'How Sachin destroyed my life' या नावाचं एक पुस्तक आहे. मी अजून ते वाचलेलं नाही. पण एकूण माझा अंदाज आसा आहे कि सचिनच्या २००३ च्या त्या सिक्सर मुळे वेड लागलेले कित्येक भारतीय आहेत. सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्हनी वेडे झालेले कित्येक भारतीय आहेत. सचिनच्या 'डेसर्ट स्ट्रॉम' मुळे उध्वस्त झालेले कित्येक आहेत. मी सुद्धा सचिनची २०० नाबाद वाली इनिंग पाहताना किती तरी संध्याकाळ वाया घालवल्या आहेत. उगाच कारण नसताना 'प्लेयिंग इट माय वे'चं कोणतं तरी प्रकरणं उघडून वाचत बसायचं, यात भरपूर वेळ वाया माझा सुद्धा गेलेला आहे. त्या अर्थाने 'How Sachin destroyed my life' असं ते पुस्तकं असावं.
पुढे मागे कधी अशी माझ्यावर पुस्तक लिहायची वेळ आली, तर मी लिहीन 'How certain Songs destroyed my life'. आज असंच एक गाणं मला आठवतंय, ज्यानी लावलेलं वेड असून उतरलं नाहीये. पूछो ना कैसे मैने रैन बिताई' हे गाणं मेरी सुरत 'तेरी आँखे' हा ६३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात आहे. हा चित्रपट काही अजून मला पाहता आलेला नाही. याचं मला दुःख नाहीये. कारण गाणं कदाचित चांगलं आहे पण त्या तोडीचा चित्रपट नाही अशी अनेक उदाहरणं असल्यामुळे गाणं ऐकलं ना, ठीक आहे! अशी माझी मनस्थिती आहे.
अशी एक गोष्ट सांगतात कि सचिन देव बर्मन, बर्मन दादांनी कलकत्याला उस्ताद अमीर खाँ साहेबांची एक मैफिल ऐकली होती. त्या मैफिलीत अमीर खाँ साहेब 'राग अहिर भैरव' गायले होते. तो अहिर भैरव बर्मन दादांच्या डोक्यात दिड वर्ष घर करून बसला होता. तो शुद्ध 'अहिर भैरव' त्यांना वापरायच होता. पण तसे शब्द मिळत नव्हते. तसे शब्द मिळाले कवी शैलेंद्र यांच्याकडून. बर्मन दादांनी अमीर खाँ साहेबांचा तो शुद्ध 'अहिर भैरव' जसाच्या तसा वापरला.
गाण्यामध्ये एक कलाकार आजारी असतो आणि तो अंथरुणाला खिळून आहे आणि वेदना सहन न झाल्यामुळे तो रात्रभर जागाच आहे, त्याचा सांभाळ करणारा 'प्यारे' त्याची विचारपूस करतो आहे, तो सुद्धा कोणत्या तरी करणाने रात्रभर जागाच आहे, असा सिन आहे. त्यांचं संभाषण सुरु असताना मागे 'नमाज' साठी अजान ऐकू येते. ती ऐकून तो आजारी माणूस नमाज साठी जायला म्हणून उठून बसायचा प्रयत्न करतो. मंदिरांच्या घंटारवात आणि नमाजच्या अजान मध्ये एकच हाक आहे ती म्हणजे संगीताची असं तो सांगतो. परंतु तो स्वतः गायला असमर्थ आहे, हे पाहून त्याची सेवा करणारा 'प्यारे' तंबोरा घेतो आणि आणि गायला सुरवात करतो. सुरवातीला संभाषण संपल्यावर एक बासरीचा पीस आहे. अनेकदा भैरव किंवा सकाळच्या रागांचे प्रकार ऐकताना ते गंभीर प्रकृतीचे असल्याचा भास होतो. पण या अहिर भैरवाचं तसं नाहीये. कदाचित आधीच प्रसंग आपल्या मनावर कोरलेला असतो त्यामुळे असेल पण हा बासरीचा पीस अत्यंत करुण वाटतो. हे गाणं गायलं आहे 'मन्ना डे' यांनी. बासरी नंतरचा पहिला आलाप हा बासरी इतकाच जबरदस्त आहे. उत्तम गाणं कोणतं याचं वर्णन करतात की जेव्हा वाद्य वाजत असतं तेव्हा त्यांच्या सुरांतून शब्द ऐकू आले तर वाद्य यशस्वी झालं असं मानतात, आणि गात असताना बासरी किंवा सतारीचे सूर ऐकू आले तर गायन यशस्वी झालं असं मानतात. जर सुरवातीची बासरी आणि नंतरचा आलाप ऐकला आपण तर दोन्हीत काही फरक नाहीये असा भास होतो, इतकं दोन्ही सुंदर आहे. तो आलाप म्हणजे शुद्ध अहिर भैरव आहे.
'पूछो ना कैसे मैने रैन बिताई' मला कोणीही विचारू नका कि रात्र कशी सरली, मी रात्र कशी घालवली. एक एक क्षण एका एका युगासारखा भासत होता. एक युग संपलं तरी ती भयाण, वेदनेची रात्र संपली नव्हती. 'पूछो ना कैसे मैने रैन बिताई' एक पल जैसे एक युग बीता,' युगानू युगं मला झोपही लागलेली नाही. 'युग बिते मोहें निंद ना आई'. एका दिशेला दिवा जाळतो आहे, दुसऱ्या बाजूला माझं मन. पण त्या उजेडाचा माझ्या घातला अंधार दूर करण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. सगळं आयुष्य असंच गेलं, अस्वस्थता आणि बेचैनी मध्येच!! तेव्हा हि रात्र कशी घालवली हे कृपा करून विचारू नका. हे गाणं म्हणणारा मन्ना डे जरी असला तरी आपल्याला समोर चित्रात दिसतो तो अशोक कुमार. चित्रपट ६३ सलाला असल्यामुळे अर्थात ब्लॅक अँड व्हाईट आहे. पण शब्दांच्या आणि मन्ना डे च्या आवाजामुळे सगळं बेरंग झाल्यासारखं आपल्याला वाटायला लागत. काळवंडलेला अशोक कुमारचा चेहरा सांगतो 'कृपा करून तेवढं विचारू नका'
रात्र भयाण होती, आकाशात चंद्र आणि चांदणं होतं पण कोणी माझ्या मदतीला आलं नाही. मदतीची आशेनी डोळे पांढरे व्हायची वेळ आली. पहाटेचे किरण सुद्धा आशा जिवंत ठेवतील इतके तीव्र नव्हते, तेव्हा कृपा करून रात्र कशी घालवली आहे हे विचारू नका. निघणाऱ्या प्रत्येक शब्दांनी आणि प्रत्यके सुरांनी समोरचा आजारी माणूस अजून व्याकुळ होत गेलेला दिसतो. त्याचा श्वास लागतो. आणि शेवटचे शब्द सुरु असतानाच तो मान टाकतो!!
केवळ सुरवातीची बासरी आणि त्यानंतरचा आलाप मी कित्येक वेळा ऐकले आहेत. गाण्याला गोडवा असतो म्हणजे काय हे या गाण्यावरून कळेल. अनेकांनी तर हे गाणं ऐकलं आता अजून जगायची इच्छा नाही अशा भावना व्यक्त केल्या होत्या
https://www.youtube.com/watch?v=376w1QPz07w
https://www.youtube.com/watch?v=376w1QPz07w
No comments:
Post a Comment