Sunday 25 March 2018

अल्लाह

मुसलमान असण्याच्या पाच सर्वात प्रार्थमिक आणि महत्वाच्या अटी म्हणजे पाच श्रद्धा. त्या पाच श्रद्धा (इमान) कोणत्या हे आपण मागच्या लेखात पहिले. त्या पाच पैकी सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची श्रद्धा आहे ‘एकमेव ईश्वर अल्लाहवर श्रद्धा’. सहजपणे ईश्वर आणि अल्लाह हे दोन शब्द आपण समानार्थी म्हणून वापरतो. किंवा वापरले जातात. परंतु आपण (म्हणजे बिगर सेमेटिक परंपरा) वापरतो तो ईश्वर शब्द आणि अल्लाहच्या शब्दात फरक आहे. तो फरक नेमका काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. अल्लाहची स्तुती करणाऱ्या असंख्य आयती आणि सुरह कुरणात आहेत. रोजच्या प्रार्थनेत जी एक सुरह कायम वाचली जाते ते पहिली सुरह त्यातील सात आयती या फक्त अल्लाहच्या स्तुतीच्या आहेत. कुराणचे आधुनिक भाष्यकार मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या कुराणच्या भाष्यग्रंथात अडीचशे पेक्षा जास्त पाने केवळ पहिल्या सात आयतींवर भाष्य करण्यासाठी खर्च केली आहेत. त्यामुळे अल्लाहच्या स्तुतीपर असणाऱ्या किंवा अल्लाहवर श्रद्धा न ठेवणाऱ्या काफिर नास्तिकांना असणाऱ्या शिक्षा यांबद्दल आपण आता बोलणार नाही. आता केवळ ‘अल्लाह’ ही काय संकल्पना आहे ते समजून घेणार आहोत.

विश्वाच्या निर्मात्याला कुराणात ‘अल्लाह’ या नावाने संबोधले आहे. ‘अल्लाह’ हा शब्द दोन अरबी शब्दांपासून बनलेला आहे. ‘इलाह’ या शब्दाचा अर्थ ‘ईश्वर’ असा होतो. इंग्रजी भाषेत ज्या प्रमाणे ‘द’ हा शब्द एकमेवाद्वितीयत्व अधोरेखित करण्यासाठी वापरतात त्याप्रमाणे अरबी भाषेत ‘अल’ हा शब्द वापरतात. उदा. किताब या शब्दाचा अर्थ ‘पुस्तक’ असा होतो, त्याला ‘अल’ जोडले कि त्याचे ‘विशेष पुस्तक’ म्हणजे ‘कुराण’ असा अर्थ होतो. ‘इलाह’ याला ‘अल’ जोडल्यावर ‘ईश्वराचा’ विशिष्ट ईश्वर होतो. हा ‘विशिष्ट ईश्वर’ म्हणजे ‘अल्लाह’ आहे. पर्शियन किंवा हिंदुस्थानी भाषांत यालाच ‘खुदा’ म्हणतात. ईश्वरालाच अल्लाहनावाने संबोधणे त्यामुळे चुकीचे ठरते. कुरणात अल्लाहला ९९ नावांनी संबोधले आहे. ‘डिक्शनरी ऑफ इस्लाम’ मध्ये अल्लाहच्या सर्व ९९ नावांची यादी दिलेली आहे. परंतु या ९९ नावांपैकी ‘रहमान’, ‘रहीम’ आणि ‘मलिक’ ही तीन नावे वारंवार येतात. कुराण सांगते (६:१६२) कि, ‘श्रद्धावानाची प्रार्थना, त्याग, जीवन व मृत्यू (सर्वकाही) अल्लाहसाठीच असते’. कुरणात अल्लाह या शब्दाचा वापर २८०० वेळा तर इतर तीन शब्दांचा वापर ७९० वेळा झाला आहे. त्यावरून त्याचे महत्व लक्षात येईल. वर सांगितलेल्या ९९ नावांच्या यादीची सुरवात किंवा शेवट ‘अल्लाह’ या नावानेच होतो. त्यामुळे एकूण १०० नावे पूर्ण होतात. मुसलमान जप करताना वापरतात त्या माळेत ९९ किंवा ३३ मणी असतात. एका माळेचा एकदा किंवा तीनदा पूर्ण जप केल्यावर अल्लाहची सर्व ९९ नावे उच्चारली जातात. प्रेषितांच्या हादीसमध्ये प्रेषित सांगतात कि, ‘अल्लाहच्या नावाचा जो सतत जप करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.’

इस्लामपूर्व अरबस्थानातील अरब टोळ्यांचा ईश्वर सुद्धा अल्लाहच होती. परंतु त्या टोळ्या एकमात्र अल्लाहच्या बरोबरीने अल्लाहच्या तीन मुलींची सुद्धा पूजा करत असत. त्याला इस्लामी परंपरेने ‘शिर्क’ म्हणजे अनेकेश्वरवादी ठरवलेले आहे. आणि एकमेव अल्लाह हाच ईश्वर आहे असे प्रतिपादन केले आहे. शिर्क म्हणजे अनेकेश्वरवाद नष्ट करून शुद्ध एकेश्वरवादाची स्थापना करणे हे उदिष्ट कुराणने मांडले आहे. 

सुरवातीला सांगितलेला गैरसमज पुन्हा एकदा दूर करणे आवश्यक आहे. बिगर सेमेटिक किंवा बिगर इस्लामी परंपरा ज्याचा ‘ईश्वर’ म्हणून उच्चार करतात ते ईश्वरचे ‘सामान्य’ स्वरूप आहे. त्याच्या विरुद्ध अल्लाह हे ईश्वराचे असामान्य किंवा सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे. इस्लामी परंपरेने ईश्वरया शब्दाचा अर्थ ‘अल्लाह’ने सत्यधर्माचा संदेश युन पृथ्वीवर पाठवलेले देवदूत असा होतो. त्यांचे स्थान अल्लाह पेक्षा खालचे आहे. इस्लामी परंपरेनुसार अल्लाह सर्वश्रेष्ठ आणि त्याच्या खालोखाल देवदूत किंवा ईश्वर. मात्र पूजा केवळ अल्लाहची करायची असते. पूजा ईश्वराची करायची नसते. ईश्वर आणि अल्लाह या दोन संकल्पनात हा फरक आहे. म्हणून ईश्वर आणि अल्लाह हे दोन शब्द समानार्थाने वापरता येत नाही किंवा वापरू नयेत.  


No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....