आयुष्यात प्रथमच रोजच्या प्रवासासाठी मुंबई लोकलने प्रवास करायची वेळ आली. त्यातसुद्धा माझं राहतं घर पनवेलमध्ये आणि ऑफिस मीरा-भायंदरला असल्यामुळे हार्बर लाईन आणि वेस्टर्न लाईनने रोज सुमारे ८ तास प्रवास करावा लागत होता. पनवेलहून सकाळी ७ वाजता गोरेगावसाठी एक लोकल आहे. ती लोकल पकडण्यासाठी साडेसहाला घरून निघायचं, 6:58 ची गोरेगाव लोकल पकडायची तिथून 8:18 ला बांद्र्याला उतरायचं, तिथून 8:28 ची विरार फास्ट. त्याने 9 ला भायंदर स्टेशनला. तिथुन ऑफिसच्या बसने 10 वाजता ऑफिसला पोचायचं. 10 ते 6 काम करायचं. पुन्हा 6 वाजता ऑफिसच्या बसने भायंदर स्टेशनला, तिथून चर्चगेट स्लो लोकलने गोरेगाव, गोरेगावहुन 7:40 ची पनवेल. रात्री १० वाजता घरी. असा सुमारे दोन महिने रोज प्रवास केला. वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वे ही मुंबईची वाहिनी. मुंबईचा जीव. ज्याने या लाईन्सच्या लोकलने प्रवास केला तो मुंबईचा झाला असं म्हणतात.
त्यात सुद्धा अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आल्यामुळे होणारी धावपळ. लांबचा प्रवास करणाऱ्यांचे बनलेलं ग्रुप, त्यांची एकमेकांची सुरु असणारी टिंगल, एकमेकांच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण शेअर करण्याइतकी त्यांची जमलेली जवळीक, त्यापैकी एखादा एखाद्या दिवशी आला नाही तर होणारी अस्वस्थता आणि दुसऱ्या दिवशी आठवणीने त्यांची ख्याली-खुशाली विचारण्याची तत्परता! मी हेही पाहिलं की त्यामध्ये कोणीतरी एक असा असतो जो रोज रोजचा पेपर घेऊन येतो आणि आणि त्या ग्रुपमधले आळीपाळीने तो पेपर वाचतात. कोणीतरी काहीतरी खायला आणतो. डब्यात सुरु असणारी भजनं हा एक विशेष फेनॉमेना आहे. खड्या आवाजात, टाळ मृदूंग वगैरे साज सजवून हा कॉर्पोरेट वेशातला वैष्णवांचा मेळा ही मला अलौकिक गोष्ट वाटली.
मुंबई हा असा एक विलक्षण केऑस आहे, पण त्यामध्ये काहीतरी एक सिमिट्री आहे. डब्यातून उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांसाठी केवळ १० सेकंड मिळतात. त्यामध्ये एक सिस्टीम निर्माण झाली आहे. मधल्या बारच्या एका बाजूने उतरणारे उतरतात, दुसऱ्या बाजूने चढणारे चढतात. रात्री १० वाजता सुद्धा स्टेशनमधून बाहेर पडल्यावर बससाठी लोकं लाईन लावून उभे राहतात. अंधेरी स्टेशनवर जेव्हा विरार लोकल लागते तेव्हा युद्धाला सैन्य आरडा-ओरडा करत निघतं तसे लोकं डब्यात घुसतात. आपण जर उतरणाऱ्यांपैकी असलो तर ज्या दिशेच्या डब्यातून उतरायचं आहे त्याच्या विरुद्ध दिशेच्या दरवाज्यात जाऊन उभं राहायचं. प्रचंड घोळका आक्रमण करतो, आपापल्या ठरलेल्या जागी जाऊन बसतो किंवा उभा राहतो. लोकांच्या डब्यात उभं राहायच्या जागाही ठरलेल्या आहेत. सगळे आपापल्या ठिकाणी सेट झाले की गर्दीतून वाट काढत आपण डब्यातून बाहेर उतरायचा प्रयत्न करायचा. त्या प्रचंड गर्दीमध्ये कोणीतरी असा असोतच ज्याला विमल खायची असते. तो गर्दीतून वाट काढत काढत दरवाज्यात येतो कारण त्याला थुंकायचं असतं. लांबच्या प्रवासाला जाणारे सीट सोडून दरवाज्यात बसून असतात. त्या सगळ्या गर्दीत असा कोणीतरी असतोच जो आपले हेडफोन घरी विसरलेला असतो किंवा तो तसदीच घेत नाही हेडफोन लावायची. त्याच्यावर विचित्र चालीमधली भोजपुरी गाणी लावलेली असतात. एक मिडल एज काका असतात त्यांना तिघाजणांच्या सीटवर चौथा म्हणून अड्जस्ट करून बसायचं असतं. पावसामध्ये एक कुंद वातावरण तयार होतं, लोकलची दारं बंद होतात, खिडक्या खाली पडतात, ओल्या छत्र्या डब्यात येतात, काही ओल्या जर्किनसह तसेच डब्यात शिरतात.
सर्व रस्त्यांवर सुरु असलेली मेट्रो, फ्लायओव्हर, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे, त्यात कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ वगैरे मोठे प्रोजेक्टतर आहेतच. लोकं ट्राफिकमध्ये अडकतात, पावसात सापडतात, केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ट्रॅफिक स्लो होतं. वेस्टर्न लाईनवर मेट्रो आहे, लोकल आहे, ६ लेनचा हायवे आहे. आणि तिन्ही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट लोकांनी पूर्ण भरलेले आहेत. ईस्टर्न हायवे आणि वेस्टर्न हायवे जोडणारे लिंक रोड कोणत्याही वेळेला ट्रॅफिकने जाम आहेत. घोडबंदरचा घाट केवळ हेवी व्हेईकल चालवणाऱ्यांच्या बेशिस्तीमुळे ५-५ तास ब्लॉक होतो, अंधेरी, गोरेगाव, दहिसर, तीन हात नका, कुर्ला, टिळक नगर, मानखुर्दचा पूल आणि अशी असंख्य ठिकाणं जिथे ट्राफिक जॅम असणं ही रोजची व्यवस्थाच झाली आहे. पण लोकं आंदोलन करत नाहीत. चिडत नाही. त्रागा करत नाही. आपल्या नगरसेवकाला जाब विचारात नाही, आमदाराला प्रश्न विचारत नाहीत, खासदाराला वेठीला धरत नाहीत. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘चित्ती असो द्यावे समाधान’ हे रोज जगणारा सामान्य मुंबईकर!
रोज दोन्ही वेळेला मुंबईकरांच्या या लीलांचे मी निरीक्षण करत होतो. थोडं थोडं स्वतःला या प्रचंड केऑसमधल्या सिमिट्रीमध्ये कुठे जागा मिळते ते शोधायचा प्रयत्न करत होतो. मी हे फक्त दोन महिने पाहिलं, पण वर्षानुवर्षं प्रवास करणारे लाखो मुंबईकर आहेत. एक दिवस ऑफिसहुन घरी जाताना लोकलच्या डब्यात माझ्या समोर बसलेल्या, थकलेल्या एका मध्यमवयीन माणसामध्ये मला ‘फारूक शेख’ दिसला. खुरटी दाढी वाढलेला, आउट केलेला पेल येलो रंगाचा शर्ट, मांडीवर ठेवलेली सॅक आणि खिडकीतून बाहेर शून्यात स्थिरावलेली नजर. ती नजर एक हेतू शोधत होती. हे सगळं कशासाठी सुरु आहे? ‘दिल हैं तो धडकने का बहाना कोई ढूंढे!’ हे सगळं कशासाठी सुरु आहे? अशी कोणती ऊर्जा आहे जी मुंबईकराला रोजच्या धक्क्यांमधून, अस्वच्छतेमधून, गर्दीतून प्रवास करण्यासाठी बळ देते, ‘सीने में जलन आँखों में तूफ़ान सा क्यूँ है? इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यूँ है’? दोन महिन्यांच्या या अत्यंत दमवणाऱ्या प्रवासानंतर, निरीक्षणानंतर, अनुभवानंतर आणि दोन महिन्यांसाठी मुंबईकर झाल्यानंतर मी स्वतःला विचारत होतो, ‘क्या कोई नई बात नज़र आती है हम में, आईना हमें देख के हैरान सा क्यूँ है!’
© मुकुल रणभोर
https://www.youtube.com/watch?v=ze-UUg63QO8&list=RDze-UUg63QO8&start_radio=1
No comments:
Post a Comment