Saturday, 8 April 2023

"पाँच साल मैं भारत जो हैं ना पुरा बदलने वाला है बॉस"

शार्क टॅंकच्या एका एपिसोडमध्ये पियुष बन्सल समोर उभ्या असलेल्या पीचरचं सगळं बोलणं ऐकून म्हणतो ‘पाँच साल मैं भारत जो हैं ना पुरा बदलने वाला है बॉस. येह तो क्लीयर कर दिया है’


हरियाणामधल्या ‘पंचकुला’ आणि ‘लुधियाना’ या दोन ठिकाणहून आलेल्या मध्यमवयीन, IIT/IIM किंवा तत्सम बिझनेस स्कुलची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या दोघा पुरुषांनी ‘मेकउप’ या कॅटेगरीमधला स्टार्ट अप सुरु केला २०१८ मध्ये. त्यानंतर कोरोना आला. धंदा लॉसमध्ये गेला. त्यातून या दोघांच्या कल्पक बुद्धीतून लॉसवर उपाय निघाला तो त्यांनी अमलात आणला, लॉसमधून बाहेर आले आणि गेल्या सहा महिन्यातल्या निव्वळ नफा ६५ ते ७० लाख रुपये आहे, असं त्यांनी सांगितलं. १०० कोटींचं कंपनीचं व्हॅल्यूएशन घेऊन ते दोघे आले होते. त्यांचं धंद्याचं डोकं, जिद्द आणि अस्सल भारतीय लहेजा पाहून समोर बसलेले शार्क्स प्रेरित झाले. 


आणि अशी शेकडो उदाहरणं या शार्क टॅंकच्या स्टेजवर दिसतात. बंगलोरच्या अजून वयाची तिशी पार न केलेल्या दोन मुली अमेरिकेतून शिकून आल्या. आणि त्यांनी फुलांचा बिझनेस सुरु केला. फुलांच्या शेल्फ लाईफ वाढवण्यावर काम केलं, झेंडू, शेवंती, गुलाब इत्यादी रोज देवघरात पूजेसाठी लागणारी फुलं २-३ दिवसांत खराब व्हायला सुरवात होते, त्यांनी टेक्निक शोधून काढलं, आणि फुलांची शेल्फ लाईफ १५ दिवसांपर्यंत वाढवून दाखवली. एका महिन्यात १ कोटीचा सेल करून दाखवला आणि ८० कोटी व्हॅल्यूएशन घेऊन त्या आल्या होत्या. 


नाशिकच्या ३ मुलांनी इलेक्ट्रिक बाईकमध्ये इनोव्हेशन करून इलेक्ट्रिक बाईक कम चालतं फिरतं दुकान केलं. केरळमधल्या दोन मुलांनी आपल्या गोठ्यातल्या जनावरांचं आरोग्य ट्रॅक करणारं एक डिव्हाईस तयार केलं, ज्यावरून दार दहा सेकंदाला आपल्या गोठ्यातल्या गाई-म्हशीच्या आरोग्याचा डेटा शेतकऱ्याच्या मोबाईल app वर येतो. डेहराडूनमध्ये बसलेल्या ४-५ मुलांनी थर्मामीटर, किंवा ऑक्सिमीटरसारखं ECG चेक करणारं डिव्हाईस तयार केलं, आणि घरच्या घरी नियमितपणे आपल्या हृदयाची ऍक्टिव्हिटी तपासून बघण्याची सोय केली. बंगालमधल्या मुलांनी आपल्या मित्राच्या अपघाती मृत्यूनंतर, अपघात झालेला आहे हे तात्काळ कळण्यासाठी स्मार्ट हेल्मेट तयार केलं. ते हेल्मेट अपघात झाल्याक्षणी आपल्या फोनमधल्या, ज्याच्याशी सगळ्यात शेवटी बोलणं झालंय त्याला किंवा जवळच्या हॉस्पिटलला मेसेज किंवा फोन पाठवून माहिती देऊ शकेल अशी योजना करून ठेवली. 


पियुष बन्सलचं ‘भारत पुरा बदलने वाला है बॉस’ हे म्हणणं कदाचित फक्त बिझनेसेस, इनोव्हेटिव्ह आयडिया, किंवा युनिकॉर्न कंपन्या या बाबतीतलं असेल. पण गेले १० वर्ष जाणीवपूर्वक आणि डोळसपणे वावरणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा हे बदलत जाणारं चित्र स्पष्ट दिसत आहे. 


आमच्या (असं म्हणतात समविचारी, तुलनेने तरुण विचार करू शकणाऱ्यांचा ग्रुप या अर्थाने ‘आमच्या’) असं लक्षात आलं की १० वर्षांपूर्वी आपण जेव्हा डोळसपणे निरीक्षण करायला लागलो त्या वेळची परिस्थिती काय होती. २०१२ मध्ये अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभं केलं, रामदेव बाबाही सारख्याच आंदोलनात होते. दहा वर्षाचं अनेक पक्षांचं कडबोळं असलेलं UPA चं सरकार. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून भारतीय जनता पक्षाने पक्षाचा कँडिडेट म्हणून केलेली निवड २०१३ सप्टेंबरमध्ये. आणि त्याच्या साधारण वर्ष-दोन वर्ष आधी सक्रिय सोशल मीडियाचा प्रसार. त्याआधी ऑर्कुट होतं, याहू मेसेंजर होतं. पण सोशल मीडियाची राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकू शकेल इतकी ताकद नव्हती. ते २०११-१२ मध्ये निर्माण झाली. टीव्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेलं सॅच्युरेशन आणि सोशल मीडियाची लोकांना कळलेली ताकद, यातून निर्माण झालेलं ‘भाऊ तोरसेकर यांचा ब्लॉग’ हा अद्भुत फेनॉमेना. भाऊंच्या नॅरेटिव्हबद्दल मी बोलत नाही, पण २०१३ या वर्षात भाऊंच्या ब्लॉगने लोकप्रियतेचा गाठलेला कळस तुम्हाला आठवत असेल. रोजचे ३ ब्लॉग ९०० ते १००० शब्दांचे. त्यावेळी भाऊ प्रस्थापित नॅरेटिव्हच्या प्रवाहाच्या उलटे उभे होते. टीव्हीवर भाऊंच्या नॅरेटिव्हला स्पेस नव्हती, पण ब्लॉग त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि लोकांच्यावर त्यांचा झालेला परिणाम या सगळ्याने भाऊंच्या नॅरेटिव्हची दखल सर्व प्रकारच्या मीडियाला घ्यावी लागली. 


पण २०१३ चं प्रस्थापित नॅरेटिव्ह काय होतं हे आठवतंय का? 


हिंदुत्वाबद्दल बोलणं म्हणजे वाळीत जाऊन पाडण्यासारखं होतं. सोशल मीडियावर समाजवादी, साम्यवादी मंडळी बहुसंख्य होती. केवळ सोशल मीडियावरच नव्हे तर पत्रकार, विचारवंत, अभ्यासक, स्तंभ लेखक, प्राध्यापक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्तेत बसणाऱ्या आमदार-खासदारांकसकट सगळ्यांच्या विचारात हिंदुत्त्वाचा द्वेष आणि खोट्या सेक्युलॅरिझमचं कौतुक. २०१५ ला विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे शेषराव मोरे सर झाले त्यावरून ‘एक हिंदुत्ववादी अध्यक्ष झाला’ यावरून किती गदारोळ झाला होता हे आठवत असेल. २०१३ मध्ये नरेंद्र मोदी म्हणजे ‘गुजरात दंगलीमधला मुख्य माणूस’ आता पंतप्रधान होणार का, त्याचा अमित शाह यांच्यासारखा महा-आक्रमक उजवा हात, तो एकदम भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला. त्याचा जबरदस्त धक्का इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला बसलेला आज स्पष्टपणे आठवतोय. आमच्या अभ्यास वर्गात एका राजकीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ‘अमित शाह’ झाला यावरून आता लोकशाही कशी धोक्यात आहे याची चर्चा झालेली मला आठवते आहे. तथाकथित पुरोगामी ही टर्म आज वापरायची गरज वाटत नाही, इतकी प्रगती आपण केली आहे. आज लोकांना आरशासारखं स्पष्ट दिसतं की हा नेमका कोण? हे ब्लॅक अँड व्हाईट करून बघणं सुद्धा खूप धोकादायक आहे. त्यामुळे एरवी चांगला वाटणारा माणूस आपल्या राजकीय भूमीच्या विरोधी भूमिका घेतो तेव्हा अचानक शत्रू वाटू लागतो. हे आज व्हायला लागलं आहे. 


पण विचार करा, हिंदुत्त्वाच्या विरोधात भूमिका घ्यायची आज सार्वजनिक ठिकाणी भीत वाटते. बॉलिवूड खूप सहजपणे हिंदूंचा अपमान करत असे, आज धसका घेतलेला आहे. हा प्रवास किती कमी काळात झाला.


२०१३-१४ च भारतातलं नॅरेटिव्ह काय होतं हे आता वेगळं सांगायची गरज नाही. राष्ट्रीय पातळीवर ‘हिंदुत्वा’ला काय प्रतिष्ठा होती याची आठवण असेल. इस्लाम आणि मुसलमान यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या चर्चा करायला लोकं घाबरत होती. मुघल इतिहासातल्या अनिष्ट गोष्टी जाहीरपणे बोलण्याची कोणाची छाती नव्हती. ‘हिंदुत्त्वाचा’ विचार चार-चौघात बोलणं म्हणजे वाळीत पाडण्यासारखं होतं, राम मंदिर, कलम ३७०, कॉमन सिव्हिल कोड वगैरे दिवास्वप्नही वाटत असत आणि दुरापास्त वाटत होती. काँग्रेसच्या अखिल भारतीय ताकदीला सक्षम पर्याय उभा राहू शकतो ही शक्यताच धूसर होत चालली आहे असं वाटत होतं. पण १४ च्या निवडणूका झाल्या. थंपिंग मेजॉरिटी भाजपला मिळाली. एकट्या भाजपकडे २८२ सीट्स. आणि वातावरण बदलायला सुरवात झाली. मी वातावरण चांगलं किंवा वाईट व्हायला सुरवात झाली असं म्हणत नाहीये. वातावरण बदललं हे व्हॅल्यू जजमेंट नाही. पण वातावरण बदललं. एक अबोल पण अकॅडमीकली उच्चशिक्षित पंतप्रधान जाऊन, दर रविवारी लोकांशी बोलणारा आणि ज्याच्या डिग्रीविषयी अजूनही लोकांना नक्की माहिती नाही असा माणूस पंतप्रधान झाला. २०१३ चं जातीय वातावरण सुद्धा ग्रीम होतं. गढूळ होतं. संभाजी ब्रिगेडचा सर्वात हाय पॉईंट. संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीनुसार, शिवरायांचे खरे शत्रू ब्राह्मण. शिवरायांच्या इतिहासाला प्रतिष्ठा नव्हती. शिवजयंती साजरी करणे हे प्रतिष्ठेचं लक्षण नव्हतं. आज महाराष्ट्रात कोणाची शिवजयंती मोठी यावरून स्पर्धा लागते. साधारण १३-१४ हाच काळ आहे जेव्हा इथल्या मुलांमध्ये किल्ल्यांच्या पावित्र्याबद्दल जागृती झाली. गावोगावी मुलांचे ग्रुप तयार झाले जे ऐच्छिकरित्या किल्ल्यांवर केवळ स्वच्छता मोहीम करण्यासाठी जाऊ लागले. मग किल्ल्यांवर घडणाऱ्या अनिष्ट गोष्टींवर आळा घालण्यासाठी गट तयार झाले. किल्ले म्हणजे कपल्स पॉईंट झाले होते, किल्ले म्हणजे ३१ डिसेंबर साजरे करण्याचे स्पॉट्स झाले होते त्यावर बंधनं आली. किल्ल्यांच्या जीर्णोद्धाराच्या योजना गावोगावी निघाल्या. कोणी स्वखुशीने किल्ल्याचा दरवाजा पुन्हा उभा केला. कोणी फेन्सिंगची कामं केली. कोणी वर्षानुवर्षे पाण्याच्या टाक्यांमध्ये साठलेला गाळ साफ केला, त्यात ऐतिहासिक दस्तऐवज सापडले. वगैरे. २०१३-१४ मध्ये शिवाजी राजांच्या हिंदुत्वाबद्दल बोलणं म्हणजे पाप होतं. शिवराय इस्लामी शक्तीविरुद्ध लढत होते ही बाब लोकं almost विसरून गेले होते. शिवराय, संभाजी महाराज लढले मुख्यतः ब्राह्मणांविरुद्धच. आणि दुसरं म्हणजे शिवरायांच्या भक्ती बद्दल समाजाला शंका होती ती ब्राह्मणांच्या भक्तीबद्दल. आज विधानसभेत अजित पवार ‘संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायची गरज नाही’ अशा आशयाचं बोलले तर गावोगावी मुलांनी अजित पवार यांच्याविरोधात रिल्स केलेत. अजित पवारांच्या शिवाजी-संभाजी महाराजांच्या भूमिकेला विरोध करणारा बहुजन समाज आज महाराष्ट्रात दिसतोय. १० वर्षांपूर्वीचं चित्र स्पष्टपणे आठवत असलेल्या लोकांना हा फरक स्पष्टपणे दिसत असणार. औरंगाबादचं 'छत्रपती संभाजी नगर' झालं, आणि लोकांनी स्वतःच्या पैशाने भाड्याने क्रेन घेऊन जिथेजिथे 'औरंगाबाद' असा उल्लेख आहे तो पुसण्याची मोहीमच हाती घेतली.


२०१४ च्या लोकसभेत उत्तरप्रदेशातून ८० खासदार निवडून जातात. त्यावेळी एक बातमी ऐकली होती की उत्तरप्रदेशातून २०१४ साली भाजपकडून एकही मुसलमान खासदार लोकसभेत गेला नाही. बातमीची शहनिशा मी केली नाही. पण २०१४ च्या लोकसभेत ५४३ च्या लोकसभेत एकूण २३ खासदार मुसलमान होते. सत्तापक्षात म्हणजे भाजपच्या २८२ पैकी एकही खासदार मुसलमान नव्हता. याचा अर्थ २०१४ ते २०१९ ची लोकसभा पूर्णपणे जन्माने हिंदू असणाऱ्या आणि हिंदुत्त्व या विचारधारेबद्दल ज्यांना सहानुभूती आहे अशांच्या हातात होती. आमचे सर म्हणालो होते, झालं की हिंदूराष्ट्र. अजून काय वेगळं पाहिजे? 


महाराष्ट्राच्या दोन राजधान्या. एक मुंबई दुसरी नागपूर. दोन महाराष्ट्राच्या दोन टोकाला. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रातली सर्वात जास्त विकसित झालेली शहरं म्हणजे पुणे मुंबई. मुंबई बंदर आहे, राजधानीचं शहर आहे. पुणे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचं होतंचं, हिंजेवाडी किंवा खराडीच्या आयटी पार्क्स मुळे अजून ऊर्जा मिळाली. पण विदर्भ मराठवाडा या विकासापासून बाजूला पडला. कारणं हजारो असतील. राजकारण आणि स्वार्थ यात आपण जाऊच नये, पण असा एक द्रुतगती रस्ता असावा आणि तो बांधावा हे लक्षात यायला, काम सुरु करायला पन्नासवर्षं का उजाडावी लागली? धडाधड रस्ते बनत आहेत, गडकरी लोकसभेत त्याचे आकडे, काम पूर्ण होण्याच्या तारखा सांगत आहेत, ती काम वेळेत पूर्ण होत आहेत. पुण्याच्या वायव्य टोकाला हिंजेवाडीहा भाग आयटी पार्क्सचा म्हणून विकसित व्हायला सुरवात २००० च्या आसपास झाली. पण पुण्यातून हिंजेवाडीला जायला मेट्रो यावी लागली २०२१-२२! 


पुन्हा एकदा हिंदुत्वाचा एक विषय बोलून पूर्णविराम देऊ. दहा वर्षांपूर्वी हिंदुत्त्वाला प्रतिष्ठा नव्हती. आज प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आणि आज हिंदुत्त्वाला इतकी ताकद मिळाली आहे की हिंदूंचं वर्तन झुंडशाही वाटावी इतकं दुसऱ्या टोकाला जात आहे. १० वर्षांपूर्वी ज्या विचारधारेला समाजात प्रतिष्ठा नव्हती, ती विचारधारा आज आज हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर दिसते. ‘टिकली असेल तरच बिझनेस’ किंवा ‘गायीबद्दल वाटणारी अवास्तव आपुलकी’ किंवा ‘आपल्या इतिहासाबद्दलचा अनावश्यक अभिमान’ आणि खूप सहज दुखावणाऱ्या भावना. 


दहा वर्षांपूर्वी हिंदुत्त्वाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही भांडत होतो, आज हिंदुत्त्वामध्ये अनिष्ट गोष्टी येऊ नयेत म्हणून भांडतोय. 'नो बिंदी नो बिझनेस' सारख्या झुंडशाहीचा विरोध करावा लागतोय, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणजे महाराजांचा अपमान होत नाही, हे सांगण्यासाठी धडपडतोय. 'इस्लाम'बद्दल १० वर्षापूर्वीपेक्षा जागृती झालेली आहे. बाकीच्या सर्वच धर्मांप्रमाणे इस्लाममध्येसुद्धा खूप गंभीर आणि अनिष्ट गोष्टी आहेत, हे मुद्दाम सांगायची गरज उरली नाही. लोकांना त्याचा अंदाज आला आहे.


स्टार्ट अप्स पासून - राजकीय भूमिकांपर्यंत गेल्या १० वर्षांत एक प्रवास करून भारत पुढे आला. पुन्हा मी व्हॅल्यू जजमेंट करत नाही. भारत विकास करून पुढे आला असं म्हणायला खूप जास्त डेटा पाहिजे, तपशील पाहिजेत, त्याची नीट चकित्सा केली पाहिजे. गेल्या दहा वर्षातला प्रवास आम्ही पाहिला, त्याच इव्हॅल्युएशन प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेनं करावं. 


पण स्वतःचा ६०० कोटी नेट वर्थ असलेला धंदा उभा केलेल्या एका प्रामाणिक आणि डाउन तो अर्थ ‘पियुष बन्सल’ या व्यावसायिकाने म्हणावं की ‘भारत जो हैं ना पुरा बदलने वाला है बॉस’ याला खूप मोठा अर्थ आहे.


© मुकुल रणभोर  



शार्क टॅंकच्या त्या एपिसोडची लिंक - https://www.youtube.com/watch?v=QtIjA4GAaT4&t=348s


#sharktank #sharktankindia #startups #madeinindia #piyushbansal #hindutva #narendramodi # #amritmahotsav #aatmanirbharbharat #amangupta #nameetathapar #veenitasingh #sharktankindia #sharktank #memes #ashneergrover #sharktankindiamemes #entrepreneurlife #entrepreneurmotivation #business #eventsforentrepreneurs #angelinvestors #tvshowtime #entrepreneurevent #tvshowquotes #tvshowhost #trending #kbu #tvshowedits #sharktankkarnataka #tvshows #tvshow #sharktankmemes #entrepreneur #instagram #karnataka #meme #tvshowaudition #kaunbanegaudayampati #entrepreneurship #sharks #realitytv 

1 comment:

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....