Tuesday 25 July 2017

‘सलाफी’इझम – आक्रमक इस्लाम की तात्विक इस्लाम?


२०१४ च्या जून मध्ये पूर्वीच्या इस्लामिक स्टेट नावाच्या एका संघटनेनी ‘अबू बक्र अल-बगदादी’ याच्या नेतृत्वाखाली इराक आणि सीरियाच्या मोठ्या प्रदेशावर खिलाफत स्थापन केली. सुरवातीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी अमेरिकी शास्त्रांच्या आधारे विजयसुद्धा मिळवले. जगातली दोन मोठ्या खनिज तेलाच्या विहिरी त्यांच्या ताब्यात होत्या. मोठ्या प्रमाणावर बिगर मुसलमानांच्या कत्तली, धर्मांतरं, बलात्कार त्यांनी केले. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया’ने स्थापन केलेली खिलाफत हा जगासमोरचा एक मोठा प्रश्न बनला होता. आता अमेरिका, सिरीया, तुर्कस्तान, रशिया आणि अन्य देशांच्या मदतीने आयसीसचा प्रभाव कमी करत करत ती खिलाफत नष्ट करण्याचे प्रयन्त यशस्वी होताना दिसत आहेत. ती आनंदाचीच गोष्ट आहे. पण अल कायदा किंवा आयसीसच्या पूर्वीच्या अतिरेकी संघटना आणि आयसीस यातला एक मुख्य फरक असा आहे की, आयसीसला अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी इराक सिरीया मधून प्रशिक्षित झालेला दहशतवादी अमेरिकेत पाठवावा लागत नाही. अमेरिकेतलाच एक माणूस गोळीबार करतो, खून पडतो आणि त्याची जबाबदारी आयसीस स्वीकारते. युरोपात झालेले अनेक हल्ले हेच सांगतात. आयसीसचा खूप मोठा धोका युरोपीय आणि अमेरिकन पत्रकार आणि अभ्यासकांनी ओळखला आणि त्यांचा अभ्यास सुरु झाला. नियतकालिकातून लेख सुरु झाले, शेकड्यांनी पुस्तकं प्रकाशित झाली. भारतात त्याबाबतीत उदासीनता होती.

जसा आयसीसच्या अर्थकारण, ब्रेनवॉशींग, इतिहास अशा अभ्यास सुरु झाला तेव्हाच आयसीसचे प्रेरणा स्थान नेमके काय आहे, असा सुद्धा अभ्यास सुरु झाला. अनेक नियतकालिकांनी, वृत्तपत्रांनी आयसीसचे मूळ सलाफी पंथात आहे असे दिले. अनेक अर्थानी ते योग्य आहे. पण ‘सलाफी’ म्हणजे काय हे सांगण्यात अनेकांनी घोडचूक केलेली आहे. यातून फॉरेन अफेअर्स सुद्धा सुटलेले नाहीत. त्यांच्याबरोबर न्यूयॉर्क टाईम्स, द इकोनॉमिस्ट पर्यंत सगळे फसलेले आहेत. आणि मी इतका मोठा क्लेम कश्याच्या आधारे करतो आहे हे पुढे मी सांगणार आहेच. त्यासाठी ‘सलाफी’इझम म्हणजे काय, सुरवात कुठे झाली इथपासून सर्व मी सांगणे गरजेचे आहे.

‘सलाफी’म्हणेज मूळ शांततावादी इस्लामचा चुकीचा अन्वयार्थ लावलेला आक्रमक आणि जिहादी पंथ इतकी ‘सलाफीइझम’ ची बोळवण अनेकांनी केली आहे. सलाफीइझमच्या थोडंस खोलात शिरून विचार करणे गरजेचे आहे.
‘सलाफ’ या मूळ अरेबिक शब्दाचा अर्थ ‘अनुयानी’ किंवा ‘सहकारी’ असा होतो. ‘सलाफ’ हा प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या हादीसमध्ये अनेकदा येतो. अर्थात तो थेट ‘सलाफ’ असा शब्द असेल असे नाही. ‘सलाफ’ हा शब्द हादीसमध्ये प्रेषित पैगंबरयांचे ‘अनुयायी’ किंवा ‘सहकारी’ या अर्थाने वापरला गेला आहे. असे सहकारी ज्यांना प्रेशितांबरोबर वावरण्याची संधी मिळाली होती, प्रेशितांबरोबर बोलण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे प्रेषित पैगंबर यांच्यानंतर इस्लामचे आकलन त्यांचे अचूक असले पाहिजे असे गृहीत धरले आहे. प्रेषितांनी सुद्धा एका हादीसमध्ये असे सांगितले आहे कि, माझ्या पिढीची माणसं ही बेस्ट आहेत, त्यांच्यानंतर येणारी पिढी ही तितकीच बेस्ट आहे, आणि त्यानंतर येणारी पिढी’सुद्धा. सहिह बुखारी (हादीस क्रमांक – ६४२९, २६५२) यांनी दोन ठिकाणी हे हादीस नोंदवलं आहे. प्रेषित ज्या पिढीचे होते ती पिढी धरून येणाऱ्या तीन पिढ्या ही पृथ्वीवरची बेस्ट ‘सर्वोत्कृष्ट’ माणसं असणार आहेत असं प्रेषितांनी नोंदवून ठेवलं आहे. (The best people are those of my century (generation), and then those who will come after them [the next century (generation)], and then those who will come after them [i.e., the next century) (generation)) (हे ते मूळ हादिस मधील वाक्य आहे) या तीन पिढ्यांच्या माणसांना ‘सलाफ’ म्हणतात. शिवाय सलाफ म्हणजे अनुयायी असा प्रेषितांच्या तोंडून झालेला उच्चार सुद्धा सहिह बुखारी यांनीच नोंदवून ठेवला आहे. बुखारी यांनी नोंदवलेलं हादीस (क्रमांक – ६२८५ आणि ६२८६) त्यात प्रेषित म्हणतात ‘So, be afraid of Allah, and be patient, for I am the best predecessor (salaf) for you (in the Hereafter).

थेट ‘सलाफ’ या शब्दाशिवाय सुद्धा अनेक ठिकाणी या अर्थाने हा शब्द वापरला गेला आहे, असे इस्लामी पंडित सांगतात. त्याचे संदर्भ हे हादीस मध्येच सापडतात. सुन्नी मुसलमान हे हादिस सर्वात पवित्र मानतात असे एकूण सहा संकलक आहेत. ज्यांनी प्रेषितांच्या कृती आणि उक्ती अतिशय परिश्रमपूर्वक गोळा केल्या आणि त्यांचे संकलन केले. त्यामध्ये सहिह बुखारी, सहीह मुस्लीम, अबू दावूद, जमी अत-त्रीमिधी, इब्न मजह आणि सुन्ना अन निसाई. या सहांपैकी जमी अत-त्रीमिधी आणि इब्न मजह यांनी नोंदवलेले काही हादीस मुद्दाम वाचण्यासारखे आहेत. प्रेषित मुहंमद सांगतात कि, ‘ज्यू धर्मात पुढे ७१ पंथ पडले, तसेच ख्रिश्चनांनमध्ये ७२ पंथ पडले. तसेच इस्लाममध्ये सुद्धा ७३ पंथ पडणार आहे’ (जमी अत-त्रीमिधी हादीस क्रमांक – २६४०) पण याबद्दल केवळ या एकमेव हादीस वाचून आकलन होणार नाही. इब्न मजह यांनी या प्रकारचे दोन हादीस नोंदवलेले आहे (क्रमांक – ३९९१ आणि ३९९२) त्यात प्रेषित सांगतात, ‘ज्यू धर्मात पुढे ७१ पंथ पडले, तसेच ख्रिश्चनांनमध्ये ७२ पंथ पडले. तसेच इस्लाममध्ये सुद्धा ७३ पंथ पडणार आहेत. त्यापैकी ७२ पंथाचे लोक नरकात जातील. अर्थात ते तिथे (नरकात) कायम राहणार नाहीत. पण एकच पंथ प्रेषितांच्या बरोबर थेट स्वर्गात जाईल’ इतर ७२ पंथाचे लोक नरकात जाऊन यातना भोगून पापक्षालन झाल्यानंतर स्वर्गात जातील. जो एक पंथ थेट स्वर्गात जाईल त्याला हादीस मध्ये ‘the main body’ ऑफ इस्लाम असे म्हणलेले आहे. अनेक इस्लामी पंडित एकमताने या ‘the main body’ ऑफ इस्लाम’ चा अर्थ ‘सलाफ’ असा लावतात.

‘सलाफी’ हा इझम होण्याची कारणं मात्र वेगळी आहेत. इसविसन १२५८ मध्ये मंगोल टोळ्यांनी बगदाद येथे असलेली अब्बासी खिलाफत नष्ट केली. त्याच्या पाच वर्षानंतर आताच्या तुर्कस्तानच्या दक्षिण टोकाचे गाव हर्रान येथे जन्म झाला ‘इब्न तामिया’याचा. शरियाचे अन्वयार्थ लावणाऱ्या ज्या चार परंपरा आहे त्यापैकी एक हंबाली पंथाचा हा एक मोठा विचारवंत होऊन गेला. मंगोल टोळ्यांमुळे इस्लामी राज्याची नासधूस झाली होती. आणि पुन्हा एकदा इस्लामच्या आदर्श तत्वावर राज्य उभे करायचे असल्यास काय केले पाहिजे, याचा विचार करून त्याने काही मार्गदर्शक तत्व मांडून दिली. ती साधारणपणे ‘कुराण आणि हादिस’ चा शब्दशः अन्वयार्थ लावण्याची पद्धत होती. आणि आदर्श इस्लामी राज्य म्हणजे जे प्रेषितांनी निर्माण केलं, शरियतनुसार चालणारं, हादीस आणि कुराण नुसार चालणारे राज्य हेच खरं इस्लामी राज्य हा साधा विचार त्याने मांडला. त्याच्या विचारात कुठेही ‘सलाफीइझम’ असा शब्द नाही. पण आधुनिक मुस्लीम पंडित ‘इब्न तामिया’ला सलाफीइझमचा प्रणेता मानतात. ‘सलाफ’ हा शब्द राजकीय चळवळीच्या दृष्टीनी प्रथम पॅन इस्लामी चळवळीचा प्रणेता ‘जमाल उद दीन अफगाणी’ याचा शिष्य ‘मुहंमद अब्दूह’ याने वापरला. पण हादीस मध्ये आणि इस्लामी प्रार्थमिक साहित्यात हा शब्द आधीपासून दिसतोच. इब्न तामिया याने लिहिलेल्या ‘मजमू अल फतवा’ या ग्रंथात तो लिहितो, ‘सलाफी धर्म तुम्ही निवडलात तर कोणीही तुमच्यावर टीका करणार नाही, कारण तो धर्म उद्दात्त धेय्यासाठी असेल. सलाफी धर्म हा सत्याशिवाय (मूळ इस्लामच्या संदेशापेक्षा) वेगळा असा नाहीच आहे.’ मुहंमद बीन अब्दुल वहाब लिहितो, ‘We are, and praise be to Allaah, followers and not innovators. We are followers of the Book and Sunnah and of the Righteous Salaf of this Ummah

‘सलाफीइझम’ म्हणजे प्रेषित पैगंबर, कुराण, हादीस आणि प्रेषितांचे जवळचे सहकारी यांच्या तत्त्वांनुसार राज्य चालावे असा आग्रह धरणारी राजकीय चळवळ आहे. ‘इब्न तामिया’ याला सलाफीइझमचा प्रणेता मानतात. परंतु त्याची तात्विक मांडणी केली आहे अठराव्या शतकातील इस्लामी धर्मसुधारक ‘मुहंमद बीन अब्दुल वहाब’. त्याची मांडणी वेगळी नाही, इब्न तामियाप्रमाणेच त्याने मांडणी केली आहे. आज ज्याला वहाबीइझम म्हणून ओळखले जाते त्याची सुरवात या मुहंमद बीन अब्दुल वहाब’ याने केलेली आहे. आज ज्याला वहाबीझम म्हणले जाते त्यात आणि सलाफीझम म्हंटले जाते त्यात फारसा फरक नाही. या वहाबनेच ‘मुहंमद बीन सौद’ याच्या बरोबरीने पहिल्या सौदी स्टेटची स्थापना केली होती. मुहंमद बीन सौद हाच पहिल्या सौदी राज्याचा राजा बनला. सौदी अरेबियाच्या सर्व धार्मिक मांडणीमागे सर्व तात्विक पाठबळ मुहंमद बीन अब्दुल वहाब’ याचे आहे.  

मी सुरवातीला सांगितले की ‘सलाफी’ म्हणेज नेमकं काय हे समजावून सांगण्यात सर्व मोठी नियतकालिकं फसलेली आहेत. ते सांगतात की, सलाफी हे इस्लामचे विकृत आक्रमक स्वरूप आहे. पण तुम्ही इब्न तामिया, मुहंमद हयात इब्न इब्राहीम अल सिंधी, इब्न अल कयीमीन, मुहंमद बीन अब्दुल वहाब हे सलाफी किंवा वहाबी पंथाचे संस्थापक लोकं आहेत. त्यांची मांडणी बघा, आदर्श इस्लामी राज्य हे प्रेषितांचे हादीस, कुराण, आणि प्रेषितांचे सहकारी (सलाफ) यांच्यानुसार चालणारे असेल अशीच मांडणी ते करतात. सगळेच बिगर इस्लामी पंडित सुद्धा हीच मांडणी करतात. ही चुकीची मांडणी आहे असं मला वाटत. सर्व नियतकालिकं ‘सलाफी’ इस्लामवर टीका करताना हे विसरतात कि प्रेषित स्वतःला सलाफ म्हणवून घेत असत. त्यामुळे अनेक अर्थांनी ‘सलाफीइझम’ ही संकल्पना आधुनिक काळाचं आपत्य आहे असं समजण्याचं कारण नाही.  

फ्रंटलाईन सारख्या आघाडीच्या आणि प्रतिष्ठित मध्यमानेसुद्धा ‘सलाफ’ या शब्दाचा अर्थ ‘the ancient one’ असा लिहिलेला आहे. याचे अर्थ दोन होतात. एक अरबी लिपी आणि भाषा यांचे आकलन चुकलेलं आहे, किंवा ‘सलाफ’ ही संकल्पना फक्त अल कायदा आणि तत्सम इस्लामी दहशतवादी संघटना यांचा अभ्यास करून त्यांनी अभ्यासलेली आहे. एका मर्यादित दृष्टीने अभ्यास केल्यामुळे ही आकालानातली मर्यादा अनेक माध्यमांना पडलेली आहे. एक असा अभ्यासाचा नवा मार्ग विचारात घेता येऊ शकतो का, असा मला प्रश्न विचारायचा आहे. की इस्लामचा अभ्यास करताना प्रत्येक संकल्पनेला इस्लामी धर्मशास्त्रात आधार आहे का, हे पहिले पाहिजे. म्हणजे अभ्यासाचे एकाच वेळी दोन मार्ग समोर येतात. एक आज मुसलमान लोक कसे वागतात आणि दोन धर्म त्याबद्दल काय सांगतो. ‘सलाफ’चेच उदाहरण आपण घेऊ. आज सलाफी म्हणून आपण ज्याला ओळखतो त्याला धर्मात काही आधार आहे का? याचं उत्तर वरच्या परिच्छेदात दिलेलं आहे. आता ‘सलाफ’ या बद्दल लोकं काय विचार करतात. या पैकी ‘लोकं’ कसा विचार करतात याची अनेक अर्थानी उत्तरं फ्रंटलाईन, फॉरेन अफेअर्स, द इकॉनॉमिस्ट, न्यूयॉर्क टाईम्स सारख्या दर्जेदार माध्यमांनी दिलेली आहेत. त्या विशिष्ट संकल्पनेला धर्मात आधार आहे का, याचा आता शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे असं मला वाटत.

सलाफीझम, वहाबीझम यांच्या तात्विक मांडणीत आणि आदर्श इस्लामी राज्याच्या तात्विक मांडणीत फरक आहे का? असला तर काय आहे, असा एकदा विचार करून बघा .. इथे वहाबीझम आणि सलाफीझम म्हणजे लोकं कशी मांडणी करतात असा अर्थ अभिप्रेत आहे. त्याच्याबरोबर आदर्श इस्लामी राज्य म्हणजे धर्माची मांडणी कशी आहे असा अर्थ अभिप्रेत आहे.

-       मुकुल रणभोर  © 
-       mukulranbhor.blogspot.in

-       mukulranbhor111@gmail.com

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....