मी अकरावी बारावीत असताना कॉलेजमध्ये फारसे मित्र नव्हते. साठ जणांच्या वर्गात सातच मुली होत्या. त्यामुळे कॉलेज लाईफ सारख्या अंधश्रद्धा तिथे नावालाही नव्हत्या. अकरावीच्या पहिल्या काही दिवसातच मला केमिस्ट्री, फिजिक्स आणि गणित हे विषय माझ्यासाठी नाहीत हे लक्षात यायला लागलं. मन रामवण्यासाठी काहीच नव्हतं तेव्हा मला पुस्तकांची गरज पडली. पण तो एकटेपणा जबरदस्त होता. त्यावेळी दर आठवड्याला मी प्रेमात पडत असे. दर आठवड्याला 'She is THE one' वालं फिलिंग तयार व्हायचं. तेव्हा केव्हातरी पहिल्यांदा मी हे गाणं ऐकलं होत. मला असा अनुभव आहे कि एक गाणं अनेकदा ऐकलं कि अशी एखादी वेळ येते जेव्हा गाण्याचे सूर ऐकू ना येत शब्द ऐकू येतात. 'स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी'
त्यावेळी ते दर आठवड्याला प्रेमात पाडण्याचं फिलिंग अगदी जेन्युइन होतं. मला मनापासून वाटत असे कि 'साला या वेळी खरंच प्रेमात आहोत आपण'. एकदाही 'त्यांना' सांगायची माझी डेरिंग झाली नाही. पण अनेकदा प्रेमात पडलो आणि त्यात अनेकदा पडलो त्यामुळे गाण्यांच्या शब्दांकडे स्वाभाविक लक्ष जात. अशाच एखाद्या मनस्थितीत हे गाणं मी दिवसभर ऐकत बसलो आहे हे मला आठवतंय. रात्री गादीवर पडल्यावर कानात हेडफोन होतेच, त्यातही हेच गाणं सुरु होत. तेव्हा कधीतरी माझं त्या शब्दांकडे लक्ष गेलं.
निर्जीव उसासे वार्यांचे, आकाश फिकटल्या तार्यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची, हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी..
एकटेपणाची भावना किती तीव्र आहे या शब्दात! हे गाणं कोणत्याच चित्रपटात नसल्याने त्याच्याभोवती कोणतीही गोष्ट नाहीये. त्यामुळे हे कोणत्या नात्याच्या एकटेपणा बद्दल आहे हे सांगणं कठीण आहे. पण निर्जीव उसासे वाऱ्यांचे -- आकाश फिकटल्या ताऱ्यांचे --- वेलींची कुजबुज नाही --- पानांचे हितगुज नाही --- अशा एका थकलेल्या स्थितीत मागच्या आठवणी एकत्र येत आहेत. सर्वात जास्त ताकदीचे शब्द दुसऱ्या कडव्यात आहेत.
विरहात मनाचे स्मित सरले --- गालावर आसू ओघळले --- होता हृदयाची दो(न) शकले --- जखमेतून क्रंदन (आकांत) पाझरले --- घाली फुंकर हलकेच कुणी ---
माझं हल्ली एक मत तयार झालं आहे. कविता ही एक अशी गोष्ट आहे कि जी समजावून सांगायची गरज पडू नये. तो भावनेचा खेळ असतो. कवी सुद्धा भावनेचा आवेग सहन न झाल्यामुळे काहीतरी लिहीत असतो. आणि प्रेमपत्र कितीही रोमँटिक असलं तरी त्याचं जाहीर वाचन हशा पिकवतं (इति पुल). भावानेच सुद्धा तसंच आहे. एखाद्या भावनेनी आपले डोळे भरून आले म्हणून सगळ्याचे यावेत हा अट्टाहास चुकीचा आहे, म्हणून ते भावानेच गाणं कोणालाही समजावून सांगू नये. हे या गाण्याचे शब्द तसेच आहेत. ज्याला हवा तसा त्याने अर्थ घ्या. आणि हवा तसा अर्थ घेता येईल इतके साधे हे शब्द आहेत. सुधीर फडक्यांनी प्रत्येक शब्दाचा उच्चार काटेकोर केला आहे. आणि त्यामुळे वेगळे सुरांशिवाय शब्द वाचायची गरज पडत नाही .. गाणं ऐकताना शब्द सुद्धा ऐकू येतात.
एकदा माझ्या डोक्यात एका मुलीला प्रपोज करायची कल्पना आली होती. मी "विरहात मनाचे स्मित सरले --- गालावर आसू ओघळले --- होता हृदयाची दो(न) शकले --- जखमेतून क्रंदन (आकांत) पाझरले --- घाली फुंकर हलकेच कुणी --- " हे वाक्य तिला सांगणार होतो. आणि म्हणणार होतो. तू बरोबर नसल्यामुळे माझी अशी अवस्था झाली आहे, असं तिला सांगणार होतो. पण तिला हे कळेल का? या विचारात माझे अनेक दिवस गेले आणि ती पण सध्या शब्दात प्रपोज करणाऱ्या मुलाबरोबर निघून गेली. असो!! आता कोणत्याही मुलीच्या जेन्युइन किंवा उथळ विचाराशिवाय हे गाणं उरलं आहे. इतर अनेक गाण्यांप्रमाणे दिवसाच्या कोणत्याही वेळी, कोणत्याही मूड मध्ये हे गाणं मी ऐकू शकतो.
भावगीत आहे आणि गाण्याची सुरवात बासरीने होऊ नये, ये होने का नही है| एक सुंदर असा बासरीचा पीस आहे, तो जिथे संपतो तिथे बाबूजींच्या आवाज सुरु होतो. गाण्याचा पहिला शब्द ऐका. ‘स्वर...’ तो ज्या आर्ततेनी म्हंटलाय त्यातच सगळं येतं. सगळ्या गाण्यात बासरीने कहर केलाय. कवितेचे शब्द जितके साधे आहेत तितकीच साधी याची चाल आहे. कोणत्याही चमत्कृतीची गरज नाही, मोठे आलाप नाही, अवघड सुरवाट नाही.
No comments:
Post a Comment