Friday 15 July 2016

'दबीक'मध्ये इस्लामिक स्टेट (भाग - १)

‘पार्श्वभूमी’ 


प्रस्तावना -

इस्लमिक स्टेटचा  अभ्यास मराठी माध्यमं/विचारवंत यांनी बहुतेक वाळीत टाकलेला आहे. मोठ्या मोठ्या घटनासुद्धा मराठी वृत्तपत्र, विचारवंत विचारत सुद्धा घेत नाहीत. खूप मोठ्या मोठ्या घटना रोज घडतात आणि मराठी माध्यमं कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन करत नाहीत, हे खरं म्हणजे चुकीच आहे. त्यामुळे मी माझी ही जबाबदारी समजतो की असे विचारवंत आणि माध्यमांतून दुर्लक्ष झालेले विषय मी अभ्यासले पाहिजेत. आणि करता आला तितका अभ्यास इतरांना सांगितला पाहिजे.

अमेरिका-इराक युद्धाचा एक परिणाम म्हणून मध्यपूर्वेत जी अशांतता निर्माण झाली त्यातून अनेक दहशतवादी गट उभे राहिले. त्यातले अनेक मोडूनही पडले. पण जे काही शिल्लक उरले त्यांनी जग अशांत करून ठेवलं आहे. जून २०१४ मध्ये एका ‘अबू-बक्र-अल-बगदादी’ याने स्वतःला खलिफा म्हणून घोषित केलं. (याचे पूर्ण नाव आहे अमिरुल मोमिनून ‘अबू-बक्र-अल हुसैनी अल-कुरेशी अल-बगदादी’, ‘अमिरुल मोमिनून’ म्हणजे श्रद्धावानांचा सेनापती. हे संबोधन प्रथम इस्लामच्या इतिहासातील पहिल्या चार आदर्श खलिफांपैकी दुसरा खलिफा उमर यांनी स्वतःला लावून घेतलेलं.) जगातल्या सर्व शोषित मुसलमानांना राजकीय, आर्थिक, लष्करी, धार्मिक नेतृत्व दिलं. ही घटना २०१४ च्या जून महिन्यात घडली. कोणत्याही संघटनेला जस कार्यक्षेत्र लागतं, तसं इस्लामिक स्टेटला सुद्धा लागतं. इराक आणि सिरीयाच्या बऱ्याच मोठ्या भागावर त्यांनी ताबा मिळवला होता. २०१४ साली इराकमधल्या काही तेलाच्या विहिरी त्यांच्या ताब्यात होत्या. आणि अत्यंत सावध आणि तयारीनिशी त्यांनी खलिफापदाची पुनःस्थापना केली. लगेचच जुलै महिन्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या मासिकाचं प्रकाशन केलं. जगातल्या सर्व संघटनांना आपले विचार लोकांनी वाचलेले हवे असतात. सर्व संघटना अनुयायी मिळावेत म्हणून धडपडत असतात, तसंच इस्लमिक स्टेटचं सुद्धा आहे. अनेकांना माहिती नसेल पण ‘अल-कायदा’ आणि ओसामा बिन लादेन सुद्धा एक मासिक चालवत असत. त्याचं नावं ‘इन्स्पायर’ असं होतं. त्या ‘इन्स्पायर’ या मासिकाचे सुद्धा १४ अंक प्रकाशित झाले आहेत. ‘इन्स्पायर’ वाचल्यानंतर आणि ‘दबिक़’ वाचल्यानंतर असं लक्षात येईल की अल-कायदाच्या मासिकाचा आवाका मोठा आहे, अनेक विषय त्यात हाताळले गेले आहेत. पण आजच्या घडीला अल-कायदा पेक्षा जास्त मोठा धोका इस्लामिक स्टेटचा आहे. त्यामुळे आज विचार फक्त ‘इस्लामिक स्टेटच्या मासिकाचा करायचा. हा विषय मांडताना मी कोणताही माझं मत नोंदवणार नाही. ‘दबिक़’चा अभ्यास करताना मला जे दिसलं ते मी सांगणार आहे. 

बहिरंग परीक्षण –

जुलै २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटनी त्याचं पाहिलं मासिक प्रकाशित केलं. ‘अल-हयात’ या इस्लामिक स्टेटच्या मिडिया सेंटर कडून ते प्रकाशित केलं जातं. ते इंग्लिश, फ्रेंच, अरेबिक, जर्मन, रशियन इत्यादी जागतिक भाषांमध्ये प्रकाशित होतं. प्रकाशन मुख्यतः इंटरनेटवरच होत असावं. कारण सार्वजनिक ठिकाणी कोणीही माणूस इस्लामिक स्टेटचं मासिक विकायचं धाडस करणार नाही. आतापर्यंत ‘दबिक़’ या मासिकाचे १५ अंक प्रकाशित झाले आहेत. शेवटचा अंक एप्रिल २०१६ मध्ये प्रकाशित झाला आहे. १५ मधले ६ अंक २०१४ या वर्षात प्रकाशित झाले, पुढचे ६, २०१५ मध्ये. या वर्षात केवळ ३ अंक प्रकाशित झाले आहेत. शेवटचा अंक आता जून महिन्यात प्रकाशित झाला आहे. पण तो कुठेही सापडत नाही. प्रत्यक्ष इस्लामिक स्टेटच्या अधिकृत वेबसाईट वर सुद्धा तो मिळत नाही. ‘दबिक़’ला मासिक म्हणता येणार नाही कारण ते दर महिन्याला नियमित प्रकाशित होत नाही. कधी दोन महिन्यांनी, कधी तीन महिन्यांनी, अशी अनियमितता त्यात आहे. आपण आपल्या सोयीसाठी त्याला मासिक म्हणू.  सर्व अंकांची सरासरी पृष्ठसंख्या ५५-६० इतकी आहे. पण शाब्दिक भाग वेगळा काढला तर A4 आकाराची १८-२० पानं इतका मजकूर होतो. सर्वात आधी म्हणजे अत्यंत व्यावसायिक डोकं वापरून ही मासिकं तयार केलेली आहेत. आपली मतं सांगण्यासाठी अनेक ठिकाणी फोटो, कोटेशन वापरून मासिक सजवलेलं आहे. (मासिकाचे ले-आउट लावण्याचा मला अनुभव असल्यामुळे दबिक़ तयार करताना त्यांनी घेतलेले कष्ट भरपूर आहेत, हे लक्षात येईल)  

सर्व मासिकांचा एक कोणतातरी प्रधान विषय आहे. त्यानुसार कव्हर स्टोरी, इस्लामिक स्टेटच्या बातम्या, विशेष लेख, इस्लामिक स्टेटचे अहवाल अशी समान सदरं सर्व मासिकांत आहेत. अजून एक महत्वाचं सदर आहे, ते म्हणजे ‘In The words of Enemy’ त्यामध्ये मुख्यतः पाश्चात्य जग इस्लामिक स्टेटबद्दल काय म्हणतं, हे सांगितलं आहे. उद्या जेव्हा कोणी इस्लामिक स्टेटचा इतिहास लिहायला घेतला तर त्याला या मासिकांचा खूप उपयोग होईल. आणि असा उपयोग व्हावा असं त्याचं स्वरूप आहे. सर्व मासिकांचा समान भाग म्हणजे प्रस्तानावा. सर्व अंकांना एक प्रस्तावना आहे. सर्व अंकांच्या प्रस्तावनांचे विषय अर्थात वेगळे आहेत, म्हणून प्रत्येकाचा विचार स्वतंत्र करावा लागेल. सर्व अंकांचे विषय आणि संदर्भ वेगवेगळे आहेत, त्यामुळे कोणतेही जनरल विधान करणे योग्य नाही. सर्व अंकांचा स्वतंत्र विचार पुढच्या लेखांत करण्यात येईल. पुढच्या अंकांमध्ये ‘इतिहासाच्या पानांतून’ हे सदर विशेष आहे. त्याचप्रमाणे ‘to our sisters’ हे एक महत्वाचे सदर आहे.

मासिकाच्या नावापासून आतील लेखांपर्यंत सर्व ठिकाणी या मासिकाच्या टीमने संदर्भ देण्याची पद्धत अवलंबली आहे. सर्व महत्वाच्या वाक्यांना संदर्भ दिले आहेत. ते संदर्भ कुठेही मोडतोड केलेले नाहीत. एकूण एक संदर्भ जर कोणीही सामान्य माणसाने तपासले तर ते जिथून घेतले आहेत, तसेच दबिक़मध्ये वापरण्यात आले आहेत, असं लक्षात येईल. संदर्भ देताना अर्थात मुख्यतः कुराण वापरण्यात आले आहे. पण त्याचबरोबर ज्याला ‘कुराण’चा शब्दकोश मानले जाते अशा ‘हदीस’चाही त्यांनी संदर्भ म्हणून वापर केला आहे.

(भारतीयांना आणि मुख्यतः हिंदूंना इस्लाम बद्दल अनेकदा अज्ञान असते. म्हणून काही मुद्दे आधीच सांगणे भाग आहे.) कुराण २३ वर्षाच्या काळात क्रमाक्रमानी निर्माण झाले आहे. एका शुद्ध चारित्र्याच्या एका व्यक्तीला अल्लाहनी संदेश देण्यासाठी निवडले आणि ते संदेश म्हणजे कुराण आहे. परंतू केवळ कुराण वाचायला घेतले तर काही सहसा कळत नाही. त्यासाठी दोन पूर्वअटी आहेत. प्रेषित पैगंबर यांचे चरित्र आपल्याला माहिती असावे लागते आणि प्रेषितांच्या कृती आपल्याला माहिती असाव्या लागतात. त्या ‘कृती’म्हणजे हदीस आहे. तेव्हा कुराणचा अभ्यास करताना हदीसचाही आधार घ्यावा लागतो.  प्रेषितांच्या मरणानंतर ‘खलिफा उमर दुसरा’ याच्या काळात हदीसचे संकलन सुरु झाले. ह्या संकलनाच्या वेळी प्रत्यक्ष प्रेषितांना पाहिलेली दोन माणसं जिवंत होती असं सांगितलं जातं. हदीसच्या संकलनाचे अनेकांनी प्रयत्न केले परंतु मुस्लीम जगतात त्यापैकी तीन लोकांना मानले जाते. त्यामध्ये सर्वात महत्वाचे ‘सहिह बुखारी’, सहिह मुस्लीम’, ‘अबू दावूद’ हे आहेत. इस्लामिक स्टेटनी सर्व संदर्भ या तीन लोकांच्या हदीस मधून आणि कुराणमधून दिले आहेत. आणि पुन्हा सांगतो ते संदर्भ वापरताना त्यांनी कोणत्याही प्रकारची संदर्भातली मोडतोड केलेली नाही. ‘हादीस’च्या अन्वयार्थामध्ये काही वेळेला फरक पडलेला दिसेल, पण मूळ हादीस वर कोणाचेही दुमत नाही. सर्व मुस्लीम समाज ज्याप्रमाणे कुराण मानतो, त्याच्या लगेच खालचे स्थान हादीसला आहे.

आपला विषय समजण्यासाठी इस्लामची एवढी माहिती पुरेशी आहे.

‘दबिक़’ म्हणजे काय?

‘दबिक़’ हे उत्तर सिरीयामधील एक शहर आहे. तुर्कस्तानच्या सीमेवरचा सिरीयाचा १४ वा प्रांत अॅलेप्पो या प्रांतात ‘दबिक़’हे शहर आहे. २००४ च्या गणनेनुसार शहराची लोकसंख्या ३३६४ इतकी आहे. मे २०१६ मध्ये तयार करण्यात आलेला शेवटचा नकाशा सांगतो की अजूनही ‘दबिक़’या शहरावर इस्लामिक स्टेटचे राज्य आहे. ही झाली प्रार्थमिक माहिती.

प्रेषितांच्या मृत्युनंतर खलिफा पद निर्माण झाले. मानवी स्वभावानुसार  त्या  खालाफापदासाठी वाद सुद्धा निर्माण झाले. त्या वादातून चार खिलाफाती निर्माण झाल्या. परंतु त्या सर्व इ.स. १२५८ पर्यंत टिकल्या. तेव्हा सुद्धा खलिफाच्या हातात पूर्वीसारखी ताकद नव्हती. तो केवळ नामधारी राहिला होता. त्या नामधारी खालीफाला मंगोल टोळ्यांनी थर केलं. त्याचे नातेवाईक मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी इजिप्तमध्ये जाऊन राहिले. इजिप्तमधल्या जनतेनी त्यांच्यापैकी एकाची खलिफा म्हणून निवड केली. पण तो सुद्धा नामधारीच राहिला. त्याच्याकडे राजसत्ता नव्हती. १५१७ मध्ये तुर्कस्तानच्या सुलतानाने इजिप्त जिंकलं त्या खलिफाला (म्हणजे ती खलिफाची गादी) तुर्कस्तानला नेलं आणि खलिफापद निर्माण केलं. केमाल पाषानी जे खलिफापद रद्द केलं ते हे. पण तुर्कस्तानच्या इजिप्त जिंकण्याच्या मार्गात एक लढाई या ‘दबिक़’ शहरात झाली होती. ओट्टोमान साम्राज्य आणि कैरोमधील मामलुक साम्राज्य यांच्यात ‘खलिफा’साठी  झालेली शेवटची लढाई या ‘दबिक़’ शहरात झाली होती.

‘दबिक़’ या शहराचे ऐतिहासिकदृष्ट्या हे महत्व आहेच, पण यापेक्षा जास्त महत्व त्याच्या धर्मशास्त्रातील उल्लेखाला आहे. सहिह मुस्लीम यांनी संकलित केलेल्या हादीसची संख्या ७५३६ इतकी आहे. बुखारी यांनी सुद्धा संकलित केलेल्या हादीसची संख्या सहा हजारापेक्षा जास्त आहेत. पण सहिह मुस्लीमयांच्या हदीसच्या संकलनात प्रकरण ९ मध्ये आलेलं एक हदीस आहे, त्यात ‘दबिक़’चा उल्लेख आहे. त्यामध्ये प्रेषित सांगतात की ‘रोमन सैन्य आणि इस्लामचे सैन्य यांच्यात दबिक़ शहरात लढाई होईल, त्यात मुसलमान जिंकतील आणि बायझेन्टाइन मुसलमानांच्या ताब्यात येईल. मुसलमान आणि बिगर मुसलमान यांच्यातील शेवटचे धर्मयुद्ध या ठिकाणी होणार आहे, अशी या हदीसची मांडणी आहे. अभ्यासाच्या दृष्टीने सर्वांनी मूळ हादीस वाचणे आवश्यक आहे.

सर्व अंकांच्या अनुक्रमणिकेच्या वर २००६ साली मारला गेलेला जिहादी ‘अबू-मौसब-अझ-झार्क्वाई’ यानी कोट केलेलं हेच हदीस देण्यात आलं आहे. ‘The spark has been lit here in Iraq, and it’s heat will continue to intensify – by Allah’s permission – until it burns crusader armies in Dabiq’ हा मासिकाचा हेतू म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

आत काय आहे?

दबिक़चा पहिला अंक प्रकाशित झाल्यापासून पाश्चिमात्य पत्रकार आणि अभ्यासकांचे त्याच्याकडे लक्ष आहे. सर्व अंकांचा विस्तृत तपशील आणि त्याच्या अन्वयार्थासह अनेक पत्रकारांनी लिहिलेलं आहे. एक - ‘भविष्यात इस्लामिक स्टेटला अनुयायी मिळावेत म्हणून’ आणि दोन – ‘इस्लामिक स्टेटची अद्ययावत आणि अधिकृत माहिती त्यांच्या शत्रूंना मिळावी’ या दोन हेतूंनी ‘दबिक़’ची निर्मिती होते. जर फक्त हे मुस्लीम जगतानी वाचायला पाहिजे असं इस्लामिक स्टेटला वाटत असतं तर इतर जागतिक भाषांमध्ये ‘दबिक़’ प्रकाशित करण्याची गरज नव्हती.  पहिल्या अंकाची कव्हर स्टोरी आहे ‘The Return of the Khilafah’ आणि त्यामध्ये जगातल्या सर्व मुसलमानांना हिजरत करून इस्लामिक स्टेटकडे येण्याचे आवाहन केले आहे. इकतच नव्हे तर विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना सुद्धा इस्लामिक स्टेटला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यात डॉक्टर्स, इंजिनीअर्स, वकील, पत्रकार अशा तज्ज्ञांना मुद्दाम बोलावण्यात आले आहे. पहिल्याच अंकात असं सांगण्यात आलं आहे की, खिलाफतीच्या स्थापनेनंतर आता जगाची वाटणी दोन गटांमध्ये झाली आहे. पहिला गट – इस्लाम आणि श्रद्धावान यांचा आणि दुसरा गट कुफ्र (श्रद्धाहीन) आणि हिप्पोक्रॅट लोकांचा. इस्लामिक स्टेटच्या एकूण कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक आदिवासी टोळ्यांनी इस्लामिक स्टेटला आपला पाठींबा जाहीर केला. पहिल्या अंकात अशा चार टोळ्यांची नावं आहेत. टोळ्यांनी इस्लामिक स्टेटला आपला पाठींबा जाहीर केल्यामुळे त्यांना कोणकोणते फायदे होणार आहेत, ते सुद्धा लिहिलं आहे. मानवी हक्कांची पुन्हा एकदा स्थापना होईल, मुस्लिमांचा फायदा व्हावा म्हणून पैशाची तरतूद करण्यात येईल, इस्लामिक स्टेटमध्ये लोकांना शांतता आणि स्थैर्य मिळेल, गुन्हेगरीचे प्रमाण कमी होईल, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील असे अनेक फायदे देण्यात आले आहेत. पुढच्या लेखांमध्ये विशेषत्वाने एकेका अंकावर विचार केलेला आहे. आता फक्त ओळख करून देणे हा हेतू आहे. 

अर्थात इस्लाममध्ये राज्यव्यवस्था आणि धर्मव्यवस्था यांच्यात भेद नसतो. प्रो. के.एस. रामकृष्णराव म्हणाले होते की प्रेषितांचे व्यक्तिमत्व अष्टादशपैलू होते, अनेक गुणांपैकी काहीच मला सांगता येतील. ते म्हणतात पैगंबर हे प्रेषित होते, सेनापती होते, राजा होते, योद्धा होते, व्यावसायिक होते, धर्मप्रसारक होते, तत्वज्ञानी होते, स्टेटमन होते, वक्ता होते, क्रांतिकारक होते, कायदा देणारे होते, न्यायाधीश होते, संत होते. हे इस्लामचे वैशिष्ट्य आहे.' इस्लामिक स्टेटच्या या दबिक़मध्ये त्यांचा आग्रह आहे हे सांगण्याचा की इस्लामिक स्टेट त्यांच्या अनुयायांना धार्मिक त्याचंबरोबर राजकीय नेतृत्व देईल. या दृष्टीकोनातून सर्व लेख, बातम्या लिहिल्या गेल्या आहेत. मुसलमानांना पुन्हा एकदा असे सर्वांगीण नेतृत्व मिळावे म्हणून पुन्हा एकदा खलिफा पदाची स्थापना करण्यात आली आहे. (क्रमशः)

पूर्वप्रसिद्धी - 'नवभारत सप्टेंबर २०१६' 


No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....