Wednesday, 1 October 2014

शिवाजी 'खरच' कोण होता? भाग - १

याला इतिहासाशी इमान राखून लिहिणे म्हणतात का? 



'हिंदू विरोध', 'हिंदुत्व विरोध', 'हिंदू देव देवतांच्या अवास्तव अपमानाचं अवास्तव समर्थन' अशा 'सेक्युलर' गोष्टींचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा सर्व 'समाजवादी', 'साम्यवादी', 'आंबेडकरवादी', आरक्षणवादी' (माझा आरक्षणाला बिनशर्त पाठींबा आहे), 'बमसेफी', 'मूलनिवासी', 'नास्तिकवादी', 'सर्व ब्रिगेडवादी', 'मुक्ती मोर्चा वादी' प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे पाठींबा देतात. या मागची मानसिक भूमिका काय असेल? हिंदू म्हणजे काय हे समजून न घेता, आणि हिंदू म्हणजे केवळ वैदिक असा गैरसमज जाणीवपूर्वक करवून घेऊन तयार झालेले हे सेक्युलर आहेत. याच परंपरेतले असल्यामुळे 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तकही 'सेक्युलर' परंपरेतले झालेले आहे. डाव्या चळवळीतला एक विचारवंत मध्ये म्हंटला सुद्धा कि, ''ब्राह्मणद्वेष पुरोगामित्वाला मारक ठरलेला आहे'' ह्याचा गांभीर्यानी पुरोगाम्यांनी विचार करायला हवा. शिवाजी 'खरच' कोण होता? या लेखांमागचे सर्व चिंतन 'शिवाजी कोण होता?' या कॉ. गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून सुरु झालं आहे. पानसरे ज्या घटनेचा जाणीवपूर्वक उल्लेख करतात ते म्हणजे या पुस्तकाच्या निर्मितीची कहाणी. 'शिवाजी कोण होता?' या विषयावर नागपूरच्या 'धनवटे' कॉलेजच्या सभागृहात २ दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. तिकिटे लावून दोन दिवस हि व्याख्यानमाला झाली. हे धनवटे कॉलेज म्हणजे जिथे 'भांडारकर तो झाकी है, शनिवारवाडा अभी बाकी है' अशा शीर्षकाची पुस्तके लिहितो तो प्राध्यापक मा. म. देशमुख तिथे इतिहास शिकवतो. म्हणजे पूर्वी शिकवत असे. धनवटे कॉलेजमध्ये इतिहास शिकवणारा हा प्राध्यापक आणि त्याच कॉलेज मध्ये 'शिवाजी कोण होता?' या विषयावर दोन दिवसांची व्याख्यानमाला हा निव्वळ योगायोग आहे अस मला वाटत नाही. जर धनवटे कॉलेजचा पुस्तकाच्या निर्मितीमध्ये काही वाटा असेल तर ते इतिहासाशी इमान राखून नाही. माझा अस स्पष्ट म्हणण आहे कि साम्यवादी आणि विवेकवादी संघटनांनी      ( या मध्ये हे दोनच 'वादी' का? तर ह्या दोन संघटना कोणत्यातरी तात्विक पायावर उभ्या आहे, केवळ दुसऱ्याच्या द्वेषावर नाही. )अशा लोकांना आपल्या कामापासून दोन हात दूर ठेवावं हेच खरं.


मला असं वाटतं कि गोविंद पानसरे पुस्तकाच्या सुरवातीला ऐतिहासिकदृष्ट्या सत्य मुद्दे सांगून वाचकांचा विश्वास संपादन करतात आणि पुढे मोठ्या आत्मविश्वसनी अर्धसत्य मुद्दे सांगतात. सुरवातीला विश्वास संपादन करून पुढच्या अर्धसत्याची ते तयारी करत आहेत. पुस्तकाच्या सुरवातीची प्रकरणे वतनदारी नष्ट केली, शेतसा-याची पद्धत, स्त्रियांचा सन्मान आणि सुरक्षितता, शेतकऱ्यांसाठी जाणता राजा, उद्यागांना आणि व्यापाऱ्यांना संरक्षण असे सर्वस्वी महत्वाचे आणि संपूर्ण सत्य ते मांडतात. पण पुढचे मुद्धे इतिहासाला धरून आहेत असं बिलकुल वाटत नाही. हे लिखाण इतिहासाशी इमान राखून केलेलं नाही.

सर्वात महत्वाचा मुद्धा. तुम्ही जेव्हा शिवाजी राजांवर एखादे पुस्तक लिहित आहात आणि ते वैचारिक आहे म्हणजे कादंबरी किंवा कथा, कविता नाटक नाही. तर एक वैचारिक पुस्तक लिहिता तेव्हा संदर्भग्रंथसूची सर्वात महत्वाची आहे. म्हणजे कोणत्या ग्रंथातून कोणतं मुद्दा घेतलेलं आहे. तशी सूची पानसरे देतात. त्या सूची मध्ये एकूण ४३ ग्रंथ आहेत. पण त्या ४३ ग्रंथांच्या यादी मध्ये एक 'सभासदाची बखर' सोडली तर एकही समकालीन पुरावे नाही. शेवटी समकालीन पुरावा म्हणून जे वापरल तर एक 'बखर?' (इतिहासशास्त्राचा असा संकेत आहे कि बखरींचा पुरावा म्हणून वापर करतान काही मर्यादा ठेऊन करावा) पण ते जाऊदे. सभासदाच्या बखरीमध्ये 'कृष्णाजी अनंत सभासद' स्वतः अस सांगतात कि या बखरीचे लेखन १६९७ मध्ये राजाराम महाराजंच्या देखरेखीखाली जिंजीच्या किल्ल्यात झाले आहे. याचा अर्थ सभासदाची बखर मराठ्यांच्या इतिहासाला समकालीन असली तरी शिवाजी राजांना समकालीन नाही. पानसरे एका भाषणात असं म्हणाले होते कि, ''भूषण नामक एक कवी होता पण तो विश्वासार्ह नाही. त्यामुळे 'अगर शिवाजी होतो, तो सुनते होती सबकी' यावर विश्वास ठेवायची गरज नाही.'' गरज नाही? सभसदापेक्षा कवी भूषण शिवाजी राजांना समकालीन आहे. त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही आणि तरी म्हणत राहणार 'इतिहासाशी इमान राखून' याला काही अर्थ नाही. अहो या भूषणाच सोडून देऊ पण या संदर्भग्रंथसूची मध्ये परमानंद नाही, जेधे शकावली नाही, जयराम पिंडे नाही, भूषण नाही, रामदास स्वामींचा साहित्य नाही. समकालीन संदर्भ न देता पण इतिहासाशी इमान असलेल हे कदाचित एकमेव शिवरायांच चरित्र असावं.

समकालीन संदर्भ न देण्याची गांभीर्यता लक्षात यावी यासाठी एक दोन उदाहरणं लक्षात घेणं जरुरीच आहे. 'कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर' हा शिवाजी राजांचा १६५६ पासूनचा सहाध्यायी आहे. १६७४ पर्यत तो महाराजांबरोबर आहे. त्यानंतर कदाचित त्याच मरण झालं असावं. त्यांनी जी शिवाजी महाराजांवर चरित्रात्मक आणि काव्यात्मक (एकाच वेळी) जो ग्रंथ लिहिला त्याच नाव आहे 'अनुपुरण' किंवा 'शिवभारत'. हा ग्रंथ मी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून लिहितो आहे अस परमानंद यात म्हणतो आहे. शिवभारतात ३४ पूर्ण अध्याय असून ३५ व्या अध्यायात ९ श्लोक आहे. शिवाजी राजे जेव्हा अफझलखानाला भेटायला गेले त्यांच्याबरोबर जे १० जणं अंगरक्षक म्हणून गेले त्या दहाही जणांची यादी या शिवभारतात देलेली आहे. अन्यत्र इतकी अचूक नावं दिल्याचं सापडणार नाही. शिवभारतात राज्याभिषेकाच वर्णन नाही. कारण कदाचित कवी तोपर्यंत जीवंत राहिला नसेल. पण शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून ग्रंथाची रचना होते आहे, याला ऐतिहासिक महत्व आहे का नाही? कॉ. पानसरे परमानंद संदर्भ ग्रंथ म्हणून वापरत नाहीत पण ग्रॅंड डफ् वापरतात. समकालीन व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण उत्तरकालीन आणि परदेशी व्यक्तीवर विश्वास ठेवणार, याला इतिहासाशी इमान राखून म्हणायचं का? त्याच प्रमाणे 'कवी भूषण' हा कनोजी ब्राह्मण शिवरायांची कीर्ती ऐकून महाराष्ट्रात आला आणि शिवाजी राजांना भेटला. शिवरायांनी औपचारिक जाहीर जरी केलं नसलं तरी तो शिवाजी महाराजांच्या दरबारातील राजकवी आहे. त्यांनी राजांवर जे काव्य रचलं. त्यावरही आपला विश्वास नाही का? बरं ! फादर हेरास यांनी पोर्तुगीज मधून एक कागद प्रसिद्ध केला, तो संभाजी राजांचा आहे. मूळ कागद १२ फुट लांब आहे. त्यावर संभाजी राजांचा हस्तक्षर आहे. त्यामध्ये संभाजी राजे शहाजी राजे आणि शिवाजी राजांबद्दल गौरवोद्गार काढत आहेत. पण हाही पुरावा पानसरे यांनी संदर्भ म्हणून दिलेला नाही. 'रामचंद्रपंत आमात्य' यांची आज्ञापत्र त्यांनी वापरली आहे, पण सोयीप्रमाणे. कदाचित साम्यवादी असल्यामुळे आर्थिक बाबींवर थोडा भर जास्त आहे. फक्त आर्थिक विषयांशी निगडीत अशीच आज्ञापत्र त्यांनी वापरलेली आहे. मग किमान असं म्हणू तरी नये की इतिहासाशी इमान आहे.

'कारनामा' म्हणजे कर्तबगारी या नावाचा एक ग्रंथ उपलब्ध आहे. तो मुसलमान सरदारांच्या औरंगजेबाशी असलेल्या पत्रव्यवहाराचा संग्रह आहे. तो हि या संदर्भग्रंथसूची मध्ये नाही. देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षानी आणि प्रत्येक विचारधारेनी स्वतःच्या गरजेनुसार, सोयीनुसार शिवाजी राजांच्या कर्तृत्वाचा अन्वयार्थ लावलेला आहे. काही प्रमाणात ते मला स्वाभाविकही वाटत. भगवद्गीतेप्रमाणे शिवाजी महाराजांचा आयुष्य सुद्धा संदिग्ध, त्याच वेळी गुंतागुंतीच आणि अनेक पदर असलेला असल्यामुळे अनेक अन्वयार्थ निघू शकतात. 'शिवाजी कोण होता?' हे प्रत्येकांनी आपापल्या विचारधारेनुसार मांडावं पण निम्मेअर्धे, सोयीचे पुरावे देऊन नव्हे. महाराजांना महाराष्ट्रात समकालीन पुरावे कोणते, महाराष्ट्राबाहेरील समकालीन कोणते? महाराष्ट्रातले उत्तरकालीन, महाराष्ट्राबाहेरचे उत्तरकालीन कोणते? हे इतिहासशास्त्रानी प्रमाण ठरवून दिलेला आहे. त्याच्या मर्यादेतच शिवाजी महाराजांची मांडणी झाली पाहिजे. निम्म, खोटं, असत्य सांगून काय मिळतं? आपला अजेंडा लोकांवर बिम्बावाण्यासाठी किमान इतिहासाचा वापर करू नका.

No comments:

Post a Comment

Featured post

सेक्स, धर्म, गुलामगिरी आणि इस्लमिक स्टेट

प्रस्तावना : Sex विषयी भारतीयांची मानसिकता अजून बदलण्याची गरज आहे. याविषयी भारतात मोकळेपणाने अजूनही सार्वजनिक ठिकाणी बोलले जात नाही....