'आयुष्य सुंदर हाये त्याला अजून सुंदर बनवायचं आपुन' असं नाना म्हणतो तोपर्यंत ठीक आहे हो! असं आयुष्य सुंदर असत नाही. एखादाच प्रसंग आनंदाचा, समाधानाचा असतो, त्या एका प्रसंगाच्या भांडवलावर आपण जगत असतो.
मी एका अत्यंत महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडलो होतो. एका ठराविक वेळेला माझा मित्र मला भेटणार होता. तो actually येणार होता साडे अकराला; माझं काम अकरा वाजताच पूर्ण झालं. ते झाल्यावर मी त्याला 'माझं काम झालं आहे' हे सांगण्यासाठी फोन करायचा म्हणून खिशातून फोन काढला, तोच समोरून एक मुलगा चालत आला. गोरापान, घारे डोळे. डोळे जड असा तो डुलत डुलत येत होता. माझ्या कानाला फोन होता, पण अजून बोलणं सुरू झालं नव्हतं. तो म्हणाला, "थोडी मदत हवी होती," म्हंटलं बोला की, "काय हवंय?" तर म्हणाला, "तीन दिवस काही खाल्लं नाहीये, नुसती दारू पितोय पण आता भूक लागलीये खूप. आग लागलीये पोटात, कहीतरी खायला देऊ शकाल का?" समोरच एक टपरी होती, मी म्हणालो, "त्या समोरच्या टपरीवरून घ्या हवं ते खायला. मी देतो पैसे". तो टपरीवर गेला. माझा तेवढ्यात फोन लागला, आणि मी मित्राला सांगितलं की माझं काम झालंय, तु थेट इकडेच ये, भेटू आपण. फोन सुरू होता तोपर्यंत तो टपरीवरून तसाच माघारी आला, हातात काहीच नव्हतं. पण माझा फोन सुरु होता, तो पुरा होईपर्यंत तो थांबला. मला त्याला सांगावं लागलं नाही, की फोन सुरु आहे, जरा थांबा म्हणून.
फोन झाल्यावर तो म्हणाला, "अहो इथे फार महाग आहे, चाळीस रुपये वडापाव म्हणतोय. एक प्लेट पोहे १०-१२ मध्ये मिळतील. तेवढ्यावर माझं दिवसभराच भागेल. चाळीस रुपयाचा वडापाव खाण्यापेक्षा ते बरं!" मी त्याचा हातावर दहा रुपये ठेवले, आणि म्हणालो, "मला आता अजिबातच वेळ नाही. एका ठिकाणी अर्जंट जायचं आहे नाहीतर मी तुम्हाला घेऊन गेलो असतो." तो चमकला, तोपर्यंत मित्राचा पुन्हा फोन आला फोनवर त्याने यायला वेळ लागेल असं सांगितलं. ते कदाचित त्या भिकाऱ्याने ऐकलं किंवा त्याला कळलं. तो म्हणाला की, "तुम्हाला थोडा वेळ आहे का? मला पाच मिनिटं बोलायचंय फक्त" मी हो म्हणालो, बोला! त्यावर तो म्हणाला -
(दारूचा बेक्कार वास त्याच्या तोंडाला येत होताच, याची जाणीव त्याला सुद्धा असावी, तो माझ्यापासून लांब उभा राहिला.) माझे कपडे, माझा एकूण अवतार, तोंडाला येणारा दारूचा वास आणि तुमच्याकडे मागितलेले पैसे यावरून तुमचा 'मी भिकारी आहे' असा गैरसमज समाज होईल. पण मी भिकारी नाही." माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव त्याच्या लक्षात आले, आणि माझी प्रतिक्रिया काय असेल हे जाणून तो म्हणाला, “मी भिकारी नाही, मी एका उच्च मध्यमवर्गीय घरातला संस्कारी आणि ब्राह्मण मुलगा आहे.” हे सांगताना त्याने त्याच्या मळलेल्या टी-शर्टच्या कॉलरच्या आत हात घालून मला त्याचं जानवं बाहेर काढून दाखवलं. “माझं नाव ************ आहे. तुम्ही माझ्याबद्दल इंटरनेटवर सर्च करू शकता. माझं व्हीआयटी कॉलेज मधून २००० साली कॉम्प्यूटर इंजिनीअरींग झालेलं आहे. कँपस मधून प्लेसमेंट होऊन मला २००० साली रिलायंस इन्फोकॉम मध्ये वीस हजार रुपयाचा जॉब मिळाला होता.”
तो हुशार होता. माझ्या चेहेऱ्यावरचे बदलेले भाव तो लक्षात घेऊन आपल्या प्रतिक्रिया बदलत किंवा लांबवत होता. “हो, २००० साली मला वीस हजार रुपयांचा जॉब मिळाला होता. शाळाकॉलेजमधले ब्लू आईड बॉइज आणि गर्ल्स असतात ना त्यापैकी एक होतो मी. अभ्यासात हुशार होतोच, आपण माझं ड्रॉइंग उत्तम होतं. आणि एकूणच मी स्टार होतो कॉलेजचा. जॉब जो मिळाला तो मुंबईला होता. आई वडील पुण्यात होते आणि मी मुंबईला. actually मुंबईमध्ये नव्हतो मी. त्यावेळी नवी मुंबई हे शहर डेव्हलप करत होते, प्लानिंग करून. नवी मुंबई ही नव्या दिल्ली सारखी planned सिटी आहे. त्या नव्या मुंबईमध्ये एक्सप्रेस हाईवेवरून खिंड ओलांडून डी.वाय. पाटील क्रिकेट स्टेडीयमच्या थोडं पुढे आलो की ऑफिसने आम्हाला ३ जणांना फ्लॅट घेऊन दिला होता.” मी प्रत्येक शब्दला फक्त आश्चर्य व्यक्त करत होतो. त्या एक एक गोष्टी ऐकून माझ्या तोंडून शब्दसुद्धा फुटायचे बंद झाले. पुढे तो म्हणाला, “जशी जशी सिटी डेव्हलप होत गेली, तशी तशी ‘बार्स’ची संख्या वाढायला लागली. कॉलेजपासूनच मला सेक्स आणि दारू याचं जबरदस्त आकर्षण होतंच.” इतकं बोलून अचानक त्याने सूर बदलला आणि म्हणाला, “तुझी पाच मिनिटं संपली असतील तर सांग, मी माझी बडबड थांबवतो. काय आहे एका दारुड्याच इतकं कोण ऐकून घेईल? तु ऐकतोयस म्हणून तुला त्रास देणं बरोबर नाही.'' मी म्हणालो, “नाही नाही आहे वेळ तुम्ही बोला” मी तोच विचार केला की, खरं आहे. या दारुड्याच कोण इतकं ऐकून घेईल. पण तोच फरक आहे. माझी ऐकून घ्यायची तयारी आहे.'' हा विचार माझ्या मनातून पुरा होतोय तोवर तो म्हणाला, “आयुष्यात खूप मोठा होशील, कारण तुझी ऐकून घ्यायची तयारी आहे!”
त्याच्या दर शब्दागणिक माझं आश्चर्य फक्त वाढत होतं. मी केवळ अवाक् होऊन ऐकत होतो. “तर ... मला सेक्स आणि दारूचं आकर्षण होतंच कायम. इतकं की मी घरातल्या स्त्रीकडे सुद्धा त्या नजरेनी बघत असे. पण याचा तिला कधी त्रास झाला नाही, मला कधी पश्चाताप झाला नाही.” पुन्हा अचानक सूर बदलून, “येडझवे साले, फेमिनिझम ही बोंबलून सांगायची गोष्ट आहे का, पुरुषाने ती आचरणात आणायची गोष्ट आहे.” शिवाजीराव भोसले यांच्या एका भाषणात ते सांगतात की, असे काही वक्ते असतात ज्यांच्या मागे मनाने धावणं सुद्धा आपल्याला कठीण होतं. रस्त्यात भेटलेल्या एक बेवड्याने सहज एक सूत्र सांगितलं. ज्याच्यावर हजारो ग्रंथ लिहिले तरी पुरेल इतकं मूलभूत ते सूत्र होतं. पण हा विचार करेपर्यंत पुढचा धक्का बसत होता.
पण आपला तोल सुटला बोलताना हे त्याच्या पुन्हा लक्षात आलं, तो सॉरी म्हणाला. ''तुमच्या सारख्या सज्जन माणसासमोर माझा तोल सुटायला नको होता,'' असं म्हणून त्यानी स्वतःला मारूनही घेतलं. मी त्याला आवरलं. “मी कॉलेजच्या काळात या प्रकारची खूप मजा केली. ‘पैसा’ हा प्रश्न कधीच नव्हता. तो पुढे मी खूप मिळवला सुद्धा आणि कॉलेजला होतो तेव्हा खूप मिळतही होता. पण तुर्भेच्या जवळ फ्लॅट मिळाल्यानंतर ते आयुष्य बदलून गेलं. खूप ‘बार’ जवळ होते, आणि खूप होते. ऑफिसच्या गाडीने आम्हाला घरी सोडलं की आम्ही बार मध्ये जायचो. सर्व प्रकारची मजा करायचो. पुण्यात होतो तेव्हा ‘पुलं होते तोपर्यंत म्हणजे २००० सालापर्यंत मी रोज पुलंना भेटायला जात असे. लोकमान्य नगर मध्ये पंडितजी राहायचे, त्यांच्या पाया पडायला मी जात असे. पंडितजी मला नावाने ओळखायचे.”
त्यावेळी ही नावं त्याच्या तोंडून ऐकूनही मला धक्केच बसत होते. एक दारुडा भीमसेन जोशींना भेटायला जातो, पुलंना भेटायला जातो ते ही नियमितपणे, आणि आम्हाला एकदाही त्यांचं दर्शन होऊ नये? मला 'नशीब' या गोष्टीचं क्षणभर आश्चर्य वाटून गेलं.
तो पुढे म्हणाला, “मेटॅलिका, नावाच्या वेस्टर्न म्युझिक बँडची कॉंसर्ट होती बेंगलोरला, त्याला साडे सात हजार रुपयाचं तिकीट काढून मी बंगलोरला गेलो होतो. २००३ साली अमेरिकेत टेक्सासमध्ये जॉब मिळाला. तीन वर्ष अमेरिकेत मी जनरल मॅनेजर होतो, एका सॉफ्टवेअर कंपनीत! २००६ मध्ये मी पुन्हा भारतात आलो, पुढे माझं लग्न झालं. २००७ मध्ये जॉब सोडला मी. त्यानंतर मी आणि बायकोने मिळून कन्सल्टंसी कंपनी सुरु केली. (ही कंपनी मी नंतर शोधली होती. पन्नास पन्नास टक्के शेअर असलेली ती कंपनी होती) पैसा खूप कमावला रे, पण पैसा म्हणजे काय यश आहे का? नाही ना. मला माझा मार्गच कधी सापडला नाही. मी कायम चुकत गेलो. दारू तर कायम पीत होतो. पैसा का कमावतो आहे हे कधी कळलच नाही त्यामुळे शक्य असेल त्या मार्गानी तो उडवत राहिलो. मेटॅलिकाच्या कॉंसर्टमध्ये पहिल्यांदा गांजा ओढला. लहानपणापासून माझी रामावर श्रद्धा, कृष्ण मला कधी आवडला नाही. तो राजकारणी होता, ते मला आवडतं नाही. पण मला राम आवडतो. माझी विठ्ठलावर श्रद्धा. त्या ढे-यांनी विठ्ठलावर टीका नव्हती करायला पाहिजे रे.. लाख्खो लोकं श्रद्धा ठेवून असतात त्यांच्या भावनांशी का खेळावं अभ्यासकांनी. तुम्ही अभ्यास करा, तुमच्यापाशी ठेवा!!”
आता मात्र मला बधीर वाटायला लागलं. साला १० मिनिटापूर्वी भेटलेला एक बेवडा मला रा.चि. ढेरे यांचे संदर्भ देतोय .. मी केवळ अवाक् आणि अवाक् होतो! “पण अम्, तुझं नाव काय?” मी हिप्नोटाईझ झाल्यासारखं नाव सांगून टाकलं. “मुकुल”, “हम, मुकुल मला माझा मार्गच कधी सापडला नाही रे. हे आयुष्य आपण का जगतो? कशासाठी जगतो, काय मिळवायचं असतं म्हणून जगतो? या सध्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत रे, ती कधीच मिळाली नाहीत. अजूनही मिळाली नाहीत. आता रस्त्यावर आलो” त्याच्या डोळ्यात हे सांगताना पाणी आलं होतं. तो म्हणाला तुला सांगतो मुकुल, “जो माणूस शून्यातून विश्व उभं करतो त्याचं कौतुक करायचं नसतं. कारण He had nothing to lose. ज्या माणसाने यशाची सगळी शिखरं पहिली आहेत, तो माणूस शून्यापर्यंत येतो पुन्हा तिथून त्याला उभं राहणं अवघड असतं रे .. माणूस म्हणून आपला हा दोष आहे की आपल्याला इगो असतो खूप मोठा. जोई गंथरला सांगतो बघ फ्रेंड्समध्ये ‘I was Dr. Dreak Remorey on Days of our lives’ तिथून वेटरचं काम करणं म्हणजे खाली येणं. actually हा प्रवास उलटा झाला पाहिजे.”
“या प्रश्नांच्या शोधात मी सगळं गमावलं. सगळं! पैसा, मित्र, सन्मान, विश्वास, बायको, दोन लहान मुली, आई वडील सगळं! आता रस्त्यावर फिरतोय, तीन दिवस काही खाल्लं नाही. घरी गेलो की भांडणं होतात, आई रडते. (त्याने त्याचं आधार कार्ड मला दाखवलं होतं. त्याच्यावर पुण्यातला धायरीमधला पत्ता होता. तो फोटो माझ्याकडे कुठेतरी अजून असेल.) आता सत्तर वर्षाची म्हातारी आई रडली तर कोणत्या मुलाला बरं वाटेल रे, मग पुन्हा निराशा येते आणि उत्तर दारू!! आता त्या निराशेचा सुद्धा कंटाळा आला. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. या आयुष्यात आता काही उरलं नाही. किंबहुना माझीच जगायची इच्छा उरली नाही. पुन्हा जन्म घेईन आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधीन.” मी आवरलं त्याला, म्हणालो, “अरे मगाशी रामावर श्रद्धा आहे असं म्हणालास ना. मग वाल्याचा वाल्मिकी झाला होताच की, धीर सोडून कसं चालेल? अजून किती आयुष्य पडलंय समोर.” त्याच्या डोळ्यात आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी होतं होतं.
भेटायला येणारा मित्र फोन करून हैराण झाला होता. शेवटी न राहवून मी त्याला सांगितलं, आता मी जातो, खूप उशीर झाला, पुन्हा भेटू आपण पुन्हा कधी चहाला! पुन्हा पाकीट काढलं माझं शंभरची नोट काढली, त्याच्या हातावर ठेवली आणि म्हणालो, “याचं काहीतरी खा, दारू कमी प्या!” त्या माणसाने आधीची दहाची नोट मला परत केली. आणि म्हणाला, “हे सुद्धा शंभर रुपये तुम्हाला परत करीन मी” मला तुमचा मोबाईल नंबर लिहून द्या. मी कागदाच्या चिटोऱ्यावर माझा मोबाईल नंबर लिहून दिला. पुन्हा भेटू म्हणालो, आणि गाडीला किक मारली. गाडीवरून जाताना रस्त्याच्या कडेला त्याला दिसणार नाही अशा आडोश्याला थांबून पाहिलं मागे वळून तर तो रस्त्यात खाली बसून रडत होता! माझ्याच्यानी राहवलं नाही. मी निघून गेलो.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका अननोन नंबरवरून मला फोन आला. त्यावेळी मी होतो गुडलकला. सात वाजले असतील संध्याकाळचे. फोनमधून आवाज आला, “एक मिनिट होल्ड करा” पलीकडून त्याचाच आवाज आला. म्हणाला, “दिवसभर लोकांकडे एकदा फोन करू द्या म्हणून विनंती करत होतो, पण नाही मिळाला फोन. आता मिळाला. तुमच्यासारखा एका चांगला माणूस भेटला, त्याच्या फोन वरून फोन केला. काल म्हणल्याप्रमाणे तुमचे शंभर रुपये परत करायचे आहेत. तुम्ही कुठे आहात'', मी होतो गुडलकला तो होता स्वारगेटला. मी त्याला म्हणालो, “तुम्ही तिथेच थांबा मी येतो. ‘नटराज हॉटेल’च्या दारात तो उभा होता. तोच कालचा मळका ड्रेस, घारे डोळे, गोरापान! गळ्यात एक शबनम! मी त्याच्या समोर गेल्यावर त्यांनी शेकहँडसाठी हात पुढे केला. मग त्याने त्याच्या मागच्या खिशातून शंभरची नोट काढली, माझ्या हातात ठेवली. “फक्त, मला माफ करा. तुम्ही चांगल्या मनानी दिलेल्या पैशाचा मी वापर चांगला केला नाही.” मला तिच अपेक्षा होती. मी ती नोट खिशात टाकली. पैसे कुठून मिळवले विचारलं नाही, कसे मिळवले विचारलं नाही. पुन्हा भेटू म्हणालो आणि गाडीला किक मारली. पुन्हा कालच्यासारखं त्याला मी दिसणार नाही अशा ठिकाणी उभा राहिलो. तेव्हा मी पाहिलं, “तो चालत चालला होता, पाठमोरा, हाडकुळा, गळ्यात शबनम, कालचाच टीशर्ट, पँट आणि कालच्याप्रमाणेच डोळे पुसत चालला होता.
आता या घटनेला ३-४ वर्षं झाली. त्यानंतरसुद्धा तो एक-दोनदा भेटला. त्याच्याकडून माझं आर्थिक नुकसान काही झालं नाही. जितके पैसे मी त्याला दिले तितके पैसे त्याने मला परत दिले. एकदा तो मला बालाजी नगरजवळ शंकर महाराज मठाच्या जवळ भेटायला आला होता. तिथे सुद्धा मी त्याला काही पैसे दिले आणि सांगितलं होतं की इथे खूप स्वस्तात जेवण मिळतं, ते तुम्ही खा. तेही पैसे त्याने मला परत दिले. एकदा बुधवार पेठेत सकाळच्या ऑफिसच्या बाहेर त्यानेच मला चहा पाजला होता. तिथेच माझ्या laptopवर आम्ही त्याची कंपनी शोधली होती. तिथेच त्याने मला त्याचं फेसबुक अकाऊंट दाखवलं होतं.
शेगावच्या व्यसनमुक्ती केंद्रात जायची इच्छा त्याने शेवटी बोलून दाखवली होती. आणि माझ्याकडून अपेक्षा होती की, शेगावपर्यंतचं ट्रेनचं तिकीट मी काढून द्यावं. मी त्याला तयार होतो. पण अक्षर मैफलच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन दोन दिवसांवर होतं. आणि त्याचं माझ्यावर जबरदस्त प्रेशर होतं. मी त्याला म्हणालो, ''चार-पाच दिवस थांबा. माझी ही गडबड संपू दे, तुमची मी सगळी व्यवस्था करतो.'' शंकर महाराज मठाच्याजवळ जेव्हा भेटला त्याच्या दुसऱ्या दिवशीची ही गोष्ट आहे. त्याने काल घेतलेले पैसे मला परत केले. आणि शेगावची इच्छा बोलून दाखवली. पण त्यानंतर आजतागायत त्याचा काही पत्ता नाही.
त्याला ज्या ज्या ठिकाणी मी भेटलो तिथे तिथे मला आज सुद्धा त्याचं ते कृष, मळकं शरीर. त्याची ती मळकी शबनम, भीती वाटावी असे घारे डोळे दिसतात. त्याचा धायरीचा पत्ता माझ्याकडे आहे. पण हिम्मत होत नाही. हिम्मत होत नाही, तो पत्ता शोधायची, ते खरं आहे की खोटं ते तपासायची, त्याच्या आईला बाबांना भेटायची. तो म्हणाला होता, दोन गोंडस लहान मुली आहेत, छान बायको आहे, पण जीवन शोधण्याच्या या जीवघेण्याप्रवासात त्याने काय काय गमावलं, ते पाहून माझा तर थरकाप उडतो.
No comments:
Post a Comment