Monday, 9 April 2018

#एक_दिवस_एक_गाणं - जाने वो कैसे लोग थे


एका मोठ्या पैसेवाल्या प्रकाशकाच्या घरी पार्टी सुरु असते. आणि पार्टीत सगळे रईस लोकं बसलेले असतात. कोणी सुंदर ग्लासांतून मद्याचे घोट घेत असतात, कोणी आरामात सिगरेटचे झुरके. आणि मैफल सुरु असते. अनेक नावाजलेले शायर मैफलीत असतातच, ते आपापले शेर ऐकवून दाद मिळवत असतात. मैफलीचा बादशहा म्हणजे पार्टी देणारा राजासारखी करडी नजर सर्वांवर ठेवून असतो. अर्थातच राजाला एक सुंदर राणी असते. राणी खुश नसते. तिला हे लग्न जबरदस्तीने करावं लागलं असल्याची सतत तडफड तिची सुरु असते. पण लग्न हे सुखासाठी आनंदासाठी थोडीच करतात, आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणून तर लग्न करतात. तसच या सुंदर राणीचं आर्थिक सुरक्षिततेसाठी या राजाबरोबर लावून दिलेलं असत. जबरदस्तीने लग्न झालं याचाच अर्थ राणीचा लग्नापूर्वी वेगळा राजा असणार, तसा तो होता. त्याचं नाव विजय! तो कवी असतो. आणि म्हणूनच दरिद्री असतो. प्रतिभा पोटाचा प्रश्न सोडवू शकली तर चांगलं ना. विजय केवळ प्रतिभावान, पण खिसा रिकामा.
राणीच्या नवीन 'प्रकाशक' राजाला राणीच्या पूर्वीच्या या प्रकरणाबद्दल माहिती असते. पैसेवाला असल्यामुळे तो प्रतिष्ठितसुद्धा असतो. तो माणसं कामाला लावतो आणि या विजयची अधिक माहिती काढतो. त्याला शोधतो. आणि आपली ताकद दाखवण्यासाठी विजयला आपल्याच घरात नोकरीला ठेवतो. जिथे राणी रोज या नोकराला पाहिलं, आकांत करेल पण कधीही तोंडातून शब्द काढणार नाही. आणि काही दिवस गेल्यानंतरची हि राजाच्या घरातली पार्टी! तिथे हा विजय काम करत असतो. राणीही आसपास भटकत असते. राजा सर्वांवर नजर ठेऊन असतो. कोणातरी एकाचा मद्याचा घोट आणि त्याच्याबरोबरचा शेर संपतो तेव्हा विजय चालत चालत पुस्तकांच्या कपाटापाशी जातो आणि आणि ... अंगावरून ट्रेडमार्क शाल घेतलेला जिझस ख्राइस्टची पोज घेतलेला गुरु दत्त म्हणतो ...
'जाने वो कैसे लोग है, जिनके प्यार को प्यार मिला,
हमने तो बस कलीय मांगी, कांटो का हार मिला ।।
सर्वांपासून दूर लांब राणी उभी असते, तिला लक्षात येतं विजय सांगतोय ती त्याचीच गोष्ट सांगतोय. पण ती बोलू शकत नाही. राजालासुद्धा लक्षात येतं काय सुरु आहे. पण हेमंत कुमारच्या अतीव गोड आवाजात, मागे हलकीशी बासरी आणि पियानो इतकाच आवाज आणि कपाळावर आठ्या असणारा गुरु दत्त साहिरचे शब्द गातो. खुशियो कि मंझिल ढुंढी तो, गम कि गर्द मिली, चाहत के नगमे चाहे तो आहे सर्द मिली, दिल के बोझ कु दुना कर गया जो गमखार मिला ..
आता विजय मैफिलीचा ताबा घेतो. मैफिलीत जमलेले लोक सुद्धा त्याला मान देतात, दोन पावलं पुढे येतात. राजाची राणी विजयची राणी माला सिन्हा मात्र अनावर होऊन पदर तोंडाला लावून मुक्याने रडते आहे. पण तिचा सुद्धा आवाज नाही. आवाज आहे तो फक्त पियानो आणि कदाचित व्हायोलीन. पण बाकी हेमंत कुमार.
विजयच्या कविता कोणी प्रकाशित करायला तयार नसत. आणि एका भिकाऱ्याला थंडी वाजत असते तेव्हा विजय आपला कोट त्याला देतो, त्यात त्याच्या कवितांची वही सुद्धा जाते. विजय तसाही आयुष्याला कंटाळलेलाच आहे. कोणीच माणूस आपल्याबरोबर उभं राहू नये ?? बिछड गया हर साथी देकर पल दो पल का साथ .. किसको फुरसत है जो थामे दिवानो का हाथ, माणसं तर सोडाच पण माझी सावली सुद्धा बरोबर राहीली नाही .. हमको अपना साया तक अक्सर बेजार मिला .. जेव्हा 'कोणीच बरोबर नाही' हे विजय सांगतो तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावर राग आहे, पण अगदी क्षणभर. पण चिडणार कोणावर? कशासाठी? क्षणात राग जाऊन त्याच्या ट्रेडमार्क आठ्या!! इथे सचिन देव बर्मन अॅट हीज बेस्ट .. फक्त पियानो तो सुद्धा हलकासा सुरु आहे, बाकी काही नाही. रावसाहेब मध्ये पुलं सांगतात बघा, 'दोन तंबोरे, तबला आणि संवादिनी एवढ्या भांडवलावर गायक स्वर्ग उभा करतो' तसच इथे आहे. फक्त पियानो आणि साहीरचे शब्द.
आपली म्हणजे हे पाहणाऱ्याची अपेक्षा असते कि राणी विजयकडे परत येईल, लोकं विजयला सन्मान देतील, पण नाही.. हतबल राणी आराम खुर्ची वरून उठून जाते. ती खुर्ची हलत राहते. राणीही दिसेनाशी होते. तेव्हा विजय म्हणतो, असो! 'इसको ही जिना केहेते है तो, युंही जी लेंगे. तक्रार करणार नाही, उंफ ना करेंगे, लब सी लेंगे आसू पी लेंगे. आता दुःख आणि वेदनेला घाबरायचं काय हो, गम से अब घबराना कैसा, गम सौ बार मिला .. हमने तो बस कालिया मांगी, कांटो का हार मिला ..
मैफिलीच्या दृष्टीने हि एका माणसाची कहाणी नसते. ती असते फक्त गझल. एकचं माणूस संपूर्ण मैफलीतून एक माणूस फक्त ती गझल अप्रिशियेट करतो. इतर सगळे त्याच्याकडे पाठ फिरवून आपापल्या कामाला लागतात. पण गम से अब घबराना कैसा, गम सौ बार मिला!!
१९५७ साली आलेला प्यासा, जिझसची पोज घेतलेला गुरु दत्त, साहीरचे शब्द आणि एसडीचं संगीत २०१७ मध्ये सुद्धा व्याकूळ करतात हो!

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....