Saturday, 8 August 2015

श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र

    Hindu Philosophy Of Life, Ethics and Religion


       २०१४ हे साल टिळक मंडालेहून सुटून आल्याचे शताब्दी वर्ष आहे. ८ जून १९१४ रोजी त्यांची मंडालेहून सुटका झाली. १४-१५ जून १९१४ रोजी त्यांनी भारताचा किनारा गाठला. म्हणजे ‘गीतारहस्य’ या ग्रंथालाही या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली. असे म्हटले जाते की १८९२ साली टिळक मुंबईहून पुण्याला येत असताना रेल्वेच्या त्याच डब्यात विवेकानंद सुद्धा होते. मुंबई- पुणे प्रवासादरम्यान ज्या अनेक विषयांवर दोघांध्ये चर्चा झाली त्यामध्ये भगवद्गीतेवरही चर्चा झाली. शेवटी समरांगाणामध्ये गीता सांगितली गेली. या मुद्द्यावर दोघांचेही एक समान मत होते ते म्हणजे, ‘सगळे सैन्य युद्धासाठी उभे असताना, सभेत उभे राहून भाषण करावे तसे भगवंतानी भाषण केले नसेल. श्रीकृष्ण नावाचा कोणीतरी एक विचारवंत झाला, त्याच्या प्रतिभेतून स्फुरणार्‍या विचारांचे संकलन व्यासांसारख्या महाऋषींनी केले आणि संदर्भांचे एक कोंदण त्याला दिले गेले. प्रत्यक्षात युद्ध आणि भगवद्गीतेचे उच्चारण स्वतंत्रपणे झाले असेल. गीतेचा बाकीचा तपशील गौण लेखून त्याचे पुन्हा विवरण केले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या देशाच्या उभारणीसाठी, आधुनिक पायाच्या बांधणीसाठी गीता लोकांना समजावून दिली पाहिजे.’ त्यावर दोघांनीही एकमेकांना वेळ मिळाल्यावर ह्या विषयावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्‍वासन दिले. तो वेळ विवेकानंदांना मिळालाच नाही पण लोकमान्यांना मात्र मंडालेत मिळाला.
      गीतारहस्याची एकूण रचना पाहताना असे लक्षात येते की जितका महत्त्वाचा ग्रंथ आहे तितकीच तो ग्रंथ लिहिण्यामागची प्रेरणा महत्त्वाची आहे. शतकानुशतके भारतीय समाज ‘कर्मसंन्यास’ या तत्त्वाच्या प्रभावाखाली होता. याचे कारण आदि शंकराचार्य यांचे ‘शांकरभाष्य’, जे गीतेवरचे उपलब्ध पहिले भाष्य किंवा टीका आहे, आणि त्यात शंकराचार्यांनी गीतेचा मूळ गाभा ‘अद्वैत वेदांता’चा असल्याचा सिद्धांत मांडला होता. ते भाष्य भारतीय समाजमानसात श्रेष्ठ ठरले. यानंतर रामानुजाचार्य यांनी गीतेवर टीकाग्रंथ लिहिला. त्यात गीतेचा मूळ गाभा ‘द्वै’ती असल्याचा दावा त्यांनी केला. नंतर मध्वाचार्य यांनी तो गाभा ‘विशिष्टाद्वैताचा’असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वरांनी गीता मराठीमध्ये आणली. पण गीतेध्ये मुख्य विवेचन ‘नारायणी धर्माचे’ असल्याचे त्यांनी सांगितले. याच मालिकेत अनेक महात्म्यांनी गीतेवर टीकाग्रंथ लिहिले. त्यामध्ये विनोबा आहेत, गांधीजी आहेत, योगी अरविंद आहेत. याच मालिकेत लोकमान्यही येतात. जसा ज्ञानेश्वरांचा ‘नारायणी धर्म’, गांधीजींचा ‘अनासक्ती योग’, त्याच मालिकेत लोकमान्यांचे ‘कर्मयोगशास्त्र’. या सर्वांध्ये कर्मयोगशास्त्राचे म्हणून एक वेगळ स्थान आहे ते अशासाठी कि या ग्रंथाचे लिखाण करताना लेाकमान्यांसमोर दोन प्रकारचे वाचक आहेत. एक सनातनी ब्राम्हण वर्ग ज्यांचा ‘प्रस्थानत्रायीं’चा उत्तम अभ्यास आहे. ज्यांच्यासाठी गीता रोजच्या पठणातील गोष्ट आहे. दुसरी पाश्‍चात्त्यविद्याविभूषित नवीन पिढी, ज्यांनी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आहे. त्यांनी आधुनिक नीतिशास्त्र अभ्यासले आहे आणि म्हणून या ग्रंथाचे नाव Hindu Philosophy Of Life, Ethics and Religion असं आहे. जी आधुनिक पिढी पाश्‍चात्त्यविद्याविभूषित म्हणून या देशात आली, ती असेही शिकून आली की भारताकडे ‘नीतिशास्त्र’ नाही. भारताकडे फक्त वैराग्य, संन्यासी वृत्ती एवढंच आहे त्यांच्यासाठी गीतारहस्य म्हणजे एथिक्सचा भारतीय धडा आहे, कारण यामध्ये पाश्‍चात्त्य समाजशास्त्र आणि समाजविज्ञान यांची उदाहरणं दिलेली आहेत. गीतेचे बहिरंगपरीक्षण, मूळ संस्कृत श्‍लोक, मराठी भाषांतर, अर्थनिर्णायक टीपा, पौर्वात्य आणि पाश्‍चिमात्त्य विद्वानांच्या मतांची तुलना अशी या ग्रंथाची रचना आहे.
      मोक्ष ही कमालीची व्यक्तिनिष्ठ कल्पना आहे तिला समाजनिष्ठ करण्याचे काम भागवतधर्माने केले परंतु टिळकांच्या मते भागवतधर्मसुद्धा पुढे निवृत्तीमार्गी म्हणजे व्यक्तीनिष्ठ झाला. राष्ट्रनिर्मितीसाठी सर्व समाज ज्याप्रमाणे एकरूप झाला पाहिजे, त्याप्रमाणे तो कर्मप्रवण झाला पाहिजे, अशी टिळकांची भूमिका आहे. गीतेतला मूळ भागवतधर्म हाच तो कर्मयोग, असे टिळकांचे म्हणणे होते. भागवतपुराणाचा भागवतधर्मही गीतेहून निराळा आहे. तो निवृत्तिमार्गी आहे. आपण जी भक्ती चळवळ म्हणतो त्या भक्त चळवळीने तो भागवतपुराणातील निवृत्तिमार्गी भागवतधर्माचा प्रसार केला. त्यामुळे फक्त पारलौकिक बाबींमध्ये समानता आली. राजकीय क्षेत्रात समाज एकरूप होऊ शकला नाही. यासाठी जे राष्ट्र पारतंत्र्यात आहे त्याच्या अभ्युदयासाठी म्हणून मूळ भारतीय असलेले एक नीतिशास्त्र, आधुनिक विज्ञानावर आधारलेले, गीतेतल्या मूळ भागवत धर्मावर आधारलेलं विश्‍लेषण टिळकांना सादर करायचे होते. ते गीतारहस्याच्यारूपाने आपल्यासमोर आहे.
                To be or not to be  हा प्रश्‍न जसा हॅम्लेटला पडला तसाच प्रश्‍न भारतीय युद्धाच्या प्रारंभी अर्जुनाला पडलेला आहे, जसा अर्जुनावर प्रसंग आला तसे सामान्य माणसाच्याही आयुष्यात रोजच्या जीवनात असे प्रसंग येत असतात आणि अर्जुनासारखेच आपणही सर्व सोडून द्यायची भाषा करतो. पण ज्यांना समाजात राहूनही आपली कर्तव्ये धर्माने आणि नीतीने बजावायची आहेत त्यांना कर्मजिज्ञासा असणे स्वाभाविक आहे. खरंच संसार इतका अवघड आहे का? माणसाला नेके काय हवेय? आयुष्य संगीतमय एखाद्या मैफिलीसारखे करता येणार नाही का? व.पु.काळे यांनी कर्मजिज्ञासेवर फार सुंदर भाष्य केले आहे. ते म्हणतात, ‘आपल्यापूर्वीही जग होते आपल्यानंतरही असणार आहे. अवाढव्य रंगमंचावर आपली एण्ट्री मध्ये केव्हातरी होते आणि एक्झिटसुद्धा अशीच अचानक. किती काळ आपल्याला आपली भूमिका बजावायची आहे ते माहीत नाही. धडधाकट भूमिका मिळणार का जन्मांधळेपणाची, अपंगत्वाची की शाप बुद्धीचे वरदान लाभलेली? सगळेच अज्ञात. तरी माणसाचा गर्व, दंभ लालसा किती सांगावी? श्रीकृष्णांनी आपल्याला बासरीसहित पाठवले. त्यातून आपल्याला संगीत निर्माण करता येत नाही तर त्यातून षड्रिरपू प्रकट होतात. संगीत का निर्माण करू शकत नाही याचे उत्तर गीता कायम देत राहील.’ कोणते कर्म योग्य, कोणते अयोग्य. कोणते नैतिक, कोणते अनैतिक, या संभ्राचे नाव आहे कर्मजिज्ञासा. आणि हेचगीतेचे महात्म्य आहे की नुसत्या मोक्षशास्त्राचा हा ग्रंथ नसून वेदांतातील गहन तत्त्वज्ञानाच्या  आधारे कार्याकार्यव्यवस्थित म्हणजे कर्मजिज्ञासेचे उत्तर देणारा गीतेइतका प्रभावी ग्रंथ संस्कृत किंवा अन्य वा़ङ्मयात नाही. कर्मजिज्ञासा या विषयावरचे विवेचन ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात आहे.
                पुढचे प्रकरण थेट ‘कर्मयोगशास्त्र’ याचेच विवेचन आहे. जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय जर शास्त्राचा अभ्यास केला तर कोणीच त्या क्षेत्रातला अधिकारी पुरूष होऊ शकत नाही. ती जिज्ञासा उत्पन्न करण्याच काम पहिल्या प्रकरणात आणि दुसर्‍यामध्ये मूळ शास्त्र. कर्मयोगाचे. एकच कर्म करण्याचे जे अनेक योग, साधने किंवा मार्ग असतात त्यापैकी पराकाष्ठेचा चांगला व शुद्ध मार्ग कोणता, तो नेहमी आचरता येईल का नाही, नसल्यास त्याला अपवाद कोणते, ते का निर्माण होतात?  आपण जो मार्ग चांगला समजतो तो का चांगला किंवा जो मार्ग वाईट मानला गेला तो का वाईट? कर्माचा चांगलेवाईटपणा कशाच्या आधारे ठरवतात? सर्व कर्माचे मूळ काय? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे ज्या शास्त्राच्या आधारे काढली जातात त्यास ‘कर्मयोगशास्त्र’ किंवा गीतेतल्या संक्षिप्त रूपाप्रमाणे नुसते ‘योगशास्त्र’ म्हटले जाते. संत तुकाराम आणि सगळ्याच संतांपासून आईनस्टाईनपर्यंत सर्वांनीच या सृष्टीचे वर्णन ‘नामरूपांचे’ असे केले आहे. त्यामुळे कर्मयोगशास्त्राच्या अभ्यासाचे आधुनिक परिभाषेनुसार तीन प्रकारे अध्ययन करता येते. एक आधिभौतिक, दोन आधिदैविक आणि तीन आध्यात्मिक. यानुसार तीनही परिभाषांधून टिळकांनी कर्मयोगशास्त्राची चर्चा केलेली आहे. याच प्रकरणात पुढे इतिहासातील आणि विशेषतः समकालीन भारतामध्ये जी सर्वात चुकीची समजली गलेली कल्पना ‘धर्म’ याचे विवरण आहे. तो धर्म फक्त रिलीजन या अर्थाने धर्म नव्हे तर कर्तव्य किंवा दिलेलं किंवा जाणीवपूर्वक निवडलेलं काम होय. जगावर निरपेक्ष प्रे करणे हा संतांचा, आईचा धर्म आहे. डंख मारणे हा सापाचा धर्म आहे. या अर्थाने टिळकांनी धर्म या संकल्पनेचे विश्‍लेषण केलेले आहे. कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करण्याचे तीन मार्ग त्या तीनही मार्गांची सविस्तरपणे चर्चा तीन स्वतंत्र प्रकरणांध्ये केलेली आहे. पुढची अनुक्रमे तीन प्रकरणे अशी आहेत. आधिभौतिक सुखवाद, आधिदैविक आणि सुखदुःखविवेक आणि अधात्म्य.
                भारतीय शास्त्रकारांनी सर्व शास्त्रांचा अध्ययनासाठी श्रेष्ठ मार्ग अध्यात्म असल्याचे म्हटले आहे, परंतु आधुनिक काळी त्याची पुनर्मांडणी करण्यासाठी वरील दोन्हीही परिभाषांधून टिळकांनी कर्मयोगशास्त्राचे विश्‍लेषण केलेले आहे. त्यातील पहिला आहे आधिभौतिक सुखवाद. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्यफळ पाहून नीतीचा, अनीतीचा निर्णय करणार्‍या गटास टिळक आधिभौतिक सुखवाद म्हणतात. बाह्य फळावर मोहित होऊन कामाचा विचार करणे अनीतीचे मानण्याचे काही कारण नाही असे टिळक म्हणतात. मिल्ल, स्पेन्सर, कान्ट वगैरे लोकांचे सर्व ग्रंथ वाचनीय आणि विचारप्रवर्तक आहेत याबद्दल कोणताही संशय असण्याचे कारण नाही. असे असूनसुद्धा पाश्‍चिमात्य विचाराचे भारतीय विचारांशी असलेले मतभेद मुख्य धागा घेऊन या प्रकरणातील एकूण चर्चा आहे. ही चर्चा म्हणजे मला वाटते की नीतिशास्त्राचा भारतीय धडा आहे. ही चर्चा चात्वाकापासून हॉब्ज आणि हेल्वेशियस यांच्यापर्यंत जाऊन पोचते.
                ज्या एका सूत्राने म्हणा किंवा तत्त्वाने विचार करण्याची दिशाच बदलली, ते तत्त्व म्हणजे Greatest good Of Greatest number, म्हणजे पुष्कळांचे पुष्कळ सुख किंवा हित. परंतु सुख आणि हित या दोन शब्दांच्या अर्थांध्ये बराच भेद आहे. पुष्कळांचे पुष्कळ सुख आहे असे गृहित धरून चालले तरीसुद्धा कार्यनिर्णयाच्या कामी बर्‍याच अडचणी निर्माण होतात. उदा. पांडवांच्या सात, तर कौरवांच्या अकरा अक्षौहिणी, म्हणून पांडवांचा पराजय झाला असता तर या अकरा अक्षौहिणी सैन्याचे सुख झाले असते. परंतु या युक्तीवादाने पांडवांच्या पक्षावर अन्याय होता असे म्हणता येईल काय? लाखो दुर्जनांना सुख होईल त्यापेक्षा एकाचे का होईना, पण सज्जनाला ज्यामुळे संतोष होईल तेच खरे कर्म होय असे व्यवहारात सर्व लोक समजतात. असे केले म्हणजे पुष्कळांचे पुष्कळ बाह्य सुख असे नीतिमत्तेचे परीक्षेचे साधन होते. येशू किंवा सॉक्रेटिस हे दोघेही परिणामकारक असा उपदेश लोकांना करत होते. परंतु त्यांच्या देशबांधवांनी त्यांना समाजाचे शत्रू म्हणून मृत्यूची शिक्षा दिली. पुष्कळांचे पुष्कळ सुख हे तत्त्व जरी मान्य केले तरी कशात लोकांचे सुख आहे हे ठरवणार कोण? केवळ संख्या हे नीती-अनीती ठरवण्याचे साधन होता कामा नये. पुष्कळांचे पुष्कळ सुख कशात आहे हे ठरवण्याचे कोणतेही बाह्य साधन उपलब्ध नाही. यापेक्षा अधिक निश्‍चित व निर्दोष तत्त्व शोधून काढले पाहिजे, असे टिळकांचे म्हणणे आहे. भगवद्गीतेच्या आरंभी ‘कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ’ असा अभिप्राय आलेला आहे. ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख’ या आधिभौतिक पंथात माणसाच्या बुद्धीचा काहीच विचार होत नाही, हा सर्वात मोठा दोष या पंथाचा आहे असे टिळक म्हणतात. या प्रकारची चर्चा पाश्‍चिमात्त्य मतांचा आधार घेऊन आणि आदर करून झाल्यावर, पण भारतीय विचार ‘पुष्कळांचे पुष्कळ सुख’ या कल्पनेच्या पुढे किती सखोल विचार करतो याचे विश्‍लेषण या प्रकरणात केलेले आहे. महाभारतात धर्म, अर्थ, काम, मोक्ष इ. पुरुषार्थ प्राप्त करून देणार्‍या सर्व धर्माचे विवेचन केल्यावर अखेर व्यासांनी लिहिले आहे की,‘सुखदुःख अनित्य, पण धर्म नित्य आहेत; म्हणून सुखेच्छेने, भयाने, लोभाने किंवा प्राण जावयाचा असला तरी धर्म कधीही सोडू नये.’ अनित्य सुखदुःखाचा विचार करीत न बसता, नित्य जीवाची धर्माशीच जोड घालून दिली पाहिजे असा व्यासांचा उपदेश आहे.
      विवेकाशिवाय आनंद Pleasure without Conscience हे गांधीजींच्या ७ सामाजिक पातकांपैकी एक पातक आहे. माणूस हा आनंद, सुख, समाधान यांसाठी जगत असतो असे म्हणतात. ते सुख किंवा समाधान दुसर्‍याला दुःख देऊन आपण मिळवत नाही ना? आपल्या सुखासाठी आपण दुसर्‍याचे शोषण करत नाही ना? याचे साधेसोपे नाव आहे ‘सुखदुःखविवेक पूर्ण एक प्रकरण टिळकांनी यासाठी खर्च केले आहे. मुळात हा ग्रंथ गीतेवरचा भाष्यग्रंथ असल्यामुळे आध्यात्मिक, पारलौकिक बाबींचा विचार मुख्यत्वे केलेला आहे. आत्मिक सुख, अद्वैताचा साक्षात्कार हेच सुखाचे मापदंड असू शकतात, असा एकूण सूर आहे. गौतम बुद्धांच्या सिद्धांताप्रमाणे आयुष्य दुःखमय आहे, तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, तृष्णेवर विजय म्हणजे दुःखांवर विजय आणि तृष्णेवर विजय कसा मिळवायचा तर अष्टांग मार्गाने. हा सिद्धांत फक्त पारलौकिक किंवा आत्मिक सुखासाठीच आहे असे नव्हे तर व्यावहारिक पातळीवर सुखप्राप्तीसाठी सुद्धा हाच मार्ग आदर्श आहे असे टिळकांचे म्हणणे आहे.
      एकेक विषय लोकमान्य आपल्यासमोर मोठ्या कुशलतेने उलगडून दाखवतात. संख्याशास्त्र, विश्‍वाचा उदय आणि अस्त, कापिलसांख्यशास्त्र, क्षराक्षरविचार (म्हणजे शरीर आणि शरीराचा मालक म्हणजे अधिष्ठाता), अध्यात्म, आत्मस्वातंत्र्य, संन्यास आणि कर्मयोग इत्यादी आणि अशा अनेक विषयांवर टिळकांनी विस्तृत विवेचन केले आहे. याच्या लेखनासाठी टिळकांनी गीतेवरील उपलब्ध सर्व भाष्यग्रंथ, टीकाग्रंथ आणि संस्कृत साहित्य तर वाचलेच पण बौद्ध धर्मग्रंथ जे मूलतः पाली भाषेतून आहेत, त्यासाठी टिळक पाली शिकले. जर्मन ग्रंथ वाचण्यासाठी जर्मन शिकले, फ्रेंच शिकले. टिळकांनी मंडालेध्ये जर्मन, फ्रेंच, पाली, इंग्लिश इत्यादी भाषांधले साडेतीनशेपेक्षाही जास्त ग्रंथ मागवून घेतले होते. या ग्रंथाच्या लेखनासाठी टिळक वयाच्या पन्नाशीनंतर तीन सर्वस्वी नवीन भाषा शिकले. भगवद्गीता ही एवढीच एकमेव गीता नसून किमान ३० वेगवेगळ्या गीता आहेत, त्या सर्व त्यांनी वाचल्या होत्या. ग्रंथाच्या अगदी सुरुवातीला ‘हिंदू धर्मग्रंथाची सामान्य माहिती’ या नावाच एक प्रकरण आहे. त्यामध्ये वेद (४), संहिता (४), ब्राम्हणे (६), उपनिषदे (२७), स्मृती (३), सूत्रे (१७), कारिका (१), व्याकरण (१), इतिहास (२), पुराणे (१८), गीता (२५), पाली ग्रंथ (२१) इत्यादी संस्कृत ग्रंथ त्यानी वाचले आहेत त्यांची सूची दिलेली आहे. गीतारहस्याचे मूळ हस्तलिखित त्यांनी दीड महिन्यात शिसपेन्सिलने लिहून काढले. याचा अर्थ संपूर्ण ग्रंथाची रचना त्यांच्या डोक्यात तयार होती. गीतारहस्याचा जन्म हीच एक थरारक गोष्ट आहे आणि तो थरार ग्रंथ वाचताना जाणवतो.

लेखक : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
प्रकाशक : ज. श्री. टिळक (टिळक बंधू)
पृष्ठ संख्या : ७३५

किंमत : ५५० रुपये 

Sunday, 26 July 2015

निशाचर



''तू काहीही म्हण बरं का, थंडी प्रचंड होती. अगं आमचा जीव निम्मा केला त्या थंडीनी"

''तू सुरवातीपासून सगळं निट सांग, विष्णूनी नेहमीप्रमाणे अर्धवट सांगितलं''
''मी नेहमीप्रमाणे सुरवातीपासून सांगतो''
मग मी जरा सावरून बसलो. एक गोष्ट सांगायची होती. मी सांगणार होतो. ती पण मग जरा सावरून बसली. मी तोंडात प्राण आणून गोष्ट सांगायला सुरवात केली आणि तिने कानात प्राण आणून ऐकायला.

''त्यादिवशीचं शेवटचं लेक्चर संपलं आणि मी विष्णूच्या रूमवर गेलो. बसलो टाईम पास करत. रूमवर गेल्यावर दुसरं काय होणारे? विष्णू दोन-तीन दिवसात घरी जाणार होतं, बाळाला बघायला. विष्णूच मला म्हंटला कि आज थांब रूमवरच. जेवायला जाऊ मस्त, बसू गप्पा मारत रात्रभर. ठरलं. मी बाबांना फोन करून सांगितलं. आणि आश्चर्य म्हणजे बाबासुद्धा लगेच मान्य झाले.

मग मी आणि विष्णू जेवायला गेलो त्याच्या मेसवर. भरपूर जेवलो आणि पुन्हा रूमवर आलो. बसलो गप्पा मारत. त्या गप्पांना कोत्याही विषयाचं बंधन नसतं. ब्रह्मसूत्रापासून कामसूत्रापर्यंत. दहा साडे दहा झाले रात्रीचे. अभीपण त्याच्या त्याच्या रूम वर गेला. विष्णूचे बाकीचे रूममेट पण सगळे झोपले. आम्ही दोघं निशाचर! आम्हाला कुठली झोप यायला. आम्ही टक्क जागे. आता बाबांकडून परवानगी मिळवून थांबलो रूमवर आणि काय झोपायचं? छे! मी विष्णूला म्हणतलो चल फिरायला जाऊ. रूमवर बसून काय करायचय. आम्ही निघालो. ५ पावलं गेलो असू तेवढ्यात विष्णू म्हणाला मुकुल आपल्याकडे गाडी आहे. मी त्याला म्हणलो ''मग किल्ली घेऊन ये'' विष्णू पळत पळत परत गेला आणि गाडीची किल्ली घेऊन आला. गाडी होती पल्सर १८०. मी गाडीवर बसलो विष्णू अजून उभाच होतं. मी गाडीचा जरा अंदाज घेतला विष्णूकडे पाहिलं आणि म्हणतलो, ''मग, कुठे जायचं?''

''तू बोल. पुण्यात काय काय आहे बघण्यासारखं?''
''पुण्यात खूप काय काय आहे बघण्यासारखं, पण रात्री नाही. दिवसा बघण्यासारखं खूप आहे आणि विष्णू पुण्यातल्या गोष्टी कधीही बघता येतील रे.''
''मग कुठे जायचं?''
थोडा पॉज घेऊन मी म्हणलो, ''लोणावळा?''
''लोणावळ्यात रात्रीचं काय बघायचं आणि हायवे वरून जावं लागेल ना? मग नको!''
मग आम्ही दोघंही बराच वेळ गप्पच राहिलो. काहीच सुचत नव्हत. जे सुचत होतं तो मूर्खपणा होता किंवा बालीशपणा. आम्हाला दोन्हीही करायचं नव्हतं. विष्णूनी अचानक माझ्या खांद्यावर हात ठेवला.
''मुकुल मी आजपर्यंत आयुष्यात समुद्र पाहिलेला नाही!''
त्याच्या डोक्यात काय सुरु आहे याचा मी अंदाज बंधू लागलो. मला अंदाज बांधणं सुद्धा अवघड जात होतं. तेवढ्यात विष्णू म्हंटला' ''मुकुल श्रीवर्धन?''

मी भानावर आलो. श्रीवर्धन म्हणजे पौड, मुळशी, आख्खा ताम्हिणी घाट, माणगाव म्हणजे जवळ पास १५० किमीच अंतर. रात्रीच्या ११ वाजता. 
मी विष्णूला म्हणलो, ''भाई आज कुछ तुफानी हो जाये? बैस गाडीवर" मी गाडीला किक मारली. गाडी कुलकर्णी पेट्रोल पंपावर नेली. ५०० चं पेट्रोल भरल. अचानक इतका उत्साह कुठून आला काय माहिती. बहुतेक नुसत्या ताम्हिणीच्या आठवणीनी हा उत्साह आला असावा. विष्णू समुद्र बघायचा म्हणून उत्साही होतं, आणि मी रात्री बघणार म्हणून.

आम्ही निघालो. कुलकर्णीवर पेट्रोल भरलं. कर्वेरोड वरून चांदणी चौक. प्रचंड थंडी होती. आम्हा दोघाजणांमध्ये मिळून एक रुमाल होतं. बहुतेक सर्ववेळ गाडी मीच चालवली, पण विष्णूनी पण थोडा वेळ गाडी चालवली. जो कोण गाडी चालवत असेल तो रुमाल बांधत असे. थंडीच फार होती. चांदणी चौक म्हणजे जिथे हमखास पोलीस असतात. पण ११ वाजता रात्री कोण असणारे. कोणीही नव्हतं. मी सुसाट चालवत होतो गाडी. गाडी पल्सर होती यार. पण थंडी फार होती. नाक, कान, हताची बोटं गार पडली. बधीर झाली. तरी गाडी ताणात राहिलो. अजून आम्ही भूगावपर्यंत सुद्धा पोचलेलो नव्हतो. पहिल्या उत्साहात ठरवलं श्रीवर्धन पर्यंत जायचं. पण थंडीनी उत्साहाचा बर्फ केला. पण आम्ही 'इतरांप्रमाणे' नाही. पहिला उत्साह मावळला कि गळून जणारे. आम्ही टिकून राहिलो. पण हाताची बोटं काम करेनात. पाय काम करेनात. मी गाडी साइड्ला लावली. खाली उतरलो. विष्णूला विचारलं,

''भाई क्या करे?'' तर विष्णू तोंड वर करून कसा म्हणतो, ''एक बार जो हमने कमीटमेंट करली तो मै अपने आप कि भी नाही सुनता!'' हाणला पाहिजे कि नाही.  हात, पाय बधीर झालेत आणि डायलॉगबाजी करता साला. पण माघारी जायचं नाही हे ठरलं. पुन्हा एकदा नव्या उत्साहानी निघालो. आताचा उत्साह केवळ वरवरचा नव्हता. आता सिरीयसली ठरलं. भूगाव, पौड, पिरंगुट पर्यंत आपण शहराच्या बाहेर आलोय असं वाटतच नाही. खर फिरायला निघाल्याचा फील पौड सोडलं कि सुरु होतो. तशी खरी थंडी पण पौड सोडल्यानंतर सुरु झाली. वस्ती सोडून गावाच्या बाहेर आलो आणि चांगलीच थंडी सुरु झाली. मग काही वेळ विष्णू नी चालवली गाडी. जमत नाही जमत नाही म्हणतो पण चांगली चालवत होता गाडी.

पौड पासून मुळशी गावापर्यंत विष्णूनी चालवली गाडी. मी मागे बसून होतो. पौडपर्यंत रस्त्यावर गाड्या होत्या त्यामुळे काहीतरी आधार होता. जिवंतपणाच काहीतरी लक्षण होतं. पौडपासून तोही आधार गेला. उगाच कुठेतरी एखादी गडी दिसायची. त्यादिवशी पौर्णिमासुद्धा होती. काय मस्त चांदणं पडलं होतं. त्याला उपमाच नाही. चंद्रासारख चांदणं पडलं होत. दिवसभर भरपूर खेळून दमलेल्या मुलासारखं सगळं आसमंत शांत झोपलं होतं. कुठेही जोरात हवा नाही, कोणत्याही प्राण्या-पक्षायचं ओरडणं नाही. माणसांचा गलका नाही. या शांततेतही कोणतातरी अवाज असतो. गुलजारच्या एका गाण्यात आहे बघा- ''वादी मै गुंजती हुई खामोशीया सुने''

अगदी तस्सच. त्या शांततेत आमची गाडी खूपच आवाज करत होती. गाडीचा आवाज त्रास देत होता, पण थांबणं परवडणार नव्हतं. मुळशी धरणाचं पाणी जस दिसायला लागलं तसं आपण काय करायला निघालो आहोत त्याची भव्यता आणि मूर्खपणा लक्षात यायला लागला. थंडी वाजत होतीच. मी विष्णूला म्हणलो गाडी जरा हळू चालव. मी जॉगिंग करतो थोडा. एक-दीड किलोमीटरचा रस्ता मी जॉगिंग केलं. शरीर जरा गरम झालं. गाडी मी घेतली मग चालवायला. मुळशी धरणांच पाणी सुरु झालं होतं. म्हणजे आता पुढचे १२-१५ किमी हे पाणी आणि त्याबरोबर थोडासा अजून गारठा हा सोबतीला आला. पण फारच थंडी वाजायला लागली. तेव्हा मात्र आम्ही चक्क गाडी बाजूला  लावून रस्त्यावर २५-२५ डीप्स मारले. जोर मारले. अंग पुन्हा थोडं गरम झालं. गाडी पुन्हा सुरु केली. आताशी १२:३० वाजत होते. अजून संपूर्ण रात्र जायची आहे. त्यानंतर उत्तररात्र आहे. तेव्हा थंडी अजून वाढेल. १२ ची थंडी सहन होत नाहीये आणि पहाटेची कशी होईल. पण ठरवलं म्हणजे ठरवलं!

बॅकवॉटर संपेपर्यंत मग मात्र आम्ही थांबलो नाही. काकडत, कुडकुडत आम्ही धारण पार केलं. जिथे जलाशय संपतो तिथून लगेच घाट सुरु होतो. तिथे एक स्कोर्पियो आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली. मी विचार केला. आता रात्रीचा एक वाजलाय. आपण महाराष्ट्रातल्या एका अवघड घाटातून टू व्हीलर वरून प्रवास करतोय. आपलं काहीही होऊ शकत. कोणी सोबत असलं तर बर. अनायासे हा स्कोर्पियोवाला आला आहे. त्याला धरून ठेवावा. पूर्ण घाट मी त्याच्या पुढे जाऊ दिला नाही, मी ही त्याच्या पुढे गेलो नाही. हा डोळ्यासमोर असलेला बरा. 'काही होईल या भीतीमध्ये आणि स्कोर्पियोवाल्याला सोडायचं नाही' या नादात चांदण्याच्या प्रकाशात हा भव्य सह्याद्री कसा दिसतो हे बघायचचं राहून गेलं. माझं सगळं लक्ष वेग, रस्ता आणि स्कोर्पियोवरच. मुख्य सौंदर्य बघायचं राहून गेलं. तरी सुद्धा ते काळे डोंगर, प्रचंड दरी, तुफान जंगल जे चांदण्याच्या प्रकाशात दिसत होतं ते सांगायला शब्द नाहीत. तू अनुभवच मुळातून घ्यायलाच हवा. सांगून तो समजणारच नाही. घाटातच एक ठिकाणी 'पुणे जिल्हा-हद्द समाप्त' आणि रायगड जिल्ह्यात आपले स्वागत आहे' अश्या गद्य पाट्यांनी आम्ही किती लांब आलो आहोत हे सांगितलं. पुण्यापासून चांगलं ८०-८५ किमी लांब आलो होतो आम्ही. ताम्हिणी हा महाराष्ट्रातील सर्वात अवघड घाटांपैकी एक. तो आता राखीव जंगलाचा भाग आहे. त्यात रात्रीची वेळ. या सगळ्याची एक थोडीशी भीती माझ्या मनात होतीच. त्यामुळे कधी घाट संपतोय असं झालेलं. 'घाट समाप्त' च्या पाटीनी एक सुकून दिला. आम्ही थांबलो. याच्याआधीचा स्टॉप आम्ही धरणापाशी घेतलेला. आता गाडीवरून खाली उतरलो तर उभ सुद्धा राहता येईना. पाय गाडी चालवून आणि थंडीनी जाम आखडले. हालवताच येईनात. या परिणामाची कल्पना नव्हती. तसं खरं म्हणजे कोणत्याच परिणामांची कल्पना नव्हती. म्हणून तर इतक मोठ डेअरिंग करत होतो. पण पाय जाम दुखत होते. मग काही वेळ विष्णूनी गाडी घेतली.

माणगावपर्यंत मग विष्णूनी गाडी चालवली. माणगावच्या रस्त्यावर आम्ही एक अचाट प्रकार बघितला. काय २ वगैरे वाजले असतील. एक वळण पार करून पुढे आलो तर पांढरा शर्ट घातलेला कोणी एक पाठमोरा बसलेला. त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. जवळपास गाडी नव्हती. वस्तीसुद्धा लांब होती. ते बघताक्षणी काळजाचा ठोका मात्र चुकला. पुढे आल्यावर कळल कि त्याच्या समोर दोघजण काळं जर्किन घालून बसले होते आणि जेवत होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांची गाडी लावली होती. आणि गाडीवर पाटी होती MH १२. पाटी पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला. माणगावच्या थोडं अलीकडे पुन्हा मी गाडी घेतली. माणगावला पोचलो. पहाटे २ वाजता आम्ही माणगावमध्ये चहा पिला. अंगात थोडी गर्मी तयार झाली. तसाही घाट उतरून कोकणात आल्यामुळे थंडी थोडीशी कमी झाली होती, पण अगदी थोडीशी बरं का! आम्ही पुण्यापासून ११० किमी आलो होतो. अजुन ४०-५० किमी जायचं होतं. पाच मिनिटं थांबलो, जरा विश्राम घेतला. मुंबई-गोवा हायवे क्रॉस करून रस्ता बदलून निघालो. विष्णूसाठी समुद्र आता फक्त ४०-५० किमी दूर होतं. दोघही खूप excite झालो होतो.

आता चन्द्र पूर्ण डोक्यावर होता. आमची सावली आमच्या पायाखाली होती. रात्री दोन वाजता रस्त्यावर कोणत्याही गाडीची अपेक्षा नव्हती. शांततेचा अनुभव घ्यावा म्हणून मी गाड़ी बंद केली. गाडीचे लाईट बंद केले. पुढचा आनंद काय वर्णावा. ते पसरलेल चांदण अणि त्यानी तयार केलेल सुन्दर चित्र आम्ही उगाच डिस्टर्ब करतो आहोत अस आम्हाला वाटलं. अपराधी वाटलं. निसर्गाच्या कोणत्याही कलाकृतीला माणसाने हात लावू नये हेच खरं.  तरी आम्ही जास्तीत जास्त त्या चित्राशी एकरूप व्ह्यायचा प्रयत्न करत होतो. पण रस्ते कोकणातले. इच्छा नसताना गाड़ी सुरु करावी लागत होती, लाईट सुरु करावे लागत होते. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाने थोड्याच होतात. श्रीवर्धन आता १६ किमी राहिलं होतं. 

माझ्या डोक्यात अजुन एक कीड़ा आला. मी गाड़ी बाजूला लावली. पाठिवरची सॅक छातीवर घेतली.   रस्त्यावरून एखादी गाड़ी, ट्रक वगैरे येताना दिसला तर त्याच्या समोर आम्ही नाचलो. चांगल आठ - दहा गाड्यांसमोर नाचलो असे. आदिवासी लोकं नाचतात न तसे! त्या गाड्यांच्या ड्रायव्हरनी काय विचार केला असेल ह्याचा विचार येउन रस्त्यावर लोळून लोळून हसलो. हा काही मिनिटांचा मुर्खपणा पुढच्या आयुष्यात बळ देणारा ठरेल. हा मुर्खपणा आवरून गाड़ी सुरु केली अणि लगेचच वळण वळून पुढे आलो तर तिथे पोलिस चौकी होती. एका जरी ड्रायव्हरनी पोलिसाना सांगितलं असतंकी खाली दोन मूलं दारू पिउन धिंगाणा घालत आहेत, तर??? पोलिसनी किती, कसं अणि कुठे कुठे मरलं असतं?  

श्रीवर्धन गावत पोचलो. साधारण ३.३० झाले असतील. गाव सुनसान. शांत. इतकं शांत अणि सुनसान कोणतचं गाव मी कधीच पाहिलेलं नाही. इतक्यावेळेला श्रीवर्धनला येउन सुद्धा आज श्रीवर्धन नवीन बघत होतो. सगळ्या गोष्टींवर मंद, शांत चांदणं पडलेलं. उंच सुपरिचि, नारळाची झाडं संथ हालत होती. सगळाच कारभार संथ सुरु होता. कोणताही आक्रामकपणा नहीं, जोराचा वारा नाही. कुत्र्यांच भुंकण नाही, कोणाचं ओरडणं नाही. झाडांची पानं सुद्धा संथ हालत होती. बहुतेक हि नशा आंब्याच्या मोहोराची असावी. श्रीवर्धन मधला मुख्य रस्ता समुद्रापर्यंत जातो. तसं विश्वेश्वरच मंदिर, तहसीलदार ऑफिस, खोताची वाडी. असं मागे टाकत पुढे आलो. समुद्राच्या लाटांचा आवाज सुरु झाला. आता मात्र धीर धरवत नव्हता. कधी एकदा तो समुद्र बघतो असं झालेलं. डांबरी रस्ता संपला, लालमातीचा सुरु झाला. त्या लाल मातीवर समुद्राची रेतीसुद्धा सुरु झाली. जिथे रस्ता संपतो  तिथून तो रत्नाकर सुरु होतो. 'जेथे सागरा धरणी मिळते' तिथून. गाडी तशीच टाकून आम्ही समुद्राकडे पळत सुटलो. आवेग आवेग म्हणतात तो यालाच!!

चंद्र आता पश्चिमेकडे गेला होता. खाली काळशार पाणी त्यात चंद्रच प्रतिबिंब. लांब डोंगरावर काही दिवे लुकलुकत होते. बंदरावर काही जहाजं उभी होती. या सगळ्यावर चांदणं. या असल्या चित्रांचे फोटो काढायचे नसतात. या चित्रांची वर्णनं करायची नसतात. 'तो' जे दाखवेल ते आपण फक्त बघायचं असत. असल्या चित्रांची वर्णनं करायला शब्द पुरत नाहीत. कॅमेराचीहि तेवढी कुवत नसते. मी असले केविलवाणे प्रयत्न करत नाही. कोणीच करायचे नाहीत. जेवढ डोळ्यांनी पाहू शकतो तेवढ पाहिलं.

विष्णू खरच भाग्यवान. पहिल्यांदा समुद्र पाहिला आणि राजासारखा. किनाऱ्यावर आमच्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. कसलाही गलका नाही. गोंधळ नाही. शांत. बंदरावरची हालणारी जहाजं, चंद्राचं निथळणार प्रतिबिंब. त्या चित्राय सतत येणाऱ्या लाटांनी चैतन्य भरलं. ४ वाजले होते. पहाटेचा गार वर सुरु झालं होतं. सगळ अंग ठणकत होतं. त्या शांत मंद वाऱ्यांनी मला झोप लागली.

सकळी ६ वाजता आम्हाला जाग आली ती किनाऱ्यावर क्रिकेट खेळायला आलेल्या १०-१२ मुलांच्या गलक्यानी. मुलं मस्त वळून स्टंप ठोकून क्रिकेट खेळत होते. अंगावरची धूळ झटकत उठलो. रात्रीच्या थंडीचा मी जबरदस्त धसका घेतला. ऊन आल्याशिवाय मी गाडीवरच बसणारच नाही असं ठरवलं. सूर्य अजून उगवला नव्हतं. पण प्रकाश पसरला होता. रात्री पाहून झालेला समुद्र वेगळा आणि आता सकाळी पाहिलेला वेगळा. आम्ही मग काही वेळ पाण्यात जाऊन उभे राहिलो. खेळण्याच्या दुकानात गेल्यावर लहान मुलांचे चेहेरे कसे होतात, तसा विष्णूचा चेहरा झाला होता. अशात सात वाजले. सूर्यही उगवला होतं. आता अजून थांबणं परवडणार नव्हतं. थंडी अजूनही होतीच. पण आता निघाण्याशिवाय पर्याय नव्ह्ता. रात्री आम्ही दोघांनीही बरीच संयामानी गाडी चालवली. आता तसं संयम पाळून चालणार नव्हतं. याचं एकमेव कारण म्हणजे सकाळी लवकर घरी येतो असं बाबांना सांगितलं होतं. सातला समुद्राकडे आम्ही पाठ फिरवली.

रात्रभर झोप नाही, डोळ्यात वांर जाऊन जाऊन डोळे सुजलेले. रात्रीची जास्त झाल्यासारखे. प्रचंड चुरचुरत होते डोळे. परत येताना आम्ही अक्षरशः ३ तासात १५० किमी आलो. अजिबात संयम ठेवला नाही. सावध राहून, मस्त गाडी चालवत आलो. येताना मात्र संपूर्ण गाडी मी चालवली.  घरी पोचलो तर बाबांनी विचारलं, "काय रे, काय झालं डोळ्यांना?" आता काय सांगणार,

म्हणलो, '' अहो कुठे काय. झोपलो नाहीये ना रात्रभर!''

(ता.क. सर्व फोटो गूगल वरून घेतलेले आहेत. सर्वच नियोजन अचानक ठरल्यामुळे चांगला कॅमेरा आमच्याकडे नव्हता. मोबाईल सुद्धा खास नव्हता.) 

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....