Sunday, 25 March 2018

इमान

श्रद्धा – इस्लाम धर्माची पाच सर्वात महत्वाची आणि मूलभूत तत्व आहे. त्यामध्ये श्रद्धा हे सर्वात महत्वाचे आणि पहिले तत्व आहे. ‘एकूण पाच बाबींवर श्रद्धा ठेवणे’ असे या शब्दाचा अर्थ आहे. त्या पाच बाबी कोणत्या कोणत्या हे आता आपण पाहूया. पहिली – एकमेव अल्लाहवर श्रद्धा, दुसरी – स्वर्गात वास्तव्य असणाऱ्या अल्लाहकडून अल्लाहचा सत्य धर्माचा संदेश पृथ्वीवर आणणाऱ्या देवदूतांवर श्रद्धा, तिसरी – अल्लाहकडून देवदूतांच्या मार्फत संदेश मानवाला देण्यासाठी निवडलेल्या प्रेषितावर आणि त्याच्या प्रेषितत्वावर श्रद्धा, चौथी -  अल्लाहने प्रेषितांच्या मार्फत मानवासाठी दिलेल्या संदेशावर म्हणजे ‘कुराण’ या ईश्वरी ग्रंथावर श्रद्धा आणि पाचवी – अंतिम निर्णय दिनावर श्रद्धा. काळाच्या एका टप्प्यावर गेल्यावर जगाचा नाश होणार आहे. त्यादिवशी सर्व मृत जीव पुन्हा जिवंत होतील. त्यावेळी कोण कोणत्या पद्धतीने जीवन जगले याच्या निकषावर अल्लाह स्वतः पाप पुण्याचा निवाडा करणार आहे. जे इस्लामच्या आदर्श तत्त्वांनुसार जीवन जगले आहे अशांना स्वर्ग आणि जे इस्लामच्या तत्त्वांनुसार जीवन जगले नाहीत अशांना नरक मिळेल. यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे ‘अंतिम निर्णय दिना’वर श्रद्धा ठेवणे होय. 

या पाचही श्रद्धा एकमेकांत गुंतलेल्या आहेत. यातल्या एकावरजरी श्रद्धा ठेवली तरी इतर चारांवर श्राद्ध आपोआप ठेवली जाते. एकावर जरी श्रद्धा ठेवली नाही तरी संपूर्ण श्रद्धेचा डोलारा कोसळून जातो. या पाचही बाबींवर श्रद्धा ठेवणारा इस्लामी परिभाषेत ‘श्रद्धावान’ ठरतो, जो श्रद्धा ठेवत नाही तो ‘श्रद्धाहीन’ ठरतो. जर एखादा माणूस म्हंटला कि, ‘माझी इतर चार गोष्टींवर श्रद्धा आहे, पण देवदूतांवर नाही’ तर देवदूतांच्या शिवाय अल्लाहचा संदेश प्रेषितापर्यंत कसा पोहोचला याला गूढत्व प्राप्त होते. अल्लाह आणि माणूस यांच्यातला दुवा नाहीसा होतो. एखादा म्हणाला कि, ‘प्रेशितांवर किंवा कुराणावर श्रद्धा नाही’ याचा अर्थ संदेश कोणी पाठवला याच्यावरही विश्वास नाही असा होतो. ‘अंतिम निर्णय दिनावर’ श्रद्धा नसेल तर अल्लाहची आणि नरकाची भीती संपून जाऊन शुद्ध धर्माचे पालन होणार नाही. त्यामुळे वर एकमेव अल्लाहवर श्रद्धा, देवदूतांवर श्रद्धा, प्रेषित पैगंबर यांच्याबर श्रद्धा, कुराण या दिव्य ग्रंथावर श्रद्धा आणि अंतिम निर्णय दिनावर श्रद्धा ह्या मूलभूत पूर्व अटी आहेत. या पाचही श्रद्धा एका वाक्यात एकत्र करण्यात आल्या आहे. ‘ला इलाहइल्लाल्लाह मुहंमद रसुल्लल्लाह’ याचा अर्थ ‘ईश्वर एकमेव आहे, तो म्हणजे अल्लाह आहे, मुहंमद हे त्याचे शेवटचे प्रेषित’. या वाक्याला ‘कलिमा’ म्हणतात. ‘कलिमा’चा उच्चार करताक्षणी माणूस मुसलमान होतो. अर्थात त्याचा अर्थ मनापासून पटायला हवा!

‘ला इलाहइल्लाल्लाह’ म्हणजे ‘एकमेव ईश्वर म्हणजे अल्लाह आहे’ या एका वाक्यावर जरी श्रद्धा ठेवली तरी इतर चारही त्याच्याबरोबर येतात, त्याच्याबरोबरच तयार होतात. आणि एकमेव अल्लाहवर श्रद्धा नसेल तर इतर चार सुद्धा तयार होत नाही. या श्रद्धेचे इस्लाममधील आणि मुसलमान असण्याच्या दृष्टीने काय महत्व आहे हे कुराणचेअनेकांमधील एक सर्वश्रेष्ठ भाष्यकार सय्यद अब्दुल आला मौदुदी यांनी सांगितले आहे. मौदुदी यांनी Towards undrestanding Quran’ असे कुराणवरच्या भाष्याचे तीन खंड लिहिले आहेत, त्याच्या तिसऱ्या खंडात मौदुदी लिहितात, “मुस्लीम समाजाचे सदस्य असण्यासाठी किंवा त्या सदस्याचे कायदेशीर हक्क व जबाबदारी या संदर्भात जेव्हा श्रद्धा आणि श्रद्धाहीनता हा आधार मानला जातो, तेव्हा कोण श्रद्धावान आहे आणि कोण श्रद्धाहीन आहे यातील स्पष्ट सीमारेषा निश्चित करावी लागते. या संबंधात श्रद्धावान कोण आहे व कोण नाही हे श्रद्धेच्या गुणवत्तेपेक्षा किमान मूलभूत श्रद्धेच्या आधारावर अवलंबून असते. इस्लामिक समाजात जे (अशी किमान) श्रद्धा ठेवतात ते समान दर्जाचे कायदेशीर हक्कदार बनतात आणि श्रद्धेच्या गुणवत्तेचा विचार न करता त्यांना समान कर्तव्य पार पाडावी लागतात. त्याचप्रमाणे श्रद्धाहीनतेच्या दर्जातील फरक लक्षात न घेता सर्व श्रद्धाहीन हे श्रद्धाहीनांच्या एकाच वर्गातील मानले जातात. यासाठी त्यांची श्रद्धाहीनता हि सामान्य दर्जाची आहे का गंभीर स्वरुपाची आहे, हे विचारात घेतले जात नाही.”

‘कलिमा’ उच्चारण्याचे महत्व सांगताना मौलाना मौदुदी लिहितात, “एका माणसापासून दुसऱ्या माणसाला वेगळं करण्याचा पाया ‘कलिमा’ हा आहे. जे त्याचा उच्चार करतात, त्यांचे एक राष्ट्र बनत असते. उलट जे त्याचा उच्चार करण्याचे नाकारतात त्यांचे वेगळे राष्ट्र बनते. जे वडिलांनी त्याचा उच्च केला, परंतु त्याच्या पुत्राने उच्चार करण्यास नकार दिला तर ते त्याचे वडील राहत नाही, तो त्यांचा मुलगा राहत नाही. उलट जे एका पूर्णपणे परक्या मनुष्याने ‘कलिमा’चा उच्चार केला तर ते रक्ताच्या नात्यापेक्षाही बलवत्तर ठरते”

इस्लामची जी पाच मूलभूत तत्व आहे त्यापैकी पहिली (पाच बाबींवरची) श्रद्धा हे इतके महत्वाचे तत्व आहे. इतर चार तत्व म्हणजे नमाज, कर, उपवास आणि हजची यात्रा यापैकी काही पाळता नाही आलं तरी मुसलमान मुसलमान राहतो. फार तर तो परिपूर्ण मुसलमान असू शकणार नाही. पण त्याची श्रद्धा नसेल तर तो मुसलमानच राहणार नाही. त्यामुळे ‘श्रद्धा’ हे मुसलमान असण्याचे सर्वात महत्वाचे आणि प्रधान तत्व आहे.

श्रद्धेचे महत्व पटवून सांगणाऱ्या अनेक आयती आणि अनेक हादीस इस्लामी धारशास्त्रात सांगण्यात येतात. त्यापैकी काही उदाहरणे आपण पाहू. कुराणातील दुसरी सुरह ‘अल बकरा’ मध्ये २७७ क्रमांकाची आयत आहे. त्यात लिहिले आहे ‘जे लोक श्रद्धा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील त्यांच्यासाठी कोणताही दुःखाचा आणि भयाचा प्रसंग नाही’ प्रेषितांची एक हादीस सहिह मुस्लिम आणि सहिह बुखारी दोघांनीही नोंदवून ठेवली आहे. त्यात एक जण प्रेषितांना विचारतो, “हे प्रेषित! श्रद्धा म्हणजे काय ते मला सांगा.” यावर प्रेषित उत्तर देतात, “म्हणजे तुमची श्रद्धा अल्लावर, त्याच्या देवदूतांवर, त्याच्या ग्रंथावर, त्याच्या (मरणोत्तर) भेटीवर, त्याच्या प्रेषितांवर आणि अंतिम निर्णय दिनानंतरच्या पुनर्जीवनावर असली पाहिजे” त्याने पुन्हा विचारले, “हे प्रेषित! इस्लाम म्हणजे काय ते सांगा” प्रेषितांनी उत्तर दिले, “इस्लाम म्हणजे तुम्ही (एकमात्र) अल्लाहची उपासना केली पाहिजे व त्याच्याबरोबर कोणालाही (देव) मानायचे नाही, तुम्ही अनिवार्य नमाज अदा केली पाहिजे, जकात दिली पाहिजे व रमजानचा उपास केला पाहिजे”  

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....