Wednesday, 25 May 2016

घोल (पानशेत) ते कोकणदिवा ... पुन्हा चालतच..



पानशेत धरणाचं बॅंकवॉटर जिथे संपतं तिथून साधारण तीन-चार किलोमीटर वर एक अतिशय अवघड घाट आहे. पानशेतनी खरच तळ गाठला होता. कोरडं जलाशयाच पात्र खरच आघात करणारं आहे. पण या प्रचंड जलाशयाचा ज्या झऱ्यातून उगम होतो, त्या झऱ्यावर एक छोटासा पूल आहे. तो पार करून पुढे गेल्यावर घाट सुरु होतो. सततच्या उल्लेखांमुळे वरंध किंवा ताम्हिणी हे खूप अवघड घाट वाटतात. आणि आहेतही. पण सह्याद्रीमधले हे दुर्लक्षित घाट सुद्धा खूप अवघड आहेत. तीव्र चढ, आणि खिंडीतून कोरून काढलेला रस्ता. हे दिव्य पार करून पुढे आलो की अक्षरशः आपल्यासमोर नवीन विश्व प्रकट होतं. ते पाहिल्यावर कोणाला सांगून खरं वाटणात नाही की सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. आठही दिशांना उंच डोंगर, त्याच्या पायथ्याशी हे टुमदार छोटंसं गाव ‘घोल’. या रस्त्यावरचं घाटावरच शेवटचं गाव. तिथून पुढे सुरु होतो कोकण. म्हणूनच बहुतेक ह्या वाटेचं रक्षण करणारा हा ‘कोकणदिवा’ असावा. पण घोलच्या आसपास ३-४ घरांच्या अनेक वस्त्या विखुरलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे ‘गीर्जाई’ त्या गीर्जाईपर्यंत कच्चा रस्ता आहे. पण कच्च्या रस्त्याची सुद्धा आपल्या डोक्यात एक कल्पना असते. त्या सगळ्या कल्पना त्या भीषण कच्च्या रस्त्यावर चिंध्याचिंध्या होऊन पडतात. हा ‘कच्चा’ रस्ता गाडीने पार करणे म्हणजे खरच अग्नीदिव्य आहे. पण आमच्याकडे दोन तरबेज ड्रायव्हर होते. त्यांनी तो रस्ता सोपा करून दाखवला. घोल ते गीर्जाई दोन किलोमीटरचे अंतर पार करायला आम्हाला वीस मिनिटे लागली. तोपर्यंत संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले होते. एका कौलारू घरांसमोर आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आणि चालायला सुरवात केली. संध्याकाळची ताडीमारून आलेल्या एका इसमानी आम्हाला खास शैलीत रस्ता सांगितला. त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा याचा विचार करतच आम्ही पायवाट तुडवायला सुरवात केली. पण त्याच्यावर विश्वास ठेवण्यावाचून पर्याय कुठे होता. आम्ही चौघंही जण पहिल्यांदा कोणकदिव्याला जात होतो. रस्ता माहिती नाही, सूर्य मावळायला आलेला, जंगल भरपूर. मानवीवस्ती पासून दूर असल्यानी बिबट्यावगैरे ची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.. आज काही तरी रोमांचकारी अनुभवायला मिळणार एवढ नक्की.

त्या ‘ताडी’वाल्यावर विश्वास ठेवून त्याने सांगितलेल्या रस्त्यानीच आम्ही गेलो. तुफान जंगलातून वाट काढत पायवाट पुढे जात होती. बहुतेक झाडांची जुनी पानं गळून नवीन आलेली. पण जुनी पडलेली अजून पुरती कुजली नव्हती. त्यामुळे जास्त मळलेली वाट शोधणे अवघड होत होतं. पण असं ट्रेकिंग नेहमी करणाऱ्यांना एक वेगळा आत्मविश्वास असतो बहुतेक. प्रकाश हळू हळू कमी होत होता, म्हणून समोर जी जास्त मळलेली वाट दिसत असेल त्या वाटेनी आम्ही पुढे चालत राहिलो. मग एक खिंड लागते. तशीच एक खिंड पुढे अजून एक आहे. त्यातून गेलं की रायगडला जाता येतं. या दोन्ही खिंडी एकमेकींना समांतर आहेत. अलीकडच्या खिंडीतून गेलं की कोकणदिवा. थोडंस चढत मग ती खिंड लागते. सतत मला कुसुमाग्रजांची कविता आठवत होती.

घोरपडीला दोर लावूनी पहाड दुर्घट चढलेले,
तुटून पडता मस्तक खाली, धुंद धडाने लढलेले
खंदकातल्या अंगारावर हसत खेळत पडलेले ...

झाडी खूप दाट आहे, की आपण बरोबर रस्त्यावर आहोत की चुकलोय हे सुद्धा कळायला काही मार्ग नाही. पण विश्वास ठेवायचा स्वतः वर आम्ही तेच केलं. मळलेली पायवाट दिसत होती, ती सोडली नाही. लगेचच पुढे जंगलाचा भाग संपतो आणि मोकळं पठार समोर येतं. तिथून तो कोकणदिवाही दिसतो आणि आपण बरोबर होतो हे सुद्धा कळतं. पुढची पायवाट स्पष्ट दिसतेच. पुन्हा जंगलाचा भाग सुरु होतो. पावसाळ्यात जिथून तुफान धबधबा कोसळत असणार अशा एका पाण्याच्या वाटेवरून पुढे जावं लागतं. तिथे डाव्या हाताला एक दगडी मंदिर उभं आहे, गम्मत म्हणजे मंदिरात आत कोणतीच मूर्ती नाही. तीन-चार घंटा आहेत आणि त्रिशूळ इतकंच. पण ते मंदिर हे खूण म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. ते मंदिर मागे टाकून पुढे आलं की पुन्हा जंगलाचा भाग संपतो आणि पुन्हा एकदा मोकळं पठार समोर येतं. तिथलं वर्णन शब्दांत करता येणार नाही. सूर्य बुडून गेलेला. पण अजून पूर्ण अंधार पडलेला नाही. पश्चिमेकडून काळे ढग पूर्वेकडे जात आहेत. शांत वारा. भरपूर चालून आल्यामुळे सर्वांग घामाने भिजलं होतं, त्याला वारा लागला की शांत वाटत होतं. आम्ही भरपूर वेळ तिथे शांत बसलो. पठारजिथे संपतं तिथे साधारण पाचशे साडेपाचशे फुट खोल दरी आहे. त्या दरीतून खेळून वारा वर येत होता. त्याचं दरीतून जाणारी पाण्याची वाट रायगडापर्यंत जाते. आम्ही दरीच्या वरच्या पठारावर होतो. अंधार पडायला सुरवात झालेली. तरी अजून किल्ला चढलोच नव्हतो. अजून बरंच चढायचं होतं. तिथे थांबण्याचा मोह आवरला. पुन्हा जंगलात शिरलो. ही जिद्द कोणी दिली?

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची
पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची...

आतापर्यंतचा सर्व रस्ता सरळ होता. फार उतार किंवा फार चढ नाही. आता जो सुरु झाला तो तीव्र चढ सुरु झाला. पूर्ण अंधार पडलेला. खर तर अंधारामुळेच कसा आणि किती चढ होता हे रात्री चढताना लक्षात आलं नाही. पण लक्षात जरी आलं नाही तरी तो चढ अंगावर येत होता. खूप दमायला झालं. पण थांबणं शक्य नव्हतं. ब्रेक घेत घेत आम्ही चालत राहिलो. मध्ये मध्ये काही रॉकपॅच सुद्धा होते. ते सुद्धा माही लीलया चढलो. बाजूला वाळलेल्या झुडपांतून  वात काढत काढत पायवाट थेट वरपर्यंत जाते. वरपर्यंत म्हणजे किल्ल्यावर मानवनिर्मित तीन गोष्टी आहेत, तिथपर्यंत. एक गुहा आणि दोन पाण्याची टाकी. दोन टाक्यांपैकी एकात स्वयंभू पाणी साठा तर दुसरी टाकी रेनवॉटर हार्वेस्टींग साठी. गुहा सुद्धा जेमतेम पाच फुट बाय दहा फुट असेल. तीव्र चढण चढून त्या गुहेपर्यंत पोहोचायला आम्हाला आठ-सव्वाआठ झाले. मग थोडा श्वास घेतला, घरी फोन करून सुखरूप असल्याच सांगितलं. गुहेत उंदीर फिरत होते, म्हणजे सापाची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आणि पहाटे थंडी वाजली तर उब मिळावी म्हून काही तरी सोय करणे गरजेच होता म्हणून थोडे शांत झाल्यावर आम्ही सरपण आणायला गेलो. सगळ वाळलेलंच होतं, सहज मोडत होतं. चारजणांनी मिळून भरपूर सरपण गोळा करून गुहेत आणून टाकलं. पूर्वी कोणी तरी तेलाची एक बाटली गुहेत ठेवली होती, काही वाती होत्या. काडेपेटी आम्ही बरोबर नेलेली. त्यामुळे शेकोटी करणं फार अवघड गेलं नाही. सहज पेटलं. मग आम्ही गुहेच्या बाहेर अंथरूण टाकलं आणि जेवायला बसलो. घरून भाकरी, बटाट्याची भाजी, सोलापूरची प्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी असा मस्त बेत होता. पोट भरून जेवण झाल्यावर कुशलनी सॅक मधून कलिंगड काढलं. मग मस्त कलिंगड खाल्ल. तोपर्यंत काळ्या ढगांनी भरून गेलेलं आभाळ थोडं मोकळं झालं आणि सुंदर चंद्र बाहेर आला. चंद्राचा शांत, सुंदर निळा प्रकाश सर्व सह्याद्रीवर पसरला. रात्रभर चंद्राचा सुंदर शांत, प्रकाश कायम होता. गुहेच्या बाहेर गार वार आणि गुहेत शेकोटीमुळे उबदार हवा तयार झाली होती. मग आम्ही गुहेच्या तोंडापाशी अंथरूणं घातली. निनाद बेडेकर यांची एक आवडती कविता होती. कविता कुसुमाग्रजांची आहे. कवितेचं नावं आहे ‘निर्धार’ झोपण्यापूर्वी निनादरावांच्या आवाजात ती कविता आम्ही ऐकली (या ओळी त्याच कवितेमधल्या आहेत). गप्पा मारत बसलो. ते गप्पांचे विषय चारचौघात सांगायचे नसतात. दमलो तर खूप होतो त्यामुळे डोळ्यात झोप मावत नव्हती. बरोबर आणलेला टॉवेल डोक्याखाली घेतला आणि डोळे बंद केले... इतकी शांत झोप पुण्यात कधीच लागत नाही. त्यासाठी इतकं दमाव लागतं, सुंदर निसर्ग बघावा लागतो, गार वाऱ्याच्या समोर उभं राहून सर्व थकवा गळून जावा लागतो, तेव्हा अशी शांत झोप लागते. झोपेत मला तर स्वप्नही पडलं.

किल्ल्यावरून सूर्यास्त बघायचा राहून गेला होता, त्यामुळे आता सूर्योदय मिस करून चालणार नव्हते. साडेपाचलाच आम्हाला जाग आली. रात्रभर झोप चागली झाली होती त्यामुळे शरीरात त्राण नव्हते कुठले. त्यामुळे फारसे आढेवेढे न घेता उठलो लगेच. बाहेर काहीच दिसत नव्हतं. धुकं फक्त.. जस काय आम्ही स्वर्गात उभे होतो. आमच्या खाली सर्व मर्त्य भूमी. मग गुहेच्या वरही अजून किल्ला बघायचा शिल्लक होता. रॉकपॅच पार करत आम्ही वर पोचलो. दोन भगवे झेंडे दिमाखात फडकत होते. या भगव्यासाठी कित्येक मर्दानी प्राण अर्पण केलेले आहेत. पुन्हा कुसुमाग्रज!!

जंगल जाळापरी मराठा पर्वतश्रेष्ठा, उठला रे,
वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे
तळातळावर ठेचून मारू हा गनिमांचा घाला रे
स्वतंत्रतेचे निशाण अमुचे अजिंक्य राखू धरेवरी
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी!

वरून रायगड दिसत होता. पण तोही सारखा ढगांमध्ये लपत होता. पलीकडे लिंगाणा, राजगड, तोरणा तर काहीच दिसत नव्हते. खर म्हणजे ते कोकणदिव्यावरून दिसतात. पण आता धुकं होता प्रचंड. त्याच्यामागून सुर्यनारायण वर येत होते. हा सूर्योदय खूपच रम्य होता. धुकं कमी होईल अशी अशा ठेवून आम्ही काही वेळ तिथेच थांबलो. पण तशी काही चिन्ह दिसत नव्हती. मग आम्ही पुन्हा उतरायला सुरवात केली. गुहेपाशी आलो तर पलीकडच्या डोंगरावर सूर्यकिरण पडले होते. फोटोग्राफीसाठी एकदम परफेक्ट माहोल होता. मग आम्ही भरपूर फोटो काढले. सेल्फी काढले. उतरायला सुरवात केली. रात्री चढलो त्यापेक्षा उतरणं जास्त अवघड जात होतं. कडक उन्हामुळे जमिनीत ओलावा शिल्लक नव्हता, त्यामुळे मोकळ्या मातीवरून पाय सहज सटकत होते. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आणि हळू आम्ही उतरलो. पुन्हा एकदा त्या पठारावर आलो. थोडासा नाश्ता केला. परत निघालो. रात्री अंधाराच्या भीतीनी आम्ही वाटेत करवंद समोर दिसत असून खाल्ली नव्हती. पण आता कसली भीती. जंगलातून जाताना दिसतील ती आणि जमलीत तितकी करवंद काढून आम्ही खाल्ली.


‘गीर्जाई’मध्ये पुन्हा आलो, हापश्यावर हातपाय तोंड धुतलं. फ्रेश झालो. कालचा ‘कच्चा’ रस्ता अजून होता. पण ‘दिवा’ सर करून आल्यानंतर रस्ता कीस झाड की पत्ती?  


ट्रेक दरम्यान काढलेले फोटो आणि शूट केलेले व्हिडीओ एकत्र करून एक क्लिप बनवली आहे.

https://www.youtube.com/watch?v=9P69tz-W5pM

ह्या लिक वर ती बघा. 



    

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....