Monday, 18 July 2016

‘दबीक’मध्ये इस्लामिक स्टेट (भाग – २)

सारांश पहिल्या अंकाचा

प्रस्तावना -

‘दबीक’ म्हणजे  नेमकं काय आहे ते गेल्या लेखात आपण पाहिलं. त्याचं एकूण स्वरूप कसं आहे, कोण श्रोता समोर ठेऊन मासिकांची निर्मिती ते करत आहेत, हे पाहिलं. ‘दबिक़’चा इतिहास, आताची थोडक्यात परिस्थिती असं सर्व आपण मागच्या लेखात पाहिलं. सर्व अंक समजावून घेण्यासाठी लागणारी सर्व पार्श्वभूमी आपल्याला आता माहिती आहे, तेव्हा आता मूळ अंकांच्या अभ्यासाकडे वळता येईल. (या मालिकेतील पहिल्या लेखाची लिंक इथे देतो आहे - http://mukulranbhor.blogspot.in/2016/07/blog-post.html) पहिला अंक एकूण पन्नास पानांचा आहे. अभ्यास करताना सुरवातीला माझी कल्पना होती, की प्रत्यक्ष अंकांचे मराठी भाषांतर करावे. पण त्याचा आवाका लक्षात आल्यावर मी ठरवलं की ज्यांना अधिक जिज्ञासा असेल ते मूळ वाचतीलच. आपण अंकांचा सारांश सांगावा. पहिले दोन अंक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की केवळ सर्व अंकांचा सारांश सुद्धा सांगणे एका लेखात शक्य नाही. म्हणून आता ह्या लेखात पहिलाच अंक विचारात घेतला आहे. पुढच्या काही लेखात पुढचे अंक काय म्हणतात ते विचारात घेतलं जाईल. प्रत्यक्ष अंकांचे स्वरूप कसे आहे, याचा अंदाज यावं म्हणून हा खटाटोप सुरु आहे.

विस्तार –

गेल्या लेखाच्या शेवटी पहिल्या अंकाचा थोडक्यात परिचय केलेलाच आहे. तो लेखाच्या सलगतेसाठी पुन्हा सांगणे आवश्यक आहे. या पहिल्या अंकाची कव्हर स्टोरी आहे ‘The Return of the Khalifah’. जगाच्या नकाशावर इराक, सिरीया, सौदी अरीबिया या देशांवर ‘The Return of the Khalifah’ अशी अक्षरे लिहिलेलं एक ग्राफिक हे ह्या अंकांचे मुखपृष्ठ आहे. अंकाचा मुख्य हेतू ‘आता जगात मुसलमानांसाठी धार्मिक आणि राजकीय नेतृत्व निर्माण झालं आहे’ हे सांगणे हाच आहे. आता जगात कोणत्याही मुसलमानाने खाली मान घालून जगण्याची गरज नाही, कारण त्यांना हक्क आणि सन्मान पुन्हा मिळवून देण्यासाठी ‘खिलाफत’ स्थापन झाली आहे.

अंकांत अगदी सुरवातीला मासिकाचे नावं ‘दबीक’ हेच का निवडण्यात आले आहे, ते सांगण्यात आले आहे. ते सांगण्यासाठी ‘सहिह मुस्लीम’ यांनी संकलित केलेल्या एका ‘हादीस’चं संदर्भ देण्यात आलेला आहे. ‘दबीक’चा अर्थ आपण मागच्या लेखात पहिला. तो पुन्हा सांगण्याची गरज नाही. या अंकांत खिलाफतीची स्थापना झाली आहे, औपचरिकपणे जाहीर करण्यात आलं आहे. हिजरी १४३५ च्या रमजानच्या पहिल्या दिवशी अल्लाहच्या कृपेनी खिलाफतीची स्थापना करण्यात आली आहे, असं इस्लामिक स्टेटच्या प्रवाक्त्यानी जाहीर केलं. ते जाहीर केल्यानंतर राज्याच्या रस्त्यारस्त्यावर आनंद साजरा करण्यात आला, असही लिहिलेलं आहे.

खिलाफतीच्या स्थापनेदिवशी नवीन खलिफा ‘अमीरुल-मू-मूमीन अबू बक्र अल-हुसैनी अल कुरैशी अल-बगदादी’ याचे भाषण झाले. हा खलिफा आतापर्यंत एकदाच जगासमोर आलेला आहे. ते त्याचे अरबीमध्ये केलेलं पूर्ण भाषण अनेक दिवस YouTube वर उपलब्ध होतं, आता बहुतेक पूर्ण भाषण काढून टाकण्यात आलं आहे, आता छोटे छोटे तुकडे त्या भाषणाचे शिल्लक आहेत. त्या खलिफाच्या भाषणाचे काही संपादित अंश देण्यात आले आहेत. ते सांगणे आवश्यक आहे. (फक्त मुद्दे सांगतो आहे)

  • अल्लाहच्या कृपेनी – आता तुम्हाला (मुसलमानांना) तुमचे राज्य आणि खलिफा लाभलेला आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचा सन्मान, हक्क आणि नेतृत्व पुन्हा प्राप्त होईल.
  •  हे असं राज्य असेल की जिथे अरब-गैर अरब, काळे–गोरे, पाश्चिमात्य-पौर्वात्य सर्व एकमेकांचे बंधू असतील.
  • कॉकेशियन, इंडियन, चायनीज, सिरीया, इराक, येमेन, इजिप्त, उत्तर आफ्रिका, अमेरिका, जर्मन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इ. देशांतील लोक एकत्र येऊन ही खिलाफत स्थापन झाली आहे.
  • अल्लाहच्या कामासाठी वेगवेगळ्या देशातील लोकांची मनं एकत्वाच्या भावनेनी भरून गेली आहेत. अल्लाहच्या कार्यासाठी एकमेकांच्या संरक्षांसाठी आणि एकमेकांसाठी ते भावाच्या नात्यानी एकत्र आले आहेत.
  • एका झेंड्याखाली, एका धेय्यासाठी, एका तंबूत आलेले एकत्वाचा आशीर्वाद अनुभवत आहेत.
  • मुसलमांनांच्या हक्क आणि सन्मानासाठी हा नवीन काळ सुरु होतो आहे.
  • अल्लाहच्या परवानगीने – लवकरच असा दिवस येईल, जेव्हा मुसलमान सर्वत्र ‘अधिकारी’ (as a master) म्हणून वावरतील. त्यांना त्याचा सन्मान पुन्हा प्राप्त होईल.
  • कोणीही त्यांच्या वाटेला जाऊ शकणार नाही. त्यांना इजा पोहोचवण्यासाठी उठलेला प्रत्येक हात तोडला जाईल. जगाला कळू द्या की नवीन युग सुरु होते आहे.
  • जे कोणी बेसावध असतील ते सावध व्हा, झोपले असतील त्यांनी जागे व्हा, आश्चर्यचकित झालेल्यांनी समजून घ्या की मुसलमानांना आता आवाज मिळाला आहे.
  • ‘दहशतवाद’ म्हणजे काय हे आम्ही जगाला शिकवू. खोट्या राष्ट्रवादाच्या मूर्ती आम्ही फोडू, लोकशाहीच्या मूल्यांचही तेच होईल.
खिलाफतीच्या स्थापनेनंतर जग पुन्हा एकदा दोन गटांत विभागलं गेलं आहे. मूळ अंकातील शब्द आहेत - पहिला गट इस्लाम आणि ‘फेत’ (श्रद्धावानांचा) आणि दुसरा गट आहे कुफ्र आणि ‘डीसबिलिफ’ (श्रद्धाहिनांचा). ह्याच परिच्छेदात हे स्पष्ट केलं आहे की एक गट आहे मुसलमानांचा आणि दुसरा आहे ज्यू, क्रुसेडर, त्यांचे साथी, आणि त्यांच्याबरोबर इतर सर्व धर्मांचे लोक.

या नंतर महत्वाचा मुदा आहे केलेले ‘हिजरतीचे’ आवाहन. सर्व मुसलमानांना आपापल्या प्रदेशातून इस्लामच्या भूमीकडे (म्हणजे इस्लामिक स्टेटकडे) हिजरत म्हणजे स्थलांतर करून येण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयातले ‘तज्ञ’ लोकांना सुद्धा इस्लामिक स्टेटकडे हिजरत करून येण्याचे आवाहन केले आहे. त्यात डॉक्टर, इंजिनीअर, स्कॉलर इ. लोकांना बोलावले आहे.

पुढचा विषय आहे, इस्लामिक स्टेट रिपोर्ट. (‘दबीक’ज्या संस्थेतर्फे प्रकाशित केलं जातं, ती अल-हयात याचं संस्थेतर्फे ‘इस्लामिक स्टेट रिपोर्ट’ या नावानी आठ-दहा पानांचा एक अहवाल सुद्धा प्रकाशित होत होता. त्याचे ५ अहवाल प्रकाशित झाले आहेत. त्यात मुख्यतः बातम्या आणि मुलाखती इतकंच होतं)  त्यामध्ये इस्लामिक स्टेटच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या अरब टोळ्यांशी संबंध निर्माण करण्याची इस्लामिक स्टेटची भूमिका आहे (अर्थात त्या टोळ्या धर्मानी मुसलमानच आहेत.)असे सांगण्यात आले आहे. अशा चार टोळ्यांची नावं पहिल्या अंकाच्या या रिपोर्ट मध्ये सांगितली आहे. त्यामध्ये ‘अबू-खमीस’, ‘बनू-सईद’, ‘अल-आवान’ आणि ‘अल-घामीन’. या चार चार टोळ्यांच्या श्रेष्ठींबरोबर इस्लामिक स्टेटच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये इस्लामिक स्टेटचे धेय्य हे प्रांतिक किंवा प्रादेशिक नसून जागतिक आहे, हे त्यांना समजावून सांगण्यात आले. टोळ्यांच्यासुद्धा मुलभूत गरजा इस्लामिक स्टेटकडून पूर्ण केल्या जाव्यात, अशी अपेक्षा टोळ्यांकडून करण्यात आली. त्या मान्य करून इस्लामिक स्टेटनी त्यांचा पाठींबा मागितला, अरब टोळ्यांनी आपल्या तन,मन, धनासकट इस्लामिक स्टेटला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्या पाठिंब्याच्या बदल्यात इस्लामिक स्टेट पुढील सेवा या टोळ्यांना पुरवेल, असे जाहीर करण्यात आहे.
  • खऱ्या मालकाला त्याची मालमत्ता आणि हक्क यांची परतफेड 
  • मुसलमानांसाठी उपयुक्त ठरतील अशा सर्व सेवांच्या नियोजनासाठी पैशाची तरतूद
  • इस्लामिक स्टेटच्या अधिकारात असलेल्या प्रदेशात शांतता व स्थैर्य
  • अन्न आणि कमोडीटीज यांचा खात्रीलायक पुरवठा
  • गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यावर भर
  • जनता आणि राज्यशासन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यावर भर

या सेवांच्या बदल्यात टोळ्यांनी इस्लामिक स्टेटला काय काय सहकार्य करायचं –

  • जकात गोळा करून, वसुली अधिकाऱ्याकडे पोहोचवणे
  • अनाथ, विधवा आणि गरजू लोकांची यादी तयार करणे, जेणेकरून गोळा केलेला जकात त्यांच्यासाठी वापरण्यात येईल
  • टोळ्यांनी तरुणांना इस्लामिक स्टेटच्या प्रशासनात जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे
  • इस्लामिक स्टेट विरुद्ध उभे राहणाऱ्या गटांना विरोध केला पाहिजे.
या नंतर अंकात ‘तल अफार’ हे शहर इस्लामिक स्टेटने मुक्त केल्याची बातमी आहे. त्यामध्ये लिखित मजकूर कमी आहे, परंतु ह्या योजनेचे फोटो मात्र टीमने भरपूर वापरलेत. अतिशय अमानुष (आपल्याला) वाटणारे फोटोसुद्धा टीमने बिनदिक्कत वापारले आहेत. ह्याचं अंकामध्ये नव्हे तर हे सर्व मासिकाचेच वैशिष्ट्य आहे, की केलेल्या कत्तलींचे सुद्धा अनेक फोटो कोणत्याही संकोचाशिवाय त्यांनी वापरले आहेत.

या नंतर पहिल्या अंकातील पहिला विशेष लेख. पुन्हा पूर्ण लेखाचे मराठी भाषांतर करणे आणि सांगणे कठीण आहे. तेव्हा त्याचा सारांश सांगतो. इब्राहीम म्हणजे अल-बगदादी याच्या शब्दात नेता म्हणजे काय? आणि ज्या प्रमाणे एखाद्या दागिन्यावर जंग चढतो, त्याप्रमाणे माणसाच्या श्रद्धेवर सुद्धा गंज चढतो, तो गंज काढून टाकून नव्याने माणसाने सुरवात केली पाहिजे असे अल्लाहने सांगितले आहे. ह्या अर्थाची आयत कुरणमध्ये आहे त्याचा संदर्भ येथे देण्यात आला आहे. ‘इस्लामिक स्टेट’चा हा चढलेला गंज दूर करण्याचा प्रयत्न आहे. अल-बगदादीने दाखवलेला रस्ता अनेक तरुण मुस्लिमांना दिशादर्शक बनला आहे. इब्राहीमने सांगितलेल्या मार्गावर त्यांनी श्रद्धा ठेवली, तर त्यांच्या श्रद्धेवरचा गंज दूर होईल, असा एकूण ह्या लेखाचा सूर आहे. त्यांनी या मार्गावर श्रद्धा ठेवली, त्यांच्यासाठी काम केलं, धर्माचा अभ्यास आणि आचरण केलं अशा लोकांनी दाखवलेल्या रस्त्यावर ते दिशाहीन मुस्लीम मार्गक्रमण करत आहेत. इतरांनीही कुराण मध्ये सांगितलेल्या मार्गावरून चालावं, असं आवाहन सर्वांनाच केलेलं आहे. इस्लामच्या दृष्टीने ‘बुडती हे जन देखवेना डोळा’ ही या लेखाची भूमिका आहे. जगाच्या सर्व भागात ह्याचे प्रतिध्वनी उमटले आहेत. अनेक मुस्लीम त्याच्याकडे आकर्षित झाले. अनेक ठिकाणी मस्जिद किंवा इतर इस्लामिक संस्थांमध्ये एकत्र येऊन त्यांनी इस्लामिक स्टेटबद्दलच्या आपल्या भावना युरोपीय भाषांमध्ये सुद्धा व्यक्त केल्या, असे लिहिण्यात आले आहे.

नेता म्हणजे काय? या लेखाचे ५ भाग आहेत. ‘दबीक’या मासिकाचं हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल, की एक गाभ्याचा विषय आणि त्यावर त्याचे मुख्य पैलू सांगणारे ५ उप-विषय. बहूतेक सर्व अंकांमध्ये असे एका मुख्य विषयाचे पाच भाग केलेले आहेत. पहिला भाग थोडक्यात काय आहे, हे वर सांगितले. दुसरा भाग मुख्यतः आहे, की हे जे नवीन नेतृत्व निर्माण झालेलं आहे, ते एकाच वेळी धार्मिक आणि राजकीय नेतृत्व आहे. गेल्या लेखाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे स्वतः प्रेषित पैगंबर हे सर्व क्षेत्रातले अधिकारी होते. इस्लाममध्ये राजकारण आणि धर्मकारण हे एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत. त्यामुळे ‘सेक्युलरॅरिझम’ ही धर्मविरोधीच कल्पना असल्याचं यात लिहिण्यात आलं आहे. त्यासाठी कुराण आणि हादीस मधले सुद्धा संदर्भ देण्यात आले आहेत. शरीया आणि प्रशासन वेगवेगळे आहे, ‘कुराण’ हे केवळ पठणाचे पुस्तक आहे आणि त्याचा आणि प्रशासन, कायदेमंडळ, न्यायव्यवस्था यांचा संबंध नाही असं म्हणणारे धर्मद्रोहीच आहेत, असं यात लिहिण्यात आलं आहे. असं म्हणणाऱ्यांनी एकदा इस्लामचा अभ्यास करावा, असंही त्यात सुचवण्यात आलं आहे.

लेखाच्या सर्व भागांपैकी सर्वात मोठा भाग हाच आहे. आधीच्या सर्व भागात कुराण, हादीस आणि शरीयानुसार इस्लामिक राज्याने कोणकोणत्या अटींची पूर्तता करणे आवश्यक असते, साधारण ते दिलेले आहे. या शेवटच्या भागात त्या सर्व अटी ‘हे’ इस्लामिक स्टेट पूर्ण करतं, त्यामुळे हेच खर इस्लामिक स्टेट आहे. या अंकात म्हणण्यात आलं आहे की, ‘This is the khilafah on the prophetic methodology’ ज्या प्रमाणे कुराण, हादीस आणि पैगंबर यांना अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे ही खिलाफत आहे.

सर्व अंकामध्ये असलेला महत्वाचा भाग म्हणजे ‘The Islamic state In the words of enemy’ पाश्चात्य (म्हणजे मुख्यतः क्रुसेडर) जग इस्लामिक स्टेट बद्दल काय काय विचार करतं, हे यात सांगण्यात येतं. अर्थात ते दबीकची टीम ‘इस्लामिक स्टेट’च्या दृष्टीने अन्वयार्थ लावून ते सांगत असते. अमेरिका-इराक राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा सदस्य 'डग्लस ऑलिव्हॅंट' आणि अमेरिकेच्या वेस्ट पॉईंट अॅकॅडमीमध्ये दहशतवादविरोधी विषयांचे संशोधन करणारा 'ब्रायन फिशमन' अशा दोन अमेरिकन क्रुसेडर्सनी लिहिलेल्या एका लेखातील संपादित अंश येथे देण्यात आला आहे. (शेजारी फोटोमध्ये आपण ते पाहू शकता)

या अंकातला सर्वात महत्वाचा लेख म्हणजे ‘From Hijrah to khilafah’. महत्वाचा अशासाठी की, या लेखात जगातील सर्व मुसलमानांना खिलाफातीपर्यंत येण्याची पद्धत सांगितली आहे. जगाच्या कोणत्याही भागातून इस्लामिक स्टेट म्हणजे खलिफा कडे येण्याचे मार्ग सांगितले आहेत. भारतातूनही अनेक मुसलमान सिरीया आणि इराक मध्ये गेले, ते या मार्गावरून गेले का, हे तपासून घेतलं पाहिजे, तसं असेल तर पुढे असे होऊ नये यासाठी काही खबरदारी घेता येईल.

या लेखात आहे, की अनेक ठिकाणी त्या त्या देशातील राज्यकर्ते मुसलमानांना हिजरत करण्याची परवानगी देत आहेत. पण अनेक ठिकाणी सेक्युलर, राष्ट्रवादी सरकारं अडथळा आणत आहेत, तेथील मुसलमानांना त्यांच्याशी लढूनच हिजरत करावी लागेल. काफिरांशी लढल्याशिवाय हिजरत होऊ शकत नाही. त्यामुळे ‘जिहाद’ हाच एकमेव मार्ग आहे ‘हिजरतीचा’. ज्या देशातून अशा स्थलांतराला पाठींबा मिळणार नाही, त्या देशात ‘मुजाहिदीनांनी’ जास्तीत जास्त अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न करून हिजरत केली पाहिजे. अशा प्रकारचे अनेक action points या लेखात सांगण्यात आले आहेत. एक मूळ लेखातील इंग्लिश परिच्छेद देतो, तो रस्ता म्हणजे ‘This has always been the roadmap towards khalifah for the mujahidin’ असं सांगण्यात आलं आहे.

शेवटी, इस्लामिक स्टेटनी सुरवातीच्या काही काळात भरपूर मोठ्या भागावर ताबा मिळवला, त्या अनेक शहरांवर ताबा मिळवला त्याच्या बातम्या आहेत. अनेक फोटो वापरून पुढची पानं सजवली आहेत. पहिल्या अंकाच्या शेवटच्या पानावर पुन्हा एकदा तो ‘दबीक’चा उल्लेख असलेलं हादीस देण्यात आलं आहे.

माझं निरीक्षण –

हा इस्लामिक स्टेट चा पहिलाच अंक असल्याने ‘इस्लामिक स्टेट’च्या काही मुलभूत संकल्पना यात स्पष्ट केल्या आहेत. ह्या नवीन राज्याची नुकतीच सुरवात असल्याने जगातील लोकांनासुद्धा इकडे येण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सर्व क्षेत्रात हे राज्य विस्तार पावू शकेल. राजकीय आणि धार्मिक असे एकत्र नेतृत्व आपण देतो आहेत, असा त्याचा दावा आहे. इस्लामिक स्टेटच्या अधिकारात असलेल्या अनेक टोळ्यांना मिळणारे फायदे त्यांनी मुद्दाम अधोरेखित केले आहेत. त्या टोळ्यांनी आपले सहकार्य तर जाहीर केलेच आहे, तरी पुन्हा त्यांना काय काय मागितलं, आणि त्यांना आम्ही काय काय देणार हे पुन्हा सांगण्याची गरज काय? तर सोप्प आहे, की इतरांनी ते वाचावं आणि त्यावर विचार करावा, आणि जमल्यास आपला सुद्धा पाठींबा इस्लामिक स्टेटला जाहीर करावा. त्यांनी हिजरत पासून खिलाफातीपर्यंतचा शास्त्रीय मार्ग दाखवला आहे, याचा अर्थ कोणीतरी माथेफिरू हे राज्य चालवत नसून, बुद्धिमान लोकं त्यांच्याकडे आहेत, हे यातून स्पष्ट होते.

प्रत्येक अंकाचा सारांश सांगणे म्हणजे सुद्धा दोन-दोन हजार शब्दाचा एक लेख होतो आहे. त्याचा व्याप खूप वाढतो आहे. म्हणून माझा आता हेतू इतकाच आहे, की मराठी वाचकांना ‘दबीक’ या मासिकाची अभ्यासासाठी ओळख करून द्यावी. ‘इस्लामिक स्टेट’ चे सर्व विचार अधिकृतपणे जगाच्या कानाकोपऱ्यात या मासिकाच्या माध्यमातून पोहोचत आहेत. तेव्हा याचा अभ्यास झाला पाहिजे.


(इस्लामिक स्टेटचे भीषण, पण वास्तव चित्र सांगणे हाच माझा हेतू आहे. वाचताना जे दिसलं तेवढंच सांगणे उद्देश आहे.) 



पहिल्या लेखाची लिंक - http://mukulranbhor.blogspot.in/2016/07/blog-post.html
तिसऱ्या लेखाची लिंक - http://mukulranbhor.blogspot.in/2016/11/blog-post.html

(पूर्वप्रसिद्धी - नवभारत २०१६, सप्टेंबर)

Friday, 15 July 2016

'दबीक'मध्ये इस्लामिक स्टेट (भाग - १)

‘पार्श्वभूमी’ 


प्रस्तावना -

इस्लमिक स्टेटचा  अभ्यास मराठी माध्यमं/विचारवंत यांनी बहुतेक वाळीत टाकलेला आहे. मोठ्या मोठ्या घटनासुद्धा मराठी वृत्तपत्र, विचारवंत विचारत सुद्धा घेत नाहीत. खूप मोठ्या मोठ्या घटना रोज घडतात आणि मराठी माध्यमं कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन करत नाहीत, हे खरं म्हणजे चुकीच आहे. त्यामुळे मी माझी ही जबाबदारी समजतो की असे विचारवंत आणि माध्यमांतून दुर्लक्ष झालेले विषय मी अभ्यासले पाहिजेत. आणि करता आला तितका अभ्यास इतरांना सांगितला पाहिजे.

अमेरिका-इराक युद्धाचा एक परिणाम म्हणून मध्यपूर्वेत जी अशांतता निर्माण झाली त्यातून अनेक दहशतवादी गट उभे राहिले. त्यातले अनेक मोडूनही पडले. पण जे काही शिल्लक उरले त्यांनी जग अशांत करून ठेवलं आहे. जून २०१४ मध्ये एका ‘अबू-बक्र-अल-बगदादी’ याने स्वतःला खलिफा म्हणून घोषित केलं. (याचे पूर्ण नाव आहे अमिरुल मोमिनून ‘अबू-बक्र-अल हुसैनी अल-कुरेशी अल-बगदादी’, ‘अमिरुल मोमिनून’ म्हणजे श्रद्धावानांचा सेनापती. हे संबोधन प्रथम इस्लामच्या इतिहासातील पहिल्या चार आदर्श खलिफांपैकी दुसरा खलिफा उमर यांनी स्वतःला लावून घेतलेलं.) जगातल्या सर्व शोषित मुसलमानांना राजकीय, आर्थिक, लष्करी, धार्मिक नेतृत्व दिलं. ही घटना २०१४ च्या जून महिन्यात घडली. कोणत्याही संघटनेला जस कार्यक्षेत्र लागतं, तसं इस्लामिक स्टेटला सुद्धा लागतं. इराक आणि सिरीयाच्या बऱ्याच मोठ्या भागावर त्यांनी ताबा मिळवला होता. २०१४ साली इराकमधल्या काही तेलाच्या विहिरी त्यांच्या ताब्यात होत्या. आणि अत्यंत सावध आणि तयारीनिशी त्यांनी खलिफापदाची पुनःस्थापना केली. लगेचच जुलै महिन्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या मासिकाचं प्रकाशन केलं. जगातल्या सर्व संघटनांना आपले विचार लोकांनी वाचलेले हवे असतात. सर्व संघटना अनुयायी मिळावेत म्हणून धडपडत असतात, तसंच इस्लमिक स्टेटचं सुद्धा आहे. अनेकांना माहिती नसेल पण ‘अल-कायदा’ आणि ओसामा बिन लादेन सुद्धा एक मासिक चालवत असत. त्याचं नावं ‘इन्स्पायर’ असं होतं. त्या ‘इन्स्पायर’ या मासिकाचे सुद्धा १४ अंक प्रकाशित झाले आहेत. ‘इन्स्पायर’ वाचल्यानंतर आणि ‘दबिक़’ वाचल्यानंतर असं लक्षात येईल की अल-कायदाच्या मासिकाचा आवाका मोठा आहे, अनेक विषय त्यात हाताळले गेले आहेत. पण आजच्या घडीला अल-कायदा पेक्षा जास्त मोठा धोका इस्लामिक स्टेटचा आहे. त्यामुळे आज विचार फक्त ‘इस्लामिक स्टेटच्या मासिकाचा करायचा. हा विषय मांडताना मी कोणताही माझं मत नोंदवणार नाही. ‘दबिक़’चा अभ्यास करताना मला जे दिसलं ते मी सांगणार आहे. 

बहिरंग परीक्षण –

जुलै २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटनी त्याचं पाहिलं मासिक प्रकाशित केलं. ‘अल-हयात’ या इस्लामिक स्टेटच्या मिडिया सेंटर कडून ते प्रकाशित केलं जातं. ते इंग्लिश, फ्रेंच, अरेबिक, जर्मन, रशियन इत्यादी जागतिक भाषांमध्ये प्रकाशित होतं. प्रकाशन मुख्यतः इंटरनेटवरच होत असावं. कारण सार्वजनिक ठिकाणी कोणीही माणूस इस्लामिक स्टेटचं मासिक विकायचं धाडस करणार नाही. आतापर्यंत ‘दबिक़’ या मासिकाचे १५ अंक प्रकाशित झाले आहेत. शेवटचा अंक एप्रिल २०१६ मध्ये प्रकाशित झाला आहे. १५ मधले ६ अंक २०१४ या वर्षात प्रकाशित झाले, पुढचे ६, २०१५ मध्ये. या वर्षात केवळ ३ अंक प्रकाशित झाले आहेत. शेवटचा अंक आता जून महिन्यात प्रकाशित झाला आहे. पण तो कुठेही सापडत नाही. प्रत्यक्ष इस्लामिक स्टेटच्या अधिकृत वेबसाईट वर सुद्धा तो मिळत नाही. ‘दबिक़’ला मासिक म्हणता येणार नाही कारण ते दर महिन्याला नियमित प्रकाशित होत नाही. कधी दोन महिन्यांनी, कधी तीन महिन्यांनी, अशी अनियमितता त्यात आहे. आपण आपल्या सोयीसाठी त्याला मासिक म्हणू.  सर्व अंकांची सरासरी पृष्ठसंख्या ५५-६० इतकी आहे. पण शाब्दिक भाग वेगळा काढला तर A4 आकाराची १८-२० पानं इतका मजकूर होतो. सर्वात आधी म्हणजे अत्यंत व्यावसायिक डोकं वापरून ही मासिकं तयार केलेली आहेत. आपली मतं सांगण्यासाठी अनेक ठिकाणी फोटो, कोटेशन वापरून मासिक सजवलेलं आहे. (मासिकाचे ले-आउट लावण्याचा मला अनुभव असल्यामुळे दबिक़ तयार करताना त्यांनी घेतलेले कष्ट भरपूर आहेत, हे लक्षात येईल)  

सर्व मासिकांचा एक कोणतातरी प्रधान विषय आहे. त्यानुसार कव्हर स्टोरी, इस्लामिक स्टेटच्या बातम्या, विशेष लेख, इस्लामिक स्टेटचे अहवाल अशी समान सदरं सर्व मासिकांत आहेत. अजून एक महत्वाचं सदर आहे, ते म्हणजे ‘In The words of Enemy’ त्यामध्ये मुख्यतः पाश्चात्य जग इस्लामिक स्टेटबद्दल काय म्हणतं, हे सांगितलं आहे. उद्या जेव्हा कोणी इस्लामिक स्टेटचा इतिहास लिहायला घेतला तर त्याला या मासिकांचा खूप उपयोग होईल. आणि असा उपयोग व्हावा असं त्याचं स्वरूप आहे. सर्व मासिकांचा समान भाग म्हणजे प्रस्तानावा. सर्व अंकांना एक प्रस्तावना आहे. सर्व अंकांच्या प्रस्तावनांचे विषय अर्थात वेगळे आहेत, म्हणून प्रत्येकाचा विचार स्वतंत्र करावा लागेल. सर्व अंकांचे विषय आणि संदर्भ वेगवेगळे आहेत, त्यामुळे कोणतेही जनरल विधान करणे योग्य नाही. सर्व अंकांचा स्वतंत्र विचार पुढच्या लेखांत करण्यात येईल. पुढच्या अंकांमध्ये ‘इतिहासाच्या पानांतून’ हे सदर विशेष आहे. त्याचप्रमाणे ‘to our sisters’ हे एक महत्वाचे सदर आहे.

मासिकाच्या नावापासून आतील लेखांपर्यंत सर्व ठिकाणी या मासिकाच्या टीमने संदर्भ देण्याची पद्धत अवलंबली आहे. सर्व महत्वाच्या वाक्यांना संदर्भ दिले आहेत. ते संदर्भ कुठेही मोडतोड केलेले नाहीत. एकूण एक संदर्भ जर कोणीही सामान्य माणसाने तपासले तर ते जिथून घेतले आहेत, तसेच दबिक़मध्ये वापरण्यात आले आहेत, असं लक्षात येईल. संदर्भ देताना अर्थात मुख्यतः कुराण वापरण्यात आले आहे. पण त्याचबरोबर ज्याला ‘कुराण’चा शब्दकोश मानले जाते अशा ‘हदीस’चाही त्यांनी संदर्भ म्हणून वापर केला आहे.

(भारतीयांना आणि मुख्यतः हिंदूंना इस्लाम बद्दल अनेकदा अज्ञान असते. म्हणून काही मुद्दे आधीच सांगणे भाग आहे.) कुराण २३ वर्षाच्या काळात क्रमाक्रमानी निर्माण झाले आहे. एका शुद्ध चारित्र्याच्या एका व्यक्तीला अल्लाहनी संदेश देण्यासाठी निवडले आणि ते संदेश म्हणजे कुराण आहे. परंतू केवळ कुराण वाचायला घेतले तर काही सहसा कळत नाही. त्यासाठी दोन पूर्वअटी आहेत. प्रेषित पैगंबर यांचे चरित्र आपल्याला माहिती असावे लागते आणि प्रेषितांच्या कृती आपल्याला माहिती असाव्या लागतात. त्या ‘कृती’म्हणजे हदीस आहे. तेव्हा कुराणचा अभ्यास करताना हदीसचाही आधार घ्यावा लागतो.  प्रेषितांच्या मरणानंतर ‘खलिफा उमर दुसरा’ याच्या काळात हदीसचे संकलन सुरु झाले. ह्या संकलनाच्या वेळी प्रत्यक्ष प्रेषितांना पाहिलेली दोन माणसं जिवंत होती असं सांगितलं जातं. हदीसच्या संकलनाचे अनेकांनी प्रयत्न केले परंतु मुस्लीम जगतात त्यापैकी तीन लोकांना मानले जाते. त्यामध्ये सर्वात महत्वाचे ‘सहिह बुखारी’, सहिह मुस्लीम’, ‘अबू दावूद’ हे आहेत. इस्लामिक स्टेटनी सर्व संदर्भ या तीन लोकांच्या हदीस मधून आणि कुराणमधून दिले आहेत. आणि पुन्हा सांगतो ते संदर्भ वापरताना त्यांनी कोणत्याही प्रकारची संदर्भातली मोडतोड केलेली नाही. ‘हादीस’च्या अन्वयार्थामध्ये काही वेळेला फरक पडलेला दिसेल, पण मूळ हादीस वर कोणाचेही दुमत नाही. सर्व मुस्लीम समाज ज्याप्रमाणे कुराण मानतो, त्याच्या लगेच खालचे स्थान हादीसला आहे.

आपला विषय समजण्यासाठी इस्लामची एवढी माहिती पुरेशी आहे.

‘दबिक़’ म्हणजे काय?

‘दबिक़’ हे उत्तर सिरीयामधील एक शहर आहे. तुर्कस्तानच्या सीमेवरचा सिरीयाचा १४ वा प्रांत अॅलेप्पो या प्रांतात ‘दबिक़’हे शहर आहे. २००४ च्या गणनेनुसार शहराची लोकसंख्या ३३६४ इतकी आहे. मे २०१६ मध्ये तयार करण्यात आलेला शेवटचा नकाशा सांगतो की अजूनही ‘दबिक़’या शहरावर इस्लामिक स्टेटचे राज्य आहे. ही झाली प्रार्थमिक माहिती.

प्रेषितांच्या मृत्युनंतर खलिफा पद निर्माण झाले. मानवी स्वभावानुसार  त्या  खालाफापदासाठी वाद सुद्धा निर्माण झाले. त्या वादातून चार खिलाफाती निर्माण झाल्या. परंतु त्या सर्व इ.स. १२५८ पर्यंत टिकल्या. तेव्हा सुद्धा खलिफाच्या हातात पूर्वीसारखी ताकद नव्हती. तो केवळ नामधारी राहिला होता. त्या नामधारी खालीफाला मंगोल टोळ्यांनी थर केलं. त्याचे नातेवाईक मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी इजिप्तमध्ये जाऊन राहिले. इजिप्तमधल्या जनतेनी त्यांच्यापैकी एकाची खलिफा म्हणून निवड केली. पण तो सुद्धा नामधारीच राहिला. त्याच्याकडे राजसत्ता नव्हती. १५१७ मध्ये तुर्कस्तानच्या सुलतानाने इजिप्त जिंकलं त्या खलिफाला (म्हणजे ती खलिफाची गादी) तुर्कस्तानला नेलं आणि खलिफापद निर्माण केलं. केमाल पाषानी जे खलिफापद रद्द केलं ते हे. पण तुर्कस्तानच्या इजिप्त जिंकण्याच्या मार्गात एक लढाई या ‘दबिक़’ शहरात झाली होती. ओट्टोमान साम्राज्य आणि कैरोमधील मामलुक साम्राज्य यांच्यात ‘खलिफा’साठी  झालेली शेवटची लढाई या ‘दबिक़’ शहरात झाली होती.

‘दबिक़’ या शहराचे ऐतिहासिकदृष्ट्या हे महत्व आहेच, पण यापेक्षा जास्त महत्व त्याच्या धर्मशास्त्रातील उल्लेखाला आहे. सहिह मुस्लीम यांनी संकलित केलेल्या हादीसची संख्या ७५३६ इतकी आहे. बुखारी यांनी सुद्धा संकलित केलेल्या हादीसची संख्या सहा हजारापेक्षा जास्त आहेत. पण सहिह मुस्लीमयांच्या हदीसच्या संकलनात प्रकरण ९ मध्ये आलेलं एक हदीस आहे, त्यात ‘दबिक़’चा उल्लेख आहे. त्यामध्ये प्रेषित सांगतात की ‘रोमन सैन्य आणि इस्लामचे सैन्य यांच्यात दबिक़ शहरात लढाई होईल, त्यात मुसलमान जिंकतील आणि बायझेन्टाइन मुसलमानांच्या ताब्यात येईल. मुसलमान आणि बिगर मुसलमान यांच्यातील शेवटचे धर्मयुद्ध या ठिकाणी होणार आहे, अशी या हदीसची मांडणी आहे. अभ्यासाच्या दृष्टीने सर्वांनी मूळ हादीस वाचणे आवश्यक आहे.

सर्व अंकांच्या अनुक्रमणिकेच्या वर २००६ साली मारला गेलेला जिहादी ‘अबू-मौसब-अझ-झार्क्वाई’ यानी कोट केलेलं हेच हदीस देण्यात आलं आहे. ‘The spark has been lit here in Iraq, and it’s heat will continue to intensify – by Allah’s permission – until it burns crusader armies in Dabiq’ हा मासिकाचा हेतू म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

आत काय आहे?

दबिक़चा पहिला अंक प्रकाशित झाल्यापासून पाश्चिमात्य पत्रकार आणि अभ्यासकांचे त्याच्याकडे लक्ष आहे. सर्व अंकांचा विस्तृत तपशील आणि त्याच्या अन्वयार्थासह अनेक पत्रकारांनी लिहिलेलं आहे. एक - ‘भविष्यात इस्लामिक स्टेटला अनुयायी मिळावेत म्हणून’ आणि दोन – ‘इस्लामिक स्टेटची अद्ययावत आणि अधिकृत माहिती त्यांच्या शत्रूंना मिळावी’ या दोन हेतूंनी ‘दबिक़’ची निर्मिती होते. जर फक्त हे मुस्लीम जगतानी वाचायला पाहिजे असं इस्लामिक स्टेटला वाटत असतं तर इतर जागतिक भाषांमध्ये ‘दबिक़’ प्रकाशित करण्याची गरज नव्हती.  पहिल्या अंकाची कव्हर स्टोरी आहे ‘The Return of the Khilafah’ आणि त्यामध्ये जगातल्या सर्व मुसलमानांना हिजरत करून इस्लामिक स्टेटकडे येण्याचे आवाहन केले आहे. इकतच नव्हे तर विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना सुद्धा इस्लामिक स्टेटला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यात डॉक्टर्स, इंजिनीअर्स, वकील, पत्रकार अशा तज्ज्ञांना मुद्दाम बोलावण्यात आले आहे. पहिल्याच अंकात असं सांगण्यात आलं आहे की, खिलाफतीच्या स्थापनेनंतर आता जगाची वाटणी दोन गटांमध्ये झाली आहे. पहिला गट – इस्लाम आणि श्रद्धावान यांचा आणि दुसरा गट कुफ्र (श्रद्धाहीन) आणि हिप्पोक्रॅट लोकांचा. इस्लामिक स्टेटच्या एकूण कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक आदिवासी टोळ्यांनी इस्लामिक स्टेटला आपला पाठींबा जाहीर केला. पहिल्या अंकात अशा चार टोळ्यांची नावं आहेत. टोळ्यांनी इस्लामिक स्टेटला आपला पाठींबा जाहीर केल्यामुळे त्यांना कोणकोणते फायदे होणार आहेत, ते सुद्धा लिहिलं आहे. मानवी हक्कांची पुन्हा एकदा स्थापना होईल, मुस्लिमांचा फायदा व्हावा म्हणून पैशाची तरतूद करण्यात येईल, इस्लामिक स्टेटमध्ये लोकांना शांतता आणि स्थैर्य मिळेल, गुन्हेगरीचे प्रमाण कमी होईल, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील असे अनेक फायदे देण्यात आले आहेत. पुढच्या लेखांमध्ये विशेषत्वाने एकेका अंकावर विचार केलेला आहे. आता फक्त ओळख करून देणे हा हेतू आहे. 

अर्थात इस्लाममध्ये राज्यव्यवस्था आणि धर्मव्यवस्था यांच्यात भेद नसतो. प्रो. के.एस. रामकृष्णराव म्हणाले होते की प्रेषितांचे व्यक्तिमत्व अष्टादशपैलू होते, अनेक गुणांपैकी काहीच मला सांगता येतील. ते म्हणतात पैगंबर हे प्रेषित होते, सेनापती होते, राजा होते, योद्धा होते, व्यावसायिक होते, धर्मप्रसारक होते, तत्वज्ञानी होते, स्टेटमन होते, वक्ता होते, क्रांतिकारक होते, कायदा देणारे होते, न्यायाधीश होते, संत होते. हे इस्लामचे वैशिष्ट्य आहे.' इस्लामिक स्टेटच्या या दबिक़मध्ये त्यांचा आग्रह आहे हे सांगण्याचा की इस्लामिक स्टेट त्यांच्या अनुयायांना धार्मिक त्याचंबरोबर राजकीय नेतृत्व देईल. या दृष्टीकोनातून सर्व लेख, बातम्या लिहिल्या गेल्या आहेत. मुसलमानांना पुन्हा एकदा असे सर्वांगीण नेतृत्व मिळावे म्हणून पुन्हा एकदा खलिफा पदाची स्थापना करण्यात आली आहे. (क्रमशः)

पूर्वप्रसिद्धी - 'नवभारत सप्टेंबर २०१६' 


Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....