Monday, 27 April 2020

कातळशिल्प, पांडवकालीन विहीर आणि यशवंतगड





पन्हळे या आमच्या गावातून निघून मी राजापूरमार्गे पावसला जाणार होतो. या रस्त्यावरून याच्याआधी अनेकदा मी गेलेलो होतो त्यामुळे रस्ता परिचित होता. राजापूरहून धूतपापेश्वर येथील रम्य शिवमंदिर पाहून अडिवरे कशेळीच्या कनकादित्याचे दर्शन घेऊन पावस असा तो मार्ग आहे. पण मध्यंतरी कोकणात अनेक ठिकाणी कातळशिल्पं सापडली आहेत, अशा बातम्या मी वाचत होतो. त्याच्यावर अधिकचं संशोधन करण्यासाठीची टीम पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्येच तयार झाली होती. आणि खूप ठिकाणी अशी शिल्प सापडली असल्याचं आणि त्याच्या डॉक्युमेंटेशनचं काम सुरू असल्याचं माझ्या वाचनात होतं. या कातळशिल्पांमुळे कोकणचा इतिहास खूप मागे पर्यंत नेता येतो आहे. त्यावरचा प्रसिद्ध झालेला एक शोधनिबंध मी वाचला होता. आणि तसा या विषयच्या संपर्कात होतो. 

राजापूरला अर्जुना नदीवरचा पूल पार करून डोंगर चढून धूतपापेश्वर पाहून अजून डोंगर चढून पठारावर आलो. या रस्त्याने याच्याआधी चार-पाच वेळा तरी मी गेलेलो होतो त्यामुळे रस्ता माहिती होता. पण मधल्या काळात कातळशिल्प सापडली होती. तसा अचानक एक बोर्ड मला रस्त्याच्या कडेला दिसला. मी माझ्या तंद्रीत होतो. हातात avenger सारखी दणकट गाडी होती. मी एकटाच होतो त्यामुळे कानात हेडफोन्स टाकून दुपारची वेळ होती त्यामुळे कोणाचा तरी शुद्ध सारंग, मधमाद सारंग ऐकत चाललो होतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या त्या बोर्डकडे लक्ष गेलं पण त्यावर काय लिहिलं होतं ते मेंदूत रजिस्टर होईपर्यंत मी बराच पुढे गेलो. बराच पुढे गेल्यावर मला आठवलं की, मी बहुतेक 'कातळशिल्प' असं वाचलं. 


लगेच गाडी वळवली आणि त्या रस्त्यावरून आत शिरलो. हे सगळं संशोधन नुकतच सुरू झाल्यामुळे फार काही प्रसिद्ध झालेलं नाही. रस्त्यावर एक बोर्ड आहे तो सोडला तर आत कुठेही काहीही माहिती किंवा आडोसा वगैरे की, ज्यावरून कळेल की नेमकी शिल्प कुठे आहेत असं काही नाही. पण साधारण मूळ रस्त्यापासून दोन किलोमीटर आत हे शिल्प आहे. बरीच शोधाशोध केल्यावर मला ते शिल्प सापडलं. अजून या शिल्पांचा अर्थ लागायचा आहे. डेक्कन कॉलेजमधली टीम त्यावर काम करते आहेत. अशी शिल्प कोकणात आता खूप ठिकाणी सापडली आहेत. 




ती पाहून मी निघालो. मूळ रस्त्याला आलो. आता असं काही वेगळं शोधायची नजर तयार झाली होती. माझ्या एका मित्राने महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी बनवली आहे. इतकी सविस्तर आणि विस्तृत यादी महाराष्ट्र शासनाकडेही उपलब्ध नाही. त्यात यशवंतगड नावाचा किल्ला राजापूर तालुक्यात आहे असं मी वाचलं होतं. तो पहायच्या हेतूने मी निघालो. अडिवरे-कशेळी-पावस हा मूळ रस्ता सोडून 'नाटे' या गावासाठी डावीकडे वळावं लागतं. त्या फाट्यापासून 'नाटे' हे गाव आठ-दहा किलोमीटर आत आहे. 

तसा फाट्यावरून आत वळलो आणि तीन-चार किलोमीटरवर पुन्हा असाच एक बोर्ड दिसला त्यावर पांडवकालीन विहीर असं लिहिलं होतं. यावेळी  मेंदूवर ते रजिस्टर व्हायला वेळ लागला नाही. लगेच गाडी बाजूला लावून पिवळ्या पडलेल्या वाळलेल्या गावातावरून तिथपर्यंत गेलो. या विहिरीबद्दल मात्र कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. ज्या गोष्टीचा उगम गावातल्या लोकांना सांगता येत नाही त्या गोष्टी पांडवांनी केल्या असं सांगण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्यामुळे ही विहीर पांडवकालीन असेल असं ठामपणे सांगता येत नाही. पण तिच्या एकूण रचनेवरून मात्र ती प्राचीन वाटत होती हे निश्चित. विहिरीमध्ये उतरत जाण्यासाठी सलग कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या आहेत. तशा पंचवीस-तीस तरी पायऱ्या असाव्यात.  जानेवारीचा शेवट असून सुद्धा विहिरीत पाणी शिल्लक होतं .




'नाटे' गाव मागे टाकलं की गावाच्या पश्चिमेच्या टोकाला हा 'यशवंतगड' नावाचा भुईकोट किल्ला उभा आहे. हा किल्ला जेव्हा मी पहिला तेव्हा या किल्ल्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. तशी या किल्ल्याबद्दल कमीच माहिती उपलब्ध आहे. पण ती सगळी माहिती मी नंतर वाचली. 

  
किल्ला पाहताना मी एकटाच होतो. तेव्हा मोबाईलवर मी किल्ल्याचा व्हिडीओ तयार केला. तो या वरच्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. 


राजापुर ते यशवंतगड हे अंतर ३० कि.मी. असुन नाटे गावाच्या पश्चिमेस असलेल्या ह्या किल्ल्याला पश्चिम व दक्षिण या दोन बाजुंनी खाडीच्या पाण्याने वेढलेले आहे. किल्ल्यापासून ३ कि.मी. अंतरावर मुसाकाजी बंदर आहे. संपूर्ण तटबंदीला १५ फुट रुंद आणि १५ फुट खोल खंदक खोदलेला आहे. गावाच्या दिशेला जो किल्ल्यात शिरायचा दरवाजा आहे त्यातून आत शिरताना आपल्याला किल्ल्याच्या डाव्या बाजुने खंदकात उतरावे लागते. खंदकात उतरल्यावर डाव्या बाजूस दोन भक्कम बुरुजांमध्ये लपलेले बालेकिल्ल्याचे उध्वस्त प्रवेशद्वार असुन उजव्या बाजुस एक समाधी मंदिर दिसते. खंदकाच्या पुढील भागात शेंदुर फासलेले मारुती शिल्प असुन त्यापुढील झेंडा असलेल्या बुरुजाखालील भागात एक ५०-६० फुट खोल आयताकृती विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी कातळात खाचा कोरलेल्या असुन विहिरीच्या वरील बाजूस बुरुजातून बाहेर आलेले दोन दगडी खांब दिसतात.

संपूर्ण जांभा दगडामध्ये बांधलेली किल्ल्याची तटबंदी आणि बुरूज आजही सुस्थितीत आहेत. दरवाजाची कमान ढासळलेली असली तरी त्याच्या दोन्ही बाजूंस असलेल्या पहारेक-याच्या देवड्या मात्र शिल्लक आहेत.

किल्ल्याला खाडीच्या बाजूने किल्ल्यात शिरायला एक आणि गावाच्या बाजूने शिरायला असे दोन दरवाजे आहेत. परकोटातुन बालेकिल्ल्यात जाण्यासाठी एक दरवाजा व परकोटातुन खंदकात उतरण्यासाठी सध्या बंद असलेला दुसरा दरवाजा तसेच खाडीवरील तटबंदीतील लहान दरवाजा असे एकुण पाच दरवाजे पहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या बाजुने समुद्राकडे उतरत जाणाऱ्या परकोटाच्या तटबंदीतही लहान दरवाजा असण्याची शक्यता आहे पण किल्ल्यात मोठया प्रमाणात वाढलेल्या काटेरी झुडूपामुळे तेथवर प्रयत्न करूनही जाता येत नाही. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याचा पसारा सात एकर असुन बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ १ एकर तर परकोटाचे क्षेत्रफळ ६ एकर आहे. बालेकिल्ल्यात डाव्या बाजूस एका मोठया वास्तूचा चौथरा दिसून येतो. त्याच्यासमोर बालेकिल्ल्याच्या मध्यभागी एक उंच सुटा बुरूज असून पाय-यानी या बुरुजावर चढल्यावर एका वास्तुचा चौथरा दिसून येतो. असा बुरुज मी याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही किल्ल्यावर पाहिलेला नाही. या चौथऱ्यासमोर एक तुळशी वृंदावन आहे. किल्ल्यावरील ही सर्वात उंच जागा असुन येथून संपूर्ण किल्ला व आसपासचा परीसर नजरेस पडतो. किल्ल्यावर वाढलेल्या प्रचंड झाडीमुळे येथुन खाडीचे ओझरते दर्शन होते.

या बुरुजावरून खाली उतरून दरवाजाशेजारील पायऱ्यांनी वर चढुन बालेकिल्ल्याच्या संपुर्ण तटबंदीला फेरी मारता येते. बालेकिल्ल्यातील तटावर चढण्यासाठी एकुण पाच ठिकाणी पायऱ्या असुन मुख्य दरवाजावर चढुन मागील बाजुस परकोटातुन आत येणाऱ्या दरवाजाशेजारील पायऱ्यांनी खाली उतरता येते. मागील दरवाजाच्या या भागात दरवाजाशेजारी एक कोरडी अर्धवट बुजलेली विहीर असुन तटबंदीत दोन कोठारे दिसुन येतात. पडकोटाचा दरवाजा आजही सुस्थितीत असुन या वळणदार दरवाजासमोर रणमंडळाची रचना केलेली आहे. या दरवाजाच्या अलीकडे तटबंदीच्या कोपऱ्यावरील बुरुजाच्या आतील बाजूस गणेशमूर्ती व दोन कमळफुले कोरलेली आहेत.


संपुर्ण किल्ल्याच्या भक्कम तटबंदीस चहूबाजूंनी एकुण २१ बुरुज असुन यातील ९ बुरुज बालेकिल्ल्याच्या तटबंदीत व उर्वरित १२ बुरुज पडकोटाच्या तटबंदीत आहेत. मुख्य दरवाजाशेजारी २, परकोटाच्या दरवाजाशेजारी २, दोन कोपऱ्यावर २, तटबंदीत २ व बालेकिल्ल्याच्या मध्यभागी एक सुटा बुरुज अशी बालेकिल्ल्याच्या बुरुजांची रचना आहे. बालेकिल्ल्यातील परकोटाच्या दरवाजाने बाहेर आल्यावर उजव्या बाजुला परकोटाची दुरवर गेलेली तटबंदी दिसते. या तटबंदीच्या टोकाला व मध्यभागी एक बुरुज असुन तटबंदीवर जाण्यासाठी एके ठिकाणी पायऱ्या आहेत. तटबंदीच्या बाहेरील बाजूस खंदक असुन कोपऱ्यावरील बुरुजावर तोफांचा मारा करण्यासाठी खिडक्या दिसतात पण या बुरुजावर जाणारी वाट मात्र दिसुन येत नाही. या बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या नष्ट झाल्या असाव्यात किंवा त्यावर शिडीने जाण्याची सोय असावी. या बुरुजापासून तसेच पडकोटाच्या दरवाजापासून खाली खाडीकडे उतरत जाणारी तटबंदी दिसते पण या वाटेवर दाट काटेरी झाडी असल्याने बुरुजांच्या टोकापर्यंत जाता येत नाही.

(शेजारच्या नकाशात जो भाग लाल रंगाने दाखवला आहे तो मूळ किल्ला आहे. आणि जो भाग निळ्या रंगाने दाखवला आहे तो परकोट आहे.)

या बुरुजाशेजारी खाडीलगत असलेला मुख्य दरवाजा पुर्णपणे कोसळलेला असुन त्याचे केवळ अवशेष पहायला मिळतात. या भागात पुर्वी गलबते उभी करण्यासाठी धक्का असल्याचे अवशेष असुन आजही तेथे मासेमारीच्या स्थानिक बोटी दुरुस्तीसाठी उभ्या असतात. या तटबंदीच्या टोकाला एक लहानसा दरवाजा असुन बालेकिल्ल्यापासून खाली येणारी परकोटाची तटबंदी तेथे संपते. या तटबंदीच्या बाहेरील बाजुस कब्रस्तान आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. यशवंतगड पुर्णपणे फिरण्यासाठी सर्वप्रथम बालेकिल्ला व शेजारील परकोट पाहुन नंतर डोंगरउतारावरील खाडीच्या बाजुने असणारी तटबंदी पहावी. बालेकिल्ला ते परकोट असा संपुर्ण किल्ला पहाण्यासाठी तीन तास लागतात. 

यशवंतगड कोणी आणि कधी बांधला याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण जैतापूर, राजापूर व , मुसाकाजी या बंदरांच्या संरक्षणासाठी व व्यापारावरील देखरेखीसाठी १६व्या शतकात जैतापूर खाडीच्या किनाऱ्यावर विजापूरकरांनी यशवंतगड किल्ला उभारला असावा. राजापूर बंदर व आसपासचा मुलूख ताब्यात आल्यावर या बंदराच्या संरक्षणासाठी आणि जैतापूर खाडीतून राजापूरकडे जाणाऱ्या बोटींवर नजर ठेवण्यासाठी यशवंतगड जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी महादरवाजा ते खाडीपर्यंत पडकोट अशी तटबंदी बांधली.

अफझलखानाच्या प्रसंगाच्या दरम्यान विजापूरकरांची युद्धसाहित्यानी भरलेली तीन मोठ्ठी गलबतं राजापूरच्या बंदरात अफझलखानाच्या मदतीसाठी उभी होती. त्यावर छापा घालून ती ताब्यात घेण्यासाठी शिवाजी राजांनी एका सरदाराला पाठवलं होतं. त्या सगळ्या प्रसंगात यशवंतगडाचा काही उपयोग, मदत, आसरा म्हणून वगैरे झाला असल्याची शक्यता आहे, असे इतिहासकार सांगतात. विजापूरकर ज्या व्यापारी मार्गावर लक्ष आणि संरक्षण म्हणून ठेवण्यासाठी हा किल्ला वापरत होते त्याचसाठी हा भाग जिंकल्यानंतर शिवाजी राजांनी याचा वापर केला असणार.



राज्याभिषेकानंतर इ.स.१६७४ साली महाराजांनी जैतापूर किल्ल्याखालील बंदरात आरमार बांधण्याचे कार्य सुरू केले. १६९० साली हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. पुढे मराठय़ांच्या ताब्यातील हा किल्ला १८१८ मध्ये ब्रिटीश कर्नल इमलाक याने जिंकला. १८६२ मधील एका पाहणीत यशवंतगडावर २८ तोफा आढळल्या. १८ जानेवारी१८७१ रोजी जनरल औट्रमची बोट वादळात या किल्ल्याखाली खाडीत जैतापूर द्वीपगृहाच्या उत्तरेस सहा कि.मी. वर असलेल्या एका खडकावर आपटून फुटली होती. १९ व्या शतकात रघुनाथ पत्की यांना इंग्रज सरकारची सेवा केल्याबद्दल हा किल्ला बक्षीसादाखल देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....