#शहीद – हा शब्द आपण रोज इतक्या सर्रास वापरतो कि त्याचा अर्थ सांगण्याची गरज पडू नये इतका आपण तो स्व स्पष्टीकरणात्मक करून टाकला आहे. पण त्याचा आपण वापरतो इतका साधा आणि सोपा अर्थ नाही आहे. हा शब्द मुळात भारतीय भाषांतला नाही. त्याचा उगम अरेबिक भाषेतला आहे. आपण वापरतो त्या ‘शहीद’ शब्दाचा उगम इस्लाम पूर्व अरब स्थानात सापडतो. इस्लाम पूर्व अरबस्थानात ‘शहीद’ हा शब्द पुरावा किंवा ‘घोषणा करणे’ या अर्थाने वापरात असत. इस्लामी संस्कृतीत त्याचा अर्थ अमुलाग्र बदलेलेला आहे. आपण ‘युध्दभूमीवर मरण आलेल्या’ला शहीद म्हणतो, परंतु ‘शहीद’ या शब्दाचा अर्थ खूप विचारपूर्वक निश्चित केला आहे.
अगदी सोप्या शब्दात ‘शहीद’ म्हणजे ‘जो अल्लाहच्या कार्यासाठी, अल्लाहचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी लढतो आहे, अशा युद्धात ज्याचा मृत्यू झाला आहे.’ इस्लामी धर्मशास्त्र मानते ‘अल्लाहच्या कार्यासाठी जो मरण पत्करतो’ त्याच्यावर अल्लाहची सर्वात जास्त कृपादृष्टी असणार आहे. अल्लाहने ‘शहीद’ झालेल्याला स्वर्गाची हमी दिलेली आहे. स्वर्गात ‘शहीद’ झालेल्यासाठी ७२ अप्सरासुद्धा आहेत. शिवाय शहीदाच्या मृतदेहाला सुद्धा इतरांपेक्षा काही विशिष्ट सेवांची तरतूद करण्यात आली आहे. कोणाही सामान्य मुसलमानाप्रमाणे ‘शहीदा’चा मृतदेह दफन करायचा नसतो. इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे सर्व माणसे त्यांच्या दफन झालेल्या ठिकाणी पडून राहणार आहेत, अंतिम निर्णय दिवसाच्या वेळी त्यांना जिवंतपणा येईल. अल्लाह त्यांच्या कर्मांवरून, जीवन कसे जगले यावरून निवडा करेल. आणि पापं जास्त असतील तर नरक आणि पुण्य असतील तर स्वर्ग देईल, असे इस्लामी धर्मशास्त्र सांगते. पण अल्लाहच्या कार्यासाठी जो लढत असेल आणि त्या कार्यात ज्याला मरण आलेले असेल, म्हणजे जो ‘शहीद’ झाला असेल त्याला अंतिम निर्णय दिनाची वात बघावी न लागता तो थेट स्वर्गात जाईल. आणि हा खूप मोठा सन्मान मानला गेला आहे.
इस्लामी धर्मशास्त्राने ‘शहीद’ यांचे दोन प्रकार मानले आहेत. १. युद्धभूमीवर मरण आलेले, २. युद्धाशिवाय मरण आलेले. यापैकी युद्धभूमीवर मरण आलेल्या ‘शहीदां’साठी काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिली आहे, ‘घुसल’ या प्रकारची विशिष्ट अंघोळ. सामान्य पणे मरण आलेल्या मुसलमानाच्या मृतदेहाला हि ‘घुसल’ नावाची अंघोळ घालण्याची प्रथा आहे. याचे विधी खूप विस्तृतपणे विकसित करण्यात आले आहेत. शिवाय संभोगानंतर निर्माण झालेली अशुद्धता धुवून टाकण्यासाठी हि अंघोळ करतात. ही अंघोळ ‘शरीर आणि मन शुद्ध आणि पवित्र’ करण्यासाठी केली जाते. परंतु जे अल्लाहच्या कार्यासाठी युद्धभूमीमध्ये मरण पावले आहेत त्या मृतदेहांना अशी अंघोळ घातली जाऊ नये असे बहुतेक सर्व परंपरा मानतात. शिया सुन्नी सुद्धा याविषयी एकमत व्यक्त करतात. याची करणे दोन आहेत. पहिले म्हणजे युद्धभूमीवरील जखमा या अभिमानाने दाखवण्याच्या असतात. शिवाय अल्लाह त्या जखमांवरून अल्लाहची कृपादृष्टी ठरणार आहे, असे इस्लामी धर्मशास्त्र मानते. त्या जखमांवरून त्याचे स्वर्गातले स्थान निश्चित होणार आहे. ‘उहूद’च्या युद्धात ‘शहीद’ झालेल्यांना प्रेषितांनी ‘अंघोळ’ घातली नव्हती, परंतु देवदूतांनी शहिदाचा मृतदेह धुवून स्वच्छ केला असे उल्लेख सापडतात.
दुसरे कारण ‘घुसल’ हि अंघोळ मन आणि शरीर पवित्र करण्यासाठी घातली जाते. इस्लामी धर्मशास्त्र मानते कि ‘शहीद’ झाला आहे याचा अर्थ तो अल्लाहच्या कार्यासाठी लढता लढता मरण पावला आहे,म= म्हणजे त्याने करू शकत होता ते सर्व पुण्याचे काम केले आहे. अल्लाहच्या कार्यासाठी युद्धात मरण आले याचा अर्थ त्याचे शरीर सर्व पापांतून मुक्त झाले आहे. त्याचे शरीर पवित्र आणि शुद्ध झालेले असताना पुन्हा शुद्ध होण्यासाठी ‘अंघोळ’ घालायची गरज नाही. या संदर्भात काही परंपरा असे मानतात कि ‘तो मुळातच शुद्ध आणि पवित्र झाला आहे’ तर अजून शुद्ध करणारी अंघोळ घातली तर तोटा काही होणार नाही म्हणून अंघोळ घालावी. पण सर्व परंपरा ‘अल्लाहच्या कार्यात मरण आले म्हणजे सर्वात पुण्याचे काम’ आहे असेच मानतात.
दुसरी तरतूद म्हणजे त्या शहीदाचे युद्धभूमीवरील कपडे – मरण आले त्यावेळी कोणते कपडे त्याच्या अंगावर होते त्या कपड्यांच्या समवेत त्याचे दफन केले जावे. शिवाय हातात हत्यार कोणते होते ते सुद्धा त्याच्या शरीराबरोबर ठेवावे, कारण रक्ताळलेले कपडे आणि त्याची हत्यारे हे त्याचे अभिमानाने दाखवण्याचे दागिने मानले गेले आहेत. शहीदांच्या शिवाय मरण आलेल्या समान्य मुसलमानाला हि विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. तिसरी विशेष तरदूत म्हणजे ‘उहूद’ च्या युद्धात शहीद मृतदेहांना स्वतः प्रेषित पैगंबर यांनी प्रार्थना केली होती. या प्रार्थनेत ‘अल्लाहला विनंती केली जाते कि, हे शरीर तू सांगितलेल्या कार्यात असताना मरण पावलेले आहे, तेव्हा उ याच्यावर कृपा कर.’ काही परंपरा मानतात शहीदाचा मृतदेह मुळात सर्व पापांतून मुक्त झालेला असताना प्रार्थना करण्याची गरज नाही. पण ‘शहीद’ व्यक्ती अल्लाहच्या कृपेचा आणि दयेचा सर्वात मोठा अधिकारी म्हणून सिद्ध झालेला असताना इतर कोणाहीपेक्षा प्रार्थनेचा त्याला सर्वात जास्त अधिकार आहे.
शतकानुशतके ‘शहीद’ होणे हा मृत्यूचा सर्वात पवित्र मार्ग आहे अशी मुसलमानांची श्रद्धा बनून राहिलेली आहे. अल्लाहची कृपा आणि दया मिळवण्याचा आणि अल्लाहच्या जवळ जाण्याचा, स्वर्गाची हमी मिळवण्याचा हा सर्वात पवित्र मार्ग आहे असेही मुसलमान मानतात. युद्धभूमीवर अल्लाहच्या कार्यासाठी मरण आलेल्या शहीदाबद्दल आपण बोललो. पण इतर काही कारणांनी मरण आले तरी त्याला शहीदाचा दर्जा मिळतो. जर युद्धात स्वतःच्या हत्याराने स्वतःला प्राणघातक जखम झाली आणि त्यात मृत्यू झाला तरी त्याला ‘शहीद’ म्हणतात. शिवाय मुस्लीम बंडखोरांनी आणि दरोडेखोरांनी मुसलमानाची हत्या केली तरी त्याला ‘शहीद’ मानतात. मुसलमान व्यक्ती स्वतःचा बचाव करताना मारला गेला तरी त्याला ‘शहीद’ म्हणण्याची पद्धत आहे.
युद्धाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या मार्गाने अल्लाहचे कार्य मुसलमान करत असेल, उदा. कुराणचे अध्ययन, अध्यापन करणारा, धर्म प्रसार करणारा, युद्ध शास्त्र तयार करणारा इ. कोणीही. त्या कार्यात त्याचा मृत्यू झाला तरी त्याला शहीद म्हणतात. अल्लाहवर श्रद्धा ठेवली आणि बिगर इस्लामी प्रदेशात हत्या झाली तरी त्याला शहीद म्हणतात. परंतु इतर कोणत्याही मार्गापेक्षा युद्धात आलेले मरण सर्वात पवित्र मानले गेले आहे.
अल्लाहच्या कार्याशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी मरण आहे तर त्याला ‘शहीद’ म्हणले जात नाही. विशिष्ट बिगर इस्लामी देशाचे, प्रदेशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाला मरण आले तर त्याला ‘शाहीदा’चा दर्जा मिळत नाही. ‘शहीद’ केवळ अल्लाहच्या कार्यात मरण आलेलाच असू शकतो.
No comments:
Post a Comment