालन आणि मंगेश देसाई या दोघांनी मिळून जुना 'अलबेला' कलर रूपात आणला होता तेव्हा ओरिजिनल गाणी कोणती आहेत म्हणून ती ऐकली होती. तेव्हा त्या ओरिजिनल अलबेला मधलं 'मेरे दिल कि घडी कारे टिक टिक टिक' आणि भगवान दादाचा डान्स हे ऐकण्यात आणि पाहण्यात मी घालवले. मग सुरु झाला सवाई गंधर्व. त्यानंतर मी सलग फक्त क्लासिकल ऐकतो आहे. त्यात अमीर खाँ साहेबांचा यमन झाला, भीमसेन जोशींचा वृन्दावनी सारंग झाला, मल्लिकार्जुनांचा दुर्गा झाला. किशोरी ताईंचा हंसध्वनी.
खरं म्हणजे या सगळ्या लिस्ट मध्ये आज जे गाणं आहे ते तसं अंडररेटेड आहे. पण माझं असं मत आहे कि रैना पण मोठा खेळाडू आहे, सचिन पण मोठा खेळाडू आहे. २०१५ च्या वर्ल्डकप मध्ये झिम्ब्वाबे बरोबर कठीण परिस्थितीत त्याने टिकून मॅच जिंकून दिली. सचिन अशा असंख्य वेळा करून दिलं, पण एकाच वेळी रैना खेळाला म्हणून त्याचं महत्व कमी होतं का? अभिषेकी बुवा हे भीमसेन वसंतरावांप्रमाणे लीलया क्लासिकल गाऊ शकणार नाहीत, पण सर्वात्मका सर्वेश्वरा, शब्दा वाचून कळले सारे, हे सुरांनो चंद्र व्हा.!! तसं कलाकाराचं मोल संपूर्ण कारकिर्दीवरून न ठरवता या क्षणी त्यांनी आपल्यला न्हाऊन काढलं कि नाही यावरून ठरवावं.
गेले अनेक दिवस मी फक्त 'युगा युगांचे नाते आपुले' एवढंच ऐकतो आहे. गाण्यात प्रशांत दामले आणि कविता लाड दोघं जणं आहेत. आणि संध्याकाळच्या वेळी दोघं पानशेतच्या बॅकग्राउंड वर व्याकुळ झाले आहेत. दोघांनी ऍक्टिंग तर उत्तम केलीये पण खरी मजा आहे ती बॅकग्राउंड ला वाजणाऱ्या व्हायोलिनची. ती त्या व्याकुळतेत अजून भर घालते. व्हायोलिनचा एक छोटा पण सुंदर पीस झाल्यावर रुपकुमार राठोडचा आवाज सुरु होतो. काव्य म्हणून सुद्धा पुढची कविता फार ग्रेट नाही, साधारणच आहे. पण सुरवातीच्या दोन ओळी फक्त, 'युग युगांचे नाते आपुले नको दुरावा, सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा'. पहिली ओळ रुपकुमार राठोडनी म्हंटली आहे आणि पुढची ओळ जयश्री शिवराम. पण दोघांनीही 'दुरावा' या शब्दावर घेतलेली मेहनत खलास करून ठेवते. सहज ऐकताना तर त्यातला कळवळा कळणारही नाही. पण मी किमान दोन-तीन आठवडे दुसरं काहीच ऐकलं नाहीये. पण मला शेवटचं कडवं अजूनही पाठ झालं नाही, पण मी पहिल्या दोन ओळी कितीही वेळा ऐकू शकतो. मजा इथेच संपत नाही. 'युग युगांचे नाते आपुले नको दुरावा' ही पहिली ओळ एकदा गाऊन झाली कि पहिल्या व्हायोलिन प्रमाणेच इथे एक छोटासा पण बासरीचा पीस आहे. बासरी पण व्हायोलिन इतकीच व्याकुळ करणारी नस आहे. त्यातला गोडवा अशा प्रसंगी अजून कहर करतो. रुपकुमार राठोडची पहिली ओळ झाल्यावर कविता लाडच्या तोंडी पुढची ओळ आहे. परत इथे सुद्धा तिनी ऍक्टिंग उत्तम केली आहेच. पण 'सहवासाची ओढ निरंतर' या शब्दांवर तिच्या चेहेऱ्यावर असलेली असहाय्यता पाहून मी अजून वेडा झालो. पुढे ती तिचे शब्द पूर्ण करते, 'सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा', यानंतर पुन्हा रुपकुमार राठोड म्हणजे प्रशांत दामले पुन्हा पहिली ओळ म्हणतो. ती पूर्ण झाल्यावर आवेग सहन न होऊन कविता लाड प्रशांत दामलेच्या जवळ येते आणि हलकी मिठी मारते. त्या दोघांच्या मागे पसरलेला जलाशय आणि डोंगरात बुडणार सूर्य आहे, आणि सूर्याचा शांत होणारा प्रकाश जयशयात पसरलेला आहे. पुढे गाणं सुरु राहत. पण मी दोन - तीन आठवडे पहिल्या दोन ओळीतच अडकून पडलो आहे.
शब्दांना क्लासिकल मध्ये जास्त महत्व नसतं, तिथे शुद्ध स्वर हेच प्रधान, पण इथे तसं नाही. पण ह्या दोन ओळी आणि निर्माण केलेलं वातावरण पाहून आणि ऐकून हा सुगम 'मारवा'च आहे, बघा ना वेळ संध्याकाळ, संधिप्रकाश पडलेला आहे, दोन व्याकुळ जीव विरहाच्या भितीनी गलबलून गेले आहेत, बासरी आहे, व्हायोलिन आहे. 'मारवा' तयार होण्यासाठी अजून काय हवं असतं!

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....