Monday, 27 April 2020

साटवलीची गडी



या वर्षी माघी गणेश जयंतीच्या उत्सवाला कोकणात गेलो होतो. राजापूरच्या अलीकडे वीस-पंचवीस किलोमीटरवर 'पन्हळे'म्हणून आमचे गाव आहे. दरवर्षी माघ महिन्यात आम्ही सगळे जण तिकडे जातो. यावर्षी मी आणि माझा भाऊ बाईकवरून गेलो होतो. पुणे सोडतानाच मी ठरवलं होतं की उत्सवाच्या कार्यात न अडकता गेल्या पंधरा वर्षांत पहिलं नाही असं कोकण बघायचं. पहिल्या दिवशी अगदी साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास झाला होता म्हणून दुसरा दिवस आराम केला. आणि तिसऱ्या दिवशी फिरायला बाहेर पडलो. माझ्या एका मित्राने महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी बनवलेली आहे. इतकी विस्तृत यादी महाराष्ट्र शासनानेही बनवलेली नाही. त्या यादीत आमच्या लांजा तालुक्यात एक किल्ला असल्याचं मी वाचलं होतं. पुणे सोडतानाचा मी ठरवलं होतं की लांजा तालुक्यातला हा किल्ला यावेळी पहायचा. किल्ल्याचे नाव साटवलीचा किल्ला. आमच्या गावापासून हा किल्ला २२ किलोमीटर अंतरावर आहे.



आमच्या लांजा तालुक्यातून सगळ्यात जवळचा समुद्रकिनारा गणेशगुळे किंवा पूर्णगडचा आहे. तरी ते अंतर 45-50 किलोमीटर आहेच. सांगायचा मुद्दा समुद्रकिनाऱ्यापासून आमचं गाव तसं खूप आत आहे. किंबहुना आंबा घाट उतरल्यावर आमच्या गावात पोहोचायला कमी वेळ लागतो जितका वेळ गावातून किनाऱ्यावर पोहोचायला लागतो. पूर्णगड हा किल्ला ज्या नदीच्या मुखाशी एका टेकडीवर आहे त्या नदीचे नाव 'मुचकुंदी' असे आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही, की कोकणातल्या नद्यांचे असे एक उगमस्थान नसते. डोंगरांवर पडणारं पाणी एकत्र येऊनच ती नदी आकार घेते. तर ही मुचकुंदी नदी पूर्णगडाच्या पायथ्याशी समुद्राला मिळते तिथून जवळजवळ ३८ किलोमीटर आतमध्ये नदीच्याच काठावर हा साटवलीचा किल्ला आहे असं मी नकाशावर पाहिलं. त्या यादीतही या किल्ल्याचं नाव होतं. मग भावंड गोळा केली, आणि तो किल्ला शोधत निघालो.

साठ-साठ सत्तर-सत्तर वर्षे लांज्यात राहिलेल्या लोकांना आपल्या जवळ साटवली या गावात किल्ला आहे हेही माहिती नव्हतं. असा किल्ला कोणालाच माहिती नाही हे लक्षात आल्यावर आम्ही साटवली गाव विचारत विचारात त्या गावात पोहोचलो. डोंगराच्या उतारावरून जाताना खाली एक नदी आहे हे लक्षात येत होतं. मग मुख्य रस्ता सोडून साटवली गावासाठी डावीकडे वळून अजून लहान रस्त्याला लागलो. गावाची वेस पार करून गावात शिरलो तरी किल्ल्याच्या कोणत्याच खुणा दिसेनात. खुणा तर नाहीतच, पण शासनाचा एखादा फलक, किंवा तत्समही काही दिसेना. गाव निम्म संपून सुद्धा गेलं आणि रस्त्याच्या उजव्या हाताला एक बुरुज दिसला आणि डाव्या हाताला एक मोकळं मैदान होतं. तो बुरुज पार करून आम्ही पुढे गेलो एका माणसाला विचारलं की किल्ल्यात जायला रस्ता कुठून? तर तो म्हणाला तो बुरुज दिसतो आहे ना, तेवढाच किल्ला आहे.

आमची निराशा झाली. कारण किल्ला पाहायला जायचा म्हणजे सगळेच ट्रेकिंगची तयारी करून आलो होतो. एक बुरुज बघायला उन्हातान्हात २२ किलोमीटरचा प्रवास करून आलो हे लक्षात आल्यावर आम्ही कपाळावर हात मारून घेतला. पण मला याचा अंदाज होता. कधीही नाव ऐकलेलं नाही, लांज्यातल्या लोकांना माहिती नाही, तिथले कायमचे रहिवासी असलेल्या लोकांना याबद्दल काहीही माहिती नसलेला किल्ला असा किती मोठ्ठा असणार होता.

प्राचीन काळापासून नद्यांची पात्रं हे महत्त्वाचे व्यापारी मार्ग होते. जयगडजवळ जी अर्जुना नदी समुद्राला मिळते तिथपासून आत ३० किलोमीटरवर राजापूरहे ठिकाण आहे. याचा अर्थ समुद्रातून नदीच्या मुखातून आत शिरून ३० किलोमीटर आत राजापूर ही किती महत्त्वाची वखार होती. आणि राजापूरपर्यंत येणारा व्यापारी मार्ग हा साठ-सत्तर वर्षांपूर्वीपर्यंत सुरू होता. राजापूरला शिकायला असलेले माझे आजोबा राजापूरहून बोटीतून समुद्रापर्यंत गेल्याच्या गोष्टी अजूनही सांगतात.

जसा व्यापारी मार्ग राजापूर पासून अर्जुना नदीतून चालत होता, त्याच प्रकारचा व्यापार मुचकुंदी नदीतूनही चालत होता. त्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी साटवलीला ती गडी बांधण्यात आली होती. आणि तेहळणी पुरताच या किल्ल्याचा उपयोग होता. लाल जांभा दगडामध्ये बांधलेल्या या गडीची रचना मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. गडीचा आकार १०५ गुंठ्याचा असून पूर्ण किल्ल्याला खंदक खोदलेला आहे. कोकणात पडणाऱ्या तुफान पावसामुळे आणि आणि एकूण लोकांचं दुर्लक्ष झाल्यामुळे गडीच्या तीन बाजूचा खंदक बुजून गेला आहे. रस्त्यावरून दिसणारा बुरुज मात्र बुलंद आहे. मुळात ती गडी बांधली गेली होती व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी त्यामुळे खूप महत्त्वाची अशी बांधकामं आत नाहीत. नाही म्हणायला आत एका वाड्याचे जोते दिसतात. एक आयताकृती विहीरही बांधलेली आहे. पण तीही बाजूच्या खंदकाप्रमाणे बुजून गेलेली आहे. गावात बोली परंपरा असं सांगते की शिवाजी राजांनी पूर्णगडाचे बांधकाम केल्यानंतर या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले असावे, पण याला संदर्भ काही नाही. त्याचप्रमाणे मोघल सरदार फाजलखान याच्याबरोबर साटखान नावाचा सरदार होता त्याच्या वास्तव्याच्या काळात 'साटवली'चा किल्ला बांधला गेला असावा असाही एक तर्क आहे. पण पुन्हा एकदा पुरावा काही नाही.  १७१३ साली सातारचे शाहू छत्रपती आणि ताराराणीच्या बाजूने लढत असलेले कान्होजी आंग्रे यांच्यात झालेल्या तहामध्ये कान्होजींनी जे १६ किल्ले सातारकर शाहू राजांना दिले त्यात साटवलीचाही किल्ला होता. किल्ल्याला ६ बुरुज आहेत.

दरवाज्याला लागून उभे असलेले दोन बुरुज मागे टाकून आपण किल्ल्यात प्रवेश केल्यावर एक प्रचंड वृक्ष आपली नजर वेधून घेतो.

मला राहून राहून आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की, साटवलीपर्यंत येईपर्यंत मुचकुंदी नदीचे पात्र खूप लहान होत गेलेलं आहे. पण लहान होत गेलेल्या नदीच्या पात्रातूनही व्यापार चालत होता. तो व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत असणार त्याच्याशिवाय त्याला संरक्षण द्यावं लागलं नसतं. आणि त्याच्या संरक्षणार्थ किल्ला बांधायची गरज वाटली नसती.


No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....