Monday, 16 May 2016

पानशेत ते रायगड (चालत)

डायरीतली काही खास पानं
१९ एप्रिल २०१३

भव्य हिमालय तुमचा, आमचा केवळ सह्यकडा,
गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा!!


ही कविता बहुतेक वसंत बापटांची आहे. आणि वैयक्तिक मला हिमालयाचं आकर्षण मुळीच नाही. अनेक ट्रेकर्स ‘एव्हरेस्ट’ सर करणं हे आपलं स्वप्न मानतात, माझी मात्र उडी सह्याद्रीच्या पुढे पडणार नाही. ‘ट्रेकिंग’चे सर्वच अनुभव खूप समृद्ध करणारे असतात. असच दोन एप्रिल महिन्यातच आम्ही ४-५ जणं पानशेत-रायगड ट्रेकला गेलेलो. तो अनुभव मी माझ्यासाठी माझ्या डायरीत लिहिलेला.

१९ तारखेला दुपारी पावणेचारला आम्ही स्वारगेट एस.टी स्टॅंडवर जमलो. भारतीय प्रमाण वेळेनुसार चारची बस साडेचारला आली. स्वारगेट ते घोल. पानशेत धरणाचं बॅकवॉटर जिथे संपत तिथे अजून थोडं पुढे हे गाव आहे. साधारण पुण्यापासून ७०-७२ किमी तर आहेच. एसटीचा प्रवास असून सुद्धा तो खडकवासला धरणावरून जातो म्हणून चांगला वाटतो. पाण्याच आकर्षण माणसाला आहे. खडकवासल्याच धरण मी किती वेळा पाहिलं असेल पण ते दर वेळेला शेजारून जाताना बघावसं वाटत. महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे, तरी धरणात पाणी सरासरीपेक्षा जास्त दिसत होतं. रस्त्याच्या एका बाजूला धरण, एका बाजूला सिंहगड. तोही काही नवीन नाही, पण त्याचंही आकर्षण आहे. खडकवासला संपल की पुढे एकमेकांना लागून पानशेत आणि वरसगाव. आणि गम्मत बघा, की पानशेतच्या बाजूनी गेलं की घोल लागतं, वरसगावच्या बाजूनी गेलं तर लावासा! मला आवडणारं वैभव पानशेतपासून सुरु होतं. तिथे कोणाचही गलका नाही, गोंधळ नाही, गाड्यांचा आवाज नाही. उन्हाळा असल्यामुळे झाडं पिवळी पडलेलीच होती, पण आम्ही पोचण्याच्या काही वेळापूर्वीच पाऊस पडून गेला होता, त्यामुळे उन्हाचा कडाका जाणवत नव्हता. त्यामुळे मातीचा मस्त वास सुटलेला, हवेत गारवा, आणि फ्रेशनेस!! त्यामुळे थकायला होत नाही ना! ही सह्याद्रीची मजा आहे. त्यावेळी मला माझ्या फुफुसंच्या मर्यादांची कीव आली, की साला इतका सुंदर वास आपण मनापासून अनुभवू शकत नाही, ह्या शरीराच्या मर्यादांवर अवलंबून राहावं लागतं. पण त्याला पर्याय नाही. लाल माती सुरु झाली होती. आणि तापलेला ती जमीन जरा थंडावली होती. साधारण पंचवीस किलोमीटरचा रस्ता आहे, बॅकवॉटर पानशेतचं संपत आणि मग दोन डोंगरांच्या मधून केवळ एक झरा, त्याचंच पुढे धरण होत असेल. तो झार ज्या डोंगरातून येतो तो डोंगर पर करून पलीकडे आम्हाला उतरायचं होतं म्हणे. तो ‘घाट’!! तो काही वेगळाच होता. सिंगल रस्ता. आणि अति तीव्र चढण. आमच्या एसटीला तर दोन वेळा यु टर्न वर पुन्हा मागे यावं लागलं. मी पाहिलेला दुसरा सर्वात  अवघड घाट. माथ्यावर डोंगर फोडून खिंड केलेली, त्यातून तो छोटासा रस्ता, डोंगराच्या पलीकडे उतरतो. एसटीमध्ये आम्ही ५ जण, आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर इतकेच होतो. मी ड्रायव्हरला माथ्यावर दोन मिनिटं थांबायला सांगितलं. स्वदेस मध्ये बघा, एका गाण्यात आहे, ‘दूर वो जाने किसका गांव है’, आहे ना! तसंच आगदी. सर्व बाजूनी डोंगर आणि सर्व डोंगराचे पाय्थे जिथे एकत्र येतात तिथे हे वीस बावीस उंबऱ्यांच गाव. पुन्हा तीव्र उतार, आणि नागमोडी रस्ता पार करून आम्ही गावात उतरलो. १९ तारखेचे संध्याकाळचे साडेसात होऊन गेली होते.

रात्रीचं गाव काय बघणार, म्हणून एका शाळेच्या ओसरीवर आमच्या बॅगा टाकल्या, थोडे फ्रेश झालो, आणि बसलो गप्पा मारत. घोलचा घाट जिथे संपतो तिथेच गाव आहे. आम्ही ज्या एसटीतून आलो ती मुक्कामी गावातच, पुन्हा सकाळी लवकर ती पुण्याला जाणार. ती एसटी लावली होती त्याच्या मागे एक सोलर दिवा होता. आठ-साडेआठला  आम्ही त्या दिव्याखाली गप्पा मारत बसलो. आम्ही पाच जण पाच वेगवेगळ्या गावाचे, प्रत्येकाचे अनिभाव वेगळे, सर्व इंटरेस्टिंग. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे विषय हमखास निघत जातात तसे तास-दीडतासाच्या गप्पानंतर विषय आला भुतांच्या गोष्टींवर. प्रत्येक जण आपापले अनुभव सांगत होता. माझ्या डोक्यात उगाचच एक विचार आला, तो मी लगेच बोलून दाखवला, ‘जर ह्या एसटीच्या वर एखादा माणूस आपल्या गप्पा ऐकत असेल तर हो? त्यानी पांढरे कपडे घातलेले असावेत, आणि उत्सुकतेनी तो आपल्या भुतांच्या गप्पा ऐकत असेल तर?’ विचार होता माझ्याच डोक्यातला, पण माझ्यासकट सर्व शहारले. योगायोगानी विजा चमकू लागल्या आणि आभाळही आलं! मग आमच्या चेहे-यावरचे भाव बदलले, आम्ही कोणीही वर न बघता, शाळेच्या ओसरीवर धावलो. पाऊस काही आलाच नाही, नुसता गडगडत राहिला. अंथरुणावर पडल्यावर सुद्धा माझी हौस फिटत नव्हती. मी बिबट्याचा विषय काढला, म्हणलो, ‘बिबट्या खूप चपळ असतो, अंधारात आपल्या एकदोन फुटावरून सुद्धा जाईल, आणि आपल्या लक्षात येणार नाही. आपण झोपलो असताना शेजारून शिकार करून घेऊन जाईल तरी कोणच्या लक्षात येणार नाही.’ मी सर्वात लहान होतो, त्याचा फायदा घेऊन मी मध्ये झोपून गेलो, कडेचे दोघेजण रात्रभर बिबट्याच्या आणि एसटीवरच्या माणसाच्या भीतीने टक्क जागे.
फारशी दमणूक झाली नव्हती त्यामुळे झोप सुद्धा पावसासारखी सतत हुलकावणी देत होती. एकदा ह्या कुशीवर, एकदा त्या कुशीवर. पाहते कधीतरी उठून ‘चांदण्यात फिरताना’चा अनुभव घ्याव म्हणून त्या ओसरीवच्या पत्र्यातून बाहेर आलो, आकाश निरभ्र होतं गार मऊ मातीत पाय टेकवल्याबरोबर पायाला गुदगुल्या झाल्या. ते शांत-शीतल चांदणं, गार वारा! सुख सुख म्हणजे वेगळं काय असत हो? एका वेगळ्याच धुंदीत मी ओसरीवरून बाहेर आलो होतो, समोर एसटी दिसली आणि रात्रीच्या गप्पा आठवल्या, गप्पांचे विषय आणि तो एसटीवरच्या माणूस! माझा शांत-शीतल चांदण्याचा फील पार उतरला. ते शांत वाटणारं चांदणं गूढ आणि गहीर वाटायला लागलं, उगाच! पळत जाऊन पांघरुणात शिरलो, आणि अथर्वशीर्ष सुरु केलं! त्यातच झोप लागली.

सकाळी साडेपाचलाच कोंबडा आरवला. झोप अजून पूर्ण झाली नव्हती, पण आज भरपूर चालायचं होतं. त्यामुळे उठून बसलो. नेहमीच्या सवयीप्रमाणे हात जोडले आणि ‘कराग्रे वसते लक्ष्मी...’ आज दिवसभर दऱ्याखोऱ्यातून चालायचं होतं, तिची आधीच माफी मागितलेली बरी! अजून बाकीचे सर्व उठले नव्हते. मी पुन्हा बाहेर आलो, सूर्य अजून उगवला नव्हता, आज त्याच्या आधी मी उठलो. आज तो आळशी, मी हुशार! मला कोकणाच खूप आकर्षण आहे. ते श्री.ना. पेंडसे, गो.नी. दांडेकर, यांनी रंगवल्यामुळे. तुंबाडचे खोत, किंवा शितू आणि पडघवली आधी वाचून झाल्यामुळे आता शाश्वत कोकणाच आकर्षण. आमच्यापैकी दोघं जण त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा कोकणात उतरणार होते. त्यामुळे उत्साह भरपूर होता. आम्ही सकाळी सूर्य उगवाच्या आधीच चालायला सुरवात केली. दोन पावलं गेलो असू, पायवाटेच्या कडेनी करवंदाची जाळी. मग पुढे जाणं शक्यच नाही. जाळीत शिरलो. खूप करवंद खाल्ली. खूप खाल्ली.! माणसाच्या हातानी तयार झालेल्या साखरेला ही गोडी येणार नाही. माणसाचे हात जिथेपर्यंत पोचतात तिथून निसर्गाचे सुरु होत असावेत. (त्या करवंदाची चव अजून जिभेवर आहे) पानागणिक ग=करवंद होती. हिरव्या पानाच्या पार्श्वभूमीवर ते काळे मणी फारच सुदंर दिसत होते. ते तोंडानी खूप गोड होते असं सांगून त्याची मजा नाही, ते प्रत्यक्ष जाऊन खाल्लेच पाहिजेत.
करवंदाचा नाश्ता झाला, आम्ही पुढे चालायला सुरवात केली. तास-दीडतास चालल्यानंतर एक वस्ती लागली. सूर्य अजून उगवला नव्हता, त्याचा आळशीपणा, दुसरं काय! त्या वस्तीवर पोचल्यावर आम्हा ५-६ जणांवर अचानक आठ-नऊ कुत्री वेगवेगळ्या दिशांनी अंगावर आली. बाकीचे पटकन पुढे गेले, आणि मी आपला फोटो काढत मागे थांबलो होतो. मी जाम घाबरलो. बाकीचे पुढे जाऊन माझ्याकडे बघून हासत होते. मग मी पण मोठ्या धैर्यानी तो हल्ला परतवून लावला (असं आपलं सांगायला, घाबरलो तर खूप होतो, पण धैर्याचा देखावा मला यशस्वीरित्या उभारता आलं) गावातल्या विहिरीवर जरा तोंडावर पाणी मारलं. फ्रेश झालो. आणि पुढे चालू लागलो. ते ४-५ घराची वस्ती पार करून पुढे निघालो. चालताना बोलायला खूप विषय असतात. ब्रह्मसुत्रा पासून कामसूत्रापर्यंत. त्यामुळे चालत जरी भरपूर असलो तरी थकायला होत नव्हतं. त्यात आदल्या रात्री पाऊस पडून गेलेला त्यामुळे हवेत गारवा होता. सूर्य उगवला होता, पण आमच्यावर डोंगराची सावली होती. त्यामुळे रस्ता वेगानी पार होत होता. आमच्या पाच जणांमध्ये मी एकता होतो, ज्यानी हा ट्रेक आधी एकदा केला होता. त्यामुळे मला रस्ता माहिती होता. संपूर्ण रस्ता डोंगराततूनच आहे, पण एक ठिकाणी आपण थोडे खाली उतरत जातो, आणि पुन्हा चढण. ती चढून वर येतो तो घाटावरचा शेवटचा डोंगर. तो उतरला की खाली कोंकण. जिथून उतार सुरु होतो तिथे एक छोटीची खिंडच आहे. आम्ही तिथे बराच वेळ बसून होतो. एक टप्पा संपतो ना तिथे. मग जरा, शेंगा खाल्ल्या, पाणी प्यालो, बरोबर घेतलेली करवंद खाल्ली. फोटो काढले. रस्ता पूर्ण जंगलातूनच आहे, त्यामुळे बसलो होतो तिथे सावलीच होती. त्यामुळे गारवा! (सावली मध्ये उन्हापेक्षा ५ अंशांनी तापमान कमी असत म्हणे). तिथून पुढे केवळ उतार. आता कोणतीही चढण नाही. तो उतार सुद्धा साधासुधा नाही, तीव्र!

घोल-रायगड या रस्त्यावर घोलपासून कोंकणात उतरलं की पाहिलं गाव आहे, संदोशी. हे अंतर जवळ जवळ १५-१८ किलोमीटर आहे. घोल ते संदोशी अंतर आहे १५-१८ किलोमीटर. त्यापैकी बारापेक्षा जास्त अंतर केवळ उतार आहे. आणि हे चालत जायची ‘अवदसा’ आम्हाला सुचलेली. (घोलमध्ये सकाळी उतल्यावर एक माणूस आमच्याशी बोलायला आला. कुठून आलात, काय शिकता, गाव कोणतं वगेरे. त्यांनी नंतर विचारलं आता कुठे जाणार, आम्ही सागितलं रायगडला. त्यांनी आम्हाला वेड्यात काढलं अहो, म्हंटला अहो महाड वरून जायचं की. थेट किल्ल्यापर्यंत गाडी जाते. तिथून वर रोप वेनी जायचं. हे चालत जायची ‘अवदसा’ कशी सुचली?) पण सुचली. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची हौस असते ना! उतार असल्यामुळे चालताना सर्व भर गुढग्यांवर पडत होता. उतार खरच तीव्र होता. रस्ता होता खूपच सुंदर. रस्ता कुठला, पाण्याची वाट. पाउस पडला की पाणी तिथून काही जाणार, ती जागा. तिथून आम्ही चालत होतो. त्या वाटेवर डाव्याहाताला ‘कोकणदिवा’ नावाचा किल्ला आहे. त्याचे उभे कातळ आधाराला घेऊनच रस्ता उतरत जातो. पण त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून आम्ही वाचत होतो. तो प्रचंड कातळ एकावेळेला डोळ्यात सुद्धा मावत नव्हता. त्याची लांबी, रुंदी, उंची.. त्यासाठी ‘पॅनरोम’च हवा. त्याच्या सावलीमध्ये आम्ही पण संदोशीपर्यंत पोचलो. वसंतामुळे पानगळ झाली होती, त्यामुळे उघड्या बोडक्या झाडांखाली बसूनच आम्ही जेवलो. एका हातात भाकरी, त्याच्यावर तिखट, खांदा आणि पिठलं. भरपूर जेवलो आणि पुन्हा चालायला सुरवात केली.

अकरा-साडेअकराच्या सुमारास आम्ही संदोशीच्या सीमेवर पोचलो. त्या एका ठिकाणावरून सगळ संदोशी एका नजरेच्या आवाक्यात दिसत होतं. थोड्या कैऱ्यापडल्या, त्या खाल्ल्या, पुढे निघालो. संदोशीत पोचलो. जिल्हा परिषदेच्या शाळेत पाण्याची टाकी होती, तिथे फ्रेश झालो. तोंडावर गार पाण्याचा शिडकावा आणि त्यानंतर लगेच एक वाऱ्याची झुळूक आली. त्यानी आम्ही सुखावलो. ट्रेकिंगचा हा एक फायदा असतो. आपण लहान लहान गोष्टींमध्ये आनंद मानायला शिकतो. मजबूत घाम आलेला असताना सुद्धा केवळ एक झुळूक किती गोड असते, हे अनुभवण्यासाठी मजबूत घाम यायला हवा. आता कोकणदिव्याचा आधार नव्हता. झाडाच्याच सावलीत थांबलो थोडं वेळ, पुढे निघलो.सूर्य त्याचं निर्धारित काम खूप तन्मयतेनी करत होता. त्यामुळे तो फ्रेशनेस फार काळ टिकला नाही. पुन्हा घामाच्या धारा सुरू झाल्या. ‘संदोशी’ हे गाव फारच सुंदर आहे. मध्ये पाच फुटी रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला टुमदार घरं. कोकणी पद्धतीची. सुट्ट्या सुरु असल्यानी गावात लहन लहान मुलं भरपूर होती. मग त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचे फोटो काढले. ते पुन्हा त्यांना दाखवले. मग ते गोड हसले, त्याचेही आम्ही फोटो काढले. संदोशीपासून रायगडपर्यंत थेट गाडी नाही. त्यासाठी छत्री निजामपूरपर्यंत जावं लागेल. मग पुन्हा पुढे निघालो. चालत चालत. छत्री निजामपूर हे गाव सावित्री नदीच्या अलीकडच्या काठावर. नदीत पाण्याचा टिपूस नव्हता. प्रचंड तापलेल्या गोल दगडांवरून आम्ही सावित्री नदी पर केली. निजामपूरमध्ये पोचलो. अडीच वाजताची बस ३ वाजता आली. तोपर्यंत आम्ही गावात बसून होतो. उन प्रचंड होतं. पण काही पर्याय नव्हता. ३ वाजता एसटी आली. अवघड आणि कच्चा रस्ता पार करून एसटी रायगडाच्या पायथ्याला पोचली. ... (क्रमशः)               

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....