प्रस्तावना
-
‘दबीक’
म्हणजे नेमकं काय आहे ते गेल्या लेखात आपण
पाहिलं. त्याचं एकूण स्वरूप कसं आहे, कोण श्रोता समोर ठेऊन मासिकांची निर्मिती ते
करत आहेत, हे पाहिलं. ‘दबिक़’चा इतिहास, आताची थोडक्यात परिस्थिती असं सर्व आपण
मागच्या लेखात पाहिलं. सर्व अंक समजावून घेण्यासाठी लागणारी सर्व पार्श्वभूमी
आपल्याला आता माहिती आहे, तेव्हा आता मूळ अंकांच्या अभ्यासाकडे वळता येईल.
(या मालिकेतील पहिल्या लेखाची लिंक इथे देतो आहे - http://mukulranbhor.blogspot.in/2016/07/blog-post.html) पहिला अंक एकूण पन्नास
पानांचा आहे. अभ्यास करताना सुरवातीला माझी कल्पना होती, की प्रत्यक्ष अंकांचे
मराठी भाषांतर करावे. पण त्याचा आवाका लक्षात आल्यावर मी ठरवलं की ज्यांना अधिक
जिज्ञासा असेल ते मूळ वाचतीलच. आपण अंकांचा सारांश सांगावा. पहिले दोन अंक
वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की केवळ सर्व अंकांचा सारांश सुद्धा सांगणे एका
लेखात शक्य नाही. म्हणून आता ह्या लेखात पहिलाच अंक विचारात घेतला आहे. पुढच्या
काही लेखात पुढचे अंक काय म्हणतात ते विचारात घेतलं जाईल. प्रत्यक्ष अंकांचे
स्वरूप कसे आहे, याचा अंदाज यावं म्हणून हा खटाटोप सुरु आहे.
विस्तार
–
गेल्या लेखाच्या
शेवटी पहिल्या अंकाचा थोडक्यात परिचय केलेलाच आहे. तो लेखाच्या सलगतेसाठी पुन्हा
सांगणे आवश्यक आहे. या पहिल्या अंकाची कव्हर स्टोरी आहे ‘The Return of the
Khalifah’. जगाच्या नकाशावर इराक, सिरीया, सौदी अरीबिया या देशांवर ‘The Return of
the Khalifah’ अशी अक्षरे लिहिलेलं एक ग्राफिक हे ह्या अंकांचे मुखपृष्ठ आहे. अंकाचा
मुख्य हेतू ‘आता जगात मुसलमानांसाठी धार्मिक आणि राजकीय नेतृत्व निर्माण झालं आहे’
हे सांगणे हाच आहे. आता जगात कोणत्याही मुसलमानाने खाली मान घालून जगण्याची गरज
नाही, कारण त्यांना हक्क आणि सन्मान पुन्हा मिळवून देण्यासाठी ‘खिलाफत’ स्थापन
झाली आहे.
अंकांत अगदी
सुरवातीला मासिकाचे नावं ‘दबीक’ हेच का निवडण्यात आले आहे, ते सांगण्यात आले आहे.
ते सांगण्यासाठी ‘सहिह मुस्लीम’ यांनी संकलित केलेल्या एका ‘हादीस’चं संदर्भ
देण्यात आलेला आहे. ‘दबीक’चा अर्थ आपण मागच्या लेखात पहिला. तो पुन्हा सांगण्याची
गरज नाही. या अंकांत खिलाफतीची स्थापना झाली आहे, औपचरिकपणे जाहीर करण्यात आलं
आहे. हिजरी १४३५ च्या रमजानच्या पहिल्या दिवशी अल्लाहच्या कृपेनी खिलाफतीची
स्थापना करण्यात आली आहे, असं इस्लामिक स्टेटच्या प्रवाक्त्यानी जाहीर केलं. ते
जाहीर केल्यानंतर राज्याच्या रस्त्यारस्त्यावर आनंद साजरा करण्यात आला, असही
लिहिलेलं आहे.
खिलाफतीच्या
स्थापनेदिवशी नवीन खलिफा ‘अमीरुल-मू-मूमीन अबू बक्र अल-हुसैनी अल कुरैशी अल-बगदादी’
याचे भाषण झाले. हा खलिफा आतापर्यंत एकदाच जगासमोर आलेला आहे. ते त्याचे अरबीमध्ये
केलेलं पूर्ण भाषण अनेक दिवस YouTube वर उपलब्ध होतं, आता बहुतेक पूर्ण भाषण काढून
टाकण्यात आलं आहे, आता छोटे छोटे तुकडे त्या भाषणाचे शिल्लक आहेत. त्या खलिफाच्या
भाषणाचे काही संपादित अंश देण्यात आले आहेत. ते सांगणे आवश्यक आहे. (फक्त मुद्दे
सांगतो आहे)
- अल्लाहच्या कृपेनी – आता तुम्हाला (मुसलमानांना) तुमचे राज्य आणि खलिफा लाभलेला आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचा सन्मान, हक्क आणि नेतृत्व पुन्हा प्राप्त होईल.
- हे असं राज्य असेल की जिथे अरब-गैर अरब, काळे–गोरे, पाश्चिमात्य-पौर्वात्य सर्व एकमेकांचे बंधू असतील.
- कॉकेशियन, इंडियन, चायनीज, सिरीया, इराक, येमेन, इजिप्त, उत्तर आफ्रिका, अमेरिका, जर्मन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इ. देशांतील लोक एकत्र येऊन ही खिलाफत स्थापन झाली आहे.
- अल्लाहच्या कामासाठी वेगवेगळ्या देशातील लोकांची मनं एकत्वाच्या भावनेनी भरून गेली आहेत. अल्लाहच्या कार्यासाठी एकमेकांच्या संरक्षांसाठी आणि एकमेकांसाठी ते भावाच्या नात्यानी एकत्र आले आहेत.
- एका झेंड्याखाली, एका धेय्यासाठी, एका तंबूत आलेले एकत्वाचा आशीर्वाद अनुभवत आहेत.
- मुसलमांनांच्या हक्क आणि सन्मानासाठी हा नवीन काळ सुरु होतो आहे.
- अल्लाहच्या परवानगीने – लवकरच असा दिवस येईल, जेव्हा मुसलमान सर्वत्र ‘अधिकारी’ (as a master) म्हणून वावरतील. त्यांना त्याचा सन्मान पुन्हा प्राप्त होईल.
- कोणीही त्यांच्या वाटेला जाऊ शकणार नाही. त्यांना इजा पोहोचवण्यासाठी उठलेला प्रत्येक हात तोडला जाईल. जगाला कळू द्या की नवीन युग सुरु होते आहे.
- जे कोणी बेसावध असतील ते सावध व्हा, झोपले असतील त्यांनी जागे व्हा, आश्चर्यचकित झालेल्यांनी समजून घ्या की मुसलमानांना आता आवाज मिळाला आहे.
- ‘दहशतवाद’ म्हणजे काय हे आम्ही जगाला शिकवू. खोट्या राष्ट्रवादाच्या मूर्ती आम्ही फोडू, लोकशाहीच्या मूल्यांचही तेच होईल.
खिलाफतीच्या
स्थापनेनंतर जग पुन्हा एकदा दोन गटांत विभागलं गेलं आहे. मूळ अंकातील शब्द आहेत -
पहिला गट इस्लाम आणि ‘फेत’ (श्रद्धावानांचा) आणि दुसरा गट आहे कुफ्र आणि ‘डीसबिलिफ’
(श्रद्धाहिनांचा). ह्याच परिच्छेदात हे स्पष्ट केलं आहे की एक गट आहे मुसलमानांचा
आणि दुसरा आहे ज्यू, क्रुसेडर, त्यांचे साथी, आणि त्यांच्याबरोबर इतर सर्व
धर्मांचे लोक.
या नंतर
महत्वाचा मुदा आहे केलेले ‘हिजरतीचे’ आवाहन. सर्व मुसलमानांना आपापल्या प्रदेशातून
इस्लामच्या भूमीकडे (म्हणजे इस्लामिक स्टेटकडे) हिजरत म्हणजे स्थलांतर करून
येण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयातले ‘तज्ञ’ लोकांना सुद्धा
इस्लामिक स्टेटकडे हिजरत करून येण्याचे आवाहन केले आहे. त्यात डॉक्टर, इंजिनीअर, स्कॉलर
इ. लोकांना बोलावले आहे.
पुढचा विषय
आहे, इस्लामिक स्टेट रिपोर्ट. (‘दबीक’ज्या संस्थेतर्फे प्रकाशित केलं जातं, ती अल-हयात
याचं संस्थेतर्फे ‘इस्लामिक स्टेट रिपोर्ट’ या नावानी आठ-दहा पानांचा एक अहवाल
सुद्धा प्रकाशित होत होता. त्याचे ५ अहवाल प्रकाशित झाले आहेत. त्यात मुख्यतः
बातम्या आणि मुलाखती इतकंच होतं) त्यामध्ये
इस्लामिक स्टेटच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या अरब टोळ्यांशी संबंध निर्माण
करण्याची इस्लामिक स्टेटची भूमिका आहे (अर्थात त्या टोळ्या धर्मानी मुसलमानच आहेत.)असे
सांगण्यात आले आहे. अशा चार टोळ्यांची नावं पहिल्या अंकाच्या या रिपोर्ट मध्ये
सांगितली आहे. त्यामध्ये ‘अबू-खमीस’, ‘बनू-सईद’, ‘अल-आवान’ आणि ‘अल-घामीन’. या चार
चार टोळ्यांच्या श्रेष्ठींबरोबर इस्लामिक स्टेटच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये
इस्लामिक स्टेटचे धेय्य हे प्रांतिक किंवा प्रादेशिक नसून जागतिक आहे, हे त्यांना
समजावून सांगण्यात आले. टोळ्यांच्यासुद्धा मुलभूत गरजा इस्लामिक स्टेटकडून पूर्ण
केल्या जाव्यात, अशी अपेक्षा टोळ्यांकडून करण्यात आली. त्या मान्य करून इस्लामिक
स्टेटनी त्यांचा पाठींबा मागितला, अरब टोळ्यांनी आपल्या तन,मन, धनासकट इस्लामिक
स्टेटला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्या पाठिंब्याच्या बदल्यात
इस्लामिक स्टेट पुढील सेवा या टोळ्यांना पुरवेल, असे जाहीर करण्यात आहे.
- खऱ्या मालकाला त्याची मालमत्ता आणि हक्क यांची परतफेड
- मुसलमानांसाठी उपयुक्त ठरतील अशा सर्व सेवांच्या नियोजनासाठी पैशाची तरतूद
- इस्लामिक स्टेटच्या अधिकारात असलेल्या प्रदेशात शांतता व स्थैर्य
- अन्न आणि कमोडीटीज यांचा खात्रीलायक पुरवठा
- गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यावर भर
- जनता आणि राज्यशासन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यावर भर
या सेवांच्या
बदल्यात टोळ्यांनी इस्लामिक स्टेटला काय काय सहकार्य करायचं –
- जकात गोळा करून, वसुली अधिकाऱ्याकडे पोहोचवणे
- अनाथ, विधवा आणि गरजू लोकांची यादी तयार करणे, जेणेकरून गोळा केलेला जकात त्यांच्यासाठी वापरण्यात येईल
- टोळ्यांनी तरुणांना इस्लामिक स्टेटच्या प्रशासनात जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे
- इस्लामिक स्टेट विरुद्ध उभे राहणाऱ्या गटांना विरोध केला पाहिजे.
या नंतर
अंकात ‘तल अफार’ हे शहर इस्लामिक स्टेटने मुक्त केल्याची बातमी आहे. त्यामध्ये
लिखित मजकूर कमी आहे, परंतु ह्या योजनेचे फोटो मात्र टीमने भरपूर वापरलेत. अतिशय
अमानुष (आपल्याला) वाटणारे फोटोसुद्धा टीमने बिनदिक्कत वापारले आहेत. ह्याचं
अंकामध्ये नव्हे तर हे सर्व मासिकाचेच वैशिष्ट्य आहे, की केलेल्या कत्तलींचे
सुद्धा अनेक फोटो कोणत्याही संकोचाशिवाय त्यांनी वापरले आहेत.
या नंतर
पहिल्या अंकातील पहिला विशेष लेख. पुन्हा पूर्ण लेखाचे मराठी भाषांतर करणे आणि
सांगणे कठीण आहे. तेव्हा त्याचा सारांश सांगतो. इब्राहीम म्हणजे अल-बगदादी याच्या
शब्दात नेता म्हणजे काय? आणि ज्या प्रमाणे एखाद्या दागिन्यावर जंग चढतो,
त्याप्रमाणे माणसाच्या श्रद्धेवर सुद्धा गंज चढतो, तो गंज काढून टाकून नव्याने
माणसाने सुरवात केली पाहिजे असे अल्लाहने सांगितले आहे. ह्या अर्थाची आयत
कुरणमध्ये आहे त्याचा संदर्भ येथे देण्यात आला आहे. ‘इस्लामिक स्टेट’चा हा चढलेला
गंज दूर करण्याचा प्रयत्न आहे. अल-बगदादीने दाखवलेला रस्ता अनेक तरुण मुस्लिमांना
दिशादर्शक बनला आहे. इब्राहीमने सांगितलेल्या मार्गावर त्यांनी श्रद्धा ठेवली, तर
त्यांच्या श्रद्धेवरचा गंज दूर होईल, असा एकूण ह्या लेखाचा सूर आहे. त्यांनी या
मार्गावर श्रद्धा ठेवली, त्यांच्यासाठी काम केलं, धर्माचा अभ्यास आणि आचरण केलं
अशा लोकांनी दाखवलेल्या रस्त्यावर ते दिशाहीन मुस्लीम मार्गक्रमण करत आहेत.
इतरांनीही कुराण मध्ये सांगितलेल्या मार्गावरून चालावं, असं आवाहन सर्वांनाच
केलेलं आहे. इस्लामच्या दृष्टीने ‘बुडती हे जन देखवेना डोळा’ ही या लेखाची भूमिका
आहे. जगाच्या सर्व भागात ह्याचे प्रतिध्वनी उमटले आहेत. अनेक मुस्लीम त्याच्याकडे
आकर्षित झाले. अनेक ठिकाणी मस्जिद किंवा इतर इस्लामिक संस्थांमध्ये एकत्र येऊन
त्यांनी इस्लामिक स्टेटबद्दलच्या आपल्या भावना युरोपीय भाषांमध्ये सुद्धा व्यक्त केल्या,
असे लिहिण्यात आले आहे.
नेता म्हणजे
काय? या लेखाचे ५ भाग आहेत. ‘दबीक’या मासिकाचं हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल, की एक
गाभ्याचा विषय आणि त्यावर त्याचे मुख्य पैलू सांगणारे ५ उप-विषय. बहूतेक सर्व
अंकांमध्ये असे एका मुख्य विषयाचे पाच भाग केलेले आहेत. पहिला भाग थोडक्यात काय
आहे, हे वर सांगितले. दुसरा भाग मुख्यतः आहे, की हे जे नवीन नेतृत्व निर्माण
झालेलं आहे, ते एकाच वेळी धार्मिक आणि राजकीय नेतृत्व आहे. गेल्या लेखाच्या शेवटी
सांगितल्याप्रमाणे स्वतः प्रेषित पैगंबर हे सर्व क्षेत्रातले अधिकारी होते. इस्लाममध्ये
राजकारण आणि धर्मकारण हे एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत. त्यामुळे ‘सेक्युलरॅरिझम’
ही धर्मविरोधीच कल्पना असल्याचं यात लिहिण्यात आलं आहे. त्यासाठी कुराण आणि हादीस
मधले सुद्धा संदर्भ देण्यात आले आहेत. शरीया आणि प्रशासन वेगवेगळे आहे, ‘कुराण’ हे
केवळ पठणाचे पुस्तक आहे आणि त्याचा आणि प्रशासन, कायदेमंडळ, न्यायव्यवस्था यांचा
संबंध नाही असं म्हणणारे धर्मद्रोहीच आहेत, असं यात लिहिण्यात आलं आहे. असं
म्हणणाऱ्यांनी एकदा इस्लामचा अभ्यास करावा, असंही त्यात सुचवण्यात आलं आहे.
लेखाच्या सर्व
भागांपैकी सर्वात मोठा भाग हाच आहे. आधीच्या सर्व भागात कुराण, हादीस आणि शरीयानुसार इस्लामिक राज्याने कोणकोणत्या अटींची
पूर्तता करणे आवश्यक असते, साधारण ते दिलेले आहे. या शेवटच्या भागात त्या सर्व अटी
‘हे’ इस्लामिक स्टेट पूर्ण करतं, त्यामुळे हेच खर इस्लामिक स्टेट आहे. या अंकात
म्हणण्यात आलं आहे की, ‘This is the khilafah on the prophetic methodology’
ज्या प्रमाणे कुराण, हादीस आणि पैगंबर यांना अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे ही खिलाफत
आहे.
सर्व
अंकामध्ये असलेला महत्वाचा भाग म्हणजे ‘The Islamic state In the words of enemy’
पाश्चात्य (म्हणजे मुख्यतः क्रुसेडर) जग इस्लामिक स्टेट बद्दल काय काय विचार करतं,
हे यात सांगण्यात येतं. अर्थात ते दबीकची टीम ‘इस्लामिक स्टेट’च्या दृष्टीने
अन्वयार्थ लावून ते सांगत असते. अमेरिका-इराक राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा सदस्य 'डग्लस ऑलिव्हॅंट' आणि अमेरिकेच्या वेस्ट पॉईंट अॅकॅडमीमध्ये दहशतवादविरोधी विषयांचे
संशोधन करणारा 'ब्रायन फिशमन' अशा दोन अमेरिकन क्रुसेडर्सनी लिहिलेल्या एका लेखातील
संपादित अंश येथे देण्यात आला आहे. (शेजारी फोटोमध्ये आपण ते पाहू शकता)
या अंकातला
सर्वात महत्वाचा लेख म्हणजे ‘From Hijrah to khilafah’. महत्वाचा अशासाठी
की, या लेखात जगातील सर्व मुसलमानांना खिलाफातीपर्यंत येण्याची पद्धत सांगितली
आहे. जगाच्या कोणत्याही भागातून इस्लामिक स्टेट म्हणजे खलिफा कडे येण्याचे मार्ग
सांगितले आहेत. भारतातूनही अनेक मुसलमान सिरीया आणि इराक मध्ये गेले, ते या
मार्गावरून गेले का, हे तपासून घेतलं पाहिजे, तसं असेल तर पुढे असे होऊ नये यासाठी
काही खबरदारी घेता येईल.
या लेखात
आहे, की अनेक ठिकाणी त्या त्या देशातील राज्यकर्ते मुसलमानांना हिजरत करण्याची
परवानगी देत आहेत. पण अनेक ठिकाणी सेक्युलर, राष्ट्रवादी सरकारं अडथळा आणत आहेत,
तेथील मुसलमानांना त्यांच्याशी लढूनच हिजरत करावी लागेल. काफिरांशी लढल्याशिवाय
हिजरत होऊ शकत नाही. त्यामुळे ‘जिहाद’ हाच एकमेव मार्ग आहे ‘हिजरतीचा’. ज्या
देशातून अशा स्थलांतराला पाठींबा मिळणार नाही, त्या देशात ‘मुजाहिदीनांनी’ जास्तीत
जास्त अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न करून हिजरत केली पाहिजे. अशा प्रकारचे
अनेक action points या लेखात सांगण्यात आले आहेत. एक मूळ लेखातील इंग्लिश परिच्छेद
देतो, तो रस्ता म्हणजे ‘This has
always been the roadmap towards khalifah for the mujahidin’ असं सांगण्यात आलं
आहे.
शेवटी,
इस्लामिक स्टेटनी सुरवातीच्या काही काळात भरपूर मोठ्या भागावर ताबा मिळवला, त्या
अनेक शहरांवर ताबा मिळवला त्याच्या बातम्या आहेत. अनेक फोटो वापरून पुढची पानं
सजवली आहेत. पहिल्या अंकाच्या शेवटच्या पानावर पुन्हा एकदा तो ‘दबीक’चा उल्लेख
असलेलं हादीस देण्यात आलं आहे.
माझं
निरीक्षण –
हा इस्लामिक
स्टेट चा पहिलाच अंक असल्याने ‘इस्लामिक स्टेट’च्या काही मुलभूत संकल्पना यात
स्पष्ट केल्या आहेत. ह्या नवीन राज्याची नुकतीच सुरवात असल्याने जगातील लोकांनासुद्धा
इकडे येण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सर्व क्षेत्रात हे राज्य विस्तार पावू
शकेल. राजकीय आणि धार्मिक असे एकत्र नेतृत्व आपण देतो आहेत, असा त्याचा दावा आहे.
इस्लामिक स्टेटच्या अधिकारात असलेल्या अनेक टोळ्यांना मिळणारे फायदे त्यांनी
मुद्दाम अधोरेखित केले आहेत. त्या टोळ्यांनी आपले सहकार्य तर जाहीर केलेच आहे, तरी
पुन्हा त्यांना काय काय मागितलं, आणि त्यांना आम्ही काय काय देणार हे पुन्हा
सांगण्याची गरज काय? तर सोप्प आहे, की इतरांनी ते वाचावं आणि त्यावर विचार करावा,
आणि जमल्यास आपला सुद्धा पाठींबा इस्लामिक स्टेटला जाहीर करावा. त्यांनी हिजरत
पासून खिलाफातीपर्यंतचा शास्त्रीय मार्ग दाखवला आहे, याचा अर्थ कोणीतरी माथेफिरू
हे राज्य चालवत नसून, बुद्धिमान लोकं त्यांच्याकडे आहेत, हे यातून स्पष्ट होते.
प्रत्येक
अंकाचा सारांश सांगणे म्हणजे सुद्धा दोन-दोन हजार शब्दाचा एक लेख होतो आहे. त्याचा
व्याप खूप वाढतो आहे. म्हणून माझा आता हेतू इतकाच आहे, की मराठी वाचकांना ‘दबीक’
या मासिकाची अभ्यासासाठी ओळख करून द्यावी. ‘इस्लामिक स्टेट’ चे सर्व विचार अधिकृतपणे
जगाच्या कानाकोपऱ्यात या मासिकाच्या माध्यमातून पोहोचत आहेत. तेव्हा याचा अभ्यास
झाला पाहिजे.
पहिल्या लेखाची लिंक - http://mukulranbhor.blogspot.in/2016/07/blog-post.html
तिसऱ्या लेखाची लिंक - http://mukulranbhor.blogspot.in/2016/11/blog-post.html
(पूर्वप्रसिद्धी - नवभारत २०१६, सप्टेंबर)
(इस्लामिक स्टेटचे भीषण, पण वास्तव चित्र सांगणे हाच माझा हेतू आहे. वाचताना जे दिसलं तेवढंच सांगणे उद्देश आहे.)
पहिल्या लेखाची लिंक - http://mukulranbhor.blogspot.in/2016/07/blog-post.html
तिसऱ्या लेखाची लिंक - http://mukulranbhor.blogspot.in/2016/11/blog-post.html
(पूर्वप्रसिद्धी - नवभारत २०१६, सप्टेंबर)
No comments:
Post a Comment