Thursday, 15 December 2016

‘चेपॉकचे’ किस्से

आता भारतात जवळ जवळ २५ टेस्ट क्रिकेट खेळता येतील असे स्टेडीयम्स आहेत. पण इडन गार्डन्स किंवा वानखेडेच जे स्थान आहे, ते कोणी नाकारू शकत नाही, अस एखाद्या स्टेडीयमला गरजेपेक्षा जास्त महत्व येण्याच कारण काय, तर असा एक सौरव गांगुली होऊन गेला त्याच्या टीमनी २००१ मध्ये mighty ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन मिळाल्यानंतर हरवून दाखवलं.. इडन गार्डनचं नाव कायम या एका आठवणीसाठी लक्षात राहील. स्टेडीयम लक्षात राहतं कारण असे लक्षात राहण्यासारखे काही प्रसंग तिथे घडलेले असतात.

गेल्या १० वर्षात भारताला भारतात हरवणाऱ्या एकमेव टीम इंग्लंडला आपण भारतात आता हरवलेलं आहे. सलग ५ सिरीज आपण जिंकलेल्या आहेत, सलग १७ टेस्ट न हरता आपण १८ वी खेळायला उतरतो आहे. विराट त्याच्या Form of life मध्ये आहे. फास्ट बॉलर नियमित १४०+ च्या स्पीडनी बॉलिंग करतायेत. अशा सगळ्या अनुकूल बाबी घेऊन आपण जातो आहोत 'चेपॉक'ला.

मुथैया अन्नामलाई चिदंबरम नावाचे एक भारतीय उद्योगपती होते, तसच ते क्रिकेट व्यवस्थापाक सुद्धा होते. चेन्नईच्या क्रिकेट स्टेडियमला MA Chidambram हे दिलेलं नाव, त्यांच्याच नावावरून दिलेलं आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे, कि जिथे प्रत्येक पुढच्या घावेला किंवा पडणाऱ्या विकेटला, घेतलेल्या प्रत्यके कॅचला एखादा नवीन विक्रम घडत असतो. त्यामुळे हा खेळ इतर खेळांपेक्षा जास्त रंजक झाला आहे, अस माझं मत आहे.

जसं २००१ इडन गार्डनची आठवण आहे, आणि सचिन आणि गावसकर यांच्या प्रेमापोटी वानखेडेची कायम आठवण राहील, तसे अनेक किस्से चेपॉकचे पण आहेत. किंबहुना कलकत्ता किंवा मुंबईपेक्षा रोमांचकारी क्रिकेटचे क्षण भारताला चेपॉकनी दिले आहेत. उद्या 'चेपॉक'ला आपण खेळायला जाणार आहोत, तेव्हा एकदा अशा मेमरीज मधून फिरून यावं!

१९३२ साली भारताला क्रिकेटच्या इतिहासातला पहिला टेस्ट सामना खेळायची संधी मिळाली. सी.के. नायडू यांच्या कॅप्टन्सीखाली भारत इंग्लंडला गेला. वेगळं सांगायची गरज नाही, पण भारत १५८ रन्सनी तो सिरीजमधला एकवेम सामना हरला. भारताची कसोटी क्रिकेटच्या क्षेत्रातली सुरवात हि अशी झालेली आहे.

त्यानंतर भारत २६ टेस्ट, भारतात किंवा भारताबाहेर खेळला. एकही टेस्टमध्ये भारताला विजय मिळू शकलेला नव्हता. हरण्याची सवय इतकी लागलेली असावी प्रतिस्पर्धी न जिंकणं हेच सामना खेळायचं धेय्य ठरून . १९५१ च्या नोव्हेंबरमध्ये इंग्लंडचा संध नायजेल हॉवर्डच्या कॅप्टन्सीखाली भारतात आला. ५ टेस्ट मॅचची सिरीज होती. त्या पाच पैकी पहिले चार सामने मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि कानपूर इथे झालेले आपल्या परंपरेप्रमाणे आपण इंग्लंडला जिंकू न देण्यात यशस्वी झालो. पाचवी मॅच होती चेपॉकवर.

भारतीय कंडीशन्स मध्ये टॉस जिंकल्यावर जे करायचं असतं तेच इंग्लंडनी केलं आणि पहिली बॅटिंग घेतली. इंग्लंडमध्ये क्रिकेटचं वातावरण वेगळच आहे. कोणतेही मोठे रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर नाहीत, ICC ट्रॉफी ते जिंकू शकले नाहीत, (T20 हे इंग्लड क्रिकेट संस्कृतीचं स्वरूप नाही) त्यामुळे त्यांच्याकडचे सगळे हिरोज हे कायम अनसंग राहिलेलेल आहेत. पण ते कायम ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज इतकचे घातक राहिलेले आहेत.

तसाच १९५१ च्या इंग्लंडच्या टीममध्ये कोणी स्टार प्लेयर नव्हता पण स्पूनर, ग्रेव्हनी, रॉबर्टसन सारखे बॅट्समन आणि हिल्टन सारखे बॉलर त्यांच्याकडे होतेच. पण ६ फेब्रुवारी १९५२ ला सुरु झालेली मॅच आणि पुढचे पाच दिवस फक्त भारताचे होते. पहिल्या इंनिंगमध्ये इंग्लंडला केवळ २६६ रन्स करता आल्या कारण आमच्याकडे विनू मंकड होता. भारताच्या बॉलर्सकडे पेस फारसा कधीच नव्हता, पण टर्न शाश्वत आहे. त्या पहिल्या इंनिगमध्ये विनू मंकडनी एकूण ३८ ओव्हर्स टाकल्या त्यापैकी १५ मेडन आणि ५५ धावांच्या बदल्यात केवळ ८ विकेट्स!!

इंग्लंडची पहिली इंनिंग संपवून भारत बॅटिंग करायला उतरला. टेस्ट मॅच जिंकण्याचं साधं सूत्र काय आहे, तर तुमच्याकडे ४००+ रन्स करणारे बॅट्समन पाहिजेत, त्याच्याबरोबर २० विकेट्स घेणारे बॉलर. आधीच्या टेस्ट्स मध्ये भारताकडे हे दोघेही जण होते, ते एका वेळी खेळत नसत. विनू मंकडनी आपली जादू दाखवली होती, आता पाळी होती आमच्या बॅट्समन्सची. आमचा 'विजय हजारे' कॅप्टन होता. पण त्याला साथ देणारे मुश्ताक आली, पॉली उम्रीगर, पंकज रॉय, लाला अमरनाथ, दत्तू फडकर होते. पंकज रॉय आणि पॉली उम्रीगर या दोघांनी सुंदर शतके करून भारताला साडेचारशे रन्सचा टप्पा पार करून दिला. भारताचा पहिला डाव ४५७ वर डिक्लेअर करण्यात आला.

याचा अर्थ भारताकडे १९१ रन्सचा लीड होता. तो लीड डोक्यावर घेऊन इंग्लंड पुन्हा बॅटिंगला आलं. यावेळी विनू मंकड बरोबर होता गुलाम अहमद. या दोघांच्या फिरकीने भारताला पुन्हा बॅटिंग करायची वेळच आली नाही, दोघांनी ४-४ विकेट्स प्रत्येकी घेऊन इंग्लंडची दुसरी इंनिग १८३ धावांवर संपवली.

ज्याचं गणित चांगलं असेल त्यांना लक्षात येईल, भारतानी ठेवलेल्या लीडचा पाठलाग करताना इंग्लंड अजून ८ रन मागेच होता. भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात आधीच्या २६ टेस्ट ची वाट पहिल्यानंतर मिळालेला पहिला विजय, हा भारताला 'एक डाव आणि ८ रन्स' असा आहे. मधला एक रेस्ट डे सोडला तर भारतानी ४ दिवसात मॅच संपवली. आणि राजासारखा पहिला विजय मिळवला!!

तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला भारताचा पहिला विजय मिळाला ते स्टेडीयम होतं 'चेपॉक'!! त्यावेळी बहुतेक 'मॅन ऑफ दि मॅच' चा किताब देत नसावेत. पण पहिल्या विजयाचा शिल्पकार म्हणून मिळालेला विनू मंकड अधिक पंकज रॉय आणि पॉली उम्रीगर हे कायम मॅन ऑफ दि मॅच ठरले.

काळाच्या भाषेत आपण किती पुढे आलो बघा, पहिला विजय मिळवण्यासाठी आपल्याला २७ टेस्ट वाट बघावी लागली तिथपासून सलग ५ सिरीज आणि १७ टेस्ट आपण न हरता कसोटी क्रिकेटमध्ये क्रमांक एक ला पोहोचलो आहोत.

असे ‘चेपॉक’चे अनेक किस्से आहेत.!!

पण एक दोन सांगितल्याशिवाय राहवत नाही.

१९७५, वेस्ट इंडीजचा राक्षसांचा कळप भारतात आला होता. त्यांच्यासमोर भारताची टीम म्हणजे अगदीच बळी द्यायला आणलेली कोवळी मुलं होती. त्या मुलांमध्ये सर्वाना सांभाळायची धुरा दिली होती मन्सूर अली खान कडे. ११ जानेवारी ७५ ला सकाळी टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. आणि वेस्ट इंडीजच्या टीम कडून अपेक्षेप्रमाणे राक्षस धावून आले. त्यांच्या म्होरक्या होता ‘क्लाईव्ह लोईड’. पण बॉलिंगची धुरा होती अँडी रॉबर्ट्स. एकट्या अँडी रॉबर्ट्सनी भारताची ७ मुलं खाल्ली. पण एक त्याला शरण जाईना. त्याचं नाव होतं ‘गुंडप्पा विश्वनाथ’. खेळायला आला चौथ्या नंबरवर, पण शेवटपर्यंत टिकून राहिला. अँडी रॉबर्ट्स समोरच्या एंड वर एक एक गडी टिपत होता, ते गुंडाप्पा विश्वनाथ बघत होता. शेवटी नॉन स्ट्राईकर एंड वर खेळायला कोणी उरलं नाही म्हणून विश्वनाथ नॉट आउट ९७ वर परत गेला. भारताला केवळ १९० धावा करता आल्या. पण वेस्ट इंडीजची सुद्धा अवस्था फार चांगली नव्हती. इरापल्ली प्रसन्नानी वेस्ट इंडीजची निम्मी टीम उखडली, उरलेली चंद्रशेखर आणि बेदी यांनी. वेस्ट इंडीजला केवळ २ धावांचा लीड देता आला. भारत तो सामना १०० धावांनी जिंकला.. १९७५ चा चेपॉक वरचा विश्वनाथ आणि प्रसन्ना, हे कायम लक्षात राहतील.

१९८६ मध्ये भारताची पहिली टाय टेस्ट मॅच सुद्धा झाली ती चेपॉक वरच.

धोनीची टेस्ट करियर मधली पहिली मॅच झाली चेपॉकवरच.

ज्या २००१ च्या बॉर्डर – गावसकर सिरीजची कायम आठवण काढली जाते, त्या सिरीजमधली तिसरी टेस्ट झाली होती चेपॉकवरच. आणि ती मॅच इडन गार्डन्स इतकीच रोमांचकारी होती. हेडनची डबल सेंच्युरी, हरभजन सिंगच्या पहिल्या इंनिगमध्ये ७ विकेट, सचिनची सेंच्युरी, हरभजन सिंगच्या दुसऱ्या इंनिगमध्ये ८ विकेट आणि भारताला जिंकायला धावा हव्या होत्या १५५. त्या १५५ पैकी एकट्या लक्ष्मणनी ६६ धावा केल्या, पण उरलेली टीम मॅक्ग्राथ, गिलेस्पी, मिलर आणि वॉर्न समोर उभं राहायला तयार नव्हती. १५५ धावांचा पाठलाग करताना आपल्या ८ विकेट्स गेल्या, आणि कसं बसं दोन विकेट्सनी आपण जिंकलो. पण तो थ्रिलर मुव्ही होता. खरं म्हणजे एका मुव्हीला एकंच क्लायमॅक्स असतो. आमच्या चेपॉकच्या मुव्हीला एका मॅच मध्ये दोन क्लायमॅक्स आहेत.

साल २००८ आहे, विनू मंकड, गावसकर, कपिल देव, अझरूद्दीन या विसाव्या शतकातून आपण द्रविड, लक्ष्मण, गांगुली, सचिन आणि first of the romans सेहवाग अशा आपण एकविसाव्या शतकात आलो त्याला सुद्धा आता ८ वर्ष होऊन गेली होती. अशा बॅट्समन बरोबर आपण एकविसाव्या शतकात पूर्ण सेटल झालो आणि २६ मार्च २००८ मध्ये आपण साउथ आफ्रिकेच्या टीम विरोधात खेळायला पुन्हा एकदा ‘चेपॉक’वरच उतरलो. माझं असं मत आहे कि १९९२ पासून, म्हणजे पहिला रंगीत वर्ल्डकप पासूनच साउथ आफ्रिकेची टीम ऑस्ट्रेलिया इतकीच mighty आहे, फक्त ‘लक’ त्यांच्याबाजूने नाही. अशी एकविसाव्या शतकात ती सुद्धा पूर्ण सेटल झालेली साउथ आफ्रिकेची टीम जबरदस्त होती. स्मिथ कॅप्टन आणि त्याच्या नंतर आमला, डीव्हीलीयर्स, बाउचर, जॅक कॅलीस हे बॅट्समन आणि बॉलर स्टेन, मॉर्केल आणि मखाय एन्टिनी!!

सौरव गांगुलीने वीरेंद्र सेहवागच्या कसोटीमधील निवडीवर सांगितलं होतं की, मी त्याला स्ट्राईक वर पाठवतो, कारण मला सामना जिंकायचा आहे. असा हा सेहवाग नावाचा राक्षस एकदा साउथ आफ्रिकेवर तुटून पडला होता. साल २००८, स्थळ ‘चेपॉक’. खरं म्हणजे आधी साउथ आफ्रिकेनी आपल्याला तसच धुतलं होतं. आपल्याकडे जसा सेहवाग होता, तसा त्यांच्याकडे ‘आमला’ होता, ग्राहम स्मिथ होता, मार्क बाउचर होता. असे सर्व एकत्र खेळून त्यांनी पहिल्या डावात ५४० धावा केल्या. पण सेहवाग सेहवाग आहे. त्याने ५४० धावांचा पाठलाग करताना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान त्रिशतक ठोकलं. हे सोप्प नाही. ‘आक्रमकता’ हा गुण काही ठराविक वेळासाठी टिकवून ठेवता येतो. ट्वेंटी२० मध्ये यशस्वी होण्याचे कारण तेच आहे. पण पूर्ण दिवस तो माइंडसेट टिकवून ठेवता येईल का? हो, सेहवागने करून दाखवलं. ह्या टेम्प्रामेंटबरोबर अजून एक अवघड गोष्ट म्हणजे समोर गोलंदाजीला बांगलादेश किंवा केनिय नव्हती. तर मखाय अँटीनी, डेल स्टेन, मॉर्ने मोर्केल, द ग्रेट जॅक कॅलीस. अॅलन बॉर्डरच्या दहा हजार धावा ज्या इंनिग मध्ये झाल्या, ती इंनिग लाराच्या खेळीमुळे जशी दुर्लक्षित राहिली तशीच सेहवागच्या या कत्तलखान्यामुळे अशीच एक इंनिग दुर्लक्षित राहिली. सेहवागबरोबर सलामीला आलेला ‘वासिम जाफर’ कसोटी क्रिकेटला साजेशी १६६ बॉलमध्ये ७३ अशी खेळी करून आउट झाला. वन डाऊनला ‘भारताचा एक सर्वोत्तम’ कसोटी प्लेयर खेळायला आला. राहुल द्रविड!! सेहवाग बरोबर दुसऱ्या विकेटसाठी द्रविडने २६८ धावांची भागीदारी रचली. सामन्याचा तिसरा दिवस संपताना सेहवाग ३०९ आणि द्रविड ६५ वर खेळत होते. चौथ्या दिवशी नवीन बॉल घेण्यात आला. आणि ब्रायन लाराचा ४०० चा विक्रम सुद्धा मोडू शकेल अशा स्टेजवर असलेला सेहवाग आउट झाला. ३१९ वर! (सेहवागचे त्रिशतक हे केवळ २७८ चेंडूत आलेलं आहे). सेहवाग आउट झाल्यावर सचिन तेंडूलकरसुद्धा लगेच आउट झाला. २९ चेंडूत २४ धावा करून सौरव गांगुली सुद्धा गेला. पण अभेद्य सह्याद्रीसारखा राहुल द्रविड उभा होता. द्रविडने २९१ बॉल खेळून १११ धावा केल्या. या द्रविडच्या इंनिगनेच द्रविडसुद्धा ‘टेन थाऊजंड’ क्लबमध्ये सामील झाला. जितक महत्वाच सेहवागच सर्वात वेगवान शतक आहे, तितकच अतिशय शांतपणे एका बाजूने टिकून राहणं सुद्धा तितकाच महत्वाचं आहे. आणि ‘सोने पे सुहागा’ म्हणजे ‘गावसकर मार्क’ला पोहोचणारा तिसरा भारतीय राहुल द्रविड ठरला. 

हे सर्व घडलं त्या ‘चेपॉक’वरच!
आत्ता तीन वर्षापूर्वी, सेहवाग सारखाच धोनी ऑस्ट्रेलिया वर तुटून पडला होता. ऑस्ट्रेलियाचा स्टार्क तेव्हाही होता, पीटर सिडल होता, नेथन लायन होता. पण आमच्याकडे एकटा धोनी होता. तो सगळ्यांना पुरून उरला. त्याची ती डबल सेंच्युरी सगळ्यांना माहिती आहे. पण ती डबल सेंच्युरी सुद्धा ‘चेपॉक’ वरच आहे!


अशा मेमरीज स्टेडियमच नाव मोठं करतात.    

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....